स्वदेशी स्थलांतर - Reverse Migration

Submitted by बेफ़िकीर on 19 June, 2015 - 12:48

खरे तर ही एखादी चालू घडामोड नाही, ही बहुधा एक मोठी व्याप्ती असलेली प्रक्रिया असावी. अगदी प्रामाणिकपणे सांगायचे तर मला देशांतर्गत स्थलांतराबाबत लिहावेसे वाटत होते कारण परवाच एकांशी चर्चा करताना असे आढळले की मोठ्या शहरातून लोक आता पुन्हा स्वगृही परतू लागले आहेत. अश्या परतण्याची कारणे आहेत त्यांच्या मूळ गावीही बर्‍यापैकी विकास झालेला असणे, तेथे राहण्याचा खर्च कमी असणे, तेथे मोठ्या शहरांसारख्या संधी उपलब्ध झालेल्या असणे, तेथे त्यांचे स्वतःचे घर असणे आणि कुटुंबास आवश्यक असतात त्या बाबी आता तेथेही उपलब्ध असणे, जसे चांगल्या शाळा, रुग्णालये वगैरे! ह्या गोष्टीबद्दल लिहावेसे वाटले कारण त्यातून काही बकाल झालेल्या मोठ्या शहरांना कदाचित पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त होण्याची चाहुल ऐकू येत होती. सर्वत्र जवळपास समान विकास झाला तर यंत्रणा, संसाधने ह्यावरील ताण अर्थातच विभागला जाईल हा फायदा जाणवत होता. पुण्या-मुंबईहून महाराष्ट्रातील इतर प्रगत शहरे जसे नागपूर, औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर येथे मंडळी परतणे ही बाब कितपत प्रमाणावर घडत आहे, कोणाचे अनुभव काय आहेत अशी चर्चा होईल असे मनात आले.

मात्र त्याआधी सहज 'रिव्हर्स मायग्रेशन' गूगलवर सर्च केले तर आंतरराष्ट्रीय स्तरावर (विशेषतः प्रगत देशांमधून भारतात परतणारे) लोक मोठ्या प्रमाणावर आहेत असे एक चित्र दिसले. अनिवासी भारतीयांनी भारतात पाठवलेला पैसा हा भारतीय संसाधने व यंत्रणांचा वापर न करता निर्माण झालेला पैसा असल्याने तो भारतासाठी बहुमोल ठरतो हे माहीत होते. कदाचित कालांतराने हा ओघ प्रभावित होईल वगैरेही! पण ह्या आंतरराष्ट्रीय पुनर्स्थलांतराचे इतर काय काय परिणाम होऊ शकतील ह्या विचाराने व्यापलो.

मुळात भारताला हे समजून घ्यावे लागेल की असे उलटे स्थलांतर फायदेशीर ठरू शकते. जेव्हा येथून लोक नव्वदच्या दशकात मोठ्या प्रमाणावर तिकडे जाऊ लागले तेव्हा भारताला वाईट वाटत होते असे एका ठिकाणी लिहिलेले आढळले. आता ते लोक किंवा त्यांच्यापैकी काही परत येत आहेत तेही चांगले ठरू शकेल हे मान्य करायला हवे. प्रत्येकजण जे काही करतो ते स्वतःच्या फायद्यासाठी करतो. येणारे लोक त्यांना अधिक सुखासीन आयुष्य जगता येईल ह्या आशेने आलेले असणार, येत असणार आणि येतील. अशा लोकांकडून आपला काय फायदा होईल ह्यावर भारतातील तज्ञ मंडळी नक्कीच विचार करत असतील. असे वाटते की अश्या लोकांकडून खालील गोष्टी येथे येतील.

१. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रगत संस्कृतीत असलेले माणसाचे महत्त्व! माणसेच कमी असल्यामुळे म्हणा किंवा सुबत्ता असल्यामुळे म्हणा किंवा संस्कृतीच तशी असल्यामुळे म्हणा, ऐकीव व वाचीव माहितीनुसार विकसित राष्ट्रांमध्ये सामान्य माणसाला भारतातील सामान्य माणसापेक्षा खूप अधिक आदर व किंमत मिळते. त्याच्या प्रश्नांना प्राधान्य मिळते. ह्यामुळे भ्रष्टाचार, सुरक्षितता, जीवनमानाचा दर्जा, स्वच्छता ह्या निकषांवर तो माणूस इथल्या माणसापेक्षा नकळतपणे अधिक सुखी असतो / असावा. अश्या संस्कृतीत वीस, तीस वर्षे काढलेली पण मुळात आपलीच असलेली माणसे येथे परतली तर येथे अशी संस्कृती निर्माण करत राहण्याचा ते त्यांच्यापरीने आटोकाट प्रयत्न करत राहतील. सेवाक्षेत्र, उत्पादनक्षेत्र, शासन-प्रशासन, पायाभूत सुविधा व इतर अगणित यंत्रणांकडून त्यांच्या असलेल्या अपेक्षा इथल्यांच्या अपेक्षांच्या तुलनेत अधिक तीव्र असतील व त्या तीव्रपणे मांडल्याही जातील. अतिशय कमी वेगाने का होईनात पण ह्या अपेक्षा योग्य आहेत हे सर्वत्र पटायला लागेल व एकुणच जीवनमान सुधारू शकेल. सच्चाई, सुरक्षा, शब्दाचे / वेळेचे महत्त्व, सेवा ह्या शब्दांना काहीतरी विश्वसनीय अर्थ प्राप्त होऊ शकेल. ह्या प्रक्रियेत खूप माणसे असंतुष्ट होतील, काही गारदही होतील पण बहुतांशी हालचालींची दिशा सुधारणेकडेच असेल.

२. हे लोक प्रदीर्घ काळ विकसित राष्ट्रांमध्ये राहिलेले असल्यामुळे त्यांच्याशी व्यवसाय करणे हे विकसित राष्ट्रांना अधिक विश्वासार्ह वाटू शकेल. त्यातून व्यवसायाला कदाचित आणखी वरचा गिअर टाकता येईल. शिवाय त्यातून पर्यटन वाढू शकेल. समाजात सधन माणसांची संख्या वाढली तरी गरीब-श्रीमंतांमधील दरी लहान होईल की नाही हे समजत नाही आहे. पण अधिक पैसा फिरू लागेल.

३. भारतात कदाचित अजूनही स्वप्नवत वाटणार्‍या काही सेवा, काही व्यवसाय हे नव्याने सुरू होऊ शकतील. त्याशिवाय अंतर्गत स्पर्धा वाढून एकंदरीत ग्राहकाचाच फायदा होईल.

४. पायाभूत सुविधांमधील चांगले बदल कानाकोपर्‍यात पोहोचू लागतील.

अर्थात हे सर्व फायदे म्हणजे 'थेंबे थेंबे' स्वरुपाचे आहेत. ह्याचे कारण भारतात असलेल्या एकशे तीस कोटींमध्ये बाहेरून येऊन येऊन येणार किती लोक? फार तर एक कोटी! तेही एकदम नाहीतच!

पण मग ही प्रक्रिया वेगवान व्हावी ह्यासाठी भारताने प्रयत्न करावेत का? मुळात आपला देश आपल्या परदेशी राहणार्‍या नागरिकांना सर्व दृष्टींनी राहण्यालायक वाटावा ह्यासाठी प्रयत्न करावेत का?

हे प्रयत्न केवळ त्याच नागरिकांसाठी करावेत असे म्हणणेही वेडेपणाचे आहे. हे प्रयत्न मुळातच होणे देशासाठी आवश्यक आहे. जसे रस्ते, वीज, शिक्षण, पाणी, अन्न, सुरक्षितता, पारदर्शकता इत्यादी!

आणि मग हे तर पाचवीला पूजलेलेच प्रश्न आहेत की? त्यात काय नवे? ह्या मुद्यांची आश्वासने देऊनच तर सरकारे येत आहेत आणि सरकारे जातही आहेत.

पण तरीही आत्ता उलटे स्थलांतर सुरू आहे. ह्याचे एक मुख्य कारण म्हंटले जाते येथे असलेल्या अमाप संधी! ह्या विषयावर वाचायला मिळालेल्या ह्या लेखात असे आढळले की भारतात इतर अनेक गोष्टी नकारात्मक असूनसुद्धा येथे व्यवसाय निर्माण करणे, तो चालवणे व फायद्यात आणणे मोठ्या प्रमाणावर शक्य आहे. येथे प्रचंड संधी आहेत. हा लेख पत्थर की लकीर मानावा असे म्हणणे नाही. उलट मायबोलीवर असलेल्या अनेक अनिवासींनी आपले प्रांजळ मत लिहावे. पण उलटे स्थलांतर तर होत आहे असे विकिवरही म्हंटलेले दिसत आहे. (निव्वळ स्थलांतर व ब्रेन ड्रेन ह्यातील फरक विचारात घेऊनही लेखातील विषयाच्या व्याप्तीपुरते दोहोंना मी एका पातळीवर गृहीत धरत आहे).

१. भारतात परत येणारे अनिवासी अधिक सुखदायी संधींमुळे परत येत आहेत का?

