सुटीसाठी ८-१० दिवस जाऊन परत घरी आले आणि दार उघडून आत प्रवेश केला तर भरपूर ठिकाणी मुंग्याच्या रांगाच रांगा दिसत होत्या, दाराच्या , खिडक्यांच्या फटींतून त्यांची लगबग आणि मुख्य म्हणजे शिस्त पाहून मला गंमत तर वाटलीच आणि कुतुहलही दाटले की एक एवढासा छोटासा जीव पण अन्नाचा इतकुसा कण मिळवायला किती आटाटी करतो, किती परिश्रम घेतो आणि किती कौशल्याने सारी कामे करतो. तसे मनात आले की मुंग्याच्या ह्या वागण्यात काही तरी अर्थ, सूत्रबध्द संचालन नक्कीच असले पाहिजे. आपण ह्याचा शोध काढला पाहिजे. एकीकडे वाटत होते की Internet लावून शोध घ्यावा आणि दुसरीकडे वाटत होते की काय कटकट ? आता सारी साफसफाई करायला हवी पहिल्यांदा. द्विधा अवस्थेत मनाची कोंडी चालू होती. पण भुकेने पोटात कावळे कोकलत होते त्यामुळे तूर्तास तरी पोटापाण्याची सोय करणे हेच आद्य कर्तव्य होते आणि जे अत्यंत निकडीचे होते. आता मात्र त्या मुंग्याच्या रांगाना पळवून लावणे आणि किचन , किचन मधील ओटा साफ करणे हेच माझे उद्दीष्ट होते . म्हटले आधी स्वत:च्या पोटात पाडू आणि मग त्या मुंग्या कशा स्वत:चे पोट भरतात ह्याकडे वळू.
अन्न पोटात गेले आणि मग बुध्दीची भूक जागी झाली , म्हटले चला एकदा शोध घेण्याचा प्रयत्न तर करू या आणि हाती खूपच छान माहिती मिळाली असे मला वाटते.
Swarm Inteligence हा शब्द जास्त परिचयाचा नसावा असे मला वाटते. आता ह्या Swarm Inteligence चा आणि मुंग्याचा काय संबंध असे तुम्हाला वाटले असेल ना, पण थोडे थांबा . आपण त्याचा अर्थ आणि संबंध दोन्ही जाणून घेऊ या.
Swarm म्हणजे प्राण्यांचा ,पक्ष्यांचा, माणसांचा असा समूह जो एका ध्येयाने प्रेरीत होऊन किंवा एका विशीष्ट कामासाठी एका जागेहून दुसर्या जागी प्रवास करत असतो, वाटचाल वा हालचाल करत असतो असा सामान्यत: अर्थ लावला जातो.
Inteligence म्हणजे बुध्दीमत्ता.
त्यामुळे Swarm Inteligence म्हणजे सामूहिक बुध्दीमत्ता. ह्यालाच " झुंड गुप्तचर" असेही म्हटले जाते असे वाचनात आले.
आपण खूपदा पाहतो की काही काही प्राणी , पक्षी हे एकेकट्याने प्रवास करीत नाही तर ते कायं कळपात , समूहात राहतात. सकाळी वा संध्याकाळी,सांजवेळी आकाशात पक्ष्यांचे थवे एकत्र उडताना दिसतात, मुंग्याच्या रांगा प्रवास करताना दिसतात , मधमाश्यांचा थवा एकत्र उडताना दिसतो. ह्या समूह वा संघ वा कळप वृतीचा अभ्यास करताना शास्त्रज्ञांना असे आढळून आले की मुंगी किंवा मधमाशी हे प्राणी एकटे असताना , वैयक्तिक पणे बुध्दीमान नसेल कदाचित पण तीच मुंगी वा मधमाशे जेव्हा तिच्या समूहात वा संघात इतर सर्वांबरोबर असते तेव्हा अत्यंत बुध्दीमान बनून वागते. ह्या त्यांच्या सामूहिक बुध्दीमान वागण्याला त्यांच्या एकत्रित, सांघिक पध्द्तीने वागून बुध्दी गाजवण्याला वा कौशल्याला Swarm Inteligence म्हणजेच सामूहिक बुध्दीमत्ता असे म्हणतात असे जाणवते.
