खरे तर ही एखादी चालू घडामोड नाही, ही बहुधा एक मोठी व्याप्ती असलेली प्रक्रिया असावी. अगदी प्रामाणिकपणे सांगायचे तर मला देशांतर्गत स्थलांतराबाबत लिहावेसे वाटत होते कारण परवाच एकांशी चर्चा करताना असे आढळले की मोठ्या शहरातून लोक आता पुन्हा स्वगृही परतू लागले आहेत. अश्या परतण्याची कारणे आहेत त्यांच्या मूळ गावीही बर्यापैकी विकास झालेला असणे, तेथे राहण्याचा खर्च कमी असणे, तेथे मोठ्या शहरांसारख्या संधी उपलब्ध झालेल्या असणे, तेथे त्यांचे स्वतःचे घर असणे आणि कुटुंबास आवश्यक असतात त्या बाबी आता तेथेही उपलब्ध असणे, जसे चांगल्या शाळा, रुग्णालये वगैरे! ह्या गोष्टीबद्दल लिहावेसे वाटले कारण त्यातून काही बकाल झालेल्या मोठ्या शहरांना कदाचित पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त होण्याची चाहुल ऐकू येत होती. सर्वत्र जवळपास समान विकास झाला तर यंत्रणा, संसाधने ह्यावरील ताण अर्थातच विभागला जाईल हा फायदा जाणवत होता. पुण्या-मुंबईहून महाराष्ट्रातील इतर प्रगत शहरे जसे नागपूर, औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर येथे मंडळी परतणे ही बाब कितपत प्रमाणावर घडत आहे, कोणाचे अनुभव काय आहेत अशी चर्चा होईल असे मनात आले.
मात्र त्याआधी सहज 'रिव्हर्स मायग्रेशन' गूगलवर सर्च केले तर आंतरराष्ट्रीय स्तरावर (विशेषतः प्रगत देशांमधून भारतात परतणारे) लोक मोठ्या प्रमाणावर आहेत असे एक चित्र दिसले. अनिवासी भारतीयांनी भारतात पाठवलेला पैसा हा भारतीय संसाधने व यंत्रणांचा वापर न करता निर्माण झालेला पैसा असल्याने तो भारतासाठी बहुमोल ठरतो हे माहीत होते. कदाचित कालांतराने हा ओघ प्रभावित होईल वगैरेही! पण ह्या आंतरराष्ट्रीय पुनर्स्थलांतराचे इतर काय काय परिणाम होऊ शकतील ह्या विचाराने व्यापलो.
मुळात भारताला हे समजून घ्यावे लागेल की असे उलटे स्थलांतर फायदेशीर ठरू शकते. जेव्हा येथून लोक नव्वदच्या दशकात मोठ्या प्रमाणावर तिकडे जाऊ लागले तेव्हा भारताला वाईट वाटत होते असे एका ठिकाणी लिहिलेले आढळले. आता ते लोक किंवा त्यांच्यापैकी काही परत येत आहेत तेही चांगले ठरू शकेल हे मान्य करायला हवे. प्रत्येकजण जे काही करतो ते स्वतःच्या फायद्यासाठी करतो. येणारे लोक त्यांना अधिक सुखासीन आयुष्य जगता येईल ह्या आशेने आलेले असणार, येत असणार आणि येतील. अशा लोकांकडून आपला काय फायदा होईल ह्यावर भारतातील तज्ञ मंडळी नक्कीच विचार करत असतील. असे वाटते की अश्या लोकांकडून खालील गोष्टी येथे येतील.
१. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रगत संस्कृतीत असलेले माणसाचे महत्त्व! माणसेच कमी असल्यामुळे म्हणा किंवा सुबत्ता असल्यामुळे म्हणा किंवा संस्कृतीच तशी असल्यामुळे म्हणा, ऐकीव व वाचीव माहितीनुसार विकसित राष्ट्रांमध्ये सामान्य माणसाला भारतातील सामान्य माणसापेक्षा खूप अधिक आदर व किंमत मिळते. त्याच्या प्रश्नांना प्राधान्य मिळते. ह्यामुळे भ्रष्टाचार, सुरक्षितता, जीवनमानाचा दर्जा, स्वच्छता ह्या निकषांवर तो माणूस इथल्या माणसापेक्षा नकळतपणे अधिक सुखी असतो / असावा. अश्या संस्कृतीत वीस, तीस वर्षे काढलेली पण मुळात आपलीच असलेली माणसे येथे परतली तर येथे अशी संस्कृती निर्माण करत राहण्याचा ते त्यांच्यापरीने आटोकाट प्रयत्न करत राहतील. सेवाक्षेत्र, उत्पादनक्षेत्र, शासन-प्रशासन, पायाभूत सुविधा व इतर अगणित यंत्रणांकडून त्यांच्या असलेल्या अपेक्षा इथल्यांच्या अपेक्षांच्या तुलनेत अधिक तीव्र असतील व त्या तीव्रपणे मांडल्याही जातील. अतिशय कमी वेगाने का होईनात पण ह्या अपेक्षा योग्य आहेत हे सर्वत्र पटायला लागेल व एकुणच जीवनमान सुधारू शकेल. सच्चाई, सुरक्षा, शब्दाचे / वेळेचे महत्त्व, सेवा ह्या शब्दांना काहीतरी विश्वसनीय अर्थ प्राप्त होऊ शकेल. ह्या प्रक्रियेत खूप माणसे असंतुष्ट होतील, काही गारदही होतील पण बहुतांशी हालचालींची दिशा सुधारणेकडेच असेल.
२. हे लोक प्रदीर्घ काळ विकसित राष्ट्रांमध्ये राहिलेले असल्यामुळे त्यांच्याशी व्यवसाय करणे हे विकसित राष्ट्रांना अधिक विश्वासार्ह वाटू शकेल. त्यातून व्यवसायाला कदाचित आणखी वरचा गिअर टाकता येईल. शिवाय त्यातून पर्यटन वाढू शकेल. समाजात सधन माणसांची संख्या वाढली तरी गरीब-श्रीमंतांमधील दरी लहान होईल की नाही हे समजत नाही आहे. पण अधिक पैसा फिरू लागेल.
३. भारतात कदाचित अजूनही स्वप्नवत वाटणार्या काही सेवा, काही व्यवसाय हे नव्याने सुरू होऊ शकतील. त्याशिवाय अंतर्गत स्पर्धा वाढून एकंदरीत ग्राहकाचाच फायदा होईल.
४. पायाभूत सुविधांमधील चांगले बदल कानाकोपर्यात पोहोचू लागतील.
अर्थात हे सर्व फायदे म्हणजे 'थेंबे थेंबे' स्वरुपाचे आहेत. ह्याचे कारण भारतात असलेल्या एकशे तीस कोटींमध्ये बाहेरून येऊन येऊन येणार किती लोक? फार तर एक कोटी! तेही एकदम नाहीतच!