२. आपल्या पुढच्या पिढीचे संगोपन आपल्या संगोपनाशी मिळतेजुळते असावे म्हणून परत येणारे काही आहेत का?

३. परदेशात दीर्घकाळ राहण्याने काही इतर प्रश्न उद्भवल्यामुळे परत येत आहेत का, जसे स्व-संस्कृतीत परतण्याची तीव्र इच्छा होणे किंवा सातत्याने परकेपणा जाणवत राहणे, एकलकोंडेपणा वाटणे किंवा तत्सम!

४. भारतात परतणारे नगण्य आहेत का? की नाहीच आहेत?

भारताबाहेर राहण्याचा काडीचा अनुभव नसूनही ह्या शंका विचाराव्याश्या वाटल्या.

धन्यवाद!

===========

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुमच्या आशादायी विचारांचे कौतुक वाटते.

भारतात काय कमी चांगले, हुषार, कामसू, कर्तबगार लोक आहेत का? कित्येक वर्षांपूर्वीपासून आहेत. संख्येने तर इतर अनेक देशातल्या अश्या लोकांपेक्षा जास्तच. सुधारतेच आहे ना परिस्थिती? ( मला तरी बराच फरक जाणवतो).
आज प्रगत देशांत जे आहे ते भारतात बसून सगळे कळते इंटरनेट मुळे. फोन करून, स्काईप वरून प्रत्यक्ष चर्चा पण करता येते. त्यातले काही घेण्याजोगे, भारतात चालेल असे असेल तर भारतात आजहि करता येईल.

एवढ्या मोठ्या लोकसंख्या असलेल्या देशात काही थोडे लोक येऊन कितपत फरक पडणार आहे? मुळात त्यांना तो फरक कुणि करू देईल का?

माझि कारणे :

२. आपल्या पुढच्या पिढीचे संगोपन आपल्या संगोपनाशी मिळतेजुळते असावे म्हणून परत येणारे काही आहेत का?

३. परदेशात दीर्घकाळ राहण्याने काही इतर प्रश्न उद्भवल्यामुळे परत येत आहेत का, जसे स्व-संस्कृतीत परतण्याची तीव्र इच्छा होणे किंवा सातत्याने परकेपणा जाणवत राहणे, एकलकोंडेपणा वाटणे किंवा तत्सम!

मी जे लिहितो ते माझ्या माहितीप्रमाणे लिहितो. यात भारतावर टीका करण्याचा उद्देश नाही. तसा कधीच नव्हता पण एकदा नाव कानफाट्या पडले की काय लिहीले आहे ते वाचण्यापूर्वीच मला शिव्या देण्याचे काम लोक करत असतात. करू देत.
गंमत म्हणजे अमेरिकेतल्या अनेक भारतीयांना तसे वाटत नाही. असो.

माझ्या माहितीतले जे परत गेले त्यातले बरेच जण इथे एच १ का कसलेसे व्हिसा घेऊन आले होते. नंतर बरीच वर्षे ग्रीन कार्ड मिळाले नाही म्हणून कंटाळून परत गेले. काही त्यांच्या भारतातील कंपनीने त्यांना परत बोलावले म्हणून गेले, काही थोडे आई वडीलांची काळजी घेण्यासाठी गेले.

काही जणांकडे भारतात प्रचंड पैसा, ओळखी इ. असल्याने परत गेले. ते इथे असताहि जाऊन येऊन असत म्हणून त्यांचे संबंध टिकले होते. (तिथे नोकर मिळतात, शोफर, आचारी, माळी सगळे स्वस्त नि मस्त. आपण नुसती चैन करायची! आजकाल भारतात सगळे काही मिळते, करायची काय अमेरिका? आपले बॉलीवूड, कोल्हापुरी मटण मस्त!)

दोन तीन कुटुंबे मुले लहान असताना गेली होती. मुलांना काही प्रॉब्लेम नव्हते, पण आई बाबांना (नोकर मिळतात, शोफर, आचारी.....) इ. गोष्टींपेक्षा (सेवाक्षेत्र, उत्पादनक्षेत्र,) इ. बद्दल त्यांच्या अपेक्षा अधिक तीव्र असल्याने व त्या पुरवल्या जाण्याची शक्यता न दिसल्याने परत आले. भारताचा आपण किंवा आपल्यासारखे हजारो लोकसुद्धा उद्धार करू शकणार नाहीत असे त्यांना वाटले. भारताबद्दल वाईट बोलत नाहीत पण चांगलेहि नाही. ते येथे सुखी आहेत.

