कास पुष्प पठार - धावती भेट आणि ड्रोसेरा इंडीका ( दवबिन्दु)

Submitted by सावली on 5 October, 2015 - 09:14

कास पुष्प पठार - धावती भेट

केव्हापासून कासला जायचे असे मनात होते. शेवटी या विकेंडला अचानक जायचा प्लान केला.  मुलगी बरोबर असल्याने खूप चालता आलं नाही किंवा कुमुदिनी तलावापर्यंतही जाता आलं नाही. पण जे पाहीलं ते फार सुंदर आहे.  कासला जायचा रस्ताही खूप मस्त आहे.
 यावर्षी पावसाच्या लहरीपणामुळे असेल किंवा काय माहित नाही फुलांचे गालीचे दिसले नाहीत. कारवी फुलली आहे असे ऐकले पण नेमके आम्ही निघालो तेव्हा  ठोसेघर पर्यंत जाताना तुफान पाऊस.समोरचे काहीच दिसत नव्हते त्यामुळे डोंगर दर्यावर फुलली असेल तरी दिसली नाही.
सनड्यु - दवबिंदू किंवा ड्रोसेरा इंडीका आणि ड्रोसेरा बुरमानी बघण्यामधे लेकीला रस होता कारण ते तिच्या पुस्तकात आहेत.  त्यातले नशिबाने  दवबिंदू किंवा ड्रोसेरा इंडीका दिसले.

कासला जाताना घाटात  ढगांचा खेळ 

कासला जाताना घाटात  ढगांचा खेळ 

कासला जाताना घाटावरच्या पठारावर  

ह्युई लुई आणी ड्युई  - कावळा ( स्मीतीया बेगेमीना )( नाव पुस्तिकेतून साभार) 

(कसला तुरा ते माहीत नाही)

अबोलीमा - Murdannia Lanuginosa . नखाएवढे  फुल आहे.   


अबोलीमा - Murdannia Lanuginosa  

निसुर्डी - Paracaryopsis Lambertiana  

निसुर्डी - Paracaryopsis Lambertiana  नखाएवढे  फुल आहे.  

तेरडा 

दवबिंदू - ड्रोसेरा इंडीका. किटकभक्षी वनस्पती.  नेटवर फ़ोटो बघून मला हे मोठे असेल असे वाटले होते. इथेही   फ़ोटोत मोठे वाटले तरी हे अगदी नखाहून छोटे फुल असते. नेमके माहित नसेल तर शोधणे कठीणच.   त्याचे दवबिंदू असलेले टेंटाकल्स जेमतेम बोटाच्या पेराएवढे किंवा लहानच असतील.     आम्हाला एका ठिकाणी चार पाच फुलं दिसली.  एका सिनियर ग्रुपच्या बोलण्यात मधेच नाक खुपसुन विचारल्याने त्यांनी फोटो दाखवला आणि लोकेशन सांगितलं त्यामुळे शोधता आली.      

दवबिंदू - ड्रोसेरा इंडीका.   सगळं रोप मिळुन जेमतेम दिड दोन इंच उंची होती.  एका ठिकाणी मुंगी चिकटलेली दिसतेय.  छोटे किटक या चिकट दवबिंदूना चिकटतात. मग ते टेंटाकल्स गुंडाळले जातात आणि किटकांचा रस शोषला जातो.   

दवबिंदू - ड्रोसेरा इंडीका.   दवबिंदू असलेले टेंटाकल्स जेमतेम बोटाच्या पेराएवढे किंवा लहानच असतील

अभाळी - सायनोटिक्स ( नाव पुस्तिकेतून साभार)   

  

ब्लॉगवर पूर्वप्रकाशित
http://prakashraan.blogspot.in/2015/10/blog-post.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर! हे ड्रोसेराज पटकन दिसत नाहीत आणि इतके नाजूक असतात! पर्यटकांपासून सर्वात जास्त हानी ह्यांना पोहोचते! कुमुदिनी आणि कंदील पुष्प नाही पाहिले का?

सर्वात शेवटचे, नभाळी. अभाळी नव्हे Happy

मस्त...

काय सुंदर आहेत फोटोज..मस्त!!!
ह्युई ,लुई आणी ड्युई.. खरंच की... किती गोड Happy

सुंदर फोटो. फुलांना ओळखण्यासाठी हे बघा http://www.kas.ind.in/index.php/flower-gallery

बर ते पहिले नखाएवढे पिवळे फुल Murdannia Lanuginosa (Endemic and Endanged) आहे.

मायक्रो लेन्स नेली नव्हती का. कासला भयंकर आवश्यक आहे.

