हेऽऽ श्यामसुंदर राजसा...मनमोहना !

Submitted by चैतन्य दीक्षित on 7 February, 2015 - 09:04

'ती' एक गोपिका. संध्याकाळची यमुनाकाठी गेली असता दुरून बासरीचे स्वर तिच्या कानी पडले आणि तिला स्वत:चा विसर पडला. त्या सुरांच्या दिशेनं ती यमुनेपासून दूर घनदाट वनांत कशी गेली हे तिचं तिलाही समजलं नाही. तिथे तिला बासरी वाजवत असलेला कान्हा दिसला, त्याने तिचा हात धरला आणि तीही क्षणभर मोहात पडली. दुसर्‍या क्षणी मात्र तिला जाणवलं की ती एकटीच खूप दूरवर आली आहे. तिला कृष्णासोबत इतक्या दूरवर आलेलं कुणी पाहिलं तर???
एकीकडे हवाहवासा वाटणारा कृष्णाचा सहवास तर दुसरीकडे लोकलज्जा ! अशा वेळी स्वतःला नक्की काय पाहिजे हे ठरवता न येऊन तिला कृष्णाच्या जवळ असण्याचाच त्रास होऊ लागला. अंतःकरण पिळवटून निघालं. या सगळ्या भावना कृष्णाला तिच्याकडे नुसतं बघूनही उमगल्या आणि तो नेहमीसारखाच गूढ हसला. त्याच्या हसण्याने तिची हॄदयव्यथा अजून तीव्र झाली. आपल्याला कृष्ण हवा आहे, हे कृष्णालाही कळलंय याचाही तिला साश्चर्य राग आला ..अर्थात लटकाच. मग कृष्णाला खोटं पाडण्यासाठीच जणू ती असं भासवू लागली की तिला कृष्णाचा सहवास नको आहे आणि तरीही कृष्णानंच तिला थांबवून ठेवलंय. आणि आपल्याला हे असं भासवावं लागतंय याचाही काहीसा त्रागा करत ती म्हणाली ... "हे श्यामसुंदर राजसा...मनमोहना, विनवुनी सांगते तुज, जाऊ दे मला परतुनी |"
हे ऐकून कृष्ण अजूनच गूढ हसला. तिचा हात तो सोडणार नाहिये हेच त्या हास्याने सूचित केलं. ते उमगून आता ती एक एक कारणं सांगू पाहतेय. "गांव गोकुळ दूर राहे, दूर यमुना-नीर वाहे, हरवले मी कसे मज ? चालले कुठे घन वनी?" कारण "पावरीचा सूर भिडला, मजसि माझा विसर पडला, नकळता पाउले मम राहिली इथे थबकुनी".... हे मनमोहना, तुझ्या पावरीच्या सुरांमुळे मी इतक्या दूर घन वनांत आले. त्या सुरांनी मोहिनीच अशी घातली की मी स्वतःला अक्षरशः विसरले आणि माझी पावलं इथेच थबकली." नाही तर मी इतक्या लांब आलेच नसते असा त्यातला लपलेला अर्थ!
एवढंच कृष्णाला पटणार नाही हे ठाऊक असल्याने तिने अनिच्छेनेच पण मनाशी अगदी खोल असलेली भीती बोलून दाखवली. कृष्णही असा मनातलं सगळं बोलायला लावणारा ! ती म्हणते 'पानजाळी सळसळे का? भिवविती रे लाख शंका.' वार्यानंच पानं हालतायत पण मला मात्र अगदी लक्ष शंकांनी घाबरवून सोडलंय. त्या झुडुपाआड कुणी नसेल ना? मला इथे तुझ्याबरोबर एकांतात असलेलं कुणी पाहात तर नसेल ना? अशा त्या शंका.
त्या शंकांनी "थरथरे बावरे मन, संगती सखी न च कुणी"...हे माझंच बावरं मन आहे जे मलाच येत असलेल्या शकांनी थरथरतंय. माझ्याबरोबर माझी कुणी सखी असती तर त्या शंकांना वाव मिळाला नसता, पण मी तर एकटीच आहे इथे.म्हणूनच "हे श्यामसुंदर राजसा, मनमोहना, विनवुनी सांगते तुज, जाऊ दे मला परतुनी"!

