पारधी (हिरवे रावे) - जी. ए. कथा, एक आकलन

Submitted by अतुल ठाकुर on 23 October, 2015 - 20:56

11401036_673931332751942_6389343008102912853_n_0.jpg

जीएंच्या कथा वाचायचे व्यसन लागुन अनेक वर्षे झाली. मात्र जीए कथां मधुन नवनवीन अर्थ गवसण्याची प्रक्रिया संपत नाहीय. दहा वर्षापुर्वी वाचलेले जीए वेगळे, आता वाचलेले जीए वेगळे. काहीवेळा वाचताना असं वाटतं कि आता आपण अगदी कथेचा तळ गाठला. पण थोडक्याच कालावधीनंतर असं जाणवतं कि तो फक्त एक टप्पा होता. जीए आणखि खोल आहेत. आपल्याकडे अध्यात्मात आत्म्याच्या सर्वव्यापीपणाचे दृष्टान्त आहेत. त्याप्रमाणे जीएंच्या कथा या ब्रह्माण्ड व्यापुन वर दशांगुळे उरणार्‍या आत्म्याप्रमाणे जास्तीचा अर्थ घेऊन पुढे पुढे येत राहतात. आपण प्रौढ होत जातो तसतसे कथेचे आणखि पैलु समोर येतात. त्यामुळे जीएंच्या कथेचं हे आकलन वयाच्या एका टप्प्यावर केलेलं आकलन आहे. काही वर्षांनी कदाचित हीच कथा मला दुसरा अर्थ सांगेल असं मला प्रामाणिकपणे वाटतं. एक मात्र म्हणावंसं वाटतं कि जीएंच्या कथा मला कधीही "सेफ" वाटत नाहीत. कारण काही कथा वाचताना समोर आरसा येऊन अचानक त्यात आपलाच चेहरा दिसावा असं होतं आणि आपण दचकतो. कुठल्यातरी आग्यामोहोळाला अनवधानाने धक्का बसुन त्या विषारी माशा भोवती घोंघावायला लागतात. हे चावणारं वादळ शमवताना मग दमायला होतं. त्यामुळे जीएंच्या कथांवर लिहायचं म्हणजे लिहितानाच आपलं भांडं डचमळु नये यासाठी देखिल प्रयत्न करावे लागतात. "पारधी" या कथेचे मला फार पूर्वीपासुन आकर्षण वाटते. एक नामवंत वकील, दादासाहेबांच्या आयुष्यातील काही तासांवर आधारलेली ही कथा त्यांच्या सार्‍या आयुष्याचे सार सांगुन जाते. त्यांनी स्विकारलेली मुल्ये, त्यासाठी मोजलेली किंमत, त्यांना लोकांबद्दल वाटत असलेला तिरस्कार, तो दिसु नये म्हणुन त्यांनी अंगिकारलेला मुखवटा याच्या अवतीभोवती ही कथा विणलेली आहे. कथेची सुरुवात कोर्टाच्या निकालापासुन होते. दादासाहेब जिंकतात. गुन्हेगाराला जन्मठेप होते. पण एकुणच शिकारी वृत्तीच्या दादासाहेबांना फारसा आनंद होत नाही. सारे काही सरळसोट झालेले असते. आरोपी यल्लुभीमा मुळात बचावासाठी काही करतच नाही. निकाल ऐकल्यावर तो इतरांबरोबर दादासाहेबांनाही नमस्कार करुन जातो. यल्लुभीमाबरोबरच दादासाहेबांचीही शिक्षा सुरु होते.

