विमानप्रवासातल्या गमतीजमती

Submitted by साधना on 30 April, 2015 - 11:46

बरेचसे मायबोलीकर परदेशस्थ असल्याने त्यांना भरपुर विमानप्रवास घडत असणार. प्रवास म्हटला की अनुभव आलेच. विमानप्रवासातही अनुभव थोडेच चुकताहेत? हा बीबी अशाच गंमतीजंमती शेअर करण्यासाठी.

माझा विमानप्रवास अतिशयच मर्यादित आहे. तरीसुद्धा त्यात मला एक गंमतीशीर अनुभव आला. तो इथे देते.

लेहला गेलो होतो. येताना दिल्ली विमानतळावर बोर्डींगपास घेताना काऊंटरवरच्या बाईला "विन्डो सिट प्लिज" ही विनंती केली. बाई जरा जास्तच हायफाय होती. चेह-यावरची इस्त्री न मोडता तोंडातल्या तोंडात कायतरी पुटपुटून तिने मला दोन बोर्डींग पास दिले. नंबर चेक केले तर दोन्ही नंबरात ४-५ आकड्यांचा फरक होता. "दोन्ही सीट्स विन्डो सीट्स आहेत बहुतेक" असे अनुमान मी जराशा खुशीतच काढले. जातानाही मी विंडो सीट मागितलेल्या तेव्हा एकच विन्डो मिळालेली, तीही दुर्दैवाने माझ्या बोर्डींगपासाला. त्यामुळे विमानात चढल्यावर लेकीने दादागिरी करुन ती स्वतःला बळकटावलेली.

विमानात चढल्यावर कळले की काऊंटरवाल्या बाईने तिच्या सिट अलोकेशनच्या स्वातंत्र्याचा मी योग्य तो आदर न राखल्याचा सुड माझ्यावर उगवलेला. आम्हा दोघींच्याही सिट्स चक्क मिडल सिटस होत्या. आणि त्याही एकमेकींपासुन दुर. मुलीच्या बाजुच्या विंडो सिटवर एक स्त्री बसलेली आणि तिच्या बाजुची सिट रिकामी होती. मी मिडल सिटवर न बसता बाजुच्या सीटवर बसले पण आयल सिटवाला बाब्या आल्यावर मला नाईलाजाने मिडलला शिफ्ट व्हावे लागले. माझ्या बाजुच्या विंडोला कोणी स्त्री यावी ही आशा मी बाळगुन होते पण थोड्या वेळाने तिथेही एक बाब्या आला. दोघांच्या मध्ये बसणे मला जरा त्रासदायक वाटू लागले म्हणुन मग मी आयलवाल्याला मिडलला बसण्याची विनंती केली . (भारतीय विमानातुन प्रवास करणा-यांना माहित असेल की विमानातल्या सिटा आपल्या एस्टीमधल्या सिटापेक्षाही जास्त अनकंफर्टेबल असतात). बिचारा बसल्याबसल्या त्याची डायरी काढुन काहीतरी लिहित होता. मिडल सिटवर त्याला लिहायला थोडा त्रास होणार होता पण त्याने माझी विनंतीला मान देऊन जागा बदलली.

