ती मधुचंद्राची रात्र … छे काळरात्र !
"सर,मिसेस सिन्हा त्यांच्या मुलीला घेवून आल्या आहेत. त्यांना तुमच्या चेंबरमध्ये बसवले आहे."
मी क्लिनिक मध्ये दुपारी प्रवेश करीतच होतो एव्हड्यात माझ्या रीसेप्शनीस्टने मला थांबवून असा निरोप दिला.
दखल घेतल्याप्रमाणे मान हलवून मी माझ्या खोलीत शिरलो.
"हलो, म्याडम, कसे काय येणे केलेत ?"
मिसेस सिन्हांनी मान किंचित हलवून माझ्या येण्याची दाखल घेतली, पण बोलल्या मात्र नाहीत. शेजारीच त्यांची तरुण मुलगी स्मिता मान खाली घालून डोके टेबलावर हातांच्या वेटोळ्यात खुपसून बसली होती. तशी स्मिता म्हणजे नावाप्रमाणेच सदैव स्मितमुखी अशी सुहास्यवदना मुलगी. नुकतीच काही दिवसांपूर्वी मिसेस सिन्हा स्मिताच्या लग्नाचे निमंत्रण करताना मला शर्ट आणि सौं'ना साडी घेवून आल्याचे माझ्या स्मरणात होते. स्मिताला असे बसलेले पाहून काहीतरी गंभीर घडले असावे असा विचार पटकन मनात डोकावला. तसे आम्हा डॉक्टरांच्या मनात नेहेमीच वाईट विचार प्रथम येतात.
"काय झालेय, स्मिताला बरे नाही का ?"
थोडा वेळ कोणीच काहीच प्रतिसाद दिला नाही आणि मग मिसेस सिन्हांनी अचानक अश्रूंना आणि शब्दांना वाट करून दिली.
स्मिताकडे पाहत त्या म्हणाल्या, "डॉक्टरसाब, कैसे बताये पर बहुत ही अनहोनी बात हो गयी."
स्मिता नुकतीच संगणक पदवीधर होवून एका प्रसिद्ध कंपनीमध्ये लठ्ठ पगारावर नोकरीला लागली होती. तिथेच तिच्याच आवडीच्या एका समवयस्क समीर अरोरा नावाच्या पंजाबी तरुणाबरोबर तारा जुळल्या आणि यथावकाश दोघांच्या आईवडीलांनी मिळून त्यांच्या लग्नाचा बार उडवून दिला. आर्थिक परिस्थिती मजबूत मग काय, 'राया, कुठे कुठे जायाचे हनिमूनला' ! नियोजन झालेच होते,मग काय, समीर आणि स्मिता निघाले सदाबहार निसर्गरम्य बालीला !
मुबई ते सिंगापूर ते देनपसार हा सातआठ तासांचा प्रवास या नवपरिणीतांनी एका वेगळ्याच विश्वात काढला आणि सकाळीच पोहोचले बालीमुक्कामी ! कार्तिक प्लाझा हॉटेलमध्ये ब्यागा टाकून आणि फ्रेश होवून दोघेही निघाले फिरायला ! दिवसभर कसा गेला त्यांना कळलेच नाही. नाही म्हणायला समीरचा दावा पाय दुखत असल्याने जरा लंगडत चालला होता पण 'हसीन साथी आणि दिलकश नजारा' मग कुठला रसिक सुजलेल्या पायाकडे लक्ष देईल ? समीरही याला अपवाद नव्हता.
सायंकाळी शेजारच्या थियेटरमधील सांस्कृतिक कार्यक्रम पाहून दोघेही रूमवर परतले. हॉटेलच्या स्टाफने त्यांची खोली सुगंधित फुलांनी छान सजवली होती. पुढचे बरेचसे वर्णन 'सुज्ञ्नास सांगणे नलगे' असल्यामुळे ते टाळून पुढे जावू या.
रात्रीचा सुमारे एकच सुमार असावा. दोघेही गाढ झोपेत होते. अशातच समीरला अचानक जाग आली, छातीमध्ये दुखत होते, दरदरून घाम आला होता आणि श्वासाला त्रास होत होत. दम लागला होता. कसेबसे त्याने गाढ झोपलेल्या स्मिताला हलवून उठवले. समीरची अशी ही अवस्था पाहून स्मिताच्या पोटात खड्डाच पडल्यासारखे झाले, काय करावे तेच तिला कळेना. पटकन तिने हॉटेल रिसेप्शनला फोन केला आणि समीरच्या शेजारी धावली. समीरला इतका दम लागला होता की त्याला धड बोलताही येत नव्हते. तेव्हड्यात हॉस्पिटलचे दोन सेवक तेथे येवून पोचले. त्यांना परिस्थितीच्या गांभीर्याची कल्पना आली व त्यांनी भराभर मदतीसाठी फोन केले. पाच मिनिटातच चौघांनी अक्षरशः समीरला उचलून लॉबीमध्ये आणले. तोपर्यंत हॉटेलची कार तयारच होती.
