गप्पा- समिता शहा (गुंतवणूक बँकर) यांच्याशी

Submitted by रैना on 16 August, 2009 - 11:54

ह्या गप्पा इंग्रजीत झाल्या. त्यातले विचार समिताचे आहेत, पण मराठीतले भाषांतर माझे आहे.
हा धागा २० ऑगस्टला प्रकाशीत केला आहे. वर दिसणारी तारीख मसुदा तयार केल्याची तारीख आहे.
.

Samita Shahweb.jpg समिता शहा
ज्येष्ठ गुंतवणूक बँकर. मुंबईतील देशी आणि विदेशी *गुंतवणूक बँकामध्ये गेली १७ वर्षे कार्यरत. छोटेखानी चण, सौम्य रंगाच्या साड्या/ सलवार कमीझ हा वेष, कानापर्यंत कापलेल्या सरळ केसांचा ब्लंट कट(कितीही काम असो, एकही केस कधी इकडचा तिकडे नाही, की अवास्तव रंगरंगोटी नाही). चेह-यावरचा करार आणि एकंदरीत दरारा म्हणता येईल असा रुबाब बघता नवख्या माणसालासुद्धा ही बाई कुठल्यातरी अधिकारपदावर असणार असा अंदाज बांधता येतो. बाईंना पाहूनच अर्धे लोक तरी सावरुन बसणार हे खरं असलं तरी कोणाच्याही अंगावर ओरडताना त्यांना आजतागायत कोणीही पाहिलेलं नाही. Unflappable, चेह-यावरुन मनात काय असेल हा अंदाज बांधणं कठीण. आयसीआयसीआय सिक्युरीटीज, जे पी मॉर्गन, लेहमन ब्रदर्स, क्रेडिट सुइस या बँकामध्ये विविध जबाबदा-यांच्या पदांवर कार्यरत.

बालपण चारचौघींसारख्या मध्यमवर्गीय घरात गेले. वडील वायुदलात कार्यरत असताना समिताच्या लहानपणीच वडलांच निधन झालं. आई डॉ आशाताई सावर्डेकर सरकारी नोकरीत. आजीच्या मदतीने आईने दोन्ही मुलींना एकटीने वाढवले. नोकरीनिमित्त अनेक सामाजिक संस्थांशी संबंध. सेवानिवृत्ती घेतल्यावर गोव्यात एक NGO चालवतात. **http://www.sanjivan.org
मोठी बहीण वास्तुस्थापत्यविशारद म्हणून कार्यरत आहे.

इतक्या वर्षांपूर्वी आय आय एम अहमदाबादबद्दल कसं ठरवलंत ?

