आधुनिक सीता - ३४

Submitted by वेल on 24 September, 2015 - 12:18

भाग ३३ - http://www.maayboli.com/node/55393

"आता?" मी विचारलं.

"आता म्हणजे काय?" रफिक मध्येच बोलला.

"माझं आता काय करायचं ठरवलं आहे तुम्ही? " मी पुन्हा अधिक स्पष्टपणे विचारलं.

"तुझं काय करायचं म्हणजे?" रफिक थोडा वरच्या आवाजात बोलला.

मी फक्त फातिमाकडे पाहिलं.

"सरीताने जर मला मदत केली ह्या प्रकरणातून सुटायला तर मीदेखील तिला मदत करेन असं मी तिला म्हटलं होतं"

"तू मदत करशील तिला आणि ते नक्की कशासाठी?"

"तिला परत पाठवण्यासाठी." हे ऐकताच रफिक कृद्ध होऊन फातिमाच्या अंगावर धावून गेला.

"रफिक जिथे आहेस तिथेच बस. माझ्या अंगावर हात उचलायचा नाहीस." आणि त्या शब्दांबरोबर रफिक डोळ्यातून आग ओकत जागेवर बसला. मला नवल वाटलं की फातिमाच्या केवळ एवढ्या शब्दांनी रफिक गप्प कसा बसला?

"ही इथून जाणार नाही. " रफिक प्रत्येक शब्दावर जोर देत फातिमाला म्हणाला.

"हा जो काही प्रकार झाला आहे त्यानंतर ही इथे राहणार का जाणार हे ठरवायचा अधिकर तुझ्या आणि माझ्या हातात नाहीच आहे. हिने इथे राहायचं की जायचं हे आता तुझे अम्मी अब्बू माझे अब्बू आणि माझे भाऊ मिळून घेणार आहेत आणि तेही त्या मिटिंगचा निर्णय झाल्यानंतर."

"हे बघ मी हिला इथून जाऊ देणार नाही. हिला इथे आणण्यसाठी मी काय काय केलय किती पैसे खर्च केलेत तुला माहित नाही आहे का? माझा अपमान करते आहेस तू हिला परत पाठवायचा विचार करून आणि ह्याबाबतीत माझे अम्मी आणि माझे अब्बू तुझ्याबरोबर का बोलतील तसे काही सांगायच असेल तर ते मला सांगतील."

"तुझा स्वभाव कसा आहे हे सगळ्यांनाच माहित आहे. त्यामुळे ते तुझ्याबरोबर नाही बोलले पण माझ्या अब्बूंबरोबर भावाबरोबर आणि माझ्याबरोबर बोलले. कारण झालेल्या गोष्टींचा परिणाम आपल्या हॉस्पिटलवर आणि आपल्या फॅमिलीच्या नावावर होत आहे. आणि आपल्या फॅमिलीच्या नावावर परिणाम होणार म्हणजे माझ्या अब्बूंच्या नावावरही परिणाम होणार. आणि त्याचा परिणाम त्यांच्या आणि हिज हायनेसच्या संबंधांवर होऊ शकतो. ते आम्हाला परवडणार नाही. आणि ते होऊ नये म्हणून अब्बू आणि माझे भाऊ काहीही करतील. तुला समजतय ना काहीही करू शकतात ते. त्यापेक्षा हा प्रश्न वाढू नये म्हणून तशीच गरज वाटली तर हिला परत पाठवावे लागेल."

"म्हणजे मला काय हवय मला काय वाटतय ह्याची काहीच कोणालाच किंमत नाही का?"

"तुला काय हवं आहे तुला काय वाटतं ह्याचा विचार केला म्हणूनच मी तुला सपोर्ट केलं ना? हिला इथे ठेवून घेण्यासाठी मीच तुझ्यामागे उभी राहिले ना? तुझ्या कोणत्याही अम्मीला आणि अब्बूंना पटलं नव्हतं तरी तुला सपोर्ट केलं ना मी. आणि शेवटी अम्मी आणि अब्बूंनी मानलच ना तुझं म्हणणं. तरीदेखील असं बोलतोस? गेली जवळ जवळ दहा वर्ष मी तुझा प्रत्येक शब्द मानते आहे पाळते आहे. तुझ्या कोणत्याही मूडला सांभाळून घेते. तू कितीही चिडलास तरी सांभाळून घेते. आत्ता इथे तुला काय हवय ह्याचा विचार करत बसलो तर कदाचित सगळेच आपण तुरुंगात जाऊ. त्यामुळे तशीच गरज वाटली तर तिला परत पाठवावेच लागेल. आणि ह्यात तुझी इच्छा किंवा तिची इच्छा काय आहे ह्याने काही फरक पडत नाही."

ह्यानंतर रफिक माझ्याबरोबर बोलायला आला.
"आणि तू.. तुला काय कमी केलं मी. तुला ऐषोआरामात ठेवलं मी, हव्या त्या सुखसोयी दिल्या तुला एवढं प्रेम दिलं, तू म्हणालीस म्हणून सागरला एवढा पैसा पाठवला. मग तुला इथे का राहायचं नाही आहे? तुला मी केलेल्या उपकाराची काहीच जाणीव नाही का?"

त्याच्या बोलण्यावर मी काहीच उत्तर न देण्याचं ठरवलं आणि मान खाली घालून गप्प बसले.

"रफिक शांतपणे बस. तिला काय वाटतं हे आपण नंतर पाहू. आधी त्या मिटिंगमधे काय ठरलय ते कळू दे."

ह्यानंतर रफिक निघून गेला आणि फातिमा पुस्तक वाचत माझ्याच खोलीत बसली.

बर्‍याच वेळानंतर फतिमाला कोणाचा तरी फोन आला आणि ती बाहेर निघून गेली. पण जाताना तिने मला काहीच सांगितले नाही. ती गेल्यानंतर थोड्या वेळाने जेनी त्या खोलीत आली. आल्या आल्या तिने मला मिठीच मारली. आणि हलकेच कानात विचारलं की मिटिंगमध्ये काय झालं?

मीही त्याच वेळी तिच्या कानात सांगितले की मी फातिमाने सांगितलेलेच सगळे मिटिंगमध्ये बोलले आहे आणि त्याशिवाय त्या भारतीय अधिकार्‍याबरोबर हिंदीमध्ये बोलून मला इथून परत पाठवायला सांगितले आहे. ह्यापुढे काय झाले मला माहित नाही.

जेनीने माझ्या खांद्यावर थोपटले आणि पुन्हा माझ्या कानात बोलली की ह्या मिटिंगमध्ये भारतीय वकिलातीमधील अधिकारी असतील ह्याची तिला खात्री होती आणि म्हणूनच माझी सुटका व्हावी म्हणून देबूदाचा आणि तिचा भारतीय वकिलातीमध्ये ओळख काढायचा प्रयत्न चालू आहे. हे ऐकूनच मला खूप हलके वाटले.

थोड्याच वेळात माझ्यासाठी जेवण आले. मी व्यवस्थित जेवते आहे की नाही ह्यावर तिचे बारीक लक्ष होते. दिवस संपेपर्यंत फातिमा अथवा रफिकपैकी कोणीच तिथे आले नाही. आणि खोलीत माईक असण्याच्या भीतीने आम्ही दोघीही एकमेकींबरोबर बोलू शकलो नाही. रात्रीचे जेवण आले आणि त्याचसोबत फातिमासुद्धा तिथे आली. तिने मला एक घट्ट मिठी मारली. तिच्या डोळ्यात पाणी होतं. आणि हातात एक पाकीट.

"सरीता, हे घे. उघडून बघ."

तिने दिलेले पाकिट मी उघडून पाहिले. त्यात माझा पासपोर्ट आणि भारतात परतायचे तिकिट होते. माझ्याही डोळ्यात पाणी आले आणि मी पुन्हा एकदा फातिमाला मिठी मारली आणि ओक्साबोक्शी रडू लागले.

"हे हे कसं झालं?" मी तिला विचारलं.

"तुझे केले गेलेले अ‍ॅबॉर्शन सौदी अधिकार्‍यांना मान्य नाही आणि भारतीय वकिलातीमधील अधिकार्‍यांचं मत असं झालं की एका भारतीय स्त्रीला अशा प्रकारे इथे ठेवणे योग्य नाही. आणि त्यासाठी तुला इथून परत पाठवायचा निर्णय घेतला गेला आहे."

"आणि माझ्या अ‍ॅबॉर्शनमुळे तुम्हाला त्रास होईल का?"

"तुला जायला मिळतय त्याचा आनंद मानायचा तू की आम्हाला काय त्रास होईल ह्याची काळजी करायचीस तू? तू खरच खूप चांगली आहेस. जे झालं आहे त्यात आमचीच चूक आहे. इथे सगळं कसं सांभाळायचं ते आम्ही बघून घेऊ. तू नको काळजी करू." आणि ती हसली अगदी प्रसन्नपणे. "मला आनंद आहे की तू तुझ्या देशात तुझ्या माणसात परत जाते आहेस."

"रफिक नाही आला इथे? तो काय म्हणाला." मी विचारले.

"त्याला अ‍ॅड्मिट केलं आहे." फातिमा हताशपणे म्हणाली. "हा निर्णय समजल्यावर त्याने खूप आरडाओरडा केला. खूप अ‍ॅग्रेसिव्ह झाला होता तो. तो स्वभावच आहे त्याचा, मनासारखं झालं नाही की अ‍ॅग्रेसिव्ह होण्याचा. वस्तूंची फेकाफेक, अंगावर धावून जायचे. आणि आत्ता ह्याच अ‍ॅग्रेसिव्ह वागण्यामुळे त्याच्या संतापामुळे तो चक्कर येऊन पडला आणी बेशुद्ध झाला. आणि आम्हाला संधी मिळाली त्याच्या ह्या वागण्याला ट्रीट करायची. पूर्वी खूप प्रयत्न केले त्याला ट्रीटमेण्ट देण्याचे पण दर वेळी फेल झालो आम्ही. ह्यावेळी तो अतिसंतापामुळे बेशुद्ध झाला असल्याने आम्ही त्याला ट्रीट करू शकू. पुढे काही दिवसांनी त्याला घरी नेल्यावर देखील त्याची ट्रीटमेण्ट चालू ठेवू."

"रफिक असा असेल वाटलं नाही कधी. एकदाच त्याने मला धमकी दिली तेव्हा मला ते विचित्र वाटलं होतं पण.."

"हो. तसा तो खूप प्रेमळ व्यवहारी आहे. कट्टर इस्लामिक सुद्धा नाही आहे. त्याचे शिक्षण बराच काळ भारतात झाल्याने खूप समंजस आहे तो. पण तरी हा त्याचा स्वभाव जेव्हा डोकं वर काढतो तेव्हा तो काहीही करू शकतो. आणि त्याला अत्यंत प्रिय असलेल्या बाबतीतच तो असा वागतो. त्याचं त्याच्या सुनितावर आणि तिच्यासारख्या दिसणार्‍या तुझ्यावर खूप प्रेम होतं आणि म्हणूनच.."

काय बोलावे मला काही सुचेचना. मी फातिमाचे हात हातात धरून तशीच उभी राहिले.

"चल. तू ह्यावर जास्त विचार करू नकोस. तुझं सगळं सामान रात्रीपर्यंत इथे हॉस्पिटलमध्ये येईल. तू आमच्या घरात येण्यापूर्वीच सगळं सामान. तू इथे राहायला आल्यानंतरची कोणतीही वस्तू तुझ्यासोबत दिलेली नाही. तुझ्या मनावर झालेले घाव तू विसरशील तेव्हा विसरशील पण वस्तूंमुळे तरी तुला काही आठवू नये आणि त्रास होऊ नये. उद्या सकाळी भारतीय वकिलातीची गाडी तुला घ्यायला इथे येईल आणि इथून थेट तू एयरपोर्टवर जायचस. आणि तिथून भारतात. भारतात तुझे आई वडिल आजी आजोबा भाऊ तुला घ्यायला एयरपोर्टवर येणार आहेत. मी कळवलं आहे त्यांना तसं."

"फातिमा थँक्स. खूप खूप थँक्स. मी तुझे उपकार .."

"थँक्स म्हणून मला लाजवू नकोस. आज तुझ्यावर जो प्रसंग ओढवलाय तो माझ्याचमुळे ओढवलाय असं मला वाटतं. मी एवढं तरी केलंच पाहिजे ना. तू निघण्याची तयारी कर."

क्रमशः

http://www.maayboli.com/node/56118

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा पुढचा भाग आला तर! पण फारच anti-climax झाल्यासारखा वाटला. नायिकेने आपणहून काहीही हातपाय हलवले नाहीत, केवळ ते अबॉर्शन तिच्या सुटकेचं निमित्त झालं Sad

कथाबीज जरी चांगले होते तरी एव्हढा घोळ (आणि वेळ) लावला गेला की उत्सुकताच संपली. आला भाग तर वाचायचा नाही तर काही फरक नाही असे झाले.
असो कादंबरी संपतेय हे महत्वाचे....

पुलेशू

खोलीत स्पीकर्स असण्याच्या भीतीने आम्ही दोघीही एकमेकींबरोबर बोलू शकलो नाही. >> इथे "माइक" असे हवे ना…

चीकु - good point. इथेच मला तुम्हा सगळ्यांची मते हवी होती.---- अजुनही हे आहेच का बाकी? संपवा आता