आधुनिक सीता - ३१

Submitted by वेल on 11 February, 2015 - 00:13

भाग - ३०: http://www.maayboli.com/node/51610
***************
ह्या भागात इंग्रजीमध्ये झालेले सर्व संभाषण खूप जास्त असल्याने ते मी मराठीतच लिहित आहे.

*****************

किती वेळ निघून गेला कळलं नाही. मध्येच तीन वेळा मला खाण्यासाठी फळे ज्युस आणि सँडविचेस आली होती. त्या संपूर्ण वेळात रफिक किंवा फतिमा मला भेटायला आले नाहीत. जेनी मात्र दोन तीन वेळा माझ्या रूमबाहेर जाऊन आली. रफिकचा बॉडी गार्ड रूम बाहेरच उभा होता. त्यादिवसाच्या सुरुवातीला मला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळणार होता, पण दिवस मावळेपर्यंत तोही मिळेल की नाही माहित नव्हते. त्यातल्या त्यात समाधानाची बाब अशी की जेनी माझ्यासोबत होती. काहीतरी रे ऑफ होप माझ्या डोळ्यासमोर होता. इतके महिने मी नुसतीच फरफटली गेले होते.

रात्रीच जेवण झालं आणि फातिमा तिथे आली. खूप थकल्यासारखी दिसत होती. खूप टेन्शनमध्येदेखील वाटत होती. तिने जेनीला बाहेर जाण्यास सांगितले. ह्याचाच अर्थ तिला माझ्याशी काही महत्त्वाचे बोलायचे होते.

"आज तुला डिस्चार्ज मिळणार नाही. तुला इथेच राहायचे आहे, उद्या तुला भेटायला काही ऑथोरिटीज येणार आहेत. बाहेर जाताना तयार व्हायचीस तशी व्यवस्थित तयार हो. तुझा चेहरा सोडला तर तुझं नख किंवा तुझ्या केसाची बटदेखील कोणालाही नजरेस पडली नाही पाहिजे. तू हॉस्पिटलमध्ये आहेस म्हणून तुला काही खास सवलत नाही."

"कोण येणार आहे मला भेटायला? कशाबद्दल? आणि तू इतकं चांगलं इंग्रजी कशी बोलतेस? तुम्ही काय लपवताय माझ्यापासून?

"तुला योग्य वेळी सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. आत्ता मी सांगते तेवढंच लक्षात ठेव आणी तेच बोलायचं. तेच तुझ्याही हिताचं आहे आणी आमच्याही. जर तू मी सांगते तशी वागलीस आणी बोललीस तर त्यात मी तुझा फायदा करून देऊ शकेन."

"माझा फायदा, म्हणजे नक्की काय? मला परत पाठवू शकशील? तू दाखवत होतीस तशी कमी शिकलेली वाटत नाहीस."

"आत्ता जास्त प्रश्न विचारू नकोस. जे सांगते ते नीट ऐक. उद्या तुला ज्या ऑथोरिटिज भेटायला येणार आहेत ते तुझी काय चौकशी करतील काय नाही माहित नाही. तुला फक्त हो किंवा नाही एवढेच उत्तर द्यायचे आहे." आणि ती गप्प बसली. एका बर्‍याच मोठ्या पॉझ नंतर तिने पुन्हा बोलायला सुरुवात केली.

"हे बघ तू इथे आल्यावर सागरने परत जाणं आणि तुझं इथे राहाणं, मग तू इस्लाम स्वीकारणं, तुझं आणि रफिकचं लग्न आणि मग तू प्रेग्नंट असणं हे सगळं सुरळीत झालेलं असताना तुझं हे अ‍ॅबॉर्शन करायला लागलंय आणि त्याने सगळा गोंधळ सुरू झाला. तुझी व्यवस्थित डिलिव्हरी झाली असती तर एवढा गोंधळ झाला नसता. जो गोंधळ होत होता तो आम्ही निस्तरत होतोच आणि पुढेही काही काळ निस्तरला असता. पण आता जे झालय त्याने रफिक, माझा भाऊ सादिक आणि मी आम्हाला तुरुंगात जायला लागू शकतं म्हणून तो गोंधळ निस्तरायला तुझी मदत हवी आहे."

