Technically तेच आकाश आहे ना? तो चंद्रही तोच आहे..सूर्य, तारे सगळंच. वारा तोच, पाणी तेच. एक धरती सोडली तर सारी पंचमहाभूतं तीच आहेत. अर्थात technically माती देखील तीच. पण मग हे असं का होतंय? एखादया मुलाच्या पुढे चॉकलेट असावं आणि घ्यायला हात पुढे केला तर एकदम ते नाहीसं होऊन त्या जागी भलतीच वस्तू निघावी असं..
ओळखीच्या सुरात वाहतोय वारा पण तरीही काहीतरी वेगळं आहे..बऱ्याच नवीन गोष्टी आहेत आणि अनेक गोष्टी missing आहेत! वारा वाहतोय खरा सुरात पण त्याला साथ देणारे कोकिळेचे स्वर नाहीयेत...अगदी तस्संच दिसतंय आकाश पण..लालभडक फुललेला गुलमोहर कुठाय? वर आकाशाकडे पाहणारा?..पिंपळाच्या नाजूक, कोवळ्या पानांची सळसळ कुठंय?..पानामागे दडून बसलेल्या लाजऱ्या-बुजऱ्या कैऱ्या कुठाएत?
आज काय झालंय मला? कसले कसले भास होताएत...ऐन चैत्रातला वसंत मनात लपंडाव का खेळतोय? उघड्या डोळ्यांसमोर कधीचे क्षण पुन्हा पुन्हा उभे राहताएत ..या पण आठवणीच पण क्षणांच्या!
तो शनिवारातल्या आत्याच्या घरासमोरचा पिंपळ..कसा दरवर्षी नाजूक तांबूस पानांनी भरून जायचा बघता बघता..आणि जाईची वेल फुलू लागायची..परीक्षा तोंडावर आलेली..पुस्तकात डोकं घालून खिडकीत बसलेलं असताना श्वासोच्छवासाबरोबर जाईचा सुगंध नकळत येजा करायचा (आत्ताही मला जाणवतोय तो सूक्ष्म गंध!) आणि तो फुलचुख्या, न चुकता त्या जाईच्या वेलावर घरटं बांधणारा! रसिकच असला पाहिजे तो! त्याची शीळ ऐकू आली की हातातलं पुस्तक विसरून किती वेळ मी त्याची लगबग पहात बसायचे..सुखी होता बिचारा..परीक्षा वगैरे काही नसायचं त्याला!
आणि पळसदरीच्या अलीकडचा "तो"! लोकलमधून दिसणारा..मला नाव पण माहिती नाही त्याचं..दुरूनच सारं! पण त्या ३ वर्षांतली माझ्या मनातली सारी गुपितं माहिती आहेत त्याला..मीच सांगायचे! त्याला बघितल्याशिवाय एकही मुलुंड-खोपोली प्रवास केला नाही मी. प्रत्येक ऋतू मध्ये पाहायचे त्याला. पण आत्ता सगळ्यात सुंदर दिसत असेल तो..नव्या पालवीने नटलेला! एकदा तरी फोटो काढायचा होता त्याचा..राहूनच गेला!
आणि बडोद्याच्या हॉस्टेलच्या दारातला बकुळ! K.G. हॉलमध्ये राहिलेल्या कोणत्याही मुलीला विचारा..आठवेलच तिला तो! त्याच्या सावलीत बसून कोणी ना कोणीतरी त्या झोपाळ्यावर झोके घेत असायचं कायम! मला अजून आठवतंय..नवीन नवीन असताना अचानक बकुळीचा वास आला आणि "तो" सापडला तो क्षण! अगदी घरंच माणूस भेटल्याचा आनंद झाला होता मला त्या क्षणी! "बडोद्यात" बकुळीचं झाड मिळाल्याचा आनंद झाला होता मला! जणू बकुळीचं झाड ही केवळ महाराष्ट्राचीच मालमत्ता होती! रात्री जेवण झाल्यावर roll call पूर्वी त्या झोपाळ्यावर घेतलेले झोके आणि वाऱ्याच्या झुळूकांसोबत येणारा बकुळीचा मंद सुवास!Department मधून दमूनभागून परत आल्यावर त्याच्याच पारावर टेकून प्यायलेला चहा! कुणीतरी senior, जुनीजाणती व्यक्ती असावी ना तसं जाणवतं मला त्याचं अस्तित्वं!
आज हा वारा असा वाहतोय की जणू या साऱ्या आठवणी सोबत आणतोय! मी miss करतेय या माझ्या सगळ्या मित्रांना/सोबत्यांना! जेव्हा त्यांच्याबरोबर होते तेव्हा वाटत होतं त्यापेक्षा खूप काही जास्ती आहे त्यांचं अस्तित्व माझ्यासाठी...जाणवतंय मला ते आजही, इतक्या हजारो मैलांच्या अंतरातूनही!