किशोरीताईंनी गायलेल्या दोनच भावगीतांपैकी हे एक. जाईन विचारित रानफुला हे दुसरं भावगीत. दोन्ही भावगीतांची भावनेची जातकुळी पूर्णतः भिन्न. या गीताचे शब्द शांताबाईंना कसे सुचले असावेत? त्यामागे ह्या वर लिहिल्यात त्याच भावना असाव्यात का? हे माहिती नाही. पण गाणं ऐकताना ही केवळ एका गोपिकेची किंवा राधेची कृष्णाकडे केलेली विनवणी नसावी हेच सारखं वाटत राहतं. भावनांची असंख्य आंदोलनं ह्या तीन कडव्यांत एकवटली आहेत खास !
गाण्याच्या सांगीतिक बाजूकडे बघावं तर ते हिमालयासारखं वाटू लागतं. जितका हिमालय लांबून आकर्ष़क वाटतो तितकाच तो जवळ गेल्यावर अवघड आणि अवाढव्य ! एखादा थेट लागलेला स्वर ऐकू यावा, तो हवाहवासा वाटावा आणि त्याच क्षणी त्या थेटपणामुळे आपल्याला होणार्‍या अस्वस्थतेमुळे काहीसा नकोसा वाटावा, असं कधी कधी होतं हे गाणं ऐकताना. कोणतंही गाणं ऐकताना मला आधी शब्द, त्यांचे अर्थ, त्यातली चमत्कृती दिसते, सूर त्या मानाने नंतर मनाचा ठाव घेतात. हे गाणंही तसंच. यातले सूर पकडू जावं तर गाण्यातले राग ओळखायची केविलवाणी धडपड होते फक्त. गाण्याला निवडलेला रूपक तालही विशेष! चालता चालता प्रत्येक पावलावर जर रूपकाची एक एक मात्रा मोजली तर एकदा सम डाव्या पायावर येईल आणि पुढच्या वेळी ती उजव्या पायावर येईल. गाण्यातले राधेचे भावही काहीसे असेच. एकदा तिला तिथेच थांबावं असंही वाटतंय तर पुढच्याच क्षणी शंकांनी तिचं मन कातर होतंय. दोन कडव्यांच्या मध्ये येणारी बासरी प्रत्येक कडव्यागणिक भावार्त अवस्था अधिक तीव्रपणे दाखवणारी. प्रत्येक कडव्याचा तिसरा भाग (विनवुनी सांगते तुज, नकळता पाउले मम इ.) बहार रागात आहे (हे मला गुरु़जींनी सांगितल्याने मी छातीठोकपणे लिहितोय) बासरीवरही या बहार अंगाचं सा-म वाजतं. तो षड्जावरून येणारा मध्यम प्रत्येक वेळी मनाला अजून कातर करणारा आहे. तानपुरा, स्वरमंडल, तबला आणि कडव्यांच्या मध्ये बासरी इतका मोजकाच वाद्यमेळ असूनही इतकं प्रभावी गाणं होऊ शकतं हे आजच्या नुसत्या वाद्यांचाच भरणा असलेल्या गाण्यांच्या जमान्यात अविश्वसनीयच वाटेल.
या गाण्याची सगळ्यात उच्च बाजू कोणती असेल तर किशोरीताईंचा स्फटिकासारखा शुद्ध, पारदर्शक स्वर ! स्वर हे भाववाही असतात याचा साक्षात्कार या गाण्यात खचितच होतो. भाव निर्माण करण्यासाठी म्हणून मुद्दाम कुठे हरकत घेतली आहे, तानबाजी केली आहे असे नाही. संगीतकाराने तयार केलेली रचना सच्चेपणानं सादर केली गेली आहे इतकंच. ह्या स्वरांत राधेचं प्रेम आहे, मीरेचा भक्तिभाव आहे आणि किशोरीताईंचं स्वतःचं समर्पण!
हे गाणं केवळ गाणं उरतच नाही. ह्यात मनोरंजनमूल्यापेक्षाही अधिक असं शब्दांत सांगता न येण्याजोगं काहीतरी आहे. डोळे मिटून हे गाणं ऐकावं, त्यातलं तंत्र-शास्त्र सगळ्याच्याही पलिकडून कान्ह्याची बासरी ऐकू यावी आणि रोमारोमांत समर्पण भरून रहावं...ह्याहून अधिक काय लिहावे?

-चैतन्य दीक्षित

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप छान मांडलंस चैतन्य.
शामसुंदर आणि रानफुला दोन्ही अत्यंत आवडती गाणी. शाळेत साधारणपणे ७वी ८वीत असताना एका मैत्रिणीच्या तोंडून ऐकलेली. नंतर आकाशवाणीवरून.
या मैत्रिणीची मोठी बहीण त्यावेळी किशोरीताईंकडे शिकत होती.

