फळे आणि फळोत्पादनांच्या निर्याती संबंधी

Submitted by सावली on 23 May, 2011 - 20:25

सध्या आंब्यांचा मोसम. भारतातले आंबे परदेशात मिळणे म्हणजे परमभाग्यच!
पण जेव्हा तीन /चार वर्षापुर्वी पहिल्यांदा इथल्या सुपरमार्केट मधे भारतीय आंबे बघितले तेव्हा आनंद व्हायच्या ऐवजी त्यांची किव आली, स्किन काळपट चॉकलेटी, डागाळलेली. क्वालिटी चेकचा स्टीकर लावलेला भाग खराब झालेला शिवाय तो चिकटपणा धुवुनही न जाणारा. कापल्यावर ५०% आंबे खराब होते. त्या नंतर हे आंबे पुन्हा त्या सुपर मार्केट मधे कधीही दिसले नाहीत.
मला वाटलं पहिल्यांदाच जपानला निर्यात झाले म्हणुन असे प्रकार झाले असावेत. पण या वर्षी भारतील ग्रोसरी स्टोअर मधुन ऑर्डर केले. या वर्षी तर माझ्याकडे आलेला लॉट भयानक खराब होता. सगळ्या आंब्याची स्कीन चॉकलेटी. त्याशिवाय ७५% आंबे कापल्यावर फेकले.
हा बाफ नक्कीच मी त्याची तक्रार करण्यासाठी उघडलेला नाही. पण या निमित्ताने बर्‍याच इतर गोष्टी सांगाव्याशा वाटतात आणि माहिती करुनही घ्याव्याशा वाटतात. माझी निरिक्षणे अर्थात जपान मधली आहेत, दुसर्‍या देशांमधली निरिक्षणे वाचायला आवडतील. शिवाय ज्यांच्या फळबागा आहेत किंवा असे उद्योग उभारायची क्षमता, इच्छा आहे त्यांच्यासाठी इथे काही माहीतीही मिळु शकते.

भारतातली काही फळं म्हणजे आंबे, शहाळी, फणस, पेरु, अननस इ. थायलंड, फिलिपिन्स सारख्या देशातही मिळतात. पण थायलंडने हि फळं आणि त्यांची उत्पादने निर्यात करण्यात बरीच प्रगती केलेली दिसते. थायलंड तर फळांचा आणि भाज्यांचा देश आहे अशीच एक प्रतिमा बनते. त्यांच्या रेस्टॉरंट मधेही फळांचे रिप्रेझेंटेशन मस्त असते.

इथे थायी, फिलिपिन्स आंबे नेहेमी दिसतात. ते बघतानाही चांगले दिसतातच शिवाय कापल्यावर कधीही खराब / काळे निघत नाहीत. त्याप्रमाणे मेक्सिकन आंबेही दिसतात. हे आंबे तर सुंदर लाल रंगाचे असतात आणि १०००येन पासुन ९०००येन ला एक अशा किमतीत विकायला ठेवलेले असतात. हे आंबेही कापल्यावर तितकेच सुंदर दिसतात/लागतात. (फार वेळा आणले नाहीयेत पण जेव्हा आणलेत तेव्हा कधीच खराब निघाले नाहीत)

थायी, फिलिपिन्स अननस, शहाळी इथे ठराविक सिझनला मिळतात. शहाळ्याचे सगळे हिरवे साल काढुन ( वजन कमी!) फक्त आतला नारळ प्लॅस्टिक मधे रॅप करुन ठेवलेला असतो. विकायला आला की पटापट खपतो.

थायलंड हुन आलेल्या सुकवलेल्या कुठलेही प्रिझर्वेटिव्ह नसलेल्या आंब्याच्या आणि फणसाच्या फोडी, केळ्याचे गोड चिप्स, शहाळ्याच्या पाण्याचे कॅन्स, लाल आणि हिरव्या पेरूच्या ज्युसचे कॅन, इ. या गोष्टी इथे बर्‍याच मिळतात आणि लोकांना आवडतात.

