व्हॉटसप एक समस्या - अश्लीलता, राजकारण, बदनामी आणि अफवांचे पंढरपूर.

Submitted by ऋन्मेऽऽष on 3 August, 2015 - 12:31

बेफिकीर यांचा व्हॉट्स अ‍ॅप हा लेख आज वाचण्यात आला. आवडीचा विषय म्हणून त्यावर सविस्तर प्रतिसाद लिहायला घेतला आणि तो फारच मोठा झाला. तर आता ‘लेखापेक्षा प्रतिसाद मोठा’ असा टोमणा सहन करायची ताकद माझ्यात नसल्याने हा स्वतंत्र लेख म्हणून प्रकाशित करत आहे. अर्थात यात काही वेगळे मुद्दे आहेत जे त्या लेखात नव्हते. त्यामुळे कोणाला चर्चा करायची असल्यास माझी हरकत नाही.

..................................................

मुख्य विषयाकडे वळण्याआधी सर्वप्रथम थोडे माझ्या व्हॉटसपगिरीबद्दल.

मोजणी करायचे झाल्यास हातासोबत पायांची बोटेही कमी पडतील एवढ्या व्हॉटसप ग्रूप्सचा मी सभासद आहे. तसेच त्यावर पडणार्‍या पोस्टींचा हिशोब मांडायला गेल्यास सायंटिफिक गणकयंत्र मागवावे लागेल ईतकी प्रचंड प्रमाणात त्यावर उलाढाल चालू असते. त्यामुळे मी अध्येमध्ये काही ग्रूप सोडून जातो, तर कालांतराने तिथे परत भरती होत त्या जागी आणखी काही वेगळे सोडतो, जेणेकरून संतुलन राखले जाते. जिथे मी अ‍ॅडमिन आहे असेही चार-पाच ग्रूप आहेत, ते मात्र मी जिवापाड जपतो. कोणी काहीही म्हणा आणि कितीही खेचा, मला तर बाबा अ‍ॅडमिन या पोस्टचे फार कौतुक वाटते. हा मान माझ्याकडेच राहावा म्हणून मी आणखी कोणाला अ‍ॅडमिन केले नाहीये. (अवांतर - या ग्रूप अ‍ॅडमिन पदाला हल्ली ‘टोळी मुकादम’ किंवा नुसतेच ‘मुकादम’ असे नाव पडलेय. माझ्या नेटफ्रेंडसच्या एका ग्रूपवर मला आता माझे नाव विसरून मुकादम याच नावाने हाक मारली जाते)

असो, तर आता या सर्वच ग्रूपवर पडणारे रिपीटेड विनोद वाचणे मी केव्हाचेच सोडून दिले आहे. त्यामुळे सोरट काढल्यासारखे मध्येच एखादा फ्रेश आणि खुसखुशीत विनोद वाचायला मिळेल या मोहापोयी शेकडो रद्दड विनोद वाचणे, ते देखील तेच तेच विनोद कधी या, तर कधी त्या ग्रूपवर, असे एकूणच हजारो पोस्ट वाचण्याचा वेळ मी आता वाचवू लागलोय. सिलेक्टीव्ह विडिओज आणि इमेज मात्र डाऊनलोड करून बघतो. त्याखाली कोणी छानेय म्हणत कॉम्प्लीमेंट दिली असेल तर नक्कीच बघतो.

वादविवाद करणे हा माझा व्हॉटसपवरचा (देखील) पहिला छंद आहे. माझ्या डोक्यातील विचार ईतरांच्या कानावर घालणे ही माझी मूलभूत गरज आहे आणि ती भागवण्याचे एक साधन म्हणूनच मी सर्वप्रथम व्हॉटसपकडे बघतो. जेव्हा माझा एखादा ग्रूपमित्र आपले व्हॉटसअप उघडून बघतो आणि त्याला आमच्या कॉमन ग्रूपवर शंभर दिडशे नवीन मेसेज दिसतात तेव्हा ऋन्मेष हजेरी लावून गेलाय हे तो ओळखून जातो.

असो, एवढेच पुरेसे आहे माझ्याबद्दल. थोडक्यात मी एक पुरेसा पोचलेला व्हॉटसपकिडा आहे हे तुम्हाला समजले असेलच.

