लोकमान्य बाळगंगाधर टिळक. काही भारतीयांची नावे घेतली की माझे मस्तक आपोआप आदराने झुकते, त्यातलं हे महत्त्वाचं नाव. लोकमान्य. दुसरं काहीही नाही. संत नाही, महंत नाही, महात्मा नाही, देवमाणूस नाही, किंवा तत्सम काहीही नाही. लोकमान्य. लोकांना मान्य असलेला तो लोकमान्य. बास्स.

सत्तावन्नचे स्वातंत्र्ययुद्ध इंग्रजांनी चिरडून फारा वर्षे लोटली नव्हती. या पराभवाने लोक मनाने इतके खचले होते की भारतीय जनता संपूर्णपणे हतवीर्य होऊन 'इंग्रज हेच आपले मायबाप, ते म्हणतील तेच आणि त्यांचेच सगळे बरोबर, आणि भारतीय जे जे ते ते टाकाऊ' अशा निष्कर्षाप्रत आली होती. अशा काळी थंड लोळागोळा होऊन पडलेल्या हिंदुस्थानला ऊब आणली ती न्यायमूर्ती रानडे यांनी. मात्र या उबेचे रूपांतर धगधगत्या वणव्यात केले ते लोकमान्य बाळगंगाधर टिळकांनी. "लोकमान्य टिळकांचा विजय असो" या मराठीभूमीतल्या घोषणे पासून उत्तरेतल्या "तिलक महाराज की जय" या जयजयकारात काय दडलेलं नाही? जनसामान्यांनी दिलेल्या या पदवीपासून ते थेट ब्रिटीश राज्यकर्त्यांच्या तोंडून म्हणजेच 'फ्रॉम द हॉर्सेस माऊथ' आलेल्या "भारतीय असंतोषाचे जनक" (Father of Indian Unrest) या संबोधनाचे धनी असलेल्या लोकमान्य बाळगंगाधर टिळकांवर आजवर अनेक लेख व पुस्तके लिहिली गेली असतील. चरित्र लिहायचं म्हटलं की किती लिहावं याला बंधन नसतं. मात्र एखाद्या ऐतिहासिक व्यक्तिमत्वाचं चित्रण चित्रपटाच्या माध्यमातून करायचं म्हटलं तर ते मात्र अतिशय आव्हानात्मक काम ठरतं. चित्रपटाला असलेलं वेळेचं बंधन आणि त्या माध्यमाला असलेल्या मर्यादा हे मोठे अडथळे ठरू शकतात. त्यात ती व्यक्ती राजकीय पुढारी किंवा स्वातंत्र्यसैनिक असली, तर बघायलाच नको. त्यातही लोकमान्यांसारखं उत्तुंग व्यक्तिमत्व असेल तर हे काम आणखी कठीण होऊन बसतं.
मग चित्रपट काढणार तरी कुठल्या पैलूवर? एका निष्णात गणितज्ञावर की पंचांगकर्त्यावर? गीतारहस्य ह्या ग्रंथाच्या रचनाकारावर की "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे" ही सिंहगर्जना करणारर्या या नरसिंहावर? गोपाळराव आगरकरांसारख्या वैचारिक शत्रूची त्याच्या आजारपणात रात्र-रात्र बसून शुश्रुषा करणार्या हळव्या मित्रावर की 'शिक्षणमहर्षी' ही ज्या काळी शिवी झाली नव्हती त्या काळात सरकारी शाळांहून सरस आणि देशाभिमान जागृत होईल असे शिक्षण देणार्या शिक्षणसंस्था काढणार्या ध्येयवेड्यावर? भल्याभल्यांची भंबेरी उडवून देणार्या धडाडीच्या पत्रकार आणि संपादकावर की १९४७ नंतरही ज्याचा पुतळा कराचीत उभा होता अशा एकमेव भारतीय पुढार्यावर? दुष्काळ पडल्यावर ब्रिटीश सरकारने केलेल्या दुष्काळावरच्या कायद्यांचा उपयोग शेतकर्यांना व्हावा म्हणून त्यावर पुस्तिका लिहून वाटणार्या आणि शेतकर्यांच्या हितासाठी झटणार्या समाजसेवकावर की तुरुंगात असतानाही केवळ पुस्तकांच्या आधारावर नवी भाषा शिकणार्या तल्लख बुद्धीच्या या विद्यार्थ्यावर? वासुदेव बळवंत फडक्यांना सबूरीचा सल्ला देणार्या बळवंतरावांवर की चापेकरांसारख्या अनेक क्रांतीकारकांना प्रेरणास्थान ठरणार्या लोकमान्यांवर? व्यक्तिमत्वाला असंख्य कंगोरे असलेल्या या नरसिंहावर कुणाला चित्रपट काढता येईल? घटना नेमक्या कुठल्या निवडायच्या? एखाद्या डबक्यावर लघुपट काढता येतो. तलावावर मालिका लिहीता येते. आणि नदीवर नाटक-चित्रपट. पण ज्याच्या अमर्याद खोलीचा अंदाजच येत नाही अशा या अथांग रत्नाकरावर कुणाला चित्रपटासारखी कलाकृती निर्माण करणे झेपेल काय?