भारतात हि सगळी फळं आणि त्याहुन जास्तीची वेगळी फळंही मिळतात. त्यांच्या निर्यातीसाठी आपण काय काय करतो /करतो का?
इथे ज्यांच्या फळ बागा आहेत त्यांनी याबद्दल विचार करायला हरकत नाही
मला सुचलेल्या काही गोष्टी -

#. आंबे निर्यात करण्यासाठी , त्यांची स्किन काळी पडु नये म्हणुन स्पेशल पॅकिंग शोधणे. किंवा नविन आंब्याचे वाण जे निर्यात योग्य आहे असे शोधणे.
# आंबा पोळी, आंबा वडी, सुकवलेल्या आंब्याच्या फोडी हे चांगल्या प्रतिचे पॅकिंग करुन निर्यात करणे.
# फणस, काजुची बोंडे, करवंदे, पेरू यांची अशीच नाविन्यपुर्ण , निर्यातयोग्य उत्पादने शोधुन काढणे.
# शहाळ्याचे पाणी, उसाचा रस, जांभळे, पेरू यांचा ज्युस बॉटल / कॅन करणे (साखर कमी प्रमाणात)
# केळ्याचे खारट चिप्स , फणसाचे चिप्स, इ. उत्पादने बनवणे.
# वेगवेगळ्या फ्लेवरची आईस्क्रिम्स बनवणे
# हि फळे फ्रोजन स्वरुपात उपलब्ध करुन देणे.
# पॅक कोकमाचा रस ( साखर, मीठ विरहीत / कमी प्रमाणात)
# फ्रोजन ब्ल्यु बेरीच्या धर्तीवर फ्रोजन करवंदे, बोरं.
# स्टारफ्रुट निर्यात ( आपल्याकडे रस्त्यावर पडलेली असतात, पण इथे बरिच महाग मिळतात)
//update Sept 2011
# कोकोनट / शहाळ्याच्या चिप्स.
# चिंचेच्या गोळ्या - साखर लावलेल्या. एकदम यम्मी आहेत Wink
# फणसाचे केक , वड्या (भारतात नारळ वड्या, काकडी/ तवसाचा केक असे पर्यायही आहेत.)
# फ्रिझ ड्राईड पपयी, किवी, अननस, फणस, आंबे
# फ्रिझ ड्राईड कंदभाज्या/ फळभाज्यांच्या चीप्स - कारले, रताळी, भेंड्या, झुक्कीनी इ.

यात मालाची उत्तम प्रत, कमी प्रीझर्वेटीव्ह, परदेशी लोकांना मानवणार्‍या चवी (कमी मिठ/ साखर / ब्लांट) आणि उत्तम , सगळी नीट माहीती लिहिलेले पॅकिंग आणि मार्केटिंग या गोष्टी निर्याती मधे खुप महत्वाच्या ठरतील.

आतापर्यंतची बरिचशी निर्यात परदेश स्थित भारतीयांसाठी आहे असे वाटते. त्याहुन पुढे जाऊन परदेशी लोकांमधेही आपल्या उत्पादनांची आवड निर्माण करणे, आणि तिथल्या साधारण बाजारपेठेतही भारतातली फळे/ फळोत्पादने उपलब्ध व्हावित अशा उद्देशाने प्रयत्न व्हायला हवेत असे वाटते.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आंब्याची सालं काळी पडण्यासंदर्भात - आंब्याला आवश्यक ते तापमान मिळालं नाही की आंबा काळा पडतो. अढीत लावलेला आंबा याच कारणासाठी चविष्ट लागतो कारण त्याचं तापमान पेंढा, सुकं गवत घालून टिकवलं जातं. यचा प्रयोग घरीही करून बघता येईल. पिकत आलेले आंबे रात्रभर एसी लावलेल्या बेडरूममधे ठेवले/ राहिले तर त्याची सालं काळी पडायला लागतात.

