बरेचसे मायबोलीकर परदेशस्थ असल्याने त्यांना भरपुर विमानप्रवास घडत असणार. प्रवास म्हटला की अनुभव आलेच. विमानप्रवासातही अनुभव थोडेच चुकताहेत? हा बीबी अशाच गंमतीजंमती शेअर करण्यासाठी.
माझा विमानप्रवास अतिशयच मर्यादित आहे. तरीसुद्धा त्यात मला एक गंमतीशीर अनुभव आला. तो इथे देते.
लेहला गेलो होतो. येताना दिल्ली विमानतळावर बोर्डींगपास घेताना काऊंटरवरच्या बाईला "विन्डो सिट प्लिज" ही विनंती केली. बाई जरा जास्तच हायफाय होती. चेह-यावरची इस्त्री न मोडता तोंडातल्या तोंडात कायतरी पुटपुटून तिने मला दोन बोर्डींग पास दिले. नंबर चेक केले तर दोन्ही नंबरात ४-५ आकड्यांचा फरक होता. "दोन्ही सीट्स विन्डो सीट्स आहेत बहुतेक" असे अनुमान मी जराशा खुशीतच काढले. जातानाही मी विंडो सीट मागितलेल्या तेव्हा एकच विन्डो मिळालेली, तीही दुर्दैवाने माझ्या बोर्डींगपासाला. त्यामुळे विमानात चढल्यावर लेकीने दादागिरी करुन ती स्वतःला बळकटावलेली.
विमानात चढल्यावर कळले की काऊंटरवाल्या बाईने तिच्या सिट अलोकेशनच्या स्वातंत्र्याचा मी योग्य तो आदर न राखल्याचा सुड माझ्यावर उगवलेला. आम्हा दोघींच्याही सिट्स चक्क मिडल सिटस होत्या. आणि त्याही एकमेकींपासुन दुर. मुलीच्या बाजुच्या विंडो सिटवर एक स्त्री बसलेली आणि तिच्या बाजुची सिट रिकामी होती. मी मिडल सिटवर न बसता बाजुच्या सीटवर बसले पण आयल सिटवाला बाब्या आल्यावर मला नाईलाजाने मिडलला शिफ्ट व्हावे लागले. माझ्या बाजुच्या विंडोला कोणी स्त्री यावी ही आशा मी बाळगुन होते पण थोड्या वेळाने तिथेही एक बाब्या आला. दोघांच्या मध्ये बसणे मला जरा त्रासदायक वाटू लागले म्हणुन मग मी आयलवाल्याला मिडलला बसण्याची विनंती केली . (भारतीय विमानातुन प्रवास करणा-यांना माहित असेल की विमानातल्या सिटा आपल्या एस्टीमधल्या सिटापेक्षाही जास्त अनकंफर्टेबल असतात). बिचारा बसल्याबसल्या त्याची डायरी काढुन काहीतरी लिहित होता. मिडल सिटवर त्याला लिहायला थोडा त्रास होणार होता पण त्याने माझी विनंतीला मान देऊन जागा बदलली.
