१९ मे म्हणजे माझ्या आज्जीचा वाढदिवस. ती आज असती तर एकोणनव्वद वर्षांची झाली असती. आम्ही लहान असताना आज्जी आम्हांला खूप गोष्टी सांगायची. रोज दुपारी, रात्री झोपताना गोष्टी ऐकून मगच झोपायचो . तिच्याकडून मी आणि भावाने ज्या गोष्टी ऐकल्या, त्या पुढे भावाच्या मुलांनीही ऐकल्या. माझी मुलगी रिया सव्वा महिन्याची असताना आज्जी गेली त्यामुळे रियाला मात्र त्या गोष्टी आज्जीकडून (म्हणजे तिच्या पणजीकडून) ऐकायला मिळत नाहीत. आम्ही आठवतील तश्या सांगत असतो पण ती सर काही येत नाही. ही सुसुंगगड्याची गोष्ट रियासकट आमच्या सर्वांच्या आवडीची. आज्जीने कुठे वाचली की कोणाकडून ऐकली की स्वतःच रचली ते माहित नाही कारण आत्तापर्यंत मी वाचलेल्या गोष्टींच्या पुस्तकात कधी गोष्ट सापडली नाही. त्यामुळे आज्जीच्या वाढदिवसानिम्मित इथे लिहून ठेवतो आहे.
--------------
एक असतं जंगल. त्या जंगलात रहात असतात खूप सारे प्राणी. वघोबा, सिंह, कोल्हा, लांडगा, हत्ती, रेडा, अस्वल वगैरे.. आणि बरेच पक्षी, कावळा, चिमणी, मोर, पोपट, कोंबडा वगैरे.. एकदा काय झालं, वाघोबा आपल्या गुहेतून निघून जंगलात फिरायला गेला. तिथेच जवळ खेळत असलेला कोंबडा खेळता खेळता चुकून वाघोबाच्या गुहेत शिरला. आधी तो घाबरला पण मग गंमत म्हणून त्याने गुहेचं दार बंद केलं आणि आतून कडी लावून घेतली. थोड्यावेळा वाघोबा आपल्या गुहेकडे परतला. येऊन बघतो तर काय, गुहेचं दार आतून बंद!
मग त्याने दार वाजवलं आणि दरडावून विचारलं, "आत कोणे ?"
कोंबड्याला कळेना की आता काय करावं. मग त्याने उत्तर दिलं, "मी सुसुंगगडी."
वाघोबाने विचारलं, "सुसुंगगडी ? तू काय करतो ?"
कोंबडा म्हणाला, "वाघाचं तंगडं मोडतो!"
वाघोबाने विचार केला, वाघाचं तंगडं मोडतो म्हणजे नक्कीच कोणतरी भला मोठा प्राणी असणार आणि मग घाबरून धुम पळत सुटला. आपल्याला वाघ घाबरला हे बघून कोंबड्याला मजा वाटली. पळता पळता वाघोबाला रस्त्यात भेटलं अस्वलं.
अस्वल म्हणालं, "अहो वाघोबा, तुम्ही असे का पळताय आणि इतके घाबरलेले का दिसताय ?"
वाघोबा म्हणाला, "अरे अस्वलभाऊ, तुला काय सांगू! माझ्या गुहेत सुसुंगगडी शिरलाय, तो म्हणतो मी वाघाचं तंगडं मोडतो."
अस्वल म्हणालं, "तुम्हांला कोणतरी फसवत असेल. चला मी येतो तुमच्याबरोबर. आपण बघुया." मग ते दोघं मिळून परत वाघाच्या गुहेकडे आले. आता अस्वलाने दार वाजवालं आणि विचारलं, "आता कोणे?"
कोंबडा म्हणाला, "मी सुसुंगगडी."
अस्वलाने विचारलं, "सुसुंगगडी ? तू काय करतो ?"
कोंबडा म्हणाला, "वाघाचं तंगडं मोडतो आणि अस्वलाच्या झिंजा ओढतो!"
ते ऐकल्यावर वाघ आणि अस्वल दोघही घाबरलो आणि धुम पळत सुटले. पळता पळता त्यांना रस्त्यात भेटला रेडा.
रेडा म्हणाला, "अरे अस्वलभाऊ आणि वाघोबा, तुम्ही असे का पळताय आणि इतके घाबरलेले का दिसताय ?"