पण मग ही प्रक्रिया वेगवान व्हावी ह्यासाठी भारताने प्रयत्न करावेत का? मुळात आपला देश आपल्या परदेशी राहणार्या नागरिकांना सर्व दृष्टींनी राहण्यालायक वाटावा ह्यासाठी प्रयत्न करावेत का?
हे प्रयत्न केवळ त्याच नागरिकांसाठी करावेत असे म्हणणेही वेडेपणाचे आहे. हे प्रयत्न मुळातच होणे देशासाठी आवश्यक आहे. जसे रस्ते, वीज, शिक्षण, पाणी, अन्न, सुरक्षितता, पारदर्शकता इत्यादी!
आणि मग हे तर पाचवीला पूजलेलेच प्रश्न आहेत की? त्यात काय नवे? ह्या मुद्यांची आश्वासने देऊनच तर सरकारे येत आहेत आणि सरकारे जातही आहेत.
पण तरीही आत्ता उलटे स्थलांतर सुरू आहे. ह्याचे एक मुख्य कारण म्हंटले जाते येथे असलेल्या अमाप संधी! ह्या विषयावर वाचायला मिळालेल्या ह्या लेखात असे आढळले की भारतात इतर अनेक गोष्टी नकारात्मक असूनसुद्धा येथे व्यवसाय निर्माण करणे, तो चालवणे व फायद्यात आणणे मोठ्या प्रमाणावर शक्य आहे. येथे प्रचंड संधी आहेत. हा लेख पत्थर की लकीर मानावा असे म्हणणे नाही. उलट मायबोलीवर असलेल्या अनेक अनिवासींनी आपले प्रांजळ मत लिहावे. पण उलटे स्थलांतर तर होत आहे असे विकिवरही म्हंटलेले दिसत आहे. (निव्वळ स्थलांतर व ब्रेन ड्रेन ह्यातील फरक विचारात घेऊनही लेखातील विषयाच्या व्याप्तीपुरते दोहोंना मी एका पातळीवर गृहीत धरत आहे).
१. भारतात परत येणारे अनिवासी अधिक सुखदायी संधींमुळे परत येत आहेत का?
२. आपल्या पुढच्या पिढीचे संगोपन आपल्या संगोपनाशी मिळतेजुळते असावे म्हणून परत येणारे काही आहेत का?
३. परदेशात दीर्घकाळ राहण्याने काही इतर प्रश्न उद्भवल्यामुळे परत येत आहेत का, जसे स्व-संस्कृतीत परतण्याची तीव्र इच्छा होणे किंवा सातत्याने परकेपणा जाणवत राहणे, एकलकोंडेपणा वाटणे किंवा तत्सम!
४. भारतात परतणारे नगण्य आहेत का? की नाहीच आहेत?
भारताबाहेर राहण्याचा काडीचा अनुभव नसूनही ह्या शंका विचाराव्याश्या वाटल्या.
धन्यवाद!
===========
-'बेफिकीर'!
>>आकर्षक वातावरण नसतानाही
>>आकर्षक वातावरण नसतानाही वैयक्तीक कारणांसाठी जे परत येत आहेत त्यांच्या तिकडच्या नेटवर्क्सचा, अनुभवाचा, जीवनशैलीबाबतच्या अपेक्षांचा काही भरीव उपयोग करून घेता येईल का असा विषय आहे. >>
बर्याच खाजगी कंपन्या उपयोग करुन घेतात. आमचे जे मित्र आईवडिलांसाठी परत गेलेत त्यांना त्यांची कंपनी अमेरीकेत व्यवसायाची नवी संधी शोधायला/बोलणी करायला पाठवत असते. जे मित्र घरचा उद्योग सांभाळायला परत गेले त्यांनी तो उद्योग छान वाढवून बर्याच लोकांना रोजगार मिळवून दिला. आता ते अमेरीकेतले मार्केट मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
बाकी जिवनशैलीच्या अपेक्षांबद्दल, तर परत जाताना आहे त्या परीस्थितीशी जुळवून घ्यायचे तुलना करायची नाही हे ठरवूनच ही मंडळी परतली.
त्यांच्या शिक्षणावर,
त्यांच्या शिक्षणावर, कौशल्यांवर भारताने जो पैसा खर्च केला त्याचे काय?
IIT सारख्या नामांकित संस्थेतून cream of the cream मुले बाहेर पडतात त्यातली ९०% मुले बाहेर शिकायला जातात आणि तिकडची होतात.
पूर्वी म्हणे एम बी बी एस झाल्यावर लहान गावात, जिथे डॉक्टर कमी आहेत किंवा नाहीतच तिथे कंपल्सरी एक दोन वर्षे नोकरी करावी लागे. खरे की खोटे माहित नाही. आता नक्की आठवत नाही.
तर आय आय टी किंवा तत्सम उच्च शिक्षण घेतल्यावर भारतातच एक दोन वर्षे नोकरी केलीच पाहिजे अशी जबरदस्ती केल्यास हरकत नाही. अगदी पास झाल्यावर लग्गेच डॉलर मिळवायला लागले पाहिजे असे चांगले नाही. अगदी इन्फोसिस, टाटा इ. कंपन्यांना पण सांगायला पाहिजे की तुम्ही परदेशात एव्हढी वर्षे कामे केलीत, आता भारतासाठी पण काही सिस्टिम्स लिहा की. तिथे जाऊन प्रोजेक्ट मॅनेजर होता नि कामे यशस्वी करता, मग तसे भारतातहि करा ना (भारतासाठी). असे आवाहन तरी करावे.
मी स्वतः काय केले ते विचारू नका. मी अनेक वेळा इथे माझे अनुभव लिहीले आहेत. वेळो वेळी भारतात येऊन चौकश्या केल्या, प्रयत्न केले, पण कुणाला मी नकोच होतो. कारण नक्कीच माझ्याहून चांगले लोक त्यांना मिळत असणार.
इथे बरे आहे. फारसा ब्रेन नसला तरी चालते. माझ्या सारखे बरेच भारतीय आहेत इथे. त्यांच्या कडे पाहिल्यावर कळते की ब्रेन ड्रेन वगैरे अतिशयोक्ति आहे. मी तर आहे इथे जाम सुखात. भारतात असतो तर एव्हढा सुखी राहिलो असतो असे दिसले नाही.
आता कुणाला प्रश्न पडला की इथे कसे जमते, भारतात का नाही? याबद्दल कुणि धागा काढल्यास माझी मते लिहायला आवडेल.
माझ्या सारखे बरेच भारतीय आहेत
माझ्या सारखे बरेच भारतीय आहेत इथे. त्यांच्या कडे पाहिल्यावर कळते की ब्रेन ड्रेन वगैरे अतिशयोक्ति आहे.>>>>>>>
अगदी अगदी. ब्रेन ड्रेन वगैरे हे आयटी चालू होयच्या आधी होते.
१९९७ पासुन जी लोक आयटी मुळे बाहेर स्थाईक झाली आहे ( आमच्या सारखी ) त्यांना ब्रेन ड्रेन वगैरे म्हणु नका हो.
@ बेफीकीर - भारत सोडुन गेलेल्या लोकांनी भारतात परत येणे हे माझ्या मते कदाचित नुकसान कारक आहे. कारणे
१. भारतात माणसे, हात, ब्रेन यांची काही कमी नाही.