दादासाहेबांची शिक्षा यासाठी कि त्यांना कोर्टात लढायला मिळालेलं नसतं, धूर्तपणे जाळं टाकत शिकार करण्याचा आनंद त्यांच्यातल्या पारध्याला मिळालेला नसतोच, शिवाय यल्लुभीमा एक प्रश्न त्यांच्यासाठी टाकुन निघुन गेलेला असतो. एका सामान्य दिसणार्‍या बाईसाठी त्याने आपल्या मित्राचा खुन केलेला असतो. का? कशासाठी? हे प्रश्न कोर्टातुन घरी येताना दादासाहेबांना छळत असतात. आपल्या बायकोशी संबंध ठेवणार्‍या मित्राचा खुन इतका हा मामला सरळ नसतो. यल्लुभीमाला या संबंधांचा पत्ता लागल्यावर तो लगेच खुन करत नाही. काही दिवस जाऊ देतो. त्यानंतर तो कुर्‍हाडीचा वापर करतो. खुन केल्यावर स्वतःच चौकीत जाऊन खुनाची बातमी देतो आणि शांतपणे विडी शिलगावतो. एका सामान्य माणसाच्या मनाचा थांग लावण्याचा प्रयत्न दादासाहेब करीत असतात. आणि त्यांचे मन त्यांच्यासमोर, त्यांच्या घरात, त्यांच्या डोळ्यादेखत चाललेला प्रकाराची तुलना यल्लुभीमाच्या घटनेशी करु लागते. पहिली बायको गेल्यावर दादासाहेबांनी नटव्या, नखरेल माईंशी केलेले लग्न ही त्या रुपगर्वीतेला नामोहरम करण्यासाठी स्वतःशीच घेतलेली शपथ असते. माई घरात येते आणि पारध्याची शिकार पूर्ण होते. यानंतर दादासाहेबांमधला पारधी समोर घडणार्‍या घटना शांतपणे पाहात असतो. एकेकाळी खोर्‍याने प्रॅक्टीस असलेला आणि आता सारं काही गमवुन बसलेल्या एका पराभूत डॉक्टरचे माईशी राजरोस संबंध असतात. हा डॉक्टर त्यांच्या घरात येऊन त्यांचा पाहुणचार घेतो. बायकोकडुन त्यांच्या पैशावर डल्ला मारतो. दादासाहेब हे माहित असुनदेखिल शांतच असतात. पण यल्लुभीमामुळे सारं ढवळलं जातं. स्वतःच्या आयुष्यातील प्रश्न यल्लुभीमाने त्याच्यापरीने पाऊल उचलुन प्रश्न संपवलेला असतो. जेलमध्ये जाताना आता यल्लुभीमा त्यांच्यासमोर जणु काही हा प्रश्न टाकुन जातो. मी हे केलं तु काय करणार आहेस? दादासाहेब हा प्रश्न कसा सोडवतात हीच कथा आहे.

घरात काय घराबाहेर काय सभ्यतेची परिसिमा गाठणारे म्हणुन प्रसिद्ध असलेले दादासाहेब शांत दिसले तरी तो शांतपणा त्यांच्या धोरणाचा एक भाग असतो. त्यांचं वागणं सारं काही समजुन उमजुन चाललेलं असतं. कपाटाची किल्ली हरवते, तेव्हापासुन कपाटातले पैसे चोरीला जातात, डॉक्टरला माई चोरुन पैसे पुरवतात, मुलगा घरात पाच दहा रुपये उचलतो, इतकेच काय आपण सिगारेट केस काढली कि आजुबाजुचे वकिल आशाळभूतपणे सिगरेट मिळेल या आशेने पाहतात. तेव्हा दादासाहेब अगदी सिगारेट देऊन काडीने पेटवुन देण्याचादेखिल नम्रपणा दाखवतात. का, तर एका सिगरेटच्या बदल्यात एक माकड नाचवायला मिळतं. हे आतलं विषारी हसु खास दादासाहेबांचं असतं. खास स्वतःसाठी. अरे तुम्हाला वाटतं तुम्ही मला मूर्ख बनवताय पण मीच तुम्हाला मूर्ख बनवत असतो. दादासाहेबांच्या जगण्याची ही पद्धतच असते. एरवी त्यांना या माणसांबद्दल अत्यंत तिरस्कार वाटत असतो. यांच्याशी कसली स्पर्धा करायची? माईचे उथळ वागणे, डॉक्टरांचे घरात धीटपणे वागणे हे सारे दादासाहेब एखाद्या स्वतः किल्ली दिलेल्या खेळण्यासारखे पाहात असतात. वाटेल तेव्हा बंद करता येण्याजोगे खेळणे. मात्र यल्लुभीमाने या सार्‍याला सुरुंग लावलेला असतो. तुला हे सारं माहित आहे हे या डॉक्टरलाही माहीत असेल तर? माईलाही माहीत असेल तर?? या एका विचाराने दादासाहेब मुळापासुन हादरुन जातात. म्हणजे आपण ज्यांना आजवर शिकार समजलो होतो ते खर्‍या अर्थाने शिकारी निघाले आणि आपणच शिकार ठरलो..जी माणसे आपल्या तावडीत आहेत असे आपल्याला आयुष्यवर वाटत आले त्यांनीच आपल्यावर कुरघोडी केली...या विचाराने ते अतिशय अस्वस्थ होतात. आणि तो निर्णय घेण्याचा क्षण समोर येऊन उभा ठाकतो. या निर्णयाने दादासाहेब पारधी आहेत कि आयुष्यभर त्यांचीच पारध झाली आहे याचा निकाल लागणार असतो.

