माझ्या रोजच्या रस्त्या च्या कोपर्यावर एक बैठी इमारत दिसे. एल आकारात पसरलेल्या या इमारती भोवताली असलेल्या सुंदरशा बगिच्यात बरेचसे वृद्ध गप्पा मारत बसलेले दिसत. कुणी आजी झोपाळ्यावर बसून विणकाम करणारी तर हातातल्या सिगरेट चे मस्तपैकी झुरके घेत तिच्याशी गप्पा करणारी दुसरी आजी दिसे. त्यांना पाहून कल्पना आलीच होती कि ही इमारत म्हणजे वृद्धाश्रम वगैरे असावा म्हणून कन्फर्म करायला मी एक दिवस त्या इमारतीत प्रवेश केलाच. समोरच त्यांचं ऑफिस होतं. आत शिरले तर एक मध्यम वयीन, हसतमुख स्त्री कंप्युटर शी खुडबुड करत बसली होती .तिच्या समोरची खुर्ची ओढून तिला थोडी माहिती विचारली तिने अगदी उत्साहाने माहिती दिली आणी अगदी आनंदाने ,आत जाऊन चक्कर मारायची, फोटो काढायचीही परवानगी दिली.
मी लगेच आतल्या भागात प्रवेश केला. समोरच मोकळा कॉरिडोर मोठ्याश्या व्हरांड्यात जात होता. चारी बाजूंनी
फुललेल्या बागेचं दर्शन होत होत होतं. मधे लांबच लांब लाकडी दोन टेबलांवर ,इथले रहिवासी आपसात गप्पा मारत्,हसत खिदळत सकाळचा नाश्ता घेत होते. ते सर्वच नीट कपडे घातलेले होते. एक वय सोडल्यास कुणीच आजारी वगैरे नव्हते. मला पाहिल्यावर सगळ्यांना खूप आनंद झाला पण भाषेची मोठ्ठीच अडचण.. माझी थाय भाषा त्यांना समजेना.. मग एक स्मार्टली ड्रेस्स्ड आजी ने मला तिच्याजवळ बोलावले .तिला थोडं इंग्लिश कळत होते. मग तिच्या थ्रू सर्वांशी थोड्या गप्पा केल्या . सगळेच एकेकटे होते. कोणी जीवन सहचर गमावलेला, मुलं नोकरी करता दुसर्या शहरात असलेली , तर कुणी सहचर,मुलं सगळच गमावून बसलेली.
. कुणी काहीबाही बनवून त्या गोष्टी विकून आपला खर्च भागवतात तर कुणी स्वैपाकघरा ची जबाबदारी उचलतात. कधी कुणाची मुलं राहाय खायचा खर्च देतात. ज्या कुणाला हे शक्य नसेल त्याच्याकरता सरकार आणी इथली म्युनिसिपालिटी यांचा सर्व खर्च देते.
समोरच्या बाजूला एक हॉस्पिटल होते. तिथले रुग्ण मात्र या बाजूला येऊ शकत नव्हते. कुणी खूप आजारी,किंवा व्हील चेअर वर , पण ते ही तिथल्या कॉरिडोर मधे बसून उत्सुकतेने या बाजूला पाहात होते.
मी जास्त काही त्यांच्या करता नाही करू शकले पण माझ्या जाण्याने त्यांना इतका आनंद झाला. मलाही प्रेमाने त्यांच्याबरोबर नाश्ता खायचे आमंत्रण मिळाले , माझी माहिती विचारून झाली. भारतीय म्हणून कौतुक ही झाले.
ह्म्म. माझी आईही तशीच आहे.
ह्म्म.
माझी आईही तशीच आहे. असो.
मस्त फोटोज , सगळेच आजी आजोबा
मस्त फोटोज ,
सगळेच आजी आजोबा प्रसन्न दिसताहेत.
छान फोटो वर्षु. स्वच्छ, नेटकं
छान फोटो वर्षु.
स्वच्छ, नेटकं वृद्धाश्रम आहे. सगळे आजी-आजोबा हसरे आनंदी पाहून छान वाटलं.
प्रसन्न आहे
प्रसन्न आहे
सुंदर फोटो... छान चर्चा
सुंदर फोटो... छान चर्चा
खुपच छान. अस काही आपल्याकडे
खुपच छान. अस काही आपल्याकडे आहे का भारतात?
व्वा व्वा!!! खूप मस्त फोटो
व्वा व्वा!!!
