श्रीलंका सहल - भाग ६ - सिगिरीया

Submitted by दिनेश. on 6 October, 2015 - 04:21

श्रीलंका सहल - भाग १ - प्राथमिक माहिती http://www.maayboli.com/node/55306
श्रीलंका सहल - भाग १ - एअरपोर्ट ते नुवारा एलिया http://www.maayboli.com/node/55355
श्रीलंका सहल - भाग २ अ - हॉर्टॉन प्लेन्स नॅशनल पार्क
http://www.maayboli.com/node/55444
श्रीलंका सहल - भाग २ ब - हॉर्टोन प्लेन्स नॅशनल पार्क http://www.maayboli.com/node/55445
श्रीलंका सहल -भाग ३ - न्यू झीलंड फार्म, अशोक वाटीका, अरालिया ग्रीन हिल्स
http://www.maayboli.com/node/55526
श्रीलंका सहल - भाग ४ - व्हीक्टोरिया गार्डन, नुवारा एलिया http://www.maayboli.com/node/55845
श्रीलंका सहल - भाग ५ - नुवारा एलिया ते कँडी http://www.maayboli.com/node/55900
इथून पुढे...

आजही पहाटे ५ वाजता आम्ही निघालो. आजचे ठिकाण होते सिगिरिया. सिगिरिया हे एक पुरातन शहर होते,
सध्या मात्र त्याचे अवशेषच उरलेत. आणि या जागेचे मुख्य आकर्षण म्हणजे तिथे असलेला २०० मीटर्स उंचीचा
उभ्या चढणीचा कातळ. इथे चढायला व्यवस्थित पायर्‍या आहेत, पण हे मला झेपेल का, याची मलाच शंका होती.
नॉर्टॉन ला १० किलोमीटर चाललो खरा पण तिथे फारसा चढ नाही पण इथे मात्र खडी चढण आहे.

शिवाय जसजसा दिवस वर येतो तसा तो कातळ तापायला लागतो, म्हणून कोवळ्या उन्हातच चढाई करणे गरजेचे
आहे. मी नेटवर बरीच माहिती वाचली आणि तो करायचाच असे ठरवले. ( पण इथेही भारतीय पर्यटक सहसा
जात नाहीत. )

हे ठिकाण मध्य श्रीलंकेत आणि कँडीच्या उत्तरेला आहे. प्रवासाला साधारण २ तास लागतात. हा भाग त्या देशातला
कमी पावसाचा भाग आहे, पण म्हणून हिरवाईत कमतरता आहे असे अजिबात नाही. रस्ता सुंदर आहे, फारचे घाट
नाहीत. या भागात मिरीचे उत्पादन प्रामुख्याने होते त्यामूळे चहाच्या मळ्याच्या जागी मिरीच्या बागा दिसत
राहतात आणि समुद्रकिनार्यापासून दूर असूनही नारळाची भरपूर झाडे दिसतात. ( नारळ त्यांच्या रोजच्या
जेवणाचा अविभाज्य भाग आहे. )

या रस्त्यावर मात्र जरा रहदारी लागते. एका गावात आम्ही थांबलो ( अर्थातच चहासाठी ) तिथलीही स्वच्छता
वाखाणण्याजोगी होती. प्रवाश्यांची भरपूर गर्दी असूनही अगदी प्रसाधगृहेही स्वच्छच होती. आम्ही नाश्ता हॉटेलमधून बांधून घेतला होता, म्हणून फक्त चहाच घेतला.

साधारण सात वाजता आम्ही सिगिरियाला पोहोचलो. भराभर नाश्ता उरकून मी चालू लागलो. तिथे ड्रॉप ऑफ पाँईट आणि पार्किग वेगवेगळ्या ठिकाणी आहे. त्यामूळे एकाच ठिकाणी गर्दी होत नाही. ड्रॉप ऑफ पाँइट्ला एकही
दुकान नाही. मला हि चढाई माझ्या गतिने करायची होती म्हणून मी थिवांकाला खालीच थांबायला सांगितले.

आता थोडेसे या जागेच्या इतिहासाबद्दल..