जीएंच्या कथांमध्ये नियती शरणता हा एक धागा जरी असला तरी काहीवेळा त्यावरही पाय रोवुन उभी राहीलेली माणसं जीएंनी रंगवलेली आढळतात. मात्र जीएंच्या माणसांचे यश कधीही परिपूर्ण नसते. दादासाहेब प्रख्यात वकील. पण मुलगा सामान्य निपजतो. त्याचे डोळे त्याच्या आईसारखे म्हणजे दादासाहेबांच्या पत्नीसारखे असतात हा एकच दादासाहेबांना वाटणारा जिव्हाळ्याचा भाग. बाकी दादासाहेबांना त्याच्याकडुन कसलिही आशा नसते. असामान्य व्यक्तीमत्वाच्या अवतीभोवती जमा झालेली अतिसामान्य माणसे हा जीएंच्या कथेत दिसणारा नेहेमीचा दैवदुर्विलास आहे. यशस्वी माणसांच्या हाताला देखिल काही बाबतीत यश नसणे हा देखिल प्रकार जीएंच्या कथांमध्ये बरेचदा आढळतो. दादासाहेबांच्या घरातील झाडांना फुलेच लागत नाहीत. वास्तविक ही झाडे बेफाम वाढतात पण सगळी वांझ निपजतात. एकमेव लाल रंगाची कळी जी मोठ्या अपेक्षेने दादासाहेब कोर्टातुन आल्यावर फुलली असेल म्हणुन वर पाहतात तर ती डॉक्टरच्या कोटाला लावलेली दिसते. हे पाहात असताना दादासाहेब मनातुन चिडतात. माणसे काय झाडे काय सगळीच हरामखोर. त्यातुन यल्लुभीमाने समोर टाकलेला प्रश्न. घरात डोळ्यासमोर यल्लुभीमासारखंच काहीतरी घडत असलेलं. अशावेळी आयुष्यात अटळपणे निर्णय घेण्याची वेळ येऊन ठेपते. काही माणसे तेव्हाही निर्णय घेण्याचं धाडस दाखवत नाहीत आणि जगत राहतात. पण आपण मृत झालो आहोत हे त्यांना कळत देखिल नाही. काहीजण मात्र निर्णय घेतात. कारण त्यांना हे ठाऊक असतं की अन्यथा आयुष्य शेणाचे ठरणार आहे. आयुष्याला कणा देणारा हा निर्णय घेण्याची वेळ दादासाहेबांवरदेखिल येते. आणि दादासाहेब निर्णय घेतात...