खूप मस्त फोटो आणि खूप चांगला विषय.. तुझं अभिनंदन..
वृद्धाश्रम वाचून थोडासा धास्तावलो होतो पण हसतमुख आणि आनंदी म्हातारे, म्हातार्यांना पाहून समाधान वाटलं.
पगाराव्यतिरिक्त बोनस घेताना जसा आनंद होतो, तसाच मिळालेला आयुष्यातला हा बोनस काळ ते आनंदाने जगतायत असं वाटलं.
अस काही आपल्याकडे आहे का
अस काही आपल्याकडे आहे का भारतात
असे काही आहे का ते माहित नाही, पण वृद्धाश्रम आहेत भरपुर. आमच्या नेरुळातच २ आहेत. पण तिथले म्हातारे मी कधी पाहिले नाहीत. तिथल्या एका म्हातारीला भेटलेले जे वर लिहिलेले आहे.
मी दोन-तिन वृद्धाश्रम पाहिले
मी दोन-तिन वृद्धाश्रम पाहिले आहेत. भयानक अवस्थेत होते वृद्धलोकं सगळ्याच सुविधा अपुर्या
यातिल एक आश्रम वसईला होते.मुलं आई-वडिलांना फसवुन आणुन सोडतात.चांगल्या घरच्या लोकांचे प्रमाण जास्त होते. दोन दिवस झोपु नाही शकले.
चिंग माय च्या वृद्धाश्रमा सारखे आश्रम आपल्या कडे दुर्मिळ असावे किंवा अती महागडे.
चिंग माय च्या जवळ जाणारे एक निसर्गौपचार केंद्र पुण्याजवळ आहे. ट्रस्टचे असुन ही दिवसाचे कमित-कमी ८००-१००० खर्च आहे.
मुलं आई-वडिलांना फसवुन आणुन
मुलं आई-वडिलांना फसवुन आणुन सोडतात.चांगल्या घरच्या लोकांचे प्रमाण जास्त होते.
हेच कारण आहे ना आपल्याकडचे वृद्धाश्रम वाईट अवस्थेत असण्याचे?
वृद्धाश्रम ही आजची गरज आहे आपल्यासारख्या न्युक्लिअर फॅमिलीतल्या लोकांना, ज्यांनी जाणिवपुर्वक एकाच अपत्याला जन्म दिलाय आणि नंतर ते अपत्य अगदी स्टार व्हावे यासाठी प्रयत्न केलेत. ह्या स्टार मुलांच्या करिअर्स अगदी उत्तम व्हाव्यात हा आपलाच आग्रह. आता ह्या करिअर्स आपल्या घराच्या बाजुलाच फुलतील असे थोडेच आहे? मग जेव्हा यांच्या करिअर्स जगाच्या पाठीवर, जिथे शक्य आहे तिथे भरात येतील तेव्हा त्यांनी त्या सोडाव्यात आणि आपल्या म्हाता-या आईबाबांच्या सेवेत वाहुन घ्यावे ही श्रावणबाळी अपेक्षाही आपलीच. मग या पंख फुटुन उडालेल्या पाखरांना जेव्हा परत घरट्यात परतणे रुचत नाही तेव्हा रागराग, भांडणे. यातुन मग फसबुन वृद्धाश्रमात आणुन सोडण्यचे प्रकार घडतात.
हल्ली जागोजागी हॉटेल्स, रिझॉर्ट्स, होमस्टेज जसे विकसित होताहेत तसेच वृद्धाश्रमही विकसित व्हायला पाहिजेत. हॉटेलिंग वाईट, घरचेच अन्न खावे हा समज २५ वर्षांपुर्यंत प्रचलित होता. आता साधारण घरातही आठवड्यातुन एकदा हॉटेलिंग घडते. हे सगळॅ बदल जसे आपण स्विकारले तसेच वृद्धाश्रम स्विकारायला हवेत. जास्त लोक तिथे जाऊ लागले, डिमांड वाढली की तेही सुधारतिल , संख्या वाढेल आणि बजेट मध्ये ही बसतील.
साधना,संपुर्ण पोस्ट्ला
साधना,संपुर्ण पोस्ट्ला अनुमोदन.
वर्षु, खरे तर तुमचेच कौतुक
वर्षु, खरे तर तुमचेच कौतुक की तुम्ही अशा जागा हुडकुन तिथे जाऊन चौकशी करुन भेटुन बोलुन आलात, अन तिथले फोटो इथे देता आहात त्याबद्दल तुमचेच आभार.
