कुणी जाल का.... सांगाल का...!!!

Submitted by भुंगा on 2 July, 2015 - 09:26

सध्या वेगवेगळ्या प्रसंगांवरून माणसाची संवेदनाशीलता कशी कमी होत चाललिये, अपघातचं चित्रण करणारे प्रत्यक्ष मदतीला कसे पुढे येत नाहीत यावर चर्चा सुरू आहे. त्यामानाने कमी त्रासदायक पण तरीही विचार करायला लावणारा अनुभव काही दिवसांपूर्वी आला. आणि असे अनुभव हल्ली सर्रास येऊ लागले आहेत मग ते पूणे असो की मुंबई.

पुण्यात असताना परवा सहकुटुंब "किल्ला" बघायचा ठरलं आणि मंगला थियेटरला आम्ही शो टायमिंगला हजर झालो. थिएटर अर्थातच फूल होतं. चित्रपट सुरू झाल्यावर साधारण २ ते ५ वर्षे वयोगटातली किमान ८ ते १० मुलं मूव्ही पाहायला आलियेत (अर्थात आणलियेत) हे लक्षात यायला फारसा वेळ गेला नाही.

दुर्दैवाने आमच्या मागच्याच रो मधे बसलेल्या कुटुंबात ३ बायका आपापल्या ३ मुलांना (जेमतेम वयवर्ष २ ते ४) मांडीवर घेऊन बसल्या होत्या. चित्रपट सुरू झाला आणि मुलं पण सुरू झाली. Sad

सुरुवातीला त्यांचा एखादा बोबडा बोल ऐकून मागे वळून एक स्माईल देत परिस्थितीचा अंदाज घेतला. पुढे येणार्‍या संकटाची चाहूल त्यावेळी लागली नव्हती.

नंतर चित्रपट आपली पकड घेत गेला आणि मुलं अखंड बडबड करत "वात" आणत राहिली.
आता हे कमी होतं म्हणून पहिल्या रांगेत बसलेली एक चिमुरडी स्क्रीन आणि पहिल्या सीटमध्ये असलेल्या मोकळ्या जागेत रिंगा रिंगा खेळायला सुरूवात झाली. थोड्याच वेळात तिच्याच वयाचा एक मुलगा तिला जॉईन झाला. आणि त्या दोघांचा पकडापकडीचा खेळ सुरू झाला. आई बाप निवांत स्क्रीनकडे पहात बसले होते.

प्रयत्नपूर्वक चित्रपटात लक्ष घातलं तरी प्रचंड डिस्टर्ब होत राहिलं... कानात मागच्या रांगेतून येणारी बोबडी बडबड आणि स्क्रीन्समोर चाललेला रिंगा रिंगा.

मध्यंतरानंतर कोणाचंतरी एक तान्हं बाळ उठलं असावं आणि भोकाड पसरून रडायला लागलं... पण बापाला चित्रपट पहायची खुमखूमी... आणि आपण आपले पैसे देतो इतरांचे नाही सो त्यांचा विचार का करा हा आविर्भाव.
तो त्या भोकाड पसरलेल्या मुलाला घेऊन बाजुला उभा राहून चित्रपट पाहात होता.

हे झालं एक प्रातिनिधिक उदाहरण पण कमी अधिक प्रमाणात हे हल्ली बर्‍याचदा व्हायला लागलय.

मुळात ज्या वयातल्या मुलांना खरंच चित्रपट कळू शकत नाही त्यांना असं घेऊन यावंच का??
घरी ठेवणं शक्य नसेल तर इतरांना त्रास होण्यापेक्षा आपण अश्या पद्धतीने चित्रपट पहाणं टाळणं शहाणपणाचं ठरणार नाही का??
बरं समजा नेलं मुलांना बरोबर तर किमानपक्षी मुलांचा त्रास जाणवायला लागल्यावर त्यांना घेऊन थोडा वेळ बाहेर जाणं संयुक्तिक नाही का??
एक दोनदा मुंबईत असे प्रसंग घडलेत जिथे शेवटी आपल्याला सांगावं लागतं किंवा बाजुचा कोणीतरी सांगतो तेंव्हा उपकार केल्यासारखे हे लोक जीवाच्या रामरामीला बाहेर नेणार मुलांना...!!!

