चाफ्याच्या झाडा, चाफ्याच्या झाडा...

Submitted by जिज्ञासा on 16 March, 2015 - 19:07

Technically तेच आकाश आहे ना? तो चंद्रही तोच आहे..सूर्य, तारे सगळंच. वारा तोच, पाणी तेच. एक धरती सोडली तर सारी पंचमहाभूतं तीच आहेत. अर्थात technically माती देखील तीच. पण मग हे असं का होतंय? एखादया मुलाच्या पुढे चॉकलेट असावं आणि घ्यायला हात पुढे केला तर एकदम ते नाहीसं होऊन त्या जागी भलतीच वस्तू निघावी असं..

ओळखीच्या सुरात वाहतोय वारा पण तरीही काहीतरी वेगळं आहे..बऱ्याच नवीन गोष्टी आहेत आणि अनेक गोष्टी missing आहेत! वारा वाहतोय खरा सुरात पण त्याला साथ देणारे कोकिळेचे स्वर नाहीयेत...अगदी तस्संच दिसतंय आकाश पण..लालभडक फुललेला गुलमोहर कुठाय? वर आकाशाकडे पाहणारा?..पिंपळाच्या नाजूक, कोवळ्या पानांची सळसळ कुठंय?..पानामागे दडून बसलेल्या लाजऱ्या-बुजऱ्या कैऱ्या कुठाएत?

आज काय झालंय मला? कसले कसले भास होताएत...ऐन चैत्रातला वसंत मनात लपंडाव का खेळतोय? उघड्या डोळ्यांसमोर कधीचे क्षण पुन्हा पुन्हा उभे राहताएत ..या पण आठवणीच पण क्षणांच्या!
तो शनिवारातल्या आत्याच्या घरासमोरचा पिंपळ..कसा दरवर्षी नाजूक तांबूस पानांनी भरून जायचा बघता बघता..आणि जाईची वेल फुलू लागायची..परीक्षा तोंडावर आलेली..पुस्तकात डोकं घालून खिडकीत बसलेलं असताना श्वासोच्छवासाबरोबर जाईचा सुगंध नकळत येजा करायचा (आत्ताही मला जाणवतोय तो सूक्ष्म गंध!) आणि तो फुलचुख्या, न चुकता त्या जाईच्या वेलावर घरटं बांधणारा! रसिकच असला पाहिजे तो! त्याची शीळ ऐकू आली की हातातलं पुस्तक विसरून किती वेळ मी त्याची लगबग पहात बसायचे..सुखी होता बिचारा..परीक्षा वगैरे काही नसायचं त्याला!

आणि पळसदरीच्या अलीकडचा "तो"! लोकलमधून दिसणारा..मला नाव पण माहिती नाही त्याचं..दुरूनच सारं! पण त्या ३ वर्षांतली माझ्या मनातली सारी गुपितं माहिती आहेत त्याला..मीच सांगायचे! त्याला बघितल्याशिवाय एकही मुलुंड-खोपोली प्रवास केला नाही मी. प्रत्येक ऋतू मध्ये पाहायचे त्याला. पण आत्ता सगळ्यात सुंदर दिसत असेल तो..नव्या पालवीने नटलेला! एकदा तरी फोटो काढायचा होता त्याचा..राहूनच गेला!

आणि बडोद्याच्या हॉस्टेलच्या दारातला बकुळ! K.G. हॉलमध्ये राहिलेल्या कोणत्याही मुलीला विचारा..आठवेलच तिला तो! त्याच्या सावलीत बसून कोणी ना कोणीतरी त्या झोपाळ्यावर झोके घेत असायचं कायम! मला अजून आठवतंय..नवीन नवीन असताना अचानक बकुळीचा वास आला आणि "तो" सापडला तो क्षण! अगदी घरंच माणूस भेटल्याचा आनंद झाला होता मला त्या क्षणी! "बडोद्यात" बकुळीचं झाड मिळाल्याचा आनंद झाला होता मला! जणू बकुळीचं झाड ही केवळ महाराष्ट्राचीच मालमत्ता होती! रात्री जेवण झाल्यावर roll call पूर्वी त्या झोपाळ्यावर घेतलेले झोके आणि वाऱ्याच्या झुळूकांसोबत येणारा बकुळीचा मंद सुवास!Department मधून दमूनभागून परत आल्यावर त्याच्याच पारावर टेकून प्यायलेला चहा! कुणीतरी senior, जुनीजाणती व्यक्ती असावी ना तसं जाणवतं मला त्याचं अस्तित्वं!

आज हा वारा असा वाहतोय की जणू या साऱ्या आठवणी सोबत आणतोय! मी miss करतेय या माझ्या सगळ्या मित्रांना/सोबत्यांना! जेव्हा त्यांच्याबरोबर होते तेव्हा वाटत होतं त्यापेक्षा खूप काही जास्ती आहे त्यांचं अस्तित्व माझ्यासाठी...जाणवतंय मला ते आजही, इतक्या हजारो मैलांच्या अंतरातूनही!

आणि इकडे त्यांच्या आठवणीने करमेनासं होतंय! नवल आहे ना... कधी जाणवलं कसं नाही मला की किती जीवापाड प्रेम आहे माझं या साऱ्या निसर्गावर! माझ्या देशातल्या प्रत्येक फुलापानावर, मातीवर, दगडधोंड्यांवर! थोडीशी जाणवतेय आज सहवेदना..आपला देश/गाव सोडून बाहेर पडलेल्यांची. आपल्या देशात/गावात राहणारी फक्त माणसंच आपली नसतात.. .ही सारी सृष्टी आपली असते! आता ती सुंदर असते आणि आपली असते की ती "आपली" असते म्हणून सुंदर असते? कठीणच आहे सांगणं!

आज मुद्दामून घराबाहेर येऊन बसलेय. ही सुंदर संध्याकाळ अनुभवायला, माझ्या देशातल्या संध्याकाळच्या/वसंतातल्या आठवणींमध्ये रमून जायला...
मगाचपासून माझं लक्ष जातंय..पाहतेय मी त्याला..आणि का कोण जाणे तोही पाहतोय असंच वाटतंय...तशी ओळख आहे आमची गेली अडीच वर्षं. आमच्याच दारात उभा असतो कायम. परवा त्याच्या गोड, नव्या हिरव्या पानांचं कौतुकपण केलं होतं थांबून! आमची आता मैत्री होत्येय बहूतेक! त्याच्याशी, त्याच्या अंगाखांद्यावर बागडणाऱ्या खारुताईशी!
उद्या जेव्हा मी इथे नसेन..कुठे असेन काय माहिती! पण कदाचित अशीच एक संध्याकाळ असेल..तेव्हा राजा, मला तुझी आठवण नक्की येईल! तुझ्यापासून कितीही दूर असले तरीही!

हा लेख माहेर मासिकाच्या मे २०११च्या अंकात प्रसिद्ध झाला होता. मायबोलीवर पुनर्प्रकाशित करण्याची परवानगी दिल्याबद्दल मासिकाच्या संपादिका सुजाता देशमुख यांचे आभार.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चाफ़्याच्या जादूवर आणि अस्तित्त्वावर फ़ुलून गेलेले मन आणि त्या निमित्ताने निसर्गातील फ़ुलदेणगीची अत्यंत सुंदर, मनोभावी आणि जुन्या स्मृतीने वेढून गेलेल्या लावण्यमहोत्सवी आठवणींची ही पाने वाचताना वाचकालाही तितक्याच ओढीने त्या सौंदर्याकडे खेचून नेण्याची क्षमता या लेखात अतिशय नाजूकपणे उमटली आहे, त्याबद्दल जिज्ञासा यांच्या लेखणीला आणि स्मरणशक्तीला दाद दिली पाहिजे.

जाई, जुई, चमेली, बकुळी, चाफा.....आणि तो जादूसारखा सदैव सोबत करणारा गुलमोहोर....यांच्याविषयी वाचताना मन एकदम हलके होऊन गेले....सारा लेख म्हणजे फ़ुलांच्या कमालीची एक दीर्घ कविताच झाली आहे....नेहमी हवीहवीशी वाटणारी.

खरं आहे. Happy

आपल्या देशात/गावात राहणारी फक्त माणसंच आपली नसतात.. .ही सारी सृष्टी आपली असते! आता ती सुंदर असते आणि आपली असते की ती "आपली" असते म्हणून सुंदर असते? कठीणच आहे सांगणं! >> +१

आपल्या भारतीय झाडांबद्दल इतकं ममत्व असलेली माणसं दुर्मिळ होत चाललीयेत हल्ली .
माझ्या बरयाच कवितांचा तो विषय आहे .ते गाव ,ती माती आणि ती ओढाळ झाडे . खूप मनापासून लिहीलय तुम्ही .

व्वा जिज्ञासा ..फार रसिकतेने न्याहाळला आहेस तू परिसर, जीव लावला आहेस झाडापानाफुलांना. तुझ्यासारखी माणसं खरंच दुर्मिळ असतात . अगदी रोजच्या रस्त्याने जातानाही झाडांची खुशाली घेत जाणारी, एका वेगळ्या विश्वात हरवलेली.

सगळ्यांचे मनापासून आभार!
हा लेख लिहून आता ४ वर्ष झाली..ह्या चार वर्षांत इथला निसर्ग देखिल ओळखीचा झाला आहे. इथल्या ऋतुचक्राची सवय होऊ लागली आहे आणि नवीन दोस्त मिळाले आहेत! हा लेख पुन्हा आठवला कारण सध्या ऑस्टिनमधे अवतरलेला वसंत ऋतू! लेख पुन्हा वाचताना जाणवलं की चार वर्षांपूर्वी लेखातलं ते शेवटचं वाक्य लिहिताना जे wishful thinking होतं ते खरं झालंय! मी कुठेही गेले तरी ही माझी नवी दोस्तमंडळी कायम आठवणीत राहणार आहेत माझ्या!

अजून एक! ह्या लेखाच्या शीर्षकाचं उचित श्रेय दिले नाही आणि आभार मानले नाहीत तर ते योग्य ठरणार नाही! कवयित्री पद्मा गोळे यांची "चाफ्याच्या झाडा" ही नितांतसुंदर कविता ह्या लेखाच्या शीर्षकाची प्रेरणा आहे.

ही नितांतसुंदर कविता इथे द्यायचा मोह टाळता येत नाहीये - (अर्थातच लेखिकेची आणि वेमांची परवानगी - कॉपीराईटच्या नियमावलीच्या दृष्टीने - असेल तरच ....)

चाफ्याच्या झाडा ….
का बरे आलास आज स्वप्नात?
तेव्हाच तर आपले नव्हते का ठरले?
दु: ख नाही उरलं आता मनात
फुलांचा पांढरा, पानांचा हिरवा
रंग तुझा रंगतोय माझ्या मनात
केसात राखडी पण पायात फुगडी
मी वेडी भाबडी तुझ्या मनात
चाफ्याच्या झाडा ….
नको ना रे पाणी डोळ्यात आणू
ओळख़ीच्या सुरात, ओळखीच्या तालात
हादग्याची गाणी नको म्हणू
तुझ्या चाळ्यात एक पाय तळ्यात
एक पाय मळ्यात खेळलोय ना
जसे काही घोड्यावर
तुझ्याच फांद्यांवर बसून
आभाळात हिंडलोय ना
चाफ्याच्या झाडा …. चाफ्याच्या झाडा ….
पानात, मनात खुपतंय ना
काहीतरी चुकतंय, कुठेतरी दुखतंय
तुलाही कळतंय …. कळतंय ना ….
चाफ्याच्या झाडा…. चाफ्याच्या झाडा
हसून सजवायचं ठरलय ना
कुठं नाही बोलायचं, मनातच ठेवायचं
फुलांनी ओंजळ भरलीये ना

– पद्मा गोळे.

फार सुरेख, अलवार लिहिलंय. सकाळीच वाचले होते पण गडबडीत मस्त..वा वा इतकेच लिहून पुढे जावेसे वाटे ना!
एका अर्थी बरेच झाले, उपसंहारही समजला.
झाडं फार दैवी असतात, काही न बोलता काही न दाखवता आपली दुःखं, गुपितं, वेदना शोषून घेतात. आपल्यासोबत फुलतात, आनंदाने मोहोरतात. समुद्र आणि खुणेची झाडे अगदी समुपदेशकासारखेच.

कोल्हापूरच्या शिक्षणतज्ञ लीलाताई पाटील सृजन आनंद शिबिरासाठी बऱ्याचदा खेडोपाडी प्रवासात असायच्या. मोबाईल इ. नसतानाच्या त्या काळात संध्याकाळी आवर्जून त्या आभाळाकडे पाच मिनिटे स्तब्ध पहात बसायच्या. बरेचदा विचारल्यावर त्यांनी सांगितले होते, "माझ्या पतीशी माझा आभाळाचा करार आहे, कुठेही असलो तरी या सर्वव्यापी आकाशाद्वारे आम्ही एकमेकांना भेटतो", त्याचीही आठवण आली हे वाचून!

शीर्षकामुळे कविताही ऐकली गेली परत. पु.ल. गेल्यावर सुनीताबाईंनी एका कवितावाचनात म्हणलेली. पहिल्या चाफ्याच्या झाडा...नंतर बाई आवंढा गिळतात, तेव्हा आपला घसाही दुखतो क्षणभर!

असं बरंच काही जागवणारा लेख .... Happy

आहाहा !! अगदी मलाही आत्ता थोडफार असच वाटतंय पण शब्दात मांडता आलं नसतं मला ते ..तुम्ही अगदी हळुवारपणे उलगड्ल्यात मनातील सच्च्या भावना ..

शशांकजी, माझी काहीच हरकत नाही! पण कॉपीराईटच्या दृष्टीने योग्य आहे का ते मला माहिती नाही. मला अजूनही बरीचशी पाठ आहे ही कविता त्यामुळे वाचताना पुन्हा एकदा उजळणी झाली Happy

अमेय२८०८०७, << झाडं फार दैवी असतात, काही न बोलता काही न दाखवता आपली दुःखं, गुपितं, वेदना शोषून घेतात. आपल्यासोबत फुलतात, आनंदाने मोहोरतात. समुद्र आणि खुणेची झाडे अगदी समुपदेशकासारखेच.>>अगदी अगदी!
सुनिताबाईंचे कविता वाचन आंतरजालावर उपलब्ध आहे का किंवा त्याची सीडी आहे का? मला कुठे मिळेल? अगदी आत्ता ऐकावसं वाटतंय!

बाकी सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार!

जिज्ञासा, अतिशय मनापासून लिहिलंयस म्हणूनच इथवर पोचलंय.. खूप सुंदर, छान छान , सुवासिक वाटत राहिलं वाचताना,, Happy

शशांक ने कविता इथे देऊन सोने पे सुहागा च चढवलाय !!!!

Pages