भाग-१ पूर्वतयारी http://www.maayboli.com/node/52024
भाग-२ पुणे ते काठगोदाम http://www.maayboli.com/node/52054
भाग-३ काठगोदाम ते धाकुरी http://www.maayboli.com/node/52100
भाग-४ आलं मनात आणि गेलो हिमालयात (पिंढारी ट्रेक)
धाकुरी-खाती (११ जून २०१४)
हा ट्रेक ट्रेकिंगच्या अवघडपणाच्या पट्टीवर फार वर नसावा. कागदोपत्री (तरी!) ह्या ट्रेकला तसा सोपा मानतात. त्यामुळे ज्यांना घाई असते, असे ट्रेकर्स दोन-दोन कँप एका दिवशी करून अगदी कमी दिवसांमध्ये ह्याच गणित बसवतात. आम्ही मात्र ह्या फंदात पडलो नव्हतो. आम्ही जाताना निवांतपणे एक-एक कँप करत जाणार होतो. जातानाच्या चार दिवसांचं चालायचं अंतर येताना दोन दिवसांमध्ये संपवणार होतो.
ह्याचा फायदा म्हणजे अगदी भल्या पहाटे उठा, भराभरा आवरून निघा अस शेड्यूल नव्हतं. घराबाहेर, त्यातून अशा निसर्गरम्य जागी असल्यावर तशीही फार उशिरापर्यंत झोप लागतच नाही. आदल्या दिवशी पाहिलेलं दृश्य आता पहाटेच्या कोवळ्या उजेडात कसं दिसेल, ह्या उत्सुकतेने लवकर जाग येतेच.
पण उठल्यानंतर व्हरांड्यात बसून एकट्याने किंवा मैत्रिणींबरोबर आरामात कॉफी प्यायला, गप्पा मारायला वेळ मिळत होता! नक्की किती वर्षांपूर्वी ही मजा घेतली होती, तेसुद्धा आठवत नव्हत. मैत्रिणींच्या घरी गेलं, तरी जिच्या घरी गेलेलो असू, तिला तिची काम असतातच. इथे सगळेच रिकामे होते. डब्याच्या भाज्या, कुकर लावणे, कामवाल्या बाईंच्या वेळा, स्वैपाक, ऑफिसचे फोन आणि तिथल्या डेडलाईन्स..... काहीही नव्हत.
दुर्मिळ असलेले निवांत क्षण
आजही काहीही न ठरवता आम्ही ‘दिदी लोग’ बाहेर कॉफीचे कप हातात घेऊन बसलो होतो. उजाडलं होत पण ऊन मात्र नव्हतं. भल्या पहाटे थोडासा पाउस झाला होता. त्याचे थेंब समोरच्या लॉनवर चमकत होते. पक्ष्यांच्या सुरेल हाका सोडल्या, तर बाकी सगळी शांतता होती. त्या शांततेमुळे आपल्या मनातला, डोक्यातला सतत चालू असलेला कोलाहल थांबला नाही, तरी थोडा कमी व्हावा अस वाटत होत.
जरा वेळाने मुलांना जाग आली. त्यांची आवराआवरी, चहा-पाणी, हसणं-खिदळणं सुरू झालं. आम्हीही आमची कॉफी-समाधी संपवून आवरायला लागलो.
आवरून, पोर्टर आणि डे सॅक वेगळ्या करून, चालायचे बूट चढवून आणि किमान सतरा वेळा कँपवर काही विसरलो नाही, ह्याची खात्री करून बाहेर आलो, तर एक आश्चर्य आमची वाट पाहात होतं. लख्ख ऊन पडलं होत. कँपसमोरच्या झाडांच्या मधून एक उंच, बर्फाच्छादित शिखर दिसत होत! सगळ्यांना इतका आनंद झाला. जणूकाही आम्ही ते शिखर सर करून आलोय.. तातडीने त्या शिखराचे आणि त्या पार्श्वभूमीवर आमचे सर्वांचे फोटो काढले गेले. आमची ही घाई पाहून देवेन सर हसत होते. ‘मॅम, ऐसे बहोत सारे नजारे दिखाई देंगे, फिकर मत किजीयेगा.’ असं म्हणून आमचा उत्साह आणि पुढच्या दिवसांबद्दलची उत्सुकता वाढवत होते.
प्रथम तुज पाहता, जीव वेडावला!!