मी माझ्या सीट बसुन लेकीवर एक डोळा ठेऊन होते. तिच्या शेजारी जर कोणी आले नाही तर तिथे जाऊन बसण्याचा माझा बेत होता. विमान आता जवळजवळ भरत आलेले आणि हवाईसुंद-यांची लगबग सुरू होती. मी एकीला वाटेतच थांबवुन "मी त्या अमुकतमुक सीटवर बसु का" म्हणुन विचारले. माझ्या शेजा-याने ते ऐकले. तो माझ्याकडे चमकुन बघत राहिला. थोड्या वेळाने त्याने मला विचारले, "तुला खरेच त्या तिथे जाऊन बसायचे आहे काय?" त्याच्या आवाजात जरा जास्तच खेद भरलाय असे मला वाटले आणि क्षणार्धात त्याच्या डोक्यात काय चाललेय ते माझ्या लक्षात आले. त्याने माझ्यासाठी जागा बदलल्यावरही मला तिथे अनकंफर्टेबल वाटतेय आणि म्हणुन मी तिथुन उठुन जिथे दोन बायका बसल्यात तिथे त्यांच्या शेजारी जाऊन बसायला धडपडतेय असा त्याचा ग्रह झालेला बहुतेक. मी त्याला सांगितले की माझी मुलगी तिथे त्या सिटवर बसलीय आणि तिच्या शेजारची जागा अजुनही रिकामी आहे. ते ऐकल्यावर तो मान मागे टाकुन दोन मिनिटे हसत राहिला. मग त्याने मला आधीच एकत्र सीट्स का घेतल्या नाहीत म्हणुन विचारले. मी त्याला सगळा किस्सा सांगितला आणि आम्ही दोघांनी मिळून त्या बाईला हव्या तशा शिव्या घालुन घेतल्या. मग अजुन थोड्या गप्पा मारत होतो तेवढ्यात हवाई सुंदरीने येऊन मला त्या दुस-या सीट्वर बसायची परवानगी दिली. मग अजुन थोड्या गप्पा मारुन मी लेकीशेजारी जाऊन बसले. मी थोड्या वेळाने पाहिले तर तो बाब्या परत आयलसीटवर शिफ्ट होऊन मधल्या रिकाम्या सीटमुळे मस्त व्यवस्थित मोकळाढाकळा बसुन त्याच्या डायरीत काहीतरी खरडत होता.
तर मंडळी तुमचेही काही गंमतीशीर अनुभव असतील तर येऊ द्या.
इब्लिस, गामा म्हणताहेत ते
इब्लिस, गामा म्हणताहेत ते कारण असावे.
>> जो प्रवासी चार्टर्ड सेवेने
>> जो प्रवासी चार्टर्ड सेवेने येतो तो शेड्यूल्ड फ्लाईटने जाऊ शकत नाही आणि व्हाईस व्हर्सा <<
जाउ शकत नाहि कि जात नाहि हा संशोधनाचा विषय आहे.
मला वाटतं जात नसावा, कारण जो माणुस चार्टर्ड/प्रायवेट जेट ने प्रवास करतो तो इतर कंपनीच्या विमानातुन प्रवास करुन स्वतःची प्रायवसी/सिक्युरिटी एक्स्पोज का करेल?
राज, हि विमाने आपल्या मोठ्या
राज, हि विमाने आपल्या मोठ्या विमानाएवढीच मोठी असतात, काही खास वेगळी नसतात. ( एका विमानकंपनीची तिकिट विक्री मीच बघत होतो, म्हणून खात्रीने सांगतोय. )
हि गोष्ट आहे १९९९ ची,
हि गोष्ट आहे १९९९ ची, त्यावेळी ईंडीयन एअरलाईंन्स चांगली सेवा देत असे,
मुंबईहुन नागपुरसाठी इंडीयन एअरलाईंन्सच्या विमानाने आकाशात झेप घेतली, वेळ सकाळची, नाष्टा घेउन विमानातले प्रवासी विसावले होते. पायलटने प्रवाश्यांना गुडमॉर्निंग वैगेरे करुन विमान आता औरंगाबादवरुन जात आहे अस सांगीतल आणी वरून आता थोड्यावेळात विमान नागपुरला उतरण्यासाठी डीसेंट सुरु करेल हे ही सांगीतल,
विमान मुंबई सोडुन ४५ -५० मिनीट उलटुन गेलेली. मी डाव्या बाजुच्या आय्ल सिटवर होतो. माझी सिट अशी होती की मला विमानाच्या ईंजीनचा मागचा भाग स्पष्ट दिसत होता, तोही माझ्या आयलच्या सिटवरुन. विमान इतक्या उंचीवर असल्याने खिडकीबाहेर बघण्याच कारण नव्हत, पण तरीही उजव्या बाजुच्या खिडकीबाहेर माझ लक्ष गेल आणि अचानक उजव्या बाजुच्या इंजीनातुन थोडा धुर आणि थोड्या ठिणग्या येउ लागल्या आणी काही सेकंदात ज्वाळा येउ लागल्या. मी मनावर ताबा मिळवला आणि न ओरडता एअर होस्टेसला बोलवुन त्याची कल्पना दिली, ती लगबगीने कॉकपीटकडे धावली.
