उड जायेगा हंस अकेला

Submitted by शरी on 11 May, 2015 - 07:45

संत कबीराची ओळख पुस्तकांमधूनच झाली फक्त! त्यांचा वेगळेपण, त्यांचा कर्मठपणाला नकार, त्यांच्या धर्माबद्दल कुणालाच काही माहित नसणं आणि सर्व धर्मांमधले लोक त्यांचे अनुयायी असणं हे सगळं जरी भारावून टाकणारं असलं, तरी ते पुस्तकी माहिती पुरतंच मर्यादित होतं; म्हणजे अजूनही ते तसंच आहे. कारण जसे ज्ञानोबा-तुकोबा आपल्याला त्यांच्या अभंगांमधून, गोष्टींमधून, आषाढी-कार्तिकी वारी मधून भेटले, तसे कबीर कधीच नाही भेटले! त्यांच्या भाषेशी, म्हणजे हिंदीशी पण जुजबीच ओळख! हिंदी सिनेमे पाहणे आणि कामचलाऊ हिंदी बोलणे ह्या पलिकडे ती ओळख गेलेली नाही. साहजिकच कबीराच्या दोह्यांचा जो अमूल्य साठा आहे, तो आपल्याला अनोळखीच आहे. जगातल्या अशा किती भाषांमधलं केवढं भांडार आपल्याला अनोळखी असतं नाही? आणि अशातच कधीतरी अचानकच आपली त्याच्याशी भेट होते आणि आपण म्हणतो अरेच्या! हे कसं सुटलं?

माझ्यासोबत एकदा असंच झालं. एक दिवस तुकारामांचा "लहानपण देगा देवा " हा अभंग ऐकत होते. इतका सुंदर अभंग, त्यातून तो कुमार गंधर्वांनी गायलेला! लहानपणा पासून आवडता! ह्याची मला कधीही आठवण येते. हल्ली एक बरं आहे, एखाद्या गाण्याची आठवण आली, की कधीही युट्युब वर सर्च करून ऐकता येतं. युट्युब ची आणखी एक गम्मत म्हणजे 'रिलेटेड व्हिडीओ'. ह्या रिलेटेड व्हिडीओ फिचरमुळे कधी कधी आपण जिलेबी शोधायला जातो आणि जिलेबी सोबत रबडी ही मिळते. तसंच झालं! लहानपण देगा देवा सोबत मला सापडला "उड जायेगा हंस अकेला". दिसलं, ऐकलं आणि म्हंटलं अरेच्या! हे कसं सुटलं? संत कबीरांच्या ह्या रचनेचं कुमार गंधर्वांनी सोनं केलंय अगदी.

अतृप्त यांचा "त्या फुलांच्या गंधकोशी" हा लेख वाचला, आणि तेव्हाच मनावर गारुड केलेलं हे गाणं आठवलं! त्याच जातकुळीतलं नाही अगदी, पण काहीतरी नक्की आहे त्यांच्यामध्ये समान, म्हणून आठवलं आणि स्वरांमुळे शब्द आपल्या अगदी जवळ पोहोचतात हा भाव सुद्धा तोच जाणवला. मग मायबोली वर केवळ वाचन मात्र असलेल्या मलाही वाटलं की ह्यावर आपण लिहायलाच हवं !

गाण्यात ऐकताना आधी आपण कुमारांच्या गोड, तरल आवाजात आणि तितक्याच मधुर संगीतात, आळवणी मध्ये अडकून जातो. शब्द मागाहून भेटतात, आणि जुन्या हिंदी मुळे त्याहूनही नंतर समजतात. कुमारांनी स्वर दिले नसते, तर कदाचित माझ्यासारख्या सामान्य श्रोत्या पर्यंत कबीराचे हे शब्द पोहोचलेच नसते! त्यांचे शब्द आपल्या पर्यंत इतक्या सुंदर प्रकारे आपल्या पर्यंत पोहोचवल्याबद्दल कुमारांचे शतश: आभार!

उड जायेगा हंस अकेला, जग दर्शन का मेला ।।धृ.।।

जैसे पात गिरे तरुवर के, मिलना बहुत दुहेला
न जानु किधर गिरेगा, लगया पवन का रेला।।

जब होवे उमर पूरी, जब छुटेगा हुकम हुजूरी
जम के दूत बडे मजबूत, जम से पडा झमेला ।।

दास कबीर हर के गुण गावे, वा हर को परन पावे
गुरु की करनी गुरु जायेगा, चेले की करनी चेला ।।

ह्याचा अनुवाद करायचे धाडस करते आहे.

उडून जाईल हंस एकला, जग दर्शनी मेळा
(चकचकीत मेळ्यात जरी असलास, तरी हंसा, जायचे तुला एकट्यालाच आहे!)