म्हटलं तर फुटकळ गोष्ट आहे पण एखाद्या कलाकृतीचा समरस होऊन आस्वाद घेताना जर अश्या प्रकारचा डिस्टर्बन्स येत राहिला तर मग ते मूल लहान असो की मोठं वैताग येतोच.

यात त्या मुलांची चूक काहीच नाही. ते वयाला साजेसंच वागतायत..... पण पालकांना किमान सामाजिक भान ठेवून हे टाळता यायला हवं. कुणी ह्यांना सांगेल का??? Sad

कुणी जाल का सांगाल का
सुचवाल का त्या पोरीला (पालक)
थियेटरमध्ये आणू नको
रडवू नको तान्ह्या मुला......

कुणी जाल का सांगाल का.... !!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भुंगा , धन्यवाद..
चला कुणीतरी या विषयाला वाचा फोडली .

मला स्वतःला चित्रपत बघताना बाजुला चुळबुळ झालेलीसुद्धा खपत नाही त्यामानाने तुमचा अभुभव बघता तुम्हाला सलाम .. माझी ताई आणि जीजु चित्रपटांची आवड असुनसुद्धा त्यांच कार्टून ३ वर्षाच आहे म्हणून चित्रपटगृहात जाण टाळतात.. वय वर्ष ५ खालील मुल बरेचदा खुप चंचल असतात तेव्हा त्यांना घेऊन इतरांना डिस्टर्ब करणार्‍या पालकांचा खरच खुप राग येतो अशावेळी.. त्यातही एखादा खुप सुंदर प्रसंग चालु असणार आणि त्यांच तान्हुल तारस्वरात भोकाड पसरत आणि हे तिथच त्याला घेऊन अलेअले..बघ तो हिरो..बघ ती हिरोईन करतात तेव्हा तर डोक्यात जातात..निदान त्याला बाहेर घेऊन जायची तसदीसुद्धा घेत नाही..

आणखी एक प्रसंग.. जरा अवांतर पण शेअर करावासा वाटला..

सिनेपोलीस व्हीआयपी ला होम हा अ‍ॅनिमेशनपट पाहायला गेली होती. नेहमीप्रमाणे राष्ट्रगीत सुरु झाल. सर्व लोक उभे राहिलेत शिवाय एक तरुण.. त्यावर मधल्या ४ खाली सिट सोडुन बसलेल्या आणखी एका तरूणाने हातानेच त्याला उभ राहा अशी खुण केली. बसलेल्यानं पद्धतशीर दुर्लक्ष करुन मान वळवली. हे सर्व माझ्या अगदी पुढ्यातल्या रांगेत सुरु.. तो उठ आणि उभा राहा म्हणणारा तरुण पुर्ण वेळ दुसर्‍याला टशन देतोय त्याच्याकडे बघत. गीत संपल्यावर जवळपास तो त्याच्या अंगावर धावुनच गेला आणि रागवायला लागला. खाली बसलेल्याच्या हातात बाळ होत म्हणुन मी उभा राहु शकत नव्हतो हा फोल प्रतिवाद रागवणार्‍यानं उलथवुन लावला.. बाकी सर्व बाचाबाचि इंग्रजीमधल्या डुड वर सुरु होउन शेमलेस वर संपली .. आता सांगा यात चुकी कुणाची ?

माझ्यामते दोघांचीही..
बसणारा तर पुर्णपणे दोषी.. हातात बाळ आहे म्हणून उभ राहु शकत नाही हा त्याचा युक्तीवाद पुर्णपणे फोल आहे..
पण रागावणारा सुद्धा मुर्ख.. समोर सियाचीन ग्लेशीअरच्या कडाक्याच्या थंडीत उभ असलेलं भारतीय सैन्य चेहर्‍यावर देशाप्रती मनभर अभिमान घेऊन राष्ट्रगीतासाठी उभं आणि हा येडा दुसरा का उभा राहत नाहीए हा राग चेहर्‍यावर आणुन पुर्णवेळ कधी समोर कधी बसलेल्याकडे रागाने बघतोय.. तो तर तसाहि उठायला तयार नव्हताच ना ही हा उभा ताबडतोब त्याच्या मुस्काटात हाणू शकत होता..मग समोर सुरु असलेल्या राष्ट्रगीताचा आपण अवमान करत आहो हेही त्या शुंभाला कळू नये म्हणजे काय ? मला तर दुसर्‍याचाच जास्त राग आला त्या़क्षणी.. बिनडोक कुठले Angry