ह्या गडबडीत माझ्या आजुबाजुच्या काही प्रवाश्याना ह्या गोष्टीची कल्पना आली. त्या लोकाम्नी देवाचा / अल्लाचा धावा सुरु केला, काही लोक भेदरलेले, काही लोक मनातल्या मनात पुटपुटत होते. पण विमानतील
पुढच्या व मागच्या प्रवाश्यांना याची काहीही कल्पना नव्हती.
जी एअर होस्टेस कॉकपीट च्या दिशेने पळालेली होती ती कॉकपीटच्या बाहेर आली नव्हती, आतापर्यंत पायलटने कोणतीही अनाँउन्समेंट केली नव्हती, प्रबाश्यांना कॉकपीटमध्ये काय चाललय, विमानाच्या बाहेर काय चाललय याची कल्पना नव्हतीच आणि ती न देणच शहाणपणाच होता !
माझ लक्ष राहुन राहुन त्या उजव्या बाजुच्या इंजीनावर जात होत, एव्हाम्ना पायलटने ते ईंजीन बंद केल असाव, कारण आता त्या ईंजीनातुन धुर येत नव्हता, तसा मुंबई नागपुर विमान प्रवास सव्वा तासाचा पण एव्हाम्ना
सव्वातास उलटुन गेला होता पण नागपुरचा पत्ताच नव्हता आणि तेव्हढ्यात पायलटने अनाँऊंसमेंट केली की काही कारणाने आपण मुंबईच्या दिशेने परत जात आहोत आणी आपण नासिकच्या वरुन जात आहोत.
पुढच्या १५ मिनिटात विमान मुंबई विमानतळावर टेकल तेंव्हा विमानाच्या दोन्ही बाजुला व मागे फायरब्रिगेडच्या गाड्यांचा ताफा विमानाबरोबर धावु लागला त्यात अँबुलंसही होत्या. ह्या सर्व प्रकारा मुळे विमानातील प्रवाश्यांना
आपण कोणत्या भयानक परिस्थीतीत होतो ह्याची लख्ख जाणिव झाली,
पायलटने एका इंजिनाच्या बळावर कसरत करत, विमानाच्या शेपटीवरच्या सुकाणूला एका विशिष्ठ कोनात धरुन
नागपुरच्या दिशेने चाललेले हे विमान वळवुन मुंबईच्या दिशेने नेले, आणी मुंबई विमानतळावर सुखरुप उतरवल.
बापरे! इथे आशुतोष व विवेक
बापरे! इथे आशुतोष व विवेक सारख्या काहिजणांचा विमान प्रवास जिवावर बेतण्याएवढा डेंजरस झालेला दिसतोय. कर्मचार्यांचे प्रसंगावधान आणि त्याला मिळालेली देवाच्या कृपेची साथ, ह्यामुळे सुखरुप परतलात
विवेक नाईक, काय भयंकर अनुभव
विवेक नाईक,
काय भयंकर अनुभव आहे. सुखरूप वाचलात ती देवाची कृपा. हा विमानप्रवासातल्या गमतीजमती मध्ये नक्कीच मोडणार नाही!
आ.न.,
-गा.पै.
दिनेश. छान माहिती
दिनेश.
छान माहिती दिलीत.
