भाजीपाला
अन्नपूर्णाच्या लेखिका मंगला बर्वे यांच्या कन्या मला नायजेरियाला भेटल्या होत्या. त्या बरीच वर्षे नैरोबीत राहिल्या आहेत. त्यांच्याशी गप्पा मारताना पहिली आठवण निघाली ती नैरोबीच्या सिटी मार्केटची.
नैरोबीमधे राहणार्या बहुतेक भारतीयांची आठवड्यातून एकदा तरी या मार्केटला भेट असतेच. खरं तर ते निव्वळ एक भाजी मार्केट. तरी आम्हा सगळ्यांना त्याची आठवण येत रहावी एवढे ते खास आहे. पहिली बाब म्हणजे तिथे केवळ भाजीपाला मिळतो. हे वाक्य थोडे विचित्र वाटेल खरे, कारण आफ्रिकेत असे बाजार प्रत्येक गावी असतातच. पण तिथे भाजीपाल्याबरोबर मासे, मटणही विकायला असते. मला नाही पण अनेक शाकाहारी लोकांना ते बघणेही असह्य होते. नैरोबीत मात्र अशी सरमिसळ नव्हती. दुसरे म्हणजे तिथल्या भारतीयांना भेटायची ती हक्काची जागा होती. एकमेकांच्या घरी जाणे नेहमीच शक्य व्हायचेच असे नाही पण सिटी मार्केटमधे भेटणे मात्र शक्य असायचे.
मी वर, तिथे केवळ भाजीपाला मिळतो असे लिहिले आहे खरे, पण ते वाक्य तिथे निवडक आणि उत्तम भाजीपाला मिळतो असे पाहिजे. नैरोबीत असताना मला एकदाही फ्रोझन किंवा टिनमधला भाजीपाला खावा
लागला नाही. त्या बाजारात सर्व भाज्या अगदी ताज्या आणि निवडक असायच्या. भाजी घेताना निवडायची
गरज पडू नये अशा रितीने त्या आधीच साफसुफ करुन ठेवलेल्या असायच्या.
आता मी बरीच वर्षे तिथे गेलो नाही पण दादरच्या किर्तीकर मार्केटमधे पायाखाली कुजलेल्या भाजीपाल्याचे ढीग तूडवतच चालावे लागे. तो चपॉक चपॉक आवाज आणि भयानक दर्प आजही माझ्या डोक्यात आहे.
तसे नैरोबीला अजिबात नव्हते.
हे मार्केट पक्क्या बांधणीचेही नाही. अर्ध्या भागात पार्किंगची जागा आणि अर्ध्या भागात कच्च्या आडोश्यामागे
दोन्ही बाजूने भाज्यांचे गाळे असणार्या पाच रांगा असे याचे स्वरुप आहे. बाहेर काही फुटकळ वस्तू विकणारी दुकाने आहेत.
त्यांच्याकडे मातीचे तवे, केरसुण्या, टोपल्या, चिको ( म्हणजे तिथल्या खास शेगड्या ) वगैरे मिळत असे. शिवाय मोगू म्हणजेच भाजलेला कसावा, रताळी, कणसे विकणारा एक होता. चित्रपटांच्या सिडीज विकणारे एक दुकान होते. कधीमधी शहाळी विकणाराही असायचा. भाजी खरेदी झाली कि या लोकांकडे माझी फेरी
असायचीच.
या भाज्या बहुदा नैरोबीच्या आसपासच्या मळ्यातूनच आलेल्या असायच्या. नैरोबीच्या बाहेर पडलो कि रिफ्ट
व्हॅलीत उतरायच्या आधी बरेच भाजीपाल्याचे मळे, रस्त्याच्या दुतर्फा दिसत असतात. बटाटे, कोबी आणि
सुकुमाविकी याचे प्रामुख्याने असले तरी बाकी सर्व भाज्या तिथे होतातच. काकड्या मात्र खास किसुमूहून येत असत तर एल्डोरेट गावाहून मश्रुम्स येत असत. या गावाचे हवामान एवढे खास आहे कि तिथे काही खास
सोयी न करता मश्रुमचे पिक घेता येते.
तिथे बटाट्याचा खप भरपूर आहे हे मी लिहिलेच आहे ( आपल्या बटाट्यांना तिथे आवर्जून आयरीश पोटॅटो म्हणतात. ) पण बाजारात मात्र इतर भाज्यांची रेलचेल असे.
