(हा राग ऐकण्यासाठी https://www.youtube.com/watch?v=cSrD8S54jnI )
चंद्रनंदन
खरं तर आजपर्यंत मी कधीही ठरवून वगैरे राग ऐकला नाही. काळवेळ आणि ऋतूनुसार जो योग्य वाटेल तोच नेहमी ऐकत आलो. पण एकदा पर्रीकराच्या वेबसाईटवर राग जोग विषयी माहिती वाचताना राग चंद्रनंदनचा उल्लेख आढळला. उस्ताद अली अकबर खानांची ही निर्मिती. बाबा अल्लाउद्दीन खानांची तालीम लाभलेलं हे व्यक्तीमत्व. मुळात बाबा स्वत:च परीसस्पर्श घेऊन जन्माला आलेले. ज्या ज्या शिष्यांना तालीम दिली त्यांच्या आयुष्याचं तर सोनं झालंच पण, शिष्यांच्या पुढच्या पिढ्यांना पण तोच वारसा मिळाला. लिहायला बसलं की वाहवत जातो असा माणूस गाण्याविषयी! मुद्द्यावर येतो, तर सांगायची गोष्ट अशी की अली अकबरांच क्रिएशन म्हणून तो राग ऐकायची इच्छा फार बळावली. पण पुढे लक्ष्यातुन गेलंच
आणि अचानक एका रात्री लॅब मधून घरी जाताना मोबाईल वर पं. ब्रजभुषण काबरा यांनी भारतीय स्लाईड गिटारवर वाजवलेला चंद्रनंदन सापडला, पं. काबरा हे अली अकबरांचेच शिष्य. मी लगेच सुरु केला तो राग ऐकायला! सुरु झाल्या झाल्या दुसऱ्याच स्वरवाक्याला माझ्या डोळ्यातून पाणी आलं. एरव्ही मला हे अश्रू बिश्रू प्रकरण फार ड्रामॅटीक वाटतं, पण काय करू, इतका विशुद्ध आलाप? फक्त स्वरांच्या शुद्धतेमुळेच एवढा आनंद झाला की तो व्यक्त करायला मार्गच नव्हता दुसरा.
काय सार्थ नाव असावं एखाद्या रागाचं तरी! डोळे बंद करून ऐकत होतो तरी डोळ्यासमोर कोजागिरीचा चंद्रच होता. तो सगळ्या परिसरावर प्रकाश पेरतोय. तिथे अंधार आजिबात नाही असं नाही, पण त्या अंधाराला सुद्धा चंद्राच्या शीतल प्रकाशाची रुपेरी कडा आहे. त्या प्रकाशात दु:खाला थारा नाही. हुरहूर जरूर आहे पण ती चंद्रप्रकाशाची, त्यातल्या सौंदर्याची. नंतर एकदा अली अकबरांची एक मुलाखत वाचताना कळलं की ह्या रागातून त्याना चंद्रप्रकाशात विहरणारे कृष्ण आणि गोपिका हेच व्यक्त करायचे होते. काय योगायोग आहे! कसे तेच भाव माझ्या मनात पं. काबरांनी उतरवले असतील? वादकाच्या प्रतिभेचा प्रवाह एखाद्या रागात इतकां संहत असतो का की तो ऐकणार्याच्या मनातही तसाच झिरपत जातो? की वादकाच्या प्रतिभेची बाधा श्रोत्याला पण होते ?
