नुकतंच माझ्या सासर्यांनी (आम्ही सगळे त्यांना आप्पा म्हणतो) पंचाण्णव्या वर्षात पदार्पण केलं. त्या निमित्तानी हा लेखनप्रपंच. असं म्हणतात की आपल्याच माणसाचं चारचौघांसमोर कौतुक करू नये. पण त्यांच्यामध्ये इतकी सकारात्मकता आहे की ज्येष्ठच काय, तरुणांनीदेखील कित्ता गिरवावा अशी त्यांची विचारशैली. त्याबद्दल न लिहिणं हाच गुन्हा होईल.
त्यांच्याबद्दल लिहिताना त्यांच्या आयुष्यातल्या वेगवेगळ्या तारखा आणि तत्सम इतर पायर्या मी गाळूनच टाकते. मात्र ते आम्हाला सुपरमॅन का वाटतात ते लिहिते.
ते एकटे स्वतंत्रपणे राहातात. पण डबा मागवणे वगैरे शॉर्ट कट अजिबात नाही. स्वयंपाक करायला आणि झाडलोटीला बाई आहे. ‘ती करेल तो स्वयंपाक’ असं नाही. काय करायचं, कसं करायचं, त्यात सुधारणा काय करायला पाहिजे ते समजावून सांगतात. हे वाचून असं वाटेल की फार चिकित्सक दिसताहेत. तसं अजिबात नाही. कोणालाही त्रास न होता क्वॉलिटी कशी सांभाळायची ही कसरत त्यांना सहज जमते.
बाई कामाला येते दुपारच्या जेवणाआधी. म्हणजे दुपारचा स्वयंपाक गॅसवरून सरळ ताटात. वयोपरत्वे रात्री जेवत नाहीत. मग ब्रेकफास्टचं काय? फ्रिजमध्ये ठेवून सकाळी मायक्रोवेव्ह करणं सोपं. पण त्यांचं गुणवत्ता नियंत्रण (quality control) आणि उत्साह इतका दांडगा की रोज ताजा ब्रेकफास्ट ते स्वतःच बनवतात. साधं सोपं कॉर्न फ्लेक्स, दूध, ब्रेड नव्हे. व्यवस्थित पोहे, खिचडी, सांजा वगैरे. इतकं सुरेख बनवतात की वाटेल त्यांना पहिल्यापासून स्वयंपाकाची आवड आहे. माझी मुलगी जितके दिवस माहेरवाशीण असते तितके दिवस रोज आजोबा आणि नातीचा ब्रेकफास्ट एकत्र असतो.
पोहे, तांदूळ, कुरडया, पापड वगैरे कुठल्या दुकानात चांगले मिळतात हे कारणमीमांसेसकट त्यांना माहीत असतं. मी स्वतः त्यांचा या बाबतीत सल्ला नेहमी घेते. राजनीतीमध्ये कोण काय करंत आहे याची इत्यंभूत माहिती असते. मी त्या बाबतीत अगदीच अनभिज्ञ. त्यामुळे तेच माझे सल्लागार.
आप्पा घरकामात इतके कुशल झाले कसे? पहिल्यापासून असे नव्हते. त्यांना जरूरच पडली नसणार कारण माझ्या सासूबाई घरच्या आणि बाहेरच्या, सर्वच कामात अतिशय निपुण. मात्र सन २००० नंतर आईंना आजारपणानी त्रास द्यायला सुरवात केल्यानंतर आप्पांनी सर्व कामांत लक्ष द्यायला सुरवात केली आणि थोड्याच काळांत माहिर झाले. आजारपणाचा काळ आई आणि आप्पा दोघांनाही कष्टप्रदच असणार. खरं तर ‘होता’ असंच म्हणायला पाहिजे, पण मी ‘असणार’ अशासाठी म्हणते की दोघांनीही चेहर्यावरचं हास्य कधीही मावळू दिलं नाही. त्यांच्याकडे जाऊन आलं की प्रसन्न वाटायचं. अजूनही वाटतं.
