मागच्या रवीवारी पुन्हा एकदा कोकणवारीचा योग घडून आला. विशेष म्हणजे हा दौरा दोस्तांबरोबर होता, त्यामुळे रंगत अजुनच वाढली होती. निमित्त होते एका मित्राच्या आमंत्रणाचे. त्याच्या लाडक्या लेकीचा तिसरा वाढदिवस त्यामुळे तिच्या लाडक्या काका लोकांस आमंत्रण होते. नाहीतरी कोकणात जायला आम्ही निमीत्तच शोधत असतो. आताही पडत्या फळाची आज्ञा घेवून निघालो. श्रीवर्धनला त्याच्या घरी एक दिवस मुक्काम केला आणि दुसर्या दिवशी परत येताना पुन्हा एकदा दिवे आगारला भेट दिली. माझ्या मागील लेखावर काही आंतरजालीय मित्रांनी आवर्जून दिवेआगारच्या रुपनारायणाचे दर्शन घेतलेस का अशी विचारणा केली होती. त्यामुळे हा रुपनारायण नव्याने बघायचे वेध लागले होते.
श्री. रुपनारायणाचे मंदीर
उजव्या बाजुचे मंदीर रुपनारायणाचे असुन, डाव्या बाजूला सुंदरनारायणाचे स्थान आहे.
रुपनारायणासमोर नतमस्तक होताना आपल्याला जाणवते की ज्या कोणी हे नाव श्रीमुर्तीला दिले असेल तो किती रसिक माणुस असेल. श्री रुपनारायणाची देखणी मुर्ती इतकी संमोहक आहे की नमस्कार करताना सुद्धा डोळे मुर्तीवरच रोखलेले राहतात.
कानी मकर कुंडले, कमलनयना, नजर नासिकेच्या अग्रावर रोखलेली, गळ्यात मोत्यांचे दागिने परिधान केलेले. कमरेला कलमचुणीदार वस्त्र, त्यावर कमरपट्टा, मनगटात सुवर्णकडी, गळ्यात पोची हा दागिना , गंडामध्ये बाजुबंध, हातातील सर्व बोटात अंगठ्या, कमरेला अनेक सुवर्ण मोती अलंकार. हातात गदा आहे. बोटावरची नखे सुद्ध स्पष्टपणे दिसतात इतके सुंदर कोरीव काम आहे. हिरवट काळ्या संगमरवरातील हे अप्रतिम देखणं शिल्प तत्कालिन उच्चप्रतीच्या शिल्पकलेचे उत्कृष्ट उदाहरण ठरावे. विष्णुची रुपे ही त्याच्या हातातील आयुधांच्या क्रमावरुन ठरतात. हातातील आयुधांचा क्रम जसा बदलतो त्यानुसार विष्णुची २४ रुपे होतात असे इथे म्हणजे रुपनारायणाच्या मंदीरात असलेले माहिती पत्रक सांगते.
अप्रतिम देखणी मुर्ती आणि मुर्तीचे अजुन एक अतिशय महत्वाचे वैशिष्ठ्य म्हणजे या मुर्तीवर श्री विष्णुचे १० अवतार कोरलेले आहेत. मस्तकावर कमलपुष्प, करंडक मुकुट त्यावरील कौस्तुभ चिन्ह व व्याघ्रमुख ही मुर्ती दक्षीण भारतीय शैलीची असल्याचे द्यौतक आहे. अलंकृत कायबंधन व किर्तीमुख कमरपट्यावर असून मुकुटातून केशसंभार बाहेर डोकावत आहे. म्हणून हा रुपनारायण.
(माहिती : मंदीरातील माहितीफलकावरुन साभार)
श्री रुपनारायण
तिथे उपलब्ध माहिती फ़लकावरुन असेही समजले की पोर्तुगिजांनी ही मुर्ती पळवून नेण्याचा प्रयत्नही केला होता. त्या हल्ल्यादरम्यान मुर्तीचे काही प्रमाणात नुकसान झालेले दिसून येते. श्रीमुर्तीचे नाक, हात असे अवयव भंगलेले असुन त्यावर केलेले रासयनिक उपचार सहजी ओळखू येतात.
वर सांगितल्याप्रमाणे श्रींच्या मुर्तीवर श्रीविष्णुचे दशावतार कोरलेले आहेत.
