घरपोच भाजीपाला व्यवसाय- सल्ला हवा आहे

Submitted by टोच्या on 28 January, 2015 - 06:17

बहुतांश लोक दारावर जो येतो तो भाजीपाला घेतात किंवा तो खरेदी करण्यासाठी बाजारात किंवा मंडईत जावे लागते. बहुतांश वेळा हा भाजीपाला दुय्यम दर्जाचा असतो. कारण प्रथम दर्जाचा माल बाजारसमितीतून इतर राज्यांत किंवा परदेशांत जातो. त्यामुळे जो मिळेल, तोच भाजीपाला बहुतेकांना खावा लागतो. यासाठी माझ्या डोक्यात गेल्या सहा-सात वर्षांपासून शेतकऱ्यांकडून घेऊन ताजा भाजीपाला ग्राहकांना घरपोच देण्याची कल्पना आहे आणि यात जम बसल्यास हाच व्यवसाय पुढे वाढविण्याची इच्छा आहे. सध्या माझ्याकडे अर्धा दिवस वेळ असतो. पुढे मी पूर्णवेळ त्यात उतरण्याचे ठरविले आहे. कारण भविष्यात भाजीपाल्याची मागणी कधीच कमी होणार नाही. नाशिकमध्ये याआधीही एका कंपनीने असा प्रयोग सुरू केला आहे. पण लोकांची वाढती संख्या आणि मागणी पाहता यात खूपच स्कोप असल्यासारखे वाटते. भाजीपाल्याची ऑनलाइन किंवा व्हॉट्स अॅपवर माहिती नोंदवून तो घरपोच पोहचविण्याची योजना आहे. असा व्यवसाय याआधी कुणी केला असल्यास त्यातले फायदे, तोटे, धोके काय आहेत, याविषयी चर्चा करता येईल. तसेच या ‌व्यवसायाला पुढे खरेच किती स्कोप आहे, यात आणखी काय नवीन करता येईल याबद्दलही जाणकारांकडून माहिती मिळू शकेल. कृपया यासंदर्भात मायबोलीकरांनी आपले अनुभव शेअर करावेत, सल्ला द्यावा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

www.go4fresh.in इथुन् मी ब-याचदा भाजी घेतलीय. यांच्या पालेभाज्या उत्तम आहेत. या अनुभवावरुन मला तरी वाटले की तुम्ही जर चांगली भाजी देत असाल तर तुमचा ग्राहकवर्ग भराभर वाढेल.

या क्षेत्रातही आता स्पर्धा खुप वाढलीय. इथे मुम्बईत आणि नवि मुंबईत ४-५ तरी साईट्स आहेत भाज्या सप्पाय करणा-या. नवनविन मंडळी यात येताहेत म्हणजे निश्चितच स्कोप भरपुर आहे.

मी जेव्हा या साईटवरुन भाजी घेत होते तेव्हा मंडईत जायचा वेळ वाचत होता याचे बरेच सुख वाटत होते. सध्या घेत नाही कारण घरी माणसे कमी असल्याने भाजी फ्रिजमध्ये पडुन राहते. पण एकुणच लोकांपाशी असलेली वेळेची कमतरता लक्षात घेता ऑनलाईन भाजी विकण्यचा धंदा खुप चांगला चालेल यात शंका नहई.

फक्त इंफ्रास्ट्रक्चर मजबुत बांधायला हवे. चांगला माल, सांगितलेल्या वेळी डिलिवरी, दिवसातुन सोयीचे असे ३-४ डिलिवरीचे स्लॉट, सकाळी खुप लवकर किंबा रात्री उशिरापर्यंत डिलिवरी करायची तयारी इत्यादी गोष्टी जर जमल्या तर उत्तम धंदा होईल.

काही ऑनलाईन मंडळी ऑर्गनीक सप्प्लाय करतात. त्यांच्या भाज्या कैच्याकै महाग आहेत.

मुलं लहान असताना मी सुद्धा भाज्या घरपोच डिलीवरी घ्यायची(अमेरीकेत).

