आईसबॉल होणारे बेडुकराव...

Submitted by पुरंदरे शशांक on 2 April, 2013 - 06:50

आईसबॉल होणारे बेडुकराव...
( Survival of the sickest by Dr. Sharon Moalem and Jonathan Prince - या पुस्तकाच्या आधारे हा लेख लिहिलेला असून याचे सर्व श्रेय "वर्षू नील" ला जाते. कालच बर्षूने या पुस्तकाची ओळख निसर्गाच्या गप्पा (भाग१३) द्वारे करुन दिली. हे पुस्तक अशा अनेक गंमती जमतीने भरलेले असून अतिशय रंजकपणे लेखकाने यात अनेक शास्त्रीय गोष्टींचा उलगडा केलेला आहे.)
.
.
.
१९८० च्या आसपास डॉ. केन स्टोरे हा कॅनडातील एक बायोकेमिस्ट बर्फात रहाणार्‍या किड्यांचे संशोधन करायला उत्तर अमेरिकेत सपत्नीक फिरत होता. तिथे त्याला कळले की वूड फ्रॉग नामक काही बेडूक शीतनिद्रेपेक्षा (का हिमनिद्रा) (हायबरनेशन) आश्चर्यकारक जीवन जगतात. शोध घेता घेता त्याला एक वूड फ्रॉग मिळाला. गंमत म्हणजे केनकडून तो बेडुक त्याच्या कारमधेच प्लॅस्टिक बॅगमधे रात्रभर राहिला. त्या रात्री नेमकी गोठवणारी थंडी (शून्याखाली तापमान दाखवणारी) पडली.

सकाळी उठून केनने पाहिले की बिचारा बेडुक त्या थंडीने गोठून पार बर्फ झालेला. केनला फार वाईट वाटले, त्याने अत्यंत निराश होऊन त्या संपूर्ण गोठलेल्या बेडकाला आपल्या घरात आणले. केन त्याच्याकडे हताश होऊन पहात होता.

आणि इथेच खरी गंमत सुरु झाली .....
- हळूहळू त्या बेडकावर घरातील तापमानाचा (रुम टेंपरेचरचा) असर होऊ लागला - जस जसा तो बेडुक वितळला (नॉर्मल रुम टेंपरेचरला आला) तसतसा तो गोठलेला बेडुक झोपेतून जागा झाल्यासारखा चारी पाय ताणू लागला, त्याचा श्वास-उच्छ्वास सुरु झाला आणि नंतर तो चक्क टेबलावर उड्या मारु लागला व त्याचा विशिष्ट आवाजही काढू लागला. आता केनने हे सर्व स्वतःच्या डोळ्याने पाहिल्याने त्याला काय खरे व काय खोटे हेच समजेना.

मग चौकशीअंती त्याला कळाल्या त्या गोष्टी अशा होत्या -

उत्तर अमेरिकेत सापडणार्‍या या बेडकाला निसर्गाने काही विशेष गोष्टी प्रदान केल्या होत्या. साधारणतः जिथे अतिशय थंडी पडते (शून्याखाली तापमान दाखवणारी : उणे काही डि. सेल्सियस) तिथले अनेक प्राणी शीतनिद्रेत जातात. यात हे प्राणी गाढ झोपी जातात. त्यांच्या शरीरात फॅट्सचे प्रमाण इतके असते की त्याचे एक सुरक्षा कवचच तयार होते. या प्राण्यांचे सर्व मेटॅबॉलिझम (चलनवलन) अतिशय मंदावते व त्यांची अतिशय कमी उर्जा वापरली जाते. पण या सर्व प्राण्यांमधे जिवंतपणाची लक्षणे दिसतात. जेव्हा केव्हा वसंत (स्प्रिंग) ऋतू येतो तेव्हा हे प्राणी या हिमनिद्रेतून बाहेर येऊन नेहेमीसारखे व्यवहार सुरु करतात.