या जागी अनेक गुंफा आहेत आणि तिथे इसवीसन पूर्व तिसर्‍या शतकापासून मानवी वस्ती असल्याचे पुरावे
सापडलेत. पण या जागेचा इतिहास आहे तो इसवीसन ४७७ पासून.

तिथल्या राजा, धातूसेनाचा दासीपासून झालेला मुलगा कश्यप आणि त्याचा पुतण्या मिगार यांनी कट करून,
गादीचा वारस असणार्या मुगालनला राज्यातून हुसकावून लावले. हा मुगालन भारतात आश्रयासाठी येऊन
राहिला. हा मुगालन परत हल्ला करेल अशी भिती असल्याने, कश्यपाने आपली राजधानी अनुराधापुरा पासून
सिगिरियाला हलवली. आणि हा निर्णय अर्थातच सुरक्षिततेच्या कारणासाठी घेतला गेला.

त्या काळात म्हणजे इसवीसन ४७७ ते ४९५ या काळात सिगिरिया हे शहर विकसित करण्यात आले.
मुख्य राजवाडा वगैरे या अभेद्य अश्या सुळक्यावर असले तरी सभोवताली अनेक उद्याने आणि सरोवरे घडवण्यात आली.

कश्यपला ज्याची भिती वाटत होती, तेच झाले. मुगालनने भारतातून सैन्याची जमवाजमव करून सिगिरियावर
हल्ला केला. कश्यप मात्र त्याच्या हाती लागला नाही त्याने स्वतःचा शिरच्छेद करुन घेतला. मुगालनने
आपली राजधानी परत अनुराधापुराला हलवली. पुढे दोन शतके या सिगिरीयात बुद्ध भिक्षुंची वसाहत होती.
अगदी १४ व्या शतकापर्यंत ते तिथे होते. पण पुढची दोन शतके मात्र हि जागा दुर्लक्षितच राहिली. मधे काही
काळ, कँडीच्या राज्याचा एक भाग म्हणून तिचा वापर झाला, पण तिला पुर्वीचे वैभव कधीच मिळाले नाही.

लाकडी वाड्याची पडझड झाली, आणि सभोवताली रान माजले. पुढे १८३१ मधे ब्रिटीश अधिकारी जोनाथन फोर्ब्ज ला याचा परत शोध लागला आणि मग तिथे उत्खनन वगैरे सुरु झाले. लाकडी बांधकामाची पडझड होणे स्वाभाविकच होते पण बाकीचे बांधकाम. भित्तीचित्रे, गुंफा वगैरे अजून बर्‍यापैकी शाबूत आहेत. ( ते आपण बघणारच आहोत )

पण या कथेबाबत थिवांका मला म्हणाला, कि मुगालनने भारतातून जे सैन आणले ते इथेच राहिले. शिवाय मुगालनचीच नव्हे तर कश्यपाचीही राणी भारतीयच होती. मी मुद्दाम विचारले कि कुठल्या भागातल्या होत्या त्या,
तर तो म्हणाला मगध भागातल्या होत्या.. ( मला या राण्यांच्या भारतीय इतिहासातला उल्लेख कुठे वाचल्याचे
अजिबात आठवत नाही, कुणाला माहीत असेल तर अवश्य सांगा. आपल्या गांधारीचाही उल्लेख, अफगाणिस्तानातल्या लोकसाहित्यात असेल का, याची मला शंकाच आहे. )

तर आपण या शिखरावर चढाई करायला सुरवात करु.

पार्किंग लॉट पासून पायथ्यापर्यंतचा परीसर रम्य आहे. मधे एक नदी ओलांडावी लागते. दोन्ही बाजूला सरोवरे
आहेत आणि त्यात भरपूर कमळे ( हो कमळे, वॉटर लिलिज नाहीत ) आहेत. मला तिथे एक घोरपडही
दिसली. बहावा आणि कॅशियाची झाडे आहेत.