विमानप्रवासाच्या धाग्यावर अजून अमिताभ बच्चन यांच्या परवाना (१९७१) चित्रपटाचा उल्लेख कसा आला नाही. त्यात तो मुंबईत ट्रेन धरतो आणि लगेच पुढच्या स्थानकावर ती सोडतो. मग पुन्हा मुंबईत येऊन ओमप्रकाशचा खून करतो. त्यानंतर मुंबई - नागपूर प्रवास विमानाने करून पुन्हा नागपूर स्थानकात तीच ट्रेन धरतो आणि त्या ट्रेनने कोलकात्यापर्यंत प्रवास करतो. यातला खूनाच भाग वगळता आपली ट्रेन एका स्थानकावर सोडून मधला प्रवास विमानाने करून पुन्हा तीच ट्रेन पुढच्या एखाद्या स्थानकावर धरण्याचा अनुभव कुणी घेतला आहे काय?
अवांतर : चेतन सुभाष गुगळे,
अवांतर :
चेतन सुभाष गुगळे,
>> आपली ट्रेन एका स्थानकावर सोडून मधला प्रवास विमानाने करून पुन्हा तीच ट्रेन पुढच्या एखाद्या स्थानकावर
>> धरण्याचा अनुभव कुणी घेतला आहे काय?
तुम्ही म्हणता तसा अनुभव कोणास आलाय का ते माहीत नाही. मात्र जम्मूतावी - कन्याकुमारी हिमसागर एक्स्प्रेस ही रेल्वेगाडी लोकं दिल्लीस सोडतात. तिथून आगऱ्यास रस्त्याने जाऊन ताजमहाल पाहतात. आणि तीच गाडी आगऱ्यात परत पकडतात. गाडीला दिल्ली आगरा प्रवासात तब्बल तीन तासांचे थांबे असल्याने हे शक्य होतं.
आ.न.,
-गा.पै.
यातला खूनाच भाग वगळता >>>
यातला खूनाच भाग वगळता >>>
यातला खूनाच भाग वगळता << हे
यातला खूनाच भाग वगळता <<
हे सांगितलंत ते बरं केलंत नाहीतर लोक इथे लिहायचा म्हणून अनुभव घ्यायला जाताना ते पण उरकून घेतील मधेच..
<< मात्र जम्मूतावी -
<< मात्र जम्मूतावी - कन्याकुमारी हिमसागर एक्स्प्रेस ही रेल्वेगाडी लोकं दिल्लीस सोडतात. तिथून आगऱ्यास रस्त्याने जाऊन ताजमहाल पाहतात. आणि तीच गाडी आगऱ्यात परत पकडतात. >>
हे असं दक्षिण भारतातही कुठल्या तरी ट्रेनबाबत होतं ना? म्हणजे त्या ट्रेनमधून उतरून लोक तिरूपती बालाजीचे दर्शन घेऊन पुन्हा ती ट्रेन धरतात असं. मला ट्रेनचं नाव आठवत नाहीये.
मस्त धागा .. भन्नाट किस्से
मस्त धागा .. भन्नाट किस्से ...
चेतन, जॉनी गद्दार मधे तोच
चेतन, जॉनी गद्दार मधे तोच संदर्भ आणि तसाच कथाभाग आहे.
विवेक, भयानक अनुभव. विमान सुखरुप उतरवण्यात पायलटचे कौशल्य नक्कीच आहे.
मुंबईला विमान उतरताना जरी ते
मुंबईला विमान उतरताना जरी ते समुद्राकडून येत असले तरी तिथून फार कमी वेळा उतरते, ते खुपदा प्रबळगडापर्यंत जाऊन मग वळते. पुर्वी बॉम्बे पिल्सनरच्या टेकड्या आणि त्यावरचे धबधबे सुंदर दिसायचे. आता ते सर्व डोंगर पोखरल्याने तो भाग फार ओकाबोका दिसतो. एमिरेटचे विमान वेगवेगळ्या ठिकाणाहून आत शिरते. कधी बोरीवलीच्या पॅगोडावरून, कधी वसईच्या किल्ल्यावरून तर कधी वांद्रे खाडीवरून... हि सर्व ठिकाणे विमानातून बघताना मला घरी परतल्याचा होणारा आनंद अवर्णनीय असतो.