................................................

तर आता या व्हॉटसपचे जे काही तुरळक उपयोग आहेत त्यांचा पुरेपूर मान ठेवत यांनी काय समस्या निर्माण केल्या आहेत हे बघूया.

** इथे समस्या म्हणजे - खूप बोअर मेसेज असतात, ढिगाने असतात, दहा लोकांना पाठवा म्हणणारे देवाधर्माचे मेसेज, गूडनाईट गूडमॉर्निंग मेसेज, वेळी अवेळी फोन ट्रिंगट्रिंग वाजतो, काही वायरल मेसेजेसनी फोन हॅंग होतो, वगैरे वैयक्तिक अन किरकोळ त्रासाला वगळण्यात आले आहे. ते तुम्ही आपल्या चॉईसने निवडलेले फायदे तोटे आहेत. सेटींग बदलून, व्हॉटसप वापरावर मर्यादा आखून, अनावश्यक ग्रूप अनजॉईन करून, वा सरळ व्हॉटसपच अनईंस्टॉल करून तुम्ही या त्रासांवर नियंत्रण मिळवू शकतात. म्हणून ईथे आपण त्या सामाजिक समस्यांचा आढावा घेऊया ज्यांचे निवारण तुमच्या आमच्या कोण्या एकाच्या आवाक्याबाहेरचे आहे.

१) अश्लीलता - व्हॉटसपच्या आधीही अश्लीलता नव्हती असे नाही, पॉर्न साईट आधीही होत्याच आणि त्यांची चलती तेव्हाही होतीच. मात्र व्हॉटसपने अश्लीलता फार बोकाळली आहे असे मला वाटते. प्रत्येक स्कूल, कॉलेज, ऑफिसच्या मित्रांचे सर्वसाधारणपणे दोन व्हॉटसप ग्रूप असतात. एक शाकाहारी, तर एक मांसाहारी. शाकाहारी ग्रूपमध्ये मुले मुली एकत्र असतात तर मांसाहारी ग्रूप फक्त मुलांचा असतो, ज्यात अश्लील फोटो आणि पॉर्न विडिओ शेअर केले जातात आणि त्यावर आपल्या आवडी तसेच ऐपतीनुसार शृंगार आणि बीभत्सरसाने नटलेल्या कॉमेंटस केल्या जातात. आता शाकाहारी ग्रूपमध्ये जेवढी मुले असतात त्यातील काही सन्माननीय अपवाद वगळता बहुतांश मुले या मांसाहारी ग्रूपचे देखील सभासद असतात. (मुलींचे असे ग्रूप्स असतात की नाही याची कल्पना नाही, पण कदाचित त्यांच्या लेव्हलनुसार असावेत.)

असो, तर एखादे अ‍ॅप्लिकेशन वा फोल्डर, हाईड वा लॉक करण्याच्या सुविधेमुळे, आपला फोन कोणाच्या हातात पडून त्यातले भलते सलते कोणी पाहिले तर लाज जाईल ही भिती देखील आता नाहीशी झाली आहे. थ्रीजी नेटवर्क वा वायफायमुळे फास्ट स्पीड मिळणे, किमान १ जीबीचा डेटाप्लान असणे, किमान ८ ते १६ जीबी चे मेमरी कार्ड असणे, ग्रूपवर शेअर झालेले पॉर्न विडिओ आणि इमेजेस सहज उपलब्ध होणे, त्यांना मोबाईलमध्ये साठवून ते हवे तेव्हा हाताशी राहणे, आपल्यात दडलेले आंबटशौकिन मूल बाहेर काढत पांचट चर्चा करायला त्या मांसाहारी व्हॉट्सपग्रूपचे व्यासपीठ उपलब्ध होणे, यामुळे एकंदरीतच अश्लीलतेचा निचरा होतोय की सभ्यता अन संस्कृतीचा कचरा होतोय असा प्रश्न मला पडलाय.

तर, स्मार्टफोन कसा वापरावा यासाठी गरजेची थोडीशी अक्कल येताच, त्या वयातच मुलांच्या हातात स्मार्टफोन, पर्यायाने व्हॉट्सप आणि त्यातून वर उल्लेखलेले सारे प्रकार येत आहेत. ही धोक्याची घंटा आहे पालकांनो, सावधान!