आईंचा आजार बळावतंच गेला आणि २००९ साली त्यांना देवाज्ञा झाली. साठ वर्षांहून जास्त काळ त्या दोघांचा संसार झाला होता. इतक्या मोठ्या कालखंडात कित्येक काटेकुटे, दगडधोंडे वाटेत लागलेच असणार. मात्र त्या दोघांच्या संभाषणात एकदाही म्हणजे खरोखरच एकदाही स्वर चढलेला कोणीही ऐकलेला नाही. प्रत्येक निर्णय घेताना घरच्या सगळ्यांची मतं घेतली जायची. भरपूर चर्चा. म्हणजे मतभेद अपरिहार्य. पण तरीही स्वर कधीही वाढला नाही. नुसतं एकमेकाशीच नव्हे, तर दुसर्या कोणाशीही बोलताना नेहमीच विनयानी बोलणं असतं.
आईंनंतरच्या एकटेपणाला आप्पांनी इतक्या सहजपणे तोंड दिलं की ते कोणाला जाणवलंच नाही. कोणतीही गोष्ट एखाद्याने effortlessly केली की आपल्याला त्याचं तितकंसं कौतुक वाटत नाही कारण आपल्याला लक्षातच येत नाही की त्या effortlessnessच्या मागे त्यांचे किती प्रचंड efforts असतात ते.
स्फुट लेख लिहिण्यात त्यांचा हातखंडा आहेच, पण या particular विषयावर त्यांनी ‘मी एकटा आहेच कुठे?’ या शीर्षकाचा इतका सुंदर लेख लिहिला की त्यांच्यावर अभिनंदनाच्या फोन्सचा वर्षाव झाला. त्याहूनही महत्वाचं म्हणजे सीनियर सिटिझन्सनी “मी अशाच अवस्थेतून जात असताना सैरभैर झालो होतो /झाले होते. तुमच्या लेखामुळे मला दिशा मिळाली.” अशी अतिशय समाधान देणारी पावती दिली.
‘मुंबई ग्राहक पंचायत’ या आता प्रचंड मोठ्या झालेल्या संस्थेच्या फाउंडर मेंबरपैकी दोन म्हणजे आमचे आई आणि आप्पा. कित्येक वर्षं संस्थेचं ऑफिस त्यांच्याच घरी होतं. तेव्हां अगणित चांगली माणसं जोडली. एक वर्षभरापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हातून त्यांचा सत्कार याच कार्यासाठी झाला. मुंबई सोडून पुण्याला आल्यावर ते काम थांबलं. आता या गोष्टीला सतरा वर्षं झाली. पण अजूनही मुंबईहून कार्यक्रमांना त्यांना बोलावणं येतं आणि ते न चुकता जातात देखील.
तीन वर्षांपूर्वी केसरीबरोबर यूरोपची टूर करून आले. एकटे! ज्यांनी यूरोपची टूर केली आहे त्यांना माहीतच असेल की प्रेक्षणीय स्थळं बघायची असतील तर सर्व ठिकाणी बसमधून उतरल्यावर खूप चालायला लागतं. नो प्रॉब्लेम! एकही ठिकाण सोडलं नाही. इतकंच नव्हे तर परत आल्यावर ‘लंडन ते रोम’ नावाचं एक पुस्तकही लिहिलं! त्यात तिथल्या एकही हॉर्न ऐकू न येणार्या गुळगुळीत रस्त्यांबद्दलच फक्त लिहिलं नाही, तर 'दुसर्या महायुद्धाचा अंत आणि भारताचं स्वातंत्र्य या दोन्ही घटना साधारण एकाच काळात होऊनही आपल्या प्रगतीमध्ये इतकी तफावत का?' यावर देखील लिहिलं.
त्यांची अंजिओप्लास्टी झाली आणि डॉक्टरांनी त्यांना सांगितलं, "तुम्ही आता वीस वर्षांनी तरूण झालेले आहात." पण डॉक्टरांनी त्यांना underestimate केलं. आप्पांनी असं ऐकलं, "तुम्ही आता वीस वर्षांचे तरूण झालेले आहात." आणि खरोखर तसेच झाले देखील!
