विमानप्रवासातल्या गमतीजमती

Submitted by साधना on 30 April, 2015 - 11:46

बरेचसे मायबोलीकर परदेशस्थ असल्याने त्यांना भरपुर विमानप्रवास घडत असणार. प्रवास म्हटला की अनुभव आलेच. विमानप्रवासातही अनुभव थोडेच चुकताहेत? हा बीबी अशाच गंमतीजंमती शेअर करण्यासाठी.

माझा विमानप्रवास अतिशयच मर्यादित आहे. तरीसुद्धा त्यात मला एक गंमतीशीर अनुभव आला. तो इथे देते.

लेहला गेलो होतो. येताना दिल्ली विमानतळावर बोर्डींगपास घेताना काऊंटरवरच्या बाईला "विन्डो सिट प्लिज" ही विनंती केली. बाई जरा जास्तच हायफाय होती. चेह-यावरची इस्त्री न मोडता तोंडातल्या तोंडात कायतरी पुटपुटून तिने मला दोन बोर्डींग पास दिले. नंबर चेक केले तर दोन्ही नंबरात ४-५ आकड्यांचा फरक होता. "दोन्ही सीट्स विन्डो सीट्स आहेत बहुतेक" असे अनुमान मी जराशा खुशीतच काढले. जातानाही मी विंडो सीट मागितलेल्या तेव्हा एकच विन्डो मिळालेली, तीही दुर्दैवाने माझ्या बोर्डींगपासाला. त्यामुळे विमानात चढल्यावर लेकीने दादागिरी करुन ती स्वतःला बळकटावलेली.

विमानात चढल्यावर कळले की काऊंटरवाल्या बाईने तिच्या सिट अलोकेशनच्या स्वातंत्र्याचा मी योग्य तो आदर न राखल्याचा सुड माझ्यावर उगवलेला. आम्हा दोघींच्याही सिट्स चक्क मिडल सिटस होत्या. आणि त्याही एकमेकींपासुन दुर. मुलीच्या बाजुच्या विंडो सिटवर एक स्त्री बसलेली आणि तिच्या बाजुची सिट रिकामी होती. मी मिडल सिटवर न बसता बाजुच्या सीटवर बसले पण आयल सिटवाला बाब्या आल्यावर मला नाईलाजाने मिडलला शिफ्ट व्हावे लागले. माझ्या बाजुच्या विंडोला कोणी स्त्री यावी ही आशा मी बाळगुन होते पण थोड्या वेळाने तिथेही एक बाब्या आला. दोघांच्या मध्ये बसणे मला जरा त्रासदायक वाटू लागले म्हणुन मग मी आयलवाल्याला मिडलला बसण्याची विनंती केली . (भारतीय विमानातुन प्रवास करणा-यांना माहित असेल की विमानातल्या सिटा आपल्या एस्टीमधल्या सिटापेक्षाही जास्त अनकंफर्टेबल असतात). बिचारा बसल्याबसल्या त्याची डायरी काढुन काहीतरी लिहित होता. मिडल सिटवर त्याला लिहायला थोडा त्रास होणार होता पण त्याने माझी विनंतीला मान देऊन जागा बदलली.