अस्वल म्हणालं, "अरे रेडेदादा, काय सांगू तुला. वाघोबाच्या गुहेत शिरलाय एक सुसुंगगडी. तो म्हणतो मी वाघाचं तंगडं मोडतो आणि अस्वलाच्या झिंजा ओढतो!"
रेडा म्हणाला, "अरे असा कोणी सुसुंगगडी असतो का? तुम्हांला कोणतरी फसवत असेल. चला मी येतो तुमच्याबरोबर. आपण बघुया." मग ते तिघं मिळून परत वाघाच्या गुहेकडे आले. आता रेड्याने दार वाजवालं आणि विचारलं, "आता कोणे?"
कोंबडा म्हणाला, "मी सुसुंगगडी."
रेड्याने विचारलं, "सुसुंगगडी ? तू काय करतो ?"
कोंबडा म्हणाला, "वाघाचं तंगडं मोडतो, अस्वलाच्या झिंजा ओढतो आणि रेड्याची शिंग मोडतो!"
ते ऐकल्यावर वाघ, अस्वल आणि रेडा तिघही घाबरलो आणि धुम पळत सुटले. पळता पळता त्यांना रस्त्यात भेटला कोल्हा.
रेडा म्हणाला, "अरे रेडेदादा, अस्वलभाऊ आणि वाघोबा, तुम्ही असे का पळताय आणि इतके घाबरलेले का दिसताय ?"
रेडा म्हणाला, "अरे कोल्होबा, काय सांगू तुला. वाघाच्या गुहेत शिरलाय एक सुसुंगगडी. तो म्हणतो मी वाघाचं तंगडं मोडतो, अस्वलाच्या झिंजा ओढतो आणि रेड्याची शिंग मोडतो!"
कोल्हा म्हणाला, "तुम्हांला कोणतरी फसवत असेल. चला मी येतो तुमच्याबरोबर. आपण बघुया." मग ते चौघं मिळून परत वाघाच्या गुहेकडे आले. आता कोल्ह्याने दार वाजवालं आणि विचारलं, "आता कोणे?"
कोंबडा म्हणाला, "मी सुसुंगगडी."
कोल्ह्याने विचारलं, "सुसुंगगडी ? तू काय करतो ?"
कोंबडा म्हणाला, "वाघाचं तंगडं मोडतो, अस्वलाच्या झिंजा ओढतो आणि रेड्याची शिंग मोडतो आणि कोल्ह्याचं शेपुट तोडतो!"
पण कोल्हा होता हुषार आणि लबाड. तो काही घाबरला नाही. त्याने विचार केला हा आवाज तर ओळखीचा वाटतो आहे. मग त्याने काय केलं, ह्ळूच गुहेच्या मागच्या बाजूला गेला आणि तिथल्या खिडकीतून आत डोकावून पाहिलं आणि बघितलं तर कोंबडा! मग त्याने वाघ, अस्वल आणि रेड्या बोलावून सांगितलं की "बघा सुसुंगगडी वगैरे काही नाही. हा तर साधा कोंबडा आहे!!". त्या सगळ्यांनी मिळून मागची खिडकी हळूच उघडली, त्या कोंबड्याला धरून बाहेर काढलं आणि जोरात बदडायला सुरूवात केली. मग कोंबडा रडून गयावया करायला लागला, "सॉरी सॉरी, मी परत असं करणार नाही! कोणाला फसवणार नाही."
मग सगळ्यांनी त्याला सांगितलं की पुन्हा असं केलस तर तुला अजून मोठी शिक्षा करू. कोबंड्याने परत खोटं न बोलण्याचं आणि कोणाला न फसवण्याचं कबूल केल्यावर त्याला सोडून दिलं!
म्हणून खोटं कधी बोलू नये आणि कोणाला कधी फसवू नये!
छान छान गोष्टी या नावाने मिळत
छान छान गोष्टी या नावाने मिळत या कॅसेट्स. माझ्या भाच्यांसाठी आणल्या होत्या.
आमच्या आजीचं व्हर्शन म्हणजे
आमच्या आजीचं व्हर्शन म्हणजे 'मी आहे ससुन्नगडी, वाघाचे पाय मोडी'. मी आणि माझा भाऊ दोघंही वर्षानुवर्षं ही गोष्ट ऐकली.
मी पण ससुल्यागडीची गोष्ट ऐकली
मी पण ससुल्यागडीची गोष्ट ऐकली होती. आज पुन्हा हे व्हर्जन वाचून मजा वाटली.