देवेन सर म्हणजे अगदी शांत लीडर होते. संपूर्ण ट्रेकभर त्यांनी आम्हाला निघण्याची, चालायची, पोचायची घाई केली नाही. सगळं आमच्या वेगाने करू द्यायचे. ‘ आपलोग जहांसे आते हो, हरदिन जल्दीही होती है. पहाडोमें आये हो, उसका मजा लिजिये, कोई दिक्कत नहीं है’ अस म्हणायचे. नाहीतर बरेच लीडर ‘घाई’ संप्रदायातले असतात. ‘हल्या-हल्या’ करण्यात त्यांना फार आनंद मिळतो. एकदा लोकांना पुढच्या कँपवर पोचवलं, म्हणजे झालं. अशी साधारण मनोवृत्ती असते.
काही वर्षांपूर्वी ह्याच ग्रुपमधले आम्ही पाच लोकं गोव्याच्या ट्रेकला एका संस्थेबरोबर गेलो होतो. मोठा, चाळीस लोकांचा ग्रूप होतं. त्या ग्रुपमधल्याच एका व्यक्तीला लीडर नेमलं होत. त्यांनी तर अगदी नकोनको केलं होत. ‘बॅचच्या सुरवातीला बायका नंतर पुरुष असचं चालायचं, फक्त नवरा-बायको असले, तरच बरोबर चालू शकतात’, असे तालिबानी फतवे काढले होते. आम्ही ‘मुलाबरोबर चाललं तर चालेल का? भाच्याबरोबर चाललं तर परवानगी आहे का?’ असे प्रश्न विचारून त्यांना भंडावून सोडलं होतं. त्या बॅचमधल्या कोणीच त्यांनी सांगितलेलं ऐकल नाहीच. पण अशा वेळेला भांडण, वाद, बोलाचाली होते, त्यामुळे ट्रेकची मजा जाते.
इथे मात्र असा काही त्रास नव्हता. सर मुलांबरोबर चालायचे. अगदी अवघड वाट असेल किंवा रस्ता चुकायची शक्यता असेलं, तरचं थांबायचे. ‘आप लोगोंका स्पीड बढिया है. आरामसे आईये’ अशा पाठिंब्यावर आमचं एकंदर मजेत चालू होत!
आज चालायला सुरवात केल्यावर चांगल्यापैकी उताराचा रस्ता होता. येताना हा रस्ता चढून यावं लागणार होतं. वर्तुळाकार ट्रेकरूटमध्ये हा प्रॉब्लेम नसतो. हा ट्रेकरुट ‘आल्या रस्त्याने परत’ ह्या प्रकारचा असल्याने हा प्रॉब्लेम होता. आत्ताचा प्रत्येक उतार येतानाचा चढ होणार होता!
थोड्याच वेळात आम्ही एका छोट्या गावात पोचलो. रस्ता दगडाच्या उभ्या कपच्या लावाव्या तसा होता. दगडाने बांधलेली, पत्र्याच्या उतरत्या छपरांची घर, सावलीला बांधलेली जनावरं दिसत होती. लहान मुलं खेळता खेळता थबकून आमच्याकडे आश्चर्याने बघत होती. देवाजीच्या करुणेमुळे गव्हाची शेत पिकून पिवळी झाली होती. गावातल्या बायका-पुरुष कापणीच्या घाईत होते. जनावरांचा, फुलांचा, उन्हाचा आणि गवताचा असा संमिश्र वास येत होतं.
समोर दरी, त्यातून वाहणारी नदी, पलीकडच्या डोंगरांवरची लहान गावं दिसत होती. लहान मुलांनी पाटीवर गिरगुटया काढाव्या, तश्या रस्त्यांच्या रेघा दिसत होत्या. क्षितिजाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत हिमालयाची शिखर दिसत होती. हे सगळं दृश्य, तो गावातला वास आणि ताजी स्वच्छ हवा. मन अगदी निवत होत. नजर बांधली गेली होती. एक हुरहूर वाटत होती.
देवाजीने करुणा केली, शेते पिकूनी पिवळी झाली!
पण अजून बरचं अंतर चालायचं आहे, हे ठाऊक असल्याने आम्ही वाट कापायला सुरवात केली. थोड्याच वेळात अजून एका मॅगी पॉंईंटला पोचलो होतो. प्रथेप्रमाणे मुलाचं मॅगी खाणे चालू होत. छान सारवलेल्या चुलीवर स्वैपाक चालू होता. बसायच्या जागेच्या आसपासच्या भिंती असंख्य पोस्टर्सने भरलेल्या होत्या. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतल्या राजकीय पोस्टर्सपासून ते देवी-देवता, निसर्गदृश्ये काय म्हणाल ते होत! थोडा वेळ त्याच रसग्रहण झाल्यावर पुढे चालायला सुरवात झाली.
मॅगी पॉइंट
नंतरचा रस्ता ‘कधी चढ तर कधी उतार’ असा, म्हणजेच ‘कधी धाप लागणे तर कधी गुढघे दुखणे’ असा होता. कालच्या रस्त्यावर खेडी-वस्त्या आजिबात नव्हत्या. आजचा रस्ता मानवी स्पर्श असलेला होता. पायऱ्या-पायऱ्यांची शेत, घरं होती. गायी, बैल, मेंढ्या रस्ता अडवत होते. न बांधलेला कुत्रा एक मैलाच्या परिघात असला, तरी सुजाताची घाबरगुंडी होते. ह्या ट्रेकमध्ये तर ह्या कँपवरची कुत्री पुढच्या कँपपर्यंत सोबत करायची. ती कुत्री सारखी आमच्या पुढे-मागे बागडत असायची. त्यामुळे मुलं तिला नुसतं ‘सुजातामावशी...’ अस जरी म्हटली, तरी कुत्र्याच्या भीतीने तिची पळापळ सुरू व्हायची. तिची किंचाळी ऐकून कोणालातरी अडगळीत गेलेला ‘अस्फुट किंचाळी’ हा शब्द आठवला. तिथून पुढे सगळ्या किंचाळ्या ‘अस्फुट’ झाल्या! ‘सुजाता-कुत्रा-अस्फुट किंचाळी’ ह्या समीकरणाला ह्या ट्रेकच्या विनोदांमध्ये अग्रस्थान मिळालं..
अशी मजा करत करत आम्ही खाती गावात पोचलो. तिथे एका गेस्ट-हाउस मध्ये पिवळ्या ग्रुपचा कँप होता. धाकुरीला आमचा कँप एकाच जागी होता. इथे त्यांचा कँप दिसल्यावर आपणही पोचलो, अस आम्हाला वाटलं. पण नाही. पुढे चांगल्यापैकी थकवणारा असा दोन किलोमीटरचा चढ होता! तो चढताना सगळ्यांची अगदी वाट लागली. आजच्या रस्त्यावर इतरही चढ चढलो होतो, पण इथे मनाची तयारी नसल्याने चढ भयानक वाटला. कुमाऊँच्या कँपचं डिझाईन एव्हाना ओळखीचं झालं होत. मध्ये खोल्या आणि दोन्ही बाजूंनी व्हरांडे अशी रचना दिसल्यावर ‘आला एकदाचा कँप!’ असं म्हणत आम्ही व्हरांड्यातच बसकण मारली.
खाती कँप
कँपवर पोचल्यावर काय लाडचं लाड होते. आल्याआल्या लगेच सरबत, पाठोपाठ गरमगरम जेवण, दुपारी चहा-कॉफी, संध्याकाळी सूप, रात्री जेवण अशी ऐश होती. चालून भूक चांगलीच लागत होती, अधेमधे विशेष काही खायलाही मिळत नव्हतं. शेतातून आणलेली ताज्या भाजीची चव, मोकळ्या हवेत फारच खुलायची. घरी ज्या भाज्या खायला मुलं खळखळ करतात, त्याही भाज्या तिथे अगदी आनंदाने, चवीने खायची.
दुपारचं जेवण झाल्यावर बराच वेळ मोकळा होता. मग पत्ते बाहेर आले. आम्ही लहान असताना कल्याणला ‘कॅनिस्टा’ हा प्रकार फार लोकप्रिय होता. फार वर्षात न खेळल्यामुळे आता कसा खेळायचा ते विसरायलाही झालं होतं. अश्विनीने सूत्र हातात घेऊन सगळ्यांची शिकवणी घेतली. एक-दोन डाव चुकत माकत खेळल्यावर सगळे अगदी अट्टल जुगाऱ्यांसारखे खेळायला लागले.