मी माझ्या सीट बसुन लेकीवर एक डोळा ठेऊन होते. तिच्या शेजारी जर कोणी आले नाही तर तिथे जाऊन बसण्याचा माझा बेत होता. विमान आता जवळजवळ भरत आलेले आणि हवाईसुंद-यांची लगबग सुरू होती. मी एकीला वाटेतच थांबवुन "मी त्या अमुकतमुक सीटवर बसु का" म्हणुन विचारले. माझ्या शेजा-याने ते ऐकले. तो माझ्याकडे चमकुन बघत राहिला. थोड्या वेळाने त्याने मला विचारले, "तुला खरेच त्या तिथे जाऊन बसायचे आहे काय?" त्याच्या आवाजात जरा जास्तच खेद भरलाय असे मला वाटले आणि क्षणार्धात त्याच्या डोक्यात काय चाललेय ते माझ्या लक्षात आले. त्याने माझ्यासाठी जागा बदलल्यावरही मला तिथे अनकंफर्टेबल वाटतेय आणि म्हणुन मी तिथुन उठुन जिथे दोन बायका बसल्यात तिथे त्यांच्या शेजारी जाऊन बसायला धडपडतेय असा त्याचा ग्रह झालेला बहुतेक. मी त्याला सांगितले की माझी मुलगी तिथे त्या सिटवर बसलीय आणि तिच्या शेजारची जागा अजुनही रिकामी आहे. ते ऐकल्यावर तो मान मागे टाकुन दोन मिनिटे हसत राहिला. मग त्याने मला आधीच एकत्र सीट्स का घेतल्या नाहीत म्हणुन विचारले. मी त्याला सगळा किस्सा सांगितला आणि आम्ही दोघांनी मिळून त्या बाईला हव्या तशा शिव्या घालुन घेतल्या. मग अजुन थोड्या गप्पा मारत होतो तेवढ्यात हवाई सुंदरीने येऊन मला त्या दुस-या सीट्वर बसायची परवानगी दिली. मग अजुन थोड्या गप्पा मारुन मी लेकीशेजारी जाऊन बसले. मी थोड्या वेळाने पाहिले तर तो बाब्या परत आयलसीटवर शिफ्ट होऊन मधल्या रिकाम्या सीटमुळे मस्त व्यवस्थित मोकळाढाकळा बसुन त्याच्या डायरीत काहीतरी खरडत होता. Happy

तर मंडळी तुमचेही काही गंमतीशीर अनुभव असतील तर येऊ द्या.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे त्यांना काऊंटरवालीने विंडो सीट म्हणुन मिडल सीट दिली , त्यांनी ती सीट बदलुन विंडो सीट घेतली आणि परत त्यांच्या मुलीजवळची सीट घेतली . त्यांच्या दृष्टीने तो गंमतीशीर अनुभवच आहे .
पण आता बाकीच्यांनी त्यांचे अनुभव शेअर करा ना.

माझा पैला वैला विमान प्रवास. साल असेल साधारण १९९८-९९. तोवर घरातली बहुतेक सर्व मंडळी विमानातून प्रवास करून आली होती. तीही इंटरनॅशनल फ्लाईटने! आणि मी विमानतळाच्या कायम अलीकडच्या बाजूला, लोकांना टाटा बायबाय करायला...
तर त्या वर्षी अचानकपणे माझे व मैतरीणीचे बंगलोरला जायचे ठरले. इतरवेळी आम्ही ट्रेन किंवा बसने प्रवास करणाऱ्या. पण अगदी आयत्या वेळी प्रवासाचे ठरल्यामुळे ट्रेनला गलेलठ्ठ वेटिंग. बसवालाही अवाच्यासवा रेट्स लावत होता. मग त्यापेक्षा विमानानेच का जाऊ नये, असा शहाणा विचार करून दोघींनी पुणे बंगलोर प्रवास विमानाने करायचे ठरवले.
मैतरीणीच्या भावाने बुकिंग केले. ज्या कार्यक्रमासाठी आम्ही जाणार होतो तिथे पुण्याहून 'भेटीदाखल' सुंदर सुंदर रोपे घेऊन जावीत असा एक येडबंबू विचार माझ्या मनात डोकावला. मैतरीणीला सांगताच तिनेही तो उचलून धरला. तडक आम्ही सिंहगड रोडवरच्या वृंदावन नर्सरीत जाऊन हौसेहौसेने बटमोगरा, मदनबाण, रातराणी, कृष्णकमळ, नीलमोहोर, अनंत वगैरे फुलझाडांची खरेदी केली. पॉलिथीन बॅग्जमधील ती रोपे अंगाखांद्यावर वागवत घरी घेऊन आलो. घरच्यांनी आमचे 'सामान' बघून कपाळावर हात मारायचेच शिल्लक ठेवले. तरी कोणी काही बोलले नाही.
प्रवासाला निघायच्या वेळी रोपांच्या गडबडीत मी चुकून घरातल्या स्लीपर्स घालून विमानतळावर जाण्यासाठी रिक्शात बसले. सोबत मैतरीण व अंगाखांद्यावर, मांडीवर, रिकाम्या जागेत फुलझाडांच्या पिशव्या.
आमचे विमान एअर इंडियाचे होते. तिथे चेक-इन करताना मी माझे अडाणीपण उघडे करत तिथल्या बाब्याला विचारले, "आमची सीट नॉन स्मोकिंग सेक्शनमध्येच आहे ना?" त्याने माझ्याकडे करूणार्द्रव कटाक्ष टाकला व म्हणाला, "विमानात 'नो स्मोकिंग' पॉलिसी आहे मॅडम!"
सामान चेक-इन करताना माझ्या हँड लगेजमधील रोपांच्या थैल्या पाहून तेथील बाब्याच्या चेहऱ्यावर जरा आठ्या पसरल्या. पोलिसमामाने प्रत्येक थैली थापटून थोपटून व नंतर डिटेक्टर मशीनीच्या साहाय्याने थैल्यांमध्ये काही लपवले नाही ना, याची खात्री केली. माझा जीव ती रोपे त्या धसमुसळेपणात ठीकठाक राहातील ना, या विचाराने टांगणीवर! माझ्या चिंतित चेहऱ्याकडे बघून पोलिसमामांनी 'अहो मॅडम, हे करायला लागतं सगळं आम्हांला,'ची पुस्ती जोडली.