गळालेले पान वटवृक्षाचे जरी असले, एकदा हवेच्या झोतात सापडले,
की कुठे जाईल कोण जाणे ? पुन्हा सापडणे कठीण आहे

आयुष्याचे दिवस भरले आणि तुझ्या नावाचे फर्मान निघाले,
तुझी इच्छा असो वा नसो यमदूतांसोबत सामना अटळ आहे

दास कबीर हरीचे गुण गातो, हरी दर्शनाची इच्छा ठेवतो
जो तो आपापल्या करणी ची फळे भोगेल, गुरु असो वा चेला

चूक भूल द्यावी घ्यावी! हा गेय अनुवाद नाही, फ़क्त भावार्थ पोहोचवण्याचा प्रयत्न आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला पटलेला अजून एक अर्थः

जगात अनेक दर्शने (मुक्तीची तत्वज्ञाने) आहेत. हिंदू धर्मातच सहा दर्शने आहेत, इतर धर्मात मिळून पुष्कळच होतील. पण ती फक्त तत्वज्ञानेच! आत्म्याला त्यांच्याशी काही देणे-घेणे नाही. वेळ येताच तो एखाद्या राजहंसाच्या दिमाखात उडेल - अगदी एकटा नि:संग!

झाडाला अनेक फांद्या असतात आणि त्या फांद्यावर अनेक पाने असतात. पण जेंव्हा एखादे पान गळून पडते तेंव्हा केवळ वाहणारा वाराच ते कुठे पडेल हे ठरवतो. ते पान कुठल्या फांदीवर (धर्म / पंथ) होते याचा ते कुठे पडेल याच्याशी सुतराम संबंध नसतो.

त्याचप्रमाणे शरीरापासून गळालेल्या जीवाला कुठे न्यायचे हे फक्त यमराजच ठरवतो. तो खूप बलशाली आहे त्याच्या तावडीतून सुटका नाही. आणि हो! तो अत्यंत निस्पृह आहे.

जगातच रमलेलो मी एखाद्या कुरुप बदकासारखा होतो. पण मला गुरु भेटला. त्याने मला शिवदर्शनाचा ध्यास लावला. माझे जगाशी असलेले सगळे पाश तुटत गेले. त्या कुरुप बदकाचा राजहंस बनत गेला. आजवर पदोपदी गुरुचे मार्गदर्शन लाभले. त्याच्याशी एक अतूट नाते निर्माण झाले. पण आता शिवदर्शनाची वेळ जवळ आली. आता तो शेवटचा पाशही तुटणार. गुरु गुरुच्या वाटेने जाणार आणि मी माझ्या. राजहंस एकटाच उडणार, अगदी एकटा.

जुन्या मायबोलीवर इथे कबीराच्या दोह्यांचा संग्रह आहे.

माधव -> छान प्रतिसाद!

जगातच रमलेलो मी एखाद्या कुरुप बदकासारखा होतो. पण मला गुरु भेटला. त्याने मला शिवदर्शनाचा ध्यास लावला. माझे जगाशी असलेले सगळे पाश तुटत गेले. त्या कुरुप बदकाचा राजहंस बनत गेला. आजवर पदोपदी गुरुचे मार्गदर्शन लाभले. त्याच्याशी एक अतूट नाते निर्माण झाले. पण आता शिवदर्शनाची वेळ जवळ आली. आता तो शेवटचा पाशही तुटणार. गुरु गुरुच्या वाटेने जाणार आणि मी माझ्या. राजहंस एकटाच उडणार, अगदी एकटा.>>>> हा शेवटच्या कडव्याचा तुम्ही सांगितलेला अर्थ अगदि पट्ला!

छान लिहीलंय.. जे काही थोडंफार वाचलंय त्यावरून संत कबीरांचे वेगळेपण खरेच जाणवते.
माधव, तुम्ही लिहीलेले पण पटले...

शरी, खूप छान लिहिलंय.

माधव, तुला लागलेला अर्थही अगदी पटला.

अश्या संतरचनांवर विचार करावासा वाटतो हेच आशादायी आहे.

मला ती कुमारांची सर्व निर्गुणी भजनं आवडतात. अर्थ लावायचा मी कधी प्रयत्न केला नव्हता Proud पण माधवने लावलेला जास्त पटला.

दोन्ही भावार्थ आवडले.. हंस अकेला या नावाची जब्बार पटेल यांची फिल्म आहे. यू ट्यूबवर आहे. अवश्य बघा.

कबीर आणि कुमार गंधर्व ही दोन्ही आवडती नावे एकत्र दिसल्याने हे वाचले. छान लिहिलेत.

कबीर अनोळखी ….

कबीर अजून हिंदी साहित्यातच mainstream गणला जात नाही. आपला दोष नाही. Happy

छान. माझं फार आवडतं भजन आहे हे.
कबीराचा थेट तुकारामांच्या जातकुळीतला रोखठोकपणा (कबिरा इहु घर प्रेम का, खाला का घर नाही!) जवळचा वाटतो अगदी!

मला या अभंगाचा अर्थ थोडक्यात 'कितीही पोथ्यापुराणं, तत्त्वज्ञानं (दर्शनं) वाचा, किती गुरू करा, आपला मार्ग आपल्यालाच आखावा आणि चालावा लागतो आणि मृत्यूसमयी आपल्या आयुष्याचा लेखाजोखा आपल्या स्वतःच्या कर्मांनी ठरतो, आपल्याला यदृच्छेने मिळालेल्या स्थल,कुल,कालामुळे (ना जानु किधर गिरेगा) नव्हे, आणि इतर कोणाच्या पुण्याईमुळेही नव्हे (चेले की करनी चेला)!' असा लागतो.

अनु, कुमारांचा नक्की ऐक. डिव्हाईन आहे.

वेगवेगळे भावार्थ पण चपखल आहेत. हेच संत वाङमयाचे यश आहे नाही?

Pages