टीना, ताई आणि जिज्ज्जूचं कौतूक... असाच विचार सगळ्यांनी करावा किमान मूल लहान असेपर्यंत.

नाटकाच्यावेळी "कृपया मोबाईल आणि लहान मुले बंद ठेवा" अशी अनाऊंसमेंट सुरुवातीला विचित्र वाटायची. आता तेच योग्य आहे असं वाटतं.... कारण एकवेळ चित्रपटाच्यावेळी इतर प्रेक्षकांना त्रास होतो स्क्रीन सुरूच असते....
पण लाईव्ह नाटकाच्यावेळी कलाकारही प्रचंड डिस्टर्ब होतोच.....!!!

नाटकाच्यावेळी "कृपया मोबाईल आणि लहान मुले बंद ठेवा" अशी अनाऊंसमेंट सुरुवातीला विचित्र वाटायची. आता तेच योग्य आहे असं वाटतं.
<<

लहान मुलांना बंद कसे ठेवायचे? Happy

कलाकृतीचे रसग्रहण वगैरे जाऊदेत हो भुंगा!

आपला दुसर्‍याला त्रास होतो आहे इतकेही न कळू शकणारी जमात सध्या सर्वत्र आहे. किंवा कळूनही न कळल्यासारखे दाखवणारे निगरगट्ट आणि निर्लज्ज!

उलट ह्या लोकांना सांगायला गेले तर आपल्याला दमदाटी वगैरे करतील की काय अशीच भीती वाटते हल्ली!

एकुणातच सार्वजनिक ठिकाणी आनंद मिळवण्याचा प्रयत्न करणे हा हळूहळू वेडेपणा ठरू लागलेला आहे.

सारे जहाँसे अच्छा!

उलट ह्या लोकांना सांगायला गेले तर आपल्याला दमदाटी वगैरे करतील की काय अशीच भीती वाटते हल्ली! >>
00020468.gif अशक्य हसतेय मी यावर .. माझ्या सगळ्या मित्रमैत्रीणींमधे माझी उंची सर्वात कमी ( कमी उंच..काय पण वाक्प्रयोग आहे.. बुटका शब्द मला शिवी वाटतो म्हणुन तो वगळला ) आणि त्यातही सर्वात शीघ्रकोपी मीच.. चिडल्यावर जेव्हा कुणा तिर्‍हाईताला लुक देते तेव्हा माझे मित्र मला नेहमी म्हणतात..निदान भांडण उपटताना समोरच्याचा अंदाज तरी घे माते..एखाददिवस आम्हाला गड्ड्यात घालशील Lol

अवांतराबद्दल क्षमा असावी Happy

असाच अनुभव 'भाग मिल्खा भाग' बघताना आला.. मागे पुढे दोन्ही ओळीत छोटी मुलं .. शाळेत आल्यासारखं वाटत होतं ..
त्यात त्यांचे प्रश्न जेव्हा मिल्खाच्या आईबाबांना मारतात, कत्तल नि रक्त.. रिफ्युजी कँप्मधे बहिणी नि नवर्याचा.. काय उत्तर देणार!!
सिनेमात कै तरी गंभीर प्रसंग तर मागे ह्या पोरांची बडबड गाणी!!
किमान परिक्षण वाचुन तरी ठरवा पोरांना आणायचं का.. आणलं तर शांत बसतील का!