त्यामुळे भारतात सुद्धा(मुंबईत), असे सुरु झालेले एकून बरे वाटले. माझे काका घेतात फ्रेश बास्केट मधून का काय. लक्षात नाही नाव. पण चांगले असते. ऑनलाईन आहे. पैसे मात्र दारात द्यायचे ते कंटाळवाणं आहे.

महाग असते पण कायच्याकाय(इति काय)

साधना, तुम्ही पालेभाज्या घेतल्या तो अनुभव चांगला होता का?
आणि किंमत कशी असते.

-------------------------------
पुण्यात अश्या भाजी डिलीवरी असलेल्या साईटची लिंक कोणाला अनुभव असल्यास द्या.

पालेभाज्या अप्रतिम होत्या. आणि व्यवस्थित निवडलेल्या असत. म्हणजे अगदी आपण भाजीसाठी निवडतो तेवढ्या नाहीत पण बाजारात कधीकधी गवताच्या काड्या येतात तसा प्रकार नाही आणि मुळे छाटलेली. भाज्यांच्या चवीही चांगल्या होत्या. या भाज्या ऑर्गीनिक नव्हत्या पण कमितकमी किटकनाशके फवारुन वाढवलेल्या होत्या असे साईटवर होते.

इतर भाज्याही चांगल्या होत्या पण अधुनमधुन थोडी क्वालीटी कमी व्हायची. मे महिन्यात मात्र वाट लागली त्यांची. चांगल्या पालेभाज्या पुरवणे खुप कठिण झाले बहुतेक कारण दर्जा खुप खालावला. पण तेवढा वाईट काळ गेल्यानंतर दर्जा परत सुधारला.

फळे पण चांगली असायची. मी आताही घेते अधुन मधुन या साईटवरुन.

बिग बास्केट्. कॉम किंवा तत्सम साय्टींवरून खूप भाज्या विकल्या जातात. अश्यांना सप्ल्याय करायचे काम घेतले तर पहिले काही महिने धंद्याचा अंदाज येइल. भाजी स्वस्त आणि बाकीचे ओव्हरहेड जास्त असा हा धंदा आहे. सर्विस चार्जेस मुळे भाजी बाजारातल्या पेक्षा महाग पडते. ते पे करणारे ग्राहक पाहिजेत. नाहीतर धंद्यात रिटर्नस कमी आहेत.

धनश्री,
>>संपर्कातून माहीती कळवलीय.मेल चेक करा.
धन्यवाद. या तुम्ही सुचविलेले फेसबुक पेज पाहिले. या पेजवरही ही लिंक पेस्ट केलेली आहे. या पेजवरील काही तरूण शेतकऱ्यांशी चर्चा करता येईल. त्यातून आणखी नवीन इनपुट्स मिळतील.

झंपी,
आपण सांगितल्याप्रमाणे मी एक प्रश्नावली छापून घेतली आहे. पण अद्याप सर्वेला सुरुवात केलेली नाही. मी राहतो त्या परिसरातच बऱ्यापैकी समृध्द लोक राहतात. सुरुवातीला अतिशय कमी प्रमाणात, कमी भांडवलावर हा व्यवसाय सुरू करणार आहे. लाइन बसल्यावर मग तो वाढविण्याचा विचार आहे. आपण सांगितल्याप्रमाणे नक्कीच सर्व बाजूंनी विचार करीन. धन्यवाद.

साधना,
>>मी जेव्हा या साईटवरुन भाजी घेत होते तेव्हा मंडईत जायचा वेळ वाचत होता याचे बरेच सुख वाटत होते. सध्या घेत नाही कारण घरी माणसे कमी असल्याने भाजी फ्रिजमध्ये पडुन राहते. पण एकुणच लोकांपाशी असलेली वेळेची कमतरता लक्षात घेता ऑनलाईन भाजी विकण्यचा धंदा खुप चांगला चालेल यात शंका नहई<<
अगदी. एका घरी आठवड्यातून दोन वेळा डिलीव्हरी देता येऊ शकेल. भाजीबाजारात जाण्यासाठीचा वेळ, पेट्रोल आणि श्रम यातही यामुळे बचत होईल. ज्यांच्याकडे पैसे आहेत पण वेळ नाही, असे लोक नक्कीच माझे ग्राहक होतील, अशी अपेक्षा आहे.
अमा,
मुंबईसारख्या शहरात ज्या भाज्या येतात, त्या नाशिकहूनच येतात. त्यामुळे त्या शेतकरी, घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी आणि संबंधित साईट्स या मार्गानेच येतात. त्यामुळे त्यात वाहतूक खर्च, व्यापाऱ्यांचा नफा आणि संबंधित साईटचा नफा हे सर्व मिळून महाग पडत असेल. पण इथे ही मधली साखळीच टाळण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे थोडं स्वस्तात देता येऊ शकेल. रिटर्न्स कमी आहेत, पण क्वांटिटी वाढली तर तुलनेने नफा वाढेल.

