पीके पीके!!!
१. लेख माझ्या रंगीबेरंगी पानावर आहे. चित्रपट ग्रूपमध्ये नाही.
२. चित्रपट पाहूनअमला काय वाटलं ते लिहिलं आहे. परीक्षण किम्वा समीक्षण नाही.
३. फॅन्स कुणाचेही असा, इथे प्रतिसाद देताना केवळ सिनेमाबद्दलच बोला. (आमिर सलमान शाहरूख तुषार फरदीन किशन कुमार ज्ञानेंद्र चौधरी यांच्या तुलना करायच्या असतील तर वेगळा बीबी शोधा)
/////////////////////////////////////////////
राजकुमार हिराणी हे एक अजब रसायन आहे हे त्याच्या पहिल्याच सिनेमामध्ये हे सिद्ध झालं होतं. मुन्नाभाई एमबीबीएस अनेक पातळींवर टिपिकल बॉलीवूड मसालापटांपेक्षा वेगळा होता. त्यामध्ये चांगला माणूस आणि वाईट माणूस यांच्या ठोकळेछाप प्रतिमाच उलटसुलट केल्या होत्या. नंतर आलेला लगे रहो मुन्नाभाई याच पठडीमध्ये होता, पण यांत वाईट माणसातला चांगलेपणा शोधून काढायचा एक भाबडेपणा होता. गांधीवादाचा उपयोग करून ते सहजसाध्य झालं होतं. या दोन सिनेमांनंतर हिराणी आपसूक माझ्या आवडत्या दिग्दर्शकांमध्ये जाऊन पोचला. टिपिकल कथा न हाताळता, काहीतरी वेगळे विषय हाताळूनदेखील बॉक्स ऑफिसवर तितकंच किंवा त्याहून जास्तही यश मिळवता येतं हे त्यानं ३ इडियट्स मधून दाखवून दिलं. पण पूर्वार्धामध्ये जबरदस्त रीत्या चाललेला ३ इडिय्ट्स शेवटी शेवटी ढेपाळत आला होता. क्लायमॅक्सचा मित्रांच्या पुनर्भेटीचा सीन जेव्हा टिप्पिकाल डीडीएलजे स्टाईल हिरो हिरॉइन मिलनाचा सीन बनला तेव्हा हिरानी “बॉलिवूडायझेशनचा” बळी पडल्याची चाहूल लागली होती, आणि आज पीकेने त्यावर शिक्कामोर्तब केलंय.
हिराणीबद्दल नमनालाच एवढं घडाभर तेल ओतायचं कारण, अर्थात पीके. पीके वाईट सिनेमा अजिबात नाहीये. नुकत्याच येऊन गेलेल्या मारधाड आणि प्रेक्षकांना उल्लू समजणार्या हाईस्ट मूव्हीजपेक्षा पीके निश्चित उजवा आहे. सिनेमा एंटरटेनिंग आहे, एकदा बघायला ठिक आहे, पण परत परत बघण्यासारखा निश्चित नाही. कारण, पीके हिराणीचा सिनेमा म्हणून फार कमी पडलाय. दिग्दर्शकाची तेवढी कुवतच नसेल ना, तर कुणी अपेक्षाच ठेवत नाही. पण इथं दिग्दर्शकाकडे तेवढी प्रातिभा आहे, आणि तरीही हिराणी या सिनेमामध्ये अपयशी ठरलाय म्हणून हे रडगाणं.