तिने कितीही चेहरा भावनाहीन ठेवाय्चा प्रयत्न केला तरी तिची चलबिचल मला कळत होती.

"तुझ्या हे अ‍ॅबॉर्शन इतल्या कायद्याप्रमाणे बेकायदेशीर आहे. जोपर्यंत आईच्या जीवाला धोका नाही तोपर्यंत अ‍ॅबॉर्शन करायला परवानगी नाही. अर्थात सर्रस अ‍ॅबॉर्शन्स होतात पण ती रेकॉर्डवर नसतात. तुझं वजन कमी होत होतं सोनोग्राफीमध्ये काही कॉम्प्लिकेशन्स दिसत होते त्यामुळे तुझ्या बाबतीत आम्हाला काही शंका आल्या. म्हणून आम्ही काही अजून टेस्ट्स केल्या. तीन वेगवेगळ्या डॉक्टरांकडून ते सारे रिपोर्ट्स तपासून घेतल्यावर मगच आम्ही तुझे अ‍ॅबॉर्शन करायचे ठरवले. त्या डिसिजन वर तीन डॉक्टरांच्या सह्या आहेत. एक हॉस्पिटलमध्ये नोकरी करणारे डॉक्टर, एक माझा भाऊ जो रेडियोलॉजिस्ट आहे आणि एक मी जी गायनॅकॉलोजिस्ट आहे." असे म्हणून तिने पुन्हा पॉझ घेतला आणि तितक्यात मी तिला "काय " असे जोरात ओरडून विचारले.

"हो. अनेक गोष्टी तुला माहित नाहीत. त्या कळतील हळू हळू. पण आत्ता मी सांगते तेवढं ऐक.
तुझ्यासोबत अजून तीन बायकांचे असे रीपोर्ट्स होते आणि पण त्यांनी दुसर्‍या हॉस्पिटलमधून चेकप्स करून घेतले. त्यांचे रिपोर्ट्स नॉर्मल आल्याने तुझे सगळे रिपोर्टस् पुन्हा चेक केले गेले आणि त्यात तुझ्या अ‍ॅबॉर्शनची गरज नव्हती असे कळले. कोणीतरी ऑनलाईन रेकॉर्ड् मध्ये बदल करून ठेवले होते. ते कोणीतरी हेल्थ मिनिस्ट्रीला कळवले आणि तो एक मोठा प्रॉब्लेम झाला. आता ह्या सगळ्यामुळे अनेक प्रश्न उभे राहिले आहेत जे इतर नॉर्मल कंडिशनमध्ये उभे रहिले नसते. तुझा नवरा परत गेला तरी तू इथे का थांबलीस. इस्लाम का स्वीकारलास? तुझा घटस्फोट झाला होता का नाही? तू रफिकशी लग्न का केलंस. आणि त्याबद्दल तुझी चौकशी होऊ शकते. अडकलो तर आपण सगळेच अडकू. तू माझं ऐकलस तर आपण सगळेच सुटू."

मी पूर्ण कन्फ्युज झाले होते.

"काय करायला हवं मी आता?" मी विचारलं.