याचे उत्तर मात्र ओम राऊत यांच्या "लोकमान्यः एक युगपुरुष" या चित्रपटातून बर्याच अंशी होकारार्थी मिळते. मी बर्याच अंशी का म्हणालो याचा खुलासा पुढे करतो. बालगंधर्व चित्रपटापासूनच सुबोध भावे कुठल्याही भूमिकेचं सोनं करु शकतो याबद्दल शंका नव्हतीच. मात्र हा चित्रपट बघायला जाताना तो लोकमान्यांच्या भूमिकेचं शिवधनुष्य कसे पेलतो याची उत्सुकताही होती. हा चित्रपट बघितल्यानंतर मात्र सुबोध भावे कुठलीही भूमिका अक्षरशः जगू शकतो याची ठामपणे खात्री पटली. लोकमान्यांची करारी भावमुद्रा, ताठ बाणा, प्रसंगी दिसणरा हळवेपणा आणि आग ओकणारे डोळे अंगार हे सुबोधने उत्तमरित्या स्वतःत उतरवले आहेत. इतके की आज टिळक हयात असते तर त्यांनीही सुबोधचं मनापासून कौतुक केलं असतं इतकी ही भूमिका तंतोतंत वठवण्यात सुबोध यशस्वी झाला आहे. गांधींची भूमिका म्हटलं की लगेच कृष्ण भानजी अर्थात बेन किंगस्ले आणि सरदार पटेल म्हटलं की परेश रावल हे ताकदीचे कलाकार जसे आठवतात, तसे आता यापुढे टिळक म्हटलं की सुबोध आणि सुबोध म्हटलं की टिळक हेच समीकरण आठवत राहणार नि:संशय.
"डॉग्स अॅन्ड इंडिअन्स आर नॉट अलाउड" हे ऐकण्याची सवय असलेल्या जनतेच्या समोरच त्या काळी एका इंग्रजाला "बाहेर पाटीच लाऊन घेणार आहे. डॉग्स अॅन्ड ब्रिटीश आर नॉट अलाउड" असं सुनावताना त्याचे डोळे अक्षरशः आग ओकतात. गोपाळराव आगरकरांशी वाद घालताना "हिंदू धर्मात काय सुधारणा करायची ते हिंदूच ठरवतील, (ब्रिटीश) कायद्याने लादलेली बळजबरीची सुधारणा चालणार नाही" असे जेव्हा लोकमान्य ठणकावतात, तेव्हा हे देशाभिमानी वाक्य ऐकताना आपल्याच हृदयाचे ठोके चुकतात. सुधारकांची सभा उधळल्यावर तिथून निघून जाताना त्याच्या चेहर्यावर उमटलेले ते छद्मी हास्य अजूनही डोळ्यांसमोरून जात नाही. "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि तो मी मिळवणारच !!" ही डरकाळी आणि "बहुजनांना मंदिरात जाऊन दर्शन घेता येत नाही आता सार्वजनिक गणेशोत्सवात घेता येईल" ही आणि अशी वाक्ये ऐकावी तर सुबोध भावेच्या तोंडूनच. केसरीत छापावयाच्या अग्रलेखाचा मजकूर लेखनिकाला सांगत असताना मधेच "विश्वनाथ गेला" हे ऐकल्यावर कापर्या आवाजात तो लेख सांगून पूर्ण करणार्या टिळकांना फक्त आणि फक्त सुबोधच साकारू जाणे.

हा चित्रपट जसा सुबोधचा आहे तसाच तो दिग्दर्शक ओम राऊत यांचाही आहे. ओम राऊत यांनी सुबोध भावे नामक हिर्याला पैलू पाडून चमकवलं आहे, त्याच्याकडून अगदी हवा तसा अभिनय करवून घेतला आहे. या बाबतीत दिग्दर्शक ओम राऊत यांचं कौतुक करायलाच हवं. वर म्हटल्याप्रमाणे घटना कोणत्या निवडायच्या या पेचातून त्यांनी इतक्या व्यवस्थितपणे मार्ग काढला आहे, की त्यातून हा चित्रपट टिळकांची कारकीर्द संपूर्णपणे दाखवत नसला तरी त्यांच्या कर्तृत्वाची पुरेशी झलक नक्की दाखवतो. चित्रपटात लोकमान्यांची हिंदुत्ववादी धर्माभिमानी बाजू त्यांनी कुठलाही प्रचारकी आव न आणता व्यवस्थित मांडली आहे. देशाच्या हिताचा असेल तर केलेला खूनही समर्थनीय ठरतो ही लोकमान्यांची भूमिका मांडताना चित्रपट कुठेही भीड ठेवत नाही. त्याचबरोबर "स्वराज्यासाठी रक्त वहायलाच हवं, नाहीतर मिळालेल्या स्वराज्याची किंमत राहणार नाही" असं सुनावून राजकारणात नाहक घुसू पाहणार्या अहिंसा नामक थोतांडाची संभावना करतानाही चित्रपट कमी पडत नाही. लोकमान्यांचा स्वदेशीचा पुरस्कार ही बाजूही चित्रपट यशस्वीपणे मांडतो. तसेच टिळक-आगरकर वाद आणि गांधी-टिळक भेट या प्रसंगांना प्रभावीपणे सादर करण्यात आलेले आहे. चित्रपटात टिळकांच्या कारकिर्दीतल्या महत्त्वाच्या घटना अशा प्रकारे दाखवण्यात आलेल्या आहेत की प्रेक्षकांना चित्रपटातून तर टिळकांविषयी माहिती मिळेलच पण चित्रपट संपवून घरी गेल्यावरही त्यांच्याविषयी अधिकाधिक जाणून घेण्याची प्रेरणा मिळेल. थोडक्यात, हा चित्रपट म्हणजे टिळक नामक महासागराची खोली दाखवण्याचा एक प्रयत्न आहे.
सुबोध म्हणजे टिळक आणि टिळक म्हणजे सुबोध असं वाटायला लावण्यात रंगभूषाकार विक्रम गायकवाड यांचाही मोठा वाटा आहे. आशिष म्हात्रे आणि अपूर्वा मोतीवाले यांनी संपादनाची बाजू उत्तमरित्या सांभाळली आहे. वेषभूषाकार महेश शेरला व कलादिग्दर्शक संतोष फुटाणे यांनी तो काळ हुबेहूब उभा करुन आपापल्या विभागात कमाल केली आहे. अजीत-समीर यांचे संगीत एरवी वेगळी गाणी म्हणून ऐकायला फार रोचक नसले तरी त्या त्या प्रसंगांत कुठेही उपरे भासत नाही, उलट चपखलच वाटते. चित्रपटाच्या सुरवातीला नाना पाटेकरांच्या आवाजातले निवेदन सुरू असताना निवेदनानुरूप ज्या बातम्या आणि छायाचित्रे दाखवली आहेत त्याबद्दल दिग्दर्शकाला वाकून कुनिर्सात.

लोकमान्यांना कारावासाची शिक्षा होऊन मंडालेला रवाना करण्याचे ठरते तो प्रसंग म्हणजे या चित्रपटाची सुरवात आहे. मग आजच्या काळातल्या मकरंद (चिन्मय मांडलेकर) आणि त्याची पत्नी समीरा (प्रिया बापट) याच्या माध्यमातून तो फुलत जातो. हा भाग मात्र जरा खटकला. एक कारण म्हणजे मुळात अशा व्यक्तिमत्वावर चित्रपट काढताना वेळेचं बंधन असताना हा भाग दाखवण्याऐवजी त्याला पूर्ण फाटा देऊन लोकमान्यांच्या कारकिर्दीतलेच अधिक प्रसंग दाखवले असते तर चित्रपट आणखी प्रभावशाली झाला असता. मकरंद आणि समीराच्या आयुष्यात लोकमान्यांच्या प्रभावाने जे बदल होतात ते सगळं फारच ओढून ताणून दाखवलं आहे, त्यामुळे चित्रपटातला हा भाग अधिकच अनावश्यक वाटतो. मात्र असं असलं तरी या दोन्ही भूमिकात्काम चिन्मय आणि प्रिया यांनी चांगलं काम केलं आहे. त्यामुळे चित्रपटाच्या या वैगुण्याकडे दुर्लक्ष करायला हरकत नाही. म्हणूनच मी सुरवातीला 'बर्याच अंशी' हे शब्द वापरले होते.
दुसरी गोष्ट म्हणजे चित्रपटात काही ठिकाणी घडणारे प्रसंग हे गोंधळात टाकतात. म्हणजे घटना किंवा दाखवलेले प्रसंग अमुक साली घडलेले असताना वेगळ्याच साली घडले आहेत असे दाखवले आहे. मात्र या गोष्टींकडे लक्षही जाणार नाही अशा प्रकारे ते प्रसंग रंगवण्यात चित्रपटकर्ते यशस्वी झाले आहेत.
चुकाच काढायच्या तर आणखीही काढता येतील. पण इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहीजे. कुठल्याही चरित्रपटाचं एक महत्त्वाचं साध्य (key takeaway) असावं ते म्हणजे एखादे जबरदस्त पुस्तक वाचल्यावर वाचकाची जशी भारावल्यासारखी अवस्था होते तशीच परिणामकारकता साधणं. निर्मिती, दिग्दर्शन, अभिनय, वेषभूषा आणि रंगभूषा, कलादिग्दर्शन इत्यादी प्रत्येक बाबीत घेतलेली प्रचंड मेहनत व अभ्यास आणि एकूणच चित्रपटाचे अप्रतीम सादरीकरण यांच्यामुळे तशी परिणामकारकता नक्कीच साधली जाते. चित्रपट आपल्याला एवढा गुंगवून ठेवतो की मध्यंतर नामक लहानशा व्यत्ययामुळेही आपण प्रचंड अस्वस्थ होतो. चित्रपटाच्या सुरवातीला सुबोधने उभ्या केलेल्या लोकमान्यांच्या प्रवेशापासून ते शेवटच्या श्रेयनामावलीपर्यंत आपण एक वेगळेच भारावलेपण अनुभवतो.
भारतीय राजकारणावर ज्यांचा तीव्र प्रभाव पडतो आहे आणि आपल्याला प्रचंड अडचणीचे ठरू शकतात अशा नेत्यांना पाताळयंत्री ब्रिटीशांनी भारतीय जनतेपासून लांब ठेवण्याचं धोरण अवलंबलं. या रास्त भीतीतूनच लोकमान्यांना आयुष्याची तब्बल सहा वर्ष ब्रिटीशांनी भारताबाहेर मंडालेत, लोकांपासून लांब ठेवलं. लोकमान्यांना आणखी फक्त दहा वर्षांचे आयुष्य मिळते, तर भारतीय स्वातंत्र्यलढा आणि एकूण राजकारण यांचा चेहरामोहरा आज काही वेगळाच दिसला असता हे निश्चित.