विमानात आमच्या सीट्स शेजारी शेजारी होत्या. दुपारची वेळ असल्याने विमान उन्हात चांगलेच तापलेले व खिडकीतून ऊन आत येत होते. मी विंडो सीटवर रोपांना ठेवले व मिडल सीट व आयल सीटवर मी व मैतरीण बसलो. सीट स्ट्रॅप बांधायच्या वेळी मैतरीणीला तिच्या सीटचा स्ट्रॅपच सापडेना! कारण तो स्ट्रॅप मी माझ्या सीटचा समजून स्वत:कडे घेतला होता. घामाघूम होऊन जवळून जाणाऱ्या हवाईसुंदरीला "ओ शुकशुक" करून पाचारण केले. तिने एक कीवयुक्त कटाक्ष टाकून आमचा सीटबेल्ट प्रॉब्लेम सोडवला. पण त्याचबरोबर रोपांची थैली विमान उड्डाणाचे वेळी सुटी ठेवता येणार नाही. तिला वरच्या कप्प्यात बंदिस्त तरी करावे लागेल किंवा मांडीवर घेऊन बसावे लागेल असे सांगितले. झाले! पुन्हा आम्ही लेकुरवाळ्या आयांगत त्या रोपांना उरापोटाशी घेऊन बसलो. त्यांची पानं, फांद्या नाकातोंडात जात होती, शिंका दाबताना पुरेवाट होत होती. तसाच कसातरी टेक ऑफ पार पडला. विंडो सीटवरचं ऊन आता चांगलंच चटकत होतं. तरी उडत्या विमानातून दिसणारं पुणं बघण्यासाठी आम्ही काही काळ तो चटका सहन केला. मग असह्य झाल्यावर पुन्हा हवाई काकूंना "ओ शुकशुक" करून हाक मारून बोलावलं. खिडकीवरचा पडदा खाली कसा ओढायचा हे माहीत नव्हतं ना! काकूंनी पुन्हा एकवार अनुकंपायुक्त कटाक्ष टाकला. आमच्या अंगाखांद्यावर बागडणाऱ्या रोपांना पाहून त्या थैल्या शेजारच्या रिकाम्या सीटवर ठेवायची उदार मनाने परवानगी दिली.

आमचा पहिलावहिला विमानप्रवास तसा खूपच लवकर संपला. "आलो बाई एकदाचे बंगलोरला!" म्हणून आम्ही आमच्या बॅगांच्या प्रतीक्षेत असताना एक दाक्षिणात्य कुटुंब एस्कलेटरच्या बाजूला कोंडाळे करून उभे असलेले दिसले. साधारण सात - आठ बुवाबाया असतील. त्यातले दोन बुवा चकचकीत साड्या नेसलेल्या दोन प्रौढ स्त्रियांना एस्कलेटरवर पाऊल ठेवायला उत्तेजन देत होते, तर पाऊल आपोआप पुढे सरकतेय हे पाहून त्या बाया भीतीयुक्त चित्कार काढत मागे सरकत होत्या. जोरजोरात मुंडी हलवून कानडीतून नकार देत होत्या बहुतेक. सोबतची दोन तीन लहान कार्टी एक्साईटमेंटने किंचाळत किंवा उड्या मारत होती. दोन विमानतळ कर्मचारी हा सारा सोहळा पाहात शांतपणे उभे होते.