पुर्वी इथे कारंजे होती, आता ती नाहीत पण बांधकाम मात्र शाबूत आहे. पायथ्याच्या आजूबाजूला काही गुंफा
दिसतात. काही यज्ञवेदी पण दिसतात. मोठमोठ्या कातळांमधून आपण सुस्थितीतल्या पायर्यांवरून चढाई
सुरु करतो. थोड्याच वेळात आपल्याला २० मीटर्स वर जाणारे स्पायरल जिने दिसतात. त्याने वर गेल्यावर
आपण एका गुहेत शिरतो.

इथे काही भित्तीचित्रे आहे. ती अर्थातच १,५०० वर्षांपुर्वीची आहेत. त्यांच्यात आणि आपल्या अजिंठाच्या चित्रात
कमालीचे साम्य आहे. ही चित्रे अजून बर्या स्थितीत आहेत. या काल्पनिक अप्सरा आहेत का राजघराण्यातील
स्त्रिया आहेत, या बद्दल संदेह आहे. तसेच सध्या जितकी ( साधारण १०/१२ ) चित्रे आहेत त्यापेक्षा खुप जास्त
प्रमाणात आणि कदाचित सर्व कातळावरच अशी चित्रे असावीत असाही कयास आहे.

हि चित्रे थेट कातळावर न रंगवता काही गिलावे देऊन मग रंगवली आहेत पण मग त्यापूर्वी हा कातळ सपाट
का करून घेतला नाही, ते कळत नाही. तसेच चित्रातलेही काही थर नष्ट झाल्याने त्या रेखाटनातील ढोबळ चूका
आता उघड्या पडल्यात. त्यावरून असे वाटते कि आता आहेत त्यापेक्षा हि चित्रे पुर्वी जास्त चमकदार
असावीत. या गुहेतून खाली यायला दुसरा एक स्पायरल जिना आहे.

तिथून पुढे एक मिरर वॉल नावाची भिंत लागते. कधी काळी त्यावर इतका नितळ मुलामा होता कि त्या
वाटेवरून जाणार्या लोकांना आपले प्रतिबिंब त्यात दिसेल. सध्या ती भिंत शाबूत असली तरी मुलामा मात्र
नष्ट झालाय. असेच पायर्यांवरून चढत आपण एका सपाट जागी येतो.

इथे सिंहाच्या पावलाच्या आकारात कोरलेले कातळ आहेत. कधी काळी पूर्ण सिंहाचा चेहराच तिथे होता आणि
त्याच्या मूखातूनच वाट जात होती, असा कयास आहे. पावलांच्या आकारावरून सिंहाच्या मुखाच्या आकाराची
कल्पना करता येते, पण तो भाग मूळ कातळाचाच भाग होता कि ते जोडकाम होते ते कळत नाही. सध्या तरी
पावलांच्या वरचा भाग शाबूत नाही.

इथे थोडा वेळ विसावा घेऊन मी वर चढायला सुरवात केली. इथे मात्र कड्याला लगटून पण मजबूत लोखंडी
पायर्या आहेत. मधे कुठेही थांबायला जागा नाही त्यामूळे या शेवटच्या टप्प्यातल्या ( साधारण चारशे ) पायर्या
न थांबता चढाव्या लागतात. ( जाण्यासाठी व येण्यासाठी दोन वेगवेगळ्या मार्गिका आहेत त्यामूळे समोरून
येणारे पर्यटक नसतात. )

इथून मात्र भन्नाट वारा सुरु होतो. आणि तो माथ्यावरही सोबत करतो. माथ्यावर बरीच मोकळी जागा आहे.
अनेक वाड्यांचे जोते दिसतात, काही पाण्याची कुंडेही आहेत त्यातही फुले आहेत.

सभोवतालचा नजारा अप्रतिम आहे. दूरवर घनदाट जंगल आहे आणि त्यापलिकडे डोंगर आहेत ( मी स्वतःभोवतीच गिरकी घेत त्याची क्लीप घेतली आहे. ) https://www.youtube.com/watch?v=2EpwmCv0C0I
या कातळाला सर्व बाजूने उभे कडे आहेत, तरीही
फार मजबूत असा संरक्षक कठडा नाही. आणि अगदी कडेला जाऊन स्टंटबाजी करणारे कुणी पर्यटकही
मला दिसले नाहीत. इथे नव्याने काहिही मजकूर लिहू नये,, एवढ्याच सूचना मोजक्या जागी दिसतात. कचरा करू नये, थुंकू नये अश्या सूचना अजिबात नाहीत. राजाच्या आसनासाठी खास तयार केलेल्या जागा आहेत, तिथे
बसू नये, एवढीच बारिकशी सूचना आहे. आणि खरोखर कौतूक वाटते कि खुप पर्यटक असूनही, कुणीही
त्याचा अव्हेर करत नव्हते.