पण या वुड फ्रॉगची गोष्टच पूर्ण वेगळी आहे. जेव्हा केव्हा गोठवणारी (शून्याखाली तापमान दाखवणारी) थंडी पडते तेव्हा हा बेडुक चक्क गोठून बर्फ होतो. त्याच्यात जिवंतपणाचे एकही लक्षण दिसत नाही - हृदयाचे ठोके, श्वास-उच्छ्वास, कुठल्या अत्याधुनिक उपकरणाने मोजता येईल अशी मेंदूची कार्यशीलता हे काही एक त्याच्या ठिकाणी दिसत नाही - कारण सहाजिकच आहे तो पूर्ण गोठूनच जातो ना... पण आश्वर्याची गोष्ट अशी की त्याच्यातील "जीवन" संपलेले नसते. कारण जेव्हा वसंत (स्प्रिंग) ऋतू येतो तेव्हा हे महाशय चक्क हळूहळू जागे होतात (का वितळतात ) व नेहेमीचे जीवन सुरु करतात.

हे सारे होते कसे -
जेव्हा बेडकाच्या सभोवतालचे तापमान शून्याच्या आसपास येऊ लागते ते त्या बेडकाच्या त्वचेला जाणवू लागते - तिथून त्याच्या सार्‍या शरीरभर काही बदल सुरु होतात -
त्याच्या रक्तातील व अवयवातील पाणी हळूहळू बाहेर पडून उदरपोकळीत जमा होते (मूत्र तयार होऊन त्याचे विसर्जन होण्याऐवजी). त्याची लिव्हर कार्यरत होऊन रक्तातील शर्करा व अल्कोहोलिक शर्करा ही जवळजवळ शंभरपटीने वाढते. आता ही शर्करा जी वाढते त्याचा उपयोग असा होतो की जेव्हा तो बेडुक गोठला जातो तेव्हा त्याच्या सूक्ष्म रक्तवाहिन्यांच्या नाजूक भित्तिका (सेल वॉल्स) या तीक्ष्ण आईस क्रीस्टल्समुळे भोके पडून खराब होऊ शकतात त्या होत नाहीत.
एक साधी गोष्ट पहा - फ्रीजर चेस्टमधे (उणे शून्य तापमानात) पाणी ठेवले तर त्याचे आईस क्यूब तयार होतात - जे खाताना आपण कुडुम कुडुम आवाज करत ते फोडतो व खातो - म्हणजेच हे आईस क्रिस्टल्स किती कठीण असतात - पण त्याच पाण्यात जरा साखर, दूध व फ्रिजिंग जेल घाला व ठेवा फ्रीजर चेस्टमधे - आईस्क्रीम तयार होते -खाताना किती मऊ मऊ लागते ना....
पाण्यात जेव्हा शर्करा, प्रोटीन्स व क्रायोप्रिझर्व्हेटिव घातले जाते तेव्हा तीक्ष्ण आईस क्रिस्टल्स तयार होऊ शकत नाहीत. नेमके हेच त्या बेडकाबाबत घडते. याचबरोबर याच्या शरीरात फायब्रिनोजेन (ब्लड क्लॉटिंग फॅक्टर) ची ही खूप निर्मिती होते ज्यामुळे फ्रिजिंग होताना अवयवांना होणारी हानि टाळली जाते.

जरी त्याच्या शरीराबाबत अजूनही काही काही गुंतागुंतीच्या प्रक्रिया घडत असतील तरी ही मुख्य गोष्ट घडते जी त्याच्या शरीरातील "जीवन" शाबूत ठेवते ....
.....अजून त्याच्या शरीरातील सर्वच्या सर्व गोष्टी शास्त्रज्ञांना समजल्यात असे नाहीत .
.... पण......
....भविष्यात कोणा शास्त्रज्ञाला ही सर्व प्रक्रिया समजली व माणसासाठी ती उपयोगात आणता आली तर !!!!

(Rana sylvatica म्हणजेच हा वूड फ्रॉग)

Rana sylvatica.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वा! शशांकजी छान माहिती. धन्यवाद! Happy
शशांक,एक सजेशन, तू आता या पुस्तकाचं भाषांतरच करून टाक मराठीत.. खूप फायदा होईल मराठी वाचकांना.. >>>तुमाखमै. Happy

वाचावे ते नवलच..
या बेडकाबद्दल विज्ञानाविषयी वाचत असताना तोंडओळख झाली होती पण इतकी डिटेलवार माहीती आत्ता वाचली.. धन्यवाद शशांक Happy

मस्त माहिती .
शशांक, धागा आभाराच्या निमित्ताने वर आणला म्हणून खूप खूप आभार .

Pages