मुंगीसारख्या प्राण्याच्या सामूहिक बुद्धिमत्तेबाबत (swarm intelligence) संशोधन झाले आहे आणि होत आहे व या संशोधनात थक्क करणारी माहिती मिळत आहे. सामूहिक बुद्धिमत्तेने अशक्य वाटणारी कार्ये लीलया करता येतात, हा मुद्दा मुंग्याच्या सामूहिक बुद्धिमत्तेच्या अभ्यासातून स्पष्ट होतो. मुंग्यांची वसाहत, त्यामागील त्यांची कल्पकता, त्यांचे अन्न गोळा करणे, इतर शत्रूंपासून संरक्षण करणे, शेती आणि पशुपालन करणे याबाबतच्या संशोधनातून माणसाला अशक्यप्राय वाटणार्या गोष्टींना समाधानकारक उत्तर वा उपाय योजना सापडू लागल्या आहेत.
हा swarm intelligence चा शास्त्रज्ञांनी केलेला सखोल अभ्यास - माणसासारख्या बुध्दीजीवीलाही अत्यंत कठीण, जटील स्वरूपाच्या वाटणार्या कार्यप्रणालींना सहज सोपे करणे जेथे अशक्य वाटत होते ते सहज रीत्या , अत्यंत कुशलतेने सहज रीत्या सोपे करून हाताळण्याचा नवीन दृष्टीकोन पुरवित आहे असे सिध्द होत आहे.
आपण दिवसेंदिवस वाढत चालेल्या भरमसाट लोकसंख्येने नवनवीन संकटांना तोंड देत असतो. वाढत्या लोकसंख्येबरोबर त्यांच्या वाहनांची गर्दीही वाढत आहे. मग ह्या वाढ्त्या वाहन गर्दीने सतत रस्त्यांवर Traffic -jamm चे प्रमाण ही वाढतेच आहे. रस्त्यावरील वाहनांची कोंडी
ही आता आपल्याला नित्य परीचयाची बाब झाली आहे , ज्यात आपल्या अमूल्य वेळेचा अनाठायी भरमसाट खर्चच होतो असे वाटते. त्यात ट्रक -टेम्पो सारखी अवजड सामानाची वाहतूक करणारी मोठी वाहने तर रस्त्यांवर आणखीच गर्दीचा भार वाढवितात. अशा वेळी TrucK Routing साठी म्हणजेच ट्रक वाहतूकीच्या नियंत्रणासाठी ह्या swarm intelligence चा अत्यंत कौशल्यपूर्ण रीतीने वापर करता येतो आणि वाहतूकीच्या कोंडीवर समाधानकारक उपाय योजना हाती लाभून व्यापाराची भरभराट ही होऊ शकते असे आढळले आहे.
एवढेच नव्हे तर Military Robots मध्येही ह्या प्रगत तंत्राचा वापर करता येऊ शकतो असे अभ्यासूकांचे मत आहे.
स्टेनफोर्ड युनिव्हर्सिटीचा ( Stanford University) एम. जोर्डन नावाचा एक जीवशास्त्रज्ञ ( M. Gordon ,Biologist) म्हणतो की मुंग्या ह्या एक एकटया ह्या लहान हुषार इंजिनीअर, आर्किटेक्ट किंवा लढवय़्य़ा योध्दा नसतील ही कदाचित, जेव्हा एखाद्या गोष्टीनंतर आता पुढे काय करायचे हा प्रश्न असतो , तेव्हा असे दिसते की बहुतांशी मुंग्याना वैयक्तिकपणे त्याचे उत्तर माहीत नसते. पण एका लहानशा मुंगीचे कोणतेही काम पूर्ण करायचे प्रयास मात्र पाहणार्याला थक्क करून सोडतात इतके ते APT असतात. त्याला दुसरा पर्याय असूच शकत नाही.
ह्यावरून मला श्रीसाईसच्चरीतातील अध्याय २७ मधील एक ओवी आठवली -
लंपट गुळाचिये गोडी । सांडी न मुंगी तुटतां मुंडी । तैसी द्या साईचरणीं दडी । कृपापरवडी रक्षील तो ॥१७१॥
भक्ताचे वा शिष्याचे आपल्या सदगुरुंशी नाते कसे असावे तर साईसचरित्रविरचिते लेखक हेमाडपंत म्हणतात ह्या मुंगीसारखे. गुळाचा एक कण नेण्यासाठी ती मुंगी अपार कष्ट घेत असते. अगदी पेलेवत नसेल तरी तो कण , भार वाहून नेत असते, मग भले माझी मुंडी तुटो ह भाव तिचा असतो. त्याच अनन्य भावाने भकताने सदगुरु साईनाथांच्या चरणांना घट्ट मिठी मारून कवटाळले तर तो कृपासागर , कृपासिंधू , दयेचा सागर साईनाथ परवडी , जराही वेळ न दवडता रक्षण करतोच करतो.
म्हणूनच अध्यात्म मार्गात मुंगीच्या ह्या अथक , अपार प्रयासांना ओळखून भक्तीच्या वाटेवरच्या प्रवासाला पिप्पलिका पंथ असे ही म्हणतात.
पिप्पलिका म्हणजेच ही इवलुशी मुंगी बरे का ... म्हणून तो भक्ती करणारा भक्त असतो पिपलिका पांथस्थ - प्रवासी -- हळू हळू टप्याटप्याने मार्गक्रमणा करणारा , संसार आणि परमार्थाची सांगड घालून चालणारा वारकरी जो आपल्या भक्तीच्या ताकदीवर प्रारब्धावर वार करतो, जराही न डगमगता, निर्भयपणे - एकमेव "त्या " सदगुरुला , "त्या " परमात्म्याला, "त्या" भगवंताला शरण जाऊन -
अगदी संत मुक्ताबाईंना ही ह्या मुंगीच्या अपार सामर्थ्याने मोहविले आणि त्यांच्या कूट प्रकारातील अभंगात त्याचे पडसाद उमटले - 'संन्याशाची मुले' म्हणून हेटाळणी झाल्याने रागावून, ज्ञानदेव स्वत:ला झोपडीत कोंडून घेतात. त्यांची समजूत घालताना सहजस्फूर्तपणे, लडिवाळपणे मुक्ताईने काव्यातून जे सांगितले, 'चणे खावे लोखंडाचे । तेव्हा ब्रह्मापदी नाचे।' किंवा 'मुंगी उडाली आकाशी। तिने गिळीले सूर्याशी।' हे विलक्षण विचार मुक्ताईचेच.
मुंग्यांची आणि माणसांची तुलना केली तर असं दिसून येतं, की मुंग्या या माणसांच्या तुलनेत कुठेच कमी पडत नाहीत. मुंग्या माणसांप्रमाणेच वास्तू बांधतात, पूल आणि बोगदेही. त्या महानगरं वसवतात. त्यांच्या वारुळात वातानुकूलनाची व्यवस्था असते. त्यांच्यात प्रत्येक कामासाठी वेगवेगळ्या मुंग्या असतात; ज्या अन्न शोधण्याचं, संरक्षण करण्याचं, साफसफाईचं आणि अशीच अन्य कामं करतात. त्या शेती करतात आणि गोपालनही करतात. त्यांच्या संरक्षण पद्धतींचा आज अमेरिकेतही उपयोग केला जात आहे. या मुंग्या युद्ध करतात, गुलाम बनवतात, त्यांच्यापाशी रासायनिक शस्त्रे असतात, इतकेच नाही तर काही मुंग्या आत्मघातकी बॉम्बप्रमाणे वागतात.
मुंग्यांची व्यवस्थापकीय कौशल्ये जगभरात वापरली जात आहेत. मुंग्यांचा हा सर्व अपार कष्टमय असा जीवनप्रवास अक्षरश: मती गुंग करणारा आहे. मुंग्याची ही अद्भुत दुनिया जगापुढे आणण्यात ज्या शास्त्रज्ञांचा मोलाचा वाटा आहे, त्यापैकी वाचनात आलेले काही -
पिअरी हुबेर, चार्ल्स डार्विन, एडवर्ड विल्सन, बर्ट हॉलडॉब्लर हे होत. यांच्या अथक संशोधनामुळे मुंग्यांची खरी ओळख आपल्याला होऊ शकली आहे.
विल्सन हे मुंग्यांच्या समूहाला एक स्वीस घड्याळ म्हणतात. एकदम नियमबद्ध आणि सुंदर. मुंग्यांची कार्यशैली पाहिली की त्याची खात्री पटते. मुंग्यांचं महत्त्व वाढवणारी आणखी एक गोष्ट म्हणजे, त्यांनी त्यांच्या जगण्यात वापरलेलं तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन.
तर मार्क डोरिगो या संशोधकाने अॅन्ट कॉलनी ऑप्टिमायझेशन नावाचा संगणक प्रोग्राम तयार करून अनेक कंपन्यांना त्यांचे रोजचे व्यवहार सुलभ व सुयोग्य रीतीने होण्यास मदत केली. मुंग्या ज्या पद्धतीने अन्न शोधतात आणि त्याची वाहतूक करतात, ती अत्यंत विकसित आणि सुलभ पद्धत आहे. त्याचाच आधार घेऊन हा प्रोग्राम तयार करण्यात आला आहे, जो विविध उद्योगधंद्यांमधील कंपन्यांना त्यांच्या मालाची वाहतूक योग्य पद्धतीने करण्यास मदत करतो व त्यातून वेळ, पैसा आणि श्रमाचीही बचत करतो. मुंग्या या व्यवस्थापनातही माहीर असतात.
इरिक बोनाबिऊने म्हटलं आहे की, मुंग्यांचा समूह एखाद्या मानवी मेंदूसारखाच सक्षम असतो. लवचिकता, कार्यक्षमता आणि स्वयंसंघटन या तीन गोष्टींच्या बळावर मुंग्यांचं जग काम करतं. अनेक कंपन्या आता या गोष्टींचा त्यांच्या दैनंदिन व्यवस्थापनात उपयोग करत आहेत.
सामूहिक रीत्या मुंग्याचा तांडा वा ताफा वाटेत आलेल्या संकटांनी न डगमगता एकत्रित्पणे, सुसंघटीत होऊन कसा काम करतो ह्या बद्दलचा
एक अत्यंत सुंदर व्हिडीओ You Tube Channel वर पाहण्यास मिळाला , त्याची खाली Link देत आहे , तो जरूर पहावा -
https://www.youtube.com/watch?v=A042J0IDQK4
आपतींना न घाबरता , उत्तम पणे कसे व्यवस्थापन करून तोंड द्यायचे ह्याचा जणू एक आदर्शच ह्या मुंग्याचा समूह आपल्याला शिकवीत आहे असेच वाटते.
मुंगीची महती ही अशी आहे. पूर्वीपासून धार्मिक आणि तात्त्विक ग्रंथातही मुंगीचा उल्लेख यामुळेच झालेला दिसतो. बायबलमध्ये सांगितलंच आहे की, मुंगीकडे जा. तिच्या कामाच्या पद्धतीचा अभ्यास करा अन् शहाणे व्हा असे मला माझ्या ख्रिश्चन मैत्रिणीने सांगितले.
आपल्याला अनेक ठिकाणी धर्मग्रंथातही मुंगीचे उल्लेख आढळतात. मानवी जीवनावर प्राचीन काळापासून मुंग्यांनी जो प्रभाव टाकला आहे, त्याला आता प्रत्यक्ष मान्यता मिळत आहे. जीवशास्त्र, तंत्रज्ञान, व्यवस्थापन, रोबोटिक्स, बँकिंग, तत्त्वज्ञान, संरक्षण, दळणवळण, सामाजिक रचना या व अन्य बाबतीत मुंग्यांपासून माणसाला शिकण्यासारख्या ब-याच गोष्टी आहेत.
पुढील भागात अधिक मनोरंजक आणि कुतुहल चाळवणारी माहिती पाहू या....
संदर्भ:
१. http://ngm.nationalgeographic.com/2007/07/swarms/miller-text
२. https://www.youtube.com/watch?v=A042J0IDQK4
छान लेख छान
छान लेख छान माहिती.
पक्ष्यांमध्ये हुशार कावळा आणि किटकांमध्ये मुंग्या.
फक्त कावळ्यामध्ये Solo Inteligence असावा आणि मुंग्यांमध्ये आपण म्हणता तसा Swarm Inteligence
पण मुंग्यांची शिस्तबद्धता खरेच वाखानण्याजोगी असते. आणि त्याचे लहानपणापासूनच आकर्षण.
लहानपणी एक क्रूर खेळ खेळायचो मी,
मुंग्यांच्या रांगेत मध्येच पाण्याची नदी करायचो, भिंतीवर असेल तर वरून खाली ओघळ सोडायचो. मग त्या मुंग्या बरोबर नवा रस्ता बनवून कश्या जातात हे बघायचो.
त्यानंतर क्रूरपणा वाढवत त्यातील एक दोन मुंग्या मारायचो, आणि त्यांची डेडबॉडी तिथेच ठेवायचो. मग त्या मुंग्यांना संकटाची चाहूल लागत त्या कश्या एकेकाला कळवत त्या मार्गावरची रहदारी पुर्णपणे थांबवून टाकतात हे बघायचो.
अर्थात हे प्रयोग लाल मुंग्यांवर चालायचे, कारण काळ्या मुंग्या देवबाप्पाच्या
लेख खूपच सुरेख आहे! पुढचे भाग
लेख खूपच सुरेख आहे! पुढचे भाग लवकर टाका.
अपराजिता, सुरेख लेख!
अपराजिता, सुरेख लेख!
खूप सुंदर माहिती.....
खूप सुंदर माहिती.....
मुंग्यांची संरक्षणप्रणाली इतकी प्रभावी आहे की मानवालाही संरक्षणनीती ठरवायला त्यापासून प्रेरणा मिळत आहे. हॉलडॉबलर या प्रसिद्ध मुंगीशास्त्रज्ञाने एकोणीसशे ऐंशीच्या दशकात 'मुंग्यांच्या समाजातील भौगोलिक नीती' हा संशोधनविषयक निबंध लिहिला. या निबंधात मुंग्या आपल्या वसाहतीचे साम्राज्य असे वाढवितात याविषयीचा अभ्यास त्यांनी मांडला होता. अन काय आश्चर्य ? काही दिवसातच अमेरिकेतील सर्वात महत्वपूर्ण संरक्षणविषयक संस्था 'पेंटॅगॉन' आणि हॉर्वर्ड विद्यापीठातील 'केनेडी स्कूल ऑफ गव्हर्मेंट' या दोन संस्थांनी या निबंधाच्या प्रती मागविल्या. हॉलडॉबलरना
आश्चर्य वाटले अन त्यांनी याची विचारणा केली. तेव्हा - उत्तर मिळाले - मुंग्यांची भौगोलिक सामरिकनीती उत्क्रांतीतून कशी विकसित झालीये हे पहायला आम्हाला रस आहे. याचा अभ्यास निश्चितच मानवी संरक्षणविषयक नीती बनवायला होऊ शकतो.' (लेखक - प्रदीपकुमार माने - निसर्गायन - पुणे, ऑक्टो. २०११, ९४२२३०४०६८, nisargayanmagazine@gmail.com )
सुंदर माहिती! धन्यवाद
सुंदर माहिती! धन्यवाद
खूप सुंदर माहिती! उत्सुकतेने
खूप सुंदर माहिती! उत्सुकतेने वाट बघतेय पुढच्या भागाची...
अपराजिता, रंजक आणि
अपराजिता,
रंजक आणि माहितीपूर्ण लेखाबद्दल आभार. मला वाटतं की आपल्या शरीरातली प्रतिकारयंत्रणा (श्वेतपेशी) यादेखील मुंग्यांच्या धर्तीवर कार्य करत असाव्यात. विकेंद्रित बुद्धिमत्ता (decentralised intelligence) हा संशोधनाचा एक अतिशय गरमागरम विषय आहे.
आ.न.,
-गा.पै.
अद्भूत आणि नवीन माहिती
अद्भूत आणि नवीन माहिती मिळाली.... नक्की यावर अधिक वाचले पाहिजे. धन्यवाद.
वरवर वाचला . निवांत वाचेन
वरवर वाचला . निवांत वाचेन नंतर . आवडला .
ऋ ,सेम पिंच .
मुंग्यांची बुद्धिमत्ता तपासायला अशा अनेक गोश्टी केल्या आहेत
अस ऐकलेल की , मुंग्या त्यान्च्या मागे एक गंध की द्रव सोडतात . मग ओल्या फडक्याने मध्येच पुसून घ्यायचे . आणि निरिक्शन करायचे की मागून येणार्या मुंग्या काय करतात . कसा माग काढतात.
काय सुंदर लेख वाचायला
काय सुंदर लेख वाचायला मिळालाय
सहिये !!
नेहमीचाच त्रास देणारा जीव, पण त्यांचा जिवन प्रवास थक्क करून सोडणारा आहे.
घरात थोडे काही सांडू देत ५ मिनीटा पेक्षा कमी वेळ लागतो मुंग्या जमायला
छान लिहीलंय, there are many
छान लिहीलंय, there are many interesting videos no you tube on this topic.
धन्यवाद सर्वांना.. पुरंदरे
धन्यवाद सर्वांना..