श्रीनगरचं शंकराचार्यांचं देऊळ असो, किंवा ग्वाल्हेरचा किल्ला असो. स्वतःच्या पायाने वरपर्यंत! कोणाशीही स्पर्धा न करता, कोणालाही काहीही सिद्ध करण्याची इच्छा न बाळगता शांत, सहज चालीनी वरपर्यंत! नव्वदीत! प्रचंड आत्मविश्वास. पण फाजील आत्मविश्वास अजिबात नाही. एक दिवशी त्यांना वाटलं, तोल सांभाळण्यासाठी चालण्याची काठी बरोबर ठेवलेली बरी. लगेच घेतली. आता अजिबात जरूर नसलेली काठी कायम बरोबर असते.
भरतीचा माज नाही अन् ओहोटीची लाज नाही.
बुद्धी तल्लख. मुलं, नातवंडं आणि पतवंड इतकेच नव्हे तर ओळखीच्या आणि नात्यातल्या सगळ्यांचीच इत्यंभूत माहिती असते आणि लक्षात देखील असते. पुण्याबाहेरचं कोणीही पुण्याला आलं की वेळात वेळ काढून आप्पांकडे जातातंच. प्रत्येकाचं आदरातिथ्य त्यांच्याकडे व्यवस्थितच होणार. मग तो त्यांचाच बालमित्र असो नाहीतर त्यांच्या अमेरिकेतील पुतण्याची ग्रीक पत्नी असो.
एकदा मी त्यांना विचारलं, “आप्पा, तुम्हाला अजिबात व्यसन नाही हे खरं, पण तुम्ही काही व्यायाम करीत नाही. खाण्याच्या बाबतीत बंधनं स्वतःला घालून घेतलेली नाहीत. तुमच्या दिनचर्येच्या बाबतीत काही कडक नियमावली नाही. तरी तुम्ही इतके सुपरमॅन कसे?”
त्यावर ते उत्तरले, “सुपरमॅन बिपरमॅन मला माहीत नाही. मात्र मला वाईट प्रसंग आणि गोष्टी आठवतंच नाहीत. फक्त चांगल्याच आठवतात.”
जीवनमूल्यांवर रकानेच्या रकाने लिहिले गेले आहेत. त्या सार्यातल्या तत्वज्ञानाचा अर्क याहून सुटसुटीत, सुंदर आणि सोप्या भाषेत कोणी काढू शकेल काय?
खूप प्रेरणादायी व्यक्तीमत्व.
खूप प्रेरणादायी व्यक्तीमत्व. तुम्ही नेहेमी प्रमाणे लिहिलंय देखिल मस्त
मला असंच मोठं व्ह्यायचंय
हर्पेन खुप संदर व्यक्तीमत्व!
हर्पेन
खुप संदर व्यक्तीमत्व! छान लिहिलंय.
त्यांचा ’मी एकटा आहेच कुठे ?’ हा लेख कुठे वाचायला मिळेल?
खूप प्रेरणादायी व्यक्तीमत्व.
खूप प्रेरणादायी व्यक्तीमत्व. तुम्ही नेहेमी प्रमाणे लिहिलंय देखिल मस्त.>>>>> +१
वा! काय प्रसन्न वाटले
वा! काय प्रसन्न वाटले वाचून!
मला असंच मोठं व्ह्यायचंय>> +१
प्रेरणादायी व्यक्तिमत्व
प्रेरणादायी व्यक्तिमत्व !
भरतीचा माज नाही अन् ओहोटीची लाज नाही.>>> हे खूप आवडलं.
जबरदस्त व्यक्तिमत्व .... एकेक
जबरदस्त व्यक्तिमत्व ....
एकेक गुणांची ओळख होता होता छाती दडपून गेली माझी ...
२०१५ मधे हे असे व्यक्तिमत्व आपल्यात वावरतंय यावर विश्वास बसत नाहीये ...
श्री. अप्पासाहेबांना शिरसाष्टांग दंडवत ...
सहज आणि उत्तम लेखनशैलीसाठी तुम्हाला मनोमन धन्यवाद..
खूप छान लिहिलय. एकदम
खूप छान लिहिलय. एकदम प्रेरणादायी व्यक्तिमत्व
भरतीचा माज नाही अन् ओहोटीची लाज नाही >>> हे मस्त आहे.