माझ्या सारखे काही जण शेलारमामाने दोर कापल्याने लढत राहिले. मेले नाहीत हे नशीब, नोकर, शोफर, आचारी, माळी काही नसताना पैसे देऊन त्या सेवा खरेदी करू शकतात. नि बॉलीवूड इतकीच हॉलिवूड व कोल्हापुरी मटण ऐवजी इथले पदार्थ आवडू लागले.

माझ्या माहितीप्रमाणे आपण भारताचा उद्धार करावा वगैरे उदात्त कारणां साठी कुणि गेले नाहीत.

एका कुटुंबाची शोककथा - तेलुगु, कट्टर हिंदू ब्राह्मण. इथे दोन मुली जन्माला आल्या, मोठी दहा वर्षाची झाल्यावर
तिच्यावर अमेरिकेचे वाईट संस्कार होऊ नयेत म्हणून आर्थिक तोटा पत्करून भारतात गेले. मुलगी अठरा वर्षाची झाल्यावर एका मुसलमानाचा हात धरून पळून गेली. त्याचा मित्र इथेच राहिला. त्याच्या मुलीने इथेच एक भारतीय तेलेगु हिंदू शोधला. पद्धतशीरपणे दोन्ही कडल्या आई वडीलांची परवानगी घेऊन मग लग्न केले.

इतरहि कुणाच्या मुली किंवा मुले अमेरिकन संस्कृतीमुळे हातची गेल्याचे ऐकले नाही. अशी बातमी अर्थातच वार्‍यासारखी पसरली असती. पण तसे अजून काही ऐकले नाही.

पण अमेरिकन शिक्षणामुळे त्यांना यांच्या बापांना मिळालेल्या नोकर्‍यांपेक्षा दसपट चांगल्या नोकर्‍या आहेत. माझ्या माहितीतल्या सर्व मुलांना बापाची इस्टेट मिळाली तर पडणारा प्रचंड टॅक्स वाचवण्यासाठी आत्तापासूनच काळजीपूर्वक काहीतरी हालचाल करायची आहे. बाबा, आई, पैसे खर्च करा! असे सांगत असतात. बाबांच्या घराहून चांगले घर त्यांचे.

असो.

तरीपण बेफिकीर, तुमचे स्वप्न खरे ठरो - इथले लोक तिथे येऊन किंवा भारतीयांनीच हवे ते मिळवल्यामुळे.

माझे बाबा म्हणतात, जिथे भरतो डेरा गड्या तोच गाव बरा! By choice होणारी बहुतांशी स्थलांतरे (कोणत्याही बाजूला) for better prospects ह्या एकाच कारणामुळे होतात आणि त्यात काहीही चूक नाही.
मला फक्त एवढंच वाटतं की ते better prospects मिळवताना किंवा मिळवण्यासाठी तुमच्या आनंदाचा बळी देऊ नका. एका माणसाच्या असण्याने किंवा नसण्याने भारत आणि अमेरिका ह्या खंडप्राय देशांना शष्प फरक पडत नाही. त्यामुळे तुम्हाला जिथे आनंद मिळेल तिथे राहा. Stay wherever you find happiness or find happiness wherever you stay!No regrets is the key to happiness!
When you ask yourself "why am I here?" you know that you are not in the right place! Because when you are in the right place this question never shows up!

धन्यवाद.

तुमच्या सारखे वाचून प्रतिसाद देणारे थोडेच उरले आहेत मायबोलीवर बहुतेक जण लिहिणार्‍याचे नाव बघूनच काञ ते लिहीतात. मी भारताविरुद्धच लिहिणार असा इथला समज असल्याने मी भारताबद्दल चांगले लिहीले तरी ते कुत्सितपणे, उपहासाने लिहीले आहे, असेच त्यांना वाटते. काही लिहीले नाही तरी त्याला ते टीकाच समजतात नि माझ्यावर आपला इकडचा तिकडचा राग काढतात झाले.

झक्की,

आपण म्हणालात त्याप्रमाणेच आपली पोस्ट ही आपल्या माहितीनुसार आहे हे दिसत आहे. शिवाय, प्रदीर्घकाळ तिकडे असल्यामुळे आपली माहिती ही येथील कित्येकांच्या माहितीपेक्षा खूप अधिक आणि मुख्य म्हणजे माझ्यासारख्याच्या माहितीपेक्षा अनेक पटींनी अधिक असल्याचेही दिसत आहे. पण तुमची पोस्ट वाचून मला नेमका मुद्दा समजलाच नाही. म्हणजे तुम्ही तिकडून इकडे परत येणार्‍यांच्या परतण्याची विविध कारणे दिलेली दिसत आहेत. पण त्याचा अर्थ असा होत आहे का की खालीलपैकी एकही गोष्ट होत नाही आहे?