२. भारता बाहेर राहुन, पैसा कमवुन, तो भारतातल्या नातेवाईकांना पाठवणे, किंवा भारतात गुंतवणे जास्त फायदेशीर आहे.
३. भारताच्या आयात निर्याती मधे प्रचंड फरक आहे, तो फरक मोठ्या प्रमाणात ह्या बाहेरच्या भारतीय लोकांनी पाठवलेल्या पैश्यामुळे भरुन निघतो. हायपोथेटीकली ही बाहेरची माणसे भारतात परत आली तर मोठाच प्रॉब्लेम होण्याची शक्यता आहे.
४. प्रत्येक देशानी त्याच्या कडे निर्माण होणारे जास्तीचे उत्पादन निर्यात करावे. भारतात सर्वात जास्ती प्रमाणात निर्माण होणारे उत्पादन हे माणसांचे आहे, त्यामुळे ते निर्यात होत रहाणे प्रचंड गरजेचे आहे.
५. प्रत्येक देशानी, आपल्याकडे आधीच जास्त असलेले उत्पादन बाहेरुन आयात करु नये. पुन्हा वरचेच लॉजिक.
एक्झॅक्टली टोचा: >>>प्रत्येक
एक्झॅक्टली टोचा:
>>>प्रत्येक देशानी त्याच्या कडे निर्माण होणारे जास्तीचे उत्पादन निर्यात करावे. भारतात सर्वात जास्ती प्रमाणात निर्माण होणारे उत्पादन हे माणसांचे आहे, त्यामुळे ते निर्यात होत रहाणे प्रचंड गरजेचे आहे<<<
माणसे निर्यात करावीत आणि ती करताना निर्यातीप्रमाणेच इतर देशांकडून शुल्क आकारले जावे अश्या अर्थाचे काहीतरी (इतके थेट व निगरगट्टपणे नव्हे) मी (ह्या धाग्याच्याही) पूर्वीपासून म्हणत आहे. येथील एका स्पर्धेच्या निमित्ताने मी भारताची लोकसंख्या ह्या विषयावर जो लेख लिहिला होता त्यातही असेच म्हणालो होतो.
पण जर माणसे पाठवताना ते केले जात नसेल तर माणसे परत येताना काही करता येईल का हे बघावे का, असे मनात आले.
तुमच्या ह्या खालील मताशीही सहमतः
>>>भारता बाहेर राहुन, पैसा कमवुन, तो भारतातल्या नातेवाईकांना पाठवणे, किंवा भारतात गुंतवणे जास्त फायदेशीर आहे.<<<
मात्र ह्या खालच्या मतातीलः
>>>भारताच्या आयात निर्याती मधे प्रचंड फरक आहे, तो फरक मोठ्या प्रमाणात ह्या बाहेरच्या भारतीय लोकांनी पाठवलेल्या पैश्यामुळे भरुन निघतो.<<<
'मोठ्या प्रमाणात' हा शब्दप्रयोग मला तरी अजिबात पटू शकत नाही. मला वाटते की ह्या लोकांनी पाठवलेले पैसे ही त्यांची बचत असते. शिवाय, देशाच्या आयात निर्यातीतील दरी बुजावी इतके पैसे हे लोक इकडे पाठवत असणे असंभव वाटते.
माणसे निर्यात करावीत आणि ती
माणसे निर्यात करावीत आणि ती करताना निर्यातीप्रमाणेच इतर देशांकडून शुल्क आकारले जावे अश्या अर्थाचे काहीतरी >> अरेरे म्हणजे गुलाम गिरी किंवा स्लेव्हरी? वेठ बिगारी? ह्युमन ट्रॅफिकिंग? हे छुप्या प्रकारे चालूच असते. त्याला कायदेशीर स्वरूप द्यावे असे का?
परदेशी स्थलांतरित होणारी माणसे आपल्या स्वतःच्या फ्री विल - विचार शक्तीचा वापर करून स्वेच्छेने जात आहेत. येतानाही स्वतः च आपल्या मनाने येत जात आहेत. ह्या स्वातंत्र्या वर देश पैसे/ कर लादू लागले तर ते मानवी हक्कांच्या विरुद्ध होईल. चर्चेचा एक इन्फिनिट लूप तयार झाला आहे हा अनेक वर्शे चालेल.
देशाच्या आयात निर्यातीतील दरी बुजावी इतके पैसे हे लोक इकडे पाठवत असणे असंभव वाटते.>> केरळ मध्ये एन आर आय रेमिटन्सेस ची वस्तुस्थिती बघा. तो त्या राज्याच्या इकॉनोमीचा एक महत्वाचा भाग आहे.
>>>अरेरे म्हणजे गुलाम गिरी
>>>अरेरे म्हणजे गुलाम गिरी किंवा स्लेव्हरी? वेठ बिगारी? ह्युमन ट्रॅफिकिंग? हे छुप्या प्रकारे चालूच असते. त्याला कायदेशीर स्वरूप द्यावे असे का?<<<
हा उपरोध आहे की खरी भावना? उपरोध असेल तर मस्त आहे आणि खरी भावना असेल तर त्यावरचे उत्तर असे आहे:
विपर्यास न करता ह्या विषयाकडे बघणे शक्य आहे. आजवर काहीतरी झाले नाही ह्याचा अर्थ ते कधीच होणार नाही / होऊ नये असा होत नाही. व्यक्तीस्वातंत्र्यावर अजिबात घाला येऊ न देता काहीतरी करणे शक्य आहे.
उदाहरणार्थः एक क्ष माणूस येथे शिकला व त्याच्या शिक्षणाचा आणि कौशल्यांचा उपयोग अमेरिकन कंपनीला अमेरिकेत करायचा असला तर ते त्याला नोकरी देतील. त्या जिवावर तो तिकडे जाऊन गुजराण करेल आणि काही पैसे इकडेही पाठवेल. हे सगळे झाले व्यक्तीस्वातंत्र्य! आता त्यावर अजिबात घाला न घालता त्या अमेरिकन कंपनीला असे विचारता येईल का की आमच्या ह्या माणसाला तुम्ही तिकडे नेत आहात तर त्या बदल्यात आम्हाला उदाहरणार्थ एक महिन्याचा पगार द्या? जर त्या माणसाला 'य' वर्षे पोसायला ती कंपनी तयार होत असेल तर ह्याही गोष्टीला ती तयार व्हायला हरकत नसावी. (हे म्हणणारे आपण कोण म्हणा, पण ह्या असल्या कल्पनांची विविध व प्रत्यक्षात आणता येणारी स्वरुपे अभ्यासली जाऊन त्यातून काहीतरी ठोस निष्कर्ष निघू शकेल इतके तरी आहेच ना?)
