'विशेष' माहेरपण

Submitted by मंजूताई on 29 April, 2015 - 06:24

शांता शेळके कवयित्रीने ' रानीच्या पाखराला माहेरी सांगावा' घेऊन पाठवतातच, हे आपण समजू शकतो पण राजा बढें सारख्या कवीनेही माहेरावर कविता करावी .. असं हे 'माहेरपण' ! स्त्रीच्या जीवनातील एक हळवा, नाजुक कोपरा! ही माहेराची ओढ वय वाढत जातं तसं तसं कमी होत जातं असावं कदाचित पण ही ओढ नाहीशी होत नाही हे त्रिकालाबाधित सत्य! पण काही सख्यांना मात्र माहेरपणाचं सुख मिळतंच असं नाही किंवा स्वतःहूनच त्या पारख्या करून घेतात किंवा परिस्थिती त्यांना भाग पाडते त्या सख्या म्हणजे 'विशेष मुलांच्या आया' संज्ञा संवर्धन संस्थेच्या 'कल्पतरू' विशेष शाळा हे त्यांचं हक्काच माहेर आहे. वर्षातून एकदा ह्या निखळ माहेरपणाचा आनंद घेण्याची त्या आतुरतेने वाट बघत असतात. ह्या औट घटकेच्या माहेरपणाचा आनंदात मीही सामील झाले अन त्याचा हा छोटेखानी सचित्र वृत्तांत!

मागच्या वर्षी 'विशेष उद्योजक' ह्या लेखाच्या निमित्ताने डॉ उत्तरवारांशी व त्यांची संज्ञा संवर्धन ह्या संस्थेची माहिती कळली होती, प्रत्यक्ष पाहूनही आले व भारावून गेले .. इच्छाशक्ती , समर्पण व प्रामाणिक प्रयत्नाच्या जोरावर रोपट्याचं सदाहरित बहरलेल्या वृक्षात रूपांतर होणं....

डॉ शैलजा देशपांडेचा फोन आला शनिवारी आपल्याला जायचंय बरं का मातृसंघर्षाच्या निवासी शिबिराला! ह्यांपूर्वी त्यांच्या कडून ह्या माहेरपणाबद्द्ल बरंच ऐकलं असल्यामुळे उत्सुकता होतीच... अर्थात संधी दवडली नाही. ह्यापूर्वी शाळेच्या वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रमाला गेले होते अन तिथल्या शिक्षकांच्या व मदतनिसांच्या मेहनतीला मनोमन सलाम ठोकला होता. तसे सगळेच सण, उत्सव व दिन इथे साजरे होत असतात त्यात पालकही सामील होत असतात पण वर्षातून एकदा होणार्‍या ह्या निवासी शिबिराची मात्र आया आतुरतेने वाट पाहत असतात कारण हा फक्त आणि फक्त त्यांच्याचसाठी कार्यक्रम असतो. हा उपक्रम गेले नऊ वर्ष नवनवीन कल्पनांसह साजरा केला जातो. ह्यावर्षीची 'थीम' नऊवर्ष झाले म्हणून 'नवरस' होती.

नागपूरपासून बावीस किमीवर ही शाळा आहे. शाळेच्या मुलांसाठी चार बसेस आहेत. बहिणींना आणायला ड्रायव्हरभाऊराया जातीने गेले होते. आम्ही दुपारी एक वाजता पोचलो तर काहीजणी एकट्या तर काहीजणी आपल्या दुसर्‍या पाल्यासह येऊन पोचलेल्या होत्या. मुलं शाळेतच होती. ज्यांच्या घरी सांभाळायला कोणी नाही ते मुलं आपल्या आयांबरोबरच राहणार होते व बाकीचे नेहमीप्रमाणे शाळा सुटल्यावर घरी जाणार होते. त्यांची मुलं कशीही वागली तरी त्याच त्यांना दडपण नव्हतं त्यामुळे आयांच्या वागण्यात मोकळेपणा, बिनधास्तपणा प्रवेश करतेवेळीच जाणवत होता.

