..
नाक्यावर नवीन एसी सलून उघडले होते. मला काही घेणेदेणे नव्हते. मालक माझ्या ओळखीचा नव्हता, त्यामुळे उद्घाटन समारंभाला आमंत्रणही नव्हते. गेले ६ वर्षांपासून माझा केस कापणारा ठरलेला होता. त्याचे सलून मात्र एसी नव्हते. कोपर्यातील उभ्या अजस्त्र लोखंडी पंख्यांच्या जागी डोक्यावर चकचकीत फॅन फिरू लागणे, हाच काय तो गेल्या ६ वर्षातील बदल. वाढत्या महागाईला अनुसरून किंमती तेवढ्या वाढत होत्या, पण माझ्याकडून ५-१० रुपये कमीच घ्यायचा. नेहमीचा गिर्हाईक म्हणून..
पण मी त्याचा नेहमीचा गिर्हाईक बनून राहण्यास हेच एकमेव कारण नव्हते. तर त्याचा मालक फैय्याज! केस खूप भारी कापायचा. सर्वांचेच नाही कापायचा, पण माझे कापायचा. जिथे माझ्या दाट, राकट केसांसमोर कित्येक कलाकारांनी आपले हात टेकले होते, तिथे हा पूरेपूर न्याय द्यायचा. तो कधी दुकानावर दिसला नाही की मी आल्यापावली परत फिरायचो. इतका तो मला तोच लागायचा.
बोलायला तसा शांतच!, पण अध्येमध्ये आपले एक स्वप्न बोलून दाखवायचा. एसी सलून काढायचे.
पण ३ खुर्च्यांच्या त्या अडगळीत एक एसी बसवायला गेलो तर एक खुर्ची बाहेर यावी. मुंबईसारख्या शहरात जागा वाढवणे ही काही सोपी गोष्ट नव्हती. स्वप्न काही सहजी शक्य होणारे नव्हते..
आणि एक दिवस अर्धवटच सोडून गेला, मला न कळवताच..
वाईट वाटले!
हातात कौशल्य होते त्याच्या, पण खिशात भांडवल नव्हते. त्याच्या जाण्याने माझ्याही आयुष्यातील एक पर्व संपले याची जाणीव झाली. आता मला माझ्या केसांसाठी एक नवीन कारागीर शोधणे गरजेचे होते. जो मला एक नवीन केशभूषा देणार होता, एक नवीन रूप, एक नवीन व्यक्तीमत्व देणार होता.
एक साक्षात्कार झाला त्या दिवशी,
एक व्यक्ती, जिला स्वत:चे छोटेसे स्वप्न पुर्ण करणे शक्य झाले नाही, तिच्यावर आजवर माझे दिसणे, माझे व्यक्तीमत्व अवलंबून होते.
लहानपणापासून काही मध्यमवर्गीय लोकांनी माझा एक समज करून ठेवला होता. गाडीवरच्या पावभाजीला जी चव असते ती मोठमोठ्या फाईव्हस्टार हॉटेलमधील अन्नाला नसते. फक्त झगमगाटाचे आणि अदबशीर सर्विसचे पैसे लावतात. कालांतराने स्वत:च्या अनुभवातून तो निव्वळ गैरसमज होता हे समजले. तर, असाच काहीसा समज एसी सलूनच्या बाबतीत होता. फक्त महागड्या क्रिम्स आणि लोशनचे पैसे घेतात. पण खरी कला कात्री चालवणार्याच्या हातात असते, आणि नेमकी तिच तिथे नसते. म्हणून जरा सांशक मनानेच आत प्रवेश केला.
चार दिवसांनी गर्लफ्रेंडच्या मावसबहिणीच्या नणंदेचा साखरपुडा होता..
काय पण ते जवळचे नाते!
पण खरे नाते मैत्रीचे होते. ज्यांचे लग्न होते त्यांची सोशलसाइटवरची मैत्री, आणि त्यातून जुळलेले प्रेम. पण त्या दोन प्रेमी जिवांचे जुळवण्यात सर्वात मोठा हात माझा होता, नव्हे अश्या जुळवाजुळवीत माझा हातखंडाच होता. आणि थोडाफार हातभार माझ्या गर्लफ्रेंडचाही होता. त्यामुळे आम्हा दोघांना त्या दोघांकडूनही बोलावणे होते. प्रमुख पाहुण्यांच्या थाटात आम्ही उपस्थिती दर्शवणार होतो.
खास दिवसासाठी, खास माणूस म्हणून जाताना, दिसलेही खासच पाहिजे हे ओघानेच आले. गालावर वाढलेली दाढी साखरपुड्याच्या आदल्या दिवशीच उडवणार होतो, पण डोक्यावरच्या टोपल्याला चार दिवस आधीच हलके करूया म्हटले. मुद्दाम मधला दिवस पकडला जेणे करून गर्दी कमी भेटेल.
तर हे नव्याने उघडलेले एसी सलून!, सहापैकी तीन रिकाम्या खुर्च्या माझी वाट बघत होत्या. टिव्ही नजरेस पडेल अश्या बेताने खुर्ची पकडून बसलो. कारण कारागीर कोण कसा भेटणार, हे दैवाच्याच हवाले होते. सलूनच्या थाटाला साजेश्या खुर्च्या असल्याने बसल्याक्षणीच झोपावेसे वाटले. पण तरी डोळे तेवढे मिटून घेतले. डोक्यावरचे वाढलेले जंगल पाहता कोणाला काही सांगायच्या आधीच काय ते समजून कामाला सुरुवात झाली. नाही म्हणायला तत्पुर्वी "मिडीयम या छोटा?" हा प्रश्न तेवढा औपचारीकता म्हणून विचारून घेतला. काही गडबडीचे कापले तर पुन्हा इतर ठिकाणी जाऊन अॅडजस्ट करता येतील या हिशोबाने मी मिडीयमच म्हणालो. एकवार स्वत:ला आरश्यात डोळे भरून बघितले, आणि मिटले.
थोड्यावेळाने डोळे उघडले तर उजवी बाजू उरकून तो डाव्या बाजूला सरकला होता. डोक्यावरचे केस मात्र ‘जैसे थे’ च होते. नाही म्हणायला कानावर येणारे थोडे मागे सरले होते. अंगावर पांघरलेल्या कपड्यावर पाहिले तर पेटीतून आंबे काढताना गवताच्या चार पातळ कांड्या आजूबाजुला सांडाव्यात तश्या तुरळक केशराच्या कांड्या पसरल्या होत्या. माझ्याकडे बघत तो गूढ हसला. आणि म्हणाला, ठिक है ना सर, मिडीयम!
ज्याच्या हातात डोके आणि मान सोपवून निवांत डोळे मिटायचे होते त्याच्याशी हुज्जत घालण्यात अर्थ नव्हता. त्यामुळे विनम्रपणे त्याला समजावले, डोक्यावरचे केस वाढल्याने मला गर्मीचा त्रास सुरू झाला आहे. तर त्यामुळे आधी सवयीप्रमाणे मिडियम म्हणालो असलो, तरी आता शक्यतो जमेल तितके छोटेच कापायचे आहेत.
आता पुन्हा डोळे मिटायची चूक केली नाही. तो काय आणि कसे कापतो हे बघू लागलो. मगाशी त्याने काय कसे केले, हे ठाऊक नाही, पण आता पुन्हा पाणी शिंपडत त्याने माझे केस छानपैकी चापडून चोपडून भिजवून घेतले. तरीही त्यातून कंगवा फिरवताना तो अडकतच होता. "कसे कसे केस डोक्यावर घेऊन फिरतात लोकं" अश्या आशयाचा एक भाव त्याच्या चेहर्यावर स्पष्ट दिसत होता, मात्र माझ्याकडे थेट कटाक्ष टाकायचे तो टाळत होता. त्याचे सारे लक्ष माझ्या केसांवरच लागले होते आणि माझे समोरच्या आरश्यावर.
काहीतरी वेगळ्याच पद्धतीने त्याने माझ्या केसांवर हल्ला चढवला होता. उगाचच क्रिकेटमधील बॉडीलाईन अॅटेक आणि बुद्धीबळातील सिसीलीयन बचाव, वगैरे पेपरात वाचलेले शब्द आठवत होते. ज्या प्रकारे कानाजवळचे केस कापले होते आणि ज्या मापात टाळूवरचे केस कापत होता त्यांचा आपापसात काहीही ताळमेळ लागत नव्हता. एकीकडचे भर्रकन कापून मोकळा झाला होता आणि दुसरीकडचे कंगव्याने माप घेत घेत कापत होता. कुठल्या जन्माचं उट्टं काढत होता माहीत नाही पण मापं काढण्यासाठी जिथून केस वळवत होता तसा भांग मी आयुष्यात कधी पाडला नव्हता. बरं, हे सारे करत असताना मला काहीतरी विचारल्यासारखे दाखवत हलक्या आवाजात स्वत:शीच काहीतरी पुटपुटत होता. स्वत: करत असलेल्या पापात मलाही सहभागी करून घेत होता.