आंब्याची उत्पादने - आंबापोळी, साटं, लोणची, मुरांबा, छुंदा, फणसाचे तळलेले गरे, फणसपोळी, इत्यादी गेली काही वर्षे नियमित निर्यात होत आहेत.

धन्यवाद मंजूडी.
बरोबर. थंड हवा लागली की आंबा काळा पडतो. पण हे फक्त भारतातल्या आंब्याबाबतच होतं हा माझा मुद्दा आहे. थायलंड, फिलिपिन्स, मेक्सिकन, अगदी जापनीज आंब्यांना हा त्रास नाही.
म्हणुन मी म्हणाले की स्किन काळी न पडण्यासाठी पॅकिंग किंवा नविन वाण शोधुन काढायला वाव आहे.

बाकि उत्पादनांबद्द्ल माझ्या माहीती प्रमाणे बहुतेक ठिकाणी (सर्व नाही) निर्यात परदेशस्थित भारतीयांसाठी आहे (काजू सोडुन). परदेशीय लोकांनाही ग्राहक म्हणुन बघितलं जावे आणि त्याप्रमाणे पॅकिंग, क्वालिटी कंट्रोल केले जावे असे मला सुचवायचे आहे.
या अनेक अडचणी असतिही पण कदाचित यात उद्योगाची चांगली संधीही आहे असे वाटते.

इथे भारतातून आलेले हापूस आंबे मी एकदोन वर्षापूर्वी खाल्ले होते. आणले तेव्हा कच्चटच होते पण हळूहळू पिकायला लागले. त्यामुळे सालं चॉकलेटी पडण्याचा अनुभव मला नाही तसेच आतून खराब वगैरेही नव्हते.

हापूस आंबे सहज मिळत नाहीत म्हणून पायरीच्या चवीचा आणि पिकायला लागल्यावर तसाच घमघमाट सुटणारा 'मॅरेथॉन' नावाचा आंबा मी नेहमी आणते पण त्याचाही वाईट अनुभव नाहीच.

आंबा आणि आंब्याच्या पदार्थांच्या निर्यातीचा धंदा नविन नाही. वर्षानुवर्षे ऐकत आलेय या बद्दल. उलट मोठ्या आमराईवाल्यांकडला बेस्टेष्ट Proud क्वालिटीचा आंबा हा खास निर्यातीसाठीच ठेवला जातो त्यामुळे इथे आम्हाला जरा कमी प्रतिचा आंबा उपलब्ध असतो. इतर वस्तूंच्या निर्यातीत पॅकेजिंगमधे आधुनिक तंत्रज्ञान आलं आहे तसं यातही आलं असेल.

सावली, एखादी बॅच तिकडे पोहोचल्यावर नीट हाताळली गेली नसेल त्यामुळे साल काळी पडली असेल Happy

सावली,
वेगळा पण छान विषयावर लेख !
Happy

माझ्या मते आंबे खुप दिवस नाही पण निर्यात होताना (३-४ दिवस तरी) चांगले राहिले पाहिजेत्,राहत असतील पण परदेशात काही लोकांकडुन चांगल्याबरोबर असा जुना खराब मालदेखील (महाग असल्यामुळे) विकण्याचा प्रयत्न होत असेल..
आंबे हे खुप दिवस रंगाने/ताजे राहत नाहीत हेही खर आहे,वातावरणाचा लगेच परिणाम होताना दिसतो,चांगले पिकले की दुसर्‍या दिवसापासुन खराब होताना दिसतात..
मी देखील छान पिकलेले पण १-२ दिवस न पाहिल्यामुळे काही डझन आंबे अशीच फेकुन द्यावी लागली.
(आंबे हे पैकिंग न करता तर अजिबात टिकत नाहीत हेही खरच आहे.)
काही रसायनांमुळे अस होत असेल का हे ही तपासुन पाहिले पाहिजे ...

