फळे आणि फळोत्पादनांच्या निर्याती संबंधी

Submitted by सावली on 23 May, 2011 - 20:25

सध्या आंब्यांचा मोसम. भारतातले आंबे परदेशात मिळणे म्हणजे परमभाग्यच!
पण जेव्हा तीन /चार वर्षापुर्वी पहिल्यांदा इथल्या सुपरमार्केट मधे भारतीय आंबे बघितले तेव्हा आनंद व्हायच्या ऐवजी त्यांची किव आली, स्किन काळपट चॉकलेटी, डागाळलेली. क्वालिटी चेकचा स्टीकर लावलेला भाग खराब झालेला शिवाय तो चिकटपणा धुवुनही न जाणारा. कापल्यावर ५०% आंबे खराब होते. त्या नंतर हे आंबे पुन्हा त्या सुपर मार्केट मधे कधीही दिसले नाहीत.
मला वाटलं पहिल्यांदाच जपानला निर्यात झाले म्हणुन असे प्रकार झाले असावेत. पण या वर्षी भारतील ग्रोसरी स्टोअर मधुन ऑर्डर केले. या वर्षी तर माझ्याकडे आलेला लॉट भयानक खराब होता. सगळ्या आंब्याची स्कीन चॉकलेटी. त्याशिवाय ७५% आंबे कापल्यावर फेकले.
हा बाफ नक्कीच मी त्याची तक्रार करण्यासाठी उघडलेला नाही. पण या निमित्ताने बर्‍याच इतर गोष्टी सांगाव्याशा वाटतात आणि माहिती करुनही घ्याव्याशा वाटतात. माझी निरिक्षणे अर्थात जपान मधली आहेत, दुसर्‍या देशांमधली निरिक्षणे वाचायला आवडतील. शिवाय ज्यांच्या फळबागा आहेत किंवा असे उद्योग उभारायची क्षमता, इच्छा आहे त्यांच्यासाठी इथे काही माहीतीही मिळु शकते.

भारतातली काही फळं म्हणजे आंबे, शहाळी, फणस, पेरु, अननस इ. थायलंड, फिलिपिन्स सारख्या देशातही मिळतात. पण थायलंडने हि फळं आणि त्यांची उत्पादने निर्यात करण्यात बरीच प्रगती केलेली दिसते. थायलंड तर फळांचा आणि भाज्यांचा देश आहे अशीच एक प्रतिमा बनते. त्यांच्या रेस्टॉरंट मधेही फळांचे रिप्रेझेंटेशन मस्त असते.

इथे थायी, फिलिपिन्स आंबे नेहेमी दिसतात. ते बघतानाही चांगले दिसतातच शिवाय कापल्यावर कधीही खराब / काळे निघत नाहीत. त्याप्रमाणे मेक्सिकन आंबेही दिसतात. हे आंबे तर सुंदर लाल रंगाचे असतात आणि १०००येन पासुन ९०००येन ला एक अशा किमतीत विकायला ठेवलेले असतात. हे आंबेही कापल्यावर तितकेच सुंदर दिसतात/लागतात. (फार वेळा आणले नाहीयेत पण जेव्हा आणलेत तेव्हा कधीच खराब निघाले नाहीत)

थायी, फिलिपिन्स अननस, शहाळी इथे ठराविक सिझनला मिळतात. शहाळ्याचे सगळे हिरवे साल काढुन ( वजन कमी!) फक्त आतला नारळ प्लॅस्टिक मधे रॅप करुन ठेवलेला असतो. विकायला आला की पटापट खपतो.

थायलंड हुन आलेल्या सुकवलेल्या कुठलेही प्रिझर्वेटिव्ह नसलेल्या आंब्याच्या आणि फणसाच्या फोडी, केळ्याचे गोड चिप्स, शहाळ्याच्या पाण्याचे कॅन्स, लाल आणि हिरव्या पेरूच्या ज्युसचे कॅन, इ. या गोष्टी इथे बर्‍याच मिळतात आणि लोकांना आवडतात.