समिताचे शालेय शिक्षण गोव्यात झाले. त्या सुरवातीपासूनच अभ्यासू वृत्तीच्या होत्या. दहावीला, बारावीला विशेष लक्षणीय यश मिळवून त्यांनी बी.ए. अर्थशास्त्राचा पदवी अभ्यासक्रम निवडला (कुटुंबात बरेच डॉक्टर असल्याकारणाने काहीतरी वेगळे करण्यासाठी त्यांनी पत्रकार व्हायचे ठरवले. कला शाखेत प्रवेश घेतला). त्या बारावीत असताना, आई कामानिमित्त अहमदाबाद येथे गेल्यावर योगायोगाने त्यांना आय.आय.एम अहमदाबादची माहिती मिळाली, आणि समिताने तिथेच जायचा चंग बांधला. त्या दिशेने पावलं उचलायला म्हणून या जिद्दी मुलीने बी.ए च्या दुस-या वर्षाला मुंबईत प्रवेश घेतला. वसतीगृहात राहून आय.आय.एमच्या अत्यंत कठीण अशा प्रवेश परिक्षेसाठी तयारी चालू केली. दहावीत गणित सोडल्यामुळे चक्क पुन्हा पहिल्यापासून सर्व गणिताची पुस्तकं घेऊन अभ्यासाला सुरवात केली. गणित सुटलं असलं तरी मुळात गणिताची आवड होती ती कामी आली. आकड्यांची भिती वगैरे कधीच नव्हती, आणि आता तर आकड्यांवर प्रेमच जडलं. त्या म्हणतात 'इतका अभ्यास मी त्याआधी आणि नंतरही आयुष्यात कधी केला नाही.' इतका जिवापाड अभ्यास करुन आय.आय. एम मध्येही प्रथम क्रमांक म्हणून गणल्या जाणा-या आय.आय.एम अहमदाबादमध्ये वयाच्या एकोणीसाव्या वर्षी प्रवेश मिळवला. साधारण १८० मुलांमध्ये त्यावर्षी एकूण मुली १४. अर्थातच प्रत्येक मुलीची कुंडलीदेखील प्रवेशाआधी मुलांना माहित असायची. फार बारकाईने आणि समिताच्या मते "अत्यंत इरिटेटिंग" लक्ष प्रत्येक मुलीकडे त्याकाळी असायचं. सांस्कृतिक धक्का वगळता अजून काय जड गेलं या प्रश्नाला समिताने आयुष्यात पहिल्यांदा "आपण पहिल्या तीनात नाही (आणि येऊ शकत नाही) ." हे सत्य पचवायला फार जड गेल्याचं प्रामाणिकपणे सांगितलं. आजवर हुशार हुशार म्हणून घरीदारी अतोनात कौतुक झाल्यावर, आपण हुशार असलो तरी इथे भारतातील सर्वात हुशार असे अतिरथीमहारथी सहाध्यायी मौजूद आहेत हे पचवायला थोडं जड गेलंच. अभ्यास फारसा जड गेला नाही, पण त्या जीवघेण्या स्पर्धेची सवय व्हायला वेळ लागला. आज १४ मुलींपैकी काही मुलींनी कुठल्यातरी टप्प्यावर नोकरी सोडली आहे. त्यातल्या काही आज वरिष्ठ पदांवर कार्यरत आहेत.
त्यावेळी तरी ही मुलगी हट्टी, हुशार आणि वेगळी आहे म्हणून घरी सर्वांनी सोडून दिलं. पण कोणालाही तिने फार काही अलौकिक केलं असं वाटलं नाही, याचं कारण त्यावेळी आय आय एम ला आजच्या इतकं ग्लॅमर नव्हतं आणि तितकी कुटुंबातील कोणाला या क्षेत्राविषयी माहितीही नव्हती. अलिकडे काही वर्षात मात्र भावंडांची मुलं वगैरे आवर्जून करियरसंबंधी सल्ला विचारतात, कारण या संस्थेविषयीचं जगातील वलय आणि समिताचं घवघवीत यश.

समितानी फायनॅन्स मेजर निवडला आणि दुस-या वर्षी नोकरीसाठी बँकाना अर्ज केले. कॅम्पस प्लेसमेंटद्वारे त्यांची निवड आय.सी.आय.सी.आय सिक्युरिटीज या त्याकाळी भारतातील अग्रगण्य अशा बँकेत झाली. या बँकेत त्याकाळीही महिला अधिकारी असण्याची परंपरा होतीच, त्यामुळे कळत नकळत मनात ती रुजवात कुठेतरी झाल्याचं समिता मान्य करतात. Seeing all those women around, success looked doable.

गुंतवणूक बँकर म्हणून वाटचाल सुरु झाली होती.

तुम्हाला बँकर म्हणून नुसतं नाही, अतिशय स्पर्धात्मक असावं लागतं, सतत धंद्याचा पाठपुरावा करावा लागतो. सतत देशात आणि विदेशात प्रवास करणे बंधनकारक असते. एक काळ असा होता की मी दिवसभर काम करुन, रात्री प्रवास करुन , सकाळी लंडनच्या ऐअरपोर्टवरच फ्रेश होऊन, तिथे दिवसभर काम करुन, रात्री पुन्हा प्रवास करुन परत यायचे की दुस-या दिवशी पुन्हा ऑफिसमध्ये. हा व्यवसायच खूप जास्त गतिमान आहे. तुम्हाला काम आवडत नसलं तर कधी गारद व्हाल ते कळणार सुद्धा नाही. It sucks the life out of you, you have little personal life left. No one said its not stressful. मला हे काम अतिशय आवडतं आणि जसजशी मी जास्त जवाबदा-या घेत गेले तसतसं ते जास्तच आवडायला लागलं. त्यासाठी मी वर्षानुवर्षे सोमवार ते शुक्रवार कुठल्याही समारंभाना उपस्थित राहू शकत नाही. अगदी एखाद्या कार्याला अचानक उपस्थित राहता येत असेल तरी जात नाही, कारण मग दुस-यांचे रुसवे फुगवे होणार (अमक्याकडे गेलात, तमक्याकडे गेला नाहीत) आणि नेहमी नेहमी कार्यांना जाणं या व्यवसायात शक्य नाही. ही शिस्त तुम्हाला असावीच लागते. मी फक्त शनिवारी किंवा रविवारी social engagements ठेवते. माझा, आमचा जवळचा मित्रपरिवार आहे तो समजून घेतो, आणि सर्व जवळच्या नातेवाईकांना आता सवय झाली आहे.