मी माझ्या सीट बसुन लेकीवर एक डोळा ठेऊन होते. तिच्या शेजारी जर कोणी आले नाही तर तिथे जाऊन बसण्याचा माझा बेत होता. विमान आता जवळजवळ भरत आलेले आणि हवाईसुंद-यांची लगबग सुरू होती. मी एकीला वाटेतच थांबवुन "मी त्या अमुकतमुक सीटवर बसु का" म्हणुन विचारले. माझ्या शेजा-याने ते ऐकले. तो माझ्याकडे चमकुन बघत राहिला. थोड्या वेळाने त्याने मला विचारले, "तुला खरेच त्या तिथे जाऊन बसायचे आहे काय?" त्याच्या आवाजात जरा जास्तच खेद भरलाय असे मला वाटले आणि क्षणार्धात त्याच्या डोक्यात काय चाललेय ते माझ्या लक्षात आले. त्याने माझ्यासाठी जागा बदलल्यावरही मला तिथे अनकंफर्टेबल वाटतेय आणि म्हणुन मी तिथुन उठुन जिथे दोन बायका बसल्यात तिथे त्यांच्या शेजारी जाऊन बसायला धडपडतेय असा त्याचा ग्रह झालेला बहुतेक. मी त्याला सांगितले की माझी मुलगी तिथे त्या सिटवर बसलीय आणि तिच्या शेजारची जागा अजुनही रिकामी आहे. ते ऐकल्यावर तो मान मागे टाकुन दोन मिनिटे हसत राहिला. मग त्याने मला आधीच एकत्र सीट्स का घेतल्या नाहीत म्हणुन विचारले. मी त्याला सगळा किस्सा सांगितला आणि आम्ही दोघांनी मिळून त्या बाईला हव्या तशा शिव्या घालुन घेतल्या. मग अजुन थोड्या गप्पा मारत होतो तेवढ्यात हवाई सुंदरीने येऊन मला त्या दुस-या सीट्वर बसायची परवानगी दिली. मग अजुन थोड्या गप्पा मारुन मी लेकीशेजारी जाऊन बसले. मी थोड्या वेळाने पाहिले तर तो बाब्या परत आयलसीटवर शिफ्ट होऊन मधल्या रिकाम्या सीटमुळे मस्त व्यवस्थित मोकळाढाकळा बसुन त्याच्या डायरीत काहीतरी खरडत होता. Happy

तर मंडळी तुमचेही काही गंमतीशीर अनुभव असतील तर येऊ द्या.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तशीच कमाल इकडे गोठवणार्‍या थंडी वार्‍यात टारगेट, कॉस्टको इत्यादी ठिकाणी बाहेर जाऊन सर्व ट्रॉल्या गोळा करणार्‍यांची किंवा एअरलाईन मध्ये विमान ग्राउंड वर असताना कामं करणार्‍यांची वाटते ..

सशल, ठळक अक्षरात विमानातल्या सांगा लिहूनही हा प्रश्न विचारणे आणि तगडी कबाब मध्ये पनीर घालू का विचारणे यात काय साम्य आहे? Wink लिही तू आम्ही वाचतो.

छत्र्या पोचवणार्‍याच्या वर्क कमिटमेंटची मला कमाल वाटते >>> नीधप, मला तर त्यांचे पायच धरावेसे वाटत होते (तुझे धरले तसे नाही, खरोखरचे Happy ) कारण तो लाँग विकेंड होता. मी जवळजवळ महीन्याभराने घरी चाललो होतो, आणी या फ्लाईटच्या आधी माझी एक सोडून दोन फ्लाईट्स ऐनवेळी कॅन्सल झालेली होती. मी हेच फ्लाईट कसबसं मिळवून माझ्या कामाच्या टिकाणाहून टॅक्सी करुन रातोरात या गावी आलो होतो, आणी एअरपोर्टवर परिस्थिती बघून फ्लाईट निघायची आशाच सोडली होती. हे फ्लाईटपण कॅन्सल झालं असतं तर पुढे निदान ३ दिवस फ्लाईटस उपलब्ध नव्हती!

अकु, वत्सला, नी - सगळेच किस्से जबरी!

वत्सला - 'देश सोडताना' च्या मूमेण्ट बद्दल लिहीलेले आहे ते जबरी आहे. प्रत्येकाची ती मूमेण्ट लक्षात असेल बहुधा.