एक ना एक दिवस, घरात वा वृद्धाश्रमात वा कुठल्या तरी मंदिराच्या पायर्यांवर एकटेपणे वृद्धपण घालवावे लागणारच आहे, मलाही. त्यातुन सुटका नाही. पण मग ते तरी अजुन आनंदी कसे करता येईल याचे समृद्ध अनुभव वरीलसारख्या फोटोतुन कळत असतील, तर ते मनाच्या कोपर्यात का जपु नये?
अजुन हाताच्या बोटावर मोजता येईल इतक्याच काही वर्षातच मलाही माझ्या वृद्धपणाला सामोरे जावेच लागणार आहे, अन ते कसे जाईल ते माहित नाही असे हे वास्तव मी स्विकारले असल्याने मला वरील फोटो "अंगावर येताहेत" असे वाटले नाही.
साधना मस्त पोस्ट.
साधना मस्त पोस्ट.
वर्षू, लेख ,फोटो व
वर्षू,
लेख ,फोटो व प्रतिसादातील मते/चर्चाही आवडली.☺
वर्षू, आवडला हा वृध्दाश्रम
वर्षू, आवडला हा वृध्दाश्रम आणि त्यातले निवासी. आयुष्यातल्या प्रत्येक स्थितीला हसतमुखाने सामोरं गेलं तर त्या त्या वयाचा आनंद उपभोगता येऊ शकतो हे कळतं त्यांच्याकडे पाहून.
साधना, अगदी बरोबर मांडलं आहेस. चांगल्या वॄध्दाश्रमांची आपल्याकडे खरच गरज आहे. वॄध्दाश्रम म्हटलं की हाल अपेष्टात दिवस काढणारे असं चित्र उभं रहाण्यापेक्षा आनंदात जिवनाची संध्याकाळ घालवणारे लोकं उभे राहिले पाहिजेत.
मी मुलांसाठी खस्ता खाल्या म्ह्णून त्यांनी माझा संभाळ केला पाहिजे अशी अपेक्षा बाळ्गण्यापेक्षा आपली सोय आपणच बघितली पाहिजे. कारण मुलंही त्यांच्या मुलांसाठी त्यांच्या कुवतीप्रमाणे करणारच आहेत. पूर्वीची वानप्रस्थाश्रमाची कल्पना त्यानुसारच असावी.
येहीच रिअॅलिटी
येहीच रिअॅलिटी है..>>>>>>>>>>+१००
वर्षू खूप उशिरा लिहितेय पण केव्हाच वाचला होता. अप्रतीम!!. अगं हल्ली प्रवास सगळेच करतात. पण हे जे "टिपणं" मनात नोंद करणं आणि नंतर "मांडणं" आहे ना त्याला तुझ्यासारखं संवेदनाशील मन लागतं!
ब्येष्ट!
साधना, खूप आवडली तुझी
साधना, खूप आवडली तुझी पोस्ट!!!
आपल्या समाजात अजूनही वय झालेले आईवडील अवास्तव अपेक्षा,लोकं काय म्हणतील हा विचार, मुलांना इमोशनली ब्लॅकमेल करणे, आपण आता टाकाऊ झालोत्,नकोसे झालोत असा न्यूनगंड बाळगणे इ. गोष्टी करत असताना दिसून येतात. त्यांना समुपदेशन करणारी एखादी संस्था आहे का इकडे कार्यरत?
परिस्थिती चा ग्रेसफुली स्वीकार करायला समुपदेशनाचा उपयोग होईल..
पहिल्या फोटोत असलेली जांभळ्या शर्ट मधली आजी आनंदाने मला सांगत होती कि वीकेंड ला ती बँकॉक ला जाऊन , जुन्या मैत्रीणींबरोबर मस्त एंजॉय करते कधी कधी.. आता तिच्याकरता सर्वच दिवस वीकेंड आहेत पण तिने या गोष्टीतली मजा स्वतःपुरती जतन करून ठेवलेलीये.. तिचा नवरा कालवश झाल्यावर ती आपणहूनच इकडे राहायला आलीये.. मुलगा, ऑस्ट्रेलिया ला सेटल झालेलाय.कधी मधी भेट होते..पण त्याबद्दल खंत, झुरणे इ. प्रकार नाहीत..