"मी आता जे तुला सांगणार आहे ते तसंच्या तसं त्या ऑथोरिटीज्ञा समजलं पाहिजे. एकही शब्द इथे तिथे नाही. सागर तुला इथे घेऊन आला पण इथे आल्यावर त्याला समजलं की तुला घरकाम येत नाही आणि त्याची तुला आवडही नाही. ह्याशिवाय तू खूप चिडखोर आहेस. तू सतत भांडतेस. महागड्या वस्तूच्या डेमाण्ड्स करतेस आणि कधी कधी रागाने व्हायोलण्ट सुद्धा होतेस. ह्यामुळे तुला कंटाळून आणि तुझी ट्रीट्मेण्ट व्हावी म्हणून सागर तुला इथेच ठेवून परत गेला. पण तिथे गेल्यावर त्याला तुझा संशय येऊ लागला आणि त्याने तुला घटस्फोट देण्याचे ठरवले. तुही रागाने इस्लाम धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतलास आणी इथेच राहाण्याचे ठरवले. माझा नवरा रफिक अत्यंत चांगला माणूस असल्याने त्याला तुझी अवस्था पाहवली नाही. तुझ्या नवर्‍याने घटस्फोटासाठी अर्ज केल्यावर तू रफिकला सांगून स्वतःचा धर्म बदललास, त्यामुळे तुझा घटस्फोट झाला आणि मग त्यामुळे रफिक तुझ्यासोबत लग्न करू शकला. मग तू प्रेग्नन्ट झालीस पण तुझे संतापाचे अ‍ॅतॅक्स वाढत गेले. आम्ही तुझ्यावर ट्रीटमेण्ट करत असतानाच तू रागाने जेवाय्ची नाहीस आणि तुझे वजन खूप कमी झाले. त्यामुळे तुझ्या जगण्याची काळजी वाटू लागली आणि तुझ्या रिपोर्ट्सचे सेकड व्हेरिफिकेशन न करताच आम्ही तुझ्या अ‍ॅबॉर्शनचा निर्णय घेतला.."

"हे असं सांगायचं मी? म्हणजे सगळं सहन करून तुम्हा सगळ्यांच्या मनासारखं वागून शेवटी मीच वाईट? नाही सांगणार मी असं. कळू दे तुमच्या ऑथोरिटिजना की तुम्ही किती खोटेपणाने वागलात माझ्याशी. रफिकने कसं अडकवून ठेवलं मला. मला परत तरी पाठवतील ते. तूसुद्धा खोटं बोललीस माझ्याशी"

"तुला इथे मी सोडून कोणाचीही मदत होऊ शकत नाही. तू माझं ऐकलस तर सुटशील नाहीतर तुलाही फाशी होईल नवरा जिवंत असताना घटस्फोट झालेला नसताना त्याच्या परवानगी शिवाय धर्म बदलून दुसरं लग्न केल्याबद्दल. शिवाय सागरला ह्युमन ट्रॅफिकिंग खाली अडकवू शकते मी. तुझ्याकडे दुसरा पर्याय नाही. रफिकला अडकवायचा विचारही करू नकोस. त्याने तुझ्यावर बलात्कार केलेला नाही तू स्वतः त्याच्याशी लग्न केलं आहेस आणि सागरला तसं पत्रही लिहिलं आहेस. माझं माझा नवरा आणि माझं हॉस्पिटल ह्यावर खूप जास्त प्रेम आहे. ह्या दोघांना धोका होईल असं मी काहीही होऊ देणार नाही. आता तू ठरव तुला काय हवय. मी सांगतेय त्याला अनुमोदन दिलस तर मी तुझ्यासाठी काहीतरी करू शकते. आणि नक्कीच करेन काही तरी. पण तू जर का काही कमी जास्त बोललीस तर... मग तुला फाशी आणि सागरला सुद्धा..काय म्हणणं आहे तुझं" खूप कृद्ध भाव होते फातिमाच्या चेहर्‍यावर.

मी गोंधळले. मला काही सुचेना. ते पत्र पाठवून मी स्वतःच्याच मानेत फासाचा दोर अडकवला होता.

"तू म्हणशील तसं होईल. पण फातिमा मला उत्तर हवय हे सगळं असं का केलत? का वागलाय तुम्ही माझ्यासोबत असे? का खेळताय माझ्या आयुष्याशी असे?"

"सरीता, डीयर सरीता, तू मी म्हणते तसं वाग ऐक माझं. मी तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईन. नक्की देईन. आणि तीही खरी उत्तरं. मला बहिण समजून मला मदत करआणि खरच मी तुझं आयुष्य सुधारण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. ."

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages