काहीतरी कारणाने वीकेंड ला जोडुन एका दिवसाची सुट्टी मिळाली होती. तसा थोडाफार ऑफ सीज़न असल्यामुळे विमानांची तिकिटे अगदी डर्ट चीप म्हणतात तशा दरात उपलब्ध होती. मग मॅड्रिडला जायचं का बार्सेलोनाला अशी तूफानी चर्चा घरात सुरू झाली. खरंतर आम्हाला काय दोन्ही बघितले नसल्यामुळे तसा काहीच फरक पडत नव्हता. शेवटी आम्ही हेड्स का टेल्स असा अत्यंत डोकेबाज उपाय वापरून निर्णय घेऊन टाकला. तिकिटे, होटेल बुकिंग वग़ैरे करुन शुक्रवारी रात्री उशिरा मॅड्रिड मधे येउन पोहचलो सुद्धा.
मॅड्रिड चा खरं म्हणजे स्थानिक लोकं माद्रिद असा उच्चार करतात. या शहरात हिंडतांना सर्वात प्रथम आपल्या डोळ्यात भरते ती येथील भव्यता. इथले रस्ते अतिशय प्रशस्त आहेत. रस्त्याच्या कडेला फूटपाथ पण अगदी ऐसपैस. सायकलिंगसाठी वेगळा मार्ग. लोकांना बसायला बेंचेस. त्यामुळे एखाद्या रस्त्याच्या कडेला तिथे बाकावर बसून कॉफी पीत त्या गर्दी, ट्रॅफिक चा जराही त्रास न होता आजूबाजूच्या ऊत्साही, आनंदी वातावरणाची मजा घेता येते.
भलेमोठे चौक....त्या चौकात भव्य देखणे पुतळे, कारंजे. आजूबाजूला इमारती तर नजर हटुच नये अशा. एखाद्या इमारती-कडे नजर जावी आणि तिचं रूप, तोरा बघून वाटावं की आत एखादं म्यूज़ीयम तरी असावं नाहीतरी एखादं महत्वाचं ठिकाण असावं. तर ही इमारत निघावी एखादे अपार्टमेंट. म्हणजे साध्या, टूरिस्ट मॅप वर नसलेल्या इमारती पण अतिदेखण्या.
या शहरात आणि पॅरिस मधे मला विलक्षण साम्य जाणवलं. तशीच थक्क करून सोडणारी सुंदरता. दोन्ही ठिकाणी उत्तम स्थापत्यशास्त्राचा नमूना असलेल्या इमारती. तसेच अतिभव्य राजवाडे. उत्तमोत्तम संग्रहालये, एकापेक्षा एक सुरेख उद्याने, कारंजी, कमानी, विस्तीर्ण प्लाझा, जागोजागी असलेले कॅफेस, बार्स, शॉपिंग.....आणि वेड लागेल असे रंगीबेरंगी सळसळतं वातवरण.
एक मात्र आहे ते म्हणजे पॅरिस ला मिळालेली प्रसिध्हि, ग्लॅमर, नाव, प्रतिष्ठा हे सर्व माद्रिद च्या नशिबी नाही. एकाच घरातले दोन भाऊ असावेत नं. दोघेही हुशार, कर्तबगार आणि देखणे. पण एकाला अपार यश-किर्ती मिळावी आणि एकाला जरा उपेक्षा असा हा प्रकार. थोडक्यात जगाच्या लाडक्या पॅरिस चा हा किंचितसा दोडका भाऊ. युरोपमधील एक अत्यंत सौंदर्यवान आणि राजबिंडं पण अतिशय अंडर-रेटेड शहर.
जालावरून साभार
जालावरून साभार
सुप्रसिद्ध Plaza Mayor
जालावरून साभार
या शहरात फिरण्यासाठी हॉप ऑन हॉप ऑफ बसेस खूप सोयीच्या पडतात. बसच्या वरच्या खुल्या जागेत बसायला जागा मिळाली की आरामात माद्रिद दर्शन करता येते. कुठे उतरायचे असेल तर उतरा. आजूबाजूला जरा चक्कर मारा, फोटो काढा. कुठल्यातरी छानशा जागी बसून टॅॅपा खा, सन्ग्रिया प्या. टापा आणि सॅंग्रिया हे क्लॅसिक कॉंबिनेशन. थंडगार सॅंग्रिया चा तो चटकदार रंगाचा भलमोठा जार नुसता बघुनच जिवाला गारेगार वाटेल.
