स्वदेशी स्थलांतर - Reverse Migration

Submitted by बेफ़िकीर on 19 June, 2015 - 12:48

खरे तर ही एखादी चालू घडामोड नाही, ही बहुधा एक मोठी व्याप्ती असलेली प्रक्रिया असावी. अगदी प्रामाणिकपणे सांगायचे तर मला देशांतर्गत स्थलांतराबाबत लिहावेसे वाटत होते कारण परवाच एकांशी चर्चा करताना असे आढळले की मोठ्या शहरातून लोक आता पुन्हा स्वगृही परतू लागले आहेत. अश्या परतण्याची कारणे आहेत त्यांच्या मूळ गावीही बर्‍यापैकी विकास झालेला असणे, तेथे राहण्याचा खर्च कमी असणे, तेथे मोठ्या शहरांसारख्या संधी उपलब्ध झालेल्या असणे, तेथे त्यांचे स्वतःचे घर असणे आणि कुटुंबास आवश्यक असतात त्या बाबी आता तेथेही उपलब्ध असणे, जसे चांगल्या शाळा, रुग्णालये वगैरे! ह्या गोष्टीबद्दल लिहावेसे वाटले कारण त्यातून काही बकाल झालेल्या मोठ्या शहरांना कदाचित पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त होण्याची चाहुल ऐकू येत होती. सर्वत्र जवळपास समान विकास झाला तर यंत्रणा, संसाधने ह्यावरील ताण अर्थातच विभागला जाईल हा फायदा जाणवत होता. पुण्या-मुंबईहून महाराष्ट्रातील इतर प्रगत शहरे जसे नागपूर, औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर येथे मंडळी परतणे ही बाब कितपत प्रमाणावर घडत आहे, कोणाचे अनुभव काय आहेत अशी चर्चा होईल असे मनात आले.

मात्र त्याआधी सहज 'रिव्हर्स मायग्रेशन' गूगलवर सर्च केले तर आंतरराष्ट्रीय स्तरावर (विशेषतः प्रगत देशांमधून भारतात परतणारे) लोक मोठ्या प्रमाणावर आहेत असे एक चित्र दिसले. अनिवासी भारतीयांनी भारतात पाठवलेला पैसा हा भारतीय संसाधने व यंत्रणांचा वापर न करता निर्माण झालेला पैसा असल्याने तो भारतासाठी बहुमोल ठरतो हे माहीत होते. कदाचित कालांतराने हा ओघ प्रभावित होईल वगैरेही! पण ह्या आंतरराष्ट्रीय पुनर्स्थलांतराचे इतर काय काय परिणाम होऊ शकतील ह्या विचाराने व्यापलो.

मुळात भारताला हे समजून घ्यावे लागेल की असे उलटे स्थलांतर फायदेशीर ठरू शकते. जेव्हा येथून लोक नव्वदच्या दशकात मोठ्या प्रमाणावर तिकडे जाऊ लागले तेव्हा भारताला वाईट वाटत होते असे एका ठिकाणी लिहिलेले आढळले. आता ते लोक किंवा त्यांच्यापैकी काही परत येत आहेत तेही चांगले ठरू शकेल हे मान्य करायला हवे. प्रत्येकजण जे काही करतो ते स्वतःच्या फायद्यासाठी करतो. येणारे लोक त्यांना अधिक सुखासीन आयुष्य जगता येईल ह्या आशेने आलेले असणार, येत असणार आणि येतील. अशा लोकांकडून आपला काय फायदा होईल ह्यावर भारतातील तज्ञ मंडळी नक्कीच विचार करत असतील. असे वाटते की अश्या लोकांकडून खालील गोष्टी येथे येतील.

१. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रगत संस्कृतीत असलेले माणसाचे महत्त्व! माणसेच कमी असल्यामुळे म्हणा किंवा सुबत्ता असल्यामुळे म्हणा किंवा संस्कृतीच तशी असल्यामुळे म्हणा, ऐकीव व वाचीव माहितीनुसार विकसित राष्ट्रांमध्ये सामान्य माणसाला भारतातील सामान्य माणसापेक्षा खूप अधिक आदर व किंमत मिळते. त्याच्या प्रश्नांना प्राधान्य मिळते. ह्यामुळे भ्रष्टाचार, सुरक्षितता, जीवनमानाचा दर्जा, स्वच्छता ह्या निकषांवर तो माणूस इथल्या माणसापेक्षा नकळतपणे अधिक सुखी असतो / असावा. अश्या संस्कृतीत वीस, तीस वर्षे काढलेली पण मुळात आपलीच असलेली माणसे येथे परतली तर येथे अशी संस्कृती निर्माण करत राहण्याचा ते त्यांच्यापरीने आटोकाट प्रयत्न करत राहतील. सेवाक्षेत्र, उत्पादनक्षेत्र, शासन-प्रशासन, पायाभूत सुविधा व इतर अगणित यंत्रणांकडून त्यांच्या असलेल्या अपेक्षा इथल्यांच्या अपेक्षांच्या तुलनेत अधिक तीव्र असतील व त्या तीव्रपणे मांडल्याही जातील. अतिशय कमी वेगाने का होईनात पण ह्या अपेक्षा योग्य आहेत हे सर्वत्र पटायला लागेल व एकुणच जीवनमान सुधारू शकेल. सच्चाई, सुरक्षा, शब्दाचे / वेळेचे महत्त्व, सेवा ह्या शब्दांना काहीतरी विश्वसनीय अर्थ प्राप्त होऊ शकेल. ह्या प्रक्रियेत खूप माणसे असंतुष्ट होतील, काही गारदही होतील पण बहुतांशी हालचालींची दिशा सुधारणेकडेच असेल.

२. हे लोक प्रदीर्घ काळ विकसित राष्ट्रांमध्ये राहिलेले असल्यामुळे त्यांच्याशी व्यवसाय करणे हे विकसित राष्ट्रांना अधिक विश्वासार्ह वाटू शकेल. त्यातून व्यवसायाला कदाचित आणखी वरचा गिअर टाकता येईल. शिवाय त्यातून पर्यटन वाढू शकेल. समाजात सधन माणसांची संख्या वाढली तरी गरीब-श्रीमंतांमधील दरी लहान होईल की नाही हे समजत नाही आहे. पण अधिक पैसा फिरू लागेल.