जीए बारीकसारीक तपशील रंगवुन कथेला गडद करत असतात. दादासाहेबांचा ड्रायव्हर त्यांना पाहिल्याबरोबर अपराधी चेहर्‍याने विडी फेकुन देतो, कारण त्याला गाडीत सिगारेट पिण्याची दादासाहेबांनी सक्त मनाई केलेली असते. माईंच्या साडी नेसण्याच्या पद्धतीतुन तीचे सारे व्यक्तीमत्व जीए उभे करतात. माईचे बोलणे, तिचे वागणे, डॉक्टर बरोबरची तिची सलगी यातुन माई आणि डॉक्टर यांचे संबंध कुठल्या थराचे आहेत हे सूचित होते. मुलगा रमेश हा कणाहीन आहे हे एकाच प्रसंगातुन जीए दाखवुन देतात. दादासाहेबांच्या मनात चाललेली खळबळ हळुहळु वाढत जाते आणि पुढे ती वादळाचे रुप धारण करते हे अतिशय परिणामकारकरित्या जीए दाखवतात. कथा पुढे जात असताना क्रमाक्रमाने त्यातील भावना सघन होत जावी आणि पुढे ती चरमसिमेला पोहोचावी असा प्रकार या कथेत घडतो. आजुबाजुचे तपशील याला सहाय्यभुत ठरतात. त्यामुळे अगदी किरकोळ अशी स्वयंपाकिण काय किंवा गडी रामा काय कदाचित त्यांना एखाददुसराच संवाद असेल पण ही पात्रे कथेतील भावना जास्त अधोरेखित करीत असतात. एरवी निरुपद्रवी वाटणारी ही माणसे आता दादासाहेबांना चीड आणु लागतात कारण एकाच विचाराने त्यांचा आत्मविश्वास डळमळीत झालेला असतो, जर आपल्याला हे संबंध माहित आहेत हे डॉक्टर आणि माईला देखिल माहित असले तर?? दादासाहेबांमधला पारधी दुबळा होऊ लागतो. सारी श्वापदे जाळ्यातुन निसटतात. कोर्टातुन केस जिंकुन आपल्या गाडीतुन घरी आलेले दादासाहेब घरी डोळ्यासमोर घडत असलेल्या गुन्ह्याचे साक्षिदार, फिर्यादी आणि न्यायाधीश सुद्धा असतात. पारधी असलेले दादासाहेब आणि आपलीच पारध झाली कि काय या विचाराने अस्वस्थ झालेले दादासाहेब जीएंनी त्यांच्या मनातील आंदोलनातुन जबरदस्त उभे केले आहेत. आपले रहस्य कळले या विचाराने त्यांची चीडचीड होऊ लागते. कारण नसताना ते नोकरांवर डाफरतात, स्वयंपाकिणीचे हसणे देखिल आता त्यांना उबग आणते. आत्मविश्वास गमावलेल्या माणसाची शारीरीक मानसिक अवस्था दादासाहेबांच्या वागण्या बोलण्यातुन जाणवते. जीएंनी ही प्रमुख पात्रे उभी करताना वेशभुषा, देहबोली, संवाद, विचारांची आंदोलने यांचा प्रभावी वापर केला आहे.

जीएंच्या कथा हे त्यांचे जीवनावरचे भाष्य असते. हिरवे रावे हा कथासंग्रह १९६० सालचा आहे, रमलखुणा आणि सांजशकुन १९७५ सालातील. कथेला पुढे सूत्राचे स्वरुप येणे ही कथेची स्वाभाविक वाढ आहे असे जीए मानीत. पुढे पात्रे किंवा घटना कमी होत होत गणितातील सूत्रांप्रमाणे अ, ब, क असे स्वरुप कथेला येऊन त्यातुन नियतीने भोगायला लावलेल्या आयुष्यात काही पॅटर्न दिसतो आहे का हे पाहण्याचा जीएंचा प्रयत्न होता हे जीएंनी अनेकदा म्हटलं होतं. त्यानुसारच त्यांच्या कथेने वळण घेतले. जरी सांजशकुन किंवा रमलखुणासारख्या सूत्र सांगणार्‍या कथांना अजुन अवकाश होता तरी जीएंच्या कथेत या वळणाच्या खाणाखुणा सुरुवातीपासुन दिसतात हे म्हणायला वाव आहे. पारधी कथा अर्थातच याला अपवाद नाही. रोखलेल्या बाणाने लक्ष्याचा अचुक भेद करणे आणि शिकार साधल्यावर त्यातील सारा आनंद नाहीसा होणे हे दादासाहेबांच्या आयुष्यात घडत राहतं. सौंदर्याच्या तोर्‍यात दादासाहेबांकडे ढुंकुनही न पाहणार्‍या माईकडे पाहुन "पुन्हा लग्न करशील तर याच मुलिशी" असा निश्चय करतात आणि तो तडीलाही नेतात. मात्र त्यानंतरही ते क्लबमधुन परतण्याची रोजची वेळ खाली आणत नाहीत. शिकार संपली. ती साधण्यातला आनंद, तो तणाव, ती प्राप्त झाल्याचे समाधान संपले. त्यामुळे यश मिळाल्यावरदेखिल दादासाहेबांच्या आयुष्यात कायम असमाधान राहते. अतिसामान्य माणसे आजुबाजुला गोळा होण्याचे दुसरे दुर्दैव त्यांच्या आयुष्यात असतेच. यातुन अपरिहार्यपणे येणारे नैराश्य, इतरांबद्दलचा विषारी उपहास, चीड त्यावर यामाणसांना एखादा पारधी शिकारीला जाळ्यात पकडुन खेळवतो त्याप्रमाणे खेळवणे हा दादासाहेबांमधल्या पारध्याने शोधलेला उपाय आहे. जीएंच्या या कथेचे एक वेगळेपण म्हणजे जरी त्यांच्या नियतीशरणतेचा धागा येथे दिसला तरी त्यासमोर दादासाहेब झुकलेले नाहीत. पदरी असमाधान असेलही पण दादासाहेब त्यावर पाय रोवुन उभे आहेत. ते हरलेले नाहीत. उलट त्यांच्यावर स्वार होऊ पाहणार्‍यांची पारध करण्याचा मार्ग त्यांनी धरला आहे.

