माघी गणेशजयंतीनिमित्त उकडीचे आंबा मोदक..!!

Submitted by माणिकमोती on 22 January, 2015 - 02:51
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

आवरणासाठी:
१ वाटी सुवासिक तांदळाचे पीठ,
१ वाटी गरम पाणी,
कणभर मीठ,
१ चमचा लोणी,
२ चमचे आंबा इमल्शन अथवा आंबा इसेन्स + खाण्याचा आंबा रंग

सारणासाठी:
१ ओला खवलेला नारळ,
आवडीप्रमाणे साखर,
सुका मेवा,
रंगीत टुटी-फ्रुटी

इतरः
मोदकपात्र अथवा चाळणी आणि कुकर
पांढरे स्वच्छ पातळ कापड

क्रमवार पाककृती: 

मायबोली वरची माझी पहिलीच पाककृती आहे, म्हणुन गोडाने सुरवात करतेय..

१. एक वाटी गरम पाण्यात लोणी, मीठ आणि आंबा इमल्शन घालावे. गॅस बंद करुन त्यात सुवासिक तांदळाचे पीठ हळुहळु घालावे. गुठळ्या होउ देऊ नयेत. अशी उकड काढताना तेल/ तुप न घालता लोणी घातल्यामुळे उकड मऊ आणि लुसलुशीत होते. ही उकड छान मळुन घ्यावी.

२. कढईत ओल्या नारळाचा चव आणि साखर घालावी. एकजीव होईपर्यंत शिजवावे. त्यात सुका मेवा (मी काजु व मनुका टाकल्या होत्या) आणि रंगीबेरंगी टुटी-फ्रुटी घालावी. सारण थंड होऊ द्यावे. बाहेरील आवरण केशरी असल्याने आणि टुटी-फ्रुटीचा रंग खुलुन दिसावा ह्यासाठी सारणात गुळ न घालता साखरच घालावी.

३. मोदक करुन, एकदा पाण्यात घालुन मोदकपात्रात पातळ कापड टाकुन वाफवावे. पाण्यातुन काढ्ल्याने उकडताना मोदक फुटत नाहीत.

असे गरम गरम सुवासिक आंबा मोदक गणपतीबाप्पाला द्यावेत आणि स्वतासुद्धा तुप घालुन गरम गरमच खावेत..

वाढणी/प्रमाण: 
४ जणांसाठी
माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पाककृती भारीच असेल, पण फोटोशिवाय मजा नाही.

उद्या माघी गणेशजयंती आहे, उद्याच हे मोदक बनवा आणि बनविल्यानंतर फोटो डकवुन टाका.

मी मायबोलीवरील अशीच एक रेसीपी पाहून प्रयत्न केला पण इतका चांगला नाही झाला. शोधावी लागेल ती रेसीपी. त्यात आंबा रस घालून करायचे होते.

>>>माघी गणेशजयंतीनिमित्त उकडीचे आंबा मोदक..!!<<
माघी म्हणजे काय?

मोदक झकास!

अर्धा मोदक कापून फोटो टाकायचा ना... कळले असते टूटी फ्रूटी कसं दिसतं ते. Happy

झंपी, गणेशाचा जन्म माघ महिन्यातला म्हणून माघी उत्सव Happy

गणपतीचा वाढदिवस एकदाच असतो आणि तो माघातच असतो. त्यामुळे माघी गणेशजयंती ही द्विरुक्ती आहे. माघी गणपती म्हटलं तरी चालतं.

धन्यवाद अश्विनी के.

मला वाटले टायपोस आहे, माझी चे माघी झालेय. पण विचारले म्हणून माहिती मिळाली. Happy
गप्प बसून राहू नये प्रश्ण असेल मनात हेच खरं.

एकदा पाण्यात घालुन मोदकपात्रात पातळ कापड टाकुन वाफवावे>>> पाणी कस घ्यायच.कोमट की थंड ???

@ झंपी, अर्धा कापलेला फोटो सुद्धा आहे. पण केबी जास्त असल्याने इथे डकवता येत नाहीये.

@ दक्शिणा, एक का, सगळे ताटच घेऊ शकता.. Happy

@ देवीका, आता ह्या पाककॄतीनुसार प्रयत्न करा. नक्की जमतील.

@ अंकु, थंड पाणी घ्यायचे. एक मोदक हळुच एकदाच बुडवुन काढायचा.

छान आहेत. मीपण करते थोडे वेगळ्या प्रकारे पण मे महिन्यात करते अस्सल आंब्याचे. पण उकड मात्र पांढरीच ठेवते.

क्युट दिसतायत.

मस्तच !

.

phpXxNqTuPM.jpg

@ अंजु, सारणात आंबा टाकता येईलच, अजुनही बरेच प्रयोग करता येतील. पण पांढर्‍या उकडीला स्वताची अशी खास चव नसते. आंबा इसेन्स सारणाएवजी आवरणामध्ये टाकायचे माझे हेच कारण आहे की आवरण देखील चविष्ट व्हावे.

@ शुम्पी, होय. साच्यामध्येच केले आहेत. हाताने जमतात, पण इतके सुबक नाही.:P Proud Proud

@ प्राजक्ता, लिंकसाठी खुप खुप धन्यवाद. त्यामुळे साईझ कमी केलेला फोटो टाकता आला.

प्रतिसादासाठी सर्वाना खुप खुप धन्यवाद..

Pages