गवारीची भाजी- बेसनाचे कोफ्ते घालून - फोटोसह

Submitted by maitreyee on 1 June, 2012 - 16:19
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

गवार निवडून तुकडे केलेली (त्याला लागणारा वेळ धरलेला नाही)
फोडणीचे साहित्य
गार्लिक पावडर किंवा लसूण
काळा मसाला
कोथिम्बीर

गोळ्यांसाठी
बेसन
ओवा
तिखट
मीठ
हळद

क्रमवार पाककृती: 

फार काही कॉम्प्लिकेटेड रेसिपी नाहिये Happy
गवार शिरा काढून तुकडे करून धुवून तयार करावी. साधारण ३ वाट्या. (आपण भाजी करणार असल्यास हे कंटाळवाणे काम इतरांना द्यावे! - यातल्या लिंगनिरपेक्षतेची नोंद घ्यावी :डोमा:)
नेहमीप्रमाणे हळद, हिंग, कढिपत्ता घालून फोडणी करा, त्यात गवार घालून परता.थोडी रोस्टेड गार्लिक पावडर किंवा दोन तीन पाकळ्या लसूण ठेचून घाला. मला स्वतःला कच्च्या लसणापेक्षा त्या गार्लिक पावडर चा स्वाद जास्त आवडतो या भाजीत. तिखट, काळा मसाला , मीठ, गूळ किंवा साखर आणि थोडे पाणी घालून उकळी येऊ द्या. पाणी अगदी गवारी पोहण्याइतके नव्हे तर अंगाबरोबर रस होईल इतकेच घाला, ते गोळे वाफवण्यासाठी लागणार आहे.
गोळ्यांसाठी - एक वाटी (जास्त गोळे हवे असल्यास दीड वाटी) बेसन, तिखट , मीठ, थोडा ओवा च्रुरून असे एकत्र करा. अगदी थोडे पाणी अन तेलाचा हात लावून साधारण पोळीच्या कणकेच्या कन्सिस्टन्सीप्रमाणे मळून घ्या. याचे तेलाच्या हाताने लहान लहान गोळे बनवा (साधारण शेंगदाण्यापेक्षा थोडा मोठा आकार) आणि शिजणार्‍या भाजीत सोडा. हलक्या हाताने थोडे हलवा. झाकण ठेवून भाजी अन गोळे एकत्र शिजू द्या.साधारण ५-१० मिनिटात भाजी तय्यार! वरून कोथिंबीर घाला. एक वाफ जाईपर्यन्त झाकून ठेवा आणि मग वाढा - त्यामुळे मसाला / रस्सा जरा जास्त मुरतो गोळ्यात.
मस्त लागते ही भाजी! माझी पोरे एरवी भाज्या खाताना का-कू करतात पण गोळयांमुळे गवार पण खातात Happy उरलेल्या शेवटच्या गोळ्यांसाठी मारामारी होते Lol
** फोटो :
gawar2.jpg

वाढणी/प्रमाण: 
३-४ जणांसाठी
माहितीचा स्रोत: 
माझे प्रयोग.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बॅक इन बिझनेस का?>> Lol

करून बघायची आहे ही रेसीपी.. मी आपली नेहेमी गवार बटाटा किंवा दाण्याचे कुट घालूनच करते ही भाजी..

आज फायनली केली ही भाजी. बेसन संपले होते कधी नव्हे ते मग भाजणी घेतली. फारच सुपर्ब लागतीय भाजी. हा घ्या फोटो..

IMG_0426.jpg

दाण्याच्या कुटाची दह्यातली चटणी. नेहेमी मी वरून फोडणी पण देते हिंग-मोहरीची. काल नाही दिली.
आणि मँगो चिली पिकल.

बस्कुनं केलेली भाजी आणि सगळं ताट एकदम भारी. मला बोलावशील तेव्हा चटणीऐवजी (दही न घालता) काकडीची कोशिंबीर कर हो Proud

नेहमीची/ इथे आधीच असलेली रेसिपी तुम्ही एक दोन अ‍ॅडिशन करून आमची म्हणून खपवता म्हणून इतके प्रतिसाद. लोकं फसली. Wink

तेच की. आता समजा वरण-भात या पारंपारिक मराठी पदार्थाच्या 'ऑथेंटिक' पाककृतीला १०० प्रतिसाद आले तर समजू शकतो.

मी पण कालच केली होती ही भाजी . ऑस्सम लागते. थँक्स मैत्रेयी. आमच्या पण बारक्या मंडळींनी चक्क आवडीने खाल्ली. Happy

काल आईने गवार कमी वाटली म्हणून की काय त्यात आपले वाळवणातले वडे (म्हणजे तुमचे सांडगे, आम्ही वडे म्हणतो :)) घातलेले तेव्हा या भाजीची आठवण झाली. हा शॉर्टकट वापरू शकता या भाजीसाठी...

