पिलू वाट पाहे...................(फोटोसहित)

Submitted by मानुषी on 18 October, 2015 - 01:57

पिलू वाट पाहे .............

आम्ही काल रेणुकामातेचं दर्शन घेऊन घरी आलो. तसा उशीरच झाला होता. रात्रीचे नऊ वाजले असतील. बेडरूमचं दार उघडता क्षणीच काही तरी फ़डफ़डत गेल्याचा भास झाला. अनवधानाने तोंडातून किंकाळी फ़ुटली. (:अओ: हे नेहमीचच!!) मग दिवा लावल्यावर असं लक्षात आलं की ते एका पक्षाचं पिल्लू असावं.

अग्गोबाई........हे आणि कधी खोलीत शिरलं असेल? असा विचार करत मी दिवा लावल्याबरोबर ते खोलीभर कडेकडेने आणि अगदी छतालगत फ़िरलं आणि माळ्यावरच्या सामानामागे लपलं. खुर्ची घेऊन बघण्याचा प्रयत्न केला. पण नाहीच दिसलं. जेवणं करून झोपलो. दुसऱ्या दिवशी सकाळी, सकाळची स्वयंपाकघरातली आणि इतर कामं आवरेपर्यन्त बेडरूमचं दार उघडं ठेवलं...अश्यासाठी की ते पिल्लू उघड्या दारातून उडून निघून जाईल. आमच्या बेडरूमच्या बाहेर एक ओपन् टु स्काय असं एक सिट आऊट आहे. इथे कमळाचं एक भलं मोठं टाकं, काही टांगत्या कुंड्या, वेली, काही झाडं असं काहीबाही आहे. त्यामुळे इथे बरेच पक्षी ये जा करत असतात.

एक गंमत: बाजारातून आणलेल्या पालेभाज्यांच्या जुड्या बऱ्याच वेळा सुतळीने बांधलेल्या असतात. ती सुतळी मी कात्रीने न कापता, गाठ सोडवून तो सुतळीचा तोडा मी माझ्या सिटाउटमधल्या टांगत्या कुंडीच्या वरच्या दांडीला बांधून ठेवते.

हे करण्याच्ं एक कारण: १) पालेभाजीच्या काड्या/देठं कधी कधी शरद त्याच्या शेळीसाठी घेऊन जातो. त्यांच्या(शेळीच्या) पोटात सुतळी जाऊ नये. २) इमर्जन्सीला कधी सुतळीचा तोडा हवा असल्यास फ़ारशी पळापळ न करता अगदी डोळ्यासमोरच अनेक सुतळी तोडे वाऱ्यावर झुलताना दिसतात. Proud कधी एखादी झाडाची फ़ांदी बांधायला उपयोगी पडतात. सुतळी्चा तोडाच तो....कधी लागेल काय नेम सांगावा! ३) सगळ्यात मस्त म्हणजे अनेक पक्षी या माझ्या लोंबत्या सुतळ्यांचे धागे चोचीने सोड्वून घरटं बांधायला घेऊन जातात! यापेक्षा सुंदर उपयोग काय असणार सुतळीच्या तोड्याचा? आणि तो पक्षी या सु्तळीशी कशी झटापट करतो आणि मग चोचीतला धागा हवेत फ़लकारत कसा उडून जातो हे सारं फ़ार प्रेक्षणीय!
हो आता कुणी म्हणू शकतात..........."काय हा चिक्कुर्डेपणा!" पण काय हो........शेवटी रीसायकलिंग आणि अपसायलकिंग म्हणजे काय वेगळं असतं हो? आँ?
सहसा काहीही फ़ेकायचे नाही. कधी तरी ते लागणार या विचारसरणीच्या पिढीतली मी आहे!(गर्वसे कहो हम उस पीढीसे है! :फिदी:) आणि हो....... माझा या विचारसरणीवर संपूर्णपणे नितांत विश्वास आहे!