"चला, म्हणजे आपणच विमानप्रवासाच्या बाबतीत गावरान गंगू नाही!" असा शोध लागल्याच्या परमानंदात आम्ही विमानतळावरील रिक्शा थांब्यावरच्या रिक्शावाल्याशी पुणेरी हिंदी इंग्रजीत प्रवास भाडे ठरवण्यासाठी हुज्जत घालू लागलो!

इंडिगो ही एक अत्यंत भिकार विमानसेवा आहे. एकदा बँगलोरवरून येत असताना माझ्या तिकीटात एक स्नॅक आणि एक ड्रिंक अंतर्भूत होते. आणि ते ज्यावेळी आले त्यावेळी नुकताच फ्रिजमधून काढलेला गारढोण बर्गर आणि त्याबरोबर रुम टेंपरेचरचे सॉफ्ट ड्रींक.
मी त्या हवाईसुंदरीला बोलावले आणि सांगितले की तुमच्या बेसिकमध्ये काहीतरी लोचा झालाय.
ती एकदम अलर्ट होऊन बघायला लागली.
मी म्हणले अहो हा बर्गर रुम टेंपरेचरला ठेवायचा असतो आणि ड्रींक्स फ्रिजरमध्ये. प्लिज माझा हा निरोप तुमच्या अॅडमिनिस्ट्रेशनला द्याल का...
आजूबाजूचे लोक्स हसायला लागल्यावर ती एकदम गोरीमोरी झाली आणि अत्यंत विनयशीलतेने यस शुअर सर म्हणून निघू गेली. अर्थात त्यावेळी मनातून शिव्या देत असताना चेहरा हसरा ठेवणे तिला किती अवघड गेले असेल.

माझ्या पहिल्या विमानप्रवासाच्या वेळी मी काऊंटरवाल्याकडे विंडो सीटच मागितली होती, पण त्याने मला "यस सर" म्हणून मधलीच सीट दिली. आत विमानात गेल्यावर कळले की त्याने आपल्याला मामा बनवलेय ते.

जसे ट्रेनमध्ये ८,१६,२४,३२,४०,४८,५६,७२ नंबरचे बर्थ साईड अपर असतात तसे विमानात सीट नंबरवरुन आपली सीट विंडो आहे की मधली हे ओळखता येते का?

अकु, महान किस्सा आहे! :))

माझाही पहिला विमानप्रवास बंगलोरचाच होता!

पहिला आंतरराष्ट्रीय प्रवास मलेशियन एयरलाईनने केला होता. तेव्हा (किंवा नेमक्या मी असलेल्या दोन्ही फ्लाईटसला) विमानांना आजच्यासारखी गर्दी नव्हती. मला जास्त लेगरुम असलेली जागा मिळाली होती. मुंबई क्वालालंपुर फ्लाईट नव्या नवलाईत पार पडली. पुढे क्वा. ते मेलबर्न फ्लाईट ७ तासांची होती. गर्दी अजिबातच नव्हती. माझ्या शेजारचे सीटस पुर्ण रिकामे होते. शेवटी तिथे आडवे होण्याचे लाजत काजत ठरवले. पण थोडी झोप लागते न लागते तोवर जाग आली.... 'आपला पाय खिडकीवर आपटुन विमानाची खिडकी फुटणार तर नाही ना!' या भितीने :))
(हल्ली तर दोन्ही फ्लाईटला मरणाची गर्दी असते. माझ्या उंचीमुळे जास्त लेगरुमची जागा हवी असते पण मिळेलच याची गॅरंटी नसते Sad )

पुढचे प्रसंग 'गमतीजमती' नाहीत पण नेमही लक्षात राहतील असे आहेत.