"म्याडम,यांना पटकन हॉस्पिटलमध्ये हलवले पहिजे. जवळच बळी मेडिकल कॉलेजचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे हॉस्पिटल आहे. आम्ही आमच्या सर्व पर्यटकांना तेथेच नेत असतो. आपल्याला काही काळजी करण्याचे कारण नाही." त्यातील एक जबाबदार वाटणारा माणूस स्मिताला सांगत होता. सर्वांच्या प्रयत्नांनी पुढच्या दहा मिनिटांतच आपला पेशंट हॉस्पिटलच्या तातडिक विभागामध्ये पोहोचलादेखील. लगेचच पुढील कार्यवाही सुरु झाली.
ड्युटीवरील डॉक्टर्स आणि सिस्टर्स पेशंटच्या सभोवती जमल्या.
प्रमुख डॉक्टरांनी सूचना द्यायला सुरवात केली.
"सिस्टर, बीपी, शुगर, व्हायटल्स चेक करा."
"सर, पल्स १४४, पण नियमित आहे, बीपी ८० सीस्टोलिक, एसपीओटू ७० आहे."
समीरच्या हृदयाचे ठोके फारच वेगात पडत होते आणि बीपी कमी होते आणि प्राणवायूची पातळी १०० ऐवजी ७० होती.
"ओटू सुरु करा. सिस्टर ईसीजी करा. मॉनिटर सुरु करा. आयव्ही लाईन सुरु करा, ल्यबसाठी ब्लड कलेक्ट करा. ब्लड ग्यसेस पाठवा."
"पेशंट स्टेबल होईपर्यंत आयसीयू मध्ये बेड साठी कळवा."
पुढील दहा मिनिटामध्ये समीरची बरीच स्थिरावली. बीपी आणि प्राणवायूची पातळी नॉर्मल रेंज मध्ये आली, दम बराच कमी झाला.
स्मिता एकटीच सुन्न होवून चाललेल्या हालचाली पाहत होती. नाही म्हणायला हॉटेलचा तो जबाबदार माणूस तिच्या सोबतीला थांबला होता.
अर्ध्या तासाने ड्युटीवरील प्रमुख डॉक्टरांनी स्मिताला त्यांच्या चेम्बरमध्ये बोलावून घेतले. सुदैवाने ते डॉक्टर भारतीयच होते.
"म्याडम, आपल्या पेशंटची तब्बेत गंभीर आहे. आम्ही सर्व प्रयत्न करतोच आहोत."
"पण त्यांना काय झाले आहे ?" स्मिता.
"आपल्या हजबंडना आमच्या वैद्यकीय भाषेमध्ये सांगायचे म्हणजे 'पल्मोनरी एम्बोलिझम' झाला आहे. त्यांच्या पायामधील अशुद्ध रक्तवाहिनीमध्ये रक्ताची गाठ तयार झाली होती ती गाठ तेथून निसटून रक्ताभिसरणाद्वारे त्यांच्या हृदयाच्या उजव्या कप्प्यात पोचली व तेथून ती फुफ्फुसाकडे जाणार्या मुख्य रक्तवाहिनीमध्ये जावून अडकली आहे. त्यामुळे त्यांच्या फुफ्फुसातील रक्ताभिसरण काही अंशतः थांबले आहे. आत्ता त्यांची तब्बेत थोडी बरी आहे. तुम्ही त्यांच्याशी जावून बोलू शकता."
आपल्या शरीरामधील रुधिराभिसरण संस्था ही एक हवाबंद व्यवस्था, सिस्टीम, असते. हृदयातून संपूर्ण शरीराकडे आणि फुफ्फुसाकडे रक्त घेवून बाहेर निघणार्या रोहिणी, केशवाहिन्या आणि आणि पुन्हा हृदयाकडे माघारी जाणार्या नीला याच्यामुळे ही व्यवस्था तयार झालेली असते. या व्यवस्थेमध्ये छेद अथवा पंक्चर झाल्यास रक्त बाहेर येते, रक्तस्त्राव सुरु होतो. हा थांबविण्यासाठी हे रक्त त्या छेदाभोवती गोठते आणि तो छेद बंद होतो. या गोठलेल्या रक्ताच्या गुठळीला थ्रोम्बस असे म्हणतात. रक्तातील काही घटक (फ्यक्टर्स ) या घोटण्यासाठी मदत करतात. दूरवरच्या प्रवासामध्ये खुपवेळ पाय न हलविता बसले गेल्यास पायांतील नीलामध्ये अशी गुठळी तयार होते त्याला आम्ही डीप व्हेन थ्रोम्बोसीस ( DVT ) असे म्हणतो. हि गुठळी निलेला चिकटलेली असते. पण कधीकधी ती मोकळी सुटते आणि मग बंदुकीच्या गोळीप्रमाणे रक्तप्रवाहामध्ये वाहत जावून हृदयाच्या उजव्या कप्प्यात येते व नंतर फुफ्फुसामध्ये जावून तेथील रोहिणीमध्ये जावून अडकते आणि फुफ्फुसाचा रक्तपुरवठा बंद करते,फुफ्फुसाचे रक्त शुद्धीचे कार्य थांबते आणि जर दोन्ही फुफ्फुसांना जाणारी मुख्य रक्तवाहिनी बंद झाली तर माणूस तत्काळ रक्ताभिसरण बंद होवून मृत होतो. काही जनुकीय दोषांमुळे अथवा इतर काही कारणांमुळे काही व्यक्तींमध्ये रक्ताच्या गुठळ्या होण्याची प्रवृत्ती जास्त आढळते. समीरमध्ये कदाचित असा जनुकीय दोष असावा आणि विमानप्रवासामुळे तो आणखीनच वाढल्यामुळे त्याच्या पायात रक्ताची गुठळी तयार झाली असावी.
"पण आत्ता यांना पुढे काय ट्रीटमेंट असणार आहे." घाबरलेली स्मिता विचारत होती.
"आम्ही हॉस्पिटलच्या हृदयरोग विशेषज्ञ डॉक्टरांना बोलावले आहे. ते लवकरच येथे येतील. पेशंटची टूडी ईको आणि कलर डॉपलर तपासणी करतील. त्यातून पल्मनरी इम्बोलीझमचे निदान निश्चित झाले कि पुढील उपचारांची दिशा स्पष्ट होईल. आम्ही त्यांना रक्त पातळ होण्यासाठी हेप्यरिन नावाचे औषध सुरु केले आहे."
याठिकाणी सोनोग्राफी या तंत्राविषयी थोडेसे समजून घेणे आवश्यक आहे. यामध्ये इजा न करणारा अतिशय जास्त कंपनाच्या ध्वनिलहरी वापरल्या जातात. आपला कान २०००० कंपनापर्यंत ऐकू शकतो पण येथे २० लाख कंपने असलेला ध्वनी वापरतात. एक छोटासा स्फटिक अशी कंपने तयार करून शरीरामध्ये सोडतो. ही कंपने निरनिराळ्या पेशींमधून जाताना त्यांच्या कंपनसंख्येमध्ये पेशींच्या घनतेप्रमाणे बदल होतो. हा बदलेल्या ध्वनीचा प्रतिध्वनी पुन्हा तोच स्फटिक पकडतो आणि संगणकाला देतो. संगणकाच्या पडद्यावर अनेक बिंदूंची एक रेषा तयार होते. प्रत्येक बिंदूची प्रकाशमानता कंपनसंख्येनुसार ठरते. अशा अनेक रेषा भरभर एकापुढे एक मांडल्या तर एक द्विमिती चित्र तयार होते. समजा छातीवर हे यंत्र ठेवले तर आतील हृदयाचे बरहुकुम चित्र बाहेर दिसते. अशी अनेक चित्रे भरभर पहिली तर चित्रपटांच्या तत्वाप्रमाणे हलणारे चित्र दिसते व आपण हृदयाच्या आत होणार्या हालचाली, झडपांची हालचाल, आणि रक्ताची गाठ देखील पाहू शकतो. गर्भवती स्त्रीच्या पोटात जांभई देणारे बालक आपण संगणकाच्या पडद्यावर पाहू शकतो.
पुढच्या दहा मिनिटांतच हृदयरोगतज्ञ तेथे आले. त्यांनी समीरची टूडी ईको टेस्ट केली.
स्मिता शेजारीच उभी होती. तिला बाहेर बोलावून ते म्हणाले,
"म्याडम, आपल्या मिस्टरांच्या हृदयामध्ये एक मोठी रक्ताची गाठ आहे व प्रत्येक ठोक्याबरोबर ती पुढेमागे हलते आहे. एरवी आम्ही रक्ताची गाठ विरघळण्याचे खास इंजेक्शन देत असतो पण यांच्या बाबतीमध्ये तेव्हडा वेळ नाही. ताबडतोब ओपन हार्ट सर्जरी करून ती गाठ काढावी लागेल. मी ती सर्व व्यवस्था तांतडीने करण्याच्या सूचना देत आहे."
बाहेर एव्हडे बोलणे चालूच होते तेव्हड्यात एक सिस्टर पळतच आली,
"सर, ही ह्यज अरेस्टेड !"
बोलणे तसेच ठेवून सर्व जण आत पळाले. पुढील दहा मिनिटे सर्व डॉक्टरांच्या प्रयत्नांना दाद न देता समीरने स्मिताचा आणि इहलोकाचा निरोप घेतला.