२) राजकारण - हा खूप व्यापक विषय आहे. पण तरीही यावर फारसे लिहिणे मुद्दामच टाळतोय. कारण माबोवर राजकीय चर्चा अश्याही खूप चालतात, तर ईथेही पुन्हा तेच ते दळण नको.
मात्र थोडक्यात एवढेच सांगेन की सध्याचे बदललेले राजकीय प्रचाराचे फंडे, जनतेची दिशाभूल आणि ब्रेनवॉश करायच्या पोस्टी, यासाठी या व्हॉटसपचा सर्रास (गैर) वापर होत आहे आणि ही एक समस्याच आहे.

३) बदनामी - ही ईथे कोणाचीही होते, होऊ शकते. अर्थात तुम्ही आम्ही सेलिब्रेटी नसल्याने आपल्याला तशी भिती नाही. पण आपल्या श्रद्धास्थानांची वा आपण ज्यांचे चाहते आहेत त्यांची, वा अशीही कोणाचीही बदनामी करायला जर एखादे माध्यम सहाय्यक ठरत असेल तर नक्कीच ती समस्या आहे. राजकीय नेतेच नाही, तर काही चित्रपट कलाकार, आणि क्रिकेटर्स बद्दल जे काही पातळी सोडून विनोद ईथे फिरतात त्यावर नियंत्रण राखणे अशक्यच आहे.

४) अफवा - अफवा पसरण्यासाठी यापेक्षा वेगवान माध्यम सध्या दुसरे नाही. मग ती अफवा सामाजिक तणाव निर्माण करणारी असो वा अमुक तमुक प्रसिद्ध व्यक्तीचे निधन झाली अशी वरकरणी निरर्थक असो. न्यूज वगैरे चेक न करता सर्वात प्रथम ही बातमी आपण ग्रूपमध्ये द्यावी या हव्यासापोटी या अफवा आणखी वेगाने फिरू लागतात.

ईतर समस्या - व्हॉटसपवर आपण स्वताचेही पर्सनल फोटो, विडिओ आणि बरेच काही शेअर करतो. त्याचा सहजपणे गैरवापर होऊ शकतो. वर म्हटल्याप्रमाणे हा आपला वैयक्तिक प्रश्न असून याची काळजी आपली आपणच घेतली पाहिजे. पण बरेच तांत्रिक गोष्टींबाबत आपण अनभिज्ञ असल्याने आणि व्हॉटसपचे पुरते व्यसन लागल्याने ते सहजी सोडणे शक्य नसल्यास येत्या काळात आपली प्रायव्हसी आपण जपणे ही देखील सर्वांसाठीच एक मोठी समस्या होणार आहे. यावर जास्त भाष्य जाणकारच करू शकतील, मी ठरलो दगड-मातीचा ईंजिनीअर. ईति लेखनसीमा !

- ऋन्मेऽऽष

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हं..
सर्वच मुद्दे आहेत खरे..पण ते चुक कि बरोबर यावर पोल घेण्यात यावा Proud
स्वतःला लिमिटेड करुन टाकल तर त्रास कमी होतो हे माझं वैयक्तीक मत..
तरी चारचारदा सांगुनही बोअर मॅसेज आणि देवधर्माचे मॅसेज पाठवणार्‍यांना मी कोपच्यात घेऊन सुनवत असतेच..
फिरभी बाज नही आए तर मग ब्लॉक करणे हा पर्याय मी सांगुन अमलात आणते..
माहितीसाठी असणार्‍या ग्रुप मधे मात्र कितीही सांगा..दिवसा दोन दिवसातुन कुणीतरी टेम्प टाकतच तेव्हा परत येरे माझ्या मागल्या सुरु होत..

थोडक्यात अजुनतरी एकदम किर्र होईपर्यंत मला त्रास मी होऊ दिला नाहिए.. Happy
नको त्या गोष्टींनी पॅनिक न होता इग्नोरास्त्र मारण्यात मी बर्‍यापैकी पारंगत झालीए..