३. भारतात कदाचित अजूनही स्वप्नवत वाटणार्‍या काही सेवा, काही व्यवसाय हे नव्याने सुरू होऊ शकतील. त्याशिवाय अंतर्गत स्पर्धा वाढून एकंदरीत ग्राहकाचाच फायदा होईल.

४. पायाभूत सुविधांमधील चांगले बदल कानाकोपर्‍यात पोहोचू लागतील.

अर्थात हे सर्व फायदे म्हणजे 'थेंबे थेंबे' स्वरुपाचे आहेत. ह्याचे कारण भारतात असलेल्या एकशे तीस कोटींमध्ये बाहेरून येऊन येऊन येणार किती लोक? फार तर एक कोटी! तेही एकदम नाहीतच!

पण मग ही प्रक्रिया वेगवान व्हावी ह्यासाठी भारताने प्रयत्न करावेत का? मुळात आपला देश आपल्या परदेशी राहणार्‍या नागरिकांना सर्व दृष्टींनी राहण्यालायक वाटावा ह्यासाठी प्रयत्न करावेत का?

हे प्रयत्न केवळ त्याच नागरिकांसाठी करावेत असे म्हणणेही वेडेपणाचे आहे. हे प्रयत्न मुळातच होणे देशासाठी आवश्यक आहे. जसे रस्ते, वीज, शिक्षण, पाणी, अन्न, सुरक्षितता, पारदर्शकता इत्यादी!

आणि मग हे तर पाचवीला पूजलेलेच प्रश्न आहेत की? त्यात काय नवे? ह्या मुद्यांची आश्वासने देऊनच तर सरकारे येत आहेत आणि सरकारे जातही आहेत.

पण तरीही आत्ता उलटे स्थलांतर सुरू आहे. ह्याचे एक मुख्य कारण म्हंटले जाते येथे असलेल्या अमाप संधी! ह्या विषयावर वाचायला मिळालेल्या ह्या लेखात असे आढळले की भारतात इतर अनेक गोष्टी नकारात्मक असूनसुद्धा येथे व्यवसाय निर्माण करणे, तो चालवणे व फायद्यात आणणे मोठ्या प्रमाणावर शक्य आहे. येथे प्रचंड संधी आहेत. हा लेख पत्थर की लकीर मानावा असे म्हणणे नाही. उलट मायबोलीवर असलेल्या अनेक अनिवासींनी आपले प्रांजळ मत लिहावे. पण उलटे स्थलांतर तर होत आहे असे विकिवरही म्हंटलेले दिसत आहे. (निव्वळ स्थलांतर व ब्रेन ड्रेन ह्यातील फरक विचारात घेऊनही लेखातील विषयाच्या व्याप्तीपुरते दोहोंना मी एका पातळीवर गृहीत धरत आहे).

१. भारतात परत येणारे अनिवासी अधिक सुखदायी संधींमुळे परत येत आहेत का?

२. आपल्या पुढच्या पिढीचे संगोपन आपल्या संगोपनाशी मिळतेजुळते असावे म्हणून परत येणारे काही आहेत का?

३. परदेशात दीर्घकाळ राहण्याने काही इतर प्रश्न उद्भवल्यामुळे परत येत आहेत का, जसे स्व-संस्कृतीत परतण्याची तीव्र इच्छा होणे किंवा सातत्याने परकेपणा जाणवत राहणे, एकलकोंडेपणा वाटणे किंवा तत्सम!

४. भारतात परतणारे नगण्य आहेत का? की नाहीच आहेत?

भारताबाहेर राहण्याचा काडीचा अनुभव नसूनही ह्या शंका विचाराव्याश्या वाटल्या.

धन्यवाद!

===========

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चर्चा चांगली चालू आहे. माझ्या माहितीत परत आलेले लोक खालील कारणांमुळे आले-
१.पालकांची जबाबदारी
२. मजबूरी(वर्क व्हिसा नाहीये, असलेला जॉब गेला व नवीन मिळेना वगैरे)
३.मुलांना भारतात वाढवायची इच्छा

गेलेले खालील कारणांंमुळे गेले-
१.करियर स्कोप,शिक्षण ,पैसा
२.बेटर लाइफस्टाइल
३. भारतातील करप्शन वगैरे नको वाटतं
४. नीधप यानी जे दुसरं कारण लिहिलंय-एखाद्या समाजाला राजकीय टार्गेट करून उठसूठ झोडायचं त्यामुळे त्यांच्यात असुरक्षितता व आता हा देश आपला राहिला नाही अशी भावना निर्माण होणं.मग सगळेच नातेवाईक जाऊ लागले की chain reaction होते..तो गेला तर मी का नको
५.सामाजिक कारणं- कोणी अविवाहित वा घटस्फोटित असेल किंवा कोणी जोडप्याने मूल नको असं ठरवलं असेल तर आपल्याकडे लोक जाम भोचकपणा करतात. हेही एक कारण परदेशात राहण्यासाठी ऐकलेले आहे.
६. अनेक मुलाना आपल्याला आयुष्यात काय करायचं आहे हे कळायच्या आत पालक परदेशात पाठवतात व पालकांची इच्छा पूर्ण करण्याच्या दबावाखाली मुलं तिथे राहतात. ३०-३५ च्या पुढे परतीचे मार्ग बन्द झालेले असतात.

>>>अनेक मुलाना आपल्याला आयुष्यात काय करायचं आहे हे कळायच्या आत पालक परदेशात पाठवतात व पालकांची इच्छा पूर्ण करण्याच्या दबावाखाली मुलं तिथे राहतात. ३०-३५ च्या पुढे परतीचे मार्ग बन्द झालेले असतात.<<<

बाप रे!

हे बघा बेफी. काही फिरंग्ज इथे फिट होण्याचा जेन्युइन प्रयत्न करत आहेत.
http://www.expatsblog.com/contests/788/15-top-things-to-know-before-movi...