१. अधिक सुखदायी (इन टर्म्स ऑफ मूळ नागरीक असणे, तरीही इतरांच्या तुलनेत खूप चांगले राहणीमान असणे व अमेरिकन राहणीमानाच्या तुलनेत विशेष काही तडजोडी न कराव्या लागणे) राहणीमानासाठी रिव्हर्स मायग्रेशन होणे!

२. मुलांचे संगोपन भारतीय पद्धतीने व्हावे ह्यासाठी स्वदेशी स्थलांतरीत होणे!

३. परदेशापेक्षा अधिक संधी भारतात उपलब्ध झाल्याचे समजल्यामुळे स्वदेशी स्थलांतरीत होणे!

तुमच्या पोस्टवरून असे वाटत आहे की स्थलांतर करणार्‍यांचे निर्णय कसे चुकले ह्याची तरी उदाहरणे तुम्ही दिली आहेत किंवा ज्यांचे निर्णय चुकले नाहीत त्यांचे आधीच भारतात सर्व काही आलबेल कसे होते ह्याची तरी उदाहरणे दिलेली आहेत. हे माझे आकलन, चुकीचे असल्यास अवश्य सांगावेत.

मात्र एक स्वतंत्र पोस्ट म्हणून पोस्ट आवडलीच. पण ती 'पटली / पटली नाही' वगैरे परिघात आहे असे वाटलेच नाही, ह्याची कारणे वर दिली आहेतच.

मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये कोणताही देश स्थलांतर "घडवून" आणू शकत नाही. दोन्ही देशांतील तुलनात्मक परिस्थितीचा तो इफेक्ट असतो.
१. लोक परदेशी जातात (किंवा परत येतात) ते एखादी स्पेसिफिक चांगली संधी आली म्हणून. जेव्हा त्या संधीमधून तुम्हाला मिळणारं समाधान किंवा युटिलिटी (पैसे वगैरे सर्व एकत्र करून) तुम्हाला त्याज्याव्या लागणार्या गोष्टींपेक्षा (उदा. क्वालिटी ऑफ लाईफ) अधिक असेल त्यावेळी तुम्ही परत जाल. हेच लॉजिक भारताहून दुसरीकडे जाणार्य लोकांसाठीही लागू आहे. मिळणारी युटिलिटी ही त्याज्याव्या लागणार्या गोष्टींपेक्षा (कुटुंब, मित्र, शहर ई.) अधिक असली पाहिजे.

२. १२० कोटींच्या देशांतून काही लाख लोक गेल्याने (किंवा परत आल्याने) काहीही फरक पडत नाही. बाहेर गेलेले लोक हुशार आणि इथेच राहिलेले सुमार असं काहीच गणित नसतं. त्याचबरोबर, मुक्त अर्थव्यवस्थेत सर्व पेटंट, रीसर्च ई. विकत घेता येतात. आणि ती पेटंट भारतात जरी विकसित झाली तरी खाजगी कंपन्या त्या विकतच देतात. थोडक्यात, स्थलांतरामुळे (किंवा रिव्हर्स मायग्रेशनमुळे) विकासावर नगण्य परिणाम होतो.

३. स्थलांतराचा निर्णय जरी आज घेत असलो तरी त्याचे परिणाम पुढचे अनेक वर्षं भोगायचे असतात. त्यामुळे कोणताही माणूस हा निर्णय घेताना अधिक रिस्क अ‍ॅव्हर्स असतो. त्याच्यामुळे क्वालिटी ऑफ लाईफ सारख्या गोष्टींना वाजवीपेक्षा अधिक महत्व दिले जाते. म्हणूनच तुलनेने कमी लोक परत येताना दिसतात. My hypothesis is that given the economic opportunities, if one improves the quality of life, you would see a threshold effect in reverse migration.

निकीत,

आपली पोस्ट 'स्थलांतर म्हणजे काय व ते कधी / का होते' ह्यावर सुंदर भाष्य करते. तसेच हे मुद्दे मूळ लेखातही लिहिले गेलेले आहेत. मात्र तुमच्या पोस्टमधील शेवटचे वाक्य खूप महत्त्वाचा मुद्दा मांडून गेले व त्याचबाबत हा लेखही आहे. Happy

त्याबाबत शक्य झाल्यास अधिक लिहावेत अशी विनंती!