केनयात ऑर्गॅनिक शेती कितपत केली जाते याची कल्पना नाही ( युगांडामधे ती मोठी चळवळ आहे ) पण तिथल्या भाज्या मूळच्याच चवदार असत. साधी गवार घेतली आणि नुसती कांदा मिरचीवर परतली तरी
छान चवदार लागत असे. तिथे मुद्दाम या भाजीला रस ठेवतात आणि तोही चवदार लागतो.
दुसरे म्हणजे तिथे बहुतेक शेंगाचे सोललेले दाणे मिळत. मटार तर असेच त्याशिवाय नक्षीचा राजमा, लाल राजमा, हिरवी चवळी, तिथले वेगळे सोयाबीन ( गोल नव्हे एका वेगळ्या दाण्यांना तिथे सोयाबीन्स म्हणतात.)
आणि तुरीचे दाणे मिळत. एरवी तुरीच्या शेंगा सोलायला कटकटीच्या म्हणून मी कधी त्या शेंगा आणत नाही.
कोवळी फरसबी देखील तिथे शेंडा देठ खुडलेली मिळत असे.
भारतातल्या अनेक राज्यातील लोक नैरोबीत स्थायिक झालेले आहेत. आपल्याकडे त्या त्या राज्यात लोकप्रिय असलेल्या भाज्याही तिथे मिळतात. टिंडा, परवर, कोहळा, सुरती पापडी, कोनफळ, केळीचे सोप असे सगळेच असे. मुंबईतही अभावानेच दिसणारे माईनमूळे तिथे असत. मला चवीपेक्षा निवडायला आवडणार्या भाज्या म्हणजे केळफूल आणि कच्चा फणसही तिथे असे. भारतीयच का, इतर देशांतील लोकांच्या आवडीच्या भाज्याही तिथे असत आणि तेही लोक तिथे आवर्जून खरेदीला येत. ब्रसेल्स स्प्राऊट्स, सेलरी, र्हुबार्ब, ब्रोकोली, पाक चोई, अस्पारॅगस... अशा अनेक भाज्या तिथे ढिगाने असत. खास आफ्रिकन भाज्या विकणारेही एक दुकान होते. त्याच्याकडे नायजेरियन मिरच्याही असत.
बरं या भाज्या महाग असत असेही नाही. मी तर कधी भावही करायचो नाही. काही भारतीय बायका मात्र नेटाने भावासाठि हुज्जत घालत बसायच्या. आणि मग मला तूझ्यापेक्षा कशी स्वस्त आणि चांगली भाजी मिळाली असा एकमेकिंशी वाद घालत बसायच्या. माझ्या गाडीत मित्रांच्या बायका असल्या तर या गप्पा घरी येईस्तो चालायच्या.
या बाजाराशिवाय रस्त्यावर भाज्या विकणारे लोकही असत. हे लोक भल्या पहाटे पाठीवर भाज्यांनी ठासून भरलेली गोणी घेऊन येत असत. अशी गोणी घेऊन जर ते रस्त्यावर दिसले तर नैरोबी सिटी कौन्सिल त्यांच्याकडून दंड वसूल करते त्यामूळे ते एखाद्या ओळखीच्या घरी ती ठेवत आणि थोड्या जुड्या घेऊन दारोदार फिरत.
पालक, मेथी, सुवा अशा भाज्या त्यांच्याकडे खासच मिळत. या भाज्यांना स्वाहीली भाषेतही तिच नावे आहेत.
ते लोक ज्या बायकांच्या घरी गोणी ठेवत त्या त्यांच्याकडून फुकटात भाजी वसूल करून घेत असत.
स्थानिक लोक जास्त करून सुकुमाविकी, कोबी आणि चार्ड खातात. सुकुमाविकी कापायला जरा अवघड असते. तिथला कोबीदेखील आपल्याकडच्या कोबीपेक्षा बराच मोठा आणि जाड पानांचा असतो. या तिन्ही भाज्या अगदी सुतासारख्या बारीक कापलेल्या तिथे रस्त्यावर मिळतात. या भाज्या भरभर कापण्याचे त्यांचे कौशल्य बघण्यासारखे असते. गाजरही असे किसलेले मिळते. या भाज्या आणुन फोडणीला दिल्या कि झाले.