नाटकाच्यावेळी "कृपया मोबाईल आणि लहान मुले बंद ठेवा" अशी अनाऊंसमेंट सुरुवातीला विचित्र वाटायची. आता तेच योग्य आहे असं वाटतं.... >> उसगावातल्या थिएटरमधे होते अनाऊंसमेंट!
तरीही माझ्या रुममेट्ने मोबाईल ऑन केला फक्त नि त्याचा उजेड पडला.. तर मागच्या रांगेतल्या अमेरिकन आंटीने तिला बाहेर जा नाहीतर मोबाईल बंद कर असं सांगितलं.. बंद करावाच लागला!!

भुंगा, अवांतराबद्दल क्षमस्व.

हेडर वाचुन मूळ गाण्याची पार्श्वभुमी आठवली आणि धागा उघडला. ज्या परिस्थितीत कवि अनिलांनी हे गाणं मुकुलजींसाठी लिहिलं त्या मागची भावना आणि या लेखांतील प्रसंग आणि व्यक्त केलेली चीड यामधला विरोधाभास जाणवला, म्हणुन हा पोस्ट्प्रपंच...

हि तक्रार नाहि, निव्वळ मतप्रदर्शन आहे. गैरसमज नसावा. Happy

raaj,

malaa dusarM sheerShak sucalM naahee...

kaaraN agadee hec manaat yetM kee kuNeetaree hyaaMnaa saaMgaa.... (amhi sangatoc paN vyarth)

छान आहे.. म्हणजे वाचा फोडणे अन्याया विरुद्ध...
ते तेव्हंड अ‍ॅडचं (जाहिराती) पण बघा... भयानक त्रास देऊन राहिल्यात.
२००-३०० चं तिकीट काढून हे आम्हांला १०-१५ मि. अ‍ॅड दाखवतात.
सिनेमा सुरु होण्यापूर्वीच डोकं तापू लागतं... मध्यांतरात तर ना आत बसवत ना बाहेर.
आत व्हिको वज्रदंती नि फेअर अ‍ॅण्ड लव्हली..... बाहेर १५० चे पॉपकॉर्न.

बाकी सगळे उद्योजक पुन्हा इथे अ‍ॅक्टीव पाहून मार्केट थंड आहे असं कन्फर्म करावं का? Wink Light 1

कुणी जाल का सांगाल का
सुचवाल का त्या पोरीला
थियेटरमध्ये आणू नको
रडवू नको तान्ह्या मुला......>>
इथे पोरिला एवजी पालक हवे, मुल हे आइ-वडिल दोघान्ची सारखीच जबाबदारी आहे.

तुमच्या भावना समजु शकते, "नियम हे पाळण्यासाठि असतात "हे उमजल कि झाल.

इथे पोरिला एवजी पालक हवे, मुल हे आइ-वडिल दोघान्ची सारखीच जबाबदारी
>>>>

१००% बरोबर... मला चपखल शब्द दुसरा सुचेना.... मला जेंडरवर घसरायचं नव्हतंच.... काही दुसरं सुचले तर अवश्य बदल करेन प्राजक्ता

कुणी ह्यांना सांगेल का??? >> कुणी कशाला, आपणच सांगावं. मी सांगते. म्हणजे पहिले विनंती करते. नाहीच ऐकलं तर थोड्या वेळानी कडक आवाजात सांगते. तरी काही लोक बेशरम असतात. अशा लोकांसाठी अजुन एक जालीम उपाय- थोड्या मोठ्यानी सांगायचं मग आपोआपच आजुबाजुचे इतरही २-४ लोक सामील होतात. असा मॉबनी विरोध केला की ऐकतात.

अजुन एक कॅटेगरी म्हणजे मोबाइल फोनवर ते " अरे जितेसभाई, वो टाटा मोटर्स बेचके टीसीएस खरीद ले" टाइप अंकल्स फार इरिटेट करतात. अजुन एक महा इरिटेटिंग कॅटेगरी म्हणजे सतत बडबड करणारे कॉलेज कपल्स. ह्यांना एवढं बोलायचं असतं तर बाहेर फुडकोर्ट्मध्ये फुकटात का नाही बसत काय माहीत. लग्न झालेले कपल्स पहा कसे एकमेकांशी एक शब्द न बोलता स्क्रीन वर नजर ठेऊन आपापले पॉपकॉर्न खात असतात Proud

कुणि जाल का सांगाल का
सुचवाल का त्या पालकां.
थियेटरमध्ये आणू नका
रडवू नका तुम्हि बालकां.... हे बघ कसं वाटतंय?