म्हणजे:

१. राहणीमानाचा दर्जा - तुलना, महत्त्वाचे घटक वगैरे
२. आपलेच लोक स्वदेशी येण्याबरोबर परदेशी लोकही इकडे येण्यासाठी काय व्हावे लागेल वगैरे! (आत्ताच्या परिस्थितीतच काय तर कदाचित पुढची पन्नास वर्षेही ते येणार नाहीत ह्याची कल्पना आहे पण शेवटी संधी, राहणीमान आणि ऐषोआराम ह्यांचे वाढीव प्रमाण मिळाले तर माणूस कुठेही जाईल हे तुम्ही व मी म्हंटल्याप्रमाणेच)

धन्यवाद!

कोणी काहीही कारणे दिली तरी मुळात कुठलेही स्थलांतर हे ठराविकच मुद्द्यांवर होते.
१. आर्थिक समृद्धी व त्या अनुषंगाने येणारे फायदे, सुखसोयी.
२. अस्तित्वाचा/ जगण्याचा प्रश्न - मूळ ठिकाणी राजकीय वा सामाजिक उलथापालथीमुळे ठराविक गट किंवा विचारसरणीवर आलेला घाला. (ज्यूंचे उदाहरण आहे.)

मला वाटते पहिल्या कारणाने सोडून गेलेले लोक परत यायचे मूळ ठिकाणी तर मूळ ठिकाणाकडे एक्झॅक्टली तेच प्रॉमिस असायला लागेल.

दुसरे कारण भारतीय संदर्भात सध्या तरी एखादेदुसरे उदाहरण वगळता नसावे. त्यामुळे त्यावर चर्चा सध्या नको.

परदेशात आता मुळे रुजलेले लोक परत आलेच पाहिजेत आणि त्याने भविष्यकाळ उज्वल होईल/ मदत होईल असे मला वाटत नाही.

वैयक्तिक पातळीवर या पर्यायाचा अनेकदा विचार करून बघितल्यामुळे असेल पण देशांतर्गत रिव्हर्स मायग्रेशनची (शहरातून छोटे गाव) सुरूवात आहे बारीक पातळ्यांवर ती मला इंटरेस्टिंग वाटते. अभ्यासावीशी वाटते.

बाकी हिंदू ब्राह्मण मुलीने मुसलमानाशी लग्न करण्यात संस्कृतीचा र्‍हास आणि जातीतच लग्न करण्यात संस्कृती पाळणे आहे असे मांडलेले गृहितक आणि त्याला आलेले टाळ्यांचे प्रतिसाद हे फारच मजेशीर.

I am sorry for writing this post in English, but it will take me hours and hours to write in marathi script

Mi us madhye geli 15 varshe ahe.
Gelya kahi varasht mazya mahititale/ group madhale kahi jan bhartat parat gele (I am using gele since I am in US) ahet ( less than 1%). Pan almost sarva jan ex Patriot mhanun gele ahet and mahatvache mhanje every one of them has made sure that they or their kids can come back to US any time they wish (everyone has made sure that they have US citizenship).

As Zakki has said there is another class of people who are in a different financial strata who mostly have returned to start their own business and use their international contacts.

Ones again sorry for English, I am learning the script but …

झक्की तुमची पोस्ट बरीचशी पटली पण " मुसलमानाचा हात धरून पळून गेली" हे वाक्य खटकले. त्यात शोककथा म्हणण्यासारखे काय आहे ? कुणी सांगावे ती आपल्या घरी सुखीही असेल. ओळखीतल्या एका मुलीने असेच "हात धरून पळून जाऊन" लग्न केले आणी ती सुखी आहे. तिच्या बहिणिचे अक्षरशः एक किलो सोने देऊन लग्न केले आणी ती वर्शभरातच नवर्‍याच्या दारू च्या व्यसनाला कंटाळून घरी आली.

> आपलेच लोक स्वदेशी येण्याबरोबर परदेशी लोकही इकडे येण्यासाठी काय व्हावे लागेल वगैरे!

कशाला उगाच ? भारतातील नैसर्गिक साधन संपत्तीवर आधीच प्रचंड लोकसंख्येचा भार आहे. मुंबई पुण्यात खचाखच भरलेली गर्दी पाहून आणखी भर कशाला?

> आपलेच लोक स्वदेशी येण्याबरोबर परदेशी लोकही इकडे येण्यासाठी काय व्हावे लागेल वगैरे!

भारतात सध्या भरपुर परदेशी लोक येतात. येथे गुरगावात तर भरपुर आहेत. चीनी कोरियन, जपानी सगळ्यात जास्त. माझ्या कंपनीत साधारण १५० आहेत. तेव्हा परदेशी लोक येण्यासाठी काही करायची गरज नाही. बिझनेस आहे लोक येतात. दिल्ली गुरगाव एवढे बदनाम असुन सगळ्यात जास्त परदेशी लोक येथेच आहेत.