अ‍ॅमस्टरडॅम बाउंड फ्लाइटमध्ये रडारड सेक्शनमध्ये सीट मिळाली होती. बाळं एकेमेकांचं ऐकून सहानुभूतीचं रडत होती. जरा वेळानं खाणंपिणं आटोपून छान अंधार केला गेला. अर्ध्याहून जास्तं बारीक जीव शांत झोपले. मग उरलेल्यांना झोपवायला आई-बापांच्या आयलफेर्‍या सुरू झाल्या. जरा वेळानं केबिन क्रूनं तोही बंद करायला लावला. त्याचा निषेध नोंदवत एक बाळ अगदी किंचाळून रडायला लागलं. शेवटी त्याची आई वैतागली असावी. मागच्या, ती बसलेल्या कुठल्याश्या रोमधून ते रडकं बाळ घेऊन ती समोर आमच्या रोजवळ, बाळाच्या बाबाजवळ आली. बाळाच्या बाबाला आईजवळ जागा मिळाली नसावी (किंवा मिळवली नसावी. :P) बाबा तोंडावर घेऊन गुडुप झोपला होता. आईनं गदागदा हलवून त्याला जागं केलं आणि झोपलेली व्यक्ती ब्लँकेट झटकून धडपडत जागी झाली. मग (बाळाचं) रडणं + सॉरी सॉरीचा कलकलाट. आईनं भलत्याच बापड्याला जागं केलं होतं. Proud

बाळं एकेमेकांचं ऐकून सहानुभूतीचं रडत होती. >>> :D.

मधे एकदा एमिरेट्स्च्या माझ्या फ्लाईटला पन्नासेक बाळे होती. टोटल कल्ला.

मी तिला मराठीत बोललो , 'मला नकोय जेवायला' >> माझी मामेबहिण असेल.. ती एमिरेट्स मधे होस्टेस आहे.. Proud
.
.
आईने भलत्याच बाबाला जागं केलं.... नशीब काळोखाचा फायदा घेऊन त्याच्या हातात (रडणार) मुल देऊन झोपायला नाही गेली.. Proud

इंडिगोतून एकदा पटण्याला जाताना सीटवर अक्षरश: मुंग्यांची रांग मोडल्यावर त्या कशा सैरावैरा करतात तशा सैरावैरा करणार्‍या उवा होत्या. तिन्ही सीट्सवर. यक! स्टाफच्या लक्षात आणून दिल्यावर आम्हाला फर्स्ट क्लासला प्रमोट केलं. फर्स्ट क्लास म्हणजे इकॉनॉमीच्या सगळ्यात पहिल्या रांगेतली सीट्स होती जिथे अर्ध्या फुटानं लेग-स्पेस जास्त असण्याशिवाय काहीही वेगळं नव्हतं.

इन्डिगो म्हणजेच जे कायम वेळेवर असतात ती एअर लाईन का? आमचा दिल्ली-मुंबई प्रवासाचा अनुभव चांगला होता .. पण ती साऊथवेस्ट सारखी आहे ना अ‍ॅज् इन नो फर्स्ट क्लास?

मृ, गोगा Lol

उवा (हा शब्द ही टाईप करताना विचित्र वाटतं ..) अशा केसांव्यतिरीक्त मुंग्यांसारख्या बाहेर कुठेही इतस्ततः भटकू शकतात का?

उवा!! यक्क!! Angry लक्षात आलं बरं झालं वेळेवर ! डार्क किंवा डिझाइन ची खुर्ची असेल तर दिसणार पण नाही चटकन!!