असो..........पहा .......कुठल्याकुठे गेले पिल्लाची गंमत सांगता सांगता.................
तर जरा हाताला सवड झाल्यावर पुन्हा बेडरूमकडे मोर्चा वळवून पाहिलं तर ते परत छतालगत भिरभिरत होतं. ओह्...म्हणजे हे उघड्या दारातून गेलेलं दिसत नाही! आणि थोडं खालच्या पातळीवर यावं हे काही त्याच्या लक्षात येत नव्हतं. आणि गंमत म्हणजे माळ्यावर उजेड येण्यासाठी जिथे काचेची तावदानं बसवलेली असतात त्यावर एका तावदानावरून दुसऱ्यावर असं ते भिरभिरत आपटत राहिलं....प्रकाशाच्या दिशेने. माझा जीव कळवळला. एक तर सकाळचे साडेसात झालेले.........तेही बिचारं भुकेनंही कळवळलं असणार. आईची आठवण काढत असेल का ते?

मनात एक गोड गाणं घुमत होतं........पक्षिणी प्रभाती चारियासी जाये, पिलू पाट पाहे उपवासी.........
मग मी खुर्चीवर चढले आणि एका कुंच्याने त्याला अलगद स्पर्श करू लागले. तर ते पुन्हा खोलीच्या प्रदक्षिणा करायला लागलं. एकदा तर ते कुंच्यावर येऊनही बसलं. मी एक डोक्याला बांधायचा मोठा स्कार्फ़ हातात घेऊन अगदी तयार होते. की त्याला अलगद रुमालात पकडून गच्चीत सोडून द्यायचं...पण नाहीच. ते परत भिरभिरायला लागलं.
तोपर्यन्त खालून लुईच्या भुंकण्याचा आवाज आला. शरद कामाला आला होता. सगळ्यात आधी तो लुईला फ़िरवून आणतो. आणि लुई त्याची सकाळची महत्वाची कामं Proud (!) बाहेर जाऊन करायला अगदी आतुर झालेला असतो. त्यामुळे तो दिसला की लुई खूप एक्साइट होऊन भुंकतो.
शरदला पिल्लाबद्दल सांगितलं, म्हटलं....लुईला फ़िरवून आणलंस की आधी त्या पिल्लाचं काय करायचं ते बघू.
शरद परत अल्यावर त्याला मोठी लोखंडी शिडी(ज्याला इकडे घोडा म्हणतात.) आणायला सांगितली. मग ज्या तावदानावर तो पक्षी फ़डफ़डत होता त्याच्या समोर ही शिडी लावली. शरद हातातल्या कुंच्यासहवर्तमान शिडीवर चढला. पण कुंचा त्याच्याजवळ नेताक्षणीच ते पिल्लू पुन्हा भिरभिरू लागलं आणि या तावदानापासून त्या तावदानापर्यन्त प्रकाशाच्या दिशेने पुन्हा धडका मारायला लागलं. मग लक्षात आलं की हे पिल्लू आपली उच्च पातळी सोडून खालच्या पातळीवर(?) यायला तयार नाहीच!!!. मग आम्ही स्ट्रॅटेजी बदलली. म्हणजे म्हटल्ं आयुधं बदलून बघू. कुंच्याचा त्याग करून डोक्याचा मऊमऊ स्कार्फ़् हे आयुध वापरण्याचं ठरलं. ते मी शिडीवर उभ्या शरदकडे सुपूर्त केलं. आणि कामच झालं. पिल्लू तावदानावर फ़डफ़डत होतं. त्याच्यावर अलगद रुमाल टाकला गेला. आणि शरदने त्याला रुमालासह अलगद ओंजळीत पकडलं. मग आम्ही तसेच गच्चीत गेलो.

खालच्या अंगणातलं जुनंजाणतं प्रचंड मोठं कडुलिंबाचं झाड वरपर्यंत येऊन आपल्या हिरव्या विस्तारासह गच्चीत एका बाजूला ओणवलं आहे.