बाकी मुद्दा अगदीच योग्य आहे.
सिनेमा आजकाल महिन्या-दोन महिन्यात टीव्हीला लागतोच पण मुलाचं लहानपण परत येणार नाही हा एक साधा मुद्दा लक्षात घेतला तरी पालक लहान मुलांना सिनेमाला घेऊन जाणं टाळतील... पण लक्षात कोण घेतो?
त्यात एक प्रकारचं कौतुक वाटत असावं पालकांना... आपली मुलं लहान असून पण आपण त्यांना घेऊन जातो याचं....
त्यांना याची लाज वाटेल असं काही तरी करायचं आपण.. उदाहरणार्थ- अभिनंदनार्थ टाळ्या वाजवायच्या त्यांचे मूल रडायला लागले की... Proud
त्यातूनही निगरगट्ट लोक असतीलच.... त्यांचे काहीच करू शकत नाही

हल्ली सिनेमांची तिकीटेही इतकी महाग आहेत + अॉड शो टाईम्स हे सगळं सांभाळून सिनेमाचा प्रोग्राम आखावा लागतो. त्यामुळेच इतक्या मेहनतीने आखलेल्या आणि ठरवून आनंद मिळवायच्या ठिकाणी असा कुणा भलत्याच्या मूर्खपणापायी पचका झाला की डोकंच फिरतं. मी पहिल्यांदाच सुनावते आम्ही पैसे खर्चून सिनेमा बघायला आलोय, तुमच्या मुलांचं रडणं, ओरडणं ऐकायला नाही. मग तेच लोक तुच्छ कटाक्ष टाकत बाहेर जातात. हू केअर्स?

लोकांना लहान मुलांना घेऊन नाटक पिक्चरला जायची एव्हढी हौस का असते हेच कळत नाही.. गप बसा की घरी जरा त्या मुलांबरोबर वेळ घालवा तीन तास पिक्चर मधे वेळ घालवण्यापेक्षा..

अजुन एक कॅटेगरी म्हणजे मोबाइल फोनवर ते " अरे जितेसभाई, वो टाटा मोटर्स बेचके टीसीएस खरीद ले +१

मी पुण्यातून मुंबईकडे शिवनेरीने प्रवास करत होतो तेव्हा माझ्या शेजारचे माकड बहुतेक मारवाडी असाव साधारण ३० ते ३५ वयाच पण पुणे ते लोणावळा तो डब्बा फोनवर मोठ्याने बोलत होता , बोलायचे विषयही फार महत्वाचे नव्हते म्हणजे काय खाल्ले काय केले वगैरे असे, मी त्याला २ वेळा सांगितले पण ते माकड तसेच बोलत सुटले होते. मग न रहावून मी माझा लॅपटॉप काढला आणि मराठी अजय अतूल ची गाणी मोठ्या आवाजात लावली. आता माझ्यामुळे तो डिस्टर्ब झाला आणि मला गाणी बंद करायला सांगू लागला पण मी त्याला बदले की भावना से दादरपर्यंत मराठी गाणी ऐकविली , गंमत म्हणजे माझ्या आजूबाजूच्या आसनावरील लोकांनाही गाणी लावल्याबद्दाल ' बरे झाले गाणी लावली ' अशी प्रतिक्रिया दिली.

सार्वजनिक ठिकाणी असे फोनवर मोठ्याने बोलणारे बर्याचदा भेटतात , मोबाईल जामर वगैरे मिळतो का आपल्याकडे ज्रेणेकरुन आसपासचे सर्वच मोबाईल बंद होतील ?