असे जास्तीतजास्त चित्रपट बनायला हवेत. कारण आपल्याला आझादी ही फक्त आणि फक्त बिना खडग बिना ढाल मिळालेली आहे अशी खोडसाळ आणि तितकीच खुळचट समजूत करुन देणारी पाठ्यपुस्तके असल्यावर पुढच्या पिढीला सत्य समजणार तरी कसे? अशा कलाकृती बनल्याशिवाय स्वातंत्र्यलढ्यातल्या अशा हिर्यांचे प्रभावशाली दर्शन होणार तरी कसे?
चित्रपटाचा तिकीट काढलेला खेळ केव्हाच संपतो, पण त्यानंतर बराच काळ डोक्यात ठाण मांडून बसतात ते सुबोध भावेने सादर केलेले तुमचे, आमचे, सर्वांचेच - लोकमान्य. दुसरं काहीही नाही. संत नाही, महंत नाही, महात्मा नाही, देवमाणूस नाही, किंवा तत्सम काहीही नाही. लोकमान्य. लोकांना मान्य असलेला तो लोकमान्य. बास्स.
अजून बघितला नसेल तर चित्रपटगृहात जाऊन नक्की पहा. लोकमान्य - एक युगपुरुष.
------------------------------------------------------------------------------------
ट्रेलर
http://www.youtube.com/watch?v=aLvVD0lyOqw
http://www.youtube.com/watch?v=nu7_JEUm6mc
http://www.youtube.com/watch?v=BpS2bF3KwmU
पत्रकार परिषद १
http://www.youtube.com/watch?v=S32mOWXJIi8
पत्रकार परिषद १
http://www.youtube.com/watch?v=VlU3RW_MTQc
गाणे: हे जीवन आपुले सार्थ करा
http://www.youtube.com/watch?v=0DeqgxST6Fg
गाणे: गजानना, गजानना
http://www.youtube.com/watch?annotation_id=annotation_3593398775&feature...
टोचा, तुमच्या बुद्धीशी आमची
टोचा, तुमच्या बुद्धीशी आमची बुद्धी स्पर्धा करु शकत आणि इच्छित नाही. आम्ही पामर काय सांगणार, तेव्हा क्षमस्व. भेटू असेच पुन्हा.
टिळक काय होते हा एक वेगळा
टिळक काय होते हा एक वेगळा धागा असू शकतो व टिळकांवरचा हा चित्रपट टिळकांच्या आयुष्याच्या तुलनेत कसा बनला आहे हा एक वेगळा धागा असू शकतो, किंबहुना हे दोन वेगळे धागे असायला हवेत, असे नम्रपणे सुचवावेसे वाटते.
तसे दोन धागे झाले तर टिळकच काय, गांधी, नेहरु, पटेल, सावरकर हे सगळेच त्यात बसवता येतीलच.
टिळकानी स्वातन्त्र्याची मागणी
टिळकानी स्वातन्त्र्याची मागणी केलीच नव्हती?:अओ:
मी प्रगल्भ वाचक नाही.:अरेरे:
इथे फक्त चित्रपटाविषयी चर्चा
इथे फक्त चित्रपटाविषयी चर्चा करता आली तर बरे. रश्मी, बाकी माहिती तुम्हाला वाचनातून मिळेलच.
एकमेकांची थोबाडे बघण्यात
एकमेकांची थोबाडे बघण्यात स्वारस्य नसलेले लोक सार्वजनिक गणेशोत्सवामुळे एकत्र येऊन दहा दिवस काहीबाही करू लागले. अश्या एकत्रीत झालेल्या लोकांच्या समुहाची मानसिकता लक्षात घेता त्यांच्यावर विचारांचा प्रभाव पाडणे हे अधिक सहज शक्य असते. त्यामुळे परकीयांपासून स्वातंत्र्य ह्या उद्दिष्टाचा विचार अधिकांपर्यंत पोचावा ह्या उद्देशाने सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्यात आला.
ह्यात 'संघटित झालात तर सुखी होण्याकडे वाटचाल करू शकाल' हे तत्त्व असावे.
पण मग गणेशोत्सवच कशाला? गल्लीगल्लीत लावणीचा कार्यक्रम ठेवायचा, नाही का?
सगळ्यांनी बघितलाच पाहिजे असा
सगळ्यांनी बघितलाच पाहिजे असा सिनेमा.
मस्तच परीक्षण .
लोकमान्यांना आणखी फक्त दहा वर्षांचे आयुष्य मिळते, तर भारतीय स्वातंत्र्यलढा आणि एकूण राजकारण यांचा चेहरामोहरा आज काही वेगळाच दिसला असता हे निश्चित. > हजार वेळा अनुमोदन.
तुमच्या माहीती साठी टिळकांनी कधीही स्वातंत्र्याची मागणी केली नाही.>
तुमच्या माहीती साठी टिळकांनी
तुमच्या माहीती साठी टिळकांनी कधीही स्वातंत्र्याची मागणी केली नाही
स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे ह्या सुप्रसिद्ध वाक्यातील स्वराज्य ह्या शब्दाचा अर्थ काय होतो मग?
की टिळकांनी हे वाक्य उच्चारलेच नव्हते असे आजच्या इंटरनेटप्रेमी संशोधकांनी शोधुन काढलेय आणि कुठेतरी नेटवर खरडले??
छान लिहिलय कोकणस्थ. खुप
छान लिहिलय कोकणस्थ. खुप आवडलं. चित्रपट बघण्याची इच्छा अजुनच बळावली. बघणार.
