भाग-१ पूर्वतयारी http://www.maayboli.com/node/52024
भाग-२ पुणे ते काठगोदाम http://www.maayboli.com/node/52054
भाग-३ काठगोदाम ते धाकुरी http://www.maayboli.com/node/52100
भाग-४ धाकुरी ते खाती http://www.maayboli.com/node/52128
भाग-५ आलं मनात आणि गेलो हिमालयात (पिंढारी ट्रेक)
द्वाली –फुरकिया (१३ जून २०१४)
जगात कुठे उकडत असेलं का? अशी शंका येईल, अश्या थंडीच्या प्रदेशात आलो होतो. अंगावरच्या कपड्यांचे आणि झोपताना घेतलेल्या पांघरुणाचे थर वाढले होते. कँपवरच्या मदतनीसांनी तोंड धुण्यासाठी गरम पाणी तयार ठेवल होतं. थंडीतल्या गरम पाण्याच्या स्पर्शाने, सुखं म्हणतात ते हेच, अशी खात्री होत होती! मागच्या वर्षीच्या हाहाःकारानंतर काफनी ग्लेशियरकडे जाणारा रस्ता बंद झाला. तो रस्ता द्वाली कँपवरून जायचा. तेव्हा द्वाली-काफनी-द्वाली असा एक दिवसाचा ट्रेक असायचा. आता तो दिवस शेड्यूलमध्ये जास्तीचा असतो. त्या गणितामुळे आज आम्हाला फक्त पाच किलोमीटर चालायचं होतं. चालताना मजा यायचीच पण कँपवरही आम्ही तेवढीच मजा करायचो. त्यामुळे मोकळ्या वेळाबद्दल आमची काहीही तक्रार नव्हती.
मधे एक दिवस टाकून पुन्हा ह्याचं कँपवर मुक्काम करायचा होता. फक्त ह्या दोन दिवसासाठीच सामान बरोबर घेऊन, उरलेलं इथेच ठेवलं. पोर्टरची सोय झाली आणि आम्हाला सॅक उपसायला अधिकृत कारण मिळालं! अंतर कमी असल्याने जरा उशीरानेच चालायला सुरवात केली. उंचावर आल्यामुळे थोडा जास्त दम लागत होता. हाय अल्टीट्यूड सिकनेसचे कारण सांगण्याइतकी उंची गाठली नव्हती, तरी ‘धकधक’ मात्र होत होती. आमच्या म्हणण्याप्रमाणे रस्त्याला चढ होता, पण स्वरुपच्या म्हणण्याप्रमाणे ‘सीsssधा रस्ता होता!’ ‘आजका रस्ता तो सीsssधा है, कल थोडी चढाई है’ हे पुरवणी मत होतं. आजचा रस्ता ‘सीsssधा’ असेलं, तर उद्याचा नक्की कसा असेलं? असं दडपण हळूच येत होतं.
रस्ता मात्र सुरेख होता. रस्त्याकडेने वेगवेगळी फुलं फुलली होती. नागाच्या फण्यासारखी दिसणारी ‘कोब्रा लिली’ जागोजागी होती. डावीकडे पिंढारी नदी वेगाने समुद्राकडे धावत होती. शुभ, दुधाळ धबधबे तिचा जोर वाढवत होते.
कोब्रा लिली
पुढे गेलेली मुलं आणि देवेन सर थांबून पलीकडच्या डोंगरावर काहीतरी पाहात होते. सरांच्या म्हणण्याप्रमाणे तिथे डोंगरी मेंढे (माउंटन गोट) दिसत होते. बराच वेळ कोणाला काही दिसेना. सर्किटला बापू दिसावे, तसे सगळे मनाला येईल तिथे हात दाखवत होते. आम्हाला थांबायला, दम खायला वेळ मिळत होता, म्हणून आम्हीही मुलांना उत्तेजन देत होतो. खूप वेळानंतर सगळ्यांना एखादा-एखादा मेंढा दिसला. ‘सुटलो बुवा’ म्हणत आम्ही पुढच्या रस्त्याला लागलो.
आजच्या रस्त्यावरही लँडस्लाईड होत्याच. त्या पार करणे, म्हणजे कसरतच होती. सुट्या, भुसभुशीत मातीवरून पाय घसरतात. दगडाला हात धरायला जावं, तर तो दगडही ‘आत्ता पडू की मग’ अशा मूडमध्ये असतो. स्वरूप खूप मदत करत होता. एकेकाला सांभाळून पलीकडे नेत होता. ह्या स्थानिक लोकांच्या मदतीशिवाय ही कसरत शक्यच झाली नसती..