भारतात हि सगळी फळं आणि त्याहुन जास्तीची वेगळी फळंही मिळतात. त्यांच्या निर्यातीसाठी आपण काय काय करतो /करतो का?
इथे ज्यांच्या फळ बागा आहेत त्यांनी याबद्दल विचार करायला हरकत नाही
मला सुचलेल्या काही गोष्टी -

#. आंबे निर्यात करण्यासाठी , त्यांची स्किन काळी पडु नये म्हणुन स्पेशल पॅकिंग शोधणे. किंवा नविन आंब्याचे वाण जे निर्यात योग्य आहे असे शोधणे.
# आंबा पोळी, आंबा वडी, सुकवलेल्या आंब्याच्या फोडी हे चांगल्या प्रतिचे पॅकिंग करुन निर्यात करणे.
# फणस, काजुची बोंडे, करवंदे, पेरू यांची अशीच नाविन्यपुर्ण , निर्यातयोग्य उत्पादने शोधुन काढणे.
# शहाळ्याचे पाणी, उसाचा रस, जांभळे, पेरू यांचा ज्युस बॉटल / कॅन करणे (साखर कमी प्रमाणात)
# केळ्याचे खारट चिप्स , फणसाचे चिप्स, इ. उत्पादने बनवणे.
# वेगवेगळ्या फ्लेवरची आईस्क्रिम्स बनवणे
# हि फळे फ्रोजन स्वरुपात उपलब्ध करुन देणे.
# पॅक कोकमाचा रस ( साखर, मीठ विरहीत / कमी प्रमाणात)
# फ्रोजन ब्ल्यु बेरीच्या धर्तीवर फ्रोजन करवंदे, बोरं.
# स्टारफ्रुट निर्यात ( आपल्याकडे रस्त्यावर पडलेली असतात, पण इथे बरिच महाग मिळतात)
//update Sept 2011
# कोकोनट / शहाळ्याच्या चिप्स.
# चिंचेच्या गोळ्या - साखर लावलेल्या. एकदम यम्मी आहेत Wink
# फणसाचे केक , वड्या (भारतात नारळ वड्या, काकडी/ तवसाचा केक असे पर्यायही आहेत.)
# फ्रिझ ड्राईड पपयी, किवी, अननस, फणस, आंबे
# फ्रिझ ड्राईड कंदभाज्या/ फळभाज्यांच्या चीप्स - कारले, रताळी, भेंड्या, झुक्कीनी इ.

यात मालाची उत्तम प्रत, कमी प्रीझर्वेटीव्ह, परदेशी लोकांना मानवणार्‍या चवी (कमी मिठ/ साखर / ब्लांट) आणि उत्तम , सगळी नीट माहीती लिहिलेले पॅकिंग आणि मार्केटिंग या गोष्टी निर्याती मधे खुप महत्वाच्या ठरतील.

आतापर्यंतची बरिचशी निर्यात परदेश स्थित भारतीयांसाठी आहे असे वाटते. त्याहुन पुढे जाऊन परदेशी लोकांमधेही आपल्या उत्पादनांची आवड निर्माण करणे, आणि तिथल्या साधारण बाजारपेठेतही भारतातली फळे/ फळोत्पादने उपलब्ध व्हावित अशा उद्देशाने प्रयत्न व्हायला हवेत असे वाटते.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद अगो. मी दुवे पुढे पाठवले लगेच.

भारतात एका प्लास्टिकच्या कागदात दोन छोट्या गोळ्या गुंडाळलेल्या मिळतात (पूर्वी जेट एअरवेज मधे द्यायचे टेकॉफच्या आधी) तसल्या गोळ्या शोधते आहे मी.

सावली....खुपच छान विषय....

दिनेश दा....मला तर तुमच्याशी बोलावेच लागेल...

आनंद.....इतर प्रतिक्रिया वाचत आहे....

पुन्हा सर्व वाचेन.....

दिनेशदा सहमत! स्वतः सहार कार्गो मध्ये काम केले असल्याने जवळून पाहिले आहे.

नाशिवंत पदार्थ निर्यात करण्यासाठी सहार कार्गो जवळ जो हब आहे तिथे खरच दादागिरी चालते. एकतर आंब्यासारख फळ विमानाने पाठवावं लागत, विमानात असून असून किती जागा असणार, रोज जाणाऱ्या मालाला जागा नसते तिथे अचानक सिझनल फळ आली कि राडा सुरु. नेहमीच्या निर्यातदारांची विमान कंपन्यांशी जवळीक असते, त्यामुळे उपलब्ध जागेसाठी आधी त्यांचा विचार होतो. जसे द्राक्षांसाठी Chartered Cargo Flights ची सोय करतात तशीच इथेही वापरता येऊ शकेल, पण यासाठी आंबा उत्पादकांचे एकत्र प्रयत्न गरजेचे आहेत.

१ डझन आंब्याला ३६०० रुपये बरोबर आहेत, कारण विमानाचा दर आणि quarantine वगैरे करावं लागतं, क्लिअरिंग एजंटचे पैसे यात सामील असतात. तुम्ही स्वतः पाठवायला गेलात तर यापेक्षा जास्त पैसे लागतात.