जीएंचे कथावाङमय अभ्यासले तर दादासाहेबांशी काहीसे साम्य दाखवणारी व्यक्तीमत्वे त्यांच्या काही कथांमध्ये दिसुन येतात. "पुरुष" कथेतील प्राध्यापक निकम, "पडदा" कथेतील प्रिसिपॉल जठार, "माणुस नावाचा बेटा" मधील दत्तू, ही सारी माणसे अतिसामान्य माणसांच्या घोळक्यात सापडलेली, मात्र या घोळक्यापासुन सुटका होऊ न शकलेली, त्यामुळे आजुबाजुच्या माणसांबद्दल तिटकारा या लोकांच्या मनात ठासुन भरलेला. ही सर्व माणसे अलिप्त राहुन या सामान्य माणसांचे खेळ पाहात राहातात आणि मनातल्या मनात त्यांचा उपहास करीत राहतात. नेहेमीचे आयुष्य जगत असतानादेखिल मनात खोल कुठेतरी आजुबाजुच्या माणसांबद्दल असमाधान आणि स्वतःच्या कुवतीबद्दल आत्मविश्वास या लोकांमध्ये जाणवतो. काहीवेळा या अलिप्तपणाचे कवच भंगते आणि आपले रहस्य जगाला कळल्याप्रमाणे ही माणसे अस्वस्थ होतात. हे कवच भंगण्याचा क्षण हा या माणसांच्या पराभवाचा क्षण असतो. त्यातुन ही माणसे पुन्हा उभी राहतात. पुन्हा तेच अलिप्तपणाचे कवच पांघरुन. माणसांमाणसांमधला संघर्ष नाही तर मानव आणि मानवेतर शक्ती यांच्यातील संघर्षाचे जीएंना आकर्षण होते. जीएंच्या अनेक कथांमध्ये नियतीचा निर्विवाद विजय होतो. काही कथांमध्ये नियती अटळपणे असमाधान पसरवीत राहते. कर्तृत्ववान माणसांनादेखिल नियती संपूर्ण समाधान मिळु देत नाही. जीएंच्याच एका कथेचा आधार घ्यायचं झालं तर कांचनमृगाची शिकार करावी आणि सर्वसामान्य हरिणाचं कलेवर हाती लागावं हा प्रकार जीएंच्या कथांमध्ये वारंवार घडणारा. त्यातसुद्धा जीएंच्या कथांमधील काही माणसे अफाट नियतीला पराभुत करण्यासाठी धडपडत राहतात. ही माणसे जिंकतात कि नाही यापेक्षा ही माणसे ज्या तर्‍हेने नियतीशी झुंजतात त्याचे जीएंमधल्या कलावंताला अतीव आकर्षण होते. "पारधी" कथेतसुद्धा निर्विवादपणे त्याचेच प्रतिबिंब पडले आहे असे मला वाटते.

अतुल ठाकुर

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खरंच कोणतंही भाष्य न करता नियती आ णि अगतिक माणसं बरंच काही सतत सांगत राहतात.
चांगलं रसग्रहण.
काही वाचकमात्र जीएं ना टाळतात वपुंसारखे.
तापलेल्या घमेल्याखालच्या कोंबड्यासारखी घुसमट होऊ नये म्हणून.