लिंबूटिंबू जी, मानुषी..
लिंबूटिंबू जी, मानुषी.. सर्व प्रतिसादकांचे मनापासून आभार!!
कमीत कमी आपल्या जनरेशन पासून तरी विचारसरणी बदलण्यास सुरुवात व्हावी याच इच्छे ने फोटो आणी माहिती दिली ही!!
कमीत कमी आपल्या जनरेशन पासून
कमीत कमी आपल्या जनरेशन पासून तरी विचारसरणी बदलण्यास सुरुवात व्हावी याच इच्छे ने फोटो आणी माहिती दिली ही!!
मनापासुन आभार गं. आपल्या पिढीने तरी शहाणे व्हायला हवेय. मागच्या पिढीकडे पाहुन पुढच्या पिढीने शहाणे व्हायला हवे.
समुपदेशनाचा फायदा तेव्हाच होतो जेव्हा घेणा-या व्यक्तीने मला यातुन बाहेर पडायचेय हा विचार मनात आणलेला असतो हेमावैम. इथे लोकांना सेल्फ पिटी अतिशय आवडते. त्यांचा आवडता टिपी आहे हा. मझ्या घरात मी समुपदेशनाचा प्रयत्न केलाय आणि शाब्दिक फटके घेतलेत मारुन....
(No subject)
>>>>> आपण आता टाकाऊ
>>>>> आपण आता टाकाऊ झालोत्,नकोसे झालोत असा न्यूनगंड बाळगणे इ. गोष्टी करत असताना दिसून येतात. त्यांना समुपदेशन करणारी एखादी संस्था आहे का इकडे कार्यरत? <<<<<<
संस्था असावी की अजुन काही वेगळे असे?
माझ्या मनात याबाबत काही वेगळीच सूत्रे रचली जात आहेत.
अडचण अशी आहे की, आपण तहान लागल्यावर विहीर खणू पहातोय असे मला वाटते. मला असे म्हणायचे आहे की, आज आपण आपल्या "तारुण्याच्या" स्थितीतून या प्रश्नाकडे, "ते त्यांचे प्रश्न" अशा रितीने बघत असतानाच, जर "हीच वेळ माझ्यावरही येणारे" असे मला कळले/जाणवले/कुणी मला जाणवुन दिले, तर निदान आपल्यापासुन पुढे तरी अशा परिस्थितीला आपण खंबीरपणे सामोरे जाऊ. इतकेच नव्हे, तर वृद्धपण हे नेमके काय असते ते आम्हाला काडीचेही ठाऊक नसते, अन जे कळते ते अत्यंत अपुरे असते असे माझे मत बनले आहे. खास करुन गेल्या महिन्यात आई गेल्या आधीच्या तिनेक वर्षातील तिची शारिरीक व मानसिक परिस्थिती अत्यंत जवळून अनुभवताना, समजुन घेताना मला हे जाणवत गेले की अरे आपण बघतो ते वर वरचे बघतो, प्रत्यक्षात घडामोडी इतक्या विविध शारिरीक मानसिक पातळीवर त्या त्या वृद्ध व्यक्तिला भोगायला लागत असतात, त्याची जंत्री आम्हास माहितच नसते. अक्षरशः सांगतो की आता नंतर कळते/जाणवते की असे असेही केले असते तर बरे झाले असते, तसे तसे अजुन करता आले असते.
अर्थातच, ती ती व्यक्ति तिच्या वकुबाप्रमाणे "वृद्धावस्थेला" सामोरी जाते, पण तिच्या त्या काळात आपला सहभाग हवा असे वाटत असेल, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे स्वतःच्या वृद्धावस्थेला कसे सामोरे जाणार याची पूर्वतयारी करणे आवश्यक वाटत असेल (मला तरी आवश्यक वाटते ), तर यावर सर्व पातळ्यांवर अधिक सखोल विचारविनिमर्ष होणे आवश्यक.
(मला अजुनही नेमक्या शब्दात मला जे म्हणायचे ते मांडता येत नाहीये)
धन्स वर्षूमाय. येथील
धन्स वर्षूमाय.
येथील स्वच्छता वाखाणण्याजोगी आहे.