तसेच मी काल इटलीतील टस्कन प्रांतात शिफ्ट होण्या विषयी माहिती गोळा करत होते तर ह्या साइट वर डिटेल वारी माहिती दिली आहे.
http://tuscany.angloinfo.com/नव्या देशात कसे शिफ्ट व्हावे, काय करावे इत्यादि तसे इतर देशांतील लोकांना पचेल रुचेल अश्या त्यांच्या भाषेत जर भारताची नीट माहिती दिली व पेपरवर्क सोपे केले, तर शिफ्टिंग प्रोसेस सोपी जाईल. तुम्हाला अपेक्षित आहेत तशी काही पॉकेट्स डेव्हलप झाली आहेत. मुलांसाठी अमेरिकन स्कूल, आयबी अभ्यासक्रम असलेल्या शाळा, बर्यापैकी इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे मुंबई, गुरगाव, दिल्ही चेन्नाइ इथे थोडे बहुत आहे. पण पहिल्या जगातील उत्तम व अग्रणी लाइफ स्टाइल, आर्थिक सुबत्ता, जग हिंडण्यातील सोपे पणा हे व इतर भरपूर प्लस पॉईंट सोडून भारतात यायचे व राहायचे तर काही तितकेच स्ट्रॉन्ग व भावनिक कारण हवे. जगभरात राहायच्या खूप चांगल्या ऑप्शन्स भरपूर आहेत. भारत ही फक्त त्या पैकी एक आहे.

>>>मुलांसाठी अमेरिकन स्कूल, आयबी अभ्यासक्रम असलेल्या शाळा, बर्यापैकी इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे मुंबई, गुरगाव, दिल्ही चेन्नाइ इथे थोडे बहुत आहे. <<<

उत्तम माहिती!

>>>पण पहिल्या जगातील उत्तम व अग्रणी लाइफ स्टाइल, आर्थिक सुबत्ता, जग हिंडण्यातील सोपे पणा हे व इतर भरपूर प्लस पॉईंट सोडून भारतात यायचे व राहायचे तर काही तितकेच स्ट्रॉन्ग व भावनिक कारण हवे.<<<

सहमत!

लिंक उघडायला वेळ लागत आहे. काही वेळाने पाहू शकेन. धन्यवाद अमा Happy

खालिल मतं वैयक्तिक आहेत. ग्रीनकार्ड मिळाल्यावर भारतात परत येऊन तीन-एक वर्षांनी ग्रीनकार्ड परत केले, अमेरिकेच्या नागरिकत्वाची प्रोसेस सुरू केली नव्हती इतका मर्यादित अनुभव आहे.

१. भारतात परत येणारे अनिवासी अधिक सुखदायी संधींमुळे परत येत आहेत का? >>>> हो आणि नाही. जितकी मेहनत अमेरिकेत जाता यावं / व्हिसा मिळावा म्हणून करतो तितकी इथे केली तर इथेही संधी मिळतात. इथे आपल्याला लूपहोल्स माहित असतात आणि भारतातच असणारे भारतीय असतो म्हनून अन्यायाविरुध आवाज उठवणे, असंतोष माजवणे सोपे जाते. अमेरिकेत टॅक्सपेयरला खूप किंमत असते, आपल्याकडे तशी किंमत मिळाली तर परिस्थीती बरीच सुसह्य होईल. त्यामुळे स्वदेशी स्थलांतर प्रक्रियेस खूप मदत होईल.

२. आपल्या पुढच्या पिढीचे संगोपन आपल्या संगोपनाशी मिळतेजुळते असावे म्हणून परत येणारे काही आहेत का?>>> ह्या प्रश्नाशी काही संबंध आला नाहे.

३. परदेशात दीर्घकाळ राहण्याने काही इतर प्रश्न उद्भवल्यामुळे परत येत आहेत का, जसे स्व-संस्कृतीत परतण्याची तीव्र इच्छा होणे किंवा सातत्याने परकेपणा जाणवत राहणे, एकलकोंडेपणा वाटणे किंवा तत्सम!>> नाही. कधिही जरी परकेपणा जाणवला नाही तरी आपण उपरे आहोत ही जाणीव कणभर का होईना होती.

४. भारतात परतणारे नगण्य आहेत का? की नाहीच आहेत?>>> टक्केवारी इतका डेटा नाही.

आपल्याकडे मिळणारे लो कॉस्ट- स्किल्ड लेबर पाश्च्यात्य भांडवलशाही अर्थव्यवस्थेसाठी पूरक आहे, ही बाब इतर कोणत्याही कारणांपेक्षा भारतात परदेशी कामं , उद्योगधंदे येण्याला कारणीभूत आहे असे वाटते.

छान आहे धागा.

जिज्ञासाची पोस्ट खूपच पटली. प्रत्येकानी जिथे स्वतःला सूख मिळेल तिथे रहावे उगीच उदात्त हेतूने स्थलांतरित होतोय किंवा मायदेशी परततो आहे असे म्हणण्यात काही अर्थ नाही. प्रत्येकाची सुखाची कल्पना वेगळी असते आणि त्यानुसार प्रत्येकजण आपापला निर्णय घेत असतो.

निकितच्या पोस्ट मधले शेवटचे वाक्य पटले. क्वालिटी ऑफ लाइफ सुधारले तर अधिक लोक मायदेशी परतण्याचा विचार करतील. पण ते अजिबात सोपे नाही. माझ्या दृष्टीने क्वालिटी ऑफ लाइफ म्हणजे:

१. भ्रष्टाचार कमी आहे, लोकांना शिस्त आहे, त्यामुळे डे-टूडे लाइफ खूप सोपे आहे.
२. स्कॉटलंडमध्ये प्रदूषण अतिशय कमी आहे.
३. ब्रिटनमध्ये २४ तास वीज आणि पाणी आहे.
४. ब्रिटनमध्ये हायस्कूल पर्यंतचे शिक्षण फुकट आहे. प्रायवेट शाळासुद्धा आहेतच. पण पब्लिक शाळांचा दर्जासुद्धा चांगलाच आहे. भारतात दर्जेदार शिक्षण अतिशय महाग आहे.
५. ब्रिटनमध्ये मेडिकल केयर फुकट आहे. अर्थात उगीच ताप, सर्दी, खोकल्याला डॉक्टर दारातही उभे करत नाहीत पण क्रॉनिक आजार झाल्यास उत्तम केयर मिळते. "म्हातारपणी आजार झाला तर" ह्या कारणासाठी पैसे जमा करायला लागत नाही. भारतात दर्जेदार मेडिकल केयर अतिशय महाग आहे.
६. आम्ही दोघे विद्यापीठात म्हणजेच सरकारी नोकरीत आहोत. आरक्षण, ब्यूरोक्रसी, वंशभेद, पुढे जाण्यासाठी वरिष्ठांचे लांगूलचालन निदान मला तरी अजिबात दिसत नाही.
७. लहान मुले असल्यास फॅमिली फ्रेंडली पॉलिसीज आहेत.
८. लहान मुलांच्या नर्सरीज महाग असल्या तरी रेग्युलेट्ड असतात त्यामुळे मुलांना नर्सरीत सोडून आईवडील निर्धास्तपणे कामावर जाउ शकतात.
९. डे-टूडे व्यवहारात फसवणूक खूप कमी आहे. असलीच तर सगळ्यांची सारखीच आहे Happy

अजूनही मुद्दे असतील जसे आठवतील तसे लिहिन.