जवळच ठोसेघर व चाळकेवाडी आहे. मोठ्या पवनचक्क्या आहेत. कासच्या गर्दीपेक्षा चाळकेवाडी मस्त वाटले मला. तिथेही बरीच फुले आहेत.

फोटो छान आहेत.

कास फुलत ठेवायचे असेल आणि तिथला दुर्मिळ ठेवा निरंतर टिकवायचा असेल तर लोकांनी तिथे जाणे बंद करायला हवे असे माझे मत होत चाललेय.

लोक तिथे स्वतः तर जातात पण अगदी डायपरच्या वयातल्या मुलांनाही सोबत नेतात, त्यांच्या शी-शू ची व्यवस्था अगदी नैसर्गिकरित्या तिथे करतात, स्वतः फुलांवर लोळून सेल्फी काढतात, फुले तोडुन ती कानामागे लावुन सेल्फी काढतात वगैरे वगैरे वगैरे अनंत गोष्टी. तिथल्या निसर्गाची शक्य तितकी हानी होतेय. ती थांबवायची असेल कासला जाणे आधी थांबवा. - इती एक फोटोप्रेमी आणि निसर्गप्रेमी मित्र.

सुंदर फोटो Happy

माझ्याकडे ड्रॉसेरा बर्मानीचा फोटो आहे. पण आत्ता नेट-कनेक्शन स्लो असल्याने अपलोड होत नाहीये.

धन्यवाद लोक्स.

जिप्सी, केपी नावांसाठी थँक्यु.

सर्वात शेवटचे, नभाळी. अभाळी नव्हे >> हो का? त्या पुस्तिकेत अभाळी असे लिहीले आहे आणि नभाळी छोटे असते असे लिहुन त्याचा फोटो नाही. आता हे छोटे की मोठे याची तुलना करायला दुसरे फुल नाहीये त्यामुळे नक्की माहित नाही.

केपी, <<बर ते पहिले नखाएवढे पिवळे फुल>> अय्यो ते पिवळे नाहीये रे. ते अबोली रंगाचे किंवा पिचच्या रंगाचे आहे. त्याचे मधले ते पराग तंतू जांभळे आहेत.

मायक्रो लेन्स नेली नव्हती का. >> माझ्याकडे मायक्रो लेन्स नाहीये. मी त्याप्रकारची फोटोग्राफी फारशी करत नाही. मी एक्स्टेन्शन ट्युब्स वापरते. त्याचा फोकसिंग डिस्टन्स एकदमच कमी आहे त्याच्या बाहेर गेलं तर फोकस होत नाही. सध्या ते पुरेस आहे मला. कधी आवड निर्माण झाली तरच मायक्रो लेन्स कडे वळणार.

साधना,
तु म्हणतेयस ते तसे बरोबरही आहे. पण मला वाटतं थोडा भागतरी लोकांसाठी खुला ठेवुन उरलेला भाग बंदी घालावी. जितके जास्त लोक बघतील तितक्यापैकी काही टक्के लोकांमधे अवेअरनेस वाढेल.

मागे अतुल धामणकर यांचा स्लाइडशो पाहिला होता तेव्हा त्यांनी याबाबत सांगितले के काही अंशी पटले होते. ते म्हणाले होते की पूर्वी वाघ बघायला जंगलात जायला परवानगी नव्हती त्यामुळे किती वाघ आहेत / आहेत की नाही या कशाचीच कल्पना लोकांना नव्हती. वाघ का वाचवायचा या अवेअरनेसही नव्हता. पण जसजसे लोक वाघ बघायला, फोटो काढायला जंगलात जायला लागले तसे लोकांचा अवेअरनेस वाढला. जागरुक निसर्गप्रेमींमुळे वाघांची संख्या , कुठला वाघ कधी दिसला यावर नजर रहाय्ला लागली. आणि याची पोचिंग कमी व्हायला मदतच झाली.

मात्र आता जंगलात फार गर्दी होतेय ती कमी / कंट्रोल करायला हवी असे मलाही वाटते. शिवाय अगदी कोअर भागात सर्वसामान्य जनतेला जायला परवानगी नाहीये हे ही चांगलेच आहे.

कासच्या इथे मिळणार्या एका पुस्तिकेत लिहीले होते की स्थानिक लोक बरेच कंद खाण्यासाठी उकरुन काढत त्यामुळे काही प्रकारची फुले नामशेष व्हायची भितीही होती पण आता त्यावरही बंदी आणली आहे. लोक गेले नसते तर हा अवेअरनेस वाढला नसता.