लिंबु, मस्त पोस्ट. तुम्ही
लिंबु, मस्त पोस्ट. तुम्ही एक धागा काढुन तिथे लिहा ना तुम्हाला काय जाणवले ते. तुमचा अनुभव. त्यातुन इतरही विचार करतील. सध्या आपल्याकडे रेटायरमेंट म्हणजे फक्त फायनान्शिअल प्लनिंग इतके च बघितले जाते. आणि तेही का? तर म्युटुयल फंड आणि इतर मंडळी त्यांचा धंदा वाढावा म्हणुन आपल्या ला हे हॅमरिंग करताहेत. २० वर्षांपुर्वी हाही विचार कोणी करत नव्हते. मुलांचे शिक्षण झाले म्हणजे झाली म्हातारपणाची तयारी एवढ्यवरच विचार येऊन थांबत होता. आता गाडी आर्थिक नियोजनापर्यंत येऊन पोचलीय, भलेही ती गाडी कोणी दुसरे त्यांच्य स्वार्थासाठी ढकलतेय. पण म्हातारपण म्हणजे केवळ एवढेच नव्हे, तर याहुन बरेच आहे. हे बरेच काय हे तुमच्या अनुभवाने तुम्हाला कळलेय तर जितपत कळालेय ते मांडा इथे.
आपण माणसांच्या
आपण माणसांच्या वृद्धाश्रमांबद्दल बोलतोय आणि आत्ताच लेकीचा फोन आला की कॉलनीत IDA ची अँबुलन्स आलीय आणि ते लोक कॉलनीत फे-या मारुन कुत्रे गोळा करताहेत. आमच्या घराखालीच ५-६ कुत्रे होते. बाकी उरलेल्या कॉलनीत पण खुप कुत्रे. आमच्या खाली एक ब्राऊन रंगाची अगदी कुरुप कुत्री होती, जिला आम्ही अग्ली म्हबायचो, तिलाही उचलले. ऐकुन मला खुप वाईट वाटले, कारण मला ती खुप आवडायची. पण तिचे म्हातारपण आता सुखात जाईल. ती म्हातारी झालेली आणि रस्त्यावर तिची दुर्दशा झाली असती. कॉलनीत खुप कुत्रे पाहिलेत म्हातारपणी खंगुन मेलेले. आता निदान हे कुत्रे तरी सुखात राहतील.
लिंबु. तुमच्या पोस्ट्स खूप
लिंबु. तुमच्या पोस्ट्स खूप विचार करायला लावणार्या आहेत.. जरूर लिहाच या विषयावर..
आणि सर्वात महत्वाचे म्हणजे स्वतःच्या वृद्धावस्थेला कसे सामोरे जाणार याची पूर्वतयारी करणे आवश्यक वाटत असेल.. हे वाक्य तर खरोखरंच हायलाईट आहे..
साधना.. सेल्फ पिटी बद्दल .. अगदी!!अगदी!!!
साधना, खूप आवडली तुझी
साधना, खूप आवडली तुझी पोस्ट!!!>>>>>>+१ खरचं खूप छान लिहिलस.
लिंबु. तुमच्या पोस्ट्स खूप विचार करायला लावणार्या आहेत.. जरूर लिहाच या विषयावर.. >>>>>>>>+१ सगळ्यांनाच गरज आहे त्याची.
आमच्या सोसायटीतल्या एक आजी स्वतःहून गेल्यात वृद्धाश्रमात राहयला. इथे मुलगा, सून, नातवंड आहेत. पण भविष्याचा विचार करून त्या आधीपासूनच तिकडे रहातात. एकदा तिकडे पडल्या, पायाला लागलं, तर आधी दीनानाथ हॉस्पीटलमध्ये अॅडमिट होऊन मग मुलाला बोलावलं. त्या कार्याला वगैरे येतात. नंतर मुलाला परत नेऊन सोडायला सांगतात.
त्यांचे पती दवाखान्यातच गेले. तर त्यांनी मुलाला, डेड्बॉडी डायरेक्ट वैकुंठात न्यायला सांगितली. त्याप्रमाणे त्यांनी तिकडे परस्पर जाऊन अंत्यसंस्कार केले. आम्हाला दुसर्या दिवशी कळलं ते गेल्याच.