असेही होईल की तो परका देश व ती कंपनी म्हणतील की 'हाड, पाठवायचे असले त्या माणसाला तर पाठवा नाहीतर ठेवा तुमच्याचकडे'! पण आपल्याकडील कुशल माणसे फक्त त्यांचे व्यक्तीस्वातंत्र्य आणि परदेशी कंपन्यांच्या अटींची पूर्तता करू शकण्याच्या निकषावर तिकडे जातात आणि आपण दशकानुदशके त्यात एक रुपयाही बघू नये किंवा त्याबाबत बोलूसुद्धा नये असे का बुवा?
'मोठ्या प्रमाणात' हा
'मोठ्या प्रमाणात' हा शब्दप्रयोग मला तरी अजिबात पटू शकत नाही. मला वाटते की ह्या लोकांनी पाठवलेले पैसे ही त्यांची बचत असते. शिवाय, देशाच्या आयात निर्यातीतील दरी बुजावी इतके पैसे हे लोक इकडे पाठवत असणे असंभव वाटते.>>>>>
@बेफिकीर - आत्ताच वीकीवर बघितले. आणि हे आकडे कायदेशीर पैसे आत येण्याचे आहेत, म्हणजे खरे कीती आले असतील ते बघा.
बाकीच्या निर्यातीत, देशाचे नैसर्गीक स्त्रोत खर्च होत असतात. बाहेरच्या भारतीयांनी पाठवलेले पैसे म्हणजे दुसर्या देशाचे रीसोर्स वापरुन भारताची केलेली भर आहे.
ह्याच्यातच ह्या बाहेरच्या भारतीयांच्या भारतातल्या ट्रीपांच्या मु़ळे येणारा पैसा मिळवा.
<<<< Remittances to India stood at $67.6 billion in 2012-13, accounts for over 4% of the country's GDP >>>
४% जीडीपीच्या म्हणजे प्रचंड मोठ्ठी रक्कम झाली. कधी कधी तर आयात निर्यातीतली दरी पूर्णपणे भरुन निघावी इतके पैसे येतात. आणि ही कायद्याच्या परीघातली रक्कम आहे. माझ्या मते इतकीच रक्कम हवाला नी येत असावी.
तसेच FDI किंवा FII म्हणुन येणार्या पैश्यात पण बाहेरच्या भारतीयांचा मोठा वाटा असतो ( तो कीती ते कळणे अवघड आहे )
<<< The latest World Bank Migration and Development brief pointed out that India has surpassed China, receiving $71 billion in remittances in 2014. India has retained the top spot amongst remittance-recipient countries since 2008—thanks to a large diaspora >>>>
IIT सारख्या नामांकित
IIT सारख्या नामांकित संस्थेतून cream of the cream मुले बाहेर पडतात त्यातली ९०% मुले बाहेर शिकायला जातात आणि तिकडची होतात. त्यांच्या कर्तृत्वाचे गोडवे गाताना केवळ Indian origin चा उल्लेख एवढेच का भारताचे returns on investment? >>> हे वाक्य अतिशय हास्यास्पद आहे. भरमसाठ IIT ची संख्या आणि जागा वाढविल्या गेल्या, IIT मध्ये आरक्षण आले, आता परवा तर बातमी वाचली कि आरक्षित जागा रिकाम्या रहात असल्याने admission साठी cut-off कमी करणार आहेत. कसली cream of the cream मुले बाहेर पडतात???? येथील मतांच्या राजकारणामुळे IIT चा brand प्रचंड प्रमाणात dilute झाला आहे. एकाही IIT चा क्रमांक जागतिक क्रमवारीमध्ये पहिल्या दोनशेमध्ये देखील नाही. नारायण मूर्तींनी २-४ वर्षांपूर्वी IIT बद्द्ल काय वक्तव्य केले होते ते आपल्याला आठवत असेलच.
भारताबाहेर जरूर जा. माझ्यामते प्रत्येकाने देशाबाहेर जाऊन राहून शिकले पाहिजे. जग पाहिले पाहिजे. Get best of the degree, get best of the job experience, do your thing! But you must not forget your country. जरी उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा, हा व्यर्थ भार विद्येचा! आणि ज्ञानाचे, कौशल्यांचे मोल हे पैशात होऊ शकत नाही. भारताला तुमच्या पैशांपेक्षा तुमच्या बुद्धिमत्तेचा, कौशल्यांचा फायदा मिळू दे! >>> हा खूप उदात्त विचार झाला. आपल्या ज्ञानाचा उपयोग देशाला करून देण्यास कोणाचीच काहीच हरकत नसते. परदेशी राहणारे लोक देशद्रोही नसतात!!!!! पण येथील ब्यूरोक्रसी, मतांचे राजकारण, लाल फितिचा कारभार, भ्रष्टाचार, आरक्षण ह्यामुळे येथे माझ्या ज्ञानाला, कौशल्याला, विद्येला काहीच किंमत नाही असे जर मला वाटत असेल तर मी काय करावे???
टोचा तुमचा प्रतिसाद आवडला.
बेफिकीर माफ करा मी तुमचा धागा भरकटवित असेन तर!!! तुमच्या काही प्रश्नांची उत्तरेसुद्धा देण्याचा प्रयत्न करते.
भारतात परत येणारे अनिवासी अधिक सुखदायी संधींमुळे परत येत आहेत का? >>>>> नाही भारतात परत येणारे अनिवासी वैयक्तीक कारणांमुळे परत येत आहेत. अधिक सुखदायी संधी भारतात आहेत असे मला तरी वाटत नाही. पुष्कळ लोक भारतात परत येऊन त्यानंतर आवडत नाही म्हणून परत परदेशी गेले आहेत किंवा जाण्याच्या प्रयत्नात आहेत.
आपल्या पुढच्या पिढीचे संगोपन आपल्या संगोपनाशी मिळतेजुळते असावे म्हणून परत येणारे काही आहेत का? >>>>> हो असे बरेच लोक आहे. विषेशतः मुलगी झाली तर तिच्यावर परदेशी संस्कार नकोत म्हणून बरेच लोक परत येतात.
परदेशात दीर्घकाळ राहण्याने काही इतर प्रश्न उद्भवल्यामुळे परत येत आहेत का, जसे स्व-संस्कृतीत परतण्याची तीव्र इच्छा होणे किंवा सातत्याने परकेपणा जाणवत राहणे, एकलकोंडेपणा वाटणे किंवा तत्सम! >>> कदाचित काही लोक असतील. जे परदेशी समाजात integrate होऊ शकत नाहीत त्यांना हे प्रश्न भेडसावत असावेत!!
भारतात परतणारे नगण्य आहेत का? की नाहीच आहेत? >>>>> ह्या प्रश्नाच्या उत्तरासाठी आवश्यक डेटा उपलब्ध नाही किंवा मला माहित नाही. तसा काही प्रयत्न भारत सरकारने चालू केल्यास तुमच्या बर्याच प्रश्नांची उत्तरे मिळतील.