मी परिवारासोबत नवा गडी... पाहायला गेले होते. माझ्यासोबत जे कुटूंब होते त्याच्यात २ वर्षांचे मुल होते. नवराबायको दोघांनीही आजवर नाटक कसले ते पाहिले नव्हते त्यामुळे त्या दोघांनाही नाटक पाहायची उत्सुकता होती. म्हणुन मग तिघेही आले नाटक पाहायला. (सिनेमा असेल तर एकजण घरी राहतो मुलाला घेऊन). आम्ही वाशीला विष्णूदास भावेला गेलेलो. तिथे मुलांसाठी क्राय रुम आहे जिथे रडक्या मुलासकट पालक नाटक पाहु शकतात कारण त्या रडक्या मुलाचा आवाज तिथुन बाहेर प्रेक्षागृहात येत नाही. नाटक सुरू झाल्यावर अर्ध्या तासात सोबतचे मुल मोठ्या आवाजात बोलायला लागल्यावर बाबा मुलाला घेऊन बाहेर गेला. बाहेर जाताच तिथल्या लोकांनी त्याला क्राय रुम दाखवली आणि तिथे बसुन त्याने मुलासकट निवांतपणे नाटक पाहिले. मुलगा क्राय रुममधल्या खेळण्यासोबत खेळत राहिला.

पण नाट्यगृहात अजुन बरेच लोक होते ज्यांची मुले किंचाळून रडणे ते मधल्या गँगवेमधुन जोरात धावणे इत्यादी सग़ळ्या वयोगटातली होती. नाटक चालु असताना भरपुर गोंधळ. अनाऊंसमेंट कितिदा कराव्यात? कोणावरती काय परिणाम? वर कोणी लिहिलेय की आपण सांगावे. उमेश कामतने दोनदा नाटक थांबवुन मुलाला बाहेर काढण्याची विनंती केली. तरी थोड्या वेळाने मुलाच्या धावण्याचा आवाज आला. एका प्रसंगात मुल इतक्या जोरात रडले की प्रिया बापट ब्लँक झाली. नाटकातले कलाकारही वैतागलेले या प्रकाराला. पण ज्यांची मुले होती त्यांना काहीही वाटत नव्हते बहुतेक. कारण मुलांचे आवाज नाटक संपेपर्यंत येत होते.

नाट्यगृहात मुलांसाठी वेगळी सोय केलीय आणि तिथे मुलांना घेऊन जा अशा घोषणा केल्यानंतरही पालक दुर्लक्ष करुन नाटक पाहात बसतात. त्यांना त्रास होत नसेल म्हणजे तो इतर कोणालाही होत नसणार असे त्यांचे मत असावे बहुतेक.

परवा किल्ला पहायला नगरमधल्या मल्टीप्लेक्सात गेले. आमच्या जागेवर बसायला म्हणून पाऊल टाकलं तर ते डायरेक्ट शेंगांच्या फोलपटांच्या ढिगार्‍यावर. अरे काय हे? पण जे बोलतात ते वेडे ठरतात. (टिनाच्या भुशी डॅमच्या धाग्यावर पहा.....)
आम्ही मुकाट एकेक लांब उडी मारून पल्ला गाठला. बसून पिक्चर पहायचा प्रयत्न केला. खरं म्हण्जे किल्ला तसा शांतपणे अनुभवण्यासारखा!(यावर दुमत असू शकते...ते वाघामार्‍यांच्या किल्ला...बाफवर नोंदवावे). आणि मला स्वता:ला शांततेत पहायला जास्त आवड्ते.
पण आलेला बराच तरुण वर्ग घरून होमवर्क करून आलेला होता. होणार्‍या विनोदावर विनोद होण्याआधीच मोठ मोठ्याने कमेन्टा! मागच्या लायनीतला तरुण ४/५ लायनी पुढे बसलेल्या मुलाला नावाने हाका मारून गड्गडाटी हास्य करीत होता.
अरे....होत्या थोड्या शिव्या पोरांच्या तोंडी....पण परेश रावळ, शक्ती कपूर यांच्या इणोदी शिणुमात हसल्यासारखे काय हसता?
पण इथेही आम्ही गप्पच. जमलं , ऐकू आलं तेवढा किल्ला पाहिला.
हे मल्टीप्लेक्स सध्या १ नं आहे, जे याच्या आधी बांधलं.....जे सध्या २ नं. वर आहे...तिथे थेटरात प्रवेश करण्यापूर्वी मावा बहाद्दरांना तोंडातला ऐवज थुंकण्यासाठी वाळूने भरलेली घमेली ठेवली आहेत. आता बोला!!!!!!
आत शिरताना पुरुष वर्गाची झडती घेतली जाते....गुट्ख्याच्या पुड्यांसाठी....इतरही काही गोष्ट साठी.
हो.....शेंगा खाणार्या कुटुंबाने नंतर दोन्ही मुलं थेटरात बागडायला सोडून दिली. त्यांनी नंरत हैदोसच घातला.