डोके सुन्न झाले. केव्हडा मोठा अन्याय केला होता देवाने बिचार्या स्मितावर ! क्षणभर श्री. तात्याराव सावरकरांच्या 'माणसाचा देव आणि विश्वाचा देव' या धड्याची आठवण झाली.
जशी संकटे थव्याने येतात असे म्हणतात ना तसेच एखाद्या आजाराचा एखादा पेशंट आला की त्याच आजाराचे आणखी अनेक पेशंट येतात हा अनुभव मला आणि माझ्या अनेक मित्रांना अनेकदा आलाय. पुढच्याच महिन्यातली गोष्ट…
माझे एक पेशंट आणि मित्र श्री सुनील झगडे एक पेशंट घेवून आले.
"डॉक्टर, हे माझे मित्र, शिवाजीरावअण्णा पाटील. मोठ्ठे पुढारी आहेत. संपूर्ण महाराष्ट्राच्या प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष आहेत. दोनतीन दिवस खूप दम लागतोय म्हणतात. म्हणून आपल्याकडे कन्सल्ट करण्यासाठी घेवून आलोय." झगद्यांनी प्रास्ताविक केले.
पांढर्या शुभ्र धोतर, शर्ट आणि गांधी टोपीधारी शिवाजीराव चांगले सहा फुट धिप्पाड आणि भारदस्त व्यक्तिमत्व. नेमकीच त्या दिवशी लिफ्ट बंद असल्यामुळे एक जिना चढून वर आल्यामुळे शिवाजीरावांना चांगलाच दम लागला होता.नाडीचे ठोके खूपच जलद पडत होते. बोटाला लावलेल्या पल्स ओक्सिजेन मीटरवर रीडिंग होते फक्त ८०% ! बीपी मात्र नॉर्मल होते. ईसीजी दाखवत होता की अण्णांच्या उजव्या हृदयावर खूपच ताण आला होता. सर्व लक्षणे दाखवत होती कि अण्णांना पल्मोनरी एम्बोलीझम झाला होता.
"अण्णा, हा जो दम लागलेला आहे तो दाखवतोय की आपल्याला हॉस्पिटलमध्ये राहावे लागेल."
"मला त्रासही खूपच आहे. जे काय करायचेय ते पटकन करा." अण्णांना परिस्थितीच्या गांभीर्याची बहुदा कल्पना आली होती.
मी तांतडीने रुबी हॉल क्लिनिकचे प्रमुख आणि माझे वर्गमित्र डॉक्टर परवेझ ग्रँट यांना फोन केला.
पुढील अर्ध्या तासात अन्न रुबिमध्ये पोचले. परवेझ सरांनी सर्व व्यवस्था करूनच ठेवली होती. सुदैवाने दुपारची वेळ असल्याने हॉस्पिटलचे सर्व विभाग कार्यरत होते. पुढील अर्ध्या तासात अण्णांच्या फुफ्फुसाचा सिटी स्कॅन आणि सिटी अँजिओग्राफी झाली. अँजिओग्राफीमध्ये दाखवत होते की अण्णांच्या मुख्य पल्मोनरी आर्टरीमध्ये रक्ताची एक मोठ्ठी गाठ अडकली होती. आजूबाजूने थोडेबहुत रक्त पुढे फुफ्फुसामध्ये जात होते आणि केवळ त्याचमुळे अण्णा तग धरून होते. मी इतर पेशंट घरी पाठवून परवेझ सरांजवळच थांबलो होतो.
"सुरेश, या पेशंटला थ्रोम्बोलाईज करावे लागेल." परवेझ सर.
"मलाही तसेच वाटते. पटकन करूया." मी.
आम्ही झगद्यांना आणि पेशंटला आजाराची कलपना दिली आणि अण्णांना कॅथलॅबमध्ये शिफ्ट केले.
अण्णांना झोपेचे इंजेक्शन दिले आणि त्यांच्या मांडीतून एक कॅथेटर नावाची छोटी नळी हृदयातून पुढे सरकवून त्या अडकलेल्या गाठीपर्यंत सरकवली आणि तिथेच स्थिर केली. पुढील ४८ तास त्या कॅथेटरद्वारे त्या गाठीला स्ट्रेप्टोकायनेज नावाच्या एका गाठ विरघळवू शकणार्या औषधाचा हळूहळू अभिषेक घडवला. स्ट्रेप्टोकायनेजने आपले काम चोख बजावले. ती गाठ पूर्ण विरघळली आणि फुफ्फुसाचा रक्त पुरवठा पूर्ववत झाला.