होमेओपथि ने माझ्या मुलामधे ४
होमेओपथि ने माझ्या मुलामधे ४ months मधे अमुलग्र बदल झाला आहे. a to z letters with minimum 4 objects, colors, aminals, flowers, fruits, 1 to 20 numbers सगळ सान्गतो. तुम्हि हि ही treatment घेउन बघा नक्कीच आनन्ददायी result मिळतो
तुमच्या सासर्याना म्हणजे
तुमच्या सासर्याना म्हणजे आदरणीय अप्पाना म्हणजेच आमच्या काकाना कृशिसान. अनमोल प्रेरणेचा लेख आहे हा. त्याबद्दल तुम्हालाही धन्यवाद. काकाना आमच्या शुभेच्छा सान्गा.
तुम्ही लिहीत रहा. खूपच मनमोकळे आणी सहज लिहीता.:स्मित:
भरतीचा माज नाही अन् ओहोटीची लाज नाही.>>>> हे वाक्य अफाट आवडले.
खुप सुंदर लिहलयं.. अप्पांना
खुप सुंदर लिहलयं.. अप्पांना साष्टांग नमस्कार..
त्यांचे लेख वाचायला आवडतील..
अप्पांना साष्टांग नमस्कार आणि
अप्पांना साष्टांग नमस्कार आणि सदैव असेच ठणठणीत राहोत हि प्रार्थना.
तुम्ही खुप छान लिहता नेहमीच.
भरतीचा माज नाही अन् ओहोटीची लाज नाही.>>>> मस्त.
सुपरमॅन बिपरमॅन मला माहीत नाही. मात्र मला वाईट प्रसंग आणि गोष्टी आठवतंच नाहीत. फक्त चांगल्याच आठवतात.” - वाह!
व्वा! सुंदर लेख! आप्पांना
व्वा! सुंदर लेख! आप्पांना शुभेच्छा सांगा! मला आवडेल त्यांना भेटायला.
२०१५ मधे हे असे व्यक्तिमत्व आपल्यात वावरतंय यावर विश्वास बसत नाहीये ... >>>>>>>>+१
किती थोडक्यात पण खूप
किती थोडक्यात पण खूप आशयसंपन्न लिहीलय.
तुमच्या आप्पांना भेटायलाच हवे...
त्यांचा ’मी एकटा आहेच कुठे ?’
त्यांचा ’मी एकटा आहेच कुठे ?’ हा लेख कुठे वाचायला मिळेल?
मला आवडेल त्यांना भेटायला. कुठे भेटतील?
छान! श्री. अप्पानां
छान!
श्री. अप्पानां शि.सा.दंडवत -/\-
--------------------------
-------होमेओपथि ने माझ्या.....@नम्रता सिद्धापुर.--कदाचीत तुम्ही चुकुन या धाग्यावर प्रतिक्रिया दिली आहे. कृपया संपादित करावी.
प्रसन्न, प्रेरणादायी, आशावादी
प्रसन्न, प्रेरणादायी, आशावादी व्यक्तिमत्वाचा परिचय करुन दिल्याबद्दल धन्यवाद. छान लिहिलंय.
सुपरमॅनना साष्टांग नमस्कार व ठणठणीत दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा
कदाचीत तुम्ही चुकुन या
कदाचीत तुम्ही चुकुन या धाग्यावर प्रतिक्रिया दिली आहे. >>>>>>.. बहुतेक त्यांनी दुसर्या धाग्यावरची, चूकून इथे दिलेय आणि तिथे शोधत असतील, कुठे गेली म्हणून.
प्रेरणादायी आहे हे..
प्रेरणादायी आहे हे.. त्यांच्यासारखा दृष्टीकोन ठेवता यावा असा आशिर्वाद मागावासा वाटतोय.
सहीये, तब्येतीनुसार पथ्यपाणी
सहीये,
तब्येतीनुसार पथ्यपाणी आणि व्यायाम हवाच,
पण आरोग्याची सर्वात जास्त काळजी घेतो ते जगण्याचा टेंशन फ्री द्रुष्टीकोन
अप्पांना नमस्कार !