पुरंदरे शशांक आपण सांगितलेले प्रदीपकुमार माने ह्यांचे पुस्तक मी ही वाचले आहे. त्याचा संदर्भ पुढच्या भागात दिला आहे. माने ह्यांनी खूप सूक्ष्म अभ्यासाद्वारे अत्यंत रोचक माहिती दिली आहे.
मानेंचे पुस्तक मला उपलब्ध नसल्याचे कळवले होते , म्हणून e-book घेऊन मी वाचले .
जर ह्या पुस्तकाची प्रिंटआवृत्ती उपलब्ध असल्यास कृपया मला कळवाल का?
संग्रही ठेवण्यास अत्यंत सुंदर पुस्तक आहे,
दिनेश आपले म्हणणे मला मान्य आहे की यू ट्यूबच्वर खूप छान व्हिडीओ उपलब्ध आहेत.
अजून काही लिन्क द्यायच्या होत्या आणि चित्रे ही अपलोड करायची होती पण जमले नाही.
पुनश्च एकवार आभार , आपण सर्वांनी लेख वाचून प्रतिक्रिया दिल्याबद्द्ल.
अतिशय रंजक आणि महत्वपूर्ण
अतिशय रंजक आणि महत्वपूर्ण माहिती.
प्रदीपकुमार माने यांचे इ-बुक कुठे मिळेल?
माहितीपूर्ण पण तरी ही रंजक.
माहितीपूर्ण पण तरी ही रंजक. कुठेही कंटाळवाणा , बोजड झालेला नाही.
)))मुंग्यांची आणि माणसांची
)))मुंग्यांची आणि माणसांची तुलना केली तर असं दिसून येतं, की मुंग्या या माणसांच्या तुलनेत कुठेच कमी पडत नाहीत. ))--??
एक ढोंगीपणा सोडून.
छान माहिती जमवली आहे.
लेख अतिशय छान झालाय त्यात
लेख अतिशय छान झालाय त्यात दिलेले अध्यात्माचे दाखले आवडले. तसं बघायला गेलं तर त्या इवल्याशा मुंगीला हे जग त्यातले प्राणी ,पक्षी ,माणसे त्यांच्या हालचाली किती महाप्रचंड वाटत असतील तरीही त्या न घाबरता दुर्लक्ष करून शक्यतो शिस्तीत ध्येयाकडे चालतच रहातात एकदम विचलीत न होता..मुंग्यांच्या सांघिक बु द्धीकौशल्याला ,अचाट कार्यप्रणालीला सलाम.
अध्यात्मात आणखी एक
अध्यात्मात आणखी एक ....
लहानपण दे गा देवा .
मुंगी साखरेचा रवा.
अॅण्ट मॅन सिनेमा बघा.
अॅण्ट मॅन सिनेमा बघा. मुंग्यांची ता़कद काय प्रचंड असते, त्या काय करू शकतात ते कळेल.
मस्त आहे हे लेखन! गा मा
मस्त आहे हे लेखन!
गा मा बरोबर पेशी पण असेच कार्य करतात. आणि विषाणू ही हीच बुद्धीमत्ता वापरतात.
निसर्गात अनेक प्राणि अशी योजना करून जगतात. वटवाघळे अशी असे काम करतात तसेच इतर पक्षीपण. मला वाटते जेव्हा इतिहासात मानवाने नाश करण्या आधी पशूंचे कळप स्वार्म इंटेलिजन्स वापरत. पण आता कळपच उरलेच नाहीत त्यामुळे ते बहुदा आपल्याला दिसण्याचा संभव नाही.
मस्त लेख . Swarm Intelligence
मस्त लेख . Swarm Intelligence बद्दल मायकेल क्रायटेन च्या 'प्रे' या पुस्तकात वाचले होते.
आपण सर्वांनी लेख वाचून
आपण सर्वांनी लेख वाचून प्रतिक्रिया दिल्याबद्द्ल सर्वांचे आभार.
प्रदीपकुमार माने ह्यांचे e-book मला खालील लिंकवर मिळाले. पद्मगंधा प्रकाशनाने ते उपलब्ध करून दिले आहे.
www.bookganga.com/ebooks
खूप सुंदर अभ्यासपूर्ण पुसतक आहे. जमल्यास प्रत्येकाने जरूर वाचावे असे पुस्तक आहे असे मला वाट्ते.