चांगला लेख प्रभावी शब्दात
चांगला लेख प्रभावी शब्दात मांडलेला आहे. टिळकांच्या बहुतेक सगळ्या विचारांना स्पर्श करण्याचा प्रयत्न केला आहे. सुबोधला घेउन अर्धी बाजु तरी जिंकण्यात जमा केली होती. पण स्क्रीनप्ले मधे गडबड झाली. जेव्हा तुम्ही एका महत्वाच्या कॅरेक्टरला उभारतात तेव्हा त्यावरच तुम्हाला लक्ष द्यायला हवे. तो काळ ते वातावरण याचे भान सतत ठेवावे लागते. यात सरमिसळ केली तर प्रेक्षकांवर असलेली पकड निसटते. चिन्मयला भाग द्यावा की सुबोधला ही दुविधा मला तरी चित्रपटात दिसली... अग्रेसिव्ह हा धागा जरा जास्तच पकडला आहे. (तु सुध्दा) टिळक अग्रेसिव्ह होते. पण ज्यात हवे तिथेच आगरकर- टिळक हा एक भाग सोडुन दिला तर त्या अग्रेसिव्हला मुक्काम होता. पण तो त्यांच्या कडव्या समर्थकांना कधी दिसलाच नाही. दिसला फक्त तो जहालपणा...असो.
चित्रपटात नेपथ्य चांगले केले आहे. सुबोधला फक्त मिशीच लावली नाही तर त्याचे डोळे उठावदार दिसतील असा मेकअप देखील केला आहे. बाकी सगळी सुबोधचीच कमाल आहे. डोळ्यातुन धगधगती आग निघणे या वाक्यप्रचाराला सुबोध ने साकारलेला टिळक हे वाक्य समानार्थी ठरु शकेल. इतका उत्कृष्ट अभिनय झालेला आहे. सध्याच्या वेळेत अतुल नंतर सुबोधचा नंबर लागल्यास मला तरी आश्चर्य वाटणार नाही. फक्त त्याचा कमल हसन नको व्हायला. साध्या चेहर्याने देखील तितकाच उत्कृष्ट अभिनय होतो हे देखील त्याने प्रेक्षकांना पटवुन द्यायला पाहिजे. (जसे एक डाव धोबीपछाड मधे होता). बाकीचे तिथल्यातिथे ठिक वाटले.
-----------------------------------------------------------------------------------------
टिळकांना उंचावण्यासाठी इतर नेत्यांना खाली बसवलेच पाहिजे.? खरतर इतर नेत्यांना उंचवताना कधीच टि़ळकांना अथवा अजुन कोणत्याही नेत्यांना खाली बसवले गेले नव्हते. मग हा जहालवाद कशाबद्दल.? जसे आधी उल्लेखल्याप्रमाणे टिळक, गांधी, नेताजी, पटेल, लाला लजपतराय यांच्यावर टीका तर लांबच काही बोलायची देखील आपल्या पिढीची लायकी नाही. इथे तर माझे टिळकच ग्रेट त्यांचाच जहालवाद बरोबर. नाही माझेच गांधी बरोबर अहिंसाच योग्य होती. नाही नाही नेताजींच्या सैन्यबळकटीमुळेच हे घडले. पटेल यांनी एकत्र ठेवले नसते तर तुम्हाला जागोजागी पाकिस्तान भेटला असता. ? अरे काय हे? सगळ्यांनी आपापली कार्ये योग्य केली होती. इतिहास वाचताना पुर्वग्रह ठेवुन वाचल्याने असे समर्थक निर्माण होतात हे माझे स्पष्ट मत आहे. (यात कधीकधी मी देखील येतोच)
टिळकांच्यानंतर गांधी आले. त्यांच्या आधी नाही. सगळ्यांनी मिळुन स्वातंत्र्याचा रथ पुढे ओढला. बाकी लोकमान्य अजुन १० वर्ष असते तर या गांधी अजुन ५ वर्ष असते तर. हे जरतर लावु नये. लोकमान्य अजुन ३० वर्ष जरी असते तरी तुम्हाला तुमच्या मनात ठसलेले कार्य कधीच झाले नसते. त्यांनी योग्य जे आहे तेच केले असते. टिळक असते तर जिनाने पाकिस्तान मागितला नसता का ? जी बियाणे पेरली गेली होती ती आज नाहीतर उद्या उगवणार होतीच...
आपल्या नेत्यांचे थोर विचार आपण काहीच न समजता केवळ हवा तो सोईस्कर अर्थाचे लेपन लावुन त्याला जातीच्या धर्माच्या द्वेषाच्या वेष्टनात बांधुन आपल्या पिढीला विकण्यासाठी ठेवत आहोत.
स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध
स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे ह्या सुप्रसिद्ध वाक्यातील स्वराज्य ह्या शब्दाचा अर्थ काय होतो मग?>>>>
पूर्ण स्वातंत्र्याची पहीली काँग्रेसची मागणी १९२९ साली पहील्यांदी केली.
मी लिहीले होते तसे टिळकांच्या वेळी काँग्रेस ची मागणी Home Rule होती. म्हणजे भारतातला आतला कारभार इंग्रजांच्या बरोबरीने भारतीयांना पण करू द्यावा.
टोचा, तुम्ही ग्रेट आहात.
