सूरूवात – ३ - अंतिम भाग

Submitted by स्फिंक्स on 13 September, 2015 - 19:47

सूरूवात – ३ - अंतिम भाग
मागचा भाग: http://www.maayboli.com/node/55298

“अग पण, त्यांचे काय हाल झाले असतील?” राघुनाथाराव काकुळतीला आले होते.
“ते आपण उद्या सकाळी बघू. आता त्या वाड्यात सकाळशिवाय मी जायची नाही आणि तुम्हाला दोघानाही जाऊ देणार नाही.” रेवातीबाई ठामपणे म्हणाल्या आणि तिथेच ओसरीवर आडव्या झाल्या.

======================================================================
कीर्ती बिछान्यावर पडल्या-पडल्या विचार करत होती.
“आज खुप छान वाटतय. काय स्वप्न होते बरे? नीट काही आठवत नाहीये. पण आज खरंच खुप मस्त वाटतंय.खुप दिवसांपासून भरलेले मळभ स्वच्छ झाल्यासारखे वाटतेय. काल या वाड्यात आले होते तेव्हापासूनच काहीतरी अशुभ वाटत होते. सारखे कोणीतरी नजर ठेवून आहे असे वाटत होते. ती वरची माडी.... तिथे तर पायही ठेववत नव्हता. सासुबाईना नाही म्हंटले तेव्हा खुप राग आला खरा , पण तिथे काहीतरी दबा धरून बसल्यासारखे वाटत होते. जायची भीती वाटत होती.म्हणूनच ही तळमजल्यावरची खोली घेतली.
आल्यापासून ती काळी मांजरही सारखी आजूबाजूला घुटमळत होती. खुप गोड आहे ती. तिला एक-दोनदा दूध दिले तर माझी पाठच सोडत नाहीय.काल रात्रीपण राखण केल्यासारखी दाराशी बसून होती.

काल राहुल झोपायला आलाच नाही.... सासूबाई आणि सासरेबुवांबरोबर झोपला असेल.तसाही तो बऱ्याच वेळा तिकडेच झोपतो. आधी खटकायचे, पण आता सवय झाली आहे. वाटले होते काव्या झाल्यावर सगळे बदलेल. पण तसे काही झालेच नाही. काव्याची माया त्याला वाटलीच नाही. त्यालाही नाही आणि तिच्या आजी-आजोबाना पण नाही. म्हणूनच हक्काची माणसे घरात असतानाही तिला पाळणाघरात ठेवावे लागते. नाही म्हंटले तरी सासरे थोडी विचारपूस करतात, पण तेही बिचकतच.
जाऊ दे.. नशीब मानावे आणि उगी राहावे. बोलूनही काय होणार? भांडणे?? कोण असणार आपल्या बाजूने? कुणीच नाही. ह्या भांडणांचा काव्यावर आणि माझ्या आई-बाबांवरच जास्त परिणाम होईल. आधीच बाबांना heart-attack येवून गेलाय. त्यांना त्रास होईल असे काही वागायची इच्छा नाहीय. पैशाची मदत नाही करू शकत, निदान मनाची शांती द्यावी असे वाटते. म्हणून सगळे सोडून देते “कृष्णार्पण” म्हणून. तोच काय ते बघेल.खरेतर स्वमिंचाही आधार वाटतो. त्यांना मनातले सगळे सांगते आणि मन शांत होते. मला विश्वास आहे, जोपर्यंत त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे, तोपर्यंत मला काहीही होणार नाही.
जाऊ दे.. उठायला हवे. संसाराचे रहाटगाडगे सुरु करायला हवे. पण आज उठावेसे वाटतच नाहीय. काल रात्रभर lights नव्हते. पण मला आणि काव्याला छान झोप लागली. मध्येच काहीतरी चाहूल लागली कसला तरी रडायचं आवाज आला खरा. काव्या रडत नव्हती. स्वप्न होते का? जाग आली तेव्हा पण कुणीतरी थोपटत-थोपटत म्हणाले, “झोप तु. भिऊ नकोस. मी आहे.” आणि खुप शांत वाटला. किती आश्वासक आणि प्रेमळ स्पर्श होता. मी निर्धास्त झोपले ती आत्तापर्यंत.
जाऊ दे... आज मन मोकाट सुटलाय. कितीतरी फांद्यांवर उडी मारतंय जाग आल्यापासून. उठायला हव. आंघोळ-पूजा झाल्यावर चहा-नाश्ता पासून सुरु करू यात.”