स्ट्रेप्टोकायनेज या वंडरड्रगचा शोधही योगायोगानेच लागला. डॉ. टिलेट्ट यांना स्वतःची दाढी करतांना एक पांढराशुभ्र ज्वारीच्या दाण्यासारखा फोड दिसला. त्यांनी त्याला धक्का न लावता दाढी केली. दुसर्या दिवशी त्या फोडामधील दुधासारख्या द्रवाची जागा आता पाण्यासारख्या द्रवाने घेतली होती. त्यांच्या मेंदूतील ट्यूब पेटली. याचा अर्थ या फोडातील बॅक्टेरियांनी त्या पांढर्या पसचे पचन केले होते ! त्यांनी ते बॅक्टेरिया शोधले आणि ते पाचक औषधदेखील जे बॅक्टेरिया शरीरामध्ये संसर्ग तयार करताना एक शस्त्र म्हणून वापरतात. हेच ते स्ट्रेप्टोकायनेज होय ! हे औषध हार्ट ॲटॅक आणि ब्रेन ॲटॅक मध्ये देखील वापरले जाते.
अण्णांचा दम कोठल्याकोठे पळून गेला. पोटाच्या सोनोग्राफीमध्ये त्यांना पोटातील व्हेन्समध्ये गुठळ्या झालेले दिसले होते. पुन्हा अशा गाठी हृदयापर्यंत जावू नयेत आणि गेल्याच तर त्यांना वाटेतच अडवण्यासाठी एक गाळणी, फिल्टर, अण्णांच्या पायाकडून हृदयाकडे जाणार्या महनिलेमध्ये बसवण्यात आला. आज या गोष्टीला तेरा वर्षे होवून गेलीत. अण्णांची तब्बेत ठणठणीत आहे. फिल्टर चोक होवू नये म्हणून रक्त पातळ होण्याचे औषध नियमितपणे घेत असतात.
वरील घटनेनंतर सहा महिन्यांनंतर अण्णांनी नागपूर येथे अ. भा. प्राथमिक शिक्षक संघटना अधिवेशनमध्ये तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री ना. शरदराव पवार यांच्या हस्ते दहा हजार रुपये देवून व 'प्रबोधन पुरस्कार' देवून कृतज्ञता व्यक्त केली. अर्थात मीही ते पैसे 'इदं न मम' म्हणून मुख्यमंत्री निधीस दिले नसते तर आपणा सर्वांच्या दृष्टीने कृतघ्नच ठरलो असतो!
मायबोलीकर मित्रांनो, आपणा
मायबोलीकर मित्रांनो,
आपणा सर्वांनी स्मिताबद्दल व्यक्त केलेल्या भावना मी तिच्यापर्यंत निश्चितच पोहोचवीन. खरोखर अगदी आपल्या वैऱ्यावरदेखील असा प्रसंग येवू नये. पण सध्या एव्हडेच सांगू इच्छितो कि स्मिताच्या मनाला झालेली जखम काळाच्या ओघामध्ये भरून आली. तिने आपल्या मनाची किवाडे किंचित किलकिली करण्याचाच अवकाश की अनेक उपवधू तरुणांनी तिला आयुष्यभर साथ देण्यासाठी आपले हात पुढे केलेले. त्यातून तिने पुन्हा एकदा नवीन साथीदाराची निवड केली देखील आणि ती आता नवीन संसारामध्ये सुखी आहे. आपली प्रतिसादाबद्दल पुन्हा एकदा आभार !
@झम्पी : दूरच्या प्रवासात ट्रव्हल सॉक्स घालणे उत्तमच !
@शुम्पि : अशा मोठ्या प्रवासात दर १-२ तासांनी जरा पाय मोकळे केले की हा धोका टळू शकतो. >> होय, निश्चितच ! आपली पायांतील पोटऱ्यातील स्नायू हे एक प्रकारचे पंपच आहेत ज्यांची हालचाल होण्याने पायांत साचलेले रक्त पुन्हा हृदयाकडे ढकलले जाते. विमानप्रवासात देखील दर दोनतीन तासांनी पुढेमागे चालले पाहिजे. बसल्या बसल्या पाय आणि पंजे हलविले पाहिजेत.
@केशर :१४-१५ तासांची फ्लाईट असेल तर ५-६ तास झोप होतेच ना.>>> काही हरकत नाही. बिनधास्त झोपावे पण नंतर पाय मोकळा करण्यास विसरू नये. जेवणानंतर भरपूर पाणी प्यावे म्हणजे आपोआप लघवीसाठी जाग येतेच !