असो मी पण दुबई सिंगापुर सोडुन आलो. एकतर चांगली पोझीशन, पैसा मिळाला आणि चक्क भारतात work life balance चांगला आहे माझ्यासाठी. तेव्हा परत जाईन असे वाटत नाही. बाकी काही कारण नाही परत येण्याचे. चांगली पोझीशन, पैसा मिळाला तर परत जाईन पण शक्यता कमी वाटते Happy

>>> पण " मुसलमानाचा हात धरून पळून गेली" हे वाक्य खटकले. <<<<
मला यात खटकण्यासारखे काहीही वाटले नाही. "परधर्मो भयावहः" ही उक्ति आम्ही विसरलो नाही आहोत, किंवा "स्वधर्म" सोडण्यामुळे विसरलो आहोत असेही नाही, सबब खटकत नाही.

>>> पण " मुसलमानाचा हात धरून पळून गेली" हे वाक्य खटकले. <<<<

मला त्या वाक्याचा भर ती पळून जाण्यावर जास्त असावा असं वाटलं आणि मी त्याच अर्थाने घेतलं. शिवाय कट्टर हिंदू ब्राह्मण असताना मुसलमान मुलाची निवड हा एक मुद्दा असू शकतो असं वाटतं. तिने धर्म बुडवला वगैरे असं कुठेही लिहीलं नाहीये.

>>>बिझनेस आहे लोक येतात.<<<

हेच महत्त्वाचे आहे. म्हणजे कोठेतरी 'परदेशवासियांना भारतात समृद्धीसाठी यावेसे वाटण्याइतपत' व्यावसायिक विकास होण्याच्या दिशेने आपण जात आहोत असे मानायला हरकत नसावी. खूप वर्षे बाहेरचे नागरीक भारतात कायमसाठी (किंवा प्रदीर्घकाळासाठी) स्थलांतरीत होणे अशक्यप्राय वाटत असे.

म्हणजे कोठेतरी 'परदेशवासियांना भारतात समृद्धीसाठी यावेसे वाटण्याइतपत' व्यावसायिक विकास होण्याच्या दिशेने आपण जात आहोत असे मानायला हरकत नसावी <<
याचे समाधान मानायचेच का?

वाढत चाललेली आर्थिक विषमता, नैसर्गिक साधनसंपत्तीची उधळमाधळ आणि र्‍हास ही किंमत देऊन हा व्यावसायिक विकास होत असेल तर तो खरेच गरजेचा आहे का?

आर्थिक विषमता - ह्याबाबत मूळ लेखातच मी म्हणालो आहे की ही दरी वाढेल किंवा कसे ते मला समजत नाही आहे.

उधळमाधळ / र्‍हास - परदेशी लोक नाही आले तरी ते सुरू राहील. तसाही त्या गोष्टींचा परदेशी लोक येण्याशी फारसा संबंध दिसत नाही. मात्र आपले परदेशातील लोक आणि परदेशी लोक इकडे येऊ लागले तर त्यांना हवी असलेली जीवनशैली ते एक्स्पेक्ट करत राहतील आणि त्यातून एक ओव्हरऑल विका (अत्यल्प वगैरे प्रमाणात का होईना) सुरू होईल असे म्हणायचे आहे. आज असा विकास करताना डोळ्यासमोर भारतातील भारतीय आहे, परदेशातील भारतीय व परदेशी नागरीक नाही आहेत असे वाटते.

मला वाटतं कुठल्याही देशाने विकासाचा विचार करताना देशातील जनतेलाच डोळ्यासमोर ठेवून केला पाहिजे. परदेशातल्या भारतीयांना डोळ्यासमोर ठेवून किंवा परदेशी नागरिकांना डोळ्यासमोर ठेवून विकासाचा विचार करायचे कारणच काय?

म्हणजे परदेशी भारतीय आणि परदेशी नागरिक यांचे हित बघितले की देशातल्या तमाम जनतेचेही हित बघितले जाणार?
मग इथेच मतभेद आहे त्यामुळे लिहिणे थांबवते.

मला वाटतं कुठल्याही देशाने विकासाचा विचार करताना देशातील जनतेलाच डोळ्यासमोर ठेवून केला पाहिजे. परदेशातल्या भारतीयांना डोळ्यासमोर ठेवून किंवा परदेशी नागरिकांना डोळ्यासमोर ठेवून विकासाचा विचार करायचे कारणच काय?
>> I don't think any govt keeps NRI or Foreginers in mind while planning development in the country. Yes FDI or NRI inverstments must be considered. Foreigners / NRIs coming and staying in India is a part of the process / globalisation . No need to give too much importance to this thing.