कीर्ती दिवाणखान्यात आली आणि तिला उघडे दार दिसले.
“अरेच्चा... दार उघडे कसे? आज कुणी लवकर उठले का? कुणाचीही चाहूल तर लागत नाहीय. वर जावे का? नको ... नको.... वर नको जायला. अंधारात लक्ष गेले नसेल.” असे मनाशी म्हणत कीर्ती सकाळच्या कामाला लागली. चहा-नाश्ता तयार केला आणि सगळ्यांना हाक मारू लागली,”राहुल.... सासूबाई... बाबा.... खाली या न... चहा आणि नाश्ता तयार आहे. ”

कुणीच आले नाही. काव्या मात्र आली आणि म्हणाली, “आई... मला दे न. खुप भूक लागलीय. लवकर दे न म्हणजे मी माउशी खेळायला जाते. ”
“हो ग बाळा. मी बाबा आणि आजी-आजोबाची वाट बघते आहे. ते आले कि तुम्ही सगळे एकत्र घ्या.”,कीर्ती काव्याला म्हणाली
“मी जाते आजीच्या खोलीत आणि सगळ्यांना बोलावून आणते.” काव्या उड्या मारत-मारत जिन्याच्या दिशेने जायला लागली, तशी कीर्ती जोऱ्यात ओरडली, “काव्या.... थांब... वर जायचा नाही. आपण इथे असेपर्यंत वरच्या मजल्यावर पाय ठेवायचा नाही.”
काव्या बावरली आणि रडवेल्या आवाजात म्हणाली,”मी तर फक्त सगळ्यांना बोलवायला जात होते.”
कीर्तीला आपल्याच ओरडण्याचे वाईट वाटले आणि आवाज खाली आणत ती प्रेमळ आवाजात म्हणाली”हो ग बाळा. माहित आहे मला. पण खरच वर नको जाऊ. ये... तुला मी दूध देते. नाश्ता नन्तर सगळ्यांबरोबर कर. ये. ”

कीर्तीने काव्याला दूध दिले आणि मनाचा हिय्या करून ती वरच्या मजल्यावर गेली. पण कुणीच नव्हते. ती गोंधळली ,“सगळीकडे बघुन आले कुणीच दिसत नाहीय. सगळे एकत्र फिरायला गेले कि काय? पण इतक्या सकाळी कुणीच उठत नाही. हे चाललाय तरी काय?”

तेव्हड्यात राहुल,रेवातीबाई आणि रघुनाथराव घरात आले. कीर्तीला त्यांचे वागणे जरा विचित्र वाटत होते.
ती मनातल्या मनात म्हणाली “ हे काय? सगळे असे का वागत आहेत घाबरल्यासारखे? सगळीकडे बिचकत बिचकत बघत आहेत? मांजर बाजूने गेली तर किती दचकले सगळे.”
ती सगळ्यांना म्हणाली,”कुठे गेला होता तुम्ही सगळे? पहाटे फिरायला गेले होते वाटते.. चहा आणि नाश्ता झालाय. खायला या.”
तिघेही धप्पकन खुर्चीत बसले. रेवतीबाई कीर्तीकडे वेड्यासारख्या बघत होत्या.
राहुलने विचारले “कशी आहेस? काव्या कुठे आहे? ”
कीर्ती पुन्हा एकदा गोंधळली आणि सावधपणाने म्हणाली,”मी ठीक आहे. काव्या आत्ता माऊच्या मागे पळाली नाही का. काय झाले? तुम्ही तिघे असे का दिसत आहात?”
“तुला काल रात्री काही झाले नाही न?” सासरे काळजीत म्हणाले.
“काल? काल काय झाले? मी आणि काव्या गाढ झोपलो होतो. ” आता मात्र कीर्तीला कसलातरी संशय यायला लागला होता.
“म्हणजे तुला काल रात्री काही दिसले नाही ? आणि काही ऐकू आले नाही? ” रेवातीबाई जवळ-जवळ ओरडल्याच.
“अं... नाही.. तुम्ही काय म्हणताय? मला काही काळात नाहीये. काय ते नीट सांगता का? ” कीर्ती एखाद्या पेशंटशी बोलतात तसे सावध पण हळू आवाजात म्हणाली.