ट्रेडर व्हावसं कधी वाटलं नाही का या प्रश्नाला समिता म्हणाल्या - " नाही. You have to be extremely fast paced to be a trader. I was never attracted to that. "

त्या दरम्यानच्या काळात आपल्या बॅचमेटशी त्यांनी लग्न केलं. कोकणी कुटुंबातील मुलीने गुजराथी कुंटुंबात लग्न करावे याला व्हायचा तो विरोध झाला आणि यथावकाश मावळला या एका वाक्यात त्या सारं सांगतात. जीवनसाथीही याच क्षेत्रातला असल्यामुळे समजून घेता आलं तरी दोघांचेही करियर अतिशय चॅलेंजिग आहेत यात वाद नाही.

स्वयंपाक करता का?

मी/ आम्ही स्वतः स्वयंपाक करत नाही, मला त्यात रस नाही. त्यामुळे मी कायम घरकामाला आणि स्वयंपाकाला बायांवर/ गड्यांवर विसंबून राहिले. घरातले सर्व रिमोट मॅनेजिंग मी करत राहिले, पण स्वतः काही करायला वेळ नाही आणि रसही नाही. सासरी हळूहळू सर्वांना सवय होत गेली, की हे कार्यक्षेत्रच असं आहे.

पालकत्वाबद्दल काही सांगाल ?

मी मूल होऊ द्यायचा निर्णय रुढार्थाने उशीरा घेतला. मला वाटतं हा तुमचा व्यक्तिगत निर्णय आहे, पूर्ण विचारांती निर्णय घ्यावा, तुमची जेव्हा पूर्ण तयारी असेल असे वाटेल तेव्हाच तो निर्णय घ्यावा. आता माझा मुलगा ३.५ वर्षाचा आहे. तो झाल्यावर मी ६ महिने घरी राहिले. मग पुन्हा काम चालू केलं. संपूर्ण प्रेग्नंसीभर मी नेहमीप्रमाणे काम करत होते, फक्त अगदी नवीन assignments घेतल्या नाहीत, जेणेकरुन माझ्या अनुपस्थितीत काम अडून राहणार नाही. तुमची पालकत्व स्वीकारायची मानसिक तयारी पूर्ण झाली की न करु शकणा-या गोष्टींबद्दलची हळहळ होत नाही. माझ्या मैत्रिणींना माझा लेकाबाबतीतचा पेशन्स पाहून अगदी आश्चर्य वाटतं, पण याला कारणीभूत वयही आहे. जरा लहान वयात किंवा पुरेशी मानसिक तयारी / प्रगल्भता नसताना मुलं झालं की आपल्याला न करायला मिळणा-या गोष्टीचा राग नकळत मुलांवर निघतो. मग द्या एक दणका.

मी या टप्प्यापर्यंत काही केलं नाही असं राहिलं नाही, खूप जीव तोडून काम केलं, खूप जबाबदारीची पदं सांभाळली, जग फिरले, उत्तमोत्तम चित्रपट पाहिले, उत्तमोत्तम रेस्तराँमधे गेले वगैरे. आता मला त्या गोष्टींची जराही उणीव जाणवत नाही. मी फक्त काम करते आणि लेकाबरोबर वेळ घालवते. उगीच त्याला फरफटत सिनेमागृहात वगैरे नेत नाही. असो. हा निर्णय व्यक्तिगत आहे आणि ज्याने त्याने आपली परिस्थिती आणि प्रायॉरिटी ठरवून घ्यावा हे माझं मत.

तुम्हाला आपल्या एवढ्या जवाबदारीच्या पदाचं कधी दडपण येतं का ? एक analyst ते मॅनेजिंग डायरेक्टर हा प्रवास कसा झाला ? ( गुंतवणूक बँकेत Analyst, Associate, VP, ED आणि एमडी अशी साधारण पदं असतात. एमडी असलेल्या स्त्रिया हाताच्या बोटावर मोजाव्या इतक्या असतात. समिता एमडी म्हणून कार्यरत होत्या. सध्या त्या स्वतःची गुंतवणूक consultancy चालवतात आणि एका नामांकित देशी financial services company साठी सल्लागार म्हणून काम पाहतात.) एक स्त्री म्हणून काय वेगळं करावं लागलं ?