शिवाय जो रस्ता बनवला आहे त्याचे काम पूर्ण झाले की बहुधा लोकांना अगदीच कुठेही फिरता / लोळता येणार नाही कारण जाल्ञा बसवल्या आहेत. ते दिसायला एकदम खराब दिसतं पण मला वाटतं सगळे कार्पेट खराब करण्यापेक्षा बरे आहे. जाळ्या थोड्या विचार करुन बसवायला हव्या होत्या मात्र. त्यात डोळ्यांच्या लेवलला थोड्या थोड्या छोट्या मोकळ्या खिडक्या ठेवल्या तर कार्पेट बघणे / फोटो काढणे इत्यादी जवळ न जाताही सहज करता येईल.

तिथे पाण्याच्या बाटल्या वगैरे न्यायला बंदी आहे असे ऐकले आहे. माझ्यासमोर फॉरेस्ट ऑफिसर इकडे तिकडे पडलेले दोन तीन कागद उचलुन घेऊन गेले ते बघुनही छान वाटलं.

अशा ठिकाणी फिरुन आल्यामुळे , अशी ठिकाण बघता आल्यामुळे नविन पिढीत निसर्गाविषयी आवड निर्माण होऊन कितीतरी तरुण निसर्गप्रेमी तयार होताना आजुबाजूला दिसत आहेत. ते अनेक प्रकारे निसर्ग संवर्धनात हातभार लावतात शिवाय यातली काही तरुण मुले निसर्गाविषयी अभ्यास आणि संशोधन हे करियर म्हणुन निवडत आहेत ही खुपच जमेची बाजु वाटते मला.

लोकांनी अधिक जागरुकपणे वागलं पाहीजे हे मात्र खरं.

ड्रॉसेरा बर्मानीचा फोटो >> नंतर टाक.
मी एका प्रो. ना दवबिंदूचे फोटो दाखवले तर त्या म्हणाल्या की गेले सात वर्ष त्या जात आहेत पण हे दवबिंदू फारसे दिसतच नाहीत. ड्रॉसेरा बर्मानी दिसतात पण इंडीका खुपच कमी वेळा दिसतात म्हणे.

अय्यो ते पिवळे नाहीये रे.>> हो तेच ते. मला जे म्हणायचे होते ते कळले ना तुला. Happy

असो. बाकी संपुर्ण पोस्टला अनुमोदन. Happy लोकांनी अधिक जागरुकपणे वागलं पाहीजे व लोकांना जागरुक करायलाही पाहीजे. माहीतच नसते अनेकदा आपल्या वागण्याने निसर्ग नामशेष होऊ शकतो हे सुद्धा. असो.

स्थानिक लोक बरेच कंद खाण्यासाठी उकरुन काढत त्यामुळे काही प्रकारची फुले नामशेष व्हायची भितीही होती >>>>> हे काही पटलं नाही. Sad माझ्यामते कासच्या "पठारावर" थोड्याच प्रमाणावर माती आहे ना. मी उन्हाळ्यातही एकदा कासला गेलो होतो सगळीकडे काळा दगडच होता. मातीचं प्रमाण फारच कमी. मग स्थानिक लोक कंद कसा उकरून काढत असतील? शुक्रवारी मी कासलाच होतो, अगदी हाताच्या बोटावर मोजता येणारे अभ्यासु पर्यटक सोडले तर बाकीचे फक्त पिकनिकला आलेले. साधनाच्या प्रतिसादातला हे सगळं मी स्वतः अनुभवलंय आणि निसर्गाची होणारी हानी पाहता यावर कुठेतरी अंकुश असावा असं मनापासुन वाटतंय. कुंपण घातलेल तरी लोक कुंपनाखालुन आत जात होते, फुलांवर लोळत स्वतःचे फोटो काढत होते/काढुन घेत होते. फुलं तोडुन कानात/केसात लावत होते. वर साधनाने लिहिलेलं डायपरच उदाहरण स्वतःच्या डोळ्याने पाहिलंय. Sad रस्त्याच्या कडेला तर सुरक्षा रक्षकच पर्यटकांकडुन पैसे घेऊन त्यांना कुंपनाच्या आत सोडत होते. ३-४ किमी वाहनांची रांग लागली होती (वायु प्रदुषण). यावर माझ्याकडुन तरी कासला जाणे यापुढे बंद. Happy

लोकांनी अधिक जागरुकपणे वागलं पाहीजे व लोकांना जागरुक करायलाही पाहीजे. माहीतच नसते अनेकदा आपल्या वागण्याने निसर्ग नामशेष होऊ शकतो हे सुद्धा. असो.>>>>>>+1000 Happy

अर्थात हा प्रतिसाद हा कासच्या अतिउत्साही पर्यटकांबद्दल Happy वरील सगळेच फोटो मस्त. Happy

Pages