त्याशिवाय फुटपाथवर पथारी पसरून भाज्या विकणारेही असतात. ते भाज्या किलोवर न विकता नगावर विकतात. त्यांच्याकडे अगदी ताजी ताजी कोथिंबीर मिळायची.
नैरोबीच्या सुपीक मातीत भाज्या सहज रुजतात. स्थानिक माणसाचे घर असेल तर घराच्या अंगणात सुकुमाविकी असतेच. भारतीय बायका कढीपत्ता, पात्रासाठी अळू वगैरे लावतात. कुंपणाच्या भिंतीवर
दुधी, घोसाळे, चिवचिव वांगे यांचे वेलही दिसतात.
आपल्या भाज्या तिथे रुजवून त्या उपलब्ध करुन देण्यात तिथल्या भारतीयांचा वाटा मोठा आहे हे विसरून
चालणार नाही. मायबोलीवरची माझी " अवघी विठाई माझी" हि मालिका माझ्या तिथल्या वास्तव्यामूळेच शक्य झाली.
फळफळावळ
भाज्यांप्रमाणेच नैरोबीत फळांचीही रेलचेल असते. सध्याच्या काळात वाहुतुकीच्या सोयी वाढल्याने, जगात जिथे सफरचंदाचे व संत्राचे पिक असेल तिथली फळे जगभर उपलब्ध असतात. तशी ती नैरोबीतही असतात.
पण त्या शिवाय खास चवीची स्थानिक फळेही भरपूर असतात.
तिथे स्वीट बनाना किंवा फिंगर बनाना अशी केळ्याची एक जात असते. अगदी हाताच्या बोटाएवढ्या आकाराची पिवळ्या सालीची हि केळी चवीला खुप गोड असतात. एकावेळी सहज आठदहा खाता येतात. त्याशिवाय स्थानिक लोकांचे आवडते मटोके म्हणजेच राजाळी केळेही असते. पण ते कच्चे खाता येत नाही.
ते भाजून वा उकडून खावे लागते. त्याच्या चिप्सही मिळतात.
पॅशन फ्रुटची चव मी पहिल्यांदा घेतली ती केनयातच. तिथे दोन प्रकारची पॅशन फ्रुटस मिळतात. एक असते किरमीजी सालीचे. आत केशरी गरात काळ्या बिया असतात. दुसरे असते केशरी सालीचे आणि आत पांढर्या
गरात काळ्या बिया असणारे. किरमीजी सालीचे स्वादासाठी उत्तम. याला आंबा, अननस आणि मोसंबी यांचा
एकत्र स्वाद असतो. पण ते चवीला खुपच आंबट असते. गोड पदार्थांवर त्याचा गर घालून खाता येतो. किंवा
भरपूर साखर घालून सरबत करता येते. हे फळ कधीही खराब होत नाही. साल सुकली आणि आतला गरही
सुकला तरी तो खाद्य असतो. सरबत करताना बिया वेगळ्या काढायची गरज नसते. तो गर तसाच मिक्सरमधे फिरवला तरी चालतो. बिया खाद्य असतात. केशरी सालीचे असते ते मूळातच गोडसर चवीचे असते. त्यातला गर तसाच खाता येतो.
केनयाची खासियत म्हणजे प्लम्स. तिथे ते लाल आणि पिवळ्या रंगाचे मिळतात. बहराच्या दिवसात बाजारात ढीगाने असतात. त्याचा जॅमही छान असतो चवीला. केनयातले आंबे लाल सालीचे असतात.
चवीला आपल्याकडच्या पेक्षा थोडे कमी गोड असतात पण स्वाद छान असतो. त्याचाही बहर दोनेक महीने असतो. त्या काळात कोपर्याकोपर्यावर त्यांचे टेंपो उभे असतात. तिथले विक्रेते आंब्याची साल काढून देतात.
मी लहानपणापासून कुठलाही आंबा सालीसकटच खात असल्याने मी असा आंबा सोलून घ्यायला नकार द्यायचो. फळांच्या बाबतीत त्या लोकांची एक खास समजून आहे. कुठलेही फळ ते झाडावर पिकल्याशिवाय तोडत नाहीत आणि धुतल्याशिवाय खात नाहीत. सुपरमार्केट्समधेही फळे धुण्यासाठी खास पाण्याची सोय केलेली असते.