मी आधी म्हणलं तसं over the years I have enjoyed it more. जीव तोडून काम केलं, जवाबदा-या घेत गेले, रिस्कही. मागे वळून पाहिलंच नाही. प्रमोशन्स होत गेली, मी स्वीकारत राहिले. इतक्या वर्षांनी तुमचे क्लायंटही हळूहळू मित्र होत जातात. तुमच्यावर विसंबून राहतात. कुठलीही आपत्ती आली तरी तुम्ही सहीसलामत त्यांना तरुन नेणार याबद्दलचा त्यांचा विश्वास वाढत जातो. मी ज्येष्ठ रिलेशनशिप मॅनेजर आहे. Deals originate करणे माझं काम आहे. उत्तमरित्या टीम सांभाळणे हे अध्याहृत आहे. या व्यवसायात सहसा analysts चा एक pool असतो. जेजे काम येईल तेते त्यांना करावं लागतं. अशा वेळेस तुमचं काम ते आपणहून करतील, करायला धडपडतील असे तुम्हाला असावे लागते.

पुरुष सहकारी फुलीमय बोलतात / आरडाओरडा करतात म्हणून आपणही तसं करावं वगैरे मोह मला कधी झाला नाही.(या व्यवसायात जास्तच, कारण थोडीशीही चूक प्रचंड महागात पडू शकते. High stress environment & Volatile markets.) मी स्वतः कधी तशी वागले नाही, पण त्यांना फार थांबवण्याचा प्रयत्नही केला नाही. ( १८० : १४ मध्ये ही तर पहिली शिकवण). मी जशी आहे तशी राहिले. स्पर्धेत तर मी होते, पण त्यांच्यासारखं, त्यांच्यापेक्षाही वरताण उद्धट वागण्याचे प्रकार वगैरे मी केले नाही. तो माझा पिंड नाही. अगदी सुरवातीला पगार वगैरे कमी असताना, मी कधीतरी आख्खा पगार एखाद्या दागिन्यावर/साड्यांवर वगैरे खर्च केला की सहकारी मला हसायचे. मीही हसून सोडून द्यायचे. पण मी कधी लपवायचा वगैरे प्रयत्न केला नाही. आणि कामात जशा कधी स्त्री म्हणून सवलती मागितल्या नाहीत तसेच पुरुषांच्या वरताण पुरुषीपणा केला नाही. अशा एकदोन ज्येष्ठ बँकर असलेल्या स्त्रिया मी पाहिल्या आहेत, की ज्या १६/१७ / २० तास काम करणार नाहीत म्हणून स्वतःच्या हाताखाली कधीही मुली घ्यायच्या नाहीत.

या व्यवसायात सहसा सगळे महत्वाचे deals ऑफिसबाहेर होतात ना ?

मी जगभरातील क्लायंटस सोबत काम केलं आहे. शक्यतोवर मी डिनर आणि ड्रिंक्स वगैरे टाळते. त्याऐवजी क्लायंट्सना दुपारच्या जेवणसाठी किंवा कॉफीसाठी बाहेर नेते. काही सहकारी हमखास पेयपान करत असताना डील्स मिळवतात. त्यात मला गम्य नाही, आणि जे क्लायंटस याच कारणासाठी गेले, ते गेले. पण ते फार कमी होते, हे ही मी सांगू इच्छिते.

(ज्या काळी आमच्या अमेरिकन बँकेत उगीचच पाश्चात्य फॉर्मल कपडे घालायचा एक अलिखित नियम होता त्या काळी समिता अगदी आरामात साड्या नेसून यायच्या. "मुंबईसारख्या उकाड्यात हे असले कपडे घालायची मला आवश्यकता वाटली नाही. मी परदेशात जाते तेव्हा घालते." हे त्यांचं उत्तर. आणि त्यामुळे त्यांचा आब किंवा त्यांना मिळणारा मान कुठेही कमी झाला नाही हे मी माझ्या पाश्चात्य- फॉर्मल-कपडे-धार्जिण्या बॉसच्या अनेकदा लक्षात आणून दिले होते.)