माझा एक ताजा अनुभव....
परवा गावाकडुन पुण्याला येताना खाण्यासाठी १-२ डझन केळी आणली (आईकडुन नेहमीप्रमाणे घातली गेली) यात एखादा डझन वसईची केळी होती, जी मोठ्या प्रमाणावर (काही एकर) केलेल्या बागेतुन,बहुतेक रासायनिक खते/ओषधे वापरुन आणलेली, दुसरी केळी देशी (लहान) पण पानमळ्यातुन आलेली, जी रासायनिक खते/औषधे खुप (नाहीच) कमी वापरलेली, ही दोन्ही प्रकारची केळी मी घरी अजुन कच्ची असल्यामुळे अशीच किचन कट्ट्यावर ठेउन दिली,१-२ दिवस घाईत असेच न बघता गेले, तर दुसर्‍याच दिवषी वसई केळी पिकल्याच दिसल,तिसर्‍या दिवशी वसईची केळी खराब होताना दिसली,तर याच वेळी देशी केळी हळुहळु छान पिकताना दिसली,आणि ४ दिवसानंतर देखील एकही केळी खराब होताना दिसल नाही.चव देखील अगदी गोड जी पुण्यातल्या अनेक मॉल मधल्या देशी (पिवळ्या) केळीत पहायला मिळाली नाही अशी.
हा सगळा फरक ,परिणाम आहे तो या रासायनिक खते आणि ओषधे यांचा आहे अस मला वाटतं ..
Happy

सावली
यातलं फारसं काही कळत नाही. पण परवा घडलेली गोष्ट सांगते. पुण्यात देसाई आंबेवाल्यांकडे "परदेशी आंबे घरपोच पाठवतो" अशी पाटी वाचली. म्हणून चौकशी केली.(आंबा खाताना लेकीसाठी फोड घशात अडकत होती.) तर "१ डझन आंब्यांचा ३६०० रु. खर्च येईल. आणि इथून तिथे आंबे पाठवताना ते बॉइल करून पाठवावे लागतात. कारण खाद्यपदार्थांचे नियम कडक आहेत. त्यातलेही पोचेपोचेपर्यंत निम्म्यापेक्षा जास्त आंबे काळे पडतात. आता पहा पैसे तुमचे आहेत."(हे वाक्य ध्रुपदासारखं वापरलं जात होतं) अशी माहिती मिळाली. मग आंबे पाठवण्याचा विचार कोण करेल? हो म्हणजे ३६०० रुपयात ४/५ आंबे पाठवणं परवडणार नाही हो! तेही काळे नसतील कशावरून?

उलट मोठ्या आमराईवाल्यांकडला बेस्टेष्ट क्वालिटीचा आंबा हा खास निर्यातीसाठीच ठेवला जातो त्यामुळे इथे आम्हाला जरा कमी प्रतिचा आंबा उपलब्ध असतो.>>> हा आंबा अमेरिकेला वगैरे जात नाही. अरबाच्या देशात जातो.

भारतातून आंब्याचे तयार पदार्थ घेऊन जायचे असल्यास योजक उत्पादनाचे घ्यावेत. चांगले टिकतात आणी चव देखील मस्त असते. त्याचे आमरस, आंबावडी., आंबापोळी, फणसाचे गरे कोकम सर॑बत, करवंदाचे सरबत असेकित्येक पदार्थ उपलब्ध आहेत.