मुळात नवीन राग हा नुसता निर्माण करून चालत नाही. त्या रागाने स्वतःचा असा एक भाव प्रकट करावा लागतो. किशोरीताईंचा बागेश्री ऐकल्यानंतर जर कुणी मला विचारलं की कसं वाटतंय तर त्या प्रश्नाला दु:ख वाटणे, आनंद वाटणे यापेक्षाही "मला बागेश्री वाटतय" हेच उत्तर असू शकेल. कारण तिथे बागेश्री हाच एक भाव असतो, एक भावावस्था असते. आणि नवीन रागांच्या बाबतीत हे अवघड आहे कारण बागेश्री सारखा शतकांचा वारसा त्याला नाही लाभलेला. जर असे वातावरण नवीन रागाने सिद्ध होत नसेल तर ती एक नवनिर्मितीच राहते, त्याचा राग होत नाही. पण चंद्रनंदन मात्र असा तयार केलाय की तो राग पौर्णिमेच्या रात्रीचे भाव तर जागवतोच पण एक चित्र देखील उभं करतो. आणि काबरांच्या गिटारीतून जेव्हा तो राग स्रवू लागतो तेव्हा आपण फक्त त्यात वाहत रहायचं!
आणि हा राग पण किती अवघड! यात जोगकंस , मालकंस आणि कौशी कानडा याचे दोर गुंफलेत. याचा धैवत मालकंसाचा, गंधार जोगकंसाचा आणि रिषभ कौशी कानड्याचा आणि असं असूनही हे सगळं एकट्या चंद्रनंदनाचं! एक अशी मींड कोमल धैवतावरून गंधारावर घेतलीय काबरांनी, जसं की पानगळ होताना एखादं सोनेरी पान अलगद जमिनीवर पडावं आणि धुळही उडू नये! हे गिटारीवर अवघड अशासाठी कारण त्याला फ्रेट्स नसतात. तारांवर सरसर वेगात फिरणारा रॉड जर हाताने पटकन आवरला नाही तर स्वर चुकीचा लागतो आणि त्यात अशा हळुवार मींडीला किती भयंकर नियंत्रण लागत असेल! ती एकच मींड सगळ्या रागाला चंद्र प्रकाशाची शीतलता आणि तरलता देते. कृष्णानं जसा करंगळीवर गोवर्धन धरला; तसंच त्या मींडीच्या शेवटी येणाऱ्या कोमल गंधारावर पूर्ण चंद्रनंदन पेललाय पं. काबरांनी. आणि त्यात कृष्णाचा गोपिकांबरोबर असणाऱ्या खेळाप्रमाणे षड्ज कधी कोमल गंधाराला कुरवाळतो तर कधी शुद्ध गंधाराशी सलगी करतो. सगळा रागच असा हळुवार पण मोकळ्या स्वरांनी उलगडत जातो.
कधी कधी असं होतं की गुरु निर्माण करतो आणि शिष्य त्या निर्मितीला एक वेगळी उंची प्रदान करतो. पं. काबरांनी चंद्रनंदनला तीच उंची बहाल केलीय. सहज डोळे उघडून बसच्या बाहेर बघितलं ! बाहेर खरंच पूर्ण चंद्र सांडला होता. ध्यानीमनीही नाही की ती पौर्णिमेची रात्र होती. कोमल आणि शुद्ध गंधाराप्रमाणे माझ्या मनातल्या आणि समोर दिसणाऱ्या त्या दोन चंद्रांनी माझ्या मनात चंद्रनंदन अगदी कोरला! चंद्रनंदन म्हणजे तो चंद्र, ती मींड, तो गंधार आणि ते पं. काबरा!
खूप छान लेखन!
खूप छान लेखन!
धन्यवाद शोभनाताई!
धन्यवाद शोभनाताई!
लेख वाचतानाच युट्युब लिंक ओपन
लेख वाचतानाच युट्युब लिंक ओपन केली होती. अद्भुतरीत्या वाजवलेलं आहे. बाकी शास्त्रीय संगीतातलं इतकं काहीच कळत नाही, पण वाचायला फार आवडलं. लिहत रहा.
कुलू, मला राग वगैरे एवढं काही
कुलू, मला राग वगैरे एवढं काही कळत नाही पण तुम्ही किती सुंदर आणि ओघवतं लिहिलंत त्याबद्दल खरंच ___/\___.
तुमचं लिखाण एवढं सुरेख आहेना की वाचत राहावं असं वाटतं.
आता लिंक ऐकते तुम्ही दिलेली.
वा! किती सुरेख लिहिलंय.
वा! किती सुरेख लिहिलंय. ऐकतेय आणि अनुभवतेय.....
मामी, नंदिनी, अन्जु धन्यवाद
मामी, नंदिनी, अन्जु धन्यवाद
अन्जु, यह तुने अच्छा नही किया वाटल्यास शिवी दे पण अहो जाहो नको बोलवुस गं!
ओके कुलू. ऐकली लिंक. शब्द
ओके कुलू.
ऐकली लिंक. शब्द नाहीत माझ्याकडे. मस्त सुरेल संध्याकाळ.
गुड गर्ल अन्जु
गुड गर्ल अन्जु
खूप छान लिहिले आहे कुलु. वर
खूप छान लिहिले आहे कुलु.
वर अनेकांनी म्हणल्याप्रमाणे संगीतातील गुंतागुंत समजत नाही पण वेगवेगळ्या रागांनी - किंवा एकाच रागाच्या वेगळ्या सादरीकरणामुळे - मनात अनेकानेक प्रतिमा जागतात इतके अनुभवू शकतो.
खरेतर एका कलेला दुसर्या कलेच्या माध्यमातून व्यक्त करणे फार अवघड, पण तुला ही किमया सहजसाध्य आहे. त्यामुळे तुझ्याइतक्या उत्कटतेने हा राग उमगत नसला तरी तुझी उत्कटता मात्र या अलवार शब्दांमुळे सहज प्रत्ययास येत आहे.
कुलू, मला राग वगैरे एवढं काही
कुलू, मला राग वगैरे एवढं काही कळत नाही पण तु किती सुंदर आणि ओघवतं लिहिलंत त्याबद्दल खरंच _^___ >>++१११
मस्त लिहिले आहेस... किती मनापासुन लिहितोस.. सुंदर्
शुभेच्छा तुला पुढील लिखाणाला.
कुलू छान लिहिलंस. निवांतपणे
कुलू छान लिहिलंस. निवांतपणे ऐकणार हा राग. (प्रथमच)
Lekh awadla.
Lekh awadla.
खुप सुंदर ! हि लिंक घरी
खुप सुंदर ! हि लिंक घरी गेल्यावर ऐकेनच... आता लिहायला सुरवात केलीच आहेस तर लिहित रहा.
पौर्णिमेच्याच रात्री
पौर्णिमेच्याच रात्री समुद्रकिनारी वाळूत आठदहा रसिक मित्र सहलीच्या निमित्ताने एकत्र जमले आहेत....विविध विषयांवरून चाललेल्या त्या गप्पा आणि सोबतीला पौर्णिमेची अधिक समुद्राची गाज अविरतपणे साथीला आहेत आणि कुणीतरी अगदी आतुरतेने कुलदीपला रागदारीबद्दल बोल रे,...अशी सूचना करीत आहे आणि मग कुलदीप तितक्याच आत्मियतेने सुरू करतो, पौर्णिमेच्या साथीसोबत..."...खरं तर आजपर्यंत मी कधीही ठरवून वगैरे राग ऐकला नाही. काळवेळ आणि ऋतूनुसार जो योग्य वाटेल तोच नेहमी ऐकत आलो....." आणि पुढच्याच क्षणाला सारे श्रोते त्या प्रवाहात भान हरपून बसतात....चंद्रनंदनाची मोहमयी जादू कुलदीप उलगडत जातो....कसे ते वरील लिखाणात आले आहेच.
खूप सुंदर....इतके की मनावर एका कारणाने आलेली उदासीनता लेख वाचताना कुठेतरी लुप्त होऊन गेली आणि उरली सोबतीला ती चंद्रनंदनपासून लाभलेली शुद्ध सौंदर्याची भावना.
अमेय आणि अशोकमामा सुंदर
अमेय आणि अशोकमामा सुंदर प्रतिसाद.
अमेय, सृष्टी, मानुषी
अमेय, सृष्टी, मानुषी धन्यवाद!
चिनुक्स यांच्यासरख्या संगीतातल्या जाणकारालाही लेख आवडल्याचा विशेष आनंद झाला धन्यवाद चिनुक्स
दिनेश नक्की ऐक निवांतपणे. खुप छान आहे!
मामा तुमचा प्रतिसाद वाचत रहावासा वाटतो . तुमच्या मनावर आलेली उदासीनता दुर झाली या गोष्टीचा आनंद झाला
kulu, >> वादकाच्या प्रतिभेचा
kulu,
>> वादकाच्या प्रतिभेचा प्रवाह एखाद्या रागात इतकां संहत असतो का की तो ऐकणार्याच्या मनातही तसाच झिरपत
>> जातो? की वादकाच्या प्रतिभेची बाधा श्रोत्याला पण होते ?
दोन्ही प्रश्न एकच आहेत. आणि त्यांचं उत्तर हो आहे. कसं ते किशोरीबाई आमोणकरांच्या स्वरार्थरमणी ग्रंथात दिलं आहे. त्याचा काही भाग इथे सापडेल : http://www.maayboli.com/node/7457
या धाग्याच्या खाली माझी रिक्षा आहे : http://www.maayboli.com/node/7457#comment-3136124
तीत भावसंक्रमण कसं होतं ते उलगडून सांगितलं आहे. तुम्ही ज्याला 'वादकाच्या प्रतिभेचा प्रवाह श्रोत्यांच्या मनात झिरपणे' म्हणता त्याला किशोरीबाई 'भाव प्रतीयमान होणे' म्हणतात.
असो.
लेखाबद्दल लिहायचं राहूनच गेलं. लेख अतिशय तरल आणि ओघवता आहे. थेट आत भिडतो. म्हणूनच तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायची उर्मी दाटून आली. मला शास्त्रीय संगीतातलं काहीही कळंत नाही. पण त्याविषयी वाचायला आवडतं. अशाच लिहित्या राहा!
आ.न.,
-गा.पै.
तुम्ही ज्याला 'वादकाच्या
तुम्ही ज्याला 'वादकाच्या प्रतिभेचा प्रवाह श्रोत्यांच्या मनात झिरपणे' म्हणता त्याला किशोरीबाई 'भाव प्रतीयमान होणे' म्हणतात.>>>>>> गा. मा. पैलवान अगदी बरोब्बर सांगितलंत. वाचलंय किशोरीताईंच स्वरार्थरमणी समजलंय की नाही काय माहित, पण वाचाणार आहे परत पण दरवेळी जेव्हा जेव्हा वादक आणि श्रोता असं अस्तित्वातलं द्वंद्व संपुन भाव हाच एकमेव अस्तित्व बनतो तेव्हा तेव्हा भावाच्या या प्रतीयमान होण्याचं आश्चर्य वाटतंच! म्हणुनच उत्तर माहित असतानाही ते प्रश्न लेखात आले तुमचा प्रतिसाद वाचुन खुप बरं वाटलं
एक अशी मींड कोमल धैवतावरून
एक अशी मींड कोमल धैवतावरून गंधारावर घेतलीय काबरांनी, जसं की पानगळ होताना एखादं सोनेरी पान अलगद जमिनीवर पडावं आणि धुळही उडू नये! >>>> क्या बात है .... तुझे लेखन हीच एक मैफिल बनून रहाते यार ....
कुलु, केवळ अप्रतिम. एखाद्या
कुलु, केवळ अप्रतिम. एखाद्या जमलेल्या खयालासारखाच उतरलाय लेख. अलि अकबर खा साहेबांचे एक सरोदिया शिष्यं इथे सिडनीत अनेक वर्षं होते. त्यांच्या कडून चंद्रनंदन ऐकलाय, बडे खा साहेबांचीच चीज. राग खरच सुरेख आहे.
लिन्क घरी जाऊन ऐकेन.
नक्की एकणार आहे पण तू जे
नक्की एकणार आहे पण तू जे लिहिलस ते फार आवडलं!
तुझे लेखन हीच एक मैफिल बनून
तुझे लेखन हीच एक मैफिल बनून रहाते यार>>>>> खुप खुप आभार शशांकजी
दाद, खुप धन्यवाद
बी नक्की ऐक आणि ऐकल्यावर कसा वाटला ते पण सांग
कुलू, आम्हाला समृद्ध
कुलू, आम्हाला समृद्ध करतोयस.
कोजागिरीचं, पूर्ण चंद्राचं ते सगळं तू अनुभवलेलं इथे वाचताना समोर उलगडत जातंय.
मींड हा प्रकारच मुळात नजाकतीचा आहे, वेग नियंत्रणात ठेवून झोका घेणे ही अशक्यप्राय गोष्ट आहे आणि ती अनुभूती केवळ गायन-वादनातूनच मिळू शकते. त्यामुळे ही मुद्दाम उल्लेख केलेली मींड ऐकण्याची खुप उत्सुकता आहे.
राग ऐकलेला नाही. लिंक घरी जाऊनच ऐकावी लागेल. मी इतर ठिकाणी म्हणाले तसं तुझे लेख वाचण्यासाठी आणि आता तू त्यात दिलेल्या लिंक्स ऐकण्यासाठीही एक माहौल आणि मनाचाही निवांतपणा लागतो. जाता जाता वाचण्यासारखा प्रकार नसतो किंवा पटकन नजर फिरवली असंही करता येत नाही. मुद्दाम सवड काढायला लावतोयस ही आनंदाची गोष्ट आहे
फार सुंदर लिहिलंय. यू-ट्यूब
फार सुंदर लिहिलंय. यू-ट्यूब लिंक पण लाजवाब.
मला रागदारीतलं अ, ब, क देखील कळत नाही; पण तुम्ही लिहिता ते वाचायला खूप आवडतं.
सई किती सुंदर प्रतिसाद देतेस!
सई किती सुंदर प्रतिसाद देतेस! अगदी मनमोकळा आणि प्रांजळ नक्की ऐक , आणि ती मींड तर अगदी कान ति़खट करुन ऐक!
ललिता-प्रीति खुप धन्यवाद
लोकहो, ही चंद्रनंदनची लाईव्ह
लोकहो, ही चंद्रनंदनची लाईव्ह व्हीडीओ क्लीप!
https://www.youtube.com/watch?v=W4vgwVfxD2c
कुलू मी तुझं लिखाण वाचलं
कुलू मी तुझं लिखाण वाचलं नव्हतं. मला ही शास्त्रीय संगितातले बारकावे कळत नाहीत. पण तुझा लेख हा लेख नसून शब्दात उतरलेली अनुभूती आहे.फारच सुरेख आणि सुरेल लिखाण.
धन्यवाद दक्षिणा वाचलंस तसं
धन्यवाद दक्षिणा वाचलंस तसं ऐक पण गं! खुप सुंदर आहे!
फारच छान ! एकदा भेटायला हवे
फारच छान !
एकदा भेटायला हवे तुला कुलू...
>>किशोरीताईंचा बागेश्री ऐकल्यानंतर जर कुणी मला विचारलं की कसं वाटतंय तर त्या प्रश्नाला दु:ख वाटणे, आनंद >>वाटणे यापेक्षाही "मला बागेश्री वाटतय" हेच उत्तर असू शकेल.
अगदी अगदी !!!
चैतन्य नक्की भेटायचं आहे
चैतन्य नक्की भेटायचं आहे
Pages