साधना, वर्षू, सुशोभा...,
साधना, वर्षू, सुशोभा..., नक्कीच लिहायचा प्रयत्न करीन... खूप विचारपूर्वक लिहायला लागेल. पण एकसलग लिहीताना, एकच एक धोरण्/दिशा असे ठेवुन लिहीणे अवघड आहे, कारण व्यक्ति तितक्या प्रकृती, व तितक्या भिन्न वृत्ती अन पिढी दर पिढी गणिक (हल्ली तर झपाट्याने) बदलणारी प्राप्त परिस्थिती... तेव्हा सर्वांनाच उपयोगी ठरतील अशी तत्वे शोधुन मेचक्या शब्दात मांडू पहाणे खरेच खूप अवघड आहे. तरीही प्रयत्न नक्की करेन.
लिंबू भाऊ,जरुर लिहा
लिंबू भाऊ,जरुर लिहा ...
आपल्या कडे वॄधांची अवस्था फार बिकट आहे.
वॄंदावन मथुरा,काशी घाटावर मुले आई-वडिलांना सोडुन जातात त्यांना त्याबद्दल अपराध बोध पण वाटत नाही.
त्यांना वाटते की आपण खुप पुण्याचे काम केले आहे.इथे जर आई-वडिलांचा मॄत्य झाला तर त्यांची डायरेक्ट स्वर्गात एन्ट्री होईल. खुप-खुप हालाकिचे जिवन जगतात ही लोकं
गो माता बचावो ,गो-वंश संरक्षण सार खे मांता-पिता बचावो मां-बाप संरक्षण धोरण सरकारणे काटेकोरपणे राबवायला पाहिजे.
२-३ वर्षांपूर्वी मी एक असाच
२-३ वर्षांपूर्वी मी एक असाच प्रसंग ऐकला होता.
आई-वडील भारतात. मुलगा-सून परदेशात. आई आजारी म्हणून मुलाला कळवलं. तर त्याने वेळ नाही म्हणून सांगितल. ती जास्त आजारी झाली म्हणून परत कळवल्यावर "ती गेल्यावरच कळवा". असं उत्तर त्याने दिलं. आणि ती गेल्याच कळवल्यावर, काही दिवसांनी आला. वडीलांना म्हणाला, " तुम्ही एकटे कशाला इकडे रहाता, चला आमच्याकडेच. " असं सांगून सगळे पैसे वगैरे आपल्या नावावर करून घेतले. परदेशात जाण्यासाठी, वडीलांना घेऊन विमानतळावर गेला. त्यांना, "आलोच" म्हणून सांगून जो गेला, तो कित्येक तास उलटले तरी परत आला नाही. नंतर कुणीतरी त्यांची चौकशी केल्यावर त्यांनी हे सांगितल. मग त्यांनी आपल्या मित्राला/मित्राच्या मुलाला फोन करून हे सांगितल. ते येऊन त्यांना घेऊन गेले. नशीबाने मित्र धावून आला. घर त्यांच्याच नावावर होतं आणि त्यांना पेंशन मिळत होती. नाहीतर त्यांचे काय हाल झाले असते, विचारच करवत नाही.
व्यक्ति तितक्या प्रकृती, व
व्यक्ति तितक्या प्रकृती, व तितक्या भिन्न वृत्ती.. मान्य आहे,पण तुम्ही फक्त तुमच्या दृष्टीकोणातून लिहा. त्यावरून दुसर्यांना विचार करण्याची नवीन दिशा मिळू शकते..
शोभा१, बदलत्या काळा बरोबर चालणार्या या आजीं, तर उत्तम उदाहरणच प्रस्तुत करत आहेत.
आमच्या ओळखीचे एक आर्मी ऑफिसर आहेत. वृद्धावस्थेत त्यांना पॅरेलिसिस चा अटॅक आला .तेंव्हा त्यांना सांभाळणे तितक्याच वॄद्ध पत्नी ला अशक्यच होते. त्यांनी सरळ राहता फ्लॅट विकून टाकला आणी पुण्यात,अथश्री मधे दोन खोल्या घेऊन राहात आहेत. आता आजोबांना २४ तास अटेंडंट उपलब्ध आहे आणी आजी निश्चिंत होऊन स्वतःचा वेळ जसा हवा तसा घालवण्यास मोकळ्या आहेत.
त्यांच्या वेल सेटल्ड मुलांना ही मानसिक शांती आहे.
एक मात्र अवश्य आहे, असे निर्णय घेताना मुलांवर उपकार म्हणून घेऊ नये किंवा त्यांच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण होईल असे वागू नये!!
आजकाल च्या न्यूक्लिअर फॅमिली च्या जमान्यात वी नीड टू बी प्रॅक्टीकल!!!
Pages