हे गाणं केवळ गाणं उरतच नाही. ह्यात मनोरंजनमूल्यापेक्षाही अधिक असं शब्दांत सांगता न येण्याजोगं काहीतरी आहे. डोळे मिटून हे गाणं ऐकावं, त्यातलं तंत्र-शास्त्र सगळ्याच्याही पलिकडून कान्ह्याची बासरी ऐकू यावी आणि रोमारोमांत समर्पण भरून रहावं>>>>>> +१११११११११११११
कसलं भारी लिहीलयंस. काय बोलणार मी यावर? आधीच किशोरीताई म्हणजे माझं दैवत, त्यात तू त्यांच्या इतक्या अलवार गाण्यविषयी लिहीलंयंस. परत परत वाचला हा लेख .मस्त मस्त मस्त मस्त आणि मस्तच!

शांताबाईंबद्दल बोललायस ते अगदी खरंय.कसे सुचले असतील हे शब्द त्याना. वर हृदयनाथांची सुंदर चाल. आणि किशोरीताईनी त्यात ओतलेला प्राण. योगायोग म्हणजे स्वतः किशोरी म्हणजे सुद्धा राधाच! Happy

मला जे भावलं ते पण लिहु का? लिहीतोच. "पानजाळी सळसळे का? भिवविती रे लाख शंका" मधल्या "सळसळे" मधुन पानांची सळसळ आणि "भिवविते" मधुन मनाची चलबिचल अवस्था हे ताईंच्या स्वरांतुन कळतं. "दूर यमुना-नीर वाहे" तर असं म्हटलंय की जणु त्या नीरावर उठणारे तरंगच! "थरथरे बावरे मन" मधुन कातर मन दाखवायला तर निव्वळ किशोरीताईंचाच गळा हवा! "विनवुनी" मधली "नी" वरची हरकत पण गोल आवाजातही म्हणता आली असती, पण ताईंनी तिथे स्वर असे उडते घेतलेत की त्यातुन हुरहुर म्हणजे काय ते कळते असं वाटतं.

या गाण्यविषयी इतक्या कळकळीनं लिहीलंस, त्यासाठी थांकु Happy

चैतन्य आणि कुलु ह्या दोन संगीतप्रेमींचे या विषयावरील सखोल आणि प्रेमाने न्हाऊन निघालेला अभ्यास पाहिला वाचला म्हणजे माझ्यासारखा त्रयस्थ फक्त हेच म्हणत राहील..."लिहा रे...अजूनी असेच लिहा...द्या आम्हाला हा आनंद....वारंवार...". ईश्वरी वरदहस्त ज्या गायक गायिकांना, कवी आणि संगीतकारांना लाभला आहे त्यांच्याकडून जेव्हा अशी गीते समोर येतात त्यावेळीही मंत्रमुग्ध होऊन त्या आनंदडोहात आम्ही उतरतोच, पण आता त्याच्यासोबतीने जेव्हा अशा सदस्यांनी आपल्या अभ्यासानी केलेली शब्दांची मांडणी वाचायला मिळते त्यावेळी जणू ते दृष्य अक्षरशः जिवंत समोर उभे राहते.

चैतन्य...फार गुंतला आहेस तू ह्या राधेच्या विनवणीत....तुझे लेखन नाही हे, तर ते आहे प्रत्यक्ष राधेने तुझ्याकडे कृष्णाविषयी केलेले हितगुजच होय....ज्याला तू शब्दरूप दिले आहेस....दिले आहेसही इतके देखणे की वाटत राहते ते संपूच नये.

असाच फुलत राहा....नावाप्रमाणे सदैव चैतन्याने बहरलेल्या झाडासारखा...!

सगळा लेख वाचताना जियो, जियो असं ह्रदय पुकारत होतं आणि वाणीवाटे एकही शब्द फुटत नव्हता ....

......... केवळ डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले या अप्रतिम लेखानं ....

सगळ्यांचे प्रतिसादही सुरेखच ....

लिहित राहा यार ...

सुंदर उतरवलंत त्या गीतात आम्हाला चैतन्य .
कुलुचा प्रतिसादही आवडला.
परिणामी किशोरीताई गातात तेव्हा ती नायिका प्रखर बुद्धिमतीही असल्याचीही एक प्रभावी जाणीव होत राहाते ..

"...परिणामी किशोरीताई गातात तेव्हा ती नायिका प्रखर बुद्धिमतीही असल्याचीही एक प्रभावी जाणीव होत राहाते ..."

~ इथे भारती दिसतात प्रकर्षाने. प्रतिसादातील एखादे वाक्य हृदयाला कसे भिडू शकते त्याचेच हे लखलखीत उदाहरण.

ग्रेट यू आर भारती.