खूपच गोड आहे गोष्ट ! मीसुद्धा
खूपच गोड आहे गोष्ट ! मीसुद्धा आजी- आजोबांकडुनच ऐकली आहे.
फारच गोड गोष्ट आहे! जाम
फारच गोड गोष्ट आहे! जाम आवडली..बाकीची व्हर्जन्सही मस्त! सगळ्याच पोस्ट्स वाचताना nostalgic व्हायला झालं!
मी माझ्या लहानपणी एक पुस्तक वाचलं होतं. बहुतेक रशियन कथांचा अनुवाद असावा. मस्त रंगीबेरंगी चित्र होती त्यात. मला त्यातली एकच गोष्ट आठवते आहे ज्यात खूप पाउस पडतो आणि मग एका मोठ्या मश्रूमच्या छत्रीखाली बरेच प्राणी एकत्र येतात असा काहीसा भाग होता. एक चित्र पण होतं त्याचं. पण मला बाकी काहीही आठवत नाहीये कोणाला हे पुस्तक/ही गोष्ट माहिती आहे का?
मी काल घरी जाऊन मुलाला ऐकवली
मी काल घरी जाऊन मुलाला ऐकवली कान देऊन ऐकली त्याने. टायगर, टेडी बेअर, भुभु, गिराफ असे व्हेरीएशन्स केले. त्याला आवडली. नंतर तो ' टायगरची तंगडी मोडी' असे बडबडत होता
सगळ्याच पोस्ट्स वाचताना
सगळ्याच पोस्ट्स वाचताना nostalgic व्हायला झालं! >> +१
जिज्ञासा, मिशा मासिक का? त्यात रशियन गोष्टी असायच्या.
छान गोष्ट आहे पराग. आजी
छान गोष्ट आहे पराग. आजी नसल्यामुळे अशा गोष्टी आजीच्या आवाजात ऐकल्या नाहीत कधीच. मम्मी पपांच्या गोष्टीत ही कधीच ऐकली नाही त्यामुळे मलाच मजा वाटली जास्त. मुलांना सांगेन.
जिज्ञासा ते मिशा मासिक. माझ्या माहेर घरी अजुनही असतील रशियन मासिके. तू जे म्हणते आहेस ते तर नक्की असणार मश्रुम वाले
मस्त रे पराग आणि ह्या
मस्त रे पराग
आणि ह्या निमित्ताने 'आठवणीतील गोष्टी' असा एखादा धागा चालू करावा ही विनंती
नीलम प्रभु म्हणजेच करुणा
नीलम प्रभु म्हणजेच करुणा देव.. अगदी ऐकत रहावा असा आवाज होता तो. आकाशवाणी कलावंत. प्रपंच मधल्या मीनावहीनी. पुलंच्या एका रविवारची कहाणी मधे पण होत्या.
मस्तच की! आमच्याकडे "मी तर
मस्तच की!
आमच्याकडे "मी तर आहे ससुंगडी; वाघोबाची तंगडीच मोडी; अस्वलाच्या झिंज्याच ओढी; .. " अशी यादी होती. आणि ससुंगडी हे पिल्लू सशाचे 'घरातले नाव' असते आणि वाघोबा, अस्वल वगैरे त्याची खेळणी असतात अशी बॅक्ग्राउंड पण. म्हणजे आधी त्या खेळातल्या वाघोबाचा पाय मोडतो वगैरे. एकदम लांबलचक गोष्ट.
रियाच्या आवाजात आहे का कुठे?
मी "छान छान गोष्टी" ऐकतच
मी "छान छान गोष्टी" ऐकतच लहानाची मोठी झाले.
प्लीज नोट.. "छान छान गोष्टी"चे सगळे भाग "सावन" या अँड्रॉईड अॅपवर आहेत. मी अजुनही ऐकते १२ ही भाग.
माझी आवडती गोष्ट (खासकरुन व्हॉईसओव्हरसाठी) : गगल्याचा मळा
मनीने धरलं गगलीला.. गगलीने धरलं गग्याला.. गग्याने धरलं गगीला.. गगीने धरलं गगल्याला (का गग्याला ).. गगल्यानं धरलं मुळ्याला.. लागले मुळा उपटायला.. ए ए ए ए ए ए.. एहे..
ओक्के पियु. धन्स माहिती
ओक्के पियु. धन्स माहिती बद्दल.