मला आतापर्यंत दोनच जणांनी व्हॉट्स अप फॉर्वर्ड्स पाठवलेत. खूप ऐकून होतो की बदाबदा फॉर्वर्ड्स येतात, त्यामुळं पहिला आला तेव्हां खूप एक्साईट झालेलो, की चला आता आपण पण हॉल ऑफ फेम मधे पोहोचलो. पण कसचं काय आणि कसचं काय !!

गर्लफ्रेण्डलाच दोन पोरं झालीत ती पण माझ्या पोरांच्या शाळेत नाहीत. उधारी झालीय, धंदा बुडालाय, टाईमपास म्हनून एक एमएनसी काढावी असा विचार चालू होता तो ही रहीत झाला... तर आता या व्हॉट्स अपचं करावं तरी काय ?

लेख वाचला नाही.
भारतात पोर्न साईट अ‍ॅक्सेस बॅन झालाय असं वाचनात आलं रिसेंट्ली.
सिलेक्टिव्ह सेन्सॉरशिपची सुरुवात ऑलरेडी झाली. अभिनंदन.

पंढरपूर हे एक सुंदर गाव आहे. तिथले चंद्रभागेचा घाट आणि कैकाडी महाराजांचा मठ मला खुप आवडतो.

भारतात पोर्न साईट अ‍ॅक्सेस बॅन झालाय असं वाचनात आलं रिसेंट्ली.
>>>>
हो यावरही बरेच जोक्स फॉर्वर्ड होताहेत, त्यातूनच समजलीय ही बातमी...

पण हे झालेय का खरेच असे? याच्या सत्यासत्यतेबद्दल अजून खात्री वाटत नाही.. चेक करून बघतो न्यूज..

पण झाले तरी काय किती फरक पडेल हा वेगळा प्रश्न..

जसे संपुर्ण दारूबंदी म्हणताच मग त्याचे उलटे परिणाम होतील असे युक्तीवाद होतात ते ईथेही लागू होईल का? लोकं आणखी उत्सुक होतील का?

हो यावरही बरेच जोक्स फॉर्वर्ड होताहेत, त्यातूनच समजलीय ही बातमी... >>> ऋन्मेष, आम्ही दुसरी कसली शंका घेतली नव्हती Proud

शीर्षकातले शेवटचे तीन फक्त तोंडी लावायलाच होते का ?

पहिल्यामधे ज्याला विशेष रुची आहे त्याच्याशी चर्चा करण्यात लोकांना रस नसतो हे दुर्दैव आहे !!
जेवायला बसतांना हावरटासोबत पंगतीला बसत नाहीत लोक पण जेवायचं प्रत्येकालाच असतं , तसंच.

मुकादम : एका हाताने एका पायाचे धोतर थोडे गुडघ्यापर्यंत ओढून धरलेला आणि मजुरांना "माल डालो ,मिशिन चलाव " ओरडणारा साइटवरचा ( बिल्डिंग ) माणूस डोळ्यासमोर योतोय.

बॅासने ग्रुपमध्ये येण्याचा आग्रह धरला तर त्याला { बैलाला थोपवून धरायचे } अॅड करायचे अॅडमिन टाळू शकतो का?बरेचदा बॅास वृषभ राशीचे नसून जोक न समजणाय्रा कन्या राशीचे अथवा टेकाडल्यावर गर्वाने का काय ते उभे राहून मीच उंssssच सांगणाय्रा मेष राशीचे असतात.

आयला आमच्या सर्विस मधले मिड फॉर्टीज़ मधले बॉसेस फार काव आणतात जीवाला!! डिस्पैच रनर ते मोर्स कॉम पाहिलेली जमात असते ती, भयानक रटाळ काय काय फॉरवर्ड करत असते त्यात कोणी फॉरवर्ड ला असला अन तिथे कवरेज असले (आजकाल बहुतेक असते) तर काही विचारायचीच सोय नाही

ऋन्मेष, आम्ही दुसरी कसली शंका घेतली नव्हती Happy
मी तर या विषयावर ऋन्मेष चा धागा किंवा किमान पोल तरी येइल याची वाट पहात होतो.

फारेण्ड Lol

विजयकुलकर्णी, काहीजण ती बंदी उठवली पण गेली असे म्हणत होते, मला नक्की माहीत नव्हते, म्हणून धागा पोलच्या भानगडीत नाही पडलो, चर्चेला उत्सुक असाल तर ईथेच करा, त्यानंतर पोल हवा तर वेगळा काढूया, जे लाजून चर्चा नाही करणार त्यांच्या गुप्त मतदानाला Wink

बॉसने हट्टच धरला तर दोन ग्रूप बनवायचे आणि एकात त्याला घ्यायचा.