जहाजाने आखातात ३-४ दिवसात माल पोहोचतो तर अमेरिकेला साधारण २०-२२ दिवस लागतात (Eastcoast). जास्तीत जास्त माल आखतात जाण्याच हे एक कारण असू शकेल . आणखी एक, नाशिवंत मालावर अमेरिका / युरोप या ठिकाणी जेव्हढी बंधने आहेत तेव्हढी आखतात नाहीत.

आंबा फक्त भारतातूनच निर्यात होतो असे नाही, तर पाकिस्तान, थायलंड, केनया, साऊथ आफ्रिका या देशातलेही आंबे निर्यात केले जातात.

आखाती प्रदेशातले भारतीय लोक, आपल्या भारतीय उत्पादनासाठी आग्रही असतात म्हणून तिथे माल पोहोचतो.

आपल्याकडचे आवळा, जांभूळ यांच्यापासून केलेल्या उत्पादनाला मागणी निर्माण करावी लागेल. या फळांच्या चवीची आणि गुणधर्माची फळे मी अजून बघितली नाहीत. कवठ हे फळ सुद्धा असेच युनिक चवीचे आहे. त्यापासून केलेले पदार्थही लोकप्रिय होऊ शकतात. ( फिलिपीन्स मधून त्याचा जाम आखाती प्रदेशात येतो. )

निवडून सुकवलेले केळफूल हे पण तिथूनच येते. ( बनाना ब्लॉसम ) थायलंड मधेही फळांचे उत्तम मार्केटींग होते. चीनमधेही होते. यू ट्यूबवर देखील अनेक क्लीप्स आहेत.

सिंगापूर विमानतळावर मला सुकवलेले ताडगोळे, बोरापासून, मलबेरीपासून केलेले अनेक प्रकार मिळाले. ते थायलंड आणि चीन मधून आले होते.

अरब देशात आंबा हे पुर्ण वर्षभर मिळणार फळ आहे, ईथे आंबा हा आफ्रिका ( केन्या, ईथिओपिया) फार ईस्ट,
भारत, पाकिस्तान, श्रीलंका ईथुन येत असतो, प्रत्येक देशात आंब्याचे सिझन वेगवेगळे असल्याने त्या सिझन प्रमाणे आंबा अरब मार्केट मध्ये येत असतो,

भारतीय आंब्याच्या बरोबरीने पाकिस्तानातुनही आंबा अरब देशात येत असतो, गेल्या वर्षी भारतातुन १.७५ मिलीयन टन आंबा युएईला निर्यात झाला तर पाकिस्तानातुन ९०७१४ टन आंबा युएईला गेला

पाकिस्तानातुन आलेला आंबा हा दुबईच्या (युएईच्या) मार्केटमध्ये फेब्रुवारी पासुन ते सप्टेंबरपर्यत उपलब्ध असतो. पाकिस्तान मधुन येणार्या आंब्याच्या जाती मध्ये लंगडा, केसर, तोतापुरी, चौसा, काला चौसा, असे अनेक प्रकार उपलब्ध असतात, हे आंबे किमती मध्ये खुप स्वस्त असल्याने त्यांना डिमांड ही खुप असते, हे आंबे केमीकल न वापरता प्रोसेस केलेले असल्याने, आणी लाकडी खोक्यातुन निर्यात केले जातात,

ह्या वर्षी पाकिस्तान सरकारने लाकडी खोक्यातुन आंबे निर्यातीवर निर्बंध टाकलेला आहे, त्यामुळे पाकिस्तानातुन
अरब देशात आंबा निर्यात अद्याप सुरु झालेली नाही, खुप आंबा हा पाकिस्तानात सडायला लागलेला आहे, ही
परीस्थिती भारतीय निर्यातदारांसाठी अनुकुल आहे, लवकर हालचाल केली तर मार्केट मध्ये भारतीय आंबा
उतरवता येऊ शकेल.

आज निर्यातीसंदर्भात एक कार्यशाळेला दिवसभर हजेरी लावली. भारतातुन पाठवलेल्या मालाचे पैसे मिळणे ही एक मोठी अडचण शेतकर्‍यांना भेडसावते. गल्फ मध्ये विशेश्तः दुबई ला सर्वाधिक निर्यात होते. (बंधने कमी.)

गल्फ मधील मायबोलीकर जर उद्योजक बनुन तिथे इंपोर्टर म्हणुन काम करु शकले तर त्यांना व भारतीय छोट्या शेतकर्‍यांना एक नवीन दालन खुले होईल.

गल्फ मधील रहिवाश्यांनी विचार करावा! Happy

Pages