मुर्तीच्या उजव्या हातास वर मत्स्यावतार, हा पहिला
थोडी उत्क्रांती, डाव्या हाताला कुर्मावतार (जमीन आणि पाणी दोन्ही ठिकाणी फ़िरणारा) हा द्वितीयावतार
उजवीकडे तिसरा वराहावतार (अलीढासनामध्ये हातावर तोलुन धरलेली पृथ्वी )
चौथा नृसिंहावतार . हा मुर्तीच्या डाव्या बाजुला कंबरेपाशी आहे
पाचवा वामनावतार - हा देखील मुर्तीच्या उजव्या बाजुला शरीरमध्यावर आहे
सहावा परशुराम : हा डाव्या बाजूला खालच्या बाजूस रेखिलेला आहे
सातवा श्रीराम : तो उजव्या बाजूस खालच्या बाजुला कोरलेला दिसून येतो
आठवा कालिया मर्दन करणारा श्रीकृष्णावतार उजवीकडे खांद्याजवळ आहे
इथे नववा अवतार गौतम बुद्ध असे संबोधलेय, (जे मला काही पटलेले नाहीये) माझ्या मते विष्णुचा अवतार म्हणुन ज्या बुद्धाचे वर्णन केले जाते तो व गौतम बुद्ध हे वेगवेगळे असावेत. या नवव्या अवताराचे काय माहीत नाही पण तथागत गौतम बुद्धाचा मात्र मी मनस्वी चाहता आहे)
दहावा अवतार कल्कीचा , डाव्या बाजुस तळाला पायाजवळ , अश्वारुढ अवस्थेत कोरलेला आहे. ही कल्कीची मुर्ती शिरविरहीत आहे.
रुपनारायणाच्या शेजारीच सुंदरनारायणाचेही नवे मंदीर बांधलेले आहे.
हा सुंदरनारायण
मंदीरासमोर तीर्थकुंड आणि दिपमाळा देखील बांधण्यात आलेल्या आहेत.
मिपाकर 'वल्ली' आणि 'ज्योताय'चे विशेष आभार रुपनारायणाची आठवण करुन दिल्याबद्दल. त्यानिमीत्ताने अजुन एकदा श्रींचे दर्शन झाले. श्रीवर्धनच्या समुद्रकिनार्यावर सुद्धा बरेच फोटो 'बरे' आले आहेत. ते पुढच्या लेखात पोस्ट करेन.
तुर्तास इतकेच...
विशाल.
मस्त फोटोज नि वर्णन ..
मस्त फोटोज नि वर्णन .. मिपावर बघितलं होत
छान आहे फोटो .. आम्ही
छान आहे फोटो ..
आम्ही दिवेआगारला राहिलो होतो तेव्हा हे मंदिर पाहिलेलं .. बिलकुल गर्दी वगेरे नसते , अगदी शांत आहे वातावरण ..
तिथे एक गणेश मंदिर आहे .. त्याबद्दलच्या अनेक आख्यायिका प्रसिद्ध आहेत. ती मूर्ती (मुखवटा) शुद्ध सोन्याची असून कोणातरी गावकऱ्याला ती शेतात पुरलेली सापडली होती म्हणे..
नंतर त्याची चोरी, चोर पकडला जाणे इ. भानगडी पण झाल्या.. (चूभूदेघे)
मस्त फोटो आणि छान माहिती.
मस्त फोटो आणि छान माहिती.:)
सुरेख फोटोज आणि वर्णन पुढच्या
सुरेख फोटोज आणि वर्णन
पुढच्या सुट्टीत श्रीवर्धन वगैरे भाग बघणार नक्की, खूप वेळा प्लॅन केला आणि बिघडला.
सुंदर आहे मूर्ती आणि
सुंदर आहे मूर्ती आणि देऊळही..
संगमेश्वरजवळही असे एक सुंदर देऊळ आहे, त्या मूर्तीवरही असेच दशावतार कोरलेले आहेत पण त्या परीसराची खुप नासधूस झालीय आता.
सुंदर फोटो आणि माहिती.
सुंदर फोटो आणि माहिती.
विशाल, ऑफिसची कामे , मिटींग यातून वेळ काढून, हे सर्व करतोस त्याबद्दल तुझे कौतुकच.
मंदीर असावे तर अश्या शांत
मंदीर असावे तर अश्या शांत रम्य परीसरात, की आमच्यासारख्या नास्तिकांनाही नतमस्तक व्हावेसे वाटावे.
छान फोटो, छान माहिती.
अतिशय सुंदर ! अगदी अशीच
अतिशय सुंदर ! अगदी अशीच मूर्ती केसरनाथ मंदिर शेडवई, तालुका मंडणगड येथे आहे
सुंदर!
सुंदर!
धन्यवाद
धन्यवाद
आम्ही दिवेआगारला राहिलो होतो
आम्ही दिवेआगारला राहिलो होतो तेव्हा हे मंदिर पाहिलेलं .. बिलकुल गर्दी वगेरे नसते , अगदी शांत आहे वातावरण .. >>>> +१००
सुंदर फोटो आणि माहितीही छाने .....
सुंदर फोटो व माहीती. सादरीकरण
सुंदर फोटो व माहीती. सादरीकरण पण मस्तच. तुफान आहे हे मंदिर. दिवेआगरला समुद्राकडे जातानाच दिसते त्यामुळे चुकुच शकत नाही.