म्हणजे परदेशी भारतीय आणि परदेशी नागरिक यांचे हित बघितले की देशातल्या तमाम जनतेचेही हित बघितले जाणार?
मग इथेच मतभेद आहे त्यामुळे लिहिणे थांबवते.<<<

हित आणि विकास ह्या दोन वेगळ्या गोष्टी नाहीत का? परदेशी आणि अनिवासी भारतियांचे हित पाहणे म्हणजे इतरांना जे मिळू शकत नसेल ते त्यांना प्राप्त करून देण्यास विशेष सहकार्य करणे! मात्र परदेशी नागरीक आणि अनिवासी भारतियांच्या विकसित जीवनशैलीला उद्दिष्ट मानून विकासकार्य केल्यावर ते सगळ्यांसाठीच हितकारक ठरणार ना? उदाहरणार्थ रस्ते, वाहने, संस्थांमधील पारदर्शकता इत्यादी!

(हित आणि विकास हे शब्दांचे खेळ वगैरे नाहीत)

==============

>>>I don't think any govt keeps NRI or Foreginers in mind while planning development in the country.<<<

१. मुद्दा पहिला म्हणजे असा की आज कोणी असे करत नाही म्हणून कधीच करू नये का?

२. मुद्दा दुसरा असा की पर्यटनावर अर्थकारण चालवणारे देश, तंत्रज्ञान विकासावर जगभरच्या नागरिकांना आकर्षित करणारे देश हे मुळातच (काही प्रमाणात तरी) देशाबाहेरील लोकांना डोळ्यासमोर ठेवून नियोजन करतात ना? मी आपला थायलंडलाच जाऊन आलेलो आहे म्हणून तिथले बोलतो की तिथे विदेशी पर्यटक हा विकासाला चालना देणारा घटक आहे. तेथील विकास थाई लोकांपेक्षा पर्यटकांना डोळ्यासमोर ठेवून झालेला असावा / आहे. पण त्याचा लाभ थाई नागरिकांनाही मिळतच आहे. असेच माझ्या अल्प माहितीनुसार श्रीलंका, मलेशिया, काही प्रमाणात हाँगकाँग व सिंगापूर येथेही होत असेल / असावे.

२. मुद्दा दुसरा असा की पर्यटनावर अर्थकारण चालवणारे देश, तंत्रज्ञान विकासावर जगभरच्या नागरिकांना आकर्षित करणारे देश हे मुळातच (काही प्रमाणात तरी) देशाबाहेरील लोकांना डोळ्यासमोर ठेवून नियोजन करतात ना? You are mixing two subjects. These countries are developing tourist based economy. Your subject of this thread is reverse migration. Anyway can't write much from mobile.

>>> पण " मुसलमानाचा हात धरून पळून गेली" हे वाक्य खटकले. <<<<

>> माझ्यामते झक्किंना एवढेच म्हणायचे आहे कि ते कुटुंब ज्या कारणासाठी ते आर्थिक तोटा सहन करून इथे आले ते त्यांचे 'विशिष्ट' उद्दिष्ट पुर्ण झाले नाही. त्यांचे 'ते' उद्दीष्ट चांगले होते कि वाईट यावर झक्किंनी काहीही भाष्य केलेले नाही. त्यामुळे खटकायचे कारण नसावे.

(अर्थात झक्किंचा प्रतिसाद बेफिंनी मूळ लेखात विचारलेल्या प्रश्नांची काहीच उत्तरे देत नाहीत याच्याशी सहमत).

मंदार,

मान्य आहे की पर्यटन व्यवसायाधारित अर्थकारण आणि स्वदेशी स्थलांतर हे दोन भिन्न विषय आहेत. पण मी गोंधळल्यामुळे वगैरे विषय मिसळत नाही आहे तर चर्चेत निघतील तश्या मुद्यांवर बोलत असल्यामुळे ते मिसळल्यासारखे वाटत आहेत. तुमचे म्हणणे असे की कोणताही देश एन आर आय लोकांना डोळ्यासमोर ठेवून योजना आखत नाही. इतक्या आणि इतक्याच मुद्यावर मी म्हणत आहे की अश्या योजना करणारेही देश आहेत. आता तुम्ही जर असे म्हणाला असतात की 'स्वदेशी स्थलांतर करणार्‍यांकडे बघून भारताने नियोजन करू नये' तर त्यावर वरती चर्चा झालेली आहे व अजूनही चर्चा सुरूच आहे.

इतर देशांचा विषय तुमच्या 'I don't think any govt keeps ......' ह्या विधानामुळे आला आहे. Happy

Pages