एक देश, एक समाज, एक सरकार म्हणून आपण सगळेजण स्वदेशी स्थलांतर करण्याचे प्रमाण वाढणे ह्या गोष्टीला एक संधी मानू शकतो का? त्या दृष्टीने आपण आज त्या स्थलांतराकडे पाहात आहोत का? तसे पाहिल्याने आपल्याकडील कायम येथेच असणार्या समाजाचाही फायदाच होईल हे आपण ध्यानी घेऊ शकतो का?>>>>>> स्वदेशी स्थलांतर करण्याचे प्रमाण कीती आहे हे निश्चित कळल्यानंतरच त्याचा impact काय आणि कीती आहे हे कळू शकते. त्यांमुळे सद्ध्या तरी स्थलांतर करण्याचे प्रमाण वाढणे ह्या गोष्टीला एक संधी मानू शकत नाही असे माझे वैयक्तिक मत आहे. कदाचित स्वदेशी स्थलांतराचे प्रमाण वाढल्याने unemployment वाढू शकते. स्थलांतरित आणि स्वदेशी दोघांना रोजगाराच्या संधी उपलब्ध असायला हव्यात. कदाचित स्थलांतरित लोकांना परदेशी अनुभव असल्याने पटकन रोजगार मिळेल पण मग येथेच रहिलेल्या लोकांना चांगल्या संधी मिळणार नाहेत. अर्थात हे सगळे माझे तर्कवितर्क आहेत. मी वरती म्हणल्याप्रमाणे स्वदेशी स्थलांतर करण्याचे प्रमाण कीती आहे हे निश्चित कळल्यानंतरच त्याचा impact काय आणि कीती आहे हे कळू शकते.
टोचा, तुम्ही दिलेली माहिती
टोचा,
तुम्ही दिलेली माहिती महत्त्वाची आहे. धन्यवाद! ६७.६ बिलिअन डॉलर्स हा आकडा नेमका २०१४-१५ तील आयात निर्यात डेफिशिटशीही जुळतो आहे हे तर अजूनच नवलाचे! पण २०१४-१५ मधील क्रूड तेलाच्या किंमतींमध्ये पडलेला ५०% च्या आसपासचा फरक आपल्या आयातीचे आकडे मोठ्या प्रमाणावर बदलवत असल्याचे पी टी आय व इतर काहींच्या इन्टरनेट डेटावरून समजत आहे.
तरीसुद्धा, ६७.६ हा आकडा खरोखरच प्रचंड म्हणावाच लागेल. तसेच अमा म्हणत आहेत त्याप्रमाणे केरळ व केरळच नव्हे तर पंजाब, उत्तर प्रदेश अश्या काही ठिकाणची अर्थकारणेही अश्या पैशांवर विसंबल्याचे दिसत आहेच.
तर ह्याबाबत एक शंका:
हे पैसे पाठवणे हे ऐच्छिक आहे ना? तोही एक वैयक्तीक निर्णय आहे ना? त्यावर काही नियंत्रण तर नाही ना?
सुमुक्ता, तुमच प्रतिसाद पूर्ण
सुमुक्ता,
तुमच प्रतिसाद पूर्ण वाचण्याआधीच जरा घाईघाईतः
>>>पण येथील ब्यूरोक्रसी, मतांचे राजकारण, लाल फितिचा कारभार, भ्रष्टाचार, आरक्षण ह्यामुळे येथे माझ्या ज्ञानाला, कौशल्याला, विद्येला काहीच किंमत नाही असे जर मला वाटत असेल तर मी काय करावे???<<<
ह्याचबद्दल मूळ लेखात एक लिंक आहे बघा. ती व्यक्ती म्हणत आहे की हे सगळे नकारात्मक घटक लक्षात घेऊनही मला भारतातच अधिक संधी असल्याचे व त्या संधींचा लाभ उठवता येणे अधिक शक्य असल्याचे आढळत आहे व म्हणून मी स्वदेशी स्थलांतरीत झालेलो आहे. (ती लिंक एकदा डोळ्याखालून घालावीत वेळ असेल तेव्हा)
पण आपल्याकडील कुशल माणसे फक्त
पण आपल्याकडील कुशल माणसे फक्त त्यांचे व्यक्तीस्वातंत्र्य आणि परदेशी कंपन्यांच्या अटींची पूर्तता करू शकण्याच्या निकषावर तिकडे जातात आणि आपण दशकानुदशके त्यात एक रुपयाही बघू नये किंवा त्याबाबत बोलूसुद्धा नये असे का बुवा?>> हवे तितके बोलता येइल अभिव्यक्ति स्वातंत्र्य आहे ना.
पण देशातील स्वतंत्र व्यक्तींचे पर्सनल डिसिजन्स, प्रोफेशनल कमिटमेंट्स देश चालवणारी यंत्रणा मोनेटाइज करू शकत नाही. हा अगदी बिग ब्रदर विचार झाला. ( संदर्भा साठी १९८४ कादंबरी गूगल करून बघा.) असे करू पाहणारे देश आहेत. पण ते डिक्टेटर शिप गटात मोडतात. लोकशाही तंत्रात असे करणे फिट बसत नाही. युनिव्हरसल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राइट्स आर्टिकल १३ काय म्हणते ते बघा.
Article 13.
(1) Everyone has the right to freedom of movement and residence within the borders of each state.
(2) Everyone has the right to leave any country, including his own, and to return to his country.
http://www.un.org/en/documents/udhr/
सुमुक्ता, माझ्या शंकांची
सुमुक्ता,
माझ्या शंकांची उत्तरे तुमच्या दृष्टिकोनानुसार देण्यासाठी आभारी आहे. झक्की व इतर काहींनी ती त्यांच्या दृष्टिकोनानुसार दिलेली आहेत. मला दृष्टिकोनच असू शकत नाही कारण मी कधी देश सोडलाच नाही.
मात्र, तुमची ही खालील दोन मते व त्याबाबत माझी मते:
>>>स्वदेशी स्थलांतर करण्याचे प्रमाण कीती आहे हे निश्चित कळल्यानंतरच त्याचा impact काय आणि कीती आहे हे कळू शकते. <<<
हे प्रमाण नगण्य असतानाही त्यातून काहीतरी संधी मिळू शकेल अश्या टप्प्यावर काल चर्चा आलेली होती, पण ती तिथेच थांबली
>>>कदाचित स्वदेशी स्थलांतराचे प्रमाण वाढल्याने unemployment वाढू शकते<<<
हे मैदेवींना पण ऐकवा
धन्यवाद अमा, समजले. लोकशाही
धन्यवाद अमा,
समजले.
लोकशाही तत्त्वानुसार असलेल्या स्वातंत्र्यामुळे आपण आपल्या माणसांच्या कोठेही जाण्यास, कोठूनही परतण्यास अडथळाही करू शकत नाही आणि त्यांच्या त्या उलट-सुलट स्थलांतरामार्फत काही मिळेल का हेही बघू शकत नाही. त्यांनी स्वेच्छेने इकडे पैसे पाठवले तर सोन्याहून पिवळे असे म्हणू शकतो.
हे पैसे पाठवणे हे ऐच्छिक आहे
हे पैसे पाठवणे हे ऐच्छिक आहे ना? तोही एक वैयक्तीक निर्णय आहे ना? त्यावर काही नियंत्रण तर नाही ना?>>>>>>>>
पूर्णपणे ऐच्छिक. हे पैसे पाठवणारे त्यांच्या कुटुंबियांसाठी पैसे पाठवत आहेत, त्यामुळे त्याला देशप्रेमाची झालर लावायची पण गरज नाही.