पहिल्यांदा भारताबाहेर पडताना घरची मंडळी दिसेनाशी झाल्यावर हमसुन हमसुन रडु आले... ते बघुन तिथला एक इमिग्रेशन ऑफिसर म्हणाला, बाई आता रडुन उपयोग नाही... पुढे जावेच लागेल Sad तेव्हा खरच कल्पना नव्हती की एकदा देशाबहेर पडलेलं पाऊल कायमचच पडलय याची ... Sad

दरम्यान लहान लहान मुली घेऊन एकटीने बरेच प्रवास झाले. एकदा परत येताना २ वर्षांची राधा खुप आजारी होती. निघण्याच्या दिवशी पहाटे पहाटे तिला भयंकर उलट्या सुरु झाल्या... डॉक्टरकडे नेले..औषधे दिली पण अगदी निघेपर्यंत उअलट्या होतच होत्या. बरं डिसेंबर महिना असल्याने तिकीट पोस्टपोनही होत नव्हते...पुढे जानेवारी पर्यंत तिकीटे उपलब्ध नव्हती. खुप टेंन्शनमध्ये तो प्रवास सुरु केला. गार्गी पण फक्त ६ वर्षाची होती. सोबत एव्हढ सामान, तिघींचे पासपोर्टस वगैरे. मुंबई विमानतळावर आल्यावर इमिग्रेशन चा फॉर्म भरत असताना राधा खुप रडत होती. तेव्हढ्यात एक गृहस्थ आले ते म्हणाले मी तिला घेतो तुम्ही फॉर्म्स भरा. त्यांनी तिला पटकन उचलुन घेतले. मी त्यांना म्हटले, तिला खुप उलट्यात्यामुळे, तुमचे कपडे खराब होतील तिने उअलटी केली तर. त्यावर ते एकदम नागपुरी स्टाईलमध्ये म्हणाले की हरकत नाही. काळजी करु नका! त्यांनी राधाला मस्त एंटरटेन केले. त्या व्यक्तिचे उपकार मी कधीच विसरु शकणार नाही. त्यांचे नांव आणि देश वगैरे विचारण्याच्यामनःस्थितीत मी नव्हते. पुढे विमानातही हवाईसुंदरी आणि आजुबाजुच्या प्रवाश्यांना राधाच्या आजारपणाची कल्पना दिली आणि दिलगिरीही व्यक्त केली.

आता विमानप्रवास खुप कंटाळवाणा होतो. कधी एकदा मलबर्न किंवा मुंबई येतेय असे होऊन जाते.

विंडो आहे की मधली हे ओळखता येते का? <<< बहुतेक वेळा. A असेल म्हणजे २A, ५A , १५A तर ती खिडकीची सीट असते. त्यानंतर मात्र विमान कोणत्या जातीचे आहे आणि त्यात बैठक व्यवस्था कशी आहे त्यावर ठरते.
म्हणजे एक रांगेत ३ + ३ शिटा असतील तर F ही खिडकीची सीट असते.
पण बोईंग ७४७ असेल तर त्यात एका रांगेत ३ + ४ + ३ शिटा असतात.
Airbus 340 असेल तर त्यात ३ + ३ + ३ असतात.
MD (जुने) असेल तर २ + ४ + २.
लहान विमानांमधे २ + २ असा प्रकार असू शकतो..
काही विमानांमधे २ + १ अशी व्यवस्था असते.

seatguru.com नामक साईटवर विमान क्रमा़ंक माहीत असेल (flight Number ) तर हे शोधून काढता येते.

गोगा +१
सीट I (आय) स्किप करतात, त्याच्या 1 शी असलेल्या साधर्म्यामुळे.
२+२ मध्ये ACDF नंबर देतात जेणेकरून AF विंडो आणि CD आएल राहतील ज्या ३+३ मध्ये असतात.

अमित बर्‍यापैकी बरोबर आहे तुमचे.. पण बर्‍याच विमानकंपन्या त्याना वाट्टेल ते करतात. त्यामुळे शाश्वती नसते.
.
आता निदान इकडे तरी बहुतेक कंपन्या तिकीट विकत घेताना seat Map दाखवून तुम्हाला कुठली सीट हवी ते ठरवायला देतात. त्यामुळे गोंधळ होण्याची शक्यता कमी..