Lol

मोन्ट्रेयल - हिथ्रो - मुंबई, असं एअर कॅनडा- जेट तिकीट होतं. पाहिलं विमान २ तास लेट, म्हणून पुढचं कनेक्शन मिस होईल आणि बरोबर १ वर्षाच्या बाळाला घेऊन हीथ्रोवर त्रास होईल म्हणून आम्हाला टीकेटिंग एजंटकडे पिटाळून त्याने १ दिवस उशिरा त्याच विमानाचं तिकीट दिलं. हिथ्रो-मुंबई बोर्डिंग पास पण दिला. भारतात फोन करून एक दिवस उशिरा घायला या चा निरोप. ती रात्र आणि पुढचा दिवस मोन्ट्रेयलला हॉटेलमध्ये घालवला. आणि विमानाने हिथ्रोवर आलो. जेटचं टर्मिनल वेगळं म्हणून बसने टर्मिनल बदलून सिक्युरिटी, डायपर, फीडिंग असे सोपस्कार पार पाडून पुढे आलो. सिक्युरिटीने डिक्लेअर केलेला सील्ड फॉर्म्युला फोडून स्वतःच्या किंवा बाळाच्या घशात घालायला लावला, अनवधानाने पाठीवरच्या पिशवीत पाण्याची बाटली विसरलेलो ती झेपली नाही त्यांना. गेटकडे जाताना जेटचा बूथ दिसला, सगळे बोर्डिंग पास घेत होते तर आम्ही पण थांबलो, आहेच वेळ तर. तिकडच्या बाईनी सांगितलं आमचं तिकीटच नाहीये आणि विमान फुल्ल. एकच बिझनेस क्लास सीट आहे बाकी काहीच नाही. टिकेटिंग एजंटनं घोळ घातला होता, एअरलाईन्स दुसरी असेल तर पुढचं तिकिटं फोन करून त्यांच्याकडून कन्फर्म करून घ्याव लागतं.
मूळ तिकीट जेटच्या साईट वरून काढलेल पण जेटवाल्यानी हात वर केले, कारण एअर कॅनडाचं विमान लेट झाल्याने त्यांनी रि-शेड्युल केलेलं. एअर कॅनडाचा कौंटर पहिल्या टर्मिनलला. तिकडे परत बस-सिक्युरिटी- डायपर- स्ट्रोलर मधून पोराला काढणे. पोराला काढायचा हा नियम पोरांच्या युनियनने केलेला असणार, अरे एकदा बसवायला किती श्रम... बाहेर काढला की एकतर ह्याला दुडूदुडू धावून अंगणाला शोभा येते असं खरंच वाटत असणार किंवा उच्चून. परत बसला नाहीचं. आता पोराला आणि स्ट्रोलरला सांभाळा. बर स्ट्रोलरमध्ये काही नसलं की त्याला अडकवलेल्या पिशव्या आणि स्ट्रोलर सगळं कोलमडतं, ते कोलमडेपर्यंत दरवेळा समजत नाही.
एअर कॅनडानी, जेटला शिव्या घातल्या, तिकडून फोन का नाही केला, मग आम्हीपण घातल्या. आता गेल्या ३० मिनिटात मुंबईची २-३ विमानं सुटणार/ सुटली होती. मग ब्रिटीश, लुफ्तांझा, स्वीस, वर्जिन, टर्किश अशा अनेक ठिकाणी फोन करून युरोपात न जाता, विसा, पासपोर्टचे नियम पाळून बराच खल केला. शेवटी अजून १६ तासांनी थायचं Bangkok आणि तिकडे ५ तास घालवून मुंबई असा एक उत्तम पर्याय निवडला. काहीही कुरकुर न करता बोर्डिंग पास घेतले.
आता १६ तास पोराला घेऊन कुठे काढायचे, तर त्याने लंडन मध्ये हॉटेलच बुकिंग दिलं. इंग्लडचा विसा अर्थात आमच्याकडे न्हवता, पण इमिग्रेशनवाल्यांना काय आवडलं माहित नाही, फटाक्कन टेम्परवारी विसाची शाई पासपोर्टावर मारली. आता हॉटेलवर जायला शटल -तिकडून हॉटेल-डायपर-फीडिंग. सिक्युरिटी वाचली, नशीब.
फुकटात लंडनला आलोय तर फिरून घ्यावं अशी नामी कल्पना हाणून पाडण्यात आली. आणि तिकडे जे काय गिळायला मिळालं ते गिळून अंघोळ करावी अशी एक फालतू कल्पना गळी उतरवण्यात आली.
मग वायफाय-स्काईप-तिकडेपैसेभरूनक्रेडीटघेणे- भारतात फोन-आता आणि एक दिवस उशिरा या घ्यायला. झ्योम्बीस्टेट मध्ये परत हिथ्रो. तिकडे कायतरी गोंधळ झालेला आणि न भूतो अशी टर्मिनलला गर्दी. जनता फोटो काढून अपलोड करण्यात मग्न. आम्ही काय झालय जाणून घ्यायचा इवलासाही प्रयत्न न करता स्ट्रोलर, आता झोपलेलं कडेवर बाळ, आणि हातातलं सामान घेऊन शांतपणे उभे. रांग फटाफट पुढे सरकून ९०व्या मिनिटाला संपली. कॅनडातले लोक आणि स्नोबिश ब्रिटीश असा परिसंवाद न करता सिक्युरिटी पार पाडली. दुपारी डायपर rash क्रीम चोपडलेल, पोरगा झोपला मग नो डायपर. डायरेक्ट विमानात. Bangkok-मुंबई अनइव्हेंट फुल प्रवास. असे ३ आठवड्यातले मौल्यवान २ दिवस गेले.
परत जाण्याचा दिवशी, कधीन्हवेते ओन्लाईन शीटा बुक कराव्या असं वाटलं आणि घडलंही. त्या होत न्हवत्या. कॉल सेंटरला फोन केला तर जेटचं परत आपलं तेच तुमचं तिकीट नाही, म्हणजे आहे, पण सिस्टीम तुम्ही भारतात आलात हे दाखवतं नाहीये. मग ते सुधरवलं, आणि मग फाको करत बसलो. परत डायरेक्ट आटोवाला येणार होतो, तसेच आलो.