टोच्या साहेब...
तुम्ही ज्या कामाची चौकशी करत आहात ते प्रचन्ड मेहनत आणि चिकाटीने करण्याचे काम आहे. सगळ्यात आधि एक छोटा भौगोलिक एरिया निवडा ...तेथे लहान प्रमाणात प्रयोग करा आणि मगच आलेल्या अनुभवावर पुढिल दिशा ठरवा...

शुभेच्छा !!

गणोबा,
<<तुम्ही ज्या कामाची चौकशी करत आहात ते प्रचन्ड मेहनत आणि चिकाटीने करण्याचे काम आहे. सगळ्यात आधि एक छोटा भौगोलिक एरिया निवडा >>
नक्कीच. म्हणूनच मी केवळ मी राहतो तो परिसर सुरुवातीला निवडणार आहे. त्या अनुभवावर पुढील विस्ताराचा विचार आहे. मेहनत आणि चिकाटी लागेलच. त्याशिवाय कुठलाच व्यवसाय यशस्वी होऊ शकत नाही. धन्यवाद.

सध्या माझ्याकडे अर्धा दिवस वेळ असतो. पुढे मी पूर्णवेळ त्यात उतरण्याचे ठरविले आहे. >>

हा अ‍ॅप्रोच नाही म्हटलं तरी थोडा खटकला. काही वेळा काही व्यवसाय अर्धवेळ करण्यासारखे असतात हे मान्य पण प्रत्येकाला ते शक्य होईल काही शंका वाटते. तुम्हाला मार्केट सर्व्हे करण्याची आणि धंदा नुकसानीत जाऊ नये म्हणून एखाद्या एक्स्पर्टची मदत घेण्याची गरज आहे. तुम्ही भाज्या निवडणार, चिरणार, पॅकिंग करणार आणि घरपोच देणार यासाठी खर्च येतो (हे काम स्वतः केले म्हणून फुकट असे समजून दर ठरवू नका. सर्विसेस, डिझेल फ्री नसतात). लोकांचं काम वाचत असेल, वेळ वाचत असेल आणि घरपोच भाज्या मिळत असतील तर ते दराकडे पाहणार नाहीत. अशाच ठिकाणी लक्ष द्यावे. पुण्यात मावशीकडे एकजण अशा भाज्या देतो. त्याची मारुती व्हॅन आहे. दर चढा आहे पण लोकांना ते बरं पडतं. रोज वेगळी भाजी आणि महीन्याला बिल. सुरुवातीला डिपॉझिट घेतात मात्र !