लांबून तर वाटतं.....गच्चीच्या त्या कोपऱ्याला या झाडाने जणु आपल्या हिरव्या कवेत घेतलंय्! हा अंगणातला कडुलिंब इतका गच्च आहे की लांबून या झाडाच्या अंतरंगात काय चाललंय काही कळत नाही. लांबून फ़क्त एक हिरवा गार घुमट दृष्टीस पडतो आणि हा हिरवा गार विस्तार भर उन्हाळ्यातही डोळ्यांना थंडावा देतो आणि अंगणावर थंड गार सावली!

तर त्या बाजूच्या गच्चीच्या कठड्यावर त्या पिल्लाला सोड्लं.

तर ते तिथंच बसून राहिलं. बिचारं दमलं असणार, त्यात पुन्हा उपाशी, भुकेलंही असणार. जरा जवळून निरीक्षण केलं तर असं वाटलं की त्याचा एकच डोळा उघडलाय. पण पक्षांचं या बाबतीत काय असतं ते जाणकार सांगतील. आता हा डोळा उघडलाच नव्हता का डोळ्याला काही इजा झाली होती देव जाणे!
मग मात्र काही वेळाने ते पिल्लू कडुलिंबात उडून दिसेनासं झालं.


आमचा जीव भांड्यात! चला......म्हणजे हे निदान उडू शकतय!

त्याला त्याची आई भेटेल आणि त्याला लवकरच खायलाही मिळेल अशी मनोमन इच्छा करत मी आणि शरद आम्ही स्वस्थचित्ताने गच्चीतून खाली आलो.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आई ग्गं.. किती गोडुलं आहे पिल्लू..आणी त्याला घरी पोचवण्याकरता चाललेली तुझी तळमळ , धडपड
पोचली गा इथपर्यन्त!!! अगदी थ्रिलिंग वर्णन केलंयस..

कसला सुंदर अनुभव आहे आणि शब्दांकनही सुरेख. साध्या सुतळीच्या तोड्यामागेही किती सुंदर विचार आहेत.. खुप छान वाटलं.

त्याला त्याची आई भेटेल आणि त्याला लवकरच खायलाही मिळेल >> अगदी हेच मनात आलं. छान लिहिलंय, फोटुही आवडले. कडुलिंबाचं झाड मस्तच आहे, एकदम हिरवेगार.

फारच सुंदर लेख. अगदी ओघवता. शब्दांची सर्व प्रकारची पेरणी छानच. मधेच मनोरंजन पेरणी. मनापासून वाटणारी पिल्लाबद्दलची तळमळ. सुरुवातीचं किंकाळी फुटल्याचे वाक्य (मी पण अशीच फोडते, नवरा ओरडतो Wink ). सर्वच अगदी समोर बसून गप्पा मारताय, इतकं वाटलं.

ग्रेट मानुषीताई.

सर्वांना धन्यवाद. इंद्रा............ते सनबर्डचं (शिंजीर) पिल्लू असावंस वाटलं. पोट खालच्या बाजूने हिरवट खाकी रंगाचं होतं.
शशांक ............. व्हॉट से?
क्रिश्नन्त..............तुम्हि त्याला थोड खायला द्याय्च ना>>>>>>>> अगदी बरोबर. आम्ही निदान पाणी तरी द्यावं म्हणून ड्रॉपर रेडी ठेवला होता.
पण त्याला सोडल्याबरोबर उडून गेल्याने काही करता आलं नाही. पुन्हा हाही एक विचारः आपण हाताळलेला पक्षी .......त्याला पुन्हा जातीत घेतील का? माहिती नाही .....हे खरं असतं का.
आत्तापर्यन्त कसं फक्त रुमालाचाच स्पर्श झाला होता त्याला.

खुपच छान लिहल आहे.कितीईईई गोड पिलु आहे ते.
मग मात्र काही वेळाने ते पिल्लू कडुलिंबात उडून दिसेनासं झालं.<>>>> हे वाचल्यावर एकदम हायस वाटल. Happy

आपण हाताळलेला पक्षी ......त्याला पुन्हा जातीत घेतील का? माहिती नाही .....हे खरं असतं का.
>> मला तरी तसा अनुभव नाही. मी दोन तीनदा पक्षी हातात घेउन सोडवले आहेत. ते चट मिसळतात त्यांच्या दोस्तांच्यात. काळजी करू नका. त्या पिल्लाला दिसत नाही आहे म्हणूनच ते
घाबरून भरकटले होते.

जनरली आमचे कुत्रे डाक्स -हुंड म्हणजे कबुतरे/ पक्षी शिकार करायच्या उद्देशानेच ब्रीड केलेले आहेत.
त्यामुळे त्यांचा जनरल कल पक्षांची शिकार करणे हाच असतो. कबुतरे पण जरा बावळट पक्षी असल्याने. ( ते एक गिरकी घेतात व परत येतात. जमिनी बसले तर खलास. कुत्रे चपळाइने मारतात. पण वर उडून जाओन अलगद वरच बसले तर कुत्र्यांची हार. व ते भुंकत बसतात.

एकदा पहाटेस एक कबुतर गार्बेज शूटच्या खोलीत अडकले होते. आम्ही दार उघडले तर ते बिचारे वर फडफडत राहिले. त्याला मी हातात घेउन बाहेर आणून सोडून दिले. ते वर उडले व वाचले. रात् भर आत अडकले होते.

एका संध्याकाळी जवळ जवळ अंधारच होत होता. व कु त्रे एका खड्ड्यात तोंड घालून रॅकेट करत होते. पाहिले तर एक कबुतर आत खाली अडकले होते. त्याला आजुबाजूला अंधार दिसत असल्याने व वर कुत्रे( मरणच) त्यामुळे ते बावरून बसले होते. मी आत हात घालून त्याला बाहेर काढले.
मग तशीच पळत पळत कंपाउंडच्या बाहेर एक उंचवटा आहे तिथे वर त्याला ठेवले. मागून आमचे कुत्रे
आलेच होते धावत. ते कबूतरही पाच मिनिटात वर फांदीत जाऊन बसले. त्याला कोणी ही रिजेक्ट केले नाही.

पक्षी वाचवायचा असेल तर झाडूचा उपयोग नाही त्याला हातात धराय चे. फडफड करत असला तरी काही दुखापत झाली आहे का ते चेक करायचे. असेल तर व्हेट कडे न्यायचे. नसेल तर सुर क्ष्हित जागी ठेवायचे. व एका बोल मध्ये पाणी, खाणे ठेवायचे व आपण दूर जायचे.

मानुषी, शाब्बास! Happy
आपण हाताळलेला पक्षी .......त्याला पुन्हा जातीत घेतील का?>>>>>.चिमणीच्या बाबतीत हे ऐकलय. Sad

मस्त

सर्वांना धन्यवाद.
अमा किती गोड पोष्ट!
काळ्जी करू नका>>>>>>>>धन्यवाद. आणि हो झाडू हा फक्त त्याला दरवाज्याच्या दिशेने ढकल्ण्यासाठीच. चुकीचं आयुध आहे खरं म्हण्जे.

किती छान.

गेल्या डिसेंबरमध्ये रात्री नऊ वाजता माझ्या घरी एकदा वटवाघळचे पिल्लू आले होते. अगदी चार इंच असेल नसेल. मग आम्ही त्याला घाबरलो ते आम्हाला घाबरले. त्याने जावे म्हणून वेगवेगळे आवाज करून पाहिले. जाईचना. शेवटी घरातले सगळे दिवे पंखे बंद करून ठेवले. तेवढ्यात पक्षिमित्रांचा फोन लागला. त्यांना बोलावून घेतलं. मग त्यांनी एका चादरीमध्ये त्या पिल्लाला पकडले आणि ते त्याला व्हेट कडे घेऊन गेले.

काही म्हणा पिल्लांना पक्ष्यांना काही होऊ नये असं किती आटोकाट वाटत असतं आपल्याला.

Pages