मी तिला मराठीत बोललो , 'मला नकोय जेवायला' >> माझी मामेबहिण असेल.. ती एमिरेट्स मधे होस्टेस आहे. >>> आणि ती चायनीज आहे का ? Lol
आईने भलत्याच बाबाला जागं केलं.... नशीब काळोखाचा फायदा घेऊन त्याच्या हातात (रडणार) मुल देऊन झोपायला नाही गेली.. >>> Lol

बरेच दिवसांनी भारतात गेलो होतो. येताना सोलापूरची तिखट शेंगा चटणी, काळा मसाला, मिरजेचा खाजा, वांगी, नाशिक चिवडा, धारवाड सांबार मसला असेच जिन्नस फार होते. मी सत्कार हारतुरे फूल ना फूलाची पाकळी यात व्यस्त होतो आणी पॅकिंग भाच्यांनी केले. केबिन बॅग मधे मसाले!

पुणे विमानतळावर गेलो तर आडगावच्या रेल्वे स्टेशन सारखे वातावरण. रेलवेची वेळ झाली की गजबज सुरु होते तसे झाले. तोपर्यंए मी केबिन बॅग घेऊन बसलो होतो तिथे का कुणास ठाऊक मसल्याचा वास सुरु झाला. मत्स्यगंधा. चेक इन झाले पण सिक्युरिटी मध्ये केबिन बॅगेवरून महिला अधिकार्‍याने एक इलेक्त्रॉनिक यंत्र फिरवले तर बिचारे यंत्र सोलापुरी चटणीच्या वासानेच ओरडू लागले.

त्या महिलेले मला केबिन बॅग उघडायला लावली आणी सारे मसाले इथे टाका किंवा शंभर डोलर देऊन चेक इन करा असे फर्मावले. मीही वैतागलो होतो आणी बॅगमध्ये बरेच मसाले होतेच. मी ते मसाले इथेच टाकणार असे जाहीर केले. तिथल्या सिक्युरिटी च्या लोकानी मग ते वाटून घेतले. मेतकूट मला दे, शेंगा चतणी तुम्ही दोघी घ्या, लाल तिखट मॅडम ना राहुदे वगिरे.

विकु,
पुण्याचे लोक चावट आहेत हे माहित नाही का? त्याना मसाले, तिखट, चटणी, मेतकूट हवं होतं म्हणून काहीतरी नियम तयार केला आणि तुम्ही त्या गळाला लागलात. नाहीतर चार दिवसांपूर्वी मीही हेच सगळे मसाले फ्रेंच/अमेरीकन सिक्युरीटी-कस्टम्सच्या लोकांच्या नाकावर टिच्चून केबिन बॅगमधेच आणले Proud

आणि ती चायनीज आहे का ? >>> आता इमिरेट्समधे आहे तर झाली असेल चायनीज.. त्यांचं काही सांगता येतं का? Proud
.
.
.
विमान प्रवसातल्याच हव्यात की दुसरं मोड ऑफ ट्रान्स्पोर्टेशन चालेल? <<< बसच्या गोष्टी विमानाच्या नावावर खपव त्यात काय? Happy

Pages