राजसी, तुमची पोस्ट मला आवडली. धन्यवाद! Happy
==========

सुमुक्ता,

तुमचा प्रतिसादही झक्कींच्या प्रतिसादाप्रमाणेच 'एक स्वतंत्र प्रतिसाद' म्हणून पटण्यासारखा असला तरी धाग्यातील मूळ मुद्यापासून दूर आहे असे माझे मत आहे.

सुमुक्ता,

तुमचा प्रतिसादही झक्कींच्या प्रतिसादाप्रमाणेच 'एक स्वतंत्र प्रतिसाद' म्हणून पटण्यासारखा असला तरी धाग्यातील मूळ मुद्यापासून दूर आहे असे माझे मत आहे. >>>> असेलही तसे. तुम्ही परत येण्याच्या कारणांची चर्चा करत आहात आणि मी परत न येण्याची कारणे देत आहे. मायदेशी परतण्याचा सद्ध्या तरी विचार नसल्यामुळे लोक परत का येत असावेत हे मी निश्चितपणे सांगू शकणार नाही. मुलगी झाली म्हणून अनेक कुटुंबं परत भारतात येताना पाहिली आहेत. मुलगा परदेशी वाढला तरी चालतो परंतु मुलगी परदेशी वाढता कामा नये हे मला थोडे हास्यास्पद वाटते. असो.

माझ्यामते मी दिलेली कारणे महत्वाची आहेत कारण ते बदल जर हळूहळू घडले तर मायदेशी परतण्यार्‍या भारतीयांचे प्रमाण वाढेल. पण सद्ध्या तरी ते बदल घडविण्यासाठी कोणत्याही पातळीवर प्रयत्न होताना मला दिसत नाहीत.

अनेक मुलाना आपल्याला आयुष्यात काय करायचं आहे हे कळायच्या आत पालक परदेशात पाठवतात व पालकांची इच्छा पूर्ण करण्याच्या दबावाखाली मुलं तिथे राहतात. ३०-३५ च्या पुढे परतीचे मार्ग बन्द झालेले असतात.<<<
होय हे खरे आहे. नात्यातल्या २ जणांनी हा वेडेपणा केलाय, मुलाला आधी एमबीए ला युके ला धाडून एमबीए नंतर तुटपुंज्या पगारावर भागत नसूनही वर्षभर तिथेच थांबायला सांगितले. नंतर आम्ही पालक भारतातून पैसे पाठवु पण तू तिकडेच रहा असे सांगितले Sad
शेवटी तो कंटाळून परत आला, तेंव्हा त्याला पुन्हा तू पगार कमी असला तरी तिथेच रहा, तुझा खर्च आम्ही भागवू असे सांगितले, कारण परदेशात नोकरी करणार्या मुलींची स्थळे ते त्याच्यासाठी शोधत होते Sad

विषय आणि विषयाबाबत मूळ धाग्यात काय म्हंटले गेलेले आहे ह्या दोन पूर्णपणे भिन्न बाबी आहेत.

म्हणजे असे की समजा वाहतुकीचा प्रॉब्लेम हा विषय असला आणि त्या विषयावर धागाकर्त्याने (उदाहरणार्थ) इतके इतके फ्लाय ओव्हर्स व्हायला हवे आहेत असे म्हंटलेले असेल तर 'अंतरेही वाढली आहेत' असा एखादा वेगळाच मुद्दा चर्चेत आणण्यात काही अर्थ आहे का? म्हणजे त्या ढोबळ विषयाबाबत आपल्याला जे काही वाटते ते 'त्या निमित्ताने' तेथे नोंदवणे हे बरोबर आहे का?

येथे चर्चा होते आहे ती रिव्हर्स मायग्रेशनची ढोबळ कारणे काय आहेत आणि हे मायग्रेशन होण्याकडे देश व सरकार सकारात्मकपणे पाहू शकेल का ह्यावर! हे तर नक्कीच आहे की येथे शेकडो प्रकारच्या सुधारणा कराव्या लागतील, पण त्या सुधारणा कोणत्या ह्यावर चर्चा खचितच नाही आहे.

पुन्हा मूळ मुद्दे क्लिअर करू पाहतो:

१. एक देश, एक समाज, एक सरकार म्हणून आपण सगळेजण स्वदेशी स्थलांतर करण्याचे प्रमाण वाढणे ह्या गोष्टीला एक संधी मानू शकतो का? त्या दृष्टीने आपण आज त्या स्थलांतराकडे पाहात आहोत का? तसे पाहिल्याने आपल्याकडील कायम येथेच असणार्‍या समाजाचाही फायदाच होईल हे आपण ध्यानी घेऊ शकतो का?

२. आज होत असलेल्या रिव्हर्स मायग्रेशनचे खालीलपैकी प्रमुख कारण कोणते वाटत आहे?

- भारतात अधिक संधी मिळण्याची शक्यता, अधिक सुखी व समृद्ध जीवन जगता येण्याची शक्यता

- मुलांचे संगोपन भारतीय पद्धतीने व्हावे

- परदेशातील वास्तव्य काही कारणाने नकोसे होणे

३. रिव्हर्स मायग्रेशन अत्यल्प किंवा नगण्य आहे का? (कोणत्याही किंवा सर्व कारणांनी होणारे).

आशा आहे की आता मला मूळ मुद्दे अधिक नीट नोंदवता आले असावेत.

धन्यवाद!