@अशोक : आपण भरपूर चालता आहात, चालू ठेवा. डीव्हीटी आपल्यासारख्या आरोग्यसक्षम व्यक्तींना होत नाही. "कोमा" ह्या वैद्यकीय रहस्यपटाने अशा प्रकारच्या साहित्यप्रकाराचे नवे दालन सुरु केले. रॉबिन कूक यांनी आत्तापर्यंत लिहिलेल्या एकूण बत्तीस पुस्तकांपैकी हे दुसरे पुस्तक ज्यावर आधारित हा चित्रपट अतिशय गाजला होत.(१९७८)
@निधप : मी आपल्या ब्लॉगचा एक जुना चाहता आहे. आपली प्रतिक्रिया पाहून आनंद झाला. <<<पल्मोनरी एम्बॉलिझम आणि पल्मनरी हायपरटेन्शन यात काय फरक असतो? >>>पल्मोनरी एम्बॉलिझम म्हणजे वरील गोष्टीत आहे तो. पण 'पल्मनरी हायपरटेन्शन ' हा एक रक्तवाहिन्यांचा आजार आहे. आपले बीपी १४०/९० पेक्षा जास्त असल्यास त्याला सिस्टेमिक हायपरटेन्शन म्हणतात. फुफ्फुसामधील रक्तवाहिन्यामधील ब्लड प्रेशर २५ mm पेक्षा वाढल्यास त्याला 'पल्मनरी हायपरटेन्शन' म्हनतत. याची कारणे खूप आहेत.
@बेफिकीर : आपल्या स्वानुभवाबद्दल वाचून वाईट वाटले. आपण आपला 'जीनोम' बदलू शकत नाही, निदान आज तरी. तोपर्यंत वार्फ गोळी घ्यायला विसरू नका. हा आजार पुन्हा उद्भवू शकतो.
<<<आपण, इब्लिस, कैलासराव, साती अश्यांनी एक ऑनलाईन वैद्यकीय सल्ला कक्ष काढण्याची कल्पना मनात आली.>> कल्पना उत्तम आहे पण एव्हडा वेळ काढणे जर कठीणच दिसते.
@लिम्बुतिम्बु : तुमचे असे लेख, त्याचे पुस्तक, वृत्तपत्रिय प्रसिद्धि असे झाले तर फार बरे होईल.>>>पाहू या ! प्रयत्न करतो.
@रोबिनहूड : डॉ. महोदयांनी प्रॅक्टीस कमी केली आहे असे कलले. >>>पाच वर्षांपूर्वी angioplasty झाली. आता तब्बेत उत्तम आहे. पूर्वी दुपारी १ ते ११ असे सलग काम करीत असे, आता १ ते ७ पर्यंत करतो. गरजा कमी झाल्या असल्यामुळे केवळ आवड म्हणून काम करतो.
@स्वाती : होय, धन्यवाद.
@प्रभा : आपली पोस्ट वाचली. रक्त पातळ होण्याची औषधे दोन प्रकारची असतात. रोहिणीमध्ये वापरण्याची म्हणजेच angioplasty नंतर stent ब्लॉक होवू नये म्हणून घेतात ती म्हणजे अस्पिरीन आणि कलोपिडोग्रेल सारखी असतात. ही औषधे नीलामध्ये होणाऱ्या थ्रोम्बोसीससाठी फारशी उपयोगी नसतात. त्यासाठी 'के' व्हीट्यामीन विरोधी औषधे म्हणजे वार्फ, असित्रोम ई घ्यावी लागतात. तुम्हाला काही जनुकीय दोष नसल्यास आणि पाय ठीक असल्यास आणखी सहा महिने तरी हे औषध घ्यावे लागेल असे दिसते. आपल्या डॉक्टरांच्या संपर्कात राहावे.
इतर सर्व माबो मित्रांचे मनःपूर्वक आभार !
छान! आपलयातील लेखकास
छान! आपलयातील लेखकास सलाम!
स्मिताबद्दल वाईट वाटले.
स्मिताबद्दल वाईट वाटले.
तुमच्या लेखनाला अनेक शुभेच्छा! वर काहींनी लिहीले आहे तसे वॄत्तपत्रात प्रसिद्ध होऊन अधिकाधिक लोकांपर्यंत पोचले तर चांगले होईल.
उत्तराबद्दल आभार
उत्तराबद्दल आभार
प्रतिसादाबद्दल धन्यवाद
प्रतिसादाबद्दल धन्यवाद डॉक्टर.
मला हा त्रास असल्याने सतत चालत रहाणे हाच एक उत्तम उपाय आहे असा अनुभव आहे.
दुसरा व्यायाम म्हणजे,
मधून मधून पाय वर खाली करून हलवणे वगैरे करते.
ती आता नवीन संसारामध्ये सुखी
ती आता नवीन संसारामध्ये सुखी आहे...छानच.
२ वर्र्षांपूर्वी माझ्या आईचे नी-रिप्लेसमेंटचे ऑपरेशन झाले होते.तिसर्या दिवसापासून आईला थोडा दम लागायला लागला.राउंडला डॉक्टर येऊन म्हणाले की काही नाही. थोडे वयही झाले आहे.बरं माझी आई हार्टपेशंट आहे.त्यामुळे म्हटले असेलही खरे. नंतर अजून त्रास वाढल्यावर मोशन्सवर औषधे दिली.नंतर तिचा चेहरा लालसर-जांभळसर झाल्यावर रात्री डॉक्टरांना परत बोलावल्यावर तिला तडक आय.सी.यूमधे हलवले.मायनर पल्मनरी थ्राँबॉसिस म्हणून सांगितले. तिच्या चेहर्याचा रंग पाहून कळून चुकले की हे सिरियस आहे. नंतर उपचार होऊन सर्व ठीक झाले. त्यातही एका डॉक्टरांचा मोबाईल नंबर माझ्याकडे होता.त्यांना गाठल्यावर, त्यांनी दुसर्या डॉक्टरांना कळविले आणि भराभर पावले उचलली.