समिता, या व्यवसायातले लोकं हे जमिनीच्या चार बोटं वर चालतात याच्याशी तुम्ही सहमत आहात ?

आहे तर. वर्षानुवर्षे दिवसाचे १८ तास काम, सततचा प्रवास, पुरेशा व्यक्तिगत वेळेचा अभाव, पैसा, अफाट पैसा आणि कुठल्याही निर्णयामुळे होणारा अफाट फायदा किंवा अतोनात तोटा, ती जबाबदारी सतत पेलणे, अतिशय गुंतागुंतीचे deals structure करणे, सतत सतर्क राहणे, सतत रिस्क घेणे, सतत एकाच प्रकारच्या लोकांना भेटणे (Bankers socialise only with Bankers) यामुळे असं होण्याची शक्यता असते. असो. मी अगदी मध्यमवर्गीय कुटुंबात वाढले असल्यामुळे अजूनही त्यामानाने माझे पाय जमिनीवर आहेत (माझ्यामते).

तुम्हाला कधी नोकरी सोडाविशी वाटली ? घरगुती सांसारिक अडचणी कशा निभावल्या? विशेषतः मुलगा झाल्यावर ?

खरं सांगायचं तर नाही. आणि मुलगा झाल्यावरही, I was keen to go back to work.
अडचणींचे म्हणशील तर त्या येणारच. तो एक भाग आहे आणि राहणारच. मी फार पुढचा विचार बारकाईने करत बसत नाही. कधी अगदी फार मोठी समस्या आली तर मी अर्थातच मुलाला प्राधान्य देईन हे ठरवलेलं आहे. बस्स. मग असं झालं तर, अमक्या अडचणी आल्यातर मी काय करेन याची काळजी करत बसण्यात काही अर्थ नाही. I don't think and worry about that.
घरात जीव अडकणारच. कामावर असताना घरचा विचार, घरगुती काळज्या थोड्याफार असणारच. यावर माझा तोडगा म्हणजे मी बॅकप प्लॅनसाठी खूप कष्ट करते, जेणेकरुन घरगुती आपत्ती ओढवणार नाहीत.उदा :
- मुलाला सांभाळायला एका बाईऐवजी दोन ठेवणे (कारण एक काही कारणाने आली नाही {आजारी असेल, तिच्या घरी काही आयत्या वेळेची कामं आली असतील} तर ऐनवेळेस घोटाळा, गोंधळ नको)
- घराजवळ मित्रपरिवार, नातेवाईकांचे, शेजा-यांचे आधारगट असणे
- फावल्यावेळात मुलाच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या आयांना घरी बोलावणे, एकमेकींना अडीअडचणीत मदत करणे.
- मुलाला सांभाळणा-या चांगल्या बायांचा अभाव वगैरे असतोच, मी तर अजिबात न संकोचता कोणालाही बाईबद्दल विचारत असते. आणि लोकही नेहमी मदत करतात असा माझा अनुभव आहे.

अडचणींचे म्हणशील तर त्या येणारच ही काळ्या दगडावरची रेघ आहे. म्हणजे महत्वाच्या प्रेझेंटेशनच्या वेळेस बाई दांडी मारणार, मुलाला बरं नसणार वगैरे. अडचणी गृहित धरुनच पुढे चालावे लागते. अशा वेळी डोकं शांत ठेवलं तर भराभरा निर्णय घेता येतात, आणि उगीचच आकांडतांडव करुन किंवा घाबरुन जाऊन काहीही होत नाही. उलट समस्या वाढतात. क्लायंट, वरिष्ठ अधिकारी आणि सहका-यांनाही घर, कुटुंब आणि अडचणी असतात हे लक्षात ठेवावे. तुम्ही जो पर्यंत उगाचच सुट्ट्या घेत नाही, किंवा त्यांचा गैरफायदा घेत नाही, तोपर्यंत तेही समजून घेतात. म्हणून तर सुट्ट्या मी अशा अडचणींसाठीच (म्हणजे समारंभांना न जाता मुलगा आजारी पडला तर वगैरेसाठी) राखीव ठेवलेल्या आहेत.

तुमचे पती आणि तुम्ही एकाच क्षेत्रातले. दोघांचाही पदभारांचा प्रवास समांतर झाला ?