शॉर्टकट म्हणून अनेक वेळा सांडगे घालून केल्यावर काल शेवटी साग्रसंगीत केली ही भाजी. बेसन जरा जास्त घट्ट भिजल्यानं की काय ते कोफ्ते कच्चे लागत होते. तरी मी काही नळ्या, काही लाट्या आणि काही गोळ्यांच्या आकारात टाकले. रात्रभर रश्श्यात मुरून मग आज मावेमध्ये गरम केल्यावर जास्त चांगले लागले. एकुणात भाजी आवडली आणि आयड्या आल्यानं पुढल्यावेळी जास्त चांगली होइल असं वाटतंय Happy

अहाहाहा गवार!!! कोवळ्या गवार शेंगा असत आमच्या रानातल्या, कच्च्या खायला ही भारी लागत तुरट गुळचट गवारीची तुम्ही सांगितली तशी भाजी (फ़क्त गोळे न घालता) आई करते आमची, गुळचट मसालेदार अशी ती भाजी वरतुन घट्ट तुरीच्या वरणाचा गोळा (पेंड) अन कच्चे तेल उगाच थेंबभर वरतुन शेंगदाण्याचे!! स्वर्ग निव्वळ स्वर्ग

मस्त लागते ही भाजी! माझी पोरे एरवी भाज्या खाताना का-कू करतात पण गोळयांमुळे गवार पण खातात स्मित उरलेल्या शेवटच्या गोळ्यांसाठी मारामारी होते हाहा

अशीच आमुची आई असती
चविष्ट भाज्या बनवती
आवडीने जेवलो असतो
दररोज सुखाने किती

आमच्या येथे दोड्क्याची [शिरी दोड्की] करतात अशी भाजी कोफ्ते घालुन. ती पण फारच मस्त लागते एकदम चविश्ट.
तसच जाड शेंगा फक्त २ तुकडे करुन कुकर मधे शिजवायच्या आंबट गोड रस्सा फोडणीला घालायचा व त्यात ह्या शेंगा घालुन उकळी आणायची. किंवा आमटीत सोडायच्या. व शेवग्याच्या शेंगासारख्या ओरपायच्या.खुपच मस्त लागतात.
आता वरील पद्धतीने करुन पाहीन.

माझ्या साबा पण दोडक्याची भाजी कोफ्ते घालून करतात. त्या बेसनाचे नव्हे तर कणकेत तिखट मीठ इ. घालून गोळे बनवतात अन त्या भाजीत घालतात. वरच्याच पद्धतीने कृती, पण त्यांच्या हातची ही भाजी चांगली होते. मला नाही धड जमत ती Happy

छान झाली भाजी, मी पहिल्यांदाच लसुण घातला गवारीच्या भाजीला. ओवा घालते एरवी आणि बेसनाचे गोळे पण चांगले लागले, न फुटता राहिले. मुख्य म्हणजे असे प्रयोग करूनही लेकाला आवडली भाजी. नाही तर बेसन म्हंटलं कि तो नाक मुरडतो.

आज मी केली ही भाजी आणि फार मस्त झाली. मी बादशहाचा रजवाडी गरम मसाला घातला.

माझी एक स्टेप चुकली ती म्हणजे बेसनाचे तेल लावून गोळे केले नाहीत. गोळवणी करताना जसे पाणी लावून गोळे आमटीत सोडतो तसे रश्श्यात सोडले. वाईट अर्थातच नाही लागलं. चव सुरेखच आली पण भाजी नीटनेटकी दिसत नव्हती. पुढच्या वेळेस गोळे करून घेईन आणि मग घालेन भाजीत.

चपाती बरोबर तर मस्त लागलीच पण दहीभाताबरोबरही मस्त लागली. पाकृकरता धन्यवाद, मै.

नुसत्या गोळ्यांची भाजी छान लागेल का >> भाजीचं माहीत नाही पण चिंच गूळ कांदा (आणि इतर नेहमीचे यशस्वी प्रकार - मोहरी-हिंगाची
फोडणी, धणे-जीरे पावडर, हळद, तीखट, मीठ) घालून आमटी करून त्यात असे ( ओवा वगळून) बेसनाचे गोळे घालतो आम्ही. त्याला गोळवणी म्हणतो.

हायला मामी, तू २०१२ मधे पहिल्या पानावर लिहिले होतेस मी करणार आहे म्हणून अन शेवटी ८ वर्षांनी मुहूर्त काढलास होय?! Happy

Pages