ह्याचबद्दल मूळ लेखात एक लिंक
ह्याचबद्दल मूळ लेखात एक लिंक आहे बघा. ती व्यक्ती म्हणत आहे की हे सगळे नकारात्मक घटक लक्षात घेऊनही मला भारतातच अधिक संधी असल्याचे व त्या संधींचा लाभ उठवता येणे अधिक शक्य असल्याचे आढळत आहे व म्हणून मी स्वदेशी स्थलांतरीत झालेलो आहे. >>> लेख लिहिणारी व्यक्ती भारतात व्यवसाय करते. मला अशा लोकांंबद्दल आदर आहेच. पण आम्ही सरकारी विद्यापीठातील संशोधक आहोत. दोन्ही क्षेत्रांमधील challenges निरनिराळे आहेत असे मला वाटते. लेखात "Around 500 scientists have come back in the last seven years - and only six have gone back." असे म्हटले आहे पण ते ५०० लोक कोणत्या कारणास्तव परत आले (परदेशी संधीच मिळाली नाही म्हणून की स्वदेशी परतायचे ह्या उदात्त हेतूने????). ते परत का गेले नाहीत??? ६ लोक परत का गेले??? हे ही मुद्दे विचारात घ्यायला हवेत (अर्थात हा डेटा बरोबर असेल तर) सात वर्षात ५०० लोक म्हणजे काही फार नाही. जगात हजारोंनी भारतीय वंशाचे scientists आहेत ते का परत येत नाहीत?? त्यांना भारतात संधी मिळेल असे का वाटत नाही??? परदेशी scientists ला आकर्षित करण्यासाठी अनेक योजना चालू करूनसुद्धा सात वर्षात फक्त ५०० लोक परत येतात. ह्या योजना कुठे फसतात??? किंवा त्या तेवढ्या आकर्षकच नाहीत असे आहे का?? अनेक असे अनेक प्रश्न अनुत्तरितच राहतात!!! भारतात संधी मिळाल्यानंतरसुद्धा पुढे जाण्यासाठी, प्रगती करण्यासाठी केवळ चांगले संशोधक असून भागत नाही!!!
मी scientists बद्दल बोलु शकते कारण ते माझे क्षेत्र आहे. इतर क्षेत्रांची विषेश जाण नसल्याने त्यावर भाष्य करित नाही. परंतु हा लेख लेखकाने स्वतःच्या अनुभवातून आणि दृष्टिकोनातून लिहिला आहे त्याच्या मतांचा आदर आहेच पण प्रत्येक क्षेत्राचे challenges निरनिरा़ळे आहेत. आणि असे अनेक अनुत्तरित प्रश्न सगळीकडेच आहेत. ह्या विषयाचा उहापोह करण्यासाठी अशा प्रश्नांची उत्तरे शोधणे आवश्यक आहे.
पूर्णपणे ऐच्छिक. हे पैसे पाठवणारे त्यांच्या कुटुंबियांसाठी पैसे पाठवत आहेत, त्यामुळे त्याला देशप्रेमाची झालर लावायची पण गरज नाही. >>> +१
न समजणार्या विषयाबाबत धागा
न समजणार्या विषयाबाबत धागा काढल्यानंतरही टोचा, अमा, मंदार व इतर अनेकांनी 'मला समजेल अश्या भाषेत' ह्या विषयाकडे बघण्याचा एक योग्य दृष्टिकोन दिल्याबद्दल आभार मानतो.
धाग्यातील मूळ विषयाशी निगडीत इतर विषयांवर चर्चा करण्यास कोणी इच्छुक असले तर अवश्य चर्चा सुरू ठेवावी.
धन्यवाद!
>>>पण प्रत्येक क्षेत्राचे
>>>पण प्रत्येक क्षेत्राचे challenges निरनिरा़ळे आहेत. आणि असे अनेक अनुत्तरित प्रश्न सगळीकडेच आहेत. ह्या विषयाचा उहापोह करण्यासाठी अशा प्रश्नांची उत्तरे शोधणे आवश्यक आहे.<<<
मान्य आहे.
मी चर्चा वाचतोय.. मला वाटते
मी चर्चा वाचतोय.. मला वाटते चर्चेचा रोख अगदी अलिकडे भारताबाहेर गेलेल्या भारतीयांवरच राहिला आहे. अर्थात त्यात चूक नाही पण या लोकांचे मूळ किंवा त्यांचे वाडवडील , नातेवाईक अजून भारतात आहेत. आणि त्यांच्या परत येण्याच्या निर्णयावर प्रभाव टाकणारा तो एक घटक आहेच.
त्याशिवाय इतिहासात खुप मोठ्या प्रमाणावर भारतीयांचे स्थलांतर झालेय ( स्वेच्छेनेच झालेय असे म्हणवत नाही ) त्यात फिजी, वेस्ट इंडीज, सिंगापूर, मलेशिया, मॉरिशियस, दक्षिण आफ्रिका, केनया, युगांडा अश्या अनेक देशातील सध्याचे नागरीक आहेत.
त्यांचा संपूर्ण गोतावळाच तिथे आहे. त्यांचा भारताशी काही संबंध उरलाच नाही. सध्या तरी ते तिथे सुखी आहेत. ते भारतात परत येतील याची शक्यता फारच कमी आहे.
बेफिकीर, "स्वदेश" नावाचे एक
बेफिकीर, "स्वदेश" नावाचे एक पुस्तक आहे. अशा परतोनि आलेल्या लोकांचे लेख त्या पुस्तकात संग्रहित केले आहेत. हे पुस्तक श्री. भूषण केळकर यांनी संपादित केलं आहे. ते स्वतःही असेच परतोनि गेलेले आहेत. हेच पुस्तक
"Salmans of Narmada" या नावानी इंग्रजीत भाषांतरित केलेले आहे. या परतलेल्या लोकांनी खूप मनमोकळेपणी त्यांचे अनुभव कथन केले आहेत.
पुस्तक बाहेर मिळत नसेल केळकरांचा इमेल देऊ शकेन .
प्रश्नांची उत्तरं फ्रॉम हॉर्सेस माऊथ मिळणं केव्हाही चांगलं नाही का?
दोन तीन प्रकारची स्थलांतरे
दोन तीन प्रकारची स्थलांतरे असतात एक बालक असताना आईबाबाजातील त्या देशात जाणे, दुसरे विद्यर्थी दशेत चांगले शिक्षण घेण्यासाठी परदेशी जाणॅ, तिसरे लग्न संसार मुले ह्या फेजमध्ये त्यांना बेटर लाइफ स्टाइल देणे, आपल्या करिअरचा उत्कर्ष होणे ह्या सा ठी स्थलांतर करणे, चौथे रिटायर झाल्यावर चेंज म्हणून, बकेट लिस्ट म्ह णून, मुलांना बालसंगोपनात मदत म्हणून कमी खर्चात परवडेल म्हणून देश बदलणे.