आप्पा किती प्रेरणादायी
आप्पा किती प्रेरणादायी व्यक्तीमत्त्व आहेत! खरोखर सुपरमॅन!! तुम्ही लिहिलंय देखिल फार सुंदर!
फार सुंदर. वाचुन ही तरतरी
फार सुंदर. वाचुन ही तरतरी आली मनाला.
खूप छान लिहिलंय. खूप
खूप छान लिहिलंय. खूप प्रेरणादायी व्यक्तिमत्वाची ओळख. फार आवडली.
मस्त
मस्त
सुंदरच लिहिलंय. अप्पांसारखे
सुंदरच लिहिलंय. अप्पांसारखे लोकं खरंच प्रेरणादायी. ___/\___
भरतीचा माज नाही अन् ओहोटीची लाज नाही. >>> लाखमोलाचं वाक्य!
अत्यंत प्रेरणादायी लेख.
अत्यंत प्रेरणादायी लेख. भरती-ओहोटीवालं वाक्य खासच !
‘मुंबई ग्राहक पंचायत’ या आता प्रचंड मोठ्या झालेल्या संस्थेच्या फाउंडर मेंबरपैकी दोन म्हणजे आमचे आई आणि आप्पा. >>> माहेरी आई-बाबा ग्राहक पंचायतीचे मेंबर्स असल्यामुळे लहानपणापासून दर महिन्याला एका सदस्याच्या घरी येणारं अत्यंत वाजवी किंमतीचं उत्तम दर्जाचं सामान घेऊन येणे, त्यांचं ते शिधापत्रक भरुन देणे वगैरे आठवणी आहेतच. पण ह्याच ग्राहक पंचायतीमुळे एका नामवंत बिल्डरने बुडवलेले पैसे चक्क व्याजासकट परत मिळाल्याची आश्चर्यकारक आठवण गाठीशी आहे. त्या ग्राहक पंचायतीचे फाऊंडर मेंबर हे वाचून खूप मस्त वाटलं.
'मी एकटा आहेच कुठे ?' हा लेख वाचावासा वाटतोय. इथे देता येईल का ?
सुंदर लिहील आहे. कोणतीही
सुंदर लिहील आहे.
कोणतीही गोष्ट एखाद्याने effortlessly केली की आपल्याला त्याचं तितकंसं कौतुक वाटत नाही कारण आपल्याला लक्षातच येत नाही की त्या effortlessnessच्या मागे त्यांचे किती प्रचंड efforts असतात ते. <<< खरं आहे हे.
आप्पाना नमस्कार ! सुंदर
आप्पाना नमस्कार ! सुंदर लिहिलेत .. अत्यंत प्रेरणादायी व्यक्तिमत्व .
त्यांच लेखन इथे प्रकाशित करा जमल्यास
भरतीचा माज नाही अन् ओहोटीची लाज नाही.>>>> लाखमोलाच वाक्य आहे
भरतीचा माज नाही अन् ओहोटीची
भरतीचा माज नाही अन् ओहोटीची लाज नाही>> हे वाक्य खरोखर लक्षात ठेवावसं आहे.
मला पण त्यांचा मी एकटा कुठे आहे हा लेख वाचायची इच्छा आहे. इथे देता येइल का?
चांगल्याच गोष्टी लक्षात राहाणे आणी वाइट प्रयत्न करूनही लक्षात न राहाणे ही फार मोठी देणगी आहे.
खुप सुंदर लेख. आप्पांना वंदन.
खुप सुंदर लेख. आप्पांना वंदन.
काय सकारात्मक व्यक्तिमत्व
काय सकारात्मक व्यक्तिमत्व आहे! त्रिवार वंदन आप्पांना. तुम्हालाही त्यांचा सहवास मिळाला ही मोठी भाग्याची गोष्ट आहे. मागे तुमच्या मुलीच्या लग्नाबद्द्ल वाचलं होतं. तिचाही खूप अभिमान वाटला होता.
आप्पांचं लेखन वाचायला आवडेल. भेटायलापण.
तुम्ही छानच लिहिता आणि विषयही छान असतात.
Pages