जालावरून साभार
चुर्रोस हा सुद्धा खास स्पॅनिश पदार्थ. थोडाफार आपल्या चीरोट्या सारखा. आपल्यासमोर हे खुसखुशीत गोडसर चुर्रोस गरम गरम येतात. त्यांना चॉकलेट सॉस मधे बुडवून गपागप खा.
माद्रिदमधे फिरण्यांच्या महत्वाच्या जागांपैकी एक आहे Temple Of Debod. एकोणिसशे साठ मधे Egypt मधे आस्वान धरण बांधले जात होते. हजारो मंदिरे- देशाचा संस्कृतिक ठेवा पाण्याखाली जाण्याचा धोका होता. अशावेळी युनेसको ने जगाला मदतीची हाक दिली. जगातील स्पेन सकट अनेक देश पुढे सरसावले. या पाण्याखाली जाणार्या असंख्य प्राचीन देवालयांना, मुर्तींना, वस्तूंना तेथून हलवून सुरक्षित ठिकाणी त्यांचे पुनर्वसन करण्यात आले. या मदतीसाठी आभाराचे प्रतीक म्हणून इजीप्त सरकारने हे टेंपल ऑफ डेबोद स्पेनला भेट दिले. आज हे देऊळ माद्रिदच्या parque del oeste या सुंदर उद्यानात उभे आहे.
जालावरून साभार
इसिस नावाच्या देवतेचे हे मंदिर साधारणपणे दोन अडीच हजार वर्षे जुने आहे. एका लहानशा जलाशयाला लागून याची उभारणी झाली आहे. मुख्य मंदिराच्या समोर दोन कमानी आहेत. आत छोट्या छोट्या खोल्या, दालने आहेत. काही ध्यानधारणे साठी, काही पूजार्यांसाठी. सगळे बांधकाम दगडाचे, एकावर एक शिळा ठेवल्यासारखे.
तेथील भितींवर वेगवेगळे देखावे कोरले आहेत त्यावरून त्यांच्या चालीरितींची, पूजा-अर्चेच्या विधींची थोडीफार कल्पना येते. काही चित्रांमधे तर मला आपल्या आणि प्राचीन इजिप्तीयन संस्कृती मधे थक्क होईल इतके साम्य जाणवले. त्यातील मुख्य भाग म्हणजे मूर्तिपूजा. देवळाच्या आत कोरीव खांब. देवाचे दर्शन घेण्यासाठी सभामंडप आणि मुर्तीचा मुख्य गाभारा. येथे फक्त प्रमुख पूजार्यालाच प्रवेश असे. देवाला वेगवेगळी फळे, अन्नपदार्थाचा नैवेद्य दाखविणे. इतकेच नाही तर आपल्यासारखेच देवाला फुले वाहणे, उद्बत्ति, धूपाने ओवळणे इत्यादी प्रकार सुद्धा.
दिवसभर फिरून पार दमायला झालं होतं. पण डोळ्यात झोप काही येत नव्हती कारण रात्री हॉटेलच्या खिडकीतून बाहेर मंद प्रकाशात उजळून निघालेला रॉयल पॅलेस आम्हाला खुणावत होता. उद्या तिथेच जायचे होते......
क्रमश:
मस्त लेख !!
मस्त लेख !!
पण तुम्ही फ़क्त दोनच फोटो
पण तुम्ही फ़क्त दोनच फोटो काढले?
मस्त
मस्त
प्रशू, फोटो खरतर खूप काढले
प्रशू, फोटो खरतर खूप काढले होते. पण ते मुलांनी. मी काढते, काढते म्हणून त्यांनी फोटोंची पार वाट लावली. म्हणून या आणि पुढच्या भागातील बरेचसे फोटो इंटरनेट वरुन च घेतले.
मस्त.
मस्त.
सुंदर फोटो आणि वर्णन !
सुंदर फोटो आणि वर्णन !
सुंदर !
सुंदर !
छान वर्णन...
छान वर्णन...
धनवन्ती, प्रशू, क्रिश्नन्त,
धनवन्ती, प्रशू, क्रिश्नन्त, बी, दिनेश, दादाश्री, limbutimbu खूप खूप धन्यवाद तुमच्या प्रतिसादांबदद्ल.
मस्तय मद्रिद
मस्तय मद्रिद
छान वर्णन मॅड्रिड चा खरं
छान वर्णन
मॅड्रिड चा खरं म्हणजे स्थानिक लोकं माद्रिद असा उच्चार करतात>>> मी स्थानिक नाही पण उच्चार माद्रिद असाच करते.

निलूदा, धन्यवाद तुमचे. मी
निलूदा, धन्यवाद तुमचे.
..धन्यवाद.
मी नताशा-