प्रत्येक जण आपल्या सिच्युएशनला फिट होईल तसे निर्णय घेणार. त्याला दुसरे जज करू शकत नाहीत देश प्रेमाची झालर बद्दल अनुमोदन.
असे दिसते की खरी टोचणी अशी
असे दिसते की खरी टोचणी अशी आहे की जे भारतातील शिक्षणाच्या सवलती उपभोगून नंतर देशप्रेमा पेक्षा स्वार्थाकडे अधिक लक्ष देतात, ते योग्य नाही. चांगला मुद्दा आहे.
असे नाही की कायमचे भारतात जाण्याचा विचार इथे राहिलेल्या लोकांनी कधीच केला नाही. इथे येऊन यशस्वी झालेले, कर्तुत्व केलेले लोक पण असा विचार करतात.
मला तरी असे बरेच लोक माहित आहेत की त्यांनी प्रयत्न केले, एक दोन वर्षे भारतात राहून पाहिले, पण माझ्या क्षेत्रात मी काही करीन, भारतातील लोकांना काही आपल्या ज्ञानाचा, अनुभवाचा फायदा करून द्यावा हे मात्र जमले नाही. प्रत्येकाची कारणे वेगळी असतील, मुलांना काही अडचणी नव्हत्या, प्रदूषण, अस्वच्छता याकडे दुर्लक्ष केले. लाचलुचपत, कामात दिरंगाई होते याचाहि त्रास नाही - पैशाचीहि तक्रार नव्हती. पण कुठेतरी कळते की भारतीय लोक आपल्याकडे संशयाने, अविश्वासाने बघतात, सहकार्य करण्याची इच्छा नाही.
हे अनेक लोकांना का वाटावे?
पण देशातील स्वतंत्र व्यक्तींचे पर्सनल डिसिजन्स, प्रोफेशनल कमिटमेंट्स देश चालवणारी यंत्रणा मोनेटाइज करू शकत नाही:
अमेरिकेतहि, स्वतंत्र व्यक्तींचे पर्सनल डिसिजन्स, प्रोफेशनल कमिटमेंट्स हे सर्व काही आहे, आणि फक्त भारतीयच नाही तर बहुसंख्या अमेरिकनहि. अमेरिकेतहि लोकशाहीच आहे, मग अमेरिकेला का जमावे?
अर्थात अमेरिकेकडे इतर देशातून लोकच नव्हे तर मोठ्या प्रमाणावर पैसेहि लुटून आणलेले होते. आता भारताकडे पण पैसे होताहेत, भारतातहि जमेल - माझ्या आयुष्यात नाही, पण काही वर्षांनी नक्कीच.
समाजशास्त्रज्ञ, मानसशास्त्रज्ञ यांनी याचा शास्त्रीय अभ्यास करावा. एकटी दुकटी उदाहरणे यांनाच प्रमाण मानू नये (हे त्यांनाहि कळतेच).
भूषण केळकर, माझे एक दोन मित्र, जे कायमचे परत गेले, अश्यासारख्यांशीहि बोलावे.
Not related maybe, but a good
Not related maybe, but a good article.
http://profit.ndtv.com/news/nation/article-the-brain-drain-how-indias-ed...
>>>असे दिसते की खरी टोचणी अशी
>>>असे दिसते की खरी टोचणी अशी आहे की जे भारतातील शिक्षणाच्या सवलती उपभोगून नंतर देशप्रेमा पेक्षा स्वार्थाकडे अधिक लक्ष देतात, ते योग्य नाही.<<<
नाही झक्की! कालपासूनची चर्चा नीट वाचलीत (विशेषतः जिज्ञासांच्या प्रतिसदानंरची चर्चा नीट वाचलीत) तर तुम्हाला सहज कळेल की असा काही चर्चेचा मुद्दाच नव्हता आणि अशी काहीही टोचणी, जळजळ, तळमळ वगैरे नाही आहे. कशाला असेल तशीही? ज्यांनी 'बेस्ट' कधी पाहिलेच नाही ते भारतालाच 'बेस्ट' मानणार ना? आणि 'आपला देश' ही संकल्पना त्यांना जिव्हाळ्याची वाटणारच ना?
मी किमान सात ते आठ वेळा 'ही चर्चा कशावर आहे' हे लिहिलेले असल्यामुळे आता ते पुन्हा लिहीत नाही. तसेही, टोचा व अमांच्या प्रतिसादानंतर 'व्यक्तीस्वातंत्र्य आणि आपली सर्वात मोठी ताकद म्हणजे लोकसंख्या ह्यांच्या परदेशगमनासंदर्भातील परिणामांबाबत' आपला सगळ्यांचा जो काही एक दृष्टिकोन झालेला आहे तो पाहता अशी चर्चा होणे संभवतही नाही.
बेफिकीरजी, महत्वाचा आणि
बेफिकीरजी,
महत्वाचा आणि चांगला विषय वाटला..
मला वाटतं १०,२०,३० वर्षे आपले मुळस्थान सोडुन बाहेर कुठेही राहुन पुन्हा मुळ गावी,देशात परतल्यावर आपली नाळ पुन्हा जुळेल का ? इथल्या आणि तिकडच्या परिस्थिती मध्ये अजुन ही मोठा फरक आहे, त्याच्याशी जुळवुन घेणं खुप अवघडं जाईल ?
गावी सगळं स्वस्त आहे ,इकडचं १बीएचके/२ बीएचके घर तिकडे अगदी १०-१५ लाखात आरामात उभं राहु शकतं, (जागा आपली असेल तर), पण पैसा मिळण्याची साधनं अजुनही नाहीतच,
>>>मला वाटतं १०,२०,३० वर्षे
>>>मला वाटतं १०,२०,३० वर्षे आपले मुळस्थान सोडुन बाहेर कुठेही राहुन पुन्हा मुळ गावी,देशात परतल्यावर आपली नाळ पुन्हा जुळेल का ?<<<
जुळणे थोडे अवघड जाईल. पण बहुधा लोक त्याच जमीनीतील असल्यामुळे कालांतराने जमवून घेताही येत असेल. माझ्या पाहण्यात माझ्या अत्यंत जवळच्या मित्रांपैकी एक असा आहे की ज्याला ब्लूमिंग्टनला पाच वर्षे राहिल्यानंतर (इतकेच नव्हे तर गेल्लेया दिवसापासून - नंतर त्याचे अख्खे कुटुंब तिकडे गेले तरीही) भारतात परतायची प्रचंड तहान लागलेली होती व तो फॉर गुड आलाही.
डिस्क्लेमर - अर्थात हा विषय धाग्यातील मूळ विषयाशी संबंधीत नाही.