तोच दारावर थाप पडली. कृष्णमंदिराचे पुजारी विष्णुराव दारात उभे होते.
“रघुनाथराव...अहो रघुनाथराव... ” विष्णुराव हाक मारत होते ” काल रात्री तुम्ही चष्मा मंदिरातच विसरलात. आणि काकडारतीसाठीपण नाही थांबलात.”
कीर्ती स्वयंपाकघरातून बाहेर येत म्हणाली, “विष्णुकाका, या न. चहा आणते. तुमच्या साठी. ”
“नको पोरी. या वाड्याचे पाणीही प्यायचे नाही. मी फक्त राघुनाथरावांचा चष्मा द्यायला आलो होतो. ते रात्रभर मंदिरात होते. मी काकाडारातीची तयारी करता-करताच तिघेही निघून गेले. काकडारतीसाठीही नाही थांबले. सगळे ठीक आहे न? ” विष्णुराव वाड्यात न शिरता बाहेरूनच म्हणाले.
कीर्तीला धक्का बसला “रात्रभर मंदिरात? का?”
“ते तु त्यांनाच विचार आणि हा चष्मा त्यांना परत दे.” विष्णुराव कीर्तीकडे चष्मा सोपवत म्हणाले.
“थांबा काका. त्यांच्याशी बोलूनच जा. ”कीर्ती चष्मा घेत म्हणाली” ते तिघेही जरा विचित्रच वागत आहेत. तुम्ही please आत येवून बोला न. मी बोलले तर लहान तोंडी मोठा घास होईल.”
“ठीक आहे. पण त्यांना बाहेरच बोलाव. इथे झोपाळ्यावरच बसू यात. मी आत येणार नाही.” विष्णूराव झोपळ्यावर बसत म्हणाले.
कीर्तीने तिघानाही बाहेर बोलावले. इतरवेळी त्यांनी कीर्तीचे ऐकले नसते, पण आज वाड्याबाहेर जाण्याची संधी न गमावता तिघेही बाहेर आले.
“नमस्कार रघुनाथराव. कसे आहात?” विष्णुराव म्हणाले,”कसे आहात? आता कसे वाटतय?”
“नमस्कार विष्णूराव. काल मी तुम्हाला मंदिरात दुपारी भेटलो होतो आणि वाड्याबद्दल सांगितले तेव्हा तुम्ही फार चमत्कारिक नजरेने बघत होतात. असे का?” रघुनाथराव विषयालाच हात घालत म्हणाले.
विष्णुराव या सरळ प्रश्नाने बावचळले “ते.. वाड्याबद्दल वदंताच आहे. “
विष्णुराव मनाचा निर्धार करत म्हणाले, ”आणि खरा सांगू का? काल सांगावे कि नको कळत नव्हते. पण, याच वाड्याने माझ्या मालातीचा जीव घेतला हो. ”
विष्णुराव विषण्णपणे दूर बघत मालातीबद्दल सांगायला लागले....