भरपूर चालण्या-चढण्यामुळे इथल्या बऱ्याचश्या लोकांची शरीरयष्टी काटक असते. एका लयीत, एका वेगाने ते चालू शकतात. त्यांना दम लागत नाही, की थकल्यामुळे थांबावं लागत नाही. आपल्या शारीरिक कष्ट नसलेल्या शहरी जीवनशैलीची इथे अगदी लाज वाटते.
असचं दमत, थांबत, सृष्टीसौंदर्याचा आनंद घेत, फोटो काढत काढत आम्ही एकदाचे फुरकिया कँपला पोचलो.
दिवसासुद्धा चांगलीच थंडी वाजत होती. हा कँप ह्या ट्रेकमधला सगळ्यात उंचावरचा कँप होता. उद्याला पिंढारी ग्लेशियर जवळच्या झिरो पॉइंटपर्यंत जायचं, परत येऊन दुपारचं जेवण ह्याचं कँपला करायचं आणि रात्रीच्या मुक्कामाला पुन्हा द्वालीला जायचं होत. परतीच्या प्रवासात दोन-दोन कँप एका दिवशी होणार होते. त्यामुळे अर्थातच चालायला जास्त वेळ लागणार होता. पत्ते खेळायला वेळ मिळणे आणि शक्ती शिल्लक राहणं कठीण होत. ती मजा करायचा हा शेवटचाच कँप होता.
माणसापरीस मेंढरं बरी!
आमचा आणि पिवळ्या ग्रुपचा कँप अगदी जवळजवळ होता. दुपारच्या जेवणानंतर आम्ही आणि ते लोकं कँपच्या जवळपास फिरत होतो. त्यांच्यातल्या काही लोकांशी चांगली ओळख झाली होती. प.बंगाल आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक देवाणघेवाण होत होती. नंदादेवी शिखर आणि इतर बर्फाच्छादित शिखरं अगदी जवळ दिसत होती. वेगळ्याच जगात आलोय, असं वाटत होतं. जरा वेळाने थोडा पाउस सुरू झाला आणि आम्ही सगळे आमच्या आमच्या कँपमध्ये आलो.
आधीच्या कँपच्या मानाने हा कँप लहान होता. नऊ जणात मिळून एकच टॉयलेट होत. सकाळी लवकर निघायचं होत. तेव्हा जरा अडचणीच होणार होतं. पण कुमाऊँ निगम बरोबर आल्याचा फायदा म्हणजे प्रत्येक कँपवर टॉयलेट होतं. टॉयलेटमध्ये असलेल्या सोयी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या होत्या. अगदी सुरवातीला बेसिन, अंघोळीसाठी गरम-गार पाण्याचे नळ, कमोड; सगळं व्यवस्थित होतं. जसजशी कँपची उंची वाढत गेली, तसतशी एकेक सोय कमी होऊ लागली. बेसिनवर कधीकधी आरसा असायचा, पण नळ नसायचा. काही ठिकाणी डोंगरावरच वाहत पाणी सायफन करून आणलेले असायचं, मग तो नळ सततच वाहात असायचा. पाणी बंद करायची सोयच नसायची! फुरकियाच्या कँपवरच्या टॉयलेटपर्यंत पोचायचं म्हणजे मोठ्या उंचीच्या पायऱ्या चढाव्या लागायच्या. ट्रेकिंगच होत ते एक प्रकारचं...!
बाहेर पावसाने जोर धरला, तशी थंडीही वाढली. कँपवर ढीगभर पांघरूण, रजया होत्या. सगळे त्यात गुरफटून बसले. आम्हाला जरी तसं लोळायला छान वाटत होतं, तरी उत्साहाने, तारुण्याच्या जोशाने सळसळणाऱ्या मंडळींना काही ती आयडिया आवडेना. ‘उठा की आता, झोपताय काय? इथे काय झोपायला आलोय का आपण? पत्ते खेळूया ना. आई नाही उठत, मावशी तू तरी उठ’ अशी आर्जव करून झाली. हो-ना करता करता सगळे उठले, पत्ते पिसले गेले, हसा-हशी सुरू झाली.