मला भारतात परत येताना आलेला अनुभव. हा पूर्वीही म्हणजे अनुभवाला दोनच वर्षे झालेली असतानाही लिहिला होता माबोवर. शिवाजी फाँटमधे. त्यानंतर केलेल्या विमानप्रवासांमधे इतका चित्तथरारक कुठलाच नव्हता त्यामुळे अजून हाच लक्षात राह्यलाय. प्रसंग २००१ सालचा. वर्ल्ड ट्रेड सेंटरची दुर्घटना घडायच्या आधीचा आहे. Happy
उसगाव सोडून परत येताना मी इंग्लंडमधे 8 दिवसांचा स्टॉप ओव्हर घेतला होता. माझ्या मावशीकडे राह्यले होते. २६ ऑगस्टला सकाळी हिथ्रोवरून १०:४० ची फ्लाइट होती. काही कारणामुळे मावशी स्वतः मला सोडायला हिथ्रोला येऊ शकणार नव्हती. त्यामुळे तिने सकाळी ६:१५ च्या बर्मिंगहॅम-हिथ्रो कोच वर माझे रिझर्वेशन केले होते आणि वॉलसॉल - बर्मिंगहॅम अशी टॅक्सीही बुक केली. जी पहाटे ५:३० ला येणार होती. सकाळचे पावणेसहा वाजून गेले तरी टॅक्सी आलीच नाही. म्हणून फोन केला तर तिथल्या माणसाने सांगितले की त्याच्याकडे एकच ड्रायव्हर आहे नी त्याला अ‍ॅक्सिडेंट झालाय त्यामुळे नो टॅक्सी. तेव्हा मी मागितला म्हणून त्याने दुसर्‍या एका टॅक्सिवाल्याचा नंबर दिला. तिथे कोणी उचलेना. मग परत त्या जुन्या माणसाला फोन. त्याने दुसरा नं दिला. तिथेहि तीच गत. असे 3 वेळा झाल्यावर मी शेवटी त्याच्याकडून सगळे नंबर्स घेतले. एका टॅक्सीवाल्याचा फोन लागला नि तो यायला तयार हि झाला. पण तेव्हा वाजले होते ५:५५. टॅक्सी घरी पोचायला १५ मिनिटे तरि लागतील असे तो म्हणाला. दुसरा पर्याय नाही म्हणून मी ती टॅक्सी बोलावली. एव्हाना माझ्या डोळ्यातून बर्‍याच नद्या वाहून गेल्या होत्या. फ्लाइट मिस झाली तर काय करायचे? या कल्पनेनेच ब्रह्मांड आठवत होते. भारतात कायमची परत येत असल्याने. खिशात शेवटचे १४ पौंडस होते ज्यातले १२ टॅक्सीला जाणार होते. टॅक्सी आली ६:०५ ला. मग २० मिनिटे टॅक्सीने बर्मिंगहॅमला पोचले. माझी कोच होती ६:१५ ची ती अर्थातच चुकली होती. ती हिथ्रोला ८:४५ ला पोचणार होती आणि माझी फ्लाइट १०:४० ची. त्या वेळेच्या सिक्युरिटी वगैरेच्या दृष्टीने पुरेसा वेळ होता. पण तसे व्हायचे नव्हते. बर्मिंगहॅमला ६:२५ ला पोचल्यावर मी चौकशी काऊंटरवर गेले तर तिथे त्या परफेक्ट ब्रिटिशांनी स्नॉब्यांनी 'ओ तुझी बस चुकली का.. हा हा हा.. ' अशी टर उडवणे सुरू केले. पाच मिनिटे टाइमपास करून त्यांचे मन भरल्यावर त्यांनी सांगितले की पुढची कोच एक तासानी म्हणजे सव्वासातला आहे. जी हिथ्रोला पावणेदहा-दहा ला पोचेल. त्यात जागा असेल तर मला जाता येईल. जागा असेल का हे बस परत आली कीच कळेल. पुढचा अर्धा पाऊण तास प्रचंड अस्वस्थतेत गेला. शेवटी एकदाची ती बस आले. तो ड्रायव्हर फारच सज्जन माणूस निघाला. त्याला सांगितल्यावर त्याने जागा होती त्यामुळे गाडीत चढायला तर सांगितलेच परत आधिच्याच गाडीचे तिकीट चालेल म्हणाला. परत नवीन १७ पौंडस द्यायला लागले नाहीत. आता बस मधे तर बसले. १० पर्यंत एअरपोर्टला पोचले म्हणजे घाईत का होइना फ्लाइट पकडता येइल असा विचार करत मी बस मधे बसून राह्यले. पावणेदहाला एअरपोर्टच्या बस स्टॉप वर बस पोचली. पण ब्रिटीश