पुर्वी डेक्कन एअर म्हणून लो कॉस्ट विमान कंपनी होती. तिचे पहाटेचे ५ वाजताचे मुंबई गोवा विमान असायचे, त्याने मी बर्याच वेळा जात असे. तिला सीट नंबर्स नसत. हवे तिथे बसा असा कारभार. विमानापर्यंत जी बस असे तिच्यात कोणी बसतच नसे, सर्वजण दाराजवळ गर्दी करून ऊभे असत. ती बस विमानाजवळ पोहोचली कि दरवाजा उघडताच सर्व जण खिडकीची जागा पकडण्यासाठी धावत जात असत.
मुंबईप्रमाणे गोव्यालाही विमान समुद्राच्या बाजूने क्वचितच उतरते. बरेच आत जाऊन मग वळते. फक्त एकदाच ते समुद्रावरून थेट उतरलेले मी बघितले. त्या वेळी फ्लाईट टाईम फक्त ३५ मिनिटाचा झाला होता ( एरवी तासापर्यंत असायचा. )
मध्ये वर्तमानपत्रात एक बातमी
मध्ये वर्तमानपत्रात एक बातमी वाचली होती. ती काहीशी अशी होती,
एका इसमाचे म्हणे कुठल्यातरी अमेरिकी विमानतळावर चेकिंग चालू होते.
त्याले मध्येच विनोद करण्याची प्रचंड हुक्की आली.
तो चेकिंग करणाऱ्याला म्हणाला, "नीट चेकिंग करा बरका... माझ्या bag मध्ये बॉम्ब आहे, हा हा हा."
यावर तत्काळ आरडाओरडा झाला. सुरक्षाकर्मी बंदुका घेऊन प्रस्तुत विनोदवीराकडे धावले.
त्याने तो विनोद असल्याचे समजावण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही.
विमान अधिकाऱ्यांनी तत्परतेने उड्डाणे रद्द करून ज्यादा कुमक वगेरे बोलावली, सर्व कामकाज थांबवले.
विनोदी गृहस्थाला ताब्यात घेऊन त्याची अत्यंत कसून तपासणी करण्यात आली.
शेवटी तो खरच विनोद करत असल्याचे निष्पन्न झाले. नंतर त्याला सोडून न देता कोर्टापुढे उभे करण्यात आले.
कोर्टाने त्याला यंत्रणा वेठीस धरल्याबद्दल दोषी ठरवून ५० हजार अमेरिकी डॉलर्सचा दंड ठोठावला..
अशा प्रकारे अस्थानी केलेला विनोद त्याला चांगलाच महागात पडला ..
विवेक, तुमच्या बर लक्षात आले,
विवेक, तुमच्या बर लक्षात आले, आय मीन औत्सुक्यापोटी तरी तुम्ही इकडे तिकडे बघत होता. अन्यथा लोक स्वतःतच इतके मश्गुल असतात की कुठे आजुबाजुला/शेजारीही काय चाललय याची फिकीर नसते.
जो माणुस चार्टर्ड/प्रायवेट
जो माणुस चार्टर्ड/प्रायवेट जेट ने प्रवास करतो तो इतर कंपनीच्या विमानातुन प्रवास करुन स्वतःची प्रायवसी/सिक्युरिटी एक्स्पोज का करेल? <<< इथे ज्या चार्टर्ड विमानांचा उल्लेख आहे ती Travel Company ची विमाने असतात. म्हणजे अख्खे विमान टूर कंपनीने आणलेले असते. त्यातले सगळे प्रवासी त्या कंपनी बरोबर गोव्याला (किंवा जिथे कुठे) फिरायला आलेले असतात, आणि त्यांच्याबरोबर परत जाणार असतात.
Pages