“मालती माझी लाडाची लेक. बायकोमाघारी मालती आणि माधव दोघांना खुप प्रेमाने वाढवले. माधव शहरात नोकरीच्या निमित्ताने गेला आणि मी आणि मालती आम्हीं दोघेच. ह्या वाड्यात तेव्हा विश्वासराव कुळकर्णी राहायचे. गावाचे मोठे प्रस्थ होते. त्यांनी आपल्या एकुलत्या एक चिरंजीवांसाठी माझ्या मालतीला मागणी घातली आणि सून करून घेतली. गरिबाघरची पोर श्रीमंताच्या घरी गेली खरी. पण ती कायमच जरा दबकूनच होती.”
“कालांतराने तिला दिवस राहिले आणि मुलगी झाली. मी एकट्याने तिचे बाळंतपण केले पण सासरची मंडळी नाराजच होती. तिला टोमणे मारायचे पण तिने ते कुणाला सांगितले नाही. लगेच काही महिन्याने तिला पुन्हा दिवस राहिले आणि सासरच्या माणसांनी तिच्यावर दबाव टाकायला सुरुवात केली कि या वेळेस मुलगा हवा. पण हे काय आपल्या हातात असते का? या वेळेस अपर्णापाठोपाठ अर्चना आली आणि कुलकर्ण्यांनी आपले खरे रंग दाखवायला सुरुवात केली. त्यांनी मालतीला छळायला सुरुवात केली. पण माझ्या पोरीने कुणालाही न सांगता सहन केले.”
“विश्वासरावांनी वंशाच्या दिव्यासाठी काळ्या जादूचा आधार घेतला. त्यांच्या घरी चित्र-विचित्र लोकांचे येणे-जाणे सुरु झाले आणि घराचे वातावरण अजूनच भयंकर होत गेले.”
“खुप घाबरली होती माझी पोर. मला त्रास होऊ नये म्हणून लपवायची. पण लहानपणापासून आई आणि बापाच्या मायेने वाढवले. तिला मी ओळखणार नाही का? मला कळत होते, पण वाटले हेही दिवस जातील. एकदा मालतीची मैत्रीण बाजारात भेटली. तिच्याकडे मालतीने मन मोकळे केले होते. तिच्या मैत्रिणीने सांगितले कि,मालतीला तिच्या सासरचे रोज काही-बाही खायला द्यायचे. कित्येक वेळा तर ३-४ दिवस उपवास करायला लावायचे. रात्र-रात्र त्या मंत्रीकांसमोर बसवून कसली-कसली पूजा करायचे. अजून कुठकुठले अत्याचार तिच्यावर होत होते कृष्णालाच ठावूक."
"दिवसेंदिवस माझी फुलासारखी लेक सुकून गेली. माझ्यासमोर उसने हसायची पण त्या हसण्यानेही हृदयाला पीळ पडायचा. आता माझीही अशा बारगळली होती आणि मी तिला माहेरी यायला परोपरीने सांगितले. पण त्या लोकांनी तिला धमकावून ठेवले होते कि तु जर माहेरी गेलीस तर तुझ्या बापावर करणी करतो. ती अशीच मारत-मरत जगत होती आणि एक दिवस तिला कळले कि पुन्हा एकदा तिला दिवस राहिले. या वेळेस ती फुलली नाही कि आनंदली नाही. "
"मालतीच्या आठव्या महिन्यात तिने मैत्रिणीच्या हातून मला पत्र पाठवले कि ‘बाबा, मला इथे राहायचे नाही. आपण दादाकडे जाऊन राहू. मला माझ्या मुलींची काळजी वाटते. मला माझे बाळ इथे वाढवायचे नाही. आपण इथून दूर जाऊ या.’ मी पण हो म्हंटले आणि दुसर्याच दिवशी जायची तयारी केली."
"पण दुसऱ्या दिवशी मालती आलीच नाही. आले ते विश्वासराव... आणि म्हणाले कि स्टोवच्या भडक्यात मालती जळून मेली.”
विष्णूराव डोळ्यातले अश्रू टिपत म्हणाले,”शेवटी माझ्या लेकराचा जीव गेला हो. पण आता ठरवले कि तिच्या लेकरांचा मी सांभाळ करणार. मालतीला भडाग्नी दिला आणि ह्या वाड्यात येवून दोन्ही पोरींना घेवून गेलो. मग पुन्हा या वाड्यात पाय ठेवला नाही. तेव्हा कुणी शब्दानेही म्हंटले नाही कि पोरींना राहू द्या. आईविना त्या पोरक्या तर होत्याच, अनाथही झाल्या होत्या. मी आणि पोरी माधवकडे शहरात राहायला गेलो.”
"ओळखीच्या लोकांकडून कळले कि त्यानंतर कुलकर्णी घराण्यालाच ग्रहण लागले. विश्वासरावांच्या चिरंजीवाना म्हणजे आमच्या जावयाला वेड लागले. ते काही काही बरळू लागले होते, कधी मालतीच्या नावानी तर कधी कुठल्या अजून नावाने. त्यांना मालती आगीत होरपळताना दिसायची म्हणे. विश्वासराव आणि त्यांची बायकोही भेदरल्यासारखे दिसायचे. काही दिवसाने कळले कि एका सकाळी नोकरांना ह्याच वाड्यात विश्वासराव, त्यांचे चिरंजीव आणि त्यांच्या बायकोचे शव मिळाले. ते जाळल्यासारखे तर होतेच पण शरीरावर चिकट काहीतरी होते.
कुणी म्हणतो कि काळ्या जादूने विश्वासरावांनी काहीतरी बोलावले आणि त्या काळ्या शक्तीने घराण्याचा नाश केला. कुणी म्हणतो, कि मालती या वाड्यात आहे, तिने हे केले. खरे खोटे कृष्ण जाणे. पण तुमचा कालचा अनुभव ऐकून हे खरे वाटते. आता इथे राहू नका. या वाड्याने खुप बळी घेतेले. आता अजून बळी नको जायला. मी मालातीला नाही वाचवू शकलो. पण तुम्हाला वाचवायचा प्रयत्न करतोय. हवे असेल तर काही दिवस माझ्या घरी राहा. पण इथे नका राहू.” विष्णूराव काकुळतीला आले होते.