भारतातून जे आंबे गल्फ मधे निर्यात होतात ते उत्तम असायचे. पण अंतर कमी असल्याने असेल का ?
भारतातून निर्यात होणार्‍या शेतमालाबद्दल काही बातम्या वाचल्या होत्या.
आपलाच आंबा बाजारात पहिल्यांदा पोहोचला पाहिजे, म्हणून कमी प्रतीचा, कच्चा, रसायने फवारलेला आंबा पाठवला जातो.
शेतीमाल निर्यात करणारे जे हब्ज आहेत तिथे लोडर्सची प्रचंड दादागिरी चालते. माल विमानात चढवण्यासाठी निर्यातदाराची प्रचंड अडवणूक केली जाते. हा माल नाशिवंत असल्याने निर्यातदार घायकुतीला आलेला असतो. पण जर त्याने पैसे दिले नाहीत तर माल चढवला जात नाही.
आता भारतातून आणखी कुठली फळे निर्यात होतात का त्याची कल्पना नाही. पण टिनमधल्या आंब्याच्या रसाची चव मला अजिबात आवडत नाही. एकतर त्यात भरमसाठ साखर घातलेली असते, आणि टिनचा म्हणून एक वेगळाच स्वाद येतो त्याला.
फ्रोझन रुपात भाजीपाला निर्यात होतो ते बघितलेय (न्यू झीलंडला ) पण त्या सर्व वाहतुकीत म्हणजे अगदी रस्त्यावरच्या वाहतुकीत देखील, तपमान राखणे अत्यंत आवश्यक असते. नीट देखभाल न केलेल्या कंटेनर्स मूळे ते खुपदा राखले जात नाही.
सुकवलेली फळे हा एक चांगला पर्याय आहे. पण त्याबाबतीत आपल्याकडे तंत्र आणि उद्योजक दोघांचीही वानवा दिसते. सन ड्राईड टोमेटो युरपमधे किती लोकप्रिय आहेत ते आपण बघतोच. पण तसा प्रयत्न भारतात झालेला दिसत नाही. मला सिंगापूरला, सुकवलेले ताडगोळे मिळाले होते, अप्रतिम चवीचे होते. थायलंड मधे मी आंबा, पपई, किवी वगैरे फळे सुकवलेली बघितली होती. अननस पण छान सुकवता येतो. पण ती उत्पादने भारतातली का दिसत नाहीत.

बँकॉक विमानतळावर उत्तमरित्या पॅक केलेले ताजे पेरू, जाम, चिंच दिसतात. आपल्या विमानतळावर क्वचित केळी दिसतात. बाकी काही नाही.

थायलंड मधेच फळांवर आधारीत पर्यटन पण आहे. त्या बागांत जाऊन, आपल्या हाताने फळे तोडून खाता येतात. (बडोद्याला पण अशी पेरुची बाग मी बघितली होती ) पण आणखी कुठे दिसली नाही.
पण ताजी फळे नेहमीच चांगल्या स्थितीत असतात असे नाही. देशोदेशीच्या सुपरमार्केटमधे बुरशी आलेली फळे मी बघितली आहेत (आणि ती इंपोर्टेडच होती.)

आता अनेक देशांनी फळांच्या बाबतीत जास्त लक्ष द्यायला सुरवात केलीय. इजिप्त, इरान, इस्रायल, केनया, पाकिस्तान पण आता पुढे येताहेत. नवनवीन फळांचे रस / नेक्टर (पेरू, पपई, आंबाडी ) बाजारात दिसतात पण त्यापैकी भारतातले काही नसतात, खरे तर केनयात फळांची समृद्धी आहे. ताज्या फळांनी बाजार भरलेले असतात. तरीही इथल्या सुपरमार्केट्स मधे आयात केलेली उत्पादने दिसतात म्हणजे त्या देशांतील निर्यातदारांना दाद दिलीच पाहिजे.