आम्ही तिघी तर बालमैत्रिणी आहोत. लग्नानंतर वेगळ्या गावात गेलो, संसारात गुरफटलो, आपापल्या काम-धंद्यात अडकलो, तरी आमची मैत्री टिकली, वाढली, ह्याचा आम्हाला अभिमान, कौतुक आणि आनंद सगळच वाटत. पण आमची मुलांचीही तेवढीच घट्ट मैत्री झाली आहे, हे बघून फारच बर वाटतं. एरवी लहानलहान गोष्टींवरून कुरकुर करणारे हे आधुनिक पिढीचे प्रतिनिधी, निसर्गाच्या सान्निध्याची मजा घेत होते. तिथल्या गैरसोयींवर विनोद करत होते. अश्विनीची मुलगी तर लहान असल्यापासून अमेरिकेत वाढलेली. पण पूर्ण ट्रेकभर तिने एकही तक्रार केली नाही. ना अन्नाबद्द्ल, ना कँपवरच्या स्वच्छतेबद्दल. त्याबद्दल तिच कौतुक करावं, तितक कमीच आहे.
बराच वेळ पत्ते कुटून झाले. चहा-कॉफी झाल्यावर सगळे पुन्हा बाहेर पडले. सगळ्या डोंगरांवरच्या बर्फात वाढ झाली होती. इथल्या लोकांची मानसिकता फार चांगली असते. पाउस पडला की,’अभी गिर रहा है, तो अच्छाही है, कल सुबह मौसम एकदम साफ होगा.’ हे आशादायक वाक्य ऐकायला मिळतच मिळतं. कदाचित इतक्या अनिश्चित वातावरणात राहताना मनातल्या ह्या प्रखर आशावादाचाच काय तो आधार वाटत असेल.
फुरकिया कँपवरून मां नंदादेवी शिखराचे दर्शन
बाहेर काळोख झाला, तसे पत्ते थांबले. इथे वीजपुरवठा नसतोच. पण जनरेटरची वीज थोडा वेळ मिळते. तो वेळही कँपच्या उंचीच्या व्यस्त प्रमाणात कमी होत गेला होता. थोडा वेळ वीज असायची, त्यात चपळाईने फोन / कॅमेरा चार्ज करणे, आपल्या हरवलेल्या वस्तू शोधणे हे कार्यक्रम उरकावे लागायचे. आज जेवण झाल्यावर अर्धा तासच वीज मिळणार होती. त्यामुळे सगळे लढाईला सज्ज व्हावे, तसे तय्यार, हुश्शार मोडमध्ये होते.
पिवळ्या ग्रुपचे सदस्य चार वाजताच चालायला सुरवात करणार होते. देवेन सरांना ही आयडिया आजिबात आवडली नव्हती. ‘रस्त्याचा काही भाग लँडस्लाईडने फारच खराब झाला आहे, त्यात काही ठिकाणी ग्लेशियर पार करावी लागतात. काळोख असताना हे भाग अजूनच धोक्याचे होतील. आपण साडेपाच-सहा वाजता निघूया.’ असं त्यांचं म्हणणं होतं. जे लॉजिकली बरोबर वाटत होतं आणि अवेळी उठायलाही लागणार नव्हत, म्हणून आम्ही आनंदाने मान्य केलं.
उद्या ट्रेकचा सर्वोच्च भाग गाठायचा होता. आनंद, भीती, उत्सुकता, काळजी सगळ्याच भावना दाटल्या होत्या. मी अगदी खिडकीलगत झोपले होते. झोपल्याझोपल्या पौर्णिमेचा चंद्र दिसत होता. शेजारी अश्विनी आणि तिची लेक झोपल्या होत्या. एरवी उशीला डोकं टेकल की तत्क्षणी मी झोपलेली असते. पण आज मात्र चंद्राच्या उजेडामुळे आणि मनातल्या विचारांमुळे मला झोप लागेना.! थोड्या वेळाने शेजारी खुसफुस सुरू झाली. आपल्या हालचालींमुळे ह्या लोकांना जाग आली की काय, असं वाटून मी अगदी शांत पडून राहिले.
पण ती अडचण नव्हती. आश्विनी आणि तिच्या लेकीचा लडिवाळ(?) संवाद ऐकायला येऊ लागला.
‘आई, काहीतरी चावतय..’
‘थांब. मी तुला पांघरूण झटकून देते.’ पांघरूण झटकल्याचे आवाज. थोडा वेळ शांतता. मग पुन्हा एकदा,
‘आई, काहीतरी चावतय..’
‘तू हाता-पायांना क्रीम लाव. थंडीमुळे तडतडत असेलं.’
‘आई, काहीतरी चावतय..’
‘हं... शेजारी बघ, मुक्ता कशी मुटकुळं करून झोपलीय’
‘ही..ही..ही.. ‘मुक्ताच मुटकुळं’ ही..ही..ही..’