रघुनाथराव त्यांना थोपटत म्हणाले, “विष्णूराव, तुमचा दुखणे मी समजू शकतो. आता आपण नियतीपुढे काहीही करू शकत नाही. पण आम्हीं हा वाडा आत्ताच सोडून जातो आणि दुसरीकडे व्यवस्था बघतो. तुम्ही काळजी करू नका.”
“नाही नाही. तुम्ही माझ्याकडेच या. ” विष्णूराव म्हणाले.
“अहो. जाऊ या त्यांच्याकडे. नाहीतरी इथे मला क्षणभरही राहवत नाही.” रेवातीबाई म्हणाल्या.

सगळ्यांनी वाड्यावरचे सामान आवरून विष्णूरावांकडे प्रयाण केले. कीर्तीचे मन अस्वास्थ होते. काल रात्री काय झाले याची अंधुक कल्पना तिला आली होती. पण खरे काय झाले तेच तिला कळत नव्हते. मनाला काहीतरी खुप खटकत होते. पण काव्याने त्या काळ्या मांजरासाठी रडारड आरंभली होती. ते काळे मांजर गायब झाले होते. कुठेतरी गेले असेल. पण काव्या खुप रडत होती, त्यामुळे कीर्तीला विचार करायचीही उसंत मिळत नव्हती. संध्याकाळ व्हायच्या आत या वाड्यातून निघायचे होते.

संध्याकाळ व्हायच्या आत सगळे बाहेर पडले आणि विष्णूरावांच्या घरी पोहचले. संध्याकाळच्या आरतीनंतर रेवातीबाइंनी त्यांना टोचणारा प्रश्न विचारलाच,”कीर्ती, काल काय झाले? रात्री तुला आणि काव्याला काही दिसले का?”
“मला आणि काव्याला काहीही दिसले नाही. खरेतर आम्हाला खुप छान आणि गाढ झोप लागली होती. पण तुमच्याबरोबर काय झाले होते?” कीर्तीनेही तिला टोचणारा प्रश्न विचारला.
रघुनाथराव, रेवातीबाई आणि राहुल तिघांनीही आळीपाळीने सगळं वृत्तांत कथन केला.
“खरेच.... एव्हढे सगळे झाले आणि मला कळले कसे नाही? हे अस्वस्थ करते आहे का?” कीर्ती विचार करायला लागली.
“कीर्ती, तुला काय वाटते? आजपर्यंत ज्या वाड्याने सगळ्यांना त्रास दिला. अगदी जीवही घेतला. त्या वाड्याने तुला काही त्रास का नाही दिला?” रघुनाथराव कीर्तीला विचारात होते.
“अं... मलाही हाच प्रश्न सतावतोय बहुतेक. एव्हढे सगळे झाले आणि मला कळलेही नाही? ” कीर्ती विचार करत होती.
विष्णूराव मंद स्मित करत म्हणाले, “त्याचे एकच कारण आहे. तुझी श्रद्धा. त्याच श्रद्धेने दुष्ट शक्तीपासून तुमची राखण केली. तुला झोपेत असल्यामुळे बाहेरच्या वादळाची आशंकाही नव्हती. तुला सारखे-सारखे थोपटून झोपवले. तुला आणि काव्याला मायेचे पांघरूण घातले. पोरी,तु अजाणतेपणाने श्रद्धेने ते केलेस जे कित्येक मांत्रिक बुद्धीने करू शकले नाही. जास्त विचार करू नकोस. तुझी श्रद्धा असेपर्यंत कुणी तुझे काही बिघडवू शकणार नाही आणि तुला कुणाची गरजही नाही.”