वीणा सुरू,
<<हा अ‍ॅप्रोच नाही म्हटलं तरी थोडा खटकला. काही वेळा काही व्यवसाय अर्धवेळ करण्यासारखे असतात हे मान्य पण प्रत्येकाला ते शक्य होईल काही शंका वाटते. >>
तुमचे म्हणणे बरोबर आहे. पण उत्पन्नाचा दुसरा कुठलाच सोर्स नसताना नोकरी सोडून नवीन व्यवसायात उडी मारणे म्हणजे पायावर धोंडा पाडून घेणे. त्यामुळे असलेल्या वेळेचा पुरेपूर वापर करून घेऊन सुरुवातीला थोडया प्रमाणावर व्यवसाय सुरू करणार आहे. कारण एकदम मोठ्या प्रमाणात तो सुरुवातीला शक्यच नाही. एकदा जम बसला की मग पूर्णवेळ देता येईल. मी वर म्हटल्याप्रमाणे सुरुवातीला फक्त ताज्या भाज्या पुरवणार आहे. रेडी टू कूकचा पर्याय नंतरचा आहे. वाहतुक, मनुष्यबळ यासाठी खर्च आहेच. त्याचा अंदाज घेऊनच दर ठरवावे लागतील. मार्केट सव्र्हेसाठी मी फॉर्म छापून घेतले आहेत. लवकरच सुरुवात करीन. तुम्ही म्हटल्याप्रमाणे एखाद्या वाहनाची गरज आहेच. हे सर्व जमता जमता वर्ष निघून जाईल. पण वर्षभरापर्यंत व्यवसाय सेट झालेला असेल, अशी माझी अपेक्षा आहे. या सर्व गोष्टी लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद.

चांगला विचार आहे तुमचा.

मी ९८-९९ या काळात दोन वर्षे घरपोच भाजी घेत होते. पण चिरलेली.
फळभाजी असेल तर चिरुन, पालेभाजी निवडून येई.. सोबत त्या भाजीची ब-यापैकी तयारी आणि दुस-या पॅकेटमधे सॅलडही देत असत . दररोज. उदा. अळूची पाने, थोडा चुका, भिजवलेले डाळ-दाणे-कढीलिंब-ओल्या खोब-याचे तुकडे वगैरे मुख्य पाकिटात आणि एक टोमॅटो-काकडी-गाजर-बीट-सॅलडपाने यापैकी २-३ गोष्टी प्रत्येकी एक दुस-या छोट्या पाकिटात. व्हरायटी खुप होती. शनिवारी वेगळा प्रकार असायचा. डोशाचं किंवा इडलीचं ओलं पीठ / कोथिंबीरवडीचे उकडलेले मुटके / भिजवलेला थालीपीठ भाजणीचा गोळा / अळूवडीच्या थाप्या वगैरे.

दर महिन्याला ते त्या महिन्याचा भाजीच्या मेनूचं पत्रक द्यायचे. त्यात कोणत्या दिवशी कोणत्या भाज्या, कोणत्या शनिवारी काय प्रकार ते लिहिलेलं असे. त्यामुळे भाज्या कोणत्या ते आधी माहित असायचं. साधारण संध्याकाळी पाकिटं येऊन पडायची. दारावर त्यासाठी मी पिशवी अडकवलेली असे. माझ्याकडे पाहुणे असतील तर दुपारीच मी त्यांना फोन करुन जास्तीचं पाठवायला सांगायची. कांदे-बटाटे ८-१५ दिवसातून कधीतरी एकदा यायचे. पण ते पुरवठी पडण्याइतके नसल्यामुळे तेवढे घरी जास्तीचे आणले जात.

तेव्हा महिन्याचे रु. ३५०/- चार्जेस होते. श्री. भुसारी नावाचे गृहस्थ आप्पा बळवंत चौकातून फक्त दोन घरांसाठी थेट सिंहगड रोडला पुरवठा करायचे. स्वच्छ असायची भाजी. आदल्या दिवशी चिरलेली भाजी कधी आली नाही. पालेभाज्याही नीट निवडलेल्या असायच्या. पदार्थ यायचे तेही चवदार होते. शिवाय ऋषीपंचमी, भोगी या भाज्याही साग्रसंगीत असत. पालेभाज्यात सोललेल्या लसणाच्या पाकळ्या कधी चुकल्या नाहीत Happy मोडाची कडधान्यंही येत.

ही खुप मोठी सोय होती खरंतर. पण बाजारात जाऊन डोळे निवत रेंगाळत भाजी बघत आधी न ठरवता दिसेल ते खरेदी करण्यातली मजाच संपली. उद्या काय भाजी करायची हा मेंदूचा स्क्रू संपला तर त्यानंही चुकचुकल्यासारखं व्हायला लागलं. शिवाय सगळं एका दरात असल्यामुळे जशा महाग भाज्या स्वस्त तशा स्वस्त भाज्याही महाग दरात घेणं भाग होतं. नेमका तेव्हाच ऑफिसला पाच दिवसांचा आठवडा सुरू झाला. म्हणुन मग दोन वर्षांनंतर ती बसलेली छान घडी मी मोडून टाकली.