आता हे लिहिताना काही वाटत नाही.पण त्यावेळी नकोसे झाले होते.
बापरे .. लेखातील स्मिताबद्दल
बापरे .. लेखातील स्मिताबद्दल वाचून फार वाईट वाटले, पण तुमचा प्रतिसाद वाचून जरा हायसे वाटले.
तुमचे सगळेच लेख वाचत असते मी. खरंच मस्त लिहीता तुम्ही. शैली एकदम ओघवती आहे!
डिव्हिटी असणे म्हणजे टाइम
डिव्हिटी असणे म्हणजे टाइम बॉम्ब असण्यासारखेच! नुकतेच एक खूप जवळेच नातेवाइक पल्मोनरी एम्बोलिझम मुळे दगावले. डिव्हीटी होता हे माहीत होते. पण गाठ अडकल्यावर इसपितळात नेईपर्यंत खूप उशीर झाला होता... अजुनही विश्वास बसत नाही
बापरे! हे असे होते. डॉक्टर
बापरे! हे असे होते. डॉक्टर खुप छान, सोप्या भाषेत लिहीलेत.
तुमचे बाकिचे लेख वाचायला घेतलेत.
एका दुर्दैवी घटनेची माहिती,
एका दुर्दैवी घटनेची माहिती, फारच रंजक स्वरुपात मांडलेली.,लेखनशैली भन्नाट.
डॉक्टरीपेशाबद्दलचे बरेचसे गैरसमज अशा लेखांमुळे दूर व्हायला मदत होऊ शकेल.
तुमचे असे लेख, त्याचे पुस्तक, वृत्तपत्रीय प्रसिद्धि असे झाले तर फार बरे होईल. >>>>>> +१००....
"स्ट्रेप्टोकायनेज" इतके गुणकारी व महत्वाचे आहे तर ........
डॉ. साहेब - असे अमूल्य अनुभव शेअर करीत आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद ....
छान लिहित आहात
छान लिहित आहात डॉक्टर.
<<औषधाचा हळूहळू अभिषेक घडवला>> अश्या प्रकारच्या वाक्यरचनांनी लिखाण वास्तवदर्शी वाटते. नेमकी घटना डोळ्यांसमोर उभी राहते. वैद्यकिय भाषेत लिहिले असते तर तेवढे पोचले नसते, जेवढे आता थेटच पोचते आहे.
स्मिताची कहाणी वाचून वाईट वाटले.
उत्तम लेख
उत्तम लेख
स्मिताचे लेखामध्ये वाचून खूप
स्मिताचे लेखामध्ये वाचून खूप वाईट वाटले होते, परंतु डॉ़क्टरसाहेबांचा प्रतिसाद वाचून बरे वाटले. तिला खूप शुभेच्छा.
डॉक्टर, खूप माहितीपूर्ण आणि
डॉक्टर, खूप माहितीपूर्ण आणि उपयुक्त लेख... अनेक धन्यवाद.
>>>>> नशीब,' बी अवेअर ऑफ
>>>>> नशीब,' बी अवेअर ऑफ डॉग्ज ' आठवले नाही. <<<<<<
साती सातीऽऽ कित्ती ग तू मनकवडी..
धन्यवाद डॉ. माझ- आम्हा
धन्यवाद डॉ. माझ- आम्हा सर्वांचच- शंका निरसन अगदी चांगल्या रीतीने केल्या बद्दल खुप-खुप आभारीआहे. जगण्याला बळ मिळाल.. कारण १० वर्षा पुर्वी मला हाच त्रास झाला होता. तेव्हा लिच थेरपीने बरी झाले.[तो उजव्या पायात होता.] नंतर २००९ मधे एन्जिओप्लास्टी झाली. आता परत डाव्या पायात त्रास झाला. त्यामुळे परत इतिहासाची पुनराव्रुत्ती होते कि काय? अशी भिती वाटत होती. त्यामुळे नैराश्य येत होत. आता नव्या उमेदीने जगण्याला बळ मिळाल. पुनश्च धन्यवाद.
खूप उपयुक्त माहिती.चांगले
खूप उपयुक्त माहिती.चांगले डॉक्टर्स भूलोकीचे देवच असतात.नव्याने जन्म देणारे, शारीरिक मानसिक पुनर्वसन करणारे.
