गारपिटीचा मारा असह्यच होता. उभं पीक जेमतेम १० मिनिटांच्या कालावधीमध्ये पूर्णपणे आडवं झालं होतं. गुडघ्यात डोके घालून धर्मा शेताकडे तासन्तास बघत राही. कर्जाच्या डोंगराखालि दबून गेलेला धर्मा आताशी कुठे वर यायची स्वप्ने बघू लागला होता. आणि या आक्रिताने त्या स्वप्नांची धूळधाण उडवली होती.
गारपीटग्रस्तांना मदत घोषित झाल्यावर धर्माला आशेचा किरण दिसला. आमदारसाहेबांनी स्वतः गावात येऊन २ शेतकर्यांना मदतीचे चेक स्वहस्ते दिले. मामलेदार कचेरीत जाऊन आता फक्त चेक घेऊन आले की आपल्याला कसलीच काळजी राहणार नाही अशी त्याची खात्रीच पटली.
पहिल्या खेपेला बँकेने दादच लागू दिली नाही. पूर्ण दिवस तिथे बसून काढल्यावर अखेर हात हलवत परत यावे लागले. आणखी तीन वेळा असेच घडल्यावर घरी बायको अन पोरे हवालदिल झाली. आता खायचे अन्न संपत आले. २ दिवस उपाशी राहून अखेर तिरीमिरीत धर्मा पुन्हा तालुक्याला गेला आणि पुन्हा एकदा त्याला वाटाण्याच्या अक्षता लागल्या.
एसटी स्टँडला थांबली तसा कंडक्टर धर्माकडे बघत-न-बघतच तिरसट आरोळी ठोकली, "विश्रामपूर आलंय, उतरा की आता" अर्धवट बंद डोळ्यांची उघडझाप करत धर्मा कसाबसा उठला. पायात मुळीच त्राण नव्हते. तसाच धडपडत एस्टीतुन बाहेर पडला आणि जेमतेम १०*१० च्या 'स्टँड' कडे जायला निघाला.
स्टँड्मध्ये शिरल्याशिरल्या जवळच्या एकमेव बाकड्यावर धर्माने अंग टाकले. पोटात आता फक्त एक खड्डा जाणवत होता, बाकी सगळ्या संवेदना बधिर होत चालल्या होत्या. त्याच्या डोळ्यांसमोर संपूर्णपणे अंधार होता. एव्हढ्यात त्याच्या कानावर एक आवाज पडला,"रातिवड्याचं पाव्हनं न्हवं का तुम्ही?".
धर्माने कसेबसे डोळे उघडून पाहिले, तर एक शेतकरी त्याच्याकडे निरखून बघत होता.
"व्हय" धर्माने अस्पष्टसे उत्तर दिले. त्याच्या आवाजावरूनच पाव्हण्याला एकंदर परिस्थितीचा अंदाज आला. त्याने आपल्या हातातले पुडके पुढे केले.
"पारंच गळाटला की पाव्हनं...... घ्या वाईच भेळ खावा".
पोट आणि मेंदूनेही धर्माला 'नको' म्हणायची परवानगी नाकारली. तशीच मळकट मूठ त्या कागदी पुडक्यात बुचकाळत त्याने अधाशासारखे बकाणे भरायला सुरुवात केली. त्याचा आवेग पाहून पाहुणाही थक्क झाला.
पहिला घास पोटात गेल्यावर एका कोरड्या शेतातल्या खड्ड्यात पाण्याचा हंडा ओतल्यासारखे धर्माला वाटले. त्या समाधानाला शांतपणे अनुभवावे असाही त्याच्या डोक्यात विचार आला. पण नकळतच त्याचा हात पुन्हा एक मूठभर भेळ घेऊन तोंडाकडे आला होता. त्यामुळे खाण्यातील समाधान शोधण्यापेक्षा आधी त्याची गरज संपवणे इष्ट होते. त्याने गचागच घास तोंडात भरायला सुरुवात केली.
भेळेचा अर्ध्याहून जास्त पुडा फस्त केल्यावर मेंदू जागा झाला आणि धर्मा थोडा मागे सरकला. इतका वेळ भुताकडे पाहिल्याप्रमाणे त्याच्याकडे बघणारा पाव्ह्णा एकदम भानावर आला आणि हातातली पाण्याची अर्धवट काळी बाटली धर्माला देत म्हणाला, "लैच भुकेले होता जनू!!!!! कुठुन आलासा?"
"मामलेदार कचेरीकडून" पाण्याचे दोन घोट पीत धर्मा उत्तरला.
"चेक आनायला गेलता का?" पाव्हण्याने कुत्सित हसत विचारले.
"व्हय. तुमी कुटले?"
"मी बाभुळवाडीचा.......खैरनार......"
धर्माच्या डोक्यात काही ट्युब पेटेना. बाभुळवाडी खरं तर त्याच्या गावावरून जवळच. पण त्याला कोणी खैरनार आठवेना. तेव्हढ्यात पाव्हण्याने विचारले,
"किती शेती म्हनायची तुमची?"
"नावाची शेती. जिवावर उठलिया माझ्याच. एक साल काही नीट जाईना" धर्मा उद्विग्न होऊन म्हणाला.
"असं म्हणून चालतया व्हय? अवो, कितीही झालं तरी पोटाला देतीया ती."
खैरनाराच्या वाक्याने धर्माला हसू फुटले. त्याची जमीन निदान त्याच्या पोटाला तरी देत नव्हती हे नक्की.
"आता कसं करनार मंग?" खैरनाराच्या प्रश्नाने धर्मा भानावर आला. त्याच्या मनात पुन्हा काळजीचे ढग जमा होऊ लागले. आजची आपली व्यवस्था तर झाली पण पोराबाळांचे काय? घरातला दाणापाणी कधीच संपला होता. उधार तरी कोण आणि किती दिवस देणार? भुकेने रडणार्या पोरांचे चेहरे त्याच्या डोळ्यासमोर नाचू लागले. त्याच्यापुढचा कोणताच मार्ग त्याला दिसत नव्हता.
त्याची मनस्थिती खैरनारने बरोबर ओळखली.
"असं करा. बाभूळवाडीला खाशाप्पांच्या घरला या उद्या. काहीतरी सोय करूयात"
खैरनाराच्या उद्गाराने आपल्याला देव तर भेटला नाही ना असेच धर्माला वाटले. अशा उद्गारांची त्याला सवय नव्हती. मदतीसाठी लाचार होऊन दारोदार पायताणं झिजवायची धर्माला आता सवय झाली होती, मात्र मदत स्वतःच अशी आपल्यासमोर येईल असे त्याला स्वप्नातही वाटले नव्हते.
"...............पन पाव्हनं, कागुद करावा लागंल" उरलेल्या भेळेतले शेंगदाणे शोधत शांतपणे खैरनार म्हणाला.
धर्मा खाडकन भानावर आला. क्षणार्धात त्याला खैरनार आणि खाशाप्पांची जोडी लक्षात आली. उरलेसुरले अवसान गोळा करून तो उभा राहिला.
"व्याज किती?"
"१५ टक्के आणि ते व्याजावर चढनार बरं का"
व्याजावर चढणार याचा अर्थ चक्रवाढ हे धर्माच्या लक्षात आले. त्याच्या जन्मात तो ते फेडू शकणार नाही हेदेखील तिथल्यातिथे त्याच्या लक्षात आले.
"ते न्हाई जमायचं" त्याच्या तोंडून ठामपणे उद्गार बाहेर पडले.
खैरनाराने त्याच्याकडे नजर वळवली. त्याच्या चेहर्यावरचा मैत्रीचा भाव कुठल्याकुठे गेला होता. थंड डोळे धर्मावर रोखुन अत्यंत कोरड्या आवाजात तो म्हणाला,
"बस खाली............. आरं, पोट भरल्यावर अभिमानानं बोलायचं असतया. तुला मी हिथं भेटलो नसतो तर भुकेपायी मेला असतास अन उद्या तुझ्या बायकोला पंचनाम्याला पोलिस हिथं घेऊन आले असते. लेका जगायची ऐपत न्हाई तुझी आणि जमिनिवर कसलं प्रेम करतुयास? एकदा आलेली लक्श्मी अशी धुडकारशील तर पुन्हा उभं न्हाई करणार ती तुला...... असंच करीत र्हाईलास तर सरकारच एक दिवस शेत जप्त करंल. सावकार शेत करू तरी देतो का न्हाई? "
दुसरा भेळेचा पुडा तिथेच ठेवत खैरनार उठला.
"हे पोराबाळास्नी घेऊन जा. भुकेले असतील. तु लेका बिनधास्त हाणंलस. त्यांची काळजी हाये आमच्या सावकारास्नी........."
धीमी धीमी पावले टाकत खैरनार अंधारात नाहीसा झाला. बाकड्यावरच्या भेळेच्या पुड्याकडे धर्मा विषण्ण्पणे बघत राहिला आणि अखेर त्याने तो पुडा उचलला.................
छान नेमक्या शब्दात जास्त आवेग
छान
नेमक्या शब्दात जास्त आवेग मिळाला
कटू पण हेच सत्य आहे बर्याच ठिकाणी
उतरलं पार.. कल्पना होतीच हे
उतरलं पार..
कल्पना होतीच हे असे होणार. आजकाल नुसतं शेतकरी म्हटले तरी असे होते. ते देखील आजवर बातम्यांमधूनच काय ते त्यांचे जग पाहिलेय.
pohachal! chhaan kas mhanav?
pohachal!
chhaan kas mhanav?
निख्या भापो लिहीत राहा रे
निख्या भापो लिहीत राहा रे ..........................
भेळ गळ्याखाली उतरवणार धर्मा समोर दिसतोय
आईगं!!
आईगं!!
सुन्न करून टाकणार वास्तव
सुन्न करून टाकणार वास्तव
ह्म्म्म्म्म सुन्न करणारे
ह्म्म्म्म्म सुन्न करणारे वास्तव ! !
शेवट कसा असेल याचा अंदाज आला
शेवट कसा असेल याचा अंदाज आला होता.
पण छान लिहिलेय.
(No subject)
सर्वांना मनापासून
सर्वांना मनापासून धन्यवाद.............
बर्याच काळाने लिहायचा प्रयत्न केला होता, त्यामुळे कितपत चांगले लिखाण होईल याची जरा शंका होती.
छान कथा .. प्रभावी मांडणी ..
छान कथा .. प्रभावी मांडणी ..
निशदे, खूप खूप छान जमलीये
निशदे, खूप खूप छान जमलीये कथा. अगदी थोडक्या शब्दांत कथानक आणि कथेचा फुलोरा. सोप्पं नाही असं लिहिणं. फार परिणामकारक.
छान कथा .. प्रभावी मांडणी
छान कथा .. प्रभावी मांडणी ..<<< +१.
आवडली असं म्हणवत नाहीये. फार वाईट वाटलं.
छान लिहल आहेस. शेवट अपेक्षित
छान लिहल आहेस. शेवट अपेक्षित आनि वाईटच
सुरेख... निशदे तु ज्या
सुरेख...
निशदे तु ज्या प्रकाराला हात घालतोस छानच लिहीतोस..
छान कथा .. प्रभावी मांडणी >>>
छान कथा .. प्रभावी मांडणी >>> +1
सशल, दाद, नंदिनी, अंकु,
सशल, दाद, नंदिनी, अंकु, चाफ्या अन जाई,
मनापासून धन्यवाद.
Vakyarachana kharach khup
Vakyarachana kharach khup chan ahet.
MANAPASUN AWADALE. Katha ajubajucya pahilelyach asatat pan tyachi mandani ani rachana apalya pratibhewar depend asate.
Tumcyat lekhan pratibha ahe.
सुन्न करून टाकणार वास्तव >>>>
सुन्न करून टाकणार वास्तव >>>> +१००
छान तरी कसं म्हणावं, जळजळीत
छान तरी कसं म्हणावं, जळजळीत वास्तव आहे हे.