दिवसाची सुरुवात अशा देखण्या वाचनाने व्हावी यापरते दुसरे सुख ते काय असेल ? असाच विचार माझ्या मनी आला. "पारधी....प्रदक्षिणा....पडदा....राक्षस....पुरुष....नाग...." आदी कथेतून दिसणारे जी.ए. आणि त्यांची पात्रे तुमच्याआमच्या भोवतालची मंडळी आहेत आणि त्यांच्या अंगी असलेले गुण अवगुण लोभ मोह माया मत्सर आदी घटक सामान्यपणे आपल्यातही असतात असू शकतात. "विदूषक...गुलाम...कळसूत्र.... ठिपका... प्रवासी... यात्रिक... दूत....इस्किलार" ह्या कथांतील वर्णन वाचून वाचक थक्क होऊन जातो आणि यातील पात्रे आपल्याला कधी प्रत्यक्षात दिसतील याची सुतराम शक्यता नसल्याने सर्वसामान्य व्यक्तिमत्वाच्यापल्याड असलेली ही चित्रे असल्याने त्यांचा प्रभाव मनस्वी असा मनी उमटतो.

"पारधी" दादासाहेब आहेत आणि त्याना कोर्टात पारध करायला जितके आवडते तितकेच घरातील वातावरणात त्यांच्याभोवताली फिरणार्‍या आणि त्यांच्या मिळकतीचा (जी लक्षणीय आहे) बिनदिक्कत वापर करणार्‍या माई आणि तो बेकार डॉक्टर यांचीही चिरडून पारध करावी असे चित्र रंगविताना त्याना समाधान होत आहे. ते समजत असतात तितके हे सहजी घडत असेल असेही नाही. कित्येक वेळा माईच आपली पारध करीत असतील अशीही शंका त्याना येते. पण ते पराभूत नाहीत, खेळ करीत आहेत....किंबहुना तो त्यांचा आता नित्याचा खेळ झाला आहे. उत्तम वाङ्मयकृतीचे एक लक्षण असे की प्रत्येक आस्वादात ती वाचकाला समृद्ध करीत जाते व सतःहा समृद्ध होत जाते. एकदा जी.एं.च्या कथेचे वाचन केले की ती आपला वाचनाचा स्तर उन्नत करतेच शिवाय पुन्हा वाचनाचा अनुभव घेण्यासही सहजी प्रवृत्ती करते आणि दुसर्‍यातिसर्‍या वाचनाच्या वेळी तिच्यातील काल न दिसलेली अदृष्ट बलस्थाने वाचकाला नव्याने दिसू लागतात....ही जी.ए.कुलकर्णी यांच्या लेखन सामर्थ्याची वैशिष्ठ्ये होते. लौकिक वर्तमान वास्तवचित्रणाची प्रवृत्ती जी.एं.नी आपल्या पारधी सारख्या कथांतून मांडताना कुठेही पात्राच्या वृत्तीवर भाष्य न करता अमुक एक घटना घडत आहे तिचे सरळसोट चित्रण करणे त्यानी पसंत केले आहे. माईनी दादासाहेबांशी विवाह केला आहे ही एकाने केलेली पारध आहे व पारधीच्या दारात नाईलाजाने आलेली ती स्त्री आता जाणीवपूर्वक पारध्याचीच पारध आपल्या परीने करीत आहे या दोन्ही स्थितीची माहिती दोघांना असूनसुद्धा त्यांच्या वर्तनाचा शेवट काय होऊ शकेल यावर लेखक भाष्य करीत नाहीत....किंबहुना ती त्यांची भूमिकाही नाही. मला दिसले मी शद्बबद्ध केले, शैलीने वागण्याला आकार दिला. वस्तुस्थितीचा उत्कट प्रत्यय वाचकाला जी.एं.च्या अशा कथातून किती प्रभावाने भेटत राहतो त्याचे अत्यंत सुरेख चित्रण अतुल ठाकुर यानी "पारधी" कथेच्या समीक्षेत केल्याचे दिसते.

उत्तम परीक्षण. कथेचं तुम्ही इतके सुंदर आणि सखोल रसग्रहण केले आहे की ही कथा मला अगदी नक्की वाचावीशी वाटतेय.

धन्यवाद Srd Happy तापलेल्या घमेल्याखालच्या कोंबड्यासारखी घुसमट होऊ नये म्हणून.
हे अगदी खरं आहे.