१. एक देश, एक समाज, एक सरकार म्हणून आपण सगळेजण स्वदेशी स्थलांतर करण्याचे प्रमाण वाढणे ह्या गोष्टीला एक संधी मानू शकतो का? त्या दृष्टीने आपण आज त्या स्थलांतराकडे पाहात आहोत का? तसे पाहिल्याने आपल्याकडील कायम येथेच असणार्‍या समाजाचाही फायदाच होईल हे आपण ध्यानी घेऊ शकतो का?>>>
फक्त परदेशी गेलेले परतले म्हणून परिस्थितीत काही फारसा बदल होईल असे वाटत नाही. हे परत आलेले जर सामाजिकदृष्ट्या निर्णायाक पदांवर पोहोचले आणि ज्या integrity ची अपेक्षा आहे (परदेशस्थ असताना भारताकडून, भारतीयांकडून) तीच integrity त्यांनी इथे आल्यावरपण आचरणांत आणली तरच ती संधी होउ शकेल.
परत येणारा बहुतांश समाज कोणत्यातरी वैयक्तिक कारणासाठीच परत येणार, त्यामुळे ते परत आल्यामुळे लगेच खूप संधी वाढतील अशी अपेक्षा करणे चूक आहे; आधी पोटोबा मग विठोबा. पण अशी मंडळी जर भरभक्कम पेपॅकेजवर परत आली तर त्यांच्याकडे असणार्‍या extra disposable income मुळे नक्कीच सामाजिक अर्थव्यवथेला हातभार लागेल.

राजसी +१

शिवाय भारताबाहेर असतांना स्वच्छता, शिस्त, प्रामाणिकपणा अश्या गुणांचे प्रदर्शन करणारे लोक भारतात आल्यावर इतडेतिकडे कचरा फेकतांना, थुंकतांना, ट्रॅफिक पोलिसांना चिरीमिरी देतांना, कामवाल्या बायकांना हडतुड करतांना पाहिले आहे. त्यामुळे असे लोक परत आल्याने काही फार फरक पडेल असे वाटत नाही.

सुमुक्ता बरेच मुद्दे पटले पण एक दोन मुद्दे पटले नाहीत खास करुन भारतात दर्जेदार मेडिकल केयर अतिशय महाग आहे हे पटले नाही.

मी दोन देशात (आधी सिंगापुर आणि आता USA) राहिलो असुन मला तरी भारतात मेडिकल हे स्वस्त आणि दर्जेदार आहे असे वाटते. कदाचित ह्याच कारणासाठी माझा भारतात यायचा विचार आहे. १८ वर्ष बाहेर राहुन आजुनही काही आजार झाल्यास भारतात धाव घेतो. timely आणि योग्य treatment, आजारी माणसाला धैर्य , आपुलकी ह्या गोष्टी भारतात उत्तम रित्या मिळतात. (कदाचित युके सारख्या फुकट मिळत नसतिल).
थोडी फसवणुक आहे आणि चांगल्या डॉक्टर हुडकावा लागतो.

पण बाकीच्या गोष्टीचा खुप त्रास होतो. भ्रष्टाचार बद्दल तर खुप चीड येते. आजच आधार कार्ड काढायला मुम्बईत ३०० रुपये देउन आलो. दोन वर्षापुर्वी आईचे death certificate घ्यायला पुण्यात १००० रुपये दिले होते. हे सगळे हातात पुर्ण कागद असताना. दोन्ही ठिकाणी indian passport issued at Singapore बघितल्यावर पैसे द्या नाहीतर काम होणार नाही म्हणुन सांगितले.

भारतात शिक्षण हे खुपच महाग आणि ठराविक संस्था सोडल्या तर दर्जा हिन आहे. पण आता आमची मुल स्वावलम्बी होउन बाहेर शिकु शकत असल्याने त्याचा issue नाही.

नोकरी करायची असल्यास भारतात खाजगी ठिकाणी करावी लागेल तिथे आरक्षण, ब्यूरोक्रसी, वंशभेद, पुढे जाण्यासाठी वरिष्ठांचे लांगूलचालन नाही चालत . at least multinational मध्ये तरी नाही.

डे-टूडे व्यवहारात फसवणूक एवढी नाही. काल रात्री प्रचड पाउस पडात होता, एका AC खानावळीतुन बाहेर पडुन रीक्षा केली, त्याने आम्हाला मिटर प्रमाणे घरी घेउन आला आणि २० रुपये दिल्यावर लगेच ३ रुपये परत देत होता. घरी २४ तास पाणि आणि विज असते. (हे कदाचित फक्त मुम्बईतच असेल) काही गोष्टीत फसवणुक आहे पण ती सगळ्या देशात आहे.

बाकी भ्रष्टाचार कमी झाला आणि प्रवासाच्या चांगल्या सोयी झाल्या तर बरीच मडळी परत येतिल. आमच्याच कंपनीची ३ जण (जी ५ वर्ष पेक्षा जास्त वेळ भारता बाहेर होती) ती बंगलोर ऑफिस ला transfer झाली. आमचे बंगलोर ऑफिस मेट्रो स्टेशन च्या समोर आहे आणि रोजचा प्रवास सुखकर होतो हे परत येण्यासाठी एक महत्वाचे कारण होते. (बाकी चांगला पगार , वरची पोस्ट ही देखिल कारणे होती)

@ बेफिकीर,

माझ्या माहीतीतले जे reverse migration झाले आहे त्यातल्या बर्‍याच ( अल्मोस्ट सर्वच ) केसेस दोन्ही कडचा फायदा घ्यायचा हा हेतू ठेवून केलेल्या आहेत.
म्हणजे त्या लोकांकडे युके ( किंवा अमेरिकेचे ) चे नागरीकत्व आहे, तसेच बर्‍याच मुलांचे जन्म मुद्दामहुन अमेरीकेत घडवून आणल्यामुळे त्यांची मुले अमेरिकन नागरीक आहेत ( जर पालक नसतील तर ).
अशी लोक कधीही परत जावू शकतात. त्यामुळे ८- १० वर्ष युके किंवा अमेरिकेत रहायचे, मग मिळालेल्या पैश्याचा उपभोग घेण्यासाठी भारतात यायचे. ते स्वता किंवा मुले कधीही परत जावू शकतात, त्यामुळे काळजी नसते.