नाही. माझा जास्त लवकर झाला. कुठल्याही पुरुषाला स्वीकारायला किंचित जड जाणारच. त्यालाही. साहजिक आहे. आम्ही दोघंही प्रचंड व्यस्त असतो. कधी महिनोनमहिने शनिवार-रविवारशिवाय भेट होत नाही. हे या व्यवसायात अध्याहृतच आहे.

ते घरातलं काही पाहतात ?

नाही. घरातील सर्व मी पाहते, तेही स्टाफच्याच मदतीने.

तुमचा देवावर विश्वास आहे? तुमच्यावर प्रभाव टाकणा-या व्यक्ति कोणत्या ?
हो आहे. मी फार धार्मिक वगैरे नाही. माझी श्रद्धा मात्र आहे.
व्यक्ति म्हणजे माझी आई, माझे काका कै डॉ. आर. बी. सावर्डेकर, आणि विल्सन कॉलेजमधील प्राध्यापक सुधाकर. अलिकडे राष्ट्राध्यक्ष ओबामा. एकेकाळी " The Prodigal Daughter" ह्या पुस्तकाचा माझ्यावर प्रचंड प्रभाव पडला होता.

तुम्हाला फावल्या वेळात (असला तर) काय करायला आवडतं ? पुढच्या वाटचालीसंबंधी काय योजलं आहे ?
फावला वेळ आताशा कमी असतो. तरी वाचन करायला, प्रवास करायला आणि सर्वात जास्त लेकाशी खेळायला आवडतं.
पुढच्या वाटचालीसाठी असं काही ठोस योजलं नाहीये, तरी जे करेन ते उत्तमच हा पिंडधर्मच आहे. जे करताय ते जीव ओतून केल्यास यश मिळतंच यावर माझा विश्वास आहे. अलिकडेच मी स्वतःची कंसलटन्सी सुरु केल्यामुळे, तिच्याच विस्ताराचे विचार डोक्यात आहेत. आता clients एक व्यक्ति म्हणून तुमच्याकडे येतील, तुम्ही केवळ एका मोठ्या नामांकित ब्रँडशी संलग्न आहात म्हणून नाही. माझ्यासाठी हे नविन आव्हान आहे.

* गुंतवणूक बँकाबद्दल इथे अधिक माहिती वाचता येईल.
http://en.wikipedia.org/wiki/Investment_banking

आणि ह्या क्षेत्राची केदार जोशी यांनी करुन दिलेली ओळख :

साधारणतः आपल्याला बॅंक (अधिकोष) म्हणजे ठेवी, व्याज, बचत, गृहकर्ज, गाडीसाठीचे कर्ज वा फार फार तर एखाद्या परदेश भेटीसाठी लागणारे पैसे पुरवणारी संस्था इ. इ. लगेच डोळ्यासमोर येते. बॅंकेकडून आपल्या ठेवीवर मिळणारे व्याज, व आपण घरकर्जावर जे व्याज देतो त्याची टक्केवारी, हीच आपली बॅंकेबद्दलची चर्चा. बॅंकेची ही आपली प्रतिमा. पण बॅंक म्हणजे की केवळ हीच कामं नसतात. ही झाली एका कमर्शियल बॅंकेची कामं, ज्यात सर्वसामान्य गुंतवणूकदारांचा विचार केला जातो.
बॅंकेचा दुसरा प्रकार जो ह्या सर्वांच्या पुढे जाउन मोठमोठ्या कंपन्यांसाठी कर्ज देणे, त्यांचे समभाग (शेअर्स) बाजारात आणणे, दोन किंवा अधिक कंपन्यांचे विलीनीकरण (मर्जर्स), एका मोठ्या कंपनीतून अनेक कंपन्यांची निर्मिती (स्पिन ऑफ), आजकाल प्रसिद्ध झालेली सरकारी कंपन्यांची डिस-इन्वेस्टमेंट, नवीन कंपनी स्थापन करण्यासाठी लागणारे भांडवल उभे करणे (सीड मनी, व्हेंचर कॅपिटल), अर्थव्यवस्थेचा अभ्यास करुन कंपनीला विविध सल्ले देणे, (उदा नवीन आय पी ओ साठी बाजार केंव्हा अनुकूल किंवा प्रतिकूल आहे ह्याचा अभ्यास ), शिवाय आजकाल सामान्य गुंतवणूकदाराला कुठला शेअर कधी विकत घेणे वा विकणे ह्याचा सल्ला देणे, फ्युचर आणि ऑप्शन मार्केट मध्ये गुंतवणूक, सामान्य गुंतवणूकदारांकडून विविध रोखे उभारणे, ( आपण विकत घेतो ते टॅक्स सेव्हिंग बॉन्डस हा त्यातलाच प्रकार) अशी विविध पडद्यामागची कामं करणार्या बॅंकेला "इन्व्हेस्टमेंट बॅंक" असे म्हणतात. "गुंतवणूक अधिकोष" नावच किती समर्पक आहे नाही? आजच्या ग्लोबलायझेशनच्या जमान्यात इन्व्हेस्टमेंट बॅंकर्स हे देशाचे अर्थकारण ठरवतात व देशाच्या अर्थव्यवस्थेला एक दिशा देतात असे म्हणणे वावगे ठरू नये. ह्या क्षेत्रातील काम करणार्यांना दिवसाचे चोवीस तासही कमी पडतात, शिवाय ग्लोबलायझेशनमुळे सर्व वित्तीय संस्थांच्या नाड्या एकमेकात गुंतलेल्या आहेत. एकाच वेळी अनेक व्यवधाने पाळून निर्णयावर यावे लागते, वेगवेगळ्या देशांचे चलन आणि त्यांची एकमेकांशी विनिमयाची पद्धत व स्पर्धा, निर्णयांचा जागतिक परिणाम हे सर्व ओघानेच आले. ही सर्व कामं निव्वळ ऐकायलाच अवघड वाटतात , पण हे सर्व आपल्या आजच्या पाहुण्या, समिता शहा लीलया पेलतात.