कल्याणला एकदा धो-धो पावसाची झाड लागली होती, तेव्हा अश्विनीच्या माजघरात, भर दुपारी मेणबत्त्या लावून तिच्या घरच्यांबरोबर आम्ही दुपारभर कॅनिस्टा खेळलो होतो, ती आठवण येत होती. एकुणात फार जुन्या मैत्रिणी बरोबर असल्यामुळे नोस्टॅल्जियाचे झटके उठता-बसता येत होते. आमचं जवळपास सगळं लहानपण बरोबर गेलं होतं. त्यामुळे आई-वडील-भावंडेच काय पण शेजारी-पाजारी, नातेवाईक सगळेच माहितीचे. ह्या सगळ्या गप्पा मारायला लागलो की मुलांच्या आघाडीकडून ‘झाल्या ह्यांच्या कल्याणच्या गप्पा सुरू’ असा निषेध व्हायचा. पण सगळ्याच मुलांना आपल्या आई-बापाचे लहानपणचे किस्से ऐकायची खूप उत्सुकता असते. सदैव मोठेपणाचे ओझे डोक्यावर असलेली आपली आई सुद्धा शाळेत शिक्षकांची बोलणी खायची, उनाडक्या करायची हे मुलांना गमतीशीर वाटायचं.
काळोख झाला, पत्ते दिसेनासे झाले, तसा कॅनिस्टा थांबला. मुक्ता आणि अभिराम दोघं शास्त्रीय संगीत शिकतात आणि सुंदर गातातही. जेवणानंतर टॉर्चच्या उजेडात मैफील जमली. त्या सुरांमध्ये तरंगतच सगळे स्वप्नांच्या राज्यात पोचले.
खाती – द्वाली (१२ जून २०१४)
जोपर्यंत बऱ्यापैकी शहरी भागात, महामार्गावरून जात असतो, तेव्हा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोपा असतो. बाटलीबंद पाणी सगळीकडे विकत मिळते. ट्रेकमध्ये, प्रवासात पोट बिघडून सगळ्या वेळापत्रकाची वाट लागू नये, म्हणून आपल्यातले बहुतेक लोकं ह्या पाण्यात पैसे घालवतात. पण आता आम्ही ज्या भागात होतो, तिथे दुकान हा प्रकार दुर्मिळ होता. पाणी विकत घेणार तरी कुठून? पैसे किती निरुपयोगी होऊ शकतात, ह्याचा अनुभव घेण्यासाठी तरी प्रत्येकाने हिमालयाच्या कुशीत जायला हवं!
तर, अशा रीतीने पाणी प्रश्न अशा जागी नेहमीच बिकट होतो. एरवी पाणी तिथल्या झऱ्याच भरून घ्यायचं आणि त्यात क्लोरिनचे ‘दो बूंद’ गंगाजलासारखे घालून त्या पाण्याच शुद्धीकरण करायचं, अशी पध्दत असते. पण ह्या वेळेला आधुनिक युगाचे पाच प्रतिनिधी बरोबर होते. शिवाय अश्विनी आणि तिच्या लेकीला ट्रेक संपल्यावर चारच दिवसात अमेरिकेत परतायचं होतं. पोट बिघडणे, आजारी पडणे ह्यासाठी वेळच नव्हता. त्यामुळे जास्तीची काळजी घेणं भागच होतं.
आता बाजारात फिल्टर बसवलेल्या बाटल्या मिळतात. त्यांची खरेदी निघण्याआधी झाली होती. त्या बाटल्यांमध्ये स्थानिक पाणी भरून आम्ही उरलेल्या बाटल्यांमध्ये ते ‘डाउनलोड’ करायचो. फिल्टरवाल्या बाटल्या दाबून दाबून हे काम करावं लागायचं. त्यामुळे ह्या कामाला ‘बाटल्या पिळणे’ असं यथायोग्य नावं पडलं! रोज सकाळ – संध्याकाळ आम्ही हा जलशुद्धीकरण प्रकल्प उभारायचो. हे काम कंटाळवाण वाटायचं. पण हे शुद्ध पाणी आणि स्वाईनफ्लू पासून प्रसिद्ध झालेल्या हँड-सॅनिटायझरचा मुबलक वापर ह्यामुळे कोणीही आजारी पडलं नाही, हेही तेवढच खरं आहे.
आज जो रस्ता चालायचा होता, तो मागच्या वर्षीपर्यंत ह्या ट्रेकमधला सगळ्यात सोपा रस्ता होता. पण जून २०१३ मध्ये काफनीगंगा नदीला प्रलयकारी पूर आला, प्रचंड प्रमाणात दरडी कोसळल्या, पाण्याच्या लोंढ्यामुळे नदीवरचे पूल वाहून गेले. रस्ता अक्षरशः होत्याचा नव्हता झाला. स्थानिक लोकांना आमच्यासारखे प्रवासी हे उत्पन्नाचे साधन. त्यामुळे त्यांनी बरेच कष्ट घेऊन तो मार्ग चालण्याजोगा केला आहे.
ह्याची कल्पना आम्हाला देवेन सरांनी आदल्या दिवशी दिली होती. तेव्हा सर्वानुमते सकाळी लवकर म्हणजे साडेसहा – सातला निघायचं, असं ठरलं. कँपवरचा एक मदतनीस आमच्या नाश्त्याची पुरी-भाजी घेऊन आम्हाला गाठेल, अशी सोय झाली होती. दाट जंगलातल्या रस्त्याने आमची वाटचाल सुरू झाली.
सुरवात चढाच्या रस्त्याने झाली, पण खूप सुंदर, वनराईने समृद्ध असा भाग होता. नदीचाचा ध्रोन्कार सतत ऐकू येत होता. तो आवाज, ते सौंदर्य, जंगलाचा ओलसर वास, सुखद असा गारवा, पुढे चालणाऱ्या मुलांच्या गप्पांचा-हसण्याचा आवाज आणि बरोबर मनासारखी सोबत... पंचेंद्रियांबरोबर मनही तृप्तीने काठोकाठ भरून वाहात होते.
लवकरच पहिली लँडस्लाईडची जागा आली. देवेन सर, इतर मदतनीस ह्यांच्या मदतीने ती जागा पार झाली. इथून पुढे बऱ्याच जागी ही कसरत करावी लागणार होती. ह्या जागेपर्यंत आमचं सामान खेचराच्या पाठीवरून येत होतं. आता ह्या अश्या रस्त्यावर खेचरं येणं अशक्य होतं. त्यामुळे त्या सॅक पोर्टरच्या पाठींवर चढल्या. ह्या स्थानिक लोकांना ह्यातून रोजगार मिळतो, रोख पैसे त्यांच्या खिशात पडतात म्हणून आनंद मानावा की आपण पैसे मोजून दुसऱ्याचे श्रम विकत घेतो, ह्याची लाज वाटावी हा त्रासदायक प्रश्न दरवेळेप्रमाणे आत्ताही टोचायला लागला.
त्या पोर्टरमध्ये एकाचं नावं ‘स्वरूप’ होतं. गप्पा मारायची खूप हौस असल्याने हा आमच्यात लगेचच मिसळून गेला. पाठीवर दोन-तीन सॅक लीलया तोलून तो आम्हाला अवघड रस्ते पार करायला मदतही करायचा.
अर्धा रस्ता चालून झाल्यावर एका जागी थांबून आम्ही पुरी-भाजी खाल्ली. नदीच्या अगदी जवळ होतो. तिचा अविरत असा नाद अजूनही कानात भरलेला आहे. डोंगरांवरून वाहणारे धबधबे आवेगाने नदीला येऊन मिळत होते. ढग नसले की नंदादेवी शिखराच दर्शन होत होत. आत्तापर्यंत पावसाच्या बाबतीत आम्ही नशीबवान होतो. मी कैलास-मानस यात्रा करून आलेली आहे, हे देवेन सरांना गप्पांमधून कळल होत. त्यामुळे ‘आप सब डीव्होटी लोग हो, देखना पुरा ट्रेक हवा अच्छीही होगी’ असं देवेन सरांचं म्हणणं, तर फॉरेनर आके कुछ उलटा-सिधा खाते है, मां नंदादेवी नाराज होती है, फिर बारीश होती है’ असं स्वरूपचं लॉजिक होत!
निसर्गाचे उग्र तांडव
कधी नदीच्या वाळवंटातून, कधी जंगलातून तर कधी कोसळलेल्या दरडीच्या रस्त्याने आजचा रस्ता होता. अगदी भयानक अवघड नसला तरी थोडा त्रासदायक मात्र आहे. नदीच्या वाळवंटातून चालताना दगड पायांना टोचत राहतात. आसपास सगळीकडे उध्वस्त झालेले डोंगर बघताना त्याचेही एक दडपण मनावर येतच. तरी आम्ही हा सगळा विध्वंस एका वर्षानंतर बघत होतो. तेव्हा ह्या परिसरात जे लोकं अडकले असतील, त्यांचं काय झालं असेलं, ही कल्पनाही अस्वस्थ करणारी होती.
पण जगरहाटी कोणाही करता थांबत नाही, हेच खरं. पूर ओसरला, पाणी वाहून गेलं, पुढचा दिवस उजाडला की पुढे बघावच लागत. इथल्या लोकांना पर्यटक हे उत्पनाच साधन. त्यांच्या सोयीसाठी जुने, विसरलेले रस्ते ह्यांनी पुन्हा शोधून काढले. संध्याकाळी नदीपात्रात दिशा कळणार नाही, म्हणून वाटेच्या कडेने खुणेसाठी दगड लावून ठेवले. जंगलातली जी वाट धोक्याची झाली आहे, तिथे चुकून कोणी जावू नये, म्हणून तिथे काटेरी झाडं टाकून ठेवली. आता सरकारनेही ह्या मार्गावर परत पूल बांधण्यासाठी हालचाल सुरू केली आहे. काही वर्षात इथली ट्रेकिंग करणाऱ्यांची संख्या पुन्हा पूर्ववत होईल अशी आशा आहे.
सापशिडीच्या खेळाप्रमाणे आम्ही सारखे नदीजवळ यायचो, चढून डोंगरावर जायचो, लँडस्लाईड मधून जपून जपून पावलं टाकत उतरून पुन्हा नदीजवळ!! असा खेळ अनेकवेळा खेळलो. पिवळ्या ग्रुपचे काही सदस्य आमच्यापेक्षा पुढे तर काही मागे असायचे. कँपच्या दोन किलोमीटर आधी आजची शेवटची आणि सगळ्यात मोठी लँडस्लाईड आली. मुलं केव्हाच उतरून आमची वाट बघत खालच्या एका दगडावर थांबली होती. घाटात एखादा ट्रक अडकून सगळी वाहतूक अडकून राहावी, तश्या पिवळ्या ग्रूपमधला एक सदस्य मधेच अडकला होता. पोर्टर त्यांना धीर देऊन, हात धरून उतरायला सांगत होता. पण पुढे पाऊल टाकायची त्यांची हिंमत होईना. बरं, बाकीचे आपापला जीव मुठीत धरून तिथे उभे, ते काय मदत करणार, कपाळ? शेवटी त्या पोर्टरने त्याच कसब पणाला लावत हळूहळू त्यांना खाली नेलं. घाटाचा रस्ता मोकळा झाला! वाहतूक सुरळीत होऊन आम्हीही खाली पोचलो.
डावीकडून पिंढारी गंगा आणि उजवीकडून काफनी गंगा वाहताना दिसत होती. इथे त्यांचा संगम होतो. फार छान दृश्य होतं. काफनी गंगा पार करून आम्हाला कँपकडे जायचं होत. पूर्वी पिंढारी गंगेवरचा पूल पार करावा लागायचा. तो मागच्या वर्षी वाहून गेला. म्हणून आता काफनी गंगेवर तात्पुरता पूल बांधला आहे. तो अगदीच कमकुवत असल्याने एका वेळेला एकच माणूस जावू देतात. वाहतूक नियमनाच काम स्वरुपने स्वखुशीने स्वीकारलं होत.
नंबर लागायची वाट बघत असताना, सुजाता मध्य रेल्वेवाली आणि पिवळा ग्रूप पूर्व रेल्वेवाले आहेत, अशी माहिती त्यांना मिळाली. पिंढारी व काफनीच्या संगमाच्या साक्षीने पूर्व आणि मध्य रेल्वेचाही संगम घडून आला!
नेहमीप्रमाणे पिवळ्या ग्रुपचा कँप आधी आणि आमचा अजून एक चढ चढल्यावर होता. ह्याचा तीव्र निषेध देवेन सरांकडे करत आणि धापा टाकत आम्ही कँपवर पोचलो. मुलाचं तोवर सरबत पिवून झालं होत. अश्विनी दिसताच एका स्वरात त्यांनी ‘कॅनिस्टा- कॅनिस्टा’ असा गजर सुरू केला. कालची पत्त्यांची चावी त्यांना फारच बसली होती. भराभरा जेवून त्यांनी पत्त्यांचा डाव मांडला.
ह्या खेळाला समसंख्येतले खेळाडू लागतात. आम्ही होतो नऊ लोकं. मग मी खेळात गेलेच नाही. शेजारच्या व्हरांड्यात बसून राहिले. समोर उंच डोंगर दिसत होते. दोन्ही नद्यांचा खळखळाट आसमंतात भरून राहिला होता. सगळ्या डोंगरउतारांवर मागच्या वर्षीच्या लँडस्लाईडच्या खुणा दिसत होत्या. आम्हाला धाकुरीच्या कँपवर भेटलेल्या काकांनी ‘खातीपासून पुढे तुम्हाला निसर्गाचा कोप किती भयानक होता, त्याचा अंदाज येईल,’ सांगितलं होते. ते किती खरं होतं ह्याचा प्रत्यय कुठल्याही दिशेला नजर फिरवली तरी येत होता.
मी एकटीच बसलेय, हे पाहून स्वरूप गप्पा मारायला आला. २०१३ च्या प्रसंगाची आठवण सांगू लागला. तेव्हा तो पन्नास लोकांच्या मोठ्या ग्रूपबरोबर इथेच होता. भयानक पाउस, थंडी, दरडी कोसळण्याचे भयप्रद आवाज अशा वातावरणात तीन दिवस सगळे अडकले होते. कँपवरचं रेशन कधीच संपून गेलं, त्यामुळे खायला काही नाही, जीवाची शाश्वती नाही, घर दूर राहिलेलं... त्यांची काय मनस्थिती झाली असेलं, ह्याची नुसती कल्पना करूनच थरकाप होत होता. सुदैवाने गोष्टीचा शेवट चांगला झाला. पाऊस ओसरल्यावर नदीचा पूरही कमी झाला. मग ते लोकं चिखल, पाणी तुडवत कसेबसे खातीला पोचले. तिथे जीप आल्या. जीपमधून बागेश्वरपर्यंत गेले आणि पुढे सुखरूप आपापल्या घरीही पोचले. हाल झाले पण निदान जीवित हानी झाली नाही. परमेश्वराची कृपाच ती.
फायर, फायर, कँप फायर
ह्या कँपवर थंडी होती. रात्रीचं जेवण झाल्यावर तर आणखीनच हुडहुडी भरायला लागली. देवेन सरांनी शेकोटी पेटवली. सगळे त्याच्या भोवती शेकत बसले. ‘जबभी कभी महाराष्ट्रासे ग्रूप आता है, एक गाना जरूर गाते है, आप लोग पेहेचानके गाईये’ अस कोडं त्यांनी घातलं. पण ह्याचं उत्तर ‘चाल तुरुतुरु’ असणार हे आम्ही लगेचच ओळखलं. पैज हारल्याची शिक्षा म्हणून त्यांनाच सगळ्यांनी गाणी म्हणायला लावली. पोर्टर लोकांनी त्यांची स्थानिक गाणी गायली. पौर्णिमा उद्यावर आली होती. आभाळात चंद्र, शेकोटी, डोंगर आणि नदी म्हणजे अगदी बॉलिवूड सेटिंग होतं!
हा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम जरा उशिरापर्यंत रंगला. त्यामुळे रोज रात्री होणारा सॅक उपसायचा कार्यक्रम सर्वानुमते रद्द करण्यात आला!!
भाग-५ द्वाली ते फुरकिया http://www.maayboli.com/node/52416
भाग-६ फुरकिया-झिरो पॉइंट-फुरकिया-द्वाली http://www.maayboli.com/node/52520
भाग-७ द्वाली ते बागेश्वर http://www.maayboli.com/node/52551
वा... मस्त लिहिला आहेस हा
वा... मस्त लिहिला आहेस हा भागही!
कँपवर पोचल्यावर काय लाडचं लाड होते. आल्याआल्या लगेच सरबत, पाठोपाठ गरमगरम जेवण, दुपारी चहा-कॉफी, संध्याकाळी सूप, रात्री जेवण अशी ऐश होती. >>>> हे केएमव्हीएनचं वैशिष्ट्य दिसतय..
सगळे भाग वाचले. मस्त जमले
सगळे भाग वाचले. मस्त जमले आहेत.
पुढील भागाच्या प्रतीक्षेत.
मजा येतेय वाचायला. पुभाप्र.
मजा येतेय वाचायला. पुभाप्र.
सुरेख झालाय हाही भाग!
सुरेख झालाय हाही भाग!
नेहमीप्रमाणेच मस्त..........
नेहमीप्रमाणेच मस्त..........
प्रतिक्रिया देणाऱ्यांचे खूप
प्रतिक्रिया देणाऱ्यांचे खूप आभार! लिहिताना आणि वाचताना ते दिवस आठवून पुन्हा मजा वाटते आहे.
पुढील भाग येऊ दे.......आम्ही
पुढील भाग येऊ दे.......आम्ही वाट बघतोय.
हे प्रवास वर्णन पूर्ण झाल्यावर मी ह्याची प्रिंट काढून बायकोला वाचायला देणार आहे.
मस्तच
मस्तच
मस्त. चारही भाग वाचून काढले.
मस्त. चारही भाग वाचून काढले. आत्ताच्या आत्ता तडक हिमालयात जावे असे वाटु लागले.
रैना, नवीन म्हणजे वेगळं
रैना, नवीन म्हणजे वेगळं काहीतरी सांग की
अनया, मस्त सुरु आहे ट्रेक.
मस्तच!
मस्तच!
अनया खूप दिवसान्नी माबो वर
अनया
खूप दिवसान्नी माबो वर आले आणि तुझे लेख पाहिले..... मस्त चाललाय ट्रेक....
कल्याणच्या आठवणींनी मी पण नॉस्टाल्जीक झाले......
खंड पडु देवु नकोस.... हा ट्रेक मलाही जमेल असा वाटतोय... प्रत्येक ठिकाणी किती किलो मीटर चे चालणे आहे ते टाक ना ! म्हणजे मला जमेल की नाही ते ठरवता येइल.... तशी मी रोज ५ कि.मी. फिरते.... ह्याचे नक्की चालणे कळले की तेवढा सराव करता येइल.....
ट्रेक सुरू झाल्यानंतरचं सर्व
ट्रेक सुरू झाल्यानंतरचं सर्व वर्णन आवडलं. पुढचे भाग कधी?
आत्ताच्या आत्ता तडक हिमालयात
आत्ताच्या आत्ता तडक हिमालयात जावे असे वाटु लागले >>
>>नवीन म्हणजे वेगळं काहीतरी सांग की
वॉव, मस्तच गं..
वॉव, मस्तच गं..
मोकीमी, रैना, वर्षु,
मोकीमी, रैना, वर्षु, सगळ्यांचे खूप आभार. पुढचे भाग लिहून तयार आहेत, पण फोटो निवडणे आणि ते अपलोड करणे ह्यासाठी वेळ मिळत नाहीये, म्हणून थोडा उशीर होतोय. पण सोमवारपर्यंत नक्की.
मोकीमी, रोज पाच किलोमीटर चालतेस, म्हणजे काही अडचण येणार नाही. आरामात होईल ट्रेक. आपण आरामात करायचा. काही लोकं हा ट्रेक चार दिवसात करतात. आम्ही घाई केली नाही, तब्येतीत सावकाश गेलो. कमीतकमी अंतर पाच किमी आणि जास्तीत जास्त वीस किमी च्या आसपास होत. कुमाऊँ वाल्यांची पॅकेज दिवसांच्या संख्येवर असतात. जास्त दिवस लागले, तर जास्त मजा आणि थोडा जास्त खर्च! होऊ दे खर्च!!!
आधीचे प्रतिसाद गायब का झाले?
आधीचे प्रतिसाद गायब का झाले?
@ अनया - रोज पाच किलोमीटर
@ अनया - रोज पाच किलोमीटर चालतेस, म्हणजे काही अडचण येणार नाही. आरामात होईल ट्रेक. आपण आरामात करायचा. - नक्की सांग. उगाच आशा वाटायला लागलीये
प्रत्येक ठिकाणी किती किलो मीटर चे चालणे आहे ते टाक ना ! -+++११११
मस्त! वाचतेय. पुढचे भाग लवकर
मस्त! वाचतेय. पुढचे भाग लवकर येऊ दे...
बायांनो, काळजी करू नका. ट्रेक
बायांनो, काळजी करू नका. ट्रेक सोपा आहे. बिंधास ठरवा. अंतर किती आहे, ते हेडरमध्येच टाकते नंतर.
खुपच सुरेख लेख आणि मस्त
खुपच सुरेख लेख आणि मस्त फोटो.
सगळे भाग आज फुरसतीत वाचुन काढले. मस्तच
मस्त... मज्जा येत्ये!
मस्त... मज्जा येत्ये!
अनया... परत गीयर टाकलास.....
अनया...
परत गीयर टाकलास..... गाडी चढावर आहे वाटते..... स्लो झालिये....
मला जाम उत्सुकता आहे पुढल्या भागांची..... टाक बाई टाक पटापट......
सगळेच भाग सुंदर झालेत. पुढचा
सगळेच भाग सुंदर झालेत. पुढचा भाग कधी?