अशोकराव, सविस्तर प्रतिसादाबद्दल आभार. "दुसर्‍यातिसर्‍या वाचनाच्या वेळी तिच्यातील काल न दिसलेली अदृष्ट बलस्थाने वाचकाला नव्याने दिसू लागतात" हे आपले म्हणणे अगदी योग्यच आहे. खरं तर त्यामुळे वाचक म्हणुन माझा विकास किती झालाय हे जाणण्यासाठी देखिल काही कथांवर आकलनात्मक लिहिण्याची इच्छा आहे.

पद्मावति, प्रतिसादाबद्दल आभार. कथा जरुर वाचा आणि शक्य झाल्यास आपले मत देखिल तेथे लिहा.

अतुल....

"...वाचक म्हणुन माझा विकास किती झालाय हे जाणण्यासाठी देखिल काही कथांवर आकलनात्मक लिहिण्याची इच्छा आहे...." ~ जरूर लिहा. अतुल ठाकुर, भारती बिर्जे-डिग्गीकर, अमेय पंडित यांच्यावर सरस्वती प्रसन्न आहे. लिखाणाद्वारे वाचकांना तुम्ही किती निर्मळ आनंद देता आहात त्याचा मी एक साक्षीदार आहेच. तरीही आपल्यातील "वाचक" घटक कधीच लुप्त होऊ देऊ नये. त्यामुळेच तर साहित्याची पूर्ण अर्थाने वृद्धी होत असते. मी स्वतःला जी.ए.प्रेमी समजतो पण त्यांची कोणतीही कथा या क्षणी वाचताना असेच वाटत राहते की, ती नव्यानेच मी वाचतो आहे.....पुन्हा काहीतरी गवसल्याचा जो आनंद मिळतो त्याने तर मी लहान मुलासारखा हुरळून जातो.

सुरेख रसग्रहण ! जीएंच्या कथा , त्यातली पात्र सगळच विलक्षण आहे. दरवेळी वाचताना काहीतरी नवीन गवसत

स्वामी नावाच्या कथेवर लिहिल् आहेत का तुम्ही ? नसल्यास जरूर लिहा

छान लिहिलंय.
जीएंच्या कथांबाबत माझा स्वतःचा अनुभव .. म्हणजे मला त्यांच्या कथेचे पुस्तक इयत्ता नववीत शाळेत बक्षीस म्हणून मिळाले होते ( माझे वय १३, समजही कमीच ) पण त्या वयातही त्या कथा वाचताना, निव्वळ घटना पातळीवर किंवा गोष्ट म्हणूनही त्या कथा आवडल्या होत्या. त्यातले खोल अर्थ नंतर त्या कथा पुन्हा वाचताना लक्षात आला, तरीही तो पुर्णपणे आकळला असे नाही आणि मला तो असा सहज लिहिता येईल... असे तर अजिबात नाही.
त्यामूळे तूम्ही अजून असे लिहित राहिले पाहिजे.

ही माझी एक अत्यंत आवडती कथा. निग्रटाचे फूल हे रूपक अत्यंत प्रभावीपणे येते या कथेत. एका छोट्या गावातल्या, म्हणजे खेडं नाही आणि शहर नाही, कोर्टातले वातावरण केवळ कथेच्या अनुषंगाने येणाऱ्या वाक्यातून उभे राहते.
>>>जीए बारीकसारीक तपशील रंगवुन कथेला गडद करत असतात>>> या वाक्याबद्दल व त्या परिच्छेदाबद्दल अनुमोदन. जीएंच्या कथेतील नियतीवाद, हतबल होणे या आषयांची बरीच चर्चा होते पण त्यांच्या कथेच्या अवकाषाची, विशेषत: या निम्नशहरी पार्श्वभुमीवरील कथेंच्या अवकाषाचे एक स्वतंत्र सौंदर्य आहे.
माणसाचे काय माकडाचे काय, माणुस नावाचा बेटा तसेच तुती मध्ये चितारलेले गाव कुठेही "जेमतेम दहा हजार लोकांचे ते गाव" अशी वाक्ये न येता त्याच्या आर्थिक सामाजिक वैशिष्टयांसह उभे राहते.