** http//www.sanjivan.org
Dr. Asha Sawardekar, Founder & President.
Contact details are Sanjeevan, Near Bandora Village
Panchayat, Nagueshim, Ponda - Goa. 403401. Phone:-91-832-2335257
Email:- sanjeevangoa@sancharnet.in

आभार -
- संपादन: मेधा पै (शोनू)
- आय बँकींग संबंधीचा परिच्छेद- केदार जोशी

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रैना, मुलाखत छान आहे, स्पष्टपणे जे आहे ते आहे असं बोलायला पण धाडस लागतं, ते त्यांच्याकडे आहे ते दिसतं.

फक्त मुलाखत वाचताना, कधी तृतीय पुरुषात , कधी प्रथम मध्ये असल्याने जरा अडखळायला झालं.. असो. तो गौण मुद्दा आहे.

मुलाखत मस्तच आहे . मिलिंदाला अनुमोदन . आणखी एक , विचारलेले प्रश्न बोल्ड अक्षरात लिहिले तर वाचायला सोप्पे जाईल ( मायबोली विशेष मधील संवाद ह्या सदराप्रमाणे ) .

चांगली मुलाखत आहे... मिलिंदाला अनुमोदन (पहिल्या प्रश्नासाठी)

ज्या काळी आमच्या अमेरिकन बँकेत उगीचच पाश्चात्य फॉर्मल कपडे घालायचा एक अलिखित नियम होता त्या काळी समिता अगदी आरामात साड्या नेसून यायच्या. "मुंबईसारख्या उकाड्यात हे असले कपडे घालायची मला आवश्यकता वाटली नाही. मी परदेशात जाते तेव्हा घालते." हे त्यांचं उत्तर. >>
हे मला खूप आवडलं... आंधळं अनुकरण करण्यात काही अर्थ नाही...

झकास झालीय मुलाखत. अगदी 'योग्य' प्रश्न विचारले आहेस रैना. बर्‍याच जणींचे 'सांसरिक' गिल्ट, किंवा समज गैरसमज कमी करण्याचं काम करतील समिताबाईंची उत्तरे. पण बाकी इतकी डिमांडिंग करिअर निभावून नेताना नातेवाईक्-मित्रमंडळी-शेजारी पाजारी यांचे आधारगट एस्टॅब्लिश करणं कसं जमवलं त्यांनी हे कळलं पाहिजे. अडचणी येणारच हे गृहित धरुन बॅक अप प्लॅन उभारण्याची थियरी वैयक्तिक आयुष्यात छानच वापरलीय.