आणि ह्या शेवटच्या वाक्यासरशी कीर्तीला आपल्या अस्वस्थतेच्या कारणाचा बोध झाला. तिला अस्वस्थता आपल्या अजाणतेपणाची नव्हती तर इतरांच्या निष्काळजीपणाची होती आणि त्याक्षणी इतके दिवस साठवलेला रागचा स्फोट झाला.
“एक मिनिट... काल रात्री तुम्हाला सगळ्यांना माहित होतं कि वाड्यामध्ये धोका आहे. तिथे माझा आणि काव्याचा जीवही जाऊ शकतो. तरीही तुम्ही सगळे मला आणि काव्याला वाऱ्यावर सोडून निघून गेलात. जाण्यापूर्वी आम्हाला उठवले नाही. आम्हाला साधे सावधही केले नाही? का? आमच्याकडे तुमचे कुणाचेच कांही कर्तव्य नाही? मी कुणाची सून आणि कुणाची बायको नाही कि काव्य कुणाची मुलगी आणि कुणाची नात नाही?
“आजपर्यंत प्रत्येक कर्तव्य इमाने-इतबारे निभावली. कधी काहीच म्हंटले नाही. सगळे सहन केले. सासूबाईंचा जाच सहन केला. त्यांचा राग, स्वार्थ, हाव आणि manipulation सहन केले. नवर्याचा आईवेडेपणा आणि भित्रेपणा सहन केला. पण आज हद्द झाली ....this is the last straw. खुप झाली तुमची मनमानीपणा आणि मानभावीपणा. आज तुम्ही माणुसकीचीसुद्धा हद्द पार केली आहे. माणुसकी म्हणूनही तुम्ही आम्हाला वागवले नाही.आता खुप झाले.आता अजून नाही. मी हे वागणे अजून सहन करणार नाही आणि काव्यालाही सहन करू देणार नाही. तीच्यावर हे संस्कार मी होऊ देणार नाही.
“आजपासून मी एक नवीन सुरुवात करणार आहे. माझ्या आयुष्याची आणि काव्याच्या आयुष्याची. आमच्या या आयुष्यात सगळे विनासायास नसले तरी प्रेम आणि आदर असणार आहे.दुसर्य्बद्दल काळजी असणार आहे. आपल्याबरोबरच दुसर्याचाही विचार असणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे कुणी अन्याय करत असेल तर तो अन्याय सहन करत कुढत बसण्यापेक्षा त्या अन्यायाचा प्रतिकार करण्याची इच्छा असणार आहे. हे संस्कार करणार आहे मी माझ्या मुलीवर. आणि त्याची सुरुवात मी आज आणि आत्ता करत आहे.”

असे म्हणून कीर्ती तिची आणि काव्याची bag घेवून काव्याबरोबर बाहेर पडली. तिला असे जाताना बघुन राहुल मटकन खाली बसला. रेवातीबाई वेड्यासारख्या तिच्या आणि काव्याच्या पाठमोर्या आकृतीकडे बघत राहिल्या.
पण रघुनाथारावांच्या डोळ्यात पाणी आले. ते म्हणाले,”बरोबर आहे तुझे पोरी, जी चूक विश्वासराव कुलकर्ण्यांनी केली, तीच आम्हीही केली. घराच्या सुनेची आणि लेकीची किमत नाही जाणली. त्यांचा दुस्वास केला. आता मी या गुन्ह्याचे प्रायश्चित करणार. तु म्हंटलेले सगळे संस्कार या घरावरही करणार. जोपर्यंत मी हे करत नाही तोपर्यंत आज माझी नझर झुकलेलीच असणार. पण आता या घरात कुणावरही अन्याय होणार नाही. आता ही माझ्यासाठीही नवीन सुरुवात आहे, पोरी.”

समाप्त
- स्पिंक्स

Group content visibility: 
Public - accessible to all site users

'करणी' वगैरेवर विश्वास ठेवणे, न ठेवणे वैयक्तिक प्रश्न आहे. मात्र कथेच्या शेवटी तुम्ही काव्या आणि किर्तीला स्वतंत्र केलेत त्यामुळे छान वाटले.

उत्तम लिहिले आहे. लिहीत राहा.