पीकेची कथा फार वेगळी नाही. फार पूर्वीपासून बॉलीवूडमध्ये हा फॉर्म्युला येऊन गेलाय. काळाच्या ओघात गावातून शहरामध्ये मग देशातून परदेशामध्ये जाणारा नायक इथं अंतराळातून पृथ्वीवर येतो हाच काय फरक. बाकीचा साचा सेमटूसेम. पूर्वी “गांव के लोग भोलेभाले” आणि यात “हमरा गोलामे कौनो झूठ नाही बोलत” असलेच थोडेफार ठळक फरक. अनोळखी गर्दीमध्ये हरवलेल्या नायकाला त्याच्या इप्सित ध्येयापाशी पोचण्यासाठी मदत करणारी नायिका, मग वाईट लोकांचं षडयंत्र, मग प्रेमाचे त्रिकोण, मग त्यांना पुरून उरणारा नायक वगैरे वगैरे. सर्वच टिपिकल. हिराणीच्या पहिल्या दोन सिनेमामध्ये तो कुठंतरी “माणसाच्या मनात असलेला मूळचा चांगुलपणा आणि नैतिकता” शोधण्याच्या नादात होता. या शोधामध्ये बाह्य गोष्टीपेक्षा त्या व्यक्तीला स्वत:लाच ते जाणवणं, आतून आकळून येणं हे फार महत्त्वाचे मुद्दे होते. जे डॉट अस्थाना बदलतो, तो कुणाच्या सांगण्यावरून नव्हे, तर ते त्याला स्वत:ला मनापासून काहीतरी वाटतं म्हणून. पण पीके या सिनेमामध्ये त्याला नक्की काय शोधायचं आहे तेच समजेनासं झालंय. खरं सांगते, इंटरव्हल येईपर्यंत अक्षरश: श्वास रोखून धरला होता. तोपर्यंत एक विलक्षण आगळीवेगळी तात्त्विक बैठक या सिनेमाने जमवली होती. कूड इट बी? आजवर हिंदी सिनेमांनी हा प्रश्न कधीच विचारला नव्हता, आतातरी विचारतील. उत्तरे मिळणार नसली तरी किमान हिंदी सिनेमाचा नायक हे करू शकतो इथवर तरी दाखवतील. कोहम? मी कोण आहे? इथं कशासाठी आलोय? हे जग म्हणजे काय आहे? असे प्रश्न या नायकाला पडले असाव्त का? त्यांचं उत्तर तो शोधण्यसाठी देवाला शोधता शोधत कधीतरी सोहम (तो मीच आहे) असं म्हणून स्वत:साठी नवीन मार्ग शोधेल का? असलं कयबाय डोक्यामध्ये इंटरव्हलची कचोरी खाताना नाचत होते. पोस्ट इंटरव्हल, माझ्याच कल्पनेचं हसू यायला लागलं, इतका हा चित्रपट कोसळत जातो. नुसता कोसळत नाही तर धडाधडा कोसळतो. ते लव्ह इन वेस्ट ऑफ टाईम गाणं चालू झाल्यावर थडाथडा कपाळ बडवलंय. हिराणी, यु टू? नक्की कशासाठी? बॉक्स ऑफिस सक्सेससाठी? शंभर कोटी, दोनशे कोटी असल्या आकड्यांसाठी? पण मला आता या क्षणी मुन्नाभाईचा गल्ला किती जमवला होता ते आठवत नाहीये. आठवतोय ते मुन्नाभाई किती उत्तम सिनेमा होता ते. आणि हे माझ्यासारख्या प्रेक्षकांनी तुला सांगावं?
“वो दुनिया मोरे बाबूल का घर ये दुनिया ससुराल” या नोटवर चालू झालेल्या सिनेमाकडून कायच्याकाय अपेक्षा ठेवल्या. आणि शेवटी टिपिकल लेव्हलवरती आणून ठेवलंय. हा अपेक्षाभंग हिराणीकडून व्हायला नको हवा होता.
हिराणीच्या सिनेमांचे विषय कितीही कॉंप्लेक्स असले तरी त्याची ट्रीटमेंट कयमच लाईट आणि मिश्किल असते. मोठ्यातल्या मोठ्या समस्येकडे तो एका कोपर्यात उभ्या राहिलेल्या तटस्थासारखा गालातल्या गालात हसू शकतो, परिणामी प्रेक्षकदेखील हसतात. हसतानाच विषय प्रेक्षकांच्या गळी उतरवणे सहजशक्य त्याला जमून जातंय. या सिनेमामध्ये मात्र ही शर्करावगुंठित गोळी जरा कडवटच राहिली आहे. परिणामी सिनेमा ना तत्त्वपातळीवर प्रामाणिक राहतो ना टिपिकल फ़ॉर्मुलासोबत.