एअरवेजच्या फ्लायटी तेव्हा टर्मिनल ४ ला असत. आणि तिथे पोचायच्या आधी हीच बस टर्मिनल १,२ व ३ अशी सगळीकडे जाते हे मला तेव्हा कळले. अता मात्र माझी अवस्था वाईट होती आणि गाडीत बसून चुळबुळण्यापलीकडे मी काहीच करू शकत नव्हते. सव्वादहा/ दहा वीसच्या आसपास बस टर्मिनल ४ ला थांबली नि मी जवळजवळ उडीच मारली. सुदैवाने यूकेमधे कार्टसाठी पैसे टाकायची सिस्टीम नसल्याने(तेव्हा नव्हती) तो वेळ वाचला. ट्रॉलीवर सामान टाकून मी चेकींग काऊंटरपाशी निघाले. माझी एकन्दरीत अवस्था पाहून ब्रिटीश एअरवेजच्या स्टाफनी मला रांगेच्या सर्वात पुढे घुसू दीले. तिथे मला बोर्डींग पास तर दिला पण बॅगेज चेक इन करुन घ्यायला नकार दिला. त्यांना गेट वरून सांगण्यात आले की तिच्यासाठी फ्लाइट थांबवली जाणार नाही पण तेवढ्या वेळात ती गेटवर पोचली तर तिथेच सामान चेकीन केले जाइल. माझ्याकडच्या 3 मोठ्या बॅग्ज, बॅकपॅक, मोठा डिझाइन पोर्टफोलिओ असा सगळा पसारा सिक्युरिटीच्या इथे ट्रॉलीवरून उतरवला, बेल्टवर टाकला आणि परत दुसर्‍या बाजूने बेल्टवरून ट्रॉलिवर चढवला. एव्हाना साडेदहा झाले असावेत पण मला काही भान नव्हते. एकच तारा समोर.... अशी अवस्था होती. काहीही करून गेट नं ११ गाठायचे होते नी तेही सगळे लगेज घेउन. मी वेड्यासारखी सुसाट धावत सुटले होते रादर गाडी ढकलत सुटले होते म्हणणे जास्त योग्य होइल. वाटेत आलेल्याला एक्स्क्युज मी असे जरी म्हणत होते तरी म्हणण्याचा टोन जवळजवळ खबरदार जर टाच मारूनी याल पुढे.... असाच होता. शेवटी मी एकदाची गेटवर पोचले. इतकी धाप लागली होती कि तिथे मला काही सांगताच येइना. पण तिथल्या काऊन्टर वरच्या माणसाचे मला बघून शब्दावाचून कळले सारे.... असे झाले होते त्यामुळे त्याने माझ्या मुठित पकडून ठेवलेला बोर्डींग पास घेतला आणि मला जा अशी खुण केली. आतमधला प्लेनच्या दारापर्यन्तचा टनेल इतका मोठा नि स्लोप असलेला होता कि मला आपण वण्डरलॅण्ड मधली अ‍ॅलिस असल्याचा भास झाला. दाराशी पोचले नि तिथल्या होस्टेसने दर्शवलेल्या टनेलमधे माझी एक बॅग भिरकावून दिली. आणि माझ्या दुर्दैवाने परत एकदा उचल खाल्ली. ती बॅग खाली हि जाईना आणि वर हि आणता येइना अशी काहीतरी विचित्र अडकून पडली तिच्या चाकामुळे. शेवटी माझे पाय त्या होस्टेसला पकडायला सांगून मी त्या टनेलमधे शिरले. कशीतरी ति बॅग सोडवली नी मी बाहेर आले. उरलेल्या दोन्ही बॅगा ढकलल्या. त्या मार्गस्थ झाल्या हे बघून मग मी विमानात शिरले. माझी जागा शोधून तिथे जाउन बसले. घशाला कोरड पडलिये, अरेच्या कॅप कुठे दिसत नाहीये(माझी नवी कोरी जॉर्जिया अ‍ॅलम्नाय वाली कॅप मध्य धावपळीत गळून पडली कुठेतरी) असे म्हणेस्तोवर एक हवाईसुंदरी पाण्याचे कप्स घेऊन आली. तिने मला विचारले वॉटर? मी विचारले दोन घेऊ का? ओह यु आर दॅट गर्ल! असे म्हणून तिने मला हसून पाण्याचे २ कप्स दिले. माझ्या शेजारचा देसी प्रवासी 'किती हा अधाशीपणा... हे देसी लोक ना जाउ तिथे लाज आणतात!' अश्या अविर्भावात माझ्याकडे बघत होता. मी खांदे उडवले, घटाघटा पाणी संपवले नी शांत बसले. मग कधीतरी झोपी गेले.