( नव्याने काही मजकूर लिहू नये असे लिहिले आहे, कारण पुरातन काली या जागेला भेट दिलेल्या प्रवाश्यांनी
काही लिहून ठेवलेले आहे, आणि त्यापैकी बरेचसे तिथल्या संग्रहालयात जपून ठेवलेले आहे. )

वरती पिण्याच्या पाण्याची वा खाण्याची सोय नाही. आपण सोबत आणलेले खाण्यापिण्यास मात्र आडकाठी नाही )
तरीही तिथे कुठेही कचरा दिसला नाही. अनेक जण तिथे बसून तिथल्या भन्नाट वार्याचा आस्वाद घेत होते.
या वार्यामूळे आणि सकाळच्या वेळेमूळे, मला वाटली होते तेवढी ही चढाई अवघड गेली नाही.

खाली उतरताना आजूबाजूची काही प्राचीन बांधकामेही दिसतात. अगदी पायथ्याशी आल्यावर एक गारुडी दिसला,
असेच फुटकळ विक्रेते दोनचार दिसले. पार्किंग कडे जायच्या सूचनाही व्यवस्थित आहेत. तिथे काही
खाण्यापिण्याचे व सुव्हेनियर्सचे स्टॉल्स आहेत. मी खरेदी टाळत होतो कारण कोलंबोला जाऊनच ती
करायची होती मला.
जपान सरकारच्या सहकार्याने तिथे पायथाजवळ एक संग्रहालयही आहे. या संग्रहालयाची रचना खासच आहे.
तिथली नदी, झाडे हे सगळे त्या इमारतीच्या रचनेत सामावून घेतलेले आह. सिगिरीया परीसरात सापडलेले
अनेक पुरातन अवशेष तिथे ठेवलेले आहेत. त्यावरचा राजवाडा कसा असेल, याचे एक काल्पनिक मॉडेलही तिथे आहे. तसेच त्या काळातली भांडी, प्रवाश्यांची ग्राफिटी वगैरे आहे. ( पण त्याभागात फोटोग्राफीला बंदी आहे )
तिथेच त्या काळातले एक सोन्याचे कर्णफूल आहे. अप्रतिम कारागिरी आहे त्यात.. ( पण फोटो नाही काढता येत. )

येताना आम्हाला वाटेत एक बी बियाणे संशोधन केंद्र दिसले. तिथे एक भेट दिली. तिथे ताज्या फळांचे रस
उपलब्ध होते. तिथे मी बेलफळाचा रस घेतला. बी बियाणेही उपलब्ध होते पण त्याची पॅकेट्स मोठी होती.
छोट्या आकारात मोजकीच मिळाली. त्यापैकी डिझायनर चवळीच्या शेंगांच्या बिया, एका मायबोलीकरणीच्या
ताब्यात आहेत.

तसेच एक गोल्डन बुद्धा असे देऊळही दिसले. तिथेही एका टेकडीवर चढायचे होते. सिगिरीया चढून आल्यावर ती
टेकडी काही मला आकर्षित करू शकली नाही. मी खालीच थोडी फोटुग्राफी केली.

परतीच्या वाटेवर जेवणवेळ झालीच होती म्हणून समोर दिसलेल्या एका साध्याश्या रीसॉर्टमधे शिरलो. जेवण
नेहमीप्रमाणेच साधे पण चवदार होते. वाटेत एक बाटीक वर्कशॉप बघितला. ही पण तिथली एक खासियत आहे.
मला तिथले कपडे जरा महाग वाटले, तरीपण एका छोट्या दोस्तासाठी एक शर्ट घेतलाच..