त्यातल्या सर्व लोकांची युके मधे स्वताच्या मालकीची ( मॉर्गेज वर का असेना ) अशी १ ( किंवा अधिक ) घरे आहे. तिथल्या भाड्यातुन मॉर्गेज चा हप्ता जाऊन थोडे पैसेच जमा होतात.

झक्की - बरोबर प्रतिसाद

मला तरी भारतात मेडिकल हे स्वस्त आणि दर्जेदार आहे असे वाटते, timely आणि योग्य treatment, आजारी माणसाला धैर्य , आपुलकी ह्या गोष्टी भारतात उत्तम रित्या मिळतात, थोडी फसवणुक आहे आणि चांगल्या डॉक्टर हुडकावा लागतो.>>> +१ बंगलोरमध्ये सध्या ३००-३५०/- रु. मध्ये चांगल्या डॉक्टरचे कन्सल्टेशन मिळते.

आजच आधार कार्ड काढायला मुम्बईत ३०० रुपये देउन आलो. दोन वर्षापुर्वी आईचे death certificate घ्यायला पुण्यात १००० रुपये दिले होते. हे सगळे हातात पुर्ण कागद असताना.>>> खरंच का Sad तुम्हाला आधार कार्ड तातडीने हवे होते का तुमची योग्य वेळ थांबायची तयारी होती तरिही पैसे द्यावे लागले. तुम्ही स्वतः काम करायला गेलात का मध्यस्थ वापरलात.

घरी २४ तास पाणि आणि विज असते. (हे कदाचित फक्त मुम्बईतच असेल)>>>+१
बंगलोरमध्ये जनरेटर बॅकप असतो प्रत्येक सोसायटीत. रहिवाशांची किती मेंटेनन्स द्यायची तयारी त्यावर कसा बॅकप मिळणार ते ठरते.

तुम्ही स्वतः काम करायला गेलात का मध्यस्थ वापरलात.

दोन्ही ठिकाणी स्वता गेलो होतो. अधार कार्ड साठी दोन महिने आधीच appointment घेतली होती. proof of identity साठी passport बघताच त्याचे मशिन बंद पडले जे माणशी ३०० रुपये दिल्यावर चालु झाले.
त्याने २ दिवसानी यायचा पर्याय दिला होता पण तेव्हा मी मुम्बईत नाही त्यामुळे आजच काढणे गरजेचे होते.

>>>> म्हणजे परदेशी भारतीय आणि परदेशी नागरिक यांचे हित बघितले की देशातल्या तमाम जनतेचेही हित बघितले जाणार? <<<<<
काये ना नीरजातै, घरात दोन अपत्ये असतील (मुद्दामहून पुरुष/स्त्री असे सांगत नाही) अन त्यांच्यातील एखादे अपत्य जास्त कमावते व दुसरे अपत्य कमसर कमावते असेल, तर जेवणाच्या पंगतीतही, जास्त कमावणार्‍या अपत्याच्या भातावर तुपाची धार जास्त ओतली जाते. Proud तुम्ही कितीही नाकारा, पण हा पन्क्तिप्रपंच होतोच होतो, व केवळ पंक्तितच नव्हे तर जीवनातल्या सर्व थरात होतो.
अर्थात, परदेशनिवासी, वा परदेशाहून इकडे येणारे यांच्यामुळे "आर्थिक सुबत्ता" येत असेल म्हणुन त्यांना रेड कार्पेट घातला /घालू पाहिला तर काही जगावेगळे कृत्य/गुन्हा करतोय असे होत नाही.
अन त्यांना तशी वागणूक दिली की आपसूक घरात येणारा इन्कम जसाच्या तसा रहात वाढीसही लागतो व सर्व काही कसे खुशाल असते, हा घरातील बाकी इतर "कमसर" टाईप नागरिकांचा फायदाच नव्हे का?

मूळ प्रश्न असा की, रिव्हर्स मायग्रेशन सारखे खरेच असे काही होते आहे का, होऊ घातलय का? झाले तर त्याचे काय परिणाम असतील?
तर मूळाच्याही मुळाशी जात मूळात सुलटे मायग्रेशन तरी का झाले याचा शोध घेता, भारतातील कर्तुत्व दाखवायला असलेली भिक्कार परिस्थिती हेच उत्तर मिळते.
रिव्हर्स मायग्रेशन होते/होणार का याच्या उत्तरादाखलही, असलेली भिक्कार परिस्थिती सुधारली आहे का याचाच शोध घ्यावा लागतोय.
याव्यतिरिक्त, अर्थातच, जाणे वा येणे यामागिल अर्थकारणासहित अन्य सोईसुविधांबाबतही वर बर्‍याच पोस्ट्समधे विवेचन आलेच आहे. व तसे ते असणे यातही काही गैर नाही. गैर वाटत असल्यास पहिल्यांदा भारतीय रेल्वेतील फर्स्टक्लास/सेकण्डक्लास वगैरे बंद करा, एशियाड/शिवनेरी वगैरे बंद करा... कारण इथेही देशात राहून जास्त पैसे मोजू शकणारा जास्त सुविधेच्या गोष्टींची मागणी करतोच, वापरतोही. तर मग परदेशस्थ भारतीय भारतात येऊ पहाताना त्यांनीही तसाच विचार केला तर बिघडले कुठे? असो.
याप्रश्नांबाबत माझ्यापेक्षा असंख्य अनुभवी लोक इथे आहेत, त्यांची मते वाचायला आवडतील.

(उगाच कुणीही सोम्यागोम्या उठून मला म्हणायला नको की स्वतःचीच बघा टिमकी कशी वाजवतोय, कित्ती ती स्वमतांधता(?) वगैरे..... Proud )

पहिल्यांदा भारतीय रेल्वेतील फर्स्टक्लास/सेकण्डक्लास वगैरे बंद करा, एशियाड/शिवनेरी वगैरे बंद करा... कारण इथेही देशात राहून जास्त पैसे मोजू शकणारा जास्त सुविधेच्या गोष्टींची मागणी करतोच, वापरतोही. तर मग परदेशस्थ भारतीय भारतात येऊ पहाताना त्यांनीही तसाच विचार केला तर बिघडले कुठे? असो.>>>>असहमत. ह्या मुद्द्यावरून माझ्याकडून निरुपयोगी आणि विषय सोडून पोस्ट येऊ शकेल सो ..... असो.