हे मुद्दाम तुम्हाला कल्पना यावी ह म्हणुन विस्तारानं सांगितलं. यातलं काही कल्पक तुम्हालाही तुमच्या योजनेत अॅड करता येईल.

मला वाटते सई यांनी लिहिलेला अनुभव तुम्हाला प्लॅनिन्गसाठी उपयोगी पडू शकेल.
तुम्हीच आधीच ठरवून टाकायचे कोणत्या भाज्या कोणत्या दिवशी किती प्रमाणात तयार ठेवणार.
आणि लोकांना तशी आगाऊ सुचना देऊन ऑर्डर घेऊन ठेवायच्या. किमान २४ तास आधी ऑर्डर मिळाली पाहिजे.
मग त्या प्रमाणात भाज्या निवडून, चिरून तयार ठेवता येऊ शकतील.

माझे दोन आणे:
पुलाव मिक्स महाग वाटते खरे थोडे स्टार डेली/रिलायन्स्/बिग बाझार मधले. पण घाई असेल तेव्हा विकत घेते बिर्याणी वा पुलाव साठी.
बिन्स आणी गवार कधीच घेत नाही कारण शिरा काढलेल्या नसतात आणि खूप मोठे तुकडे असतात. पुलाव मिक्स घरात असले तर त्यातले गाजर प्रमाण कमी करुन पावभाजीला पण वापरता येते.
मोठ्या मार्केटांचे बघून 'अमुक तमुक माता सुपर मार्केट' वाले कोपर्‍यावरचे एका प्रांतातील लोक पण आता प्लॅस्टीक मधे चिरलेल्या भाज्या विकतात. पण स्टोरेज नीट नाही आणि प्लॅस्टिक ला हवेला वाव नाही (थोडीतरी छिद्रे) म्हणून त्यांच्या भाज्या सडून वाया जातात.
चांगल्या प्रतीच्या निवडलेल्या भाज्या पुरवणार्‍या बर्‍याच सेवा औंध्/कोथरुड किंवा दूर भागात आहेत. त्यामुळे आणि ताजेपणा म्हणून स्वतःच भाज्या निवडते. पण वेळेचा अभाव यामुळे गवारीसारख्या भाज्या कमी केल्या जातात.
अशा भाज्या पुरवणार्‍यांनी भाज्या ताज्या राखण्याचे तंत्र, सडू न देण्याची युक्ती आणि भाज्या आपण घरी खाताना कशा निवडतो यावर थोडे डोके वापरुन धंदा करावा (काही जण चालवतात) तर जास्त चालेल असे वाटते.

सई,
अगदी याच पध्दतीने माझं नियोजन होतं. फक्त पूर्ण महिन्यासाठीचं डोक्यात नव्हतं. १९९८-९९ ला मोबाइल नव्हते, त्यामुळे त्यावेळी असे वेळापत्रक बनवणे आवश्यक होते. आता दररोजची मागणी नोंदवणं शक्य आहे. एका घरी दररोज भाजी देण्याऐवजी आठवड्यातून दोन दिवस भाज्या द्यायच्या. त्यात टिकण्याच्या दृष्टीने फळभाजी, पालेभाजी असा क्रम ठेवता येईल. कारण दररोज एक भाजी द्यायला जाणे परवडू शकत नाही. त्यासाठी महिन्याकाठी सर्व्हिस चार्जेस लावावे लागतील. तुम्ही उल्लेख केल्याप्रमाणे महिन्याच्या पॅकेजचा पर्यायही उत्तम आहे. त्यावर नक्कीच विचार करीन.
--
महेश,
अगदी खरं आहे. चोवीस तास आधी ऑर्डर मिळाली तर ती योग्य पध्दतीने पूर्ण करता येईल. धन्यवाद.
--
जागू, अमा, मी-अनू प्रतिसादांबद्दल धन्यवाद.