दिनेशदा,
मी आंबा आणी अननस वाळवण्याचा प्रयत्न करत आहे.. अजून तरी थायलंड सारखी quality नाही मिळत. त्यांच्या कडचे आंबे वेगळे असतात. गुगल ही खूप केले पण commercial प्रोसेस सापडली नाही अजून. ज्या काही दिल्या आहेत त्यांनी ती quality नाही मिळाली. आपल्याकडे आवळ्याचे बर्‍यापैकी वाळवणे दिसते.. पण बाकी च्या फळांसाठी दिसत नाही.
अननस साठी जवळपास आलो होतो..पण तरीपण perfect नाही झाले..
टिन मधल्या रसात preservatives असतात.
मी मेल करतो.. फोन घेऊन कॉल करेन. बोलण्यासारखे आणी विचारण्यासारखे खूप आहे...

जर कुणाला ह्या संदर्भात माहिती असेल तर कृपया मला मेल करा...

मी tetrapack मधील एकाशी बोललो होतो... त्यांनी सांगितले की जर कोकमाचा रस (मीठ वा साखर शिवाय) काढला तर त्याला मागणी असेल्...पण त्याविषयी ही काही मिळाले नाही...
spray dried पावडर ला खूप मागणी आहे.. पण त्याला गुंतवणूक फार लागते...

आनंद नक्की. संपर्कातून इमेल केली तरी चालेल. ही जी वाळवलेली फळे असतात त्यांचा रंग आणि स्चाद अगदी टिकून असतो.
कदाचित ते उन्हात न वाळवता, आणखी काही प्रकाराने वाळवत असावेत.
मी स्वतः अशी अनेक फळे चाखून बघितलेली आहेत. साखरेचे प्रमाणही जास्त नसते.
मी वर उल्लेख केलेला आंबाडीच्या बोंडाच्या पाकळ्यांचा रस, चवीला आणि रंगाला कोकम फळासारखाच असतो.
सुकवलेल्या प्रकारात भाज्याही डिहायड्रेट केलेल्या असतात. हा प्रयोग मी घरी करुन बघितला. लाल व पांढरा कोबी, गाजर यांचा किस करुन, व्हिनीगरच्या गरम पाण्यातून काढून सुकवला. दोन तीन महिने व्यवस्थित टिकलाय. पण कैरीचा किस वाळवताना ढगाळ वातावरणामूळे बुरशी आली.
मला सिंगापूरला लिंबाच्या पण वाळवलेल्या चकत्या मिळाल्या. रंग पिवळाच होता.
माझ्याकडे एक पुस्तक आहे त्यात काही वाळवायच्या कृति आहेत. पुस्तक इथे असले तर संदर्भ देतो.

दिनेशदा,
तुमच्या पानावर संपर्कासाठी option दिसत नाही. बहुतेक तुम्ही ती सुविधा बंद केली असेल..
पण माझ्याकडे तुमचा address आहे...तो वापरुन मेल करेन..

--
संपर्क सुविधा चालू करायची असेल तर
माझे सदस्यत्व-> संपादन->सदस्य खाते-> पानावर खाली संपर्काची सोय असे आहे.. त्यात checkbox वापरुन सुविधा चालू\बंद करू शकता.

पुण्याच्या देसाईबंधू आंबेवाल्यांचा टीन मध्ये पॅक केलेला हापूस आंब्याचा रस मागच्यावर्षी पहिल्यांदा खाल्ला, अमर या नावानी बाजारात आणलाय त्यांनी (अमेरीकेत तरी याच नावाने आहे). पल्प आणि titbits असे दोन प्रकार आणलेत. मला titbits प्रकार जास्त आवडला यात आंब्याचा हाताने रस केल्यासारख्या बारीक फोडी असतात. एकदम घरी रस काढल्यासारखे वाटते.
आत्ता पर्यंत खाल्लेला टीनमधला सगळ्यात उत्तम रस. चक्क हापूसची चव लागते, No Sugar, No preservatives added असे लिहीलेले असते डब्ब्यावर आणि अगदी खरच कुठलाही प्रीझर्व्हेटीव्हचा वास येत नाही किंवा चव लागत नाही. त्याच्या आधी हल्दीराम, स्वाद अश्या कंपन्यांचे टीन मधले मँगो पल्प खाल्ले होते अगदी नाईलाजास्तव. आता फक्त देसाई बंधू.