सुमुक्ता, देशद्रोही?? When
सुमुक्ता, देशद्रोही?? When did I say this? देशभक्ती काय तापासारखी थर्मामीटर लावून मोजता येते का? ना ती पुराव्याने सिद्ध करता येते! How can one quantify or qualify values? १००% मैत्री, ५०% प्रेम, ए ग्रेडची देशभक्ती वगैरे वगैरे!! मी माझ्या प्रतिसादात असे कोणतेही विधान केलेले नाही. You have completely misunderstood my statements. भारतात परतल्यानेच देशभक्तीचा stamp लागतो का? पण मी जे अमेरिकेतल्या भारतीय लोकांमध्ये बघते त्या वरून मला जे वाटते ते मी लिहते आहे. खूप generalize करते आहे पण तरी! इथे उच्चशिक्षणासाठी येणारे जे बरेचसे मध्यम अथवा उच्च मध्यम वर्गातून येतात त्यांना ह्या गोष्टीची कितपत जाण असते हे मला माहिती नाही. पण भारतातून कॉलेज डिग्री घेणे हे अमेरिकेपेक्षा कितीतरी स्वस्त आणि सोपे आहे. इथल्या कॉलेजच्या फीज प्रचंड असतात. इथली मुलं बहुतेक वेळा कर्ज काढून शिकतात. कॉलेजमध्ये असताना घराबाहेर पडल्याने त्यांना त्यांच्या राहण्या-खाण्याचा खर्च देखील स्वतःच भागवावा लागतो. आणि इथल्या कॉलेजमध्ये शिक्षणदेखील खूप competitive असते. त्या मानाने आपल्याकडे बहुतेकजण घरी राहून किंवा होस्टेलमध्ये (जे खूप महाग नसते) शिकतात. घरी राहिलात तर आई-वडिलांना घरखर्च वगैरे द्यावा लागत नाही! पण इथे येऊन स्थिरावल्यानंतर फार कमी लोक ह्या गोष्टीची जाणीव ठेवतात की ज्या समाजव्यवस्थेने तुम्हाला घडवलं आणि तुमच्या पंखांना ही भरारी घेण्याची ताकद मिळवून दिली त्यांचेही काही ऋण असते! आणि ह्या जाणीवा नियमांनी/कायद्याने घडवता येत नाहीत! जगाच्या पाठीवर कुठेही असा ह्या ऋणातून मुक्ती नाही! But one can always find ways to contribute..to pay it forward!
IITs in India may not be highly ranked in the world but they are definitely good places to get a college degree from. There is no need to be so derogatory (हास्यास्पद वगैरे)! I have many IITian friends who are brilliant and extra-ordinary! It does not mean that students from other places are not smart. But in India IITs still do get the best of Indian brains (cream of the cream) and sadly those more or less get directly exported out of India!
टोचा आणि इतरांनी म्हटल्याप्रमाणे परदेशस्थ भारतीयांचा पैसा मोठ्या प्रमाणावर भारतात येतोच! मग ब्रेनड्रेन ने काय फरक पडतो? तसंही आपल्याकडे माणसांची कमी नाहीच! असं नसतं!! The influx of money is great and no one should deny its benefits. But money is not equal to human resource. आणि माणसाला माणूस असाही हिशोब लावता येत नाही. Human resource isn't a number game! Harvard मधून structural engineering ची पदवी घेऊन आलेला माणूस आणि ज्याने आयुष्यभर सोन्याचे दागिने घडवले आहेत असा कारागीर ह्यांना एका पारड्यात कसे तोलता येईल? भारताला दोघांचीही गरज असू शकते! Also, knowledge is power and it's not emphasized enough in our country! परदेशी राहून शिकल्याने, काम केल्याने, अनुभवाने जो दृष्टीकोन मिळतो त्याचे मोल पैशात करता येत नाही! आणि तो दृष्टीकोन असणाऱ्या व्यक्तीच्या ज्ञानाचा देशाला खूप फायदा होऊ शकतो! सुदैवाने तंत्रज्ञानाने इतकी प्रगती केली आहे की एखाद्या व्यक्तीला दूर राहून देखील आपले ज्ञान/कौशल्य ह्यांचा देशासाठी वापर करता येऊ शकेल. फक्त इच्छा हवी, मार्ग काढता येईल! Maayboli is a great example of paying it forward! It is serving as a platform for marathi people across the globe to exchange knowledge and make meaningful connections!
झक्की काका, मी तुमच्यापेक्षा सर्वार्थाने खूप लहान आहे आणि मला माहिती आहे की तुम्ही मजेने लिहित असता पण तरीही I want to say this to you, we know that your generation of immigrants haven't had it easy! It is never easy to establish yourself in a new country, especially in the days when the world wasn't as connected as it is today. I have a great respect for you! आणि जर भारतातील लोकांनी तुम्हाला परत येण्याची योग्य संधी दिली नाही तर त्यात नुकसान भारताचेच झाले आहे! Because you are an asset! तुमच्या प्रत्येक नर्मविनोदी, वरकरणी तिरकस भासणाऱ्या पोस्ट्समधून देखील तुमची भारताबद्दलची कळकळ दिसून येत असते! I really enjoy reading all your posts!
Maayboli is a great example
Maayboli is a great example of paying it forward! It is serving as a platform for marathi people across the globe to exchange knowledge and make meaningful connections! >>> अहो, निदान हे वाक्य तरी मराठीत लिहा की !
...आपला प्रतिसाद हा जास्तीत जास्त (९८%) मराठीत लिहावा अशी या संके तस्थळाची अपेक्षा आहे !
...बाकी चर्चा उत्तम चालू आहे.
इथे परदेश म्हणून केवळ युरप
इथे परदेश म्हणून केवळ युरप आणि अमेरिकेचाच का विचार होतोय ? एक कारण असे आहे का कि त्या देशांचे नागरीकत्व काही काळाने मिळू शकते ?
गल्फ मधल्या देशात ती शक्यता नाही. अनेक वर्षे तिथे नोकरी केली तरी निवृत्त झाल्यावर भारतात येण्याशिवाय पर्याय नसतो. त्या दरम्यान जर इतर कुठल्या देशाचे नागरीकत्व मिळवले ( कॅनडा, ऑस्ट्रेलिया ) तर ठिक. अनेकजण आपल्या मूलांना मात्र उच्च शिक्षणासाठी युरप किंवा अमेरिकेत पाठवतात. ( हे खुपदा त्या देशातील कमाई / बचतीमूळे शक्य होते )
आफ्रिकेतील देशांचेही नागरीकत्व मिळू शकते. आणि इथल्या देशात राहणेही सुखावह असू शकते. तसे नागरीकत्व अनेक जण घेतात आणि कालांतराने आपल्या सर्व परीवारालाच इथे आणतात.
आणखी एक मुद्दा आहे, शिक्षण आणि इतर सामाजिक कारणांसाठी भारतीयांना परदेशी स्वीकारले जाते. पण इतर देशातले नागरीक भारतात शिक्षणासाठी आले तरी त्यांना इथे कायमचे स्थायिक होणे शक्य होत नाही. सेवाभावी वृत्तीने आलेले युरोपियन्स अपवाद आहेत, माझा रोख आफ्रिकेतील तरुणांवर आहे.
घमासान व मस्त चर्चा झडलेली
घमासान व मस्त चर्चा झडलेली आहे.
Pages