डिलीवरी चार्जेस वगैरे वेगळे लावतात की दरच वाढवुन त्यात येते?
जास्त मालावर (तुम्हाला परवडत असेल तर) सुट वगैरे देण्याची जाहीरात हे तर तुम्हाला माहीत असेलच. त्यामुळे लोक जास्त माल घेण्याची शक्यता वाढते.

हो, आताच्या काळानुसार आणि ग्राहकांच्या मागणी-सोयीनुसार त्यात आवश्यक ते बदल तुम्हाला करता येतील.

सुरुवात केलीत की इथेही लिहा. पुढे कसा प्रतिसाद येतोय, अडचणी काय येतायत तेही शेअर केलंत तर इथल्या सगळ्यांकडून अनेक सूचना, उपाय मदतीला येतील तुमच्या Happy

तुम्हाला मनःपुर्वक शुभेच्छा Happy

हो, नक्कीच स्कोप आहे याला.
काही लोकांनी पुण्यात सुरु केलं आहे, असं ऐकलयं.
माझ्या आवडीचा विषय.

कुठलाही धंदा सुरु करताना स्वाट अनालिसीस करायला हवं.
तुमच्या स्ट्रेंथ आणि वीकनेस
मार्केट मधले ऑपोर्चुनिटी आणि थ्रेट्स

तुम्हाला किती गुंतवणूक करावी लागेल? परतावा किती मिळेल? खेळते भांडवल किती लागेल? ब्रेक इव्हन कधी होईल? रिस्क काय आहेत? त्या कशा सांभाळणार? तुम्ही एकटेच सगळा डोलारा सांभाळणार की तुमची सपोर्ट सिस्टम आहे? कॉम्पिटिशन किती आहे? कोण आहे? त्यांच्याकडून काय शिकता येईल? त्यांच्यापेक्षा वेगळं काय करता येईल? एंट्री बॅरिअर किती आहे? अजुन ४ जण त्याच एरिआत हाच धंदा करू लागले तर काय? राजकारणी किंवा गुंड यांचा त्रास होईल का? आपल्या धंद्यामुळे ज्यांचा धंदा कमी होईल त्यांचा काही त्रास होईल का? घरच्यांचा पाठिंबा आहे का?

तुम्हाला नाउमेद करायचा विचार नाही पण तुम्ही अर्धवट तयारिनिशि उतरलात तर फटका खाण्याचा संभव जास्त

कालचा घरी एक वर्तमान पत्रातुन जाहीरात होती. या कंपनीने एक अ‍ॅप्लीकेशन बनवले आहे ज्या माध्यमातुन ऑर्डर देता येते. ऑन लाईन पेमेंट करावयाचे आहे. घरपोच डिलिव्हरी केवळ भाजीपाला नाही तर ग्रोसरी सुध्दा असा बिझनेस प्लॅन आहे.

कालचा घरी एक वर्तमान पत्रातुन जाहीरात होती. या कंपनीने एक अ‍ॅप्लीकेशन बनवले आहे ज्या माध्यमातुन ऑर्डर देता येते. ऑन लाईन पेमेंट करावयाचे आहे. घरपोच डिलिव्हरी केवळ भाजीपाला नाही तर ग्रोसरी सुध्दा असा बिझनेस प्लॅन आहे.

टग्या, आपण मांडलेले मुद्दे खूपच कळीचे आहेत. या सर्वांचा विचार करणे खरंच गरजेचे आहे. धन्यवाद आपण लक्षात आणून दिल्याबद्दल. खरं तर हा व्यवसाय अनेकांनी सुरू केला तरी त्याला स्कोप आहे.

नितीनचंद्र- कोणती कंपनी आहे? कुठल्या शहरात सुरू केलंय याबद्दल जरा माहिती सांगाल का?

सुरुवात केलीत की इथेही लिहा. पुढे कसा प्रतिसाद येतोय, अडचणी काय येतायत तेही शेअर केलंत तर इथल्या सगळ्यांकडून अनेक सूचना, उपाय मदतीला येतील >>>केली का सुरुवात? कसा प्रतिसाद आहे?

Pages