तेचबूक! - रिद्धी-सिद्धी

Submitted by मामी on 17 September, 2015 - 03:54

स्टेटस अपडेट : रिद्धी-सिद्धी

एकदाची गणेशाची स्वारी आज त्याच्या वार्षिक टूरवर गेली. आता दहा दिवस मी पण मज्जा करणार. शॉपिंग, मैत्रिणींबरोबर भटकणं आणि कैलासावर स्कीइंग ..... यिप्पी!!!!

आता परत येतील तर स्वारीला पुन्हा डाएटिंग करायला लावलं पाहिजे. आता कुठे फोर पॅक्स दिसायला लागले होते तर गेला मोदक आणि मिठाई रिचवायला..... हम्म्म.

लाईक्स : ८४१७५८९८६९९५९७१७७१७४१८७८१५९८६९०९६०८९२७८१७८९४.......

कार्तिकेय : यो! वहिनी. धम्माल कर.
लाईक्स (१) : रिद्धी-सिद्धी

भक्त पुरुष : तुम्ही एकच आहात की दोन? रिद्धी आणि सिद्धी अशा दोघीजणी आहेत ना?
रिप्लाय (रिद्धी-सिद्धी): रिद्धी माझं माहेरचं नाव आणि सिद्धी सासरचं. मी सिध्धी-साध्धी म्हणून सिद्धी. बायका दोन दोन आडनावं लावतात. मी दोन दोन नावं लावते.

लक्ष्मी : मस्तच. मी येतेय अर्ध्या तासात तुझ्याकडे. तुझी स्पेशालिटी असलेलं आईसग्लासमधलं ब्रह्मकमळ आणि सोमरसाचं कॉकटेल तयार ठेव. नंतर मला ऐश्वर्या साडी सेंटरमध्ये जायचंय ते जाऊयात.
लाईक्स (३) : रिद्धी-सिद्धी, सरस्वती, ऐश्वर्या साडी सेंटरचा मालक

सरस्वती : वा वा, गेला का नवरा टूरवर! मी उद्या येईन. आज वीणावादनाचे विद्यार्थी येणार आहेत. त्यांचा क्लास संपेपर्यंत उशीर होईल. आमचा मोर ओव्हर टाईम करायला तयार नसतो. त्याच्या लांडोरी वाट बघत असतात ना!
लाईक्स (१) : मोर
रिप्लाय (मोर) : ये दिल मांगे मोर (सुट्ट्या)!
रिप्लाय (कार्तिकेय) : अगं तुझं मॉडेल बदल. माझा मोर बघ कधीही कुठंही यायला तयार असतो. पृथ्वीप्रदक्षिणाही घातलेय मी त्याच्यावरून.
लाईक्स (१) : सरस्वती
डिसलाईक (१): मोर

शंकर : तुझ्या सासूबाईही चालल्यात गं परवा. मग मी ही जरा एकटाच भटकायला जाईन माझ्या शाळूसोबत्यांना भेटायला - विष्णु क्षीरसागर आणि ब्रह्म देव यांना. तुला आणि तुझ्या मैत्रिणींना स्कीइंग करायचं असेल तर घराच्या चाव्या नंदीपाशी देऊन ठेवीन.
लाईक्स (१) : रिद्धी-सिद्धी
रिप्लाय (रिद्धी-सिद्धी): यु आर सो कूल!
रिप्लाय ( कार्तिकेय) : बाबा, मी पण येऊ का?
रिप्लाय (शंकर) : चालत जाणार आहे मी. येणार का?
रिप्लाय (कार्तिकेय) : नक्को. मी मोरावरून जाईन.
रिप्लाय ( शंकर) : गेलास उडत!

पार्वती : जपून स्कीइंग करा गं पोरींनो. लागलं, खरचटलं तर फडताळातलं कैलासजीवन लावा. आणि हो, मागच्यावेळेसारखं धांदरटासारखं दार बंद करायला विसरू नकोस.
लाईक्स (१) : रिद्धी-सिद्धी, लक्ष्मी, सरस्वती
रिप्लाय (रिद्धी-सिद्धी): हो सासूबाई. तुम्ही काळजी करू नका. या तीन दिवसांनी.

भक्त स्त्री : ओ आय अ‍ॅम सो जेलस! म्हणजे, आम्ही इथे तुझ्या नवर्‍याची सरबराई करणार आणि तू मज्जा करणार!
लाईक्स (३४३९५१५८९७४५८७८९४५......) : पृथ्वीवरले काही भक्त
डिसलाईक (१) : रिद्धी-सिद्धी
रिप्लाय (रंगू ऊर्फ रँगेलिना) : ओ ताई, कामं तर मीच करतुया न्हवं! सुट्टी दिली नाय ना तुमी. येऊंद्यात की गणपतीबाप्पास्नी.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<आता कुठे फोर पॅक्स दिसायला लागले होते तर गेले मोदक आणि मिठाई रिचवायला>> Biggrin
<<अगं तुझं मॉडेल बदल. माझा मोर बघ कधीही कुठंही यायला तयार असतो. पृथ्वीप्रदक्षिणाही घातलेय मी त्याच्यावरून.>>
<<तुला आणि तुझ्या मैत्रिणींना स्कीइंग करायचं असेल तर घराच्या चाव्या नंदीपाशी देऊन ठेवीन.>> Lol

लई भारी मामी. ___/\___

Pages