मनीने धरलं गगलीला.. गगलीने
मनीने धरलं गगलीला.. गगलीने धरलं गग्याला.. गग्याने धरलं गगीला.. गगीने धरलं गगल्याला (का गग्याला अ ओ, आता काय करायचं ).. लागले मुळा उपटायला.. ए ए ए ए ए ए.. एहे.. स्मित स्मित स्मित >>> ही भक्ती बर्वे ह्यांच्या आवाजात आहे ना ? एकदम घुमला त्यांचा खास आवाज कानात
ही भक्ती बर्वे ह्यांच्या
ही भक्ती बर्वे ह्यांच्या आवाजात आहे ना ?
>> हो. त्यांचा तो खास आवाज.
चवदार मूळ्याची भाजी
चवदार मूळ्याची भाजी
छान छान गोष्टी चे १२ भाग mp3
छान छान गोष्टी चे १२ भाग mp3 format मधे मिळतात.
चैत्रागंधा, प्रिन्सेस,
चैत्रागंधा, प्रिन्सेस, धन्यवाद! मला बाकी काहीच आठवत नाहीये पण आता मिशा मासिक शोधून बघते..ते जर तेच निघालं तर फार भारी वाटेल मला
मस्त आहेत छान छान
मस्त आहेत छान छान गोष्टी
ससुल्यागडी ऐकली आहे, सोनसाखळी -आजीने अपभ्रंश करुन सरवन साखळी अशी ऐकविली होती.
मिशा आमच्याकडेही यायचं.
मिशा आमच्याकडेही यायचं. त्याचा तो नवाकोर्या पानांचा वास घ्यायला फार आवडायचं :).
काय क्युट गोष्ट आहे. फ्रायडे
काय क्युट गोष्ट आहे.
फ्रायडे नाइट ही आमची स्टोरी नाइट असते.
काल हीच गोष्ट मुलाला ऐकवली.
ससुला गडी नाव आणि त्याची आई वाचवते हे व्हर्जन.
मुलं जरा मोठी झाल्येत (असं
मुलं जरा मोठी झाल्येत (असं मला वाटल्यानं दुसरी आणि पाचवी) त्यांना नव्हती सांगीतली, परवा शेजारच्या छोट्या सईला( ज्यु. केजी) ही गोष्ट सांगीतली.....
सांगत असताना माझे दोन्ही मुलगे आले थांबले आणि गोष्ट नीटच ऐकली. लहान्याची परत दुसर्या दिवशी फर्माईश होती ही गोष्ट ऐकव म्हणून
आमची पण ससुल्या गडी आणि आई वाचवते अशीच ...
मस्तच! पण आमच्याकडे हा
मस्तच!
पण आमच्याकडे हा ससुल्यागडी होता.
आधी माझा लेक या गोष्टीत रंगून जायचा.
मग हीच गोष्ट पुतणीला सांगायला सुरवात केली. पण परत परत ३, ४ वेळा तरी ऐकल्याशिवाय तिचं समाधान व्हायचं नाही.
परागजी गोष्ट वाचता वाचता कधी
परागजी गोष्ट वाचता वाचता कधी मनाने लहान झाले कळलच नाही.खूप छान बालकथा.
मला गोष्टी सांगणारे ते माझे काका...काय सुरेख खजिना असायचा त्यांच्याजवळ नव - नवीन गोष्टींचा आणि कवितांचा. आता सारख google / Internet पण नव्ह्त त्यांच्यावेळेस पण त्यांच वाचन मात्र अफाट होत आणि अजूनही आहे. त्यांची एखादि गोष्ट किंवा कविता सांगायची हातोटी खूपच छान होती,मला गोष्ट सांगता सांगता स्वतः पण ते त्यात लहान होऊन जायचे.
आज मी जे काही यश माझ्या आयुष्यात मिळवले आहे, त्यात त्यांचा खूप मोलाचा वाटा आहे.या कथेच्या नीमित्ताने मला माझ्या मनातल्या... माझ्या अमोल काकां विषयीच्या असलेल्या आदराच्या भावना मोकळेपणाने व्यक्त करता आल्या.
परागजी थोड विषयांतर झाल, काल ही गोष्ट लेकीला सांगितली,तीला ही गोष्ट खुपच आवडली.आज पण याच गोष्टिची फर्माईश आहे.
अश्याच छान छान गोष्टि लीहीत रहा. Thank You.
Pages