‘अग हळू जरा, किती जोराने हसतेस’
‘ही..ही..ही.. ‘मुक्ताच मुटकुळं’ ही..ही..ही.. पण आई, मला मुटकुळं म्हणजे काय ते माहीत नाही’
अग, मग हसत का होतीस?
‘मला आवडलं ‘मुक्ताच मुटकुळं’ म्हणून. ही..ही..ही..’
मग मातोश्रींनी कन्येच्या ज्ञानात ‘मुटकुळ’ ह्या संकल्पनेची भर घातली. थोडा वेळ शांतता. पाचच मिनिटांनी पुन्हा एकदा..
‘आई, काहीतरी चावतय..’
‘झोप आता. म्हणजे काही होणार नाही’
‘आई, आत्ता बाबा काय करत असेल? आणि आपली पाणीपुरी खायची राहिलेय. मला जायच्या आधी खूप वेळा पाहिजे. आपण आत्याकडे कधी जाऊया? ती मला शॉपिंगला नेणार आहेना?’
‘हो ग, परत मुंबईला गेलो की सगळं करुया.’
‘आई, बाहेर चंद्र दिसतोय. जाऊया का बघायला? आणि मी उद्या कपडे कुठले घालू?’
‘आता बास बरं का. मी रामरक्षा म्हणते, तू डोळे बंद करून झोप पटकन.’
( ह्या वाक्याला एक विशिष्ट असा जोर होता, तो लिखाणात आणणे शक्य नाही. त्याचं उदाहरण द्यायचं, तर तो जोर साधारणपणे वैतागलेल्या आयांच्या बोलण्यात असतो. वाक्यात उपयोगही सगळ्यांनी ऐकलेला असेलच!)
भाग-६ फुरकिया-झिरो पॉइंट-फुरकिया-द्वाली http://www.maayboli.com/node/52520
भाग-७ द्वाली ते बागेश्वर http://www.maayboli.com/node/52551
बराच वेळ गेला हा भाग येण्यात
बराच वेळ गेला हा भाग येण्यात आणि छोटा पण आहे तसा
सर्किटला बापू दिसावे, तसे सगळे मनाला येईल तिथे हात दाखवत होते>>>:हाहा: सर्किटला बापू हे डोक्यात शिरायलाच २-३ मिनीटं गेली.
खुप वेळ वाट पाहायला लावलीत
खुप वेळ वाट पाहायला लावलीत तुम्ही. पण देर आए दुरस्त आए|
मस्त!.. शेवटचे संवाद वाचुन पण
मस्त!.. शेवटचे संवाद वाचुन पण हसु आलं![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त पण छोटा भाग . सर्किटला
मस्त पण छोटा भाग .
सर्किटला बापू हे तर खालची प्रतिक्रिया वाचल्यावर कळले
‘आता बास बरं का. मी रामरक्षा
‘आता बास बरं का. मी रामरक्षा म्हणते, तू डोळे बंद करून झोप पटकन.’>>![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
झोपल्याझोपल्या पौर्णिमेचा चंद्र दिसत होता> इमॅजिन करुनच भारी वाटलं..
मस्तस चाललाय ट्रेक रमतगमत..
मस्तस चाललाय ट्रेक रमतगमत.. फोटोही छान आहेत.
वाचतेय...
वाचतेय...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त! मजा आली!
मस्त! मजा आली!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त. मी २२-२३ वर्षांपूर्वी
मस्त. मी २२-२३ वर्षांपूर्वी केला होता हा ट्रेक. आठवणी ताज्या झाल्या.
मस्त.. पुढचा लवकर टाक आता..
मस्त.. पुढचा लवकर टाक आता..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आडो +१. पुढचे भाग लवकर येऊ
आडो +१. पुढचे भाग लवकर येऊ द्या.
मस्तं!
मस्तं!
एकदम खुसखुशीत, खमंग लेखनशैली
एकदम खुसखुशीत, खमंग लेखनशैली ....![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त भाग.. मायबोलीवर बर्याच
मस्त भाग.. मायबोलीवर बर्याच काळानंतर आलो आणि असे मस्त काहितरी वाचायला मिळाले.
मस्त!
मस्त!
मस्त! पुढचा भाग लवकर येऊ दे..
मस्त! पुढचा भाग लवकर येऊ दे..
मस्त!
मस्त!
वा... आला (हुश्श....) मस्त
वा... आला (हुश्श....)
मस्त झालाय हा भाग.....
मस्त ट्रेक चालू आहे
मस्त ट्रेक चालू आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त चालू आहे लेखमाला!
मस्त चालू आहे लेखमाला! घरबसल्या हिमालयाची वारी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)