जांभळे, तुती, रासबेरी अशी फळे बाजारात खास द्रोणात मिळतात. ती फळे खाऊन जीभ रंगवून घ्यायला मला
अजूनही ( या वयात ) आवडते. करवंदाची झाडे केनयात आहेत पण ती बाजारात दिसत नाहीत. एका गुजराथी माणसाच्या लिचीच्या बागा आहेत. तिथल्या गुजराथी समाजाच्या शाळेत त्याचे बॉक्सेस मिळत असत.
फणसाचे गरेही असेच बाजारात द्रोणात मिळत असत. स्थानिक नासपती पण मोसमात भरपूर असे. ओबडधोबड आकाराची नासपती चवीला छान असे. पपयाही खास गोड चवीच्या असत.
अननस खास युगांडातून येत. ते अननस आपल्यापेक्षा थोडे वेगळे असत. पांढर्या गराचे असत त्याशिवाय सालही काढणे सोपे असे. गर जरा मऊसर व आपल्याकडच्यापेक्षा जास्त रसाळ आणि गोड असे.
अवाकाडोची झाडेही तिथे भरपूर आहेत आणि तेही जवळजवळ वर्षभर उपलब्ध असत. स्थानिक लोक ते भाताबरोबर किंवा पावासोबत खातात.
सिताफळे पण अशीच भरपूर येत. कधीकधी तर दारावर टोपलीभर सिताफळे १०० शिलिंगना मिळत असत ( ५० भारतीय रुपयांना २५ ते ३० सिताफळे. ) पेरूची झाडे भरपूर होती. त्यांना इतके पेरू लागत कि झाडाखाली
बदाबद पडत असत, त्यांचा गोड वास आवारात येत असे. आवळे पण असत.
माझ्या बघण्यात अंजिराची झाडे होती आणि त्यांना अंजिरे पण लागत असत. पण बाजारात ती क्वचितच दिसली. द्राक्षे मात्र आयात केलेली असत. मोंबासा भागात काजूची झाडे आहेत पण बाजारात फळे ( बोंडे )
नसत. याशिवाय काही स्थानिक फळेही असत. एकतर थेट सफरचंदासारखे असे पण चवीला फारच वेगळे.
संत्राचे अनेक प्रकार दिसत. अनेक फळांची स्थानिक नावे भारतीय नावावरून घेतल्यासारखी आहेत. फणस, जांभळा हि तर आहेतच पण मसिंदा ( संत्रे ) मफेरा ( पेरू ) हि नावे पण ओळखीची वाटतात. चिकूही कधीकधी
बाजारात दिसत. एक प्रकारची पिवळी काटेरी काकडी फळ म्हणून ते खातात.
कलिंगडाच्या दिवसात तर ती एवढी येत कि बाजारात ठेवायला जागा नसे. मग बाहेर उघड्यावर त्यांचे ढीग लागत. चिनी लोकांची तिकडे मग फार गर्दी होत असे.
ही फळे रस्त्यावरच्या फेरीवेल्यांकडे पण मिळत. वाहतुकीत अडकल्यावर या फळांचे आकर्षण मला वाटतच असे.
याशिवाय नैरोबीत एक खास झाड जागोजाग आढळते. याची पाने साधारण चिकूच्या पानासारखीच असतात आणि त्याला पांढर्या फुलांचा गुच्छ येतो. मग त्याला पिवळ्या रंगाची साधारण अंजिराच्या आकाराची फळे धरत. अप्रतिम चवीची ती फळे खाण्यासाठी लहान मुलांची धांदल चाललेली असे. उंचावरची फळे काढून देण्यासाठी मला मस्का मारला जात असे. मी सुद्धा माझा वाटा घेतच असे. ही फळे बाजारात क्वचितच उपलब्ध असत. पण आजूबाजूच्या झाडांच्या फळांवर आमची नजर असेच. त्या फळाचे नाव Loquat ( Eriobotrya japonica ) असे आहे. भारतात फारसे दिसत नाही पण पुण्यात प्रभात रोडवरच्या ९ व्या लेनमधे श्री पांडे यांच्या घराच्या आवारात आहे असे वाचले.
क्रमशः
तुमच्या आवडीचाच विषय आहे
तुमच्या आवडीचाच विषय आहे त्यामुळे हा भाग सगळ्यात मस्त झालाय या मालिकेत![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
किर्तीकर मार्केटबद्दल +१०००
नेहेमी सारखे मस्त. फोटो का
नेहेमी सारखे मस्त.
फोटो का नाहित?