मी एकदा मेक्सिकोमधल्या Ciudad del Carmen नावाच्या गावातून Houston ला परत येत होतो. सकाळचं फ्लाईट, अन भयंकर मुसळधार पाऊस पडत होता. त्यामुळे सगळीकडचे लाईट गेले होते. एअरपोर्टवरचे काँप्युटर्स, बॅगेज चे बेल्ट वगैरे सगळं बंद. वाटलं आता फ्लाईट कॅन्सलच होणार. पण प्रत्येक प्यासेंजर आला की ते नाव विचारुन ह्युस्टनला कॉल करुन कन्फर्म करत, अन सीट नंबर वगैरे विचारुन कोर्‍या कागदावर पेनाने लिहून बोर्डींग पास बनवून दिले. Happy

फ्लाईट बोर्ड करतानाही मुसळधार पाऊस पडतच होता. विमान लांबवर पार्क केलेलं होतं अन तिथपर्यंत चालत जायचं होतं. मग गेटवर बोर्डींग पास तपासणारा प्रत्येकाला एक छत्री पण द्यायचा. विमानाच्या दारात दुसरा एकजण छ्त्री परत घ्यायचा. छत्र्या लिमीटेड असल्यामुळे इकडून सगळ्या छ्त्र्या तिकडे पोचल्या की तिकडचा माणूस धावतपळत छ्त्र्या परत इकडे आणून देइ.

Flight.jpg

पाऊस इतका वेडावाकडा पडत होता की लांबवर विमानात चालत जाईपर्यंत फक्त डोकं कोरडं राहीलं. मग विमानातल्या जोरदार एसीमधे ओल्याचिंब जीन्समधे कुडकुडत प्रवास संपवला Happy

अरे म्हणजे माझ्याबद्दलच्या आदरभावनेतून पाय नव्हते पकडायला सांगितले. मी टनेलमधे रांगल्यासारखे पुढे गेले होते थोडी. तर घसरून बॅगेजबरोबर आत जाऊ नये म्हणून मागे माझे पाय पकडून ठेवायला सांगितले होते.

हो तेच इमॅजीन करुन भन्नाट वाटलं.

अरे म्हणजे माझ्याबद्दलच्या आदरभावनेतून पाय नव्हते पकडायला सांगितले >>> आता हेही इमॅजिन करुन हसतो आहे Happy

भारी किस्से आहेत वरचे.
एमिरेट्सच्या एअरहोस्टेस प्रचंड प्रेमळ असतात , बर्‍याचदा अगदी झोपेतुन उठवुन जेवायला देतात ( जर स्टिकर लावलेलं नसेल तर), एकदा मला झोपेतुन उठवलं होतं तर मी तिला मराठीत बोललो , 'मला नकोय जेवायला' ,बिचारी क्षणभर सरभरली , काय बोलतोय हा म्हणुन. Lol

शेवटी माझे पाय त्या होस्टेसला पकडायला सांगून मी त्या टनेलमधे शिरले. >>> Lol मंदार मला पण आधी कळलं नाही .

श्री, नशीब म्हैस मधल्या एस्टीतल्यासारखं - "काय शिंची कटकट आहे, अगं ए, पलीकडे जाउन झोप बघू तू!" असं खेकसला नाहीस Proud

"काय शिंची कटकट आहे, अगं ए, पलीकडे जाउन झोप बघू तू!" असं खेकसला नाहीस >>> Lol मंदार बोललो असतो तरी तिला काय कळणार होतं.

Pages