आणि कँडीला येऊन पोहोचलो..

1) Another Archeological site near Sigiriya

2) Approach road to Sigiriya

3) Casia

4)

5)

6)

7)

8)

9)

10) First sight

11)

12)

13)

14)

15)

16)

17)

18)

19)

20)

21)

22)

23) Mirror Wall

24)

25)

26) Lion paw

27) View from top

28)

29)

30)

31)

32)

33)

34) Lake at the bottom

35) An elephant in the lake ( clicked from top )


36)

37)

38)

39)

40)

41)

42)

43)

44)

45) Inside the Museum Building

46)

47)

48)

49)

50)

51)

52)

53)

54)

55)

56)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माहिती आणि फोटो वरुन अजिबात मिस करु नये अशीच जागा वाटतीये ही. अजिंठा वेरुळ च्या चित्रांतलं साम्य आहे खरंच. पुलेशु.

अदभुत आहे हे! याबद्दल अजिबातच कधी ऐकलं नव्हतं.

दिनेशदा, या भागापुरते तरी फोटो शेवटी न देता वर्णनातच द्या. तुम्ही जे वर्णन केलंय ते लगेच बघितलं की पटकन लक्षात येईल.

वाह.. अतिशय सुंदर आहे हे ठिकाण ही!! टूरिस्ट सीझन कोणताये? म्हंजे तो टाळून जायला बरं!!
शांत पणे निसर्ग पाहता आला कि वेगळीच अनुभुती होते.
बुद्धा ची ही मुद्रा पाहिली नव्हती आधी.
फणसही दिसलाच का तिकडे ही.. Happy
कमळं रॉयल आहेत अगदी.
भित्तीचित्रं अतिशय सुरेख ,सुबक आहेत. जुनी असली तरी रंग अजून पर्यन्त चांगले आहेत किती.. कि रिस्टोरेशन केलंय??
कातळावरची चढण ,कातिल आहे मात्र!!! मस्त ट्रिप चाललीये आमचीही तुझ्याबरोबर!!

आभार,

मित.. अगदी खरंय.

मामी, इथे भारतीय पर्यटक का जात नाही कळत नाही. खरेच बघण्यासारखे आहे हे . माझ्या ब्राउझरचा काहितरी प्रॉब्लेम झालाय. एकदा फोटोच्या लिंक्स दिल्या कि देवनागरी टाईपच होत नाही.

वर्षू, तशीही इथे फार गर्दी नसते. एप्रिल मे त्यांचा वसंत ऋतू असतो. ऑगस्टमधे कँडी एक बुद्धाचा सण असतो, त्यावेळी तिथे गर्दी असते. रमझान नंतर अरब लोकांची गर्दी असते. बाकी वेळी जाता येईल. चढणही तशी फार कठीण नाही ( आता मी जाऊ शकलो म्हणजे बघ ना. )
भित्तीचित्रांचे रिस्टोरेशन नाही केलेय. पण पुर्वी यापेक्षा सुंदर असणार नक्की. फणस काय फणसाची भाजी पण मिळाली.

ऋन्मेऽऽष , खरेच खुप निवांत जागा आहे. फारशी गर्दी पण नसते.

मस्तच आहे ही जागा. सुंदर प्रकारे जतन करून ठेवली आहे आजुबाजुची स्वच्छता पाहता खुप बरं वाटलं. जीव जळतो असे फोटो पाहिले की कारण भारतात सुध्दा अशी एकापेक्षा एक सुंदर ठिकाणे आहेत पण..............

नरेश.. स्वच्छतेबाबत अगदी अगदी.. या छोट्या देशांनी हे कसे साधले त्याचा भारताने खरेच शोध घ्यायला हवा.
नॉर्टॉन प्लेन्स मधे रस्ता सोडून जायचे नाही, अशी सूचना एकदाच प्रवेशद्वारापाशी लिहिली आहे. सपूर्ण ट्रेकभर कुणीही अधिकारी देखभालीला नव्हता, तरी तो नियम कुणीही तोडत नव्हते. आपल्याकडे अश्या स्थळांची जी विटंबना होत असते तिथे जावेसे पण वाटत नाही.

