विपूतल्या पाककृती ५ : कणकेचा शिरा

Submitted by तृप्ती आवटी on 11 March, 2015 - 22:01
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

_१ वाटी रवाळ कणीक
_लिपिड प्रोफाइल बघून पाव ते अर्धी वाटी साजुक तूप
_१ वाटी फुल फॅट गरम दूध + शिपके मारून शिजवायला लागेल तसं
_वेलदोडा पावडर
_पाव वाटी खडबडीत बदाम पावडर
_अर्धी वाटी किसलेला गूळ

क्रमवार पाककृती: 

- जाड बुडाच्या कढईत कणीक आधी कोरडीच, मंद आचेवर भाजायला घ्यायची.
- टीपाप्यात चार पोस्टी टाकायच्या. सटरफटर बाफं वाचायचे. अधेमधे कणकेला ढवळत रहायचं. चांगली अर्धा तास भाजून झाली की आता थोडं थोडं तूप ओतून भाजायची.
- सगळं तूप ओतून झाल्यावर कणीक कोरडी दिसायला नको. तशी दिसली तर (लि.प्रो. नुसार) चमचाभर तूप घालायचं.
- कढत दूध थोडं थोडं ओतून कणीक फुलवायची. सगळं भस्सकन ओतलं तर एक विचित्र गोळा तयार होईल आणि त्याचा गाभा गुळाचा अनुल्लेख करेल.
- झाकण ठेवून शिजू द्यायची.
- गूळ, वेलदोडा पावडर घालून परतायचं.
- गूळ वितळून लगदा होईल. पण धीर न सोडता लगदा परतायचा, त्यात बदामपूड घालायची.
- लापशीछाप आवडत असेल तर आत्ताच खायला घ्यायचा. नाहीतर थोडा आणखी परतायचा.

photo_0.JPG

वाढणी/प्रमाण: 
इतर मेन्युसोबत गोड पदार्थ म्हणून असेल तर ३-४
अधिक टिपा: 

_सुजाता मल्टिग्रेन कणीक किंवा लाडवांसाठी जरा जाडसर कणीक मिळते ती चालेल.
_अर्धी वाटी गूळ घालून बेताचा गोड शिरा होतो. आणखी कमी गोड हवा असल्यास अर्थातच गुळाचं प्रमाण कमी करावं.
_गुळाऐवजी रॉ ब्राउन शुगर चालेल.
_वेलदोड्याच्या जोडीनं जायफळ किसून घातलं तरी चांगलं लागेल.
_पानात वाढायच्या कमीत कमी तासभर आधी तरी शिरा तयार असावा. मुरला की जास्त छान लागतो. शिर्‍यांच्या अलिखित नियमानुसार दुसर्‍या दिवशी तर फारच छान लागतो.

माहितीचा स्रोत: 
मृण्मयी
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फोटो जबरी आलाय, मी नेहमी साखर घालुन करते, आता गुळ घालून करुन बघेल.

सगळं भस्सकन ओतलं तर एक विचित्र गोळा तयार होईल >>> सहमतच! निट जमुन आल तर गोळा थापुन वड्या कापता येतात, मुलीला लहानपणी आवडायच फिन्गरफुड म्हणुन

फोटो छान आलाय .. Happy

माझ्या बाबांचा आवडता पदार्थ .. पण आमच्याकडे थोडा सरसरीत करायची आई आणि ती बहुतेक साखर घालायची ..

एकदा करून बघेन ..

नाही! हिन्दीमध्ये ते योग्य होईल पण सहसा मराठीत भाज्यांच्या गोड पदार्थाला हलवा म्हणतात. शिरा हा धान्याच्या रव्याचा असतो. ( उद्या कुणी दुधी हलवा रेसिपी टाकली व त्याला दुधीचा शिरा नाव दिले तर ते मिस्लिडींग होईल Happy )

मस्त रेसिपी व फोटो!!

वा तृप्ती ...अगदी शेमटुशेम माझीच पाकृ.
मुलं लहान होती ना तेव्हा दर वर्षी पहिला पाऊस सुरू झाला की मुलांसाठी हा शिरा आणि भजी असा बेत माझी नणंद करायची. मग मीही तेच करायला लागले तिचं बघून. आता सगळे चारी दिशांना पांगले पण सीझनचा पहिला पाऊस आला की या शिराभजीची आठवण हमखास सगळ्यांनाच होते.

फोटो दृष्ट लागण्याजोगा आला आहे. रेफ्रिजरेटर खजाना पार्टीसाठी पण चांगला आहे Wink

आता हा मल्टीग्रेन आटा शोधावा लागेल.

वॉव.. गुरुद्वार्‍या त मिळणार्‍या परशादा सार्ख..अर्थात मायनस बदाम्,वेलची वगैरे..

मस्तये रेस्पी..

लिपिड प्रोफाईल पाहून तूप घेणे Rofl अगदी!!अगदी!!

वेका, इंडियन ग्रोसरी स्टोअरमध्ये स्वादचं जरा रवाळ पीठ मिळतं गव्हाचं, ते चालेल. मी तेच वापरलं आहे.

मानुषी, ही मायबोलीकर मृण्मयीनं दिलेली पाककृती आहे, मी केवळ विपूवाहक Wink

तिच्याचतर्फे सर्वांचे आभार Happy

आहाहा.. कणकेचा शिरा (आईच्या हातचा) फाआआआअर्र आठवतोय!
मृ आणि सिंडी, आभार्स!!
आता खुदके हातसे बनाके खाना पडेगाच. Happy

यम्मी!! मला इतर कुणी करून दिला तर खाईन बापडी! करायला बरेच कष्ट वाटत आहेत!
अन आता जो ही रेसिपी वाचेल तो टिपापात ४ पोस्टी जाऊन टाकायला लागला तर जबाबदार कोण आँ ?!! Happy

वाह! यातल्या तुपाच्या सढळ वापरामुळे कधी घरी हा शिरा करायचं धैर्य झालं नाही. पण अनेक पंजाबी, गुजराती व मारवाडी स्नेह्यांकडे कणकेचा, तुपात ओथंबलेला, सुक्या मेव्याने सजलेला गरमागरम शिरा खाल्लाय. पोटात गपगार पडून राहातो आणि असा शिरा खाऊन येणारी सुस्तीही काय वर्णावी!!

खरंतर मी हा कधीच घरी खाल्लेला नाही Proud ( कोकणस्थांत बनवत नाहीत बहुतेक Wink ). इथे आल्यावरच पहिल्यांदा खाल्ला, स्वतः बनवून खावा इतपत त्याबद्दल प्रेम निर्माण झालेच नाही. आता साग्रसंगीत रेसिपी मिळालीये म्हणजे बनवून बघायलाच हवा Proud

Pages