शाळेतल्या यशोदा (शिक्षिका)आयांनी 'मातृसंघर्ष' सदस्यांच स्वागत 'जागर रे जागू या' ह्या गाण्यावरील नृत्याने केले. सौ पुराणिक ह्यांनी आतापर्यंतच्या 'मातृसंघर्ष' च्या वाटचालीचा आढावा घेतला. सोमलवार महिला महाविद्यालयाच्या शिक्षकांनी खास देवकी (खरी आई) व यशोदा आयांसाठी विविध मनोरंजक खेळ व स्पर्धा घेतल्या ज्यातून त्याचा सामंजस्य, समन्वय व सहकार्य दिसून येत होतं. दिलेल्या वेळात तोरण बनविणे सारखी एक गटस्पर्धा होती स्पर्धा म्हणजे चढाओढ ...प्रत्येक स्पर्धक जिंकण्याच्या ईर्ष्येने सहभागी झाला होता . मुलं आया व शिक्षकांना टाळ्या वाजवून प्रोत्साहित करताना पाहून ह्यांना ' विशेष' का म्हणायचं प्रश्नच पडला व कोण कृष्ण ? कोण पेंद्या? आपण सुंदर, आकर्षक दिसावं ही स्त्रीसुलभ भावना! ह्या भावनेचा प्रत्यय सजून धजून आलेल्या ह्या गौराय्यांना आज त्याच प्रदर्शन करायला मिळणार म्हणून खूपच उल्हसित व उत्साहित होत्या. मीच 'विश्वसुंदरी' ह्या थाटात तीस ते सत्तर वयोगटातील ह्या यौवनांचा 'रॅम्प वॉक' केवळ अप्रतिम! 'लाजणं-बुजणं' चा बुरखा फाटकाबाहेरच सोडून आल्यामुळे आत्मविश्वासाने वावरत होत्या, कला सादर करीत होत्या, स्वतःची ओळख निर्भीडपणे सांगत होत्या.
नंतरचा खेळ होता डम्प शेराचा प्रकार. एका रांगेत दहाजणी उभ्या राहणार असे तीन गट. एका गटातील शेवटचीला एक शब्द मिळणार तो तिने हावभावातून शब्द पुढचीला सांगायचा असे करत करत शेवटचीने तो शब्द ओळखायचा. पहिलीने वाचलेल्या मूळ शब्दाची लागलेली वाट बघून हास्यकल्लोळाला नुसतं उधाण आलं. तीन तास कसे गेले ते कळलेच नाही. चहा, कच्चा चिवडा व गप्पात समस्त माहेरवाशिणी इतक्या रंगून गेल्या की... दिवेलागणी झाली. तबला-पेटीच्या संगतीने सामूहिक सांजप्रार्थनेचा आनंद काही औरच आणि विशेष म्हणजे ही मुलेही अगदी शांत बसली होती. आपापल्या घरात म्हटल्या जाणारी प्रार्थना कानावर पडली की त्यांचे डोळे चमकत होते.. सांगू पाहत होते.. ही प्रार्थना/श्लोक मला आवडतात. खास ह्या कार्यक्रमासाठी पाठक दांपत्य वर्ध्याहून आले होते. पाठक दांपत्य गेली पंचवीस वर्षे बीड (मराठवाडा) जवळच्या छोट्याश्या गावात 'दीनदयाल शोध संस्थेच्या' प्रकल्प सांभाळत होते व सध्या ते वर्ध्यात काम करतात. श्री पाठकांच्या जोषपूर्ण गाण्यांनी सगळ्यांमध्येच जोष संचारला ... हवशे, नवशे, गवश्या गवयांनी त्यांच्या आवाजात आवाज मिसळत गाण्याची हौस भागवून घेतली. भागवतकार सौ शैलजा सराफ व पाठक दांपत्याने प्रार्थना, सामूहिक प्रार्थनांचे महत्त्व व त्याचा आपल्या शरीरा व मनावर होणारा परिणाम ह्यावर उत्तम विवेचन केले... दुपारच्या नाच, गाणे, खेळ, स्पर्धांमुळे चैतन्यमय झालेल्या वातावरणाला सांजवेळी सुंदर आध्यात्मिक किनार लाभली होती अन त्याचे प्रतिबिंब प्रत्येकीच्या चेहर्‍यावरुन ओसंडून वाहत होते.

प्रत्येकीने घरून आणलेल्या पोळ्या, फोडणीच वरण ,भात , भाजी असा साधा पण रुचकर स्वयंपाक व तोंडी लावायला तोंड (गप्पा) असल्यावर चांदरातीतील अंगणातील अंगत-पंगत विलंबित झाली नाही तर नवल ! निरागस चिरंजीवी बालकत्वाचं वरदान लाभलेली ही बालके. राखी युनिटमध्ये काम करणार्‍या चाळिशीच्या वरच्या मतिमंद मुली इतर मुलांची काळजी घेत असलेल्या पाहून जरी त्या आई बनू नाही शकल्या तरी त्यांच्यातलं मातृत्व, वात्स्यल्याचा पाझर त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. कोणी मुलांना जेवायला सांगत होत तर कोणी रडणार्‍या मुलांना शांत करत होतं.. साक्षीला गाणी तोंडपाठ ... . एकदा सुरुवात केली सगळी गाणी ऐकवल्याशिवाय राहणार नाही. पण सारखी लाळ गळते तिच्यापेक्षा दोनवर्षाने मोठी असलेली तिची सखी अपूर्वा , तिची लाळ पुसायला, कौतुकाने गाणी ऐकायला तिच्याजवळ सदोदित उभी! काहीजणी आपल्या मुलांना जेवू घालता घालता स्वतः जेवत होत्या तर काहींची सामान्य मुले आपल्या बहीण - भावांची काळजी घेत असलेले बघून नकळत मनोमन शुभेच्छा उमटल्या 'हे नातं, हे प्रेम असंच चिरकाल टिकू दे'! हो, आणि काही मुलांनी प्रत्यक्षात ते उतरवलं आहे... आपआपसात लग्न करून ... फडकेंच्या दोन मुलांपैकी एक सामान्य व दामल्यांची मुलगी सामान्य व मुलगा विशेष ह्या दोन्ही कुटुंबाने जाणीवपूर्वक ही सोयरीक केली. ..प्रत्येकीच्या कथे, व्यथेचा काठपदर वेगळा! पण त्यांच्या जवळ असलेला छोटासा का होईना नाचरा मोर आहे जो त्यांना हसरा ठेवतोय ! अली व असगर दोन्ही विशेष मुलांचे नुकतेच वडील वारले. स्थावर संपत्ती भरपूर ! भाऊबंदकीमुळे त्यांच्या वाटेला काही येत नाही. .. हातात उत्तम कला.. बुटीक चालवते. सदा हसतमुख! दोघांपैकी एक अतिशय शांत तर दुसरा हनुमान .. देवाचे आभार मानते दोघं असे असले तरी त्यातला एक शांत मुलगा दिला म्हणून! गाणी व कार्टून चाहता बारा वर्षाचा प्रथमेश व्हील चेअरवासी. शी - शू शिकविण्याची उमेद संपलेल्या आईने डायपर पर्याय अवलंबून श्रम व वेळेची बचत केली व ती बचत वाटायला अनाथ मुलांच्या रात्रशाळेत जाते व समाजसेवेची आवड जोपासते. सेरिबल प्लासीग्रस्त -- चे आईवडील दोघही नोकरी करतात. --- उचलून उचलून खांदेदुखी झाली. शक्य असेल तेव्हा ताई मदत करते अन --- काही त्रासच नाही कौतुकाने सांगत होती. शांत, सोज्वळ , सुंदर --- कडे पाहून कोणाला कळणारच नाही ही विशेष आहे म्हणून. दहा वर्ष ही अशी का हे शोधण्यात गेले, पुढची दहा वर्ष ही नक्की बरी होईल ह्या आशेत गेले व आता दहा वर्षापूर्वी स्वीकार केला, हे आहे असंच राहणार आहे, मन शांत झालं व तिच्या भविष्यासाठीच नियोजन करू लागले . स्वमग्न --- तारुण्यात प्रवेश केलाय. समजत काही नाही. आमच्यानंतर काळजी घ्यायला समजूतदार बहीण दिलीये म्हणून आई देवाचे आभार मानते व उद्या गरज पडली तर प्रजनन संस्थाच काढून टाकायची मनाची तयारी केलीये. .. सकारात्मक दृष्टिकोनाची उत्तम उदाहरणं अजून काय असू शकतील. मानसशास्त्राच्या एका पुस्तकात एक वाक्य वाचलं 'इच इंडिवीज्युल एज अ‍ॅबनॉर्मल' कोणाला नॉर्मल अन कोण अ‍ॅबनॉर्मल म्हणायचं प्रश्न पडला.

लोग जमा हो और अंताक्षरी न हो, बात कुछ हजम नही होती ना ? रात्र चढत गेली तसा तसा अंताक्षरीचा कार्यक्रम अधिकच रंगत गेला. पण कुटुंबप्रमुख अत्रेमॅडमने आवर घातला व सगळ्यांची व्यवस्था नीट लागलीये की नाही हे बघून झोपायला गेल्या.

मंगल अश्या प्रातःकालीन प्रार्थनेने व त्यानंतर प्रभात फेरीने दिवसाची सुरुवात झाली. मन व शरीराच्या आरोग्यासाठी योग व प्राणायामाचे महत्त्व अन्यनसाधारण आहे, हे आपण जाणतोच . घरच्या घरी करता येण्यासारखी आसने, प्राणायाम, शवासन व योगनिद्रा ह्याचे प्रात्यक्षिक श्री रडके व त्यांच्या चमूने करवून घेतले व महत्त्वही विशद केले. नाश्ता, चहापाणीसाठी एक तासाची विश्रांती दिली होती. संपूर्ण कुटुंबाची आरोग्य रक्षक एक स्त्री असते. पण तिच्याही काही गरजा, अपेक्षा असतात पण ह्याची दखल घेतली जात नाही. त्याची जाणीव करून द्यावी ह्या उद्देश्याने पुढचा कार्यक्रम संपूर्ण कुटुंबासाठी होता त्यासाठी इतर सदस्य हळूहळू जमा होऊ लागले. स्त्रीरोगविशेषज्ञ डॉ वर्षा सगदेवांचे 'एजिंग ग्रेसफुली' दृकश्राव्य व्याख्यानाने सगळ्यांना खिळवून ठेवले. स्त्रीच्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर येणार्‍या समस्या, प्रश्न कसे हाताळावे व त्यासाठी काय केले पाहिजे जेणेकरून सकारात्मक राहता येईल ह्यावर अत्यंत साध्या व सोप्या भाषेत त्यांनी मार्गदर्शन केले. आहार, विहार, जीवन शैली, व्यायाम, छंद, ध्यान-धारणा ह्याचे महत्त्व विशद केले. आज जगभरात शवासन, योगनिद्रा, ध्यान-धारणा, प्लॅसिबो परिणाम इ गोष्टींवर खूप उपयुक्त संशोधन होतंय, हे त्यांनी त्याचे दाखले देत चित्रफितीतून सोदाहरण समजावून सांगितलं. ,

शेवटचा टप्पा सांस्कृतिक कार्यक्रमाचा! नवरस ह्या कल्पनेतून विविध कला सादर करण्यात आल्या. काही अडचणीमुळे निमंत्रित पाहुण्या येऊ शकल्या नाही व ऐनवेळी आकाशवाणी निवेदिका प्रभा देऊस्करांना अध्यक्षपद दिलं व त्यांनी ते सहजतेने स्वीकारलं. निवेदिका हिची भूमिका 'फिलर'ची आणि तिच भूमिका त्यांनी इथेही निभावली. तिला फिलर म्हणा किंवा स्टेपनी पण तिचं महत्त्व अन्यनसाधारण आहे, ह्यात दुमत होण्याचे कारण नाही. संगीत व नृत्य ही एक उपचार पद्धती आहे, हे आज जगन्मान्य झालंय. संगीत शिक्षक पाखरे ह्यांनी त्यांचे अनुभव कथन केले. समृद्ध जीवन जगण्यासाठी 'कला' किती महत्त्वाची आहे, अधोरेखीत झाले. ह्या देवकी यशोदांनी घर, कुटुंब, नोकरी व्यवसाय सांभाळत नाच गाण्याचा सराव केला अन ज्या उत्साहाने त्यांनी त्याचे सादरीकरण केलं, त्याला खरोखर तोड नाही. गोडाधोड्याच्या जेवणाने व शाळेतल्याच मुलींनी बनविलेल्या भेटवस्तू देऊन रंजक कार्यक्रमाची सांगता झाली.

"जिंदगी बदलने के लिये लडना पडता है और आसान करने के लिये समझना पडता है"
www.sandnya.org

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माहेरपणाची ही कल्पना वाचून आधी डोळे पाणावले... पण खूप छान वाटलं.
हिंमतवान शूर पालकांची, शिक्षकांची.. कुटुंबांची ही एक लढाऊ आर्मीच की.
अत्यंत सुरेख उपक्रम... आणि त्याची सार्थ ओळख करून देणारा लेख.

माझा भाउ पन special child आहे. हे सर्व त्रास आनन्दने सहन कर् नार्या आइला सलाम

व्वा! लेख वाचुन डोळे पाणावलेत अगदी..
असही माहेरपण असु शकत? कल्पनाच करवत नाही...
त्या सगळ्या देवकी आणि यशोदाना सलाम...

मंजु ताई, खुप उत्तम दर्जाची लेखन शैली असते तुझी.. तुझ्या लेखाचे घरी सगळे fan आहेत...
खुप वेगळे विषय समोर आणते.... आणि कुठे तरी आपण केवढस जगतो अस विचार करायला भाग पाडतेस...

सगळ्यांना धन्यवाद! ह्या संस्थेत सगळेच ट्रस्टी, कर्मचारी, शिक्षक खूप मनापासून काम करतात त्यांना खरोखर सलाम! नियमीत मदत करणारे हात दिवसेंदिवस वाढताहेत. त्यात खास करुन उल्लेख करावासा वाटतो अभिनंदनास पात्र निशा कोठारी ह्यांचे! निशा कोठारी ह्या आयआयटी कोचिंग क्लास मधील अग्रगण्य नाव. त्या अभ्यासा व्यतिरिक्त विद्यर्थ्यांमध्ये जागरुकता व संवेदनशीलता वाढावी म्हणून बुध्यांकाच्या दोन टोकांवर असणारे विद्यार्थी ( त्यांचे विद्यार्थी व ही विशेष मुलं) एक दिवस एकत्र घालवतात....