ममो Happy

कमळाच्या केसरापासून निघालेला वारा, डोळ्यातील बुब्बुळाना जितक्या हळूवारपणे स्पर्श करेल.. ( तितके हळूवार बोलणे असावे ) अशी एक उपमा, ज्ञानेश्वरीत आली आहे. ती आठवली. पण नेमकी ओवी मात्र आठवत नाहीये.

मस्तचं,
दिनेशदा एकच प्रश्न,
सिगिरिया कडे जाणारा रस्ता लाल मातीचा दिसतोय, पावसाळ्यात तिथे चिखलाचा त्रास होत असावा काय ?

जेम्स बाँड, हा शेवटचा २/३ किलोमीटरचा टप्पा आहे. नेहमीच वाहतुकीखाली असल्याने मजबूत आहे, शिवाय या भागात पाऊसही कमी पडतो. मी अनेक युरोपीयन तरुणांना या रस्त्यावरून चालत जाताना बघितले.
इथेच काही हेरीटेज साईट्स आहेत, काही गुंफाही आहेत.
या जंगलात काही ट्रेक्सही आयोजित करतात, काही नद्या आहेत त्यातून होडीने नेतात, एखाद्या खेड्यात दिवस घालवता येतो.

मी भेट दिलेल्या प्रत्येक ठिकाणी, एक पूर्ण दिवस काढता येईल, अशी ठिकाणे आहेत ही.

धन्यवाद दिनेशदा. मला वाटलं होत, इतक सदाहरित असल्याने पावसाचं प्रमाणही तितकच असेल. एकंदरीत त्यांच्या पुरविण्यात येणार्‍या सुविधा खुपच छान वाटत आहेत.

त्या देशात शंभरच्या वर नद्या आहेत. मध्यभागी असलेल्या डोंगराळ प्रदेशात त्या उगम पावतात आणि चारी दिशांना वाहतात. म्हणून मी बघितलेला सर्वच भाग हिरवागार होता.

वा अगदी अद्भुत आहे हे सगळे...
अगदी आत्ता उठून तिकडे जावेसे वाटते आहे.
भित्तीचित्रं खुपच छान टिकली आहेत.
अजून फोटो हवे होते असे वाटले!
तुमची स्वतः भोवती गिरकी घेत काढलेली चित्रफीतपण सुरेख आहे.

आम्हाला हे सगळे आवर्जून दाखवल्याबद्दल धन्यवाद!

हा भाग पण अप्रतिम.
चढायला किती वेळ लागला?चढुन-उतरुन पायांना काही त्रास झाला नाही का?
आम्ही खालुनच पाहुन माघारी फिरलो होतो. माझी एक मैत्रिण म्हणाली की चढताना त्रास होत नाही पण उतरताना होतो.

परत आभार,

सकुरा,
चढायला दोन तास लागले, आणि मी मधल्या टप्प्यावर बराच वेळ थांबलो होतो. पायर्‍या अगदी कमी उंचीच्या आहेत. शेवटच्या टप्प्यात थांबायला वाव नाही हे खरेय पण तोपर्यंत आपल्याला जोम आलेला असतो.
मला तरी तसा काही पाय दुखण्याचा त्रास झाला नाही आणि मी असा ट्रेक बर्‍याच वर्षांनी केला. वेळ मात्र सकाळचीच ठरवायची. नंतर तो खडक तापायला लागतो.

आणि असे पर्वत आपल्याकडे आहेतही, पण अश्या नीट पायर्‍या नसतील कदाचित. आणि शिवाय तिथली स्वच्छता आणि शिस्त यामूळे मला खुप छान वाटले. वरच्या अनेक फोटोत बराच मोकळा भाग दिसतोय, पण कागदाचा कपटा, ग्राफिटी वगैरे अजिबात दिसत नाही.

अहाहा, अगदी सर्वच. लेखन, फोटो. शब्दांना अशावेळी मर्यादा येते, अपुरे पडतात.

तुमच्याबरोबर आम्हीही फिरतोय, धन्यवाद. Happy