मी तर आता एक शहाणपणा शिकलोय, बॉसच नाही तर कलीगही घातक असतात..
उदाहरणार्थ तुम्ही हाल्फ डे ने गेलात आणि तब्येत बरी नाही हे कारण सांगितले तर काल रात्री 2 ची तर पोस्ट होती ग्रूपवर म्हणून पचकून जातात..

टिना +१
माझ्या व्हॉ अ‍ॅपचे ग्रुप लिमिटेड आहेत .. त्यातही नो फॉर्वर्डची सुचना असतेच.. निव्वळ गप्पा सुरु असतात तेही वेळापत्रक बघुन Happy .. वैताग आलाच तर मी ग्रुप सोडुन देते

टीम लीड न बॉस वगैरे लोकांना कुठल्याच सोशल ग्रुप्समधे अ‍ॅड नाही केलं फक्त लिंक्ड ईन सोडुन Proud

जोक न समजणाय्रा कन्या राशीचे >>>>>हॉई! कन्येला जोक समजत नाहीत? नाहीत? नाहीत? ( एको) विनोद करणे, मार्मिक बोलणे, हसत हसत टोमणा मारणे, हजरजबाबी असणे असे गुण असलेल्या आणी विनोदा चा कारक बुध जो कन्येचा मालक आहे, अशा राशीला जोक कळत नाहीत असे म्हणणे म्हणजे सचीन तेन्डुलकरला कव्हर ड्राईव्ह मारत येत नाही असे आहे का?:फिदी:

पॉर्न साईट्स बंद होणे हा उथळ व किरकोळ विषय नाही. त्यावर एक धागा आवश्यक आहे. मी आज व उद्या प्रवासात असेन. इतर कोणी धागा काढला तर उद्या संध्याकाळी वगैरे लिहू शकेन. पण तोवर हुरहुर लागेल की कोणी कोणी काय लिहिलेले आहे ह्याची, ते वाचायची!

गेल्या काही काळात झालेल्या काही गाठीभेटींनंतर ह्या साईट्सचे खासगी आयुष्यातील वाढते महत्त्व हे एक मोठे आव्हान असल्याचे जाणवले. त्यामुळे त्यावर लिहायची इच्छाही होती. काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. असो! ऋन्मेष तुम्ही धागा काढणार असलात तर सुस्वागतम! (जसे काही माझ्या खर्चाने सगळे चाललेले आहे Proud Sad प्रांजळपणाने म्हणालो इतकेच)

ह्या ठिकाणी अवांतर प्रतिसाद दिल्याबद्दल क्षमस्व!

whatsapp च नव्हे तर कुठल्याही social site जिच्यावर instant messaging करता येते तिथे अत्यंत कडक धोरण ठेवूनच मित्र स्वीकारावेत. मेल/फोरमची गोष्ट वेगळी असते पण अशा apps वर नंतर नंतर खूप त्रास होऊ शकतो. मी तरी निरर्थक फॉरवर्ड आला रे आला की warning देतो. दुसऱ्या फॉरवर्डला grp left आणि मुळात मी उत्तर केवळ genuine msgs ना देतो. अर्थात मला tp करायला आवडतो पण whatsapp वर तो २४ तास होत राहतो म्हणून असे धोरण! पण त्यामुळे मला दिवसातून २दा चेक केले तरी पुरते.

पॉर्नचा मुद्दा - काय फरक पडतो? लाखो साइट्स पैकी फक्त ८५७ ब्लॉक केल्या आहेत. आणि proxy साइट्स आता शाळकरी पोरांना पण माहित असतात. खरा गदारोळ जेव्हा माजायला पाहिजे होता -> github ब्लॉक होत एक आठवडा पॉर्नच्या नावाखाली- तेव्हा सगळे गप्प होते. बाकी सुप्रीम कोर्टाचा आदेश नीट वाचा. ऋन्मेषकुमारांच्या लेटेस्ट शतकाचे बीज त्या आदेशात आहे.