आणि इकडे त्यांच्या आठवणीने करमेनासं होतंय! नवल आहे ना... कधी जाणवलं कसं नाही मला की किती जीवापाड प्रेम आहे माझं या साऱ्या निसर्गावर! माझ्या देशातल्या प्रत्येक फुलापानावर, मातीवर, दगडधोंड्यांवर! थोडीशी जाणवतेय आज सहवेदना..आपला देश/गाव सोडून बाहेर पडलेल्यांची. आपल्या देशात/गावात राहणारी फक्त माणसंच आपली नसतात.. .ही सारी सृष्टी आपली असते! आता ती सुंदर असते आणि आपली असते की ती "आपली" असते म्हणून सुंदर असते? कठीणच आहे सांगणं!
आज मुद्दामून घराबाहेर येऊन बसलेय. ही सुंदर संध्याकाळ अनुभवायला, माझ्या देशातल्या संध्याकाळच्या/वसंतातल्या आठवणींमध्ये रमून जायला...
मगाचपासून माझं लक्ष जातंय..पाहतेय मी त्याला..आणि का कोण जाणे तोही पाहतोय असंच वाटतंय...तशी ओळख आहे आमची गेली अडीच वर्षं. आमच्याच दारात उभा असतो कायम. परवा त्याच्या गोड, नव्या हिरव्या पानांचं कौतुकपण केलं होतं थांबून! आमची आता मैत्री होत्येय बहूतेक! त्याच्याशी, त्याच्या अंगाखांद्यावर बागडणाऱ्या खारुताईशी!
उद्या जेव्हा मी इथे नसेन..कुठे असेन काय माहिती! पण कदाचित अशीच एक संध्याकाळ असेल..तेव्हा राजा, मला तुझी आठवण नक्की येईल! तुझ्यापासून कितीही दूर असले तरीही!
हा लेख माहेर मासिकाच्या मे २०११च्या अंकात प्रसिद्ध झाला होता. मायबोलीवर पुनर्प्रकाशित करण्याची परवानगी दिल्याबद्दल मासिकाच्या संपादिका सुजाता देशमुख यांचे आभार.
कविता फार छान आहे. अश्या
कविता फार छान आहे. अश्या फुलांवरच्या कविता कुठे मिळतील. जसे बकुळी, गुलाब, मोगरा जाईजुई, केवडा चंदन इत्यादि. संकलन करून प्रत्येक कागदाला तसे सुगंध लावून ठेवुन देईन. एक वही बनवून.
जिज्ञासा, कवितावाचन बहुधा
जिज्ञासा,
कवितावाचन बहुधा नेटवर नाही, व्यावसायिक सी डी वगैरेही नाहीच बहुतेक. मला अश्याच मित्राकरवी मिळाल्या आहेत. पु ल आणि सुनीताबाई यांचा बोरकरांवरचा एक तासाभराचा कार्यक्रम ("दिसली नसतीस तर"...ही कविता भन्नाट वाचली आहे बाईंनी) आणि सुनीताबाईंनी एकट्याने म्हणलेल्या चार पाच कविता...अशा फाईल्स आहेत.
सुंदर लेख...
सुंदर लेख...
सुंदरच! कित्ति ओघवतं आणि
सुंदरच! कित्ति ओघवतं आणि मनाला भिडणारे लिखाण! स्वित्झर्लंड एव्हढा सुंदर देश, पण कधी कधी घरी जाताना संध्याकाळी अचानक घरच्या आठवणीनं मन कासावीस व्हायचं, आणि निमित्त देखिल अगदी छोटंसंच असायचं काहीस. कधी कधी एखादा रस्त्यावरचा लाईट पाहुन, तुळशीसमोरच निरांजन देखील आठवायचं!
जिज्ञासा मी एक सुन्दर
जिज्ञासा मी एक सुन्दर झाडान्ची कविता काव्य विभागात टाकली आहे सर्व निगप्रेमीनी ती वाचावी अशी विनंती
निसर्गप्रेमीना नवर्षाच्या पालवत्या शुभेच्छा...
http://www.maayboli.com/node/53188
खूपच सुरेख लिहिलंय , शशांकराव
खूपच सुरेख लिहिलंय , शशांकराव कविता दिलीत हे फार छान केलात , आभार !
Hi Jidnysa, tu Jnana
Hi Jidnysa, tu Jnana Prabodhinit hotis ka???? Shalet he kavita shikveleli, maazi prancband aavadichi........
Btw khup chane lihil aahes, rather rasgrahan kelyasarkh watal......
https://youtu.be/i5_jgK1ggkM
जिज्ञासा,
https://youtu.be/i5_jgK1ggkM
सुंदर ओघवत लिहिलंय..
सुंदर ओघवत लिहिलंय..
@ देवकी, कवितेसाठी धन्स..
Jollyjui, धन्यवाद! हो, मी
Jollyjui, धन्यवाद! हो, मी प्रबोधिनीची माजी विद्यार्थीनी आहे. अनुराधाताईंनी शिकवली होती ही कविता आम्हाला तू पण प्रबोधिनीत होतीस का?
देवकी, अहा! सुनीताबाईंनी सादर केलेली कविता! या लिंकसाठी मनापासून आभार!
मन्या S, धन्यवाद!
Pages