परिणामी किशोरीताई गातात तेव्हा ती नायिका प्रखर बुद्धिमतीही असल्याचीही एक प्रभावी जाणीव होत राहाते>>>>>+१११११११११ अगदी मस्त सांगितलंस ताई.
इथे किशोरीताईंच्या प्रखर बुद्धिमत्तेची छाया नायिकेवर नक्कीच पडलीय!

वा चैतन्य, किती हळुवार लिहिलयस. राधेची तगमग आलीय सगळी.
आणि शेवटचा परिच्छेद, वा क्या बात है ___/\___

प्ररिसादाबद्दल सर्वांचे मनापासून आभार!
kulu,तूही छान लिहिलंयस तुला भावलं ते.
अशोक मामा, पुरंदरे काका...तुमच्या कौतुकाने गहिवरुन येतं!
भारतीताई, गाणाऱ्याचं व्यक्तिमत्व गाण्यात उतरतं असं म्हणतात त्यामुळे किशोरीताईंच्या कोणत्याही गाण्यात प्रखर बुद्धिमत्ता जाणवतेच.
पुनश्च सर्वांना धन्यवाद!

तुझे लेखन नाही हे, तर ते आहे प्रत्यक्ष राधेने तुझ्याकडे कृष्णाविषयी केलेले हितगुजच होय....ज्याला तू शब्दरूप दिले आहेस....दिले आहेसही इतके देखणे की वाटत राहते ते संपूच नये.>>>>> अगदी अगदी!!
फारच तरल!!...............

अप्रतिम लिहिले आहे! दिवसाची सुंदर सुरुवात झाली, धन्यवाद!
'अर्धसत्य' मध्ये एके ठिकाणी रेडीओवरती पार्श्वभूमीला हेच गाणे वाजत असते.

प्रत्येक नव्या दिवसाची सुरूवात "हेss श्यामसुंदर..." लेखावर आलेल्या प्रतिक्रिया वाचनाने होते आहे हे मला फार भावत आहे. पुढील सारा दिवस एका स्वप्नील गोडीत जायला लागतो. लेखामुळे आनंद मिळतोच पण त्यावर येत असलेल्या देखण्या प्रतिक्रियाही त्या आनंदात भर घालत आहे हे या लेखाचे वैशिष्ट्य बनत चालले आहे. नक्कीच चैतन्यला हा प्रोत्साहनपर अनुभव वाटत असेल यात संदेह नाही.

आगाऊ...."अर्धसत्य" ची तुम्हाला या निमित्ताने आठवण व्हावी म्हणजे तुमच्या मनीही किशोरीताईंचे हे भावगीत किती रुतले आहे त्याचे एक सुंदर उदाहरण होय.

सायली....धन्यवाद देत असताना मी असेच म्हणेन की चैतन्यसोबत कुलदीपच्या (kulu) लिखाणाचाही तुम्ही प्राधान्याने आढावा घ्या....हा मुलगादेखील शास्त्रीय संगीत विषयावर अत्यंत तरलतेने लिहित असतो. फार अभ्यासू आहेत हे दोन्ही युवक.

पुन्हा एकदा सर्वांचे प्रतिसादाबद्दल आभार!
अशोक मामा, किती अकृत्रिम कौतुक करता तुम्ही..☺

लेख छान आहे.

जितके श्रेय किशोरी आमोणकरांना तितकेच श्रेय शांताबाई आणि पं ह्रदयनाथांनाही द्यायला हवे. ( माझ्या मते )

अप्रतिम निरूपण. हे माझं एक अतिशय लाडकं गाणं. त्याचा इतका सुंदर रसास्वाद कधी वाचण्या-ऐकण्यात आला नव्हता. 'दाद' यांची आठवण होणं स्वाभाविक. आत्ता पर्यंत मायबोलीवर अशी रसरशीत निरुपणं फक्त त्यांचीच यायची, म्हणून, केबळ. एरव्ही चैतन्याची शैली अगदी स्वतःचीच आहे आणि अतिशय प्रभावी आहे. भविष्यात खूप अपेक्षा आहेत, याची नोंद घ्यावी.
प्रभाकर (बापू) करंदीकर.

बुवा ! __/\__ बस एवढेच करू शकतो ! कारण लेख वाचल्यावर काय वाटते ते सांगायला शब्दच नाहीत.