अंजली हो इं.ग्रो. मध्ये. इथे ठराविक इंडीयन ग्रोसरीच्या दुकानातच मिळतो सगळ्या नाही. मागच्यावर्षी एका प्रदर्शनात देसाईबंधूचा स्टॉल होता त्यांनी यादी दिली होती आमच्या इथल्या सप्लायर्सची. लालूच्या घराजवळच्या स्टोअरमध्ये मिळतो. तुमच्या इथल्या इंग्रो मध्ये नसेल तर मराठी मंडळातर्फे त्यांना संपर्क करता आला आणि काही करता आले तर बघ.

@सायो, मॅरेथॉन आंबा माहीत नव्हता. धन्यवाद.
@अश्विनी, नाही गं एक बॅच नाही दोन वेगवेगळ्या वर्षी आलेला अनुभव आहे. नंदिनी म्हणाली तसे ते बेस्टेस्ट Wink आंबे अरब देशात जातात.
@ अनिल, रसायने, खते यांचा परिणाम असेलही. तुम्हाला आलेला केळ्यांचा अनुभव मीही घेतला आहे. बिना खताची घरातल्या बागेतली केळी जास्त टिकतात आणि चव सुद्धा गोड असते. त्याशिवाय विक्रिसाठी आंबे कवळे असतानाच उतरवतात त्यामुळे आंब्याची बाठी काळी पडते किंवा गरात पांढरे डाग पडतात.
@नंदिनी धन्यवाद.
@ मानुषी, हो आंबा काळा पडतो बर्‍याच वेळा ते या प्रोसेस मुळेही असेल. पण पुन्हा भारतीय आंबाच का? दुसर्‍या सगळ्याच देशातुन फळे निर्यात होतात. भारतीय आंबे परदेशात मिळतात ते काही स्वस्त नसतातच. मग एवढाले पैसे देऊन खराब माल कोण घेईल?
@दिनेशदा धन्यवाद. हि उपयोगी माहीती आहे. म्हणजे निर्यातीच्या मालाची क्वालीटी चांगली करण्यासाठी निर्यात प्रोसेसमधेही बदल हवे असणार. त्याशिवाय पॅकिंग मधेही.
सुकवलेली फळे आणि त्यांची इतर उत्पादने याला खरच फार वाव आहे. भारतातुन यासाठी अधिक प्रयत्न व्हायला पाहीजेत. यासाठीच हा लेख आहे. विकसित देशात वेगवेगळ्या नियमांमुळे खराब झालेला पदार्थ सुपर मार्केट मधे दिसत नाही. शिवाय एकदा भारतीय आंबे /पेरू/ कुठलही फळ खराब मिळालं तर ग्राहक पुन्हा ते विकत घ्यायच्या भानगडीत पडणार नाही म्हणुन ताजी फळे किंवा उत्पादने जे काही निर्यात करु ते उत्तर प्रतिचेच असले पाहीजे. फिलिपिन, थाई सारखे देश जर या आघाडी घेऊ शकतात तर भारत का नाही. आपल्याकडे खरच याबाबतीत अजुन संशोधन आणि प्रयोगही व्हायला हवेत.

@ आनंद , ग्रेट. Happy
या लेखातल्या चर्चेतुन तुमच्या सारख्या एकालातरी फायदा झाला तर खुप आनंद होईल.
तुम्ही थायलंड मधे ओळख वगरे काढुन, तिथे जाऊन हि प्रोसेस बघुन येण्याविषयी विचार केला आहात का? कदाचित तिथेच तुम्हाला जास्त माहीती मिळणार. निरनिराळे सेमिनार वगरेची माहीती मिळवा . शक्य असेल तर ते अटेंड करा.
मागच्या वर्षी आमचा एक जवळचा मित्र जपान मधला सेमिनार अटेंड करण्यासाठी आमच्याकडे राहुन गेला. त्याला इसेन्स आणि हर्बल प्रॉडक्ट्स बनवायचे आहेत. त्याला स्पॉन्सरही मिळाला होता.

