श्रावणघेवड्याची सुकी भाजी (उपीटाच्या फोडणीसहित)

Submitted by ललिता-प्रीति on 29 April, 2013 - 00:12
shrava-ghvada-suki-bhaji
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

- श्रावणघेवडा (फरसबी) पाव किलो
- १ मोठा कांदा (बारीक चिरून)
- हिरव्या मिरच्या (चवीनुसार)
- कढीपत्त्याची पानं ५-६
- किसलेलं आलं १ छोटा चमचा भरून
- उडीद डाळ १ मोठा चमचा भरून
- खोवलेलं खोबरं पाव वाटी
- चिरलेली कोथिंबीर २ मोठे चमचे भरून
- मीठ (चवीनुसार)
- साखर (चिमटीभर)
- तेल, मोहरी, हिंग

क्रमवार पाककृती: 

- श्रावणघेवड्याच्या शेंगा धुवून, निवडून, चिरून घ्याव्यात.
- कढईत तेल गरम करून त्यात मोहरी टाकावी. ती तडतडली, की हिंग टाकावा. उडीद डाळ टाकावी.
- डाळ जरा तांबूस, खरपूस झाली, की कढीपत्याची पानं आणि मिरच्यांचे तुकडे टाकावेत. त्यावर चिरलेला कांदा टाकून चांगला परतावा.
- कांदा तांबूस झाला, की किसलेलं आलं टाकावं.
- जरासं हलवून त्यात चिरलेला श्रावणघेवडा टाकावा.
- कांदा आणि श्रावणघेवडा चांगला हलवून एकत्र करून घ्यावा. मीठ, साखर घालून पुन्हा हलवावा.
- झाकण टाकून भाजी शिजू द्यावी. अधूनमधून हलवावी. आवश्यकता भासल्यास थोडा पाण्याचा हबका मारावा.
- भाजी शिजल्यावर त्यात खोबरं-कोथिंबीर घालून पोळी / भाकरीबरोबर वाढावी.

Copy of DSC03806.JPG

वाढणी/प्रमाण: 
२-३ जणांसाठी
अधिक टिपा: 

- ३० मिनिटांचा वेळ हा सगळी कच्ची तयारी करण्यापासून ते भाजी शिजण्यापर्यंतचा धरलेला आहे.
- भाजी शक्यतो वाफेवरच शिजवावी. (गरजेनुसार १-२ चमचे पाणी घालावे.) शिजल्यावर रस राहता कामा नये.
- फोडणीत हळद घालायची नाही. (हळद घातल्यावर भाजीची सगळी मजाच जाते.)
- कांदा, खोवलेलं खोबरं, आलं - यांचं प्रमाण आवडीनुसार कमी-जास्त करू शकता. पण यातला कुठलाही जिन्नस वगळायचा नाही. (खोबरं जितकं जास्त घालाल, तितकी भाजीची लज्जत वाढते.)
- ही भाजी नुसती (पचडीसारखी) खायलाही अप्रतिम लागते. पांढर्‍या भाताबरोबरही चविष्ट लागते.

माहितीचा स्रोत: 
मैत्रीण
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अखेर ही भाजी केली. कांदा, हिरव्या मिर्च्या, आलं आणि चिमूटभर का होईना, पण साखर हे नवे घटक होते. चव आवडली. धन्यवाद ललिता!

beanschibhaji-maayboli.jpg

>> शे. दा. तु.

म्हणजे शें दा कु का? ती (चणा)डाळ असेल .. हळद नाही म्हणून अशी दिसत असेल ..

>> भाताच्या शितासारखं

विकतचं फ्रोझन खोबरं असावं ..

मी बहुतेक रुचिरा मध्ये वाचलं होतं की हिरव्या (शेंगांच्या) भाज्यांनां हळद फार कमी घालायची असं .. त्याने म्हणे हिरवा रंग जास्त चांगला दिसतो ..

नाही तु (तुकडे).

>>हिरवा रंग जास्त चांगला दिसतो
हो, पण तसा तो राहिला पाहीजे ना.. दणकून वाफ काढली की शेवाळ होतं. Proud

आज ही भाजी केली. युएस मधे मिळतात त्या French style cut frozen beans घातल्या. वेगळ्या चवीची आणि झटपट भाजी तयार. धन्यवाद ललिता!

अखेर ही भाजी केली. कांदा, हिरव्या मिर्च्या, आलं आणि चिमूटभर का होईना, पण साखर हे नवे घटक होते. >> आक्का श्रावण घेवडा म्हणून काय वापरले तेव्हढे लिहायचे राहून गेले बघ Wink

ही फरसबी/ फरसी ( भाजीवाल्यांचा शब्द ) असणार. वांगी शेवगासह करतात तो नसणार. खोबरे अधिक तेवढे बरे हे खरेच.
किंचीत मीठ घातलेल्या पाण्यात पाच मिनिटे उकळून घेतले तुकडे की रंग छान राहतो आणि चव राहते. थोडे गाजराचे तुकडेही टाकतो. मग पाणी सुपात वापरायचे आणि फोडींवर उडीद डाळ,लाल मिरची फोडणी घालून हलवायचे. ओले खोबरे मिसळायचे. अशी करतो.
फोटो छान दिसतो आहे.

Pages

Back to top