नितीनचंद्रजी, अगदी मान्य. गाण्याला योजलेल्या तालाबद्दल लिहिताना संगीतकार हृदयानाथांच्याच कल्पकतेबद्दल लिहिले आहे, परंतु त्यांचा नामोल्लेख तिथे व्हायला हवा होता तो झाला नाही.
दिनेशदा, प्रभाकरजी, महेश,
धन्यवाद ☺
दिनेशदा,सुचेल तसे नक्की लिहीन.
प्रभाकरजी, दाद यांचे गानभुली चे लेखनच माझ्या लेखनामागची प्रेरणा आहे खरे.
किंबहुना, अजून त्यांनी हा लेख वचला नाही असे दिसते. त्यांच्या प्रतिक्रियेची वाट बघतोय मी प्रामाणिकपणे.._/\_

कसं शब्दांपलिकडंही शब्दांत मांडून गेलायस, चैतन्य... जियो. खूप आवडला लेख. घरी जाऊन पुन्हा एकदा वाचला. सुरेख लिहिलायस, रे.
माझं एक खूप खूप आवडीचं गाणं आहे हे.. प्रचंड आहे सगळच ह्या गाण्यातलं. किशोरीताईं आणि गाणं जणू एकमेकांसाठीच घडलेत असा समसमासंयोग आहे. म्हणजे दुसर्‍या कुणाला हे पेललं असतं? असं वाटत रहातं.

कुलुनं लिहिलय तसं लिहायचा मोह आवरत नाहीये... पान जाळी सळसळे का... ह्या मधे ’सळसळे’ हे ऑफ़ बीट घेतलय... समेनंतर किंचित थांबून. इतका विलक्षण परिणाम घडवून आणलाय ह्यानं. हुरहुरलं मन, राना-वनात आल्याची किंचित भीती, पुढच्या भिववणार्‍या लाख शंकांची ही नांदीच. हा विचार हृदयनाथांचा की किशोरीताईंचा माहीत नाही. पण खास आहे.
तसं बघायला गेलं तर जवळ जवळ सगळ्याच ओळी ऑफ़ बीट उचलल्यात. तरीही ही जागा मला खास वाटते.

भारतीचं निरिक्षण किती नेमकं आहे... कुठेतरी किशोरीताईंच्या गाण्यात वावरलेली ही गोपिका ’एक बुद्धीमान गोपिका’ वाटते. ती टाळता आली असती का, असं वाटत मला रहातं...
आता... गोपिका बुद्धिमान असायला काय हरकत आहे... असंही म्हणेल कुणीतरी. पण, ह्या गाण्यातली गोपी तशी नाही वाटत. जरी ती ओढीनं आली असली तरी ती ’निडर’ (आजच्या भाषेत बिन्धास्त) वाटत नाही. तिचं हे करणं ’बुद्ध्याच’ नाही वाटत.. किंबहुना आपण गाव-पाणवठा सोडून इथे कसल्या भुलीनं आलोय ह्यानं ती संभ्रमित आहे. आणि बुद्धी गहाण ठेवल्याविना असं वागणं शक्यं झालं नसतं.

किशोरीताईंचं गाणं ऐकल्यावर ते ’किशोरीताईंचं अस्तं’ असं मला नेहमी वाटतं. म्हणजे गाण्याच्या भावावरही त्यांच्या स्व’स्तित्वाची सावली असतेच. त्यांच्या प्रखर बुद्धिमत्तेची छाप असतेच असते. ह्यात त्यांच्या तीक्ष्णं अन सानुनासिक स्वरलगावाचा भाग नाही येत.
<<भारतीताई, गाणाऱ्याचं व्यक्तिमत्व गाण्यात उतरतं असं म्हणतात त्यामुळे किशोरीताईंच्या कोणत्याही गाण्यात प्रखर बुद्धिमत्ता जाणवतेच>> चैतन्य म्हणतोय तशा त्या उतरतातच गाण्यात.

पण व्यक्तित्वं सांडून हे गाणं गाता येणं किशोरीताईंना शक्यं झालं असतं? किंबहुना मी जो मुद्दा इथे चर्चिते आहे (भारतीनं मांडलेला) तो गायिकेच्या, संगितकाराच्या ध्यानी आला असेल?
"किशोरीताईंना शक्यं " ह्यावर इथे गदारोळ उठण्याची शक्यता आहे. मी किशोरीताईंची, त्यांच्या गाण्याची चाहती आहे... तरीही ही चर्चा करण्याजोगी बाब आहे.

उदा. लताबाईंची काही "छप्परतोड" गाणी मला आशाबाईंनी किती शेमले-फ़ेटे गायली असती असं वारंवार वाटतं. लिहिण्याच्या फ़ंदात ’व्यक्तित्वं सांडून गाणं’ लिहून गेले खरं... पण असं खरच शक्यं आहे का? सर्वस्वी गाण्यातल्या भावाचं होऊन गाणं?

Pages