""जेमतेम दहा हजार लोकांचे ते गाव" अशी वाक्ये न येता त्याच्या आर्थिक सामाजिक वैशिष्टयांसह उभे राहते."-
बय्राचदा धारवाडकडच्या गावातलेही खरे वर्णन आहे.स्टारमाझा ( एबिपीमाझा) वर राहूल कुलकर्णीने दाखवलं आहे.एका कथेतली ती समोरची खिडकी,एकातलं तळं आणि नायक तिथे पाय धुऊन घराकडे कसा आला वगैरे.

@srd जीएन्च्या कथातील जागा यावर एक पुस्तक बघण्यत आले होते. त्यात बरीच छायाचित्रेदेखील होती.

टण्या, प्रतिसादाबद्दल आभार.

रखरखती दुपार, गल्ली, पत्र्याची घरे, त्यावर फळकुट बडवणारी पोरे, अ‍ॅल्युमिनीयमची भांडी, गोणपाटावर भाजी विकणार्‍या बायका, लाकडाचा अड्डा, गल्लीत फिरणारी, उन्हाने जीभ वासणारी कुत्री, अशासारखी वर्णने जीएंच्या कथात येतात. एक विशिष्ट तर्‍हेचे गाव, माणसे त्यात नेहेमी दिसतात हे खरं आहे. अगदी सुखवस्तु माणसाच्या आजुबाजुचेही वातावरण बरेचदा भकास किंवा करपलेले असते.

सुटकेचा मार्ग कथा मला फार आवडायची.

जीएंच्या कथा वाचताना दोन प्रश्न पडतात-
१) लेखक स्वत:च्या आयुष्यातलं काही कथेतून मांडतोय का?
२) अरे हे माझ्यासाठी तर नाही ना?

अतुल, नियती आणि निर्णय यांची गुंतागुंत इतकी होते आयुष्यात की आपण यात सूत्रधार की कळसूत्र हेही समजणं कठीण असतं घटनांचं आकलन करताना. निरनिराळी माणसे कथेच्या पटावर नाचवताना जीएंना हेच रंग गडद करायचे असतात हे तुम्ही या कथेच्या निमित्ताने पुन्हा एकदा छान उकलले आहे..या महान साहित्यकृतीना मनात उजाळा मिळतो अशा लेखनाने..

अत्यंत सुंदर लेख.
योगायोगाने आताच हिरवे रावे पुन्हा वाचायला घेतलं आहे. 'तुती' मला खूप आवडते...पारधी पेक्षाही. 'बाधा' तर फारच उत्तम आहे. एका हळव्या, नवथर तरुणीचं लग्ना आधीचं दिवाकर वरचं अव्यक्त प्रेम किती प्रभावी पणे रंगविलं आहे! तिच्या भाव भावना, तरंग अलगद मनात उतरतात. आरशात पाहिल्या सारखे वाटते जी एंच्या कथा वाचताना!
बाधा मधे रमा ला जाणून घेणारं कुणीच नाही...गोपाळ रावांसारखा निबर, निरस नवरा, सोवळ्या ओवळ्याची सासू, आणि आपल्याच विश्वात दंग असणार्‍या अनेक लहान मुलांप्रमाणे असणारा, आई ची लाज वाटणारा तिचा मुलगा .....!
त्यांच्या कथांमध्ये नियती शरणता हा एक धागा जरी असला तरीही त्या पात्रांच्या हतबलतेने मन आक्रंदत राहते. ...........
जी एं च्या कथे तील 'आई 'चं वर्णन मन खिळवून टाकाणारे असते. अत्यंत करारी पण शालीन, तत्ववादी आणि तितकीच प्रेमळ! 'कारट्या'' या शिवाय मुलाला कधीही हाक न मारणारी, गोरीपान, मागे केस आवळून वेणी घालणारी, खंबीर, लळ्या लोंब्याने कधीही प्रेम व्यक्त न करणारी......थोडी 'शामच्या' आईसारखी आई .
आपल्यालाही तिचा अबोल धाक वाटत राहतो.

तुम्ही कृपया बाधा बद्दल लिहा...आणि जी एंनी विविध कथांमधून रंगविलेल्या आई वर सुद्धा...

खुप छान लिहिलाय लेख.
पारधी नव्याने समजली. हिरवे रावे वाचुन वर्ष झाली. पुन्हा हातत घ्यायला हवं आता.
आंबट्गोड, बाधा बद्दल+१