मोबाईल जामर वगैरे मिळतो का आपल्याकडे ज्रेणेकरुन आसपासचे सर्वच मोबाईल बंद होतील ? >> मिळतो.
पण सार्वजनीक ठिकाणी जॅमर वापरणे हे भारतात बेकायदेशीर आहे किंवा कसे याची चौकशी करावी लागेल कारण कंपन्यांचे आर्थिक हितसंबंध आहेत.
जॅमर संदर्भात स्वतःच्या मालकीच्या खाजगी जागेत कोणता कायदा लागु होतो भारतात त्याचीसुद्धा चौकशी करावी लागेल.

टीना, ताई आणि जिज्ज्जूचं कौतूक... असाच विचार
सर्वानि करायला हवा. मि पन माझ्या मुलाला घेउन जात नहि सिनेमा बघाय्ला

मुलं--मोबाईल--मुलांचे किंचाळणे--मुलांना/ बायकोला / नवर्‍याला लटकं दटावणे--स्वतःचेच मोबाईल वाजणे--मोबाईलवर मोठ्याने बोलणे--आपलं सारं विश्व प्लास्टिकच्या पिशवीत घेऊन येणे--आता हे शेवटचंच थेटरातलं खाणं अशा थाटात आवेशात खाणे--मोठ्याने ओरडणे/ हसणे--आजूबाजूच्या आणि पुढच्या खुर्च्या सतत ढकलत / हलवत ठेवणे-- एवढ्यापुरतंच मर्यादित नाही हे सारं.
दुसर्‍यांना आपल्यामुळे त्रास होईल याची जाणीव नसणे--व्यक्त होण्यासाठी सतत आवाजाची आणि वरचढ असण्याची गरज भासणे--उरातला जन्म झाल्यापासूनचा असंतोष काहीतरी मार्गाने बाहेर काढणे-- असा आपल्या संपन्न सामाजिक अराजकाचा चढता, वैभवशाली आलेख आहे. त्याची मूळं खोलवर आणि सहज न दिसणारी आहेत.

ओवी झाल्यापासून गेल १ वर्ष आम्ही दोघानी एकही चित्रपट थिएटर मधे पाहिला नाही आहे . (जुरासिक वर्ल्ड अन तवेमरि तेवढा मी एकट्याने जाऊन पाहिला , खोट का बोला ? :))

ती २-३ तास अंधार्या जागी शांत बसू शकत नाही हे कळायला काही रॉकेट सायन्स लागत नाही . पण माझे एक शेजारी आपल्या चक्क ७ महिन्याच्या मुलाला घेऊन सिनेमाला गेले अन वर सगळीकडे फुशारक्या Happy

लोक आपल्याला अन आपल्या बाळाला मनातल्या मनात (अन बाहेरही) किती शिव्या घालत असतील याची तरी जाणीव नसेल का याना ?

चैतन्य.... चांगला बदल.

साधना, क्राय रूम्सचे वाचून छान वाटलं,,,, इथे दिनानाथ शिवाजी मंदीर प्रबोधनकार ला अजूनतरी पाहिली नाहिये (असेल तर माहित नाही). आता गोरेगावला नात्यगृह बांधायला घेतायत सो तिथे होईल का पाहुया. सध्या असलेली मंडई पाडायला घेतलिये तिथेच उभं राहणारे नाट्यगृह फायनली.

नाटकात असा व्यत्यय हा अक्षम्य गुन्हा आहे..... कलाकारांचा विचार व्हायला हवा.

Pages