फळफळावळ च्या खालच्या वाक्यात टाइपो आहे
तुमच्या आवडीचाच विषय आहे
तुमच्या आवडीचाच विषय आहे त्यामुळे हा भाग सगळ्यात मस्त झालाय या मालिकेत >>>>> +१००...
फोटु कुठेत - त्यामुळे बरेच काही लक्षात राहील वाचकांच्या ....![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फळफळावळ मस्तचं फोटोपण टाका
फळफळावळ मस्तचं
फोटोपण टाका ना ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
माधवशी अगदी सहमत. मी रंगून
माधवशी अगदी सहमत. मी रंगून गेले वाचताना... पहिला भाग मला जितका कोरडा वाटला तितका हा रसाळ
बाजाराचे, भाज्यांचे, फळांचे नजारे डोळ्यासमोरून सरकत राहिले.
छान लिहिलय.. पण ह्या भागात
छान लिहिलय.. पण ह्या भागात फोटो हवेच होते !
खूप सुंदर आणि ओघवते आहे
खूप सुंदर आणि ओघवते आहे वर्णन. सर्व डोळ्यासमोर उभे राहिले तरीपण फोटो मिस करतेय.
नेट प्रॉब्लेममुळे एकच पोस्ट
नेट प्रॉब्लेममुळे एकच पोस्ट तीनदा आली.
.
.
आभार इब्लिस, फोटोंचे असे
आभार इब्लिस,
फोटोंचे असे झालेय कि मायबोलीवरच मी भरपूर फोटो ऑलरेडी टाकले आहेत. ते शोधून त्या त्या लेखाच्या लिंक्स मालिकेच्या शेवटी देईनच. सध्या ते शोधायला सवड होत नाही.
अजून दोन तीन भाग लिहून झाले कि लागतोच त्या कामाला.
व्वा! भाज्या आणि फळ्फळावळी
व्वा! भाज्या आणि फळ्फळावळी बद्दल डीटेल वाचून मस्त वाट्लं.
खूप सुंदर आणि ओघवते आहे
खूप सुंदर आणि ओघवते आहे वर्णन. सर्व डोळ्यासमोर उभे राहिले तरीपण फोटो मिस करतेय.>>>> +१
चिव चिव वांगं??? हे काय
चिव चिव वांगं??? हे काय असत?
पॅशन फ्रूट( स्पॅनिश शब्द- माराकुइया) , साऊथ अमेरिकेमधे खाल्लं.. त्याचा जूस खूप पॉप्युलर आहे , फळापेक्षा
Choyote किंवा बदानकाई असे पण
Choyote किंवा बदानकाई असे पण म्हणतात त्याला. पोपटी रंगाचे पेरूसारखे फळ असते आणि तेच बी पण असते. थाई जेवणात त्या वेलाचे कोंब असतात.
पोर्तुगीज मधे पण माराकुजा असाच शब्द आहे. अंगोलातले आणखी वेगळे असते.
तो पा सू
तो पा सू
हा भागही मस्तं जमलाय. इतक्या
हा भागही मस्तं जमलाय. इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आणि फळे, बर्याचश्या फळांची नावं पहिल्यांदाच ऐकली. पहिला आणि तिसरा भाग आत्ताच वाचले पण दुसरा भाग कुठे दिसत नाहीये, प्लीज़ सांगता का?
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/47374
पद्मावति हा घ्या दुसरा भाग
पद्मावति, माझ्या लेखनात दुवे
पद्मावति, माझ्या लेखनात दुवे सापडतील.![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
देण्यासारखे फोटो नसल्याने मी हि मालिका अर्धवटच सोडली होती
खूप दिवसांनी मायबोलीवर आलो.
खूप दिवसांनी मायबोलीवर आलो. आणि तुमचच लेख पहिला.
मस्त!
मस्त!
अतिशय ताजा, रसाळ अन चविष्ट
अतिशय ताजा, रसाळ अन चविष्ट लेख...... भाज्या अन पळांसाऱखा अन लेखकासारखा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
निलुदा, तुमचे खूप खूप
निलुदा, तुमचे खूप खूप धन्यवाद, ही लिंक दिल्याबद्दल. आता हा भाग वाचते. इतके छान लेख वाचायचे राहून गेले की वाईट वाटते. थॅंक्स अगेन.
![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
दिनेश, " देण्यासारखे फोटो नसल्याने मी हि मालिका अर्धवटच सोडली होती".......:(
(No subject)