कॉर्न फॅन क्लब

Submitted by संपदा on 3 March, 2015 - 05:52

मंजूडीच्या कॉर्न चाट पाककृतीवर पूनमने केलेली फर्माईश या बाफस्वरूपात पूर्ण करण्यात येत आहे :). चला तर मग, लिहा आपापल्या आवडत्या कॉर्नच्या पाककृती.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी नाही करत गं तशी डाळ. मी प्युअर चणाडाळीचीच वाटली डाळ करते. अताशा गावठी कणसंच दृष्टीलाही पडत नाहीत. मिळाली तर लगेच करेन तशी डाळ आणि आधी २-३ कणसं भाजून तिखट, मीठ, लिंबू लावून खाईन. किती वर्षं झाली गावठी मका खाल्ल्याला.

गावठी मका म्हणजे मक्याचे पांढरे दाणे ना ? कुठे मिळतात ते हल्ली ?
मला तर फक्त ( पिवळे ) अमेरिकन कॉर्नच दिसतात सगळीकडे !

मका अर्धाबोबडा वाटून हिरव्या मिरचीच्या खमंग फोडणीवर परतायचा. वरुन ओलं खोबरं + कोथिंबीर + लिंबू पिळून अशी वाटली डाळ म्हणतेयंस का पूनम ?
किती वर्षांत खाल्ला नाहीये हा प्रकार ... का कुणास ठाऊक पुलावात, मिक्स-व्हेजमध्येच वापरले जातात मक्याचे दाणे. आता मुद्दाम करायला हवं.

स्वीट कॉर्न भुट्टा मला आवडतो.

स्वीट कॉर्न भुर्जी / भाजी - झटपट प्रकार. उकडलेले / न उकडलेले स्वीट कॉर्न दाणे, चिरलेला कांदा, सिमला मिरची - गाजर - मटार (ऐच्छिक)
तेलात जिरे, काळे मिरे, तिखट /मिरचीची फोडणी करून त्यावर कांदा परतायचा, बाकीच्या भाज्या व स्वीट कॉर्न घालून परतायचे, मीठ, गरम मसाला घालायचा. खूप शिजवायचे नाही. एक वाफ आणायची. वरून कोथिंबीर ऐच्छिक. स्वाद खुलवायचा असेल तर थोडे अमूल बटर वरून घालायचे. गरम / गार भुर्जी फुलका / ब्रेड / पराठ्यासोबत मस्त लागतात. ओलसरपणा हवा असेल तर सोबत टोमॅटो केचप.

माझ्या लहानपणी आजोळी पांढर्‍या मक्याच्या भाकर्‍या असत. सोबत कोल्हापुरी चटणी घातलेली डाळ, भरल्या सिमला मिरच्या.... अनेक वर्षे ती चव आठवणीत आहे.

इथे अंगोलात पांढर्‍या मक्याचे पिठ मिळते, त्यामूळे भाकर्‍या होतात ( पण आजीच्या हातची चव नाही. )

पांढर्‍या मक्याचे भरड पिठ मिळते, ते उपम्यासारखे बनवता येते.

स्वीट कॉर्नचे टीन्स कायम असतात माझ्याघरी. गाजराचा किस आणि त्याची भाजी छान होते. त्यातच निम्मे तांदूळ घातले तर मस्त पुलाव होतो.

पुण्यातल्या दर्शन हॉटेलात मिळणारा बेक्ड पोटॅटो वुईथ कॉर्न हा प्रकार खूपच भारी (दोन्ही अर्थांनी) आहे. व्हाईट सॉस, चीज, मीठ, मिरपूड व त्यात बटाटे व कॉर्न घालून बेक केलेलं प्रकरण गार्लिक टोस्ट बरोबर सर्व्ह करतात. सोबत केचप.

व्हेज ओ ग्रातीन / बेक्ड व्हेज पण खूप आवडते.

व्हाईट सॉसमध्ये उकडलेले स्वीट कॉर्न, दुधी, मटार, घेवडा, बटाटा वगैरे भाज्या, वरून मीठ मिरपूड, एखादी मिरची हवी असल्यास. वरून चीज भुरभुरून.
हा प्रकार भाजी / सलाद म्हणून खाऊ शकतो.

स्वीट कॉर्न कटलेट्स् - उकडलेले स्वीट कॉर्न भरड करून, मिरची पेस्ट, आले लसूण पेस्ट (ऐच्छिक), उकडलेला बटाटा कुस्करून, मीठ, गरम मसाला (किंवा धणे जिरे पूडही चालते), आंबटगोड चव हवी असल्यास आमचूर पावडर, बाईंडिंगसाठी रवा / ब्रेडचा चुरा वगैरे.
रवा/ ब्रेड चुरा वगळून बाकी सर्व मिश्रण एकत्र करून चपटे गोळे बनवायचे, रव्यात किंवा ब्रेड चुऱ्यात घोळवायचे व नॉन स्टिक पॅनमध्ये तेलावर खरपूस भाजायचे. सॉस सोबत खायचे.

पांढ-या दाण्याचा मका मिळतो गाडीवर जे मके भाजून देतात ना त्यांच्याकडे. वेगळा मागायचा. नाहीतर स्वीट कॉर्नच बोकाळलाय सगळीकडे.
कणसं किसायची. आम्ही हरबरा डाळिऐवजी मूग डाळ भिजवतो आणि भरड वाटून घेतो. मक्याचा कीस आणि ही डाळ फोडणीवर परतायची. फ़ार भारी मक्याची डाळ होते. फोडणी खमंग हवी आणि वरून लिंबू, कोथिंबीर. लसूण नाही.

वा मस्त पूनम आता अशी करून बघेन नाहीतर मक्याचे दाणे वाटते मी इतर डाळींबरोबर. कधी कधी चणाडाळ, मुगडाळ आणि मका घेते.

पूनम हल्ली तोच पांढरा मका इथे कुठेही नाही दिसत. बाजारात, गाडीवाल्याकडे. ओन्ली अमेरिकन.

दिसला रे दिसला की मी पहिला डल्ला मारते.

अर्रे वा, पूनम. हे नव्हते डोक्यात आले. हे म्हणजे वन डिश मीलच होईल डाळ आणि कॉर्न दोन्ही एकत्र म्हणजे. बरोबर दहीभात वगैरे केला की मस्त झटपट जेवण. मका कधी घालायचा फोडणीत ? कारण मूगडाळ शिजायला थोडा वेळ लागेल ना ? तसेच तेलही थोडे जास्त लागते का एरवीपेक्षा ? चणाडाळीच्या वाटल्या डाळीला अगदी कमी तेल चालत नाही, कोरडी होते.
नक्कीच करुन बघणार लवकरात लवकर Happy

अगो, 'खमंग' फोडणी म्हणजे जास्त तेलाचीच Wink

मी नॉनस्टिक कढईत करते. त्यामुळे डाळ आणि मका कीस एकत्रच घालते. डाळ शिजेपर्यंत मका मस्त 'खुसखुशीत' होतो. मला वाटतं या डाळी कोरड्या पडू नयेत म्हणूनच त्यांच्यात ओलं खोबरं घालत असावेत. चवही येते आणि कोरडेही होत नाही.

'खमंग' फोडणी म्हणजे जास्त तेलाचीच >>>>>असे अजीबात नाही पूनम.:स्मित: अगदी थोड्या तेलातही खमन्ग फोडणी होते. तेल तापले की मोहरी तडतडु द्यावी ते भान्डे/ कढई खाली उतरवुन मग हिन्ग, जीरे, हळद घालावी. मस्त वास येतो, करुन बघ. माझ्या साबानी शिकवली मला.

मका प्रचंड जास्त आवडता, एकेकाळी मका हा आमचा इतर अन्नदाता होता , उत्तम पिक खास करुन गंगा सफ़ेद हे वाण तर उत्तमच! भुस्काट केलेली त्याची बिरमुटली खायला घातली की जनवारांच्या दुधात फॅट कंटेंट सुद्धा नैसर्गिक रीत्या वाढते!! आम्ही मक्याचे कणीस थोड़े गावठी पद्धतीने खात असु, रानातून तोडून आणलेली कोवळी कणसे सोलण्या च्या भानगडीत न पड़ता साला सकट चुलीच्या वायलात खुपसायची, साले काळपट होइस्तोवर ठेवायची मग बाहेर काढून सोलायची, बंद सालांच्या पॉकेट मधे आपल्याच वाफेत शिजतात कणसे मस्त मग त्यानंतर त्याला फ़क्त तेल मीठा चा एक हात लावला की काम फत्ते, अगदीच वेळ नसे तेव्हा आम्ही दुधाळ बारकी कणसे तोडून सोलुन तशीच कचाकच चावुन खाऊन टाकत असु.

(एकेकाळ चा मक्याचा शेतकरी) बाप्या

Pages