टोचा,

तुम्ही म्हणत आहात ते माहीत आहे आणि सहमतही आहे. माझ्या मित्रांपैकी एकाने अमेरिकेत मुद्दाम एक बालक जन्माला घातले. असे लोक आठ दहा वर्षे इकडे येऊन परत गेले किंवा नाही गेले तरी रिव्हर्स मायग्रेशनसंदर्भात 'देशांतर्गत घडामोडींमध्ये' विशेष फरक पडणार नाही. म्हणजे असे की आठ दहा वर्षे हा काळ इतपत मोठा आहे की त्यांच्या जीवनशैलीबाबतच्या अपेक्षांना येथील सरकारचे अभय मिळणारच! (अगदीच वर्षभरासाठी येणार्‍यांचे सध्या सोडून देऊ). तसेही, एकच कुटुंब फॉर गुड परत येणे आणि चार, सहा कुटुंब आलटून पालटून पाच पाच वर्षांसाठी येणे ह्यातील दुसरी बाब आपल्या सगळ्यांसाठी अधिक लाभदायक ठरेल बघा! बाकी ते लोक परत जाऊ शकतात, त्यांचे तिकडे घर असते किंवा तिकडचे नागरीकत्व असते ह्याने काही बिघडत नाही. बिघडत नाही म्हणजे असे की खूप वर्षे ते येथे राहून जाणार असले तर इथे त्यांना अपेक्षित ते बदल घडण्याच्या प्रक्रियेला तशीही चालना मिळू शकेल.

मात्र तुमच्या प्रतिसादातील >>>झक्की- बरोबर प्रतिसाद<<< हा भाग वाचून असे विचारावेसे वाटते की झक्कींच्या प्रतिसादाचे वर माझ्यासकट काहींनी खंडन केलेले आहे त्याबद्दल तुमचे काय म्हणणे आहे?

साहिल, तुमच्या बाकी पोस्टशी सहमत.
एक्सेप्ट मेडिकल ट्रिटमेंट..... कटप्रॅक्टिसने पोखरलेली आहे ही व्यवस्था... हॉटेलच्या रुमच्या भाड्याइतके भाडे हॉस्पिटलमधिल खाटेला असते. अन हे हॉस्पिटल नगरपालिकेकडून स्वस्तात मिळविलेल्या जागेवर/इमारतीमधे असते. आर्थिक कमसर गटावरील उपचारांची सक्ति नाममात्र किंवा पेपरमात्रच असते. खरोखरचा गरीबही त्याकरता लागणारी कागदपत्रे पुरवू शकत नाही. असो.

लाखोंची कॅपिटेशन देऊन डॉक्टरी शिक्षण घ्यावे लागलेले तो पैका वसुल तरी कुठुन करणार म्हणा? तर कटप्रॅक्टीस हे उत्तर. पण ती परवडली. त्याशिवाय, स्कॅन/सोनोग्राफी वगैरे टेस्टमधिल कटप्रॅक्टीस पेशंटच्या नातेवाईकांना बुडबुडा आणते.

मला नर्व्हस/उदास फिल येतोय म्हणुन सांगितल्यावर मेंदूचे ३०००/- चे सीटीस्कॅन करायचे प्रिस्किप्शन देऊन अमुक ठिकाणीच लौकर करुन घ्या असा आग्रह धरणारे डॉक्टर्सही प्रथितयश निर्व्यसनाच्या समाजपयोगी संस्थेमधे भेटलेत. मला आजवर कळलेले नाही की नर्व्हस/उदास फील येणे अन मेंदूचे सीटीस्कॅन यांचा संबंध काय, जेव्हा कि आजवर "मी डोक्यावर" पडल्याची एकही घटना झालेली नाहीये. Proud

भारतातील डॉक्टरी व्यावसायिकांवरील माझा विश्वास केव्हाच उडलेला आहे.
औषधांचेबाबतीत तर न बोलणेच बरे.... कारण एकतर माझा तो प्रांतही नाही.
पण इतर अ‍ॅसेसरीज? आईकरता भिंतीत बसवायची टॉयलेट सीट आणायला घराजवळील दुकानात गेलो तर तिची किंमत अडीच हजार रुपयांहून जास्त, म्हणुन होलसेल मार्केटला गेलो तर तीच वस्तू हजार रुपयांनी कमी दरात...... धंद्याकरता दीडपट/दुप्पट किंमत जास्त लावायची? मला वेळ होता म्हणून मी चार ठिकाणी हिंडलो, ज्यांना वेळ नाही त्यांचे काय?
सलाईनची बाटली पन्नास रुपयांच्या आत मिळते, तीच हॉस्पिटलमधिल मेडिकल दुकानातुन घेतली तर सव्वाशे रुपयांपर्यंत व त्यांची त्यांनीच घेऊन लावली तर अडिचशे रुपये बीलात. अहो, औरंगजेबाचा जिझिया परवडतो यापुढे.... !

लिंबूभौ,

तुमच्या वरच्या दोन्ही पोस्ट्समध्ये धाग्याला जगाच्या कानाकोपर्‍यात कुठेही भरकटवण्याचे पोटेन्शिअल आहे बरं का! Proud

मी वरच्या एका प्रतिसादात (पुन्हा एकदा) समराईझ केलेले मुद्दे कृपया एकदा विचारात घेऊन त्यावर आपले मत सांगावेत अशी विनंती! Happy

अहो नै हो बेफिकीर भौजी, आधी भरकटत अस्लेले मी जागेवर आणू पहात होतो. असो.
उद्या तुमची ती पोस्ट बघुन लिहीतो. एकडाव माफी असावी.

चेन्नईमध्ये एम एस डॉक्टरची ((युएसची डिग्री. स्वतःचे अत्यंत पॉश हॉस्पिटल. डॉक्टर बी एम डब्ल्यु चालवतो) कन्स्लटेशन फी १०० रूपये. दहा दिवसांनी परत गेलं की फी पन्नास रूपये. औषधं लिहून दिली त्रेसष्ट रूपयांची.

माझ्या प्रतिसादावर एव्हढे भाष्य अपेक्षित नव्हते.
मुसलमानाशी लग्न करण्यासंबंधी - त्यात संस्कृति वगैरेचा र्‍हास होतो असली मते माझी स्वतःची नाहीत. जो या कारणासाठी भारतात गेला त्याचे काय झाले हे सांगितले एव्हढेच.