रैना. छान मुलाखत. फक्त केदारचा पॅरा सर्वात वर घे कारण एकदा त्याचे काम समजले की प्रश्नाची नीट लिंक लागतेय

मधे मधे एकदा उत्तरामधे पण तृतीय पुरुषी झालय ते बदलून घेतलेस तरी चालेल.
गुंतवणूक बँकेत Analyst, Associate, VP, ED आणि एमडी अशी साधारण पदं असतात. एमडी असलेल्या स्त्रिया हाताच्या बोटावर मोजाव्या इतक्या असतात. समिता एमडी म्हणून कार्यरत होत्या. सध्या त्या स्वतःची गुंतवणूक consultancy चालवतात आणि एका नामांकित देशी financial services company साठी सल्लागार म्हणून काम पाहतात.) हे पण इंट्रोमधे घेतलेस तर अजून चांगले होइल.

छान झाली आहे मुलाखत, अश्या मुलाखती वरचेवर इथे व्हायला हव्यात.

घरकाम आणि त्याबाबत त्यांच रोख ठोक मत आवडलं. Happy
तसंच त्यांच्या प्रोफेशनमधे अगदी आवश्यक असणा-या
या व्यवसायात सहसा सगळे महत्वाचे deals ऑफिसबाहेर होतात ना ?>>>या प्रश्न्याच त्यांच उत्तर आवडलं

रैना
चांगली झाली मुलाखत. प्रश्म पण आवडले. त्यांनी घर आणि नोकरी कसे सांभाळलय हे आवडले सगळ्यांनाच असे करता येईल असही नाही.

रैना,
मुलाखत अगदी 'To the point झाली आहे. ट्यूशी सहमत. उगाच 'कर्तव्ये', 'त्याग' वगैरे भानगडीत न पडता स्वतःच्या priorities काय आहेत ते बघून, समजून घेउन, त्या वद्दल कुठलाही अपराधीपणा न वाटून घेता स्वतःला आवडणार्‍या क्षेत्रात झोकून देउन काम करत आहेत, त्या बद्दल त्यांना सलाम. विचारांची इतकी स्पष्टता फार अभावानेच बघायला मिळते. 'आहे हे असं आहे' हा दृष्टीकोनही सहीच.

मस्त आहे मुलाखत. केवळ वाचुनच एकदम प्रभावित झाल्यासारखे वाटले. आयुष्यात एकदा तरी भेटलेच पाहिजे अश्या व्यक्तींच्या यादीत अजुन एक भर.ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद.

सगळ्यांचेच धन्यवाद. आपल्या प्रतिसादांमुळे आणि सुधारणा सुचवल्यामुळे हुरुप वाढलाय.
लालू, केदार, शोनू आणि रुनी चे आभार. त्यांची खूप मदत झाली.

नंदिनी- अगं मला वाटलं की पहिलाच परिच्छेद आय बँकिंगबद्दल पाहून कदाचित बरेच लोकं पुढे वाचणारच नाहीत, म्हणून फुटनोटस मध्ये टाकलाय. Happy
ट्यु- विचारून पाहते. मलाही हाच प्रश्न आहे.

मुलाखत छान झाली आहे.
समिता शहा यांना संपर्क साधता येइल का? तसेच त्यांच्या कन्सल्टन्सी आणि services बद्दल पुरेशी माहीती मिळेल का?

रैना, छान झाली आहे मुलाखत.
समिता शहांचे स्पष्ट विचार आणि रोखठोक मते आवडली.
मुलाखत ईंग्रजी मधे झाली अस लिहिल आहेसच, पण एक विचारल्याखेरीज राहवत नाही, त्या मुळच्या (सावर्डेकर) म्हणजे मराठी नं. त्यांना मायबोली बद्दल, संयुक्ता उपक्रमाबद्दल काही विचारलस/सांगितलस का?

छान मुलाखत. मोजकेच पण महत्वाचे प्रश्न विचारल्यामुळे मजा आली. कोणताही अभिनिवेश न ठेवता पण स्पष्ट्पणे दिलेली उत्तरे आणी आपल्या प्रायॉरिटिज काय याची स्पष्टता यामुळे अजूनच आवडली.

रैना फारच छान घेतली आहेस मुलाखत !
अन अमिता शहांबद्द्ल प्रचंड आदर वाटला. आपल्याला नेमके काय अन कसे करायचे आहे याची इतकी स्वच्छ जाणीव फार कमी जणांना असते. "हॅट्स ऑफ तू यू मॅडम!"
धन्यवाद रैना अशा व्यक्तीची ओळख करून दिल्याबद्दल !

Pages