टोचा, तुम्ही ग्रेट आहात. म्हटले ना, तुमच्या बुद्धीशी आमची बुद्धी स्पर्धा करु शकत आणि इच्छित नाही. तेव्हा धन्यवाद.
कोकणस्थसाहेब, अभिनंदन ! उत्तम
कोकणस्थसाहेब,
अभिनंदन ! उत्तम परिक्षण.
"टिळकांनी कधी स्वातंत्र्याची मागणी केलीच नाही" हा शोधच म्हणायला हवा.
टिळकांनी ही मागणी इंग्रजांकडे नोंदवली नसेल असे सिध्द होईल कदाचित. अश्या महात्मा गांधींनी केलेल्या मागण्यांना इंग्रजांनी केराची टोपली दाखवली हेही विसरयला नको.
टिळक इंग्रजांवर थुंकायला सांगत हेच योग्य होते. काँग्रेसची स्थापना स्वातंत्र्यासाठी होती आणि टिळक अध्यक्ष होते ते काय राजे रजवाडे यांचे हक्क वाढवुन मागायला का ?
मी लिहीले होते तसे टिळकांच्या
मी लिहीले होते तसे टिळकांच्या वेळी काँग्रेस ची मागणी Home Rule होती. >>
नव्हती. काँग्रेस आणि होम रूल ह्या दोन वेगवेगळ्या चळवळी होत्या. पहिल्या महायुद्धानंतर जिन्हा, टिळक, अॅनी बेझेंट ह्या पूर्वाश्रमीच्या काँग्रेसच्या लोकांनी होम रूल चळवळ (वेगळी) सुरू केली. काँग्रेसचा पहिले काही वर्षे तसा डायरेक्ट संबंध नव्हता. पुढे टिळक होम रूल सोडून परत काँग्रेस मध्ये गेले. १९२० मध्ये तर गांधींजी देखील अध्यक्ष होते, मग त्यांनी ह्या चळवळीचे विलिनीकरण केले.
मला जेवढे आठवते त्याप्रमाणे श्री जवाहरलाल नेहरूंनी टिळकांना, फादर ऑफ इंडियन रिव्होल्युशन" असे म्हणले आहे.
सर्वात महत्त्वाचे होम रूल चळवळ ही १९१४ नंतरची आहे. त्या आधी १९०७ मध्ये टिळकांनी काँग्रेस अधिवेशन हायजॅक करून "स्वराज्य, स्वदेशी" हे विधेयक मांडले. आणि मॉडरेट लोकांनी गोंधळ केला. त्यांना अति जहाल ठरवले गेले आणि ह्या संपूर्ण एपिसोडची परिणीती म्हणूनच , ब्रिटिशांनी टिळकांना मंडालेत पाठवले असे काही इतिहासकार लिहितात. त्यालाच प्रसिद्ध "सुरत स्प्लिट" असेही म्हणतात.
उत्तम चित्रपट परिचय. अगदी
उत्तम चित्रपट परिचय. अगदी मनापासून लिहीला आहे. खूपच प्रभावी आणि ओघवता..
पण हे
आझादी ही फक्त आणि फक्त बिना खडग बिना ढाल मिळालेली आहे अशी खोडसाळ आणि तितकीच खुळचट समजूत करुन देणारी पाठ्यपुस्तके असल्यावर पुढच्या पिढीला सत्य समजणार तरी कसे?
शेपूट जोडले नसते तर बरे झाले असते.
मी अजूनही कुठल्याही पाठ्यपुस्तकात असे लिहीलेले पाहिले नाही. आमच्याकाळी पुस्तकात जसे गांधी होते तसेच सुभाषबाबू, भगतसिंग आणि राजगुरुदेखील होते. १८५७ च्या उठावापासून वासुदेव बळवंत फडकेदेखील होते. त्यामुळे उगाच खाज काढवून खरूज काढायची सवय सोडून द्या.
>>>मी अजूनही कुठल्याही
>>>मी अजूनही कुठल्याही पाठ्यपुस्तकात असे लिहीलेले पाहिले नाही. आमच्याकाळी पुस्तकात जसे गांधी होते तसेच सुभाषबाबू, भगतसिंग आणि राजगुरुदेखील होते. १८५७ च्या उठावापासून वासुदेव बळवंत फडकेदेखील होते. त्यामुळे उगाच खाज काढवून खरूज काढायची सवय सोडून द्या.<<<
कोणत्याही पाठ्यपुस्तकात तसे नसणे ह्याच्याशी सहमत!
मात्र वरील बर्यापैकी चर्चा 'खाजवून खरूज' ह्या सदरात मोडणारी झालेली आहे आणि कोकणस्थांनी ते खाजवणे केलेले नाही.
पुन्हा तेच म्हणावेसे वाटते.
१. टिळक चित्रपट कसा आहे ह्यावरची चर्चा एका धाग्यावर
२. टिळकांनी प्रत्यक्षात काय केले, काय नाही, ही चर्चा दुसर्या धाग्यावर!
असे झाले तर किती छान होईल!
Pkच्या धाग्यावर एका आगलाव्या
Pkच्या धाग्यावर एका आगलाव्या कंपूने काय केले? पीके सोडून बरेच विषय आणलेले ते चालत होते? तेव्हा सुचले नाही?
टोचा, >> विचारयचे दुसरे कारण
टोचा,
>> विचारयचे दुसरे कारण म्हणजे टीव्हीवर पण सुबोध भावे ला टीळकांची तत्वे वगैरे बोलत होता. काय होती ही तत्वे?
टिळकांच्या तत्त्वांपैकी चटकन आठवली ती चतु:सूत्री. तीत स्वदेशी, स्वराज्य, बहिष्कार आणि शिक्षण यांचा समावेश होता. टिळकांविषयी अधिक माहितीसाठी भारतकुमार राऊतांचा इथला लेख पाहावा : http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3311746.cms
आ.न.,
-गा.पै.
>>>स्वदेशी, स्वराज्य,
>>>स्वदेशी, स्वराज्य, बहिष्कार आणि शिक्षण<<<
गांधींनी पहिली तीन सूत्रे मांडलीच होती. चौथे टिळकांचे वैशिष्ट्य मानावे लागेल.
गांधी टिळकांनंतर उदयास आले हा भाग वेगळा!
स्वदेशी - स्वावलंबन
स्वराज्य - सत्य
बहिष्कार - अहिंसा
रीव्ह्यू आवडला. सिनेमा नक्की
रीव्ह्यू आवडला. सिनेमा नक्की बघणार.
गांधींनी पहिली तीन सूत्रे
गांधींनी पहिली तीन सूत्रे मांडलीच होती. चौथे टिळकांचे वैशिष्ट्य मानावे लागेल >>
नाही. स्वदेशी, बहिष्कार आणि स्वराज्य ह्याचे श्रेय टिळकांचे आहे. १९०७ च्या त्या सुरत स्प्लिट मध्येच ही विधेयके त्यांनी मांडली होती. गांधींजी तेंव्हा इथे नव्हते. ते १९१५ मध्ये परतोनि आले.
गांधींजींनी त्यांचा वारसा मोठ्या सशक्तपणे पुढे नेला. ( विधेयक वगैरेंचा) शिक्षणासाठी टिळकांनी काय केले हे पुण्यात राहणार्यांना मी काय सांगावे ?
केदार, १९०७.
केदार, १९०७.
लिहायच्या ओघात २००७ लिहिले.
लिहायच्या ओघात २००७ लिहिले.
'स्वदेशी'चं मूळ बंगालात आहे.
'स्वदेशी'चं मूळ बंगालात आहे. आणि महाराष्ट्रात टिळकांच्या आधी लोकहितवादींनी स्वदेशीचा मुद्दा मांडला आणि रेटून धरला. 'बहिष्कारा'चं अस्त्रही लोकहितवादींनी सर्वप्रथम वापरलं. महाराष्ट्रात चळवळीला पाठिंबा मिळाला तो मात्र टिळकांमुळे.
परीक्षण आवडलं.
>>>गांधींजी तेंव्हा इथे
>>>गांधींजी तेंव्हा इथे नव्हते. ते १९१५ मध्ये परतोनि आले<<<
तुम्हाला माझ्या प्रतिसादातील वक्रोक्ती लक्षात आलेली दिसत नाही. हे वाक्य पुन्हा वाचावेत.
>>>गांधी टिळकांनंतर उदयास आले हा भाग वेगळा! <<<
बेफिकीर
बेफिकीर
धन्यवाद चिनुक्स
धन्यवाद चिनुक्स
या लेखामुळे 'दुर्दम्य' हे
या लेखामुळे 'दुर्दम्य' हे पुस्तक कळलं..मला हे नाव माहीत नव्हतं..वाचेन आता.
मी लहानपणी 'गुणसागर टिळक' नावाचं एक पुस्तक वाचलं होतं आणि ते खूप आवडलं होतं असं आठवतंय.
परिक्षण आवडले.... टिळक काय
परिक्षण आवडले....
टिळक काय होते, त्यांची काय तत्वे होती हे जर माहित नसेल, किंवा जाणून घ्यायची तयारी नसेल तर मग कशाला सिनेमा पहायच्या फन्दात पडायचे....
मला सिनेमा आवडला... त्याचा आजचा जोडलेला संदर्भ पण आवडला. (चिन्मय-प्रिया चा ट्रॅक). आजच्या काळात त्यांची तत्वे आपण कशी बासनात गुंडाळुन ठेवली आहेत किंवा जागतिक रेट्या मुळे आपल्याला त्यांची सगळीच तत्वे पाळायला जमत नाहीत... चिन्मय चे कॅरॅक्टर हे विचार आणि सध्याची परिस्थीती याने गोंधळुन गेलेले दाखवले आहे. त्यात प्रिया बापट च्या तोंडुन त्यावर सुवर्ण मध्य कसा काढायचा ह्याचा विचार मांडला आहे. त्यांची तत्वे आज शब्द्शः पाळता येणे दुरापास्त आहे. पण त्यांची जी बेसिक तत्वे आहेत जसे आपल्या शिक्षणाचा समाजाला शक्य तेवढा उपयोग करुन देणे. समाजाचे ऋण मान्य करुन होत होइल तेवढे त्याचे देणे परत करणे. आधी आपला देश मग बाकी सगळे. आधी करा मग सांगा. गीतेचे सोप्पे तत्वज्ञान.... हे तर आज आपण सहज आमलात आणु शकतो, हा आशावाद सिनेमा चांगला मांडतो.
लोकमान्यां सारखी सामाजिक परिस्थीती आज नाही. आजच्या परिस्थीतीत लोकमान्यही कदाचित वेगळे वागले असते. तो लोकांचा नेता होता. त्या काळात जेंव्हा धर्म ह्या नावा खाली अनेक भेदाभेद होते, तेंव्हा सुधारकी मते बाजुला थेवुन आधी समाज मन आपल्या बाजुला वळवुन एक सांघिक ताकद निर्माण करणे ह्या गोष्टी ला त्यांनी महत्व दिले. मग लंडन ची वारी केल्यावर प्रायश्चित्त ही घेतले. लोकांच्या मना विरुध्ध त्यांनी काहीही केले नाही. कारण त्यांना लोकांना आपल्या बाजुला वळवुन एक समाजिक ताकद ब्रिटिश सरकार समोर उभी करायची होती..
मला वाटतय लोकमान्य आज आउट्डेटेड झालेले नाहीत हे दाखवायचा सिनेमाचा उद्देश नक्कीच सफल झाला आहे. एक माणूस आयुष्यात काय काय करु शकतो. त्याच बरोबर तो माणूस कसा पूर्ण पणे समाजाचा होता, घरच्यांचा नव्हताच. हा धागाही सिनेमा व्यवस्थीत मांडतो.... त्यांच्या बायकोला पूर्ण चित्रपटात एकही संवाद नाही. तसेच टिळकांचे खट्याळ व्यक्तिमत्व, थोडी गुंडगीरी, (डेव्हिल टिळक) हे सगळे सिनेमात चांगले दाखवले आहे.
सुबोध भावे हा हिरा आहे. चिन्मय मांडलेकर, प्रिया बापट, सगळ्यांचीच कामे छान. ओम राउत ने फार मोठे धाडस केले आणि बर्याच प्रमाणात पेलले सुध्धा.
पूण्याला सिटी प्राइड्ला दुसर्या शो ला ४२ पैकी १७ आसने भरलेली होती.... सिनेमा थेटरात बघारे..... नाहितर असे चांगले विषय पुढे येणार नाहीत.....
दूर्दम्य परत वाचायला घेतले आहे.... मी १८ वर्षांची असताना माझ्या वाढदिवसाला बाबांनी ते पुस्तक भेट दिले होते ( त्याच्या वरच्या तारखे नुसार)..... त्यावर गंगाधर गाडगीळांची सही मी ते आमच्या कॉलेज मधे आले असताना घेतली होती. गंगाधर गाडगीळांचे इतर कोणतेही लेखन मला फारसे आवडले नाही... पण ह्या एका पुस्तकाने सगळ्याची भरपाई केली.
त्यांना नसेल पुस्तक वाचायला
त्यांना नसेल पुस्तक वाचायला वेळ मिळत, किंवा बोअर होत असेल वाचून.
त्यामुळे वाचणार नाही ही पळवाट होऊ शकत नाही त्यांच्यासाठी. नाही का ?
टोचा, मी सांगतो त्यांचे एक तत्व होते मिशनरी वृत्तीने काम करायचे देशासाठी, आणि ते त्यांनी आयुष्यभर पाळले.
मिशनरी वृत्ती म्हणजे, जे काही काम करत असतील त्यातुन फक्त आयुष्याच्या बेसिक गरजा भागतील एवढेच मानधन या स्वरूपात घ्यायचे. खुप मोठा संग्रह करून त्यात गुंतून पडायचे नाही, असे केले तर ठरविलेल्या कार्यापासुन विचलित होण्याचे भय असते. त्यांनी जे काही काम केले, शिक्षक, पत्रकारिता, वृत्तपत्र चालविणे, इ. हे केवळ स्वतःचे आयुष्य चालावे यासाठी नव्हते. आणि हे तत्व त्यांनी कसोशीने आयुष्यभर पाळले.
अजुन एक तत्व होते ते म्हणजे ज्यांनी त्यांच्यावर विश्वास टाकला होता त्याला कधी तडा जाऊ न देता, स्वतःचा कोणताही स्वार्थ न साधता विश्वस्त वृत्तीनेच कारभार पहाणे. याचे मोठे उदाहरण होते भाऊ महाराज या नागपुरच्या संस्थानिकांनी त्यांना विश्वस्त (ट्रस्टी) नेमले होते आणि त्यांच्या माघारी एक योग्य उत्तराधिकारी नेमण्यास सांगितले होते. ही जिकिरीची आणि मोठी जबाबदारी पार पाडताना त्यांना स्वतःला मोठ्या खटल्याला सामोरे जावे लागले, पण त्यात ते बावनकशी सोन्याप्रमाणे निष्कलंक ठरले.
ही दोन तत्वे एवढी मोठी आहेत की यापुढे अजुन काय सांगू ? _/\_
एक शंका आहे. टिळक जेव्हा
एक शंका आहे. टिळक जेव्हा मंडालेहून परत आले तेव्हा ही बातमी कोणालाच माहीत नव्हती
म्हणजे त्याकाळी सोशल मिडीया किंवा २४ तास बातम्या देणारी न्युज चॅनेल्स नव्हती तरी हे खर वाटत नाही.
तसेच घरी काम करण्यार्या नोकराने त्यांना ओळखले नाही हे पण जरा विचित्र वाटले. तो नोकर जरी नवा असेल तरी आपण ज्यांच्याकडे काम करतो तो भारतातला एक खूप मोठा नेता आहे हे त्याला नक्कीच माहीत असेल. किंबहुना त्याला त्याचा अभिमानही असेल. अश्या वेळी त्याने टिळकांना ओळखू नये ही काही झेपले नाही.
Pages