काही वेळा हि फळे वाळवलेली असतात तर काही वेळा डिहायड्रेटेड असतात. कमर्शियल प्रोसेस बद्दल माहिती मिळाली तर नक्की देईन.

रुनी, रैना, अंजली धन्यवाद.

अंजली, www.vedanttrading.com वर रुनी म्हणतेय ती प्रॉडक्ट्स अवलेबल आहेत. मी ऑर्डर करायचा प्रयत्न केला पण त्यांच्या वेबसाईटला प्रॉब्लेम आहे. पेमेंट प्रोसेस होत नाहीये.

नविन काही उत्पादनांच्या कल्पना आल्या तर वर मुख्य धाग्यात टाकेन.
आता हे टाकले आहे
# पॅक कोकमाचा रस ( साखर, मीठ विरहीत / कमी प्रमाणात)
# फ्रोजन ब्ल्यु बेरीच्या धर्तीवर फ्रोजन करवंदे, बोरं.
# स्टारफ्रुट निर्यात ( आपल्याकडे रस्त्यावर पडलेली असतात, पण इथे बरिच महाग मिळतात)

@आनंद
आपले उत्पादन निर्यात योग्य आहे का नाही यासाठी करुन घ्यायच्या काही टेस्ट असतात. त्या लॅब मधे चेक करुन त्यांच्याकडुन शहानिशा करुन प्रमाणपत्रही मिळवता येते. अशा एका लॅबची माहीती दोन एक वर्षापुर्वी चतुरंग मधे वाचलेली आठवते. कोणाला अशा लॅब्स माहिती असतील तर प्लिज इथे लिंक्स / माहिती द्या.

गुगल ही खूप केले पण commercial प्रोसेस सापडली नाही अजून.>> साधारणपणे किती स्केल ला करायचा विअचार आहे? आणि नेमके काय करायचे आहे ते सविस्तर लिहाल का? मी तुम्हाला प्रोसेस डेव्हलप करायला पुर्ण पणे मदत करु शकतो.

पुन्हा एकदा व्हाया बँकॉक गेले. तेव्हा एअरपोर्ट वर अजुन वेगळी उत्पादने दिसली

# कोकोनट / शहाळ्याच्या चिप्स.
# चिंचेच्या गोळ्या - साखर लावलेल्या. एकदम यम्मी आहेत Wink
# फणसाचे केक , वड्या (भारतात नारळ वड्या, काकडी/ तवसाचा केक असे पर्यायही आहेत.)
# फ्रिझ ड्राईड पपयी, किवी, अननस, फणस, आंबे
# फ्रिझ ड्राईड कंदभाज्या/ फळभाज्यांच्या चीप्स - कारले, रताळी, भेंड्या, झुक्कीनी इ.

>>चिंचेच्या गोळ्या - साखर लावलेल्या.
या काय नावाने मिळतात?
मी भारतातून किलोभर घेऊन आले होते या वर्षी आणि खाणार्‍या प्रत्येक व्यक्तीने हे कुठे मिळेल असे विचारले. गूगलायला नावही माहित नसल्याने काही सापडले नाही. (साधे इंग्रजी भाषांतर केले तर फारसे काही आढळत नाही.)

tamarind balls नावाने सर्च केल्यास इंग्लिश साईट्सवर तशा गोळ्या दिसत आहेत.
tamarind candy असे सर्च केल्यास इथे विकायला ठेवलेल्या दिसल्या. अजूनही ठिकाणी आहेत पण युकेतल्या साईट्स कमी होत्या. शोधून बघ Happy

Pages