डॉक्टर, याची सुरुवात नेहमी
डॉक्टर, याची सुरुवात नेहमी पाय दुखण्यापासूनच होते का?
खूप छान लिहिता तुम्ही.
खूप छान लिहिता तुम्ही. माहितीपूर्ण तरीही रंजक. स्मिता आता सुखात आहे हे वाचून बरे वाट्ले.
नेहेमीप्रमाणेच सुरेख लेख
नेहेमीप्रमाणेच सुरेख लेख !
स्मिताबद्दल वाचून वाईट वाटले पण नंतरचा तुमचा प्रतिसाद वाचून फार बरे वाटले
याची लक्षणे काय असतात? दोन
याची लक्षणे काय असतात?
दोन आठवडे झाले, माझ्या उजव्या पायात इथे दाखवले आहे त्या आकृतीनुसार "इनर आर्च" दुखते आहे.
बहुतेक ती नस दुखत असावी कारण अध्येमध्ये कळ मांडीपर्यंत जाणवते.
कळ सहन करणेबल असल्याने अंगावरच काढले जात आहे.
अण्णांना झोपेचे इंजेक्शन दिले
अण्णांना झोपेचे इंजेक्शन दिले आणि त्यांच्या मांडीतून एक कॅथेटर नावाची छोटी नळी हृदयातून पुढे सरकवून त्या अडकलेल्या गाठीपर्यंत सरकवली आणि तिथेच स्थिर केली.
>>>>>>>>>>>>
मांडीतून थेट हृद्यापर्यंत.. म्हणजे कंबर पोट वगैरे पार करत ??
डॉक्टर खूप छान लेख.
डॉक्टर खूप छान लेख. डोळ्यासमोर् प्रसंग उभा राह्तो वाचत असताना.
स्मित आणि समीर बद्दल वाचून
स्मित आणि समीर बद्दल वाचून वाईट वाटले . गाठ अशी एका दिवसात तयार होते का ? आधीपासून सुरवात झाली असेल आणि समीरने त्याच्याकडे दुर्लक्ष केल. अन्न बरे झाले म्हणून समाधान वाटलं .
पण … १ गोष्ट खटकली .
केव्हडा मोठा अन्याय केला होता देवाने बिचार्या स्मितावर >>> इथे देवाचा काय संबंध ? देवाने सांगितलं होतं का समीरला त्याच्या दुखणाऱ्या पायाकडे लक्ष न द्यायला . असं काही झालं कि लगेच देवाच्या नावाने ओरडायचं . चांगलं काही झालं कि देवाची आठवण येते का ? काही लोक तर देवावर विश्वास सुधा ठेवत नाहीत . पाप कर्म करताना जरासुद्धा विचार करत नाहीत आणि शिक्षा झाली कि देवाच्या नावाने बोंबलत बसतात . समीर आणि स्मिता च्या पूर्व कर्मांबद्दल काहीही माहित नसताना ते धुतल्या तांदळासारखे निष्पाप होते आणि देवाने त्यांच्यावर अन्याय केला हा निष्कर्ष कसा काढला ?
<< बोटाला लावलेल्या पल्स
<< बोटाला लावलेल्या पल्स ओक्सिजेन मीटरवर रीडिंग होते फक्त ८०% ! बीपी मात्र नॉर्मल होते. >>
ऑक्सिजन मीटरवरील रीडिंग सर्वसाधारणपणे किती असावे? एकदा तपासणी शिबीरात माझे ९८% आले होते तरी डॉक्टरांनी ते कमी आहे असे सांगितले. त्यांच्या मते ते नेहमीच १००% असायला हवे. हे खरे आहे का? मी वयाच्या २० व्या वर्षापासून (सध्याचे वय ३७ वर्षे) वेगन आहारशैलीचा (मध, दूध व दूग्धजन्य आणि इतर कुठल्याही प्राणिज पदार्थांचा वापर वर्ज्य असलेला आहार) अवलंब करीत असल्याने माझी ऑक्सिज अॅब्सॉर्बिंग कपॅसिटी कमी आहे असा डॉक्टरांचा तर्क होता.
त्याचप्रमाणे कधीही माझा रक्तदाब मोजल्यास १२०/८० भरत नाही, ११०/८०, ११०/७० किंवा १००/६० भरतो पण ह्याबद्दल काळजीचे कारण नाही असे डॉक्टर सांगतात ते योग्य आहे काय?
खुप छान लेख आहे.. माझे आई
खुप छान लेख आहे..
माझे आई बाबा नेहमी गावी जात असतात.. किमान १० तास प्रवास असतो..
१) त्यानी काय काळजी घ्यायला हवी..
२) बस च्या प्रवासामुळे पल्मोनरी एम्बोलिझम होउ शकतो का??
उत्तम लेख - माहितीपूर्ण आणि
उत्तम लेख - माहितीपूर्ण आणि ओघवत्या भाषेत.
Pages