मला स्वतःला भारतीय संस्कृति म्हणजे नक्की काय हे माहित नाही. तसेच पाश्चिमात्य संस्कृति म्हणजे काय हेहि माहित नाही. मुळात संस्कृति म्हणजे काय हेच माहित नाही. एव्हढेच माहित आहे की जगातले बरेचसे लोक निरनिराळ्या गोष्टींना संस्कृति समजतात, ते मी ऐकतो. माझे काही मत नाही.

बेफिकीर, तुमचा धागा भरकट्वण्या बद्दल क्षमस्व.

कुणितरी विचारले की परत जाणार्‍या लोकांची माहिती द्या म्हणून दिली.
कुणि परत जावे न जावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे नि बहुतेक लोक केवळ स्वतःला काय सोयिस्कर आहे, करावे लागते ते करतात. आपण कोण सांगणार बरोबर की चूक.

>>>बेफिकीर, तुमचा धागा भरकट्वण्या बद्दल क्षमस्व.<<<

अहो तुम्ही धागा भरकटवलात असे अजिबात म्हणायचे नाही आहे. इन फॅक्ट जिव्हाळ्याचा विषय असू शकत असल्यामुळे त्यावर बरेच काही बोलायचेही असू शकते व मोस्ट वेलकमही!

माझे म्हणणे इतकेच आहे की 'रिव्हर्स मायग्रेशन - एक संधी' ह्या विषयावर चर्चा होऊ शकते का हे बघणे! जर रिव्हर्स मायग्रेशन अत्यल्प / नगण्य असेल तर ते वाढावे म्हणून काही करणे योग्य ठरेल का? (काय करावे लागेल तो येथील विषय नाही). Happy मात्र तो विषय अजून (सुमुक्तांबरोबरच) इतर काही प्रतिसाददात्यांना चर्चेस घ्यायचा असल्यास तसे काही अगदी 'हा विषय का काढलात' वगैरे म्हणणे नाहीच. Happy

नंदिनी - तुमच्या प्रतिसादातील अर्थाशी सहमत!

मतच द्यायचे तर माझे स्पष्ट मत असे आहे की भारताची प्रगति जी काय व्हायची असेल ती फक्त भारतात कायम रहाणारे भारतीयच करू शकतील नि करतच आहेत. अनेक बाबतीत भारतातील व्यवहार सुगम होत आहेत हे दर चार पाच वर्षांनी भारतात गेल्यावर जाणवते. आता लाच म्हणाल तर असते बर्‍याच देशात.

मुळात परदेशी जाणारे नि त्यातून कायमचे परत जाणारे यांची संख्या भारतीय लोकसंख्येच्या मानाने नगण्य आहे. त्याचा काही फारसा परिणाम होणार नाही, गरजहि नाही. ते आले काय नि गेले काय?

कदाचित इथून भारतात परत जाणार्‍या लोकांपेक्षा भारतातून इथे येऊन भारतीय मानसशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ वगैरे लोकांनी अभ्यास करावा की काय चांगले आहे नि का? पण ते इथे येऊन नुसतेच लोक गन घेऊन एकमेकांना मारतात, ड्रग्स घेतात, इथली संस्कृति किती वाईट आहे एव्हढेच बघतील. पण लाचलुचपत का होत नाही, कामे पटापट का होतात, याचा अभ्यास कुणि केल्याचे ऐकले नाही.

झक्की,

खरे सांगायचे तर 'ज्या विषयातले आपल्याला समजत नाही त्या विषयावर मी काढलेला हा आणखीन एक धागा इतकेच ह्या धाग्याचे स्वरूप म्हणावे लागेल. Proud

स्थलांतर ह्या विषयाबाबत पूर्णपणे अज्ञानी असलेल्या मला नेमके काय वाटले हे लिहून पाहतो.

लोकं समृद्धीसाठी भारतातून परदेशी जात होती तेव्हा भारतीय सरकारने खालील भूमिका घेतली नव्हती.

'आमच्याकडे शिकलेली माणसे तुम्हाला तुमच्या माणसांपेक्षा स्वस्तात मिळत आहेत. त्या बदल्यात आम्हाला देश म्हणून काहीतरी मिळायला हवे'

अशी भूमिका घेणे शक्यच नसेल ह्याची संभाव्य कारणे:

१. अमेरिकेपुढे किंवा युरोपपुढे भारत काय बोलणार?
२. ते देश जर म्हणाले की आम्ही आमंत्रण धाडलेले नाही तर काय?
३. देशी नागरीक देश सोडून जायला स्वतंत्र आहेत.

पण आज रिव्हर्स मायग्रेशन होत आहे असे दिसत आहे. (पुन्हा एकदा, कारणे काहीही असोत).

तर मग निदान आता तरी ह्या 'स्वदेशी स्थलांतराकडे' एक व्यावसायिक संधी म्हणून बघता येणे शक्य आहे का? की फक्त आपले काही लोक परत आले इतकाच अर्थ घेऊन गप्प बसणे होत आहे?

उदाहरणार्थः

भारताच्या भूमीवर झालेल्या परदेशी गुंतवणूकींमार्फत भारताने काही उत्पन्न मिळवले. निदान अर्थकारणाला अधिक वेग देऊ केला. जसे ऑटो, बेव्हरेजेस वगैरे व्यवसाय!

ही व्यावसायिक भूमिका 'आपली माणसे तिकडे जात असताना' घेतली जात नव्हती. आता काही माणसे परत येत असली तर त्या माणसांमार्फत अ‍ॅडिशनल परदेशी कंपन्यांशी व्यवहार करण्याची शक्यता पडताळून पाहिली जावी का? त्यांच्या येण्यामार्फत परदेशातील काही अ‍ॅडिशनल गुंतवणुकी येतील का हे पाहायला हवे का, वगैरे!

हे सगळे करताना अश्या परतलेल्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आणि त्याद्वारे अधिक अनिवासी भारतीय व परदेशी नागरीक येथे यावेत ह्यासाठी काही मूलभूत सोयीसुविधा वगैरे निर्माण कराव्या लागतील. ते करताना इथेच असलेल्यांचाही आपोआप काही फायदा होईल. वगैरे!

चु भु द्या घ्या

Pages

Back to top