पीके हा एक एलियन आहे हे पहिल्याच दृश्यात एस्टाब्लिश केल्यावर हिराणी हे अल्मोस्ट विसरून जातो. इंटरव्हलनंतर पीकेच्या #घरवापसीपेक्षाही त्याला इथल्या धर्माचं राजकारण आणि त्याला खोटं पाडणं इतकं आवश्यक वाटत जातं की प्रेक्षकांखेरीज प्रत्येकजण त्याचं एलियन असणं विसरून जातो. पीकेच्या एलियनपणामध्ये खटकलेली अजून एक गोष्ट म्हणजे, ही संस्कृती आपल्याहून प्रगत आहे. पीके इथे रीसर्चसाठी आलेला आहे, असं असताना तो इथली “संस्कृती” अथवा त्याचा अभ्यास अथवा त्यावर काही निरीक्षणं मांडत नाही. रीमोट चोरीला गेल्यापासून तो परत मिळवण्यापर्यंतची त्याची धडपड चालू असताना त्याला मानवी संस्कृतीविषयी इतर काहीही प्रश्न पडत नाही, ते जाणून घ्यावेसे वाटत नाहीत. तो फक्त देवाला शोधत राहतो आणि ही “माणसाची कल्पना आहे” हेच त्याला उमगत नाही? त्याची संस्कृती जर आपल्याहून भिन्न आहे, तर त्याचे काहीही वेगळे बदल त्याला का जाणवत नाहीत? हा संपूर्ण एलियन भाग खूपच विस्कळीत झालाय.
रीमोट कुठं आहे हे समजल्यावर तो परत मिळवण्यासाठी हजारो मार्ग उपलब्ध असताना पीके आणि जग्गू जे काही करतात ते अनाकलनीय आहे. तितकंच पीकेचं जग्गूच्या प्रेमात पडणंदेखील. बरं, यातून पीकेचं इमोशनली ह्युमन होत जाणं वगैरे काही अपेक्षित असेल तर तेही दाखवायला हिराणी विसरलेला आहे. की सिनेमाच्या शेवटी पीके चक्क खोटं बोलतो, तर ते कित्येक प्रेक्षकांच्या लक्षातही येत नाही. “प्रेमात पडणं” ही प्रोसेस फार वेगळी आणि अनोखी असताना सरधोपटरीत्या गाण्याचा मार्ग निवडल्यामुळे परत एकदा टिपिकल होत गेलंय. सेम त्या शेवटच्या सीनसाठीदेखील. पाकिस्तान एम्बसीला फोन लावून माहिती घेणं इथवर ठिक होतं. त्यानंतर जे काही दाखवलंय ते अचाट आणि अतर्क्य आहे. सॉरी, हिरानी. यु कूड हॅव डन समिथिंग ड्फ़रंट.
“भगवान तू कहां है” गाण्याच्या चित्रीकरणामुळे आणि शब्दांमुळे (सोनू निगमचा आवाजदेखील. वन ऑफ हिज बेस्ट!) चित्रपटाच्या पुढील भागामध्ये काय होइल याचा थोडा अंदाज आला, काही थोडंफार प्रेडिक्शनही होतं, पण अचानक सिनेमानं युटर्न मारला आणि इतका वेळ उंचच्या उंच केलेल्या सिनेमाला स्वत:च्या हातानं कोसळवला. पोस्ट इंटरव्हल सिनेमाची तुलना अप्रिहार्यपणे ओह माय गॉड या सिनेमासोबत होणं अटळ आहे. ओह माय गॉड सुरूवातीपासून विषयाशी प्रामाणिक राहतो. पीके विषयाच्या इर्दगिर्द फिरत राहतो, मूळ प्लॉटच्या जवळ जायचेसुद्धा धाडस करत नाही. हे नक्की कशामुळे घडलं असावं? हिराणीला चित्रपटाच्या आशयापेक्षा बॉक्स ऑफिसचेआकडे महत्त्वाचे वाटल्यामुळे का? माहित नाही. एक अत्यंत वेगळा, संवेदनशील विषय घेऊन पीके भलतीकडेच बडबडत बसतो. देव काय आहे? देवाची संकल्पना काय आहे? माणसाच्या आयुष्यात देवाचे नक्की स्थान काय या प्रश्नांकडे पीके जातच नाही. तो धर्म म्हणजेच देव अशा कन्फ़्युजनमध्येच घोटाळत राहतो. त्यातही त्याचा रोख धर्मामधल्या “रिच्युअल्स” अर्थात विधींवर वगैरे जास्त आहे. तो केवळ धर्माचं बाह्यस्वरूप जाणून घेतो, पुढे काय? देवाचा शोध घेताना धर्माच्या रस्त्यावर तो मिळणार नाही हे समजल्यावर तो इतर काहीच मार्ग शोधत नाही. माझ्यादृष्टीनं पीकेचा आत्मा इथंच हरवलेला आहे. कारण, हे असे विधी वगैरे न करतादेखील धर्म पाळणारे, समाजामध्ये नीट राहणारे असंख्य लोक आहेत. पीके धर्मावर किंवा धर्माच्या ठेकेदारांवर असूड ओढायच्या नादांत या लोकांना दुर्लक्षितच करतो. या लोकांसाठी धर्म हा केवळ जगण्याचा हिस्सा आहे, अख्खं आयुष्य नव्हे. पीके अशा लोकांना भेटतो, जगू तशीच आहे. पण तो त्यांना समजून घेत नाही, त्यांची विचारसरणी जुळवून घेत नाही. त्यामुळे पीके हा “एलियन” राहतच नाही. तो एक सर्वसाधारण माणूस बनतो आणि सिनेमा कोसळवतो.