"भाईसाहब, नये हो क्या?", अखेर न राहवून मी त्याला म्हणालो.
तो पुन्हा जवळ येत माझ्या कानाजवळ काहीतरी कुजबुजला. मला पुन्हा ओ की ठो समजला नाही. तोंडात गुटखा भरलेले देखील यापेक्षा सुस्पष्ट बोलत असावेत.
"भाईसाहब, ये नये है क्या..?" हाच प्रश्न मी शेजारच्या कारागीराला विचारला.
"हम सभई नये है.." तो उत्तरला आणि आजूबाजुचे सारे हसले.
गिर्हाईकाशी थट्टा!, थोडक्यात मदतीला दुसर्या कोणाला बोलवावे हा मार्ग संपुष्टात आला होता. त्याने ज्या पातळीला माझे केस आणून ठेवले होते तिथून आता दुसरीकडे जात चूक सुधारायची म्हटल्यास झिरोची मशीन फिरवत मैदान साफ करणे हाच पर्याय उपलब्ध होता.
आपण या परिस्थितीत हतबल झालो आहोत हे स्वत:च्या मनाला बजावत मी पुन्हा एकदा खुर्ची सरसावून निवांत बसलो. समोर आरश्यात जे घडताना दिसत होते ते उघड्या डोळ्यांनी बघत राहिलो. मध्येच तो पुन्हापुन्हा माझ्या कानाशी येऊन काहीतरी कुजबुजत होता, पण ते ऐकण्याच्या प्रयत्न करण्याऐवजी त्याचा चेहरा जवळ आल्यावर त्याची दाढी टोचणार तर नाही ना, याचीच भिती मला जास्त सतावत होती. त्याचे स्वत:चे केस पाहिले तर ते मात्र सुरेख कापले होते. पण याचा अर्थ ते त्याने स्वत:च कापले होते असा होत नव्हता. ईतर कारागीरांचेही केस पाहिले तर ते देखील आधुनिक आणि स्टायलिश दिसत होते. ‘नक्की कुठून कापून आला आहात?’ असे त्यांना विचारायचा मोह होत होता. आणि इतक्यातच कंगवा-कात्री समोरच्या टेबलावर आदळल्याचा आवाज झाला.
माझे केस कापून झाले होते. बहुधा..
विस्कटलेल्या, किंबहुना वेगळ्याच दिशेने फिरवलेल्या भांगामुळे काही अंदाज येत नव्हता. चंपक, झंपक, चमन, चिल्ली.. यापैकी कोणत्या नावाने माझी ग’फ्रेंड माझे स्वागत करणार होती याचाच विचार डोक्यात चालू होता. पण त्याहीपेक्षा या विचित्र अवतारात माझ्याबरोबर कुठे जायचे म्हणत तिने माझा जीवच घेतला असता याचेच टेंशन जास्त येऊ लागले होते. ....आणि त्याचवेळी मधोमध कंगवा रोवत त्याने माझे केस सेट करायला सुरुवात केली. थोडेसे जेल देखील केसांना लावले होते, जेणेकरून तो थांबवेल तिथे ते थांबत होते. बघता बघता त्याने माझ्या केसांना असा काही आकारउकार दिला की मी अवाक होत बघतच राहिलो.
सह्ही! (बोलीभाषेत सुभानअल्लाह!) हा एकच शब्द नकळत माझ्या तोंडातून बाहेर पडला. जणू हि केशरचना खास माझ्या चेहर्यासाठीच बनली होती, आणि त्याने ती पहिल्याच नजरेत हेरून त्याला मुर्त स्वरूप दिले होते. एवढा वेळ जो ईसम मला मुखदुर्बळ आणि आत्मविश्वासाचा अभाव असलेला वाटत होता, तोच अचानक मला विनम्र स्वभावाचा कलाकार वाटू लागला.
गेले ५-६ वर्षे मी जसा दिसत होतो त्याहीपेक्षा सुंदर दिसू शकतो याचा आनंद साजरा करावा, की गेले ५-६ वर्षे स्वत:च्याच केसांना दोष देत मी ऐन तारुण्यातील काळ सुमार दिसण्यात वाया घालवला याचे वैषम्य वाटावे हे समजेनासे झाले. त्याचा चेहरा अजूनही तसाच शांत निश्चल होता, पण माझ्या चेहर्यावर त्याच्याप्रती आदराची भावना उमटली होती.
कोणाच्या जाण्याने आपले आयुष्य थांबत नाही हे मला आज समजले होते..
कोणाबद्दलही अंदाज बांधायची फार घाई करू नये हा धडा मला आज मिळाला होता..
निव्वळ केशरचना बदलल्यास एकंदरीत दिसण्यात किती आमूलाग्र बदल घडू शकतो हे मी आज अनुभवत होतो..
एसी सलूनबाबत असलेला आणखी एक गैरसमज दूर करत,
आयुष्यात पहिल्यांदाच मी एका केशकर्तनालयातून टिप देत बाहेर पडत होतो..
- ऋन्मेऽऽष
.
.
छान लिहिलं आहे
छान लिहिलं आहे
हे मगाशी वाचलं होतं! छान
हे मगाशी वाचलं होतं! छान लिहिलं आहे.
ऋन्मेष, बरेच दिवसानी
ऋन्मेष, बरेच दिवसानी लिहीलेस रे. पण मस्त आहे. आवडले मनापासून.
आवडलं! इथे टाकलसं ते चांगलच
आवडलं! इथे टाकलसं ते चांगलच पण एखाद्या नियतकालिकाकडे दिले असतेस तर जास्त लोकांना तुझ्या अनुभवात सहभागी होता आले असते
छान लिहीलंय. पण ते जेल धुवून
छान लिहीलंय.
पण ते जेल धुवून गेल्यावरही तो सुंदर गोजिरा इफेक्ट राहिला का?
साती
साती
धन्यवाद प्रतिसाद, मनीमोहोर,
धन्यवाद प्रतिसाद,
मनीमोहोर, हो बरेच दिवसांनी बिझी वीक होता हा..
हे घडले तेव्हाच लिहिता आले नाही. त्यामुळे उत्स्फुर्त न येता रखडल्याचा फील तर येणार नाही ना याची भिती होती. पण तेव्हा मनात आलेल्या विचारांवर ठाम होतो म्हणून लिहिलेच.
सीमंतिनी, कुठल्या नियतकालिकाकडे पोहोच नाहीये माझी, छोटुसं असतं तर व्हॉट्सपवर टाकले असते
साती, अगदी तसाच पॉलिश लूक नाही राहीला तरी शेप तसाच राहतो. याउपर जेलच्या ऐवजी हलक्या हाताने तेल चोळूनही बरेपैकी स्थिर ठेऊ शकतो.... बहुधा.... मी ते करत नाही.
माझ्या केसांचा गुण म्हणा वा अवगुण म्हणा, माझी सवय म्हणा वा माझा दोष म्हणा, मी साधारण दहावीच्यानंतर कंगवा वापरणे सोडलेय ते आजवर... बस्स, हाताची बोटे झिंदाबाद. अगदी सकाळी आंघोळ करून आल्यावरही आधी डोके साफ पुसून घेतो आणि मग हात थोडेसे ओले करून केसांतून हवे तसे फिरवून घेतो. दोन मिनिटात सुकतात आणि तस्सेच्या तसे बसून राहतात. सुसाट वार्याचा एक्स्टर्नल फोर्स त्यावर आला तरच डगमगतात. अधूनमधून एखादा केस हललाच तर अधूनमधून माझी केसांतून हात फिरवायची सवय कामी येतेच
याउपर माझ्या केसांवर (किंवा केस + दाढीमिशीवर) लिहिण्यासारखे बरेच किस्से अनुभव आहेत, मूड लागल्यास कधीतरी लिहेन नक्की ..
आवडलं.
आवडलं.
छान लिहिलंय !
छान लिहिलंय !
आवडलं.. मस्तं लिहिलय
आवडलं.. मस्तं लिहिलय
ऋन्मेष..छान लिहिलं आहे.
ऋन्मेष..छान लिहिलं आहे.
धन्यवाद, दाद, चंबू, दिनेशदा,
धन्यवाद, दाद, चंबू, दिनेशदा, अदिती
छान आहे, आवडलं.. खर्रय, नवीन
छान आहे, आवडलं.. खर्रय, नवीन पार्लर, सालोन मधे शिरताना खूप शंका(रादर..कुशंका !!) भेडसवतात
मस्त लिहिलंयस..
छान लिहिलयं.
छान लिहिलयं.
ऋ, आवडलं. कोणाच्या जाण्याने
ऋ, आवडलं.
कोणाच्या जाण्याने आपले आयुष्य थांबत नाही हे मला आज समजले होते..
कोणाबद्दलही अंदाज बांधायची फार घाई करू नये हा धडा मला आज मिळाला होता..>>>>>>>>>>>>सत्यवचन.
छान लिहिलं आहे!! कोणाबद्दलही
छान लिहिलं आहे!!
कोणाबद्दलही अंदाज बांधायची फार घाई करू नये हा धडा मला आज मिळाला होता.. >> हे आवडलं
वर्षूदी, नरेश, सस्मित,
वर्षूदी, नरेश, सस्मित, सुमुक्ता, धन्यवाद
मस्त! आवडलं मिळालेले धडेही
मस्त! आवडलं
मिळालेले धडेही आवडले.
लेख छान आहे. आवडलाच. तुमच्या
लेख छान आहे. आवडलाच.
तुमच्या केसांची वाट नाही लागली हे वाचून बरं वाटलं.
माझा अनुभव फार वाईट होता नवीन पार्लरचा. माझ्या केसांची तिने अशी वाट लावली होती की माझ्या आईला पण माझ्याकडे बघवेना. शेवटी आईने कात्री घेतली अन् जितके व्यवस्थित दिसू शकतील तितके कापून त्यांना आकारात आणले होते.
छान.. आवडलं. गप्पा(२) कधी ??
छान.. आवडलं. गप्पा(२) कधी ??
मला पण आवडल. मस्त लिहिलंयस.
मला पण आवडल. मस्त लिहिलंयस.
छान लिहिलयं
छान लिहिलयं
शेवटी आईने कात्री घेतली अन्
शेवटी आईने कात्री घेतली अन् >> माझ्या शेजारच्या मित्राचे असे कात्रीने कराकरा केस त्याच्या आईने कापलेले लहानपणी, कारण त्याचे तिच्या मर्जीविरुद्ध वाढलेले केस .. त्यांच्या घराच्या बाहेर कॉमन गॅलरीतच हा कार्यक्रम झालेला त्यामुळे आम्हा सर्व मित्रमंडळींना लाभ घेता आलेला
नाठाळ, गप्पा २ येईलच असे नाही, मला सवय आहे अशी जागा बनवून ठेवायची, जेणेकरून लिहायची उर्मी कायम राहते
छान लिहीलंय. गर्लफ्रेण्डला
छान लिहीलंय.
गर्लफ्रेण्डला काडीमोड देऊन टाका आता.. रसभंग करतेय.
छान लिहीलंय, ऋन्मेष.
छान लिहीलंय, ऋन्मेष.
रमड, धन्यवाद बाळू, ग'फ्रेंडला
रमड, धन्यवाद
बाळू, ग'फ्रेंडला काडीमोड प्रत्यक्ष आयुष्यात देणे तर शक्य नाही, आणि आयुष्यात आहे तर त्यावरच लिहिलेल्या लेखांतही येणारच, पण तरीही रसभंग होणार नाही याची काळजी घेईन
छान लिहिलय.
छान लिहिलय.
धन्यवाद असामी
धन्यवाद असामी
ग'फ्रेंडला काडीमोड प्रत्यक्ष
ग'फ्रेंडला काडीमोड प्रत्यक्ष आयुष्यात देणे तर शक्य नाही, आणि आयुष्यात आहे तर त्यावरच लिहिलेल्या लेखांतही येणारच, पण तरीही रसभंग होणार नाही याची काळजी घेईन >>> अत्यंत आभारी आहे आपला. पण जर पुन्हा रसभंग केलाच तर वहीनींना नाव सांगण्यात येईल याची नोंद घ्यावी.
Pages