प्ण तरी काही बाबतीत हिराणीला मानलं पाहिजे. आमिरखानसारखा अभिनेता असताना त्याला “इतकाच आणि एवढाच अभिनय” कर आणि तो तसाच करवून घेणं हे जिकीरीचं काम. फार कमी दिग्दर्शकांना ते जमलंय. (धूम३ आठवला का?) ३ इडियट्सम्मध्ये हिरानीनं आमिर खानला मोठा होऊ दिला होता, इथं मात्र व्यवस्थित जकडून पकडून ठेवलाय. पीकेच्या पात्राला अजून खोल डायमेन्शन दिली असती तर बहार आली असती, पण हेही नसे थोडके! पीकेला अजून कसल्याही अचाट सुपरपॉवर न दिल्याबद्दल हार्दिक अभिनंदन करायची वेळ आली आहे. हिराणीच्या सिनेमाचं वैशिष्ट्य म्हणजे थोडाच वेळ स्क्रीनवर दिसणारी आणि तरीही अतिशय महत्त्वाची ठरणारी पात्रं. त्याच्या प्रत्येक सिनेमामधली अशी छोटी छोटी पात्रं आज “कल्ट” ठरली आहेत. याही सिनेमामध्ये अशी अनेक मोजकीच पण ठसा उमटवून जाणारी पात्रं आहेत. अनुष्का शर्मा ओके, सौरभ शुक्ला ओके. इतर सर्व तांत्रिक बाबतीत सिनेमा उत्तम. गाणी थोडीच आहेत त्यापैकी दोन तीन गाणी अनावश्यक आहेत.
थोडक्यात पीके राजकुमार हिरानी आणि टिपिकल बॉलीवूड मसालापट यांच्यामध्ये कुठंतरी अडकलेला सॅण्डविच आहे. इकडं कुठं भटकायलास हिरानी? ये दुनिया तेरेलिये नही. हिरानीला त्याचा रीमोटवा लवकर मिळूदेत आणि त्याच्याच विश्वामधले प्रामाणिक परंतु निखळ मनोरंजन करणारे सिनेमा प्रेक्षकांना बघायला मिळू देत हीच त्या “देवाचरणी” प्रार्थना. .
शेवटी तो आरके ला घेवून येतो
शेवटी तो आरके ला घेवून येतो तर मला वाटल ह्याच्या ग्रहावर मुलगे प्रेग्नंट होतात काय? हा अमीर- अनुष्काचा पोरगा हाय काय?? मैत्रिणीनी फार मारल... जाऊ द्या...
चित्रपट आवडला होता. काही
चित्रपट आवडला होता. काही पंचेस बरोबर बसलेले होते पण पहाताना जे काही खटकले होते ते बरोबर पकडले आहेस!
एडिटिंग सुद्धा थोडे भरकटलेले वाटते. कदाचीत लोकांना (विरोधक) घाबरून बदल करताना सुसंगत राहीला नाही. ( ती कोर्ट केस झाली होति ना)
नंदिनी ग्रेट जॉब! मी सिनेमा
नंदिनी ग्रेट जॉब! मी सिनेमा पाहिलेला नाही पण तुला जे वाटलं ते मी समजू शकते. कारण असंच काहीसं मला थ्री इडियट्स पाहताना वाटलं होतं! Cant' help quoting a line from my favorite, evergreen serial धूप किनारे - "जिन लोगोंको हम आसमानों पे बिठा देते हैं, वो जब मुंह के बल जमीन पे गिरते हैं ना तो चोट हमें खुद लगती है!"
हिरानीला त्याचा रीमोटवा लवकर मिळूदेत आणि त्याच्याच विश्वामधले प्रामाणिक परंतु निखळ मनोरंजन करणारे सिनेमा प्रेक्षकांना बघायला मिळू देत हीच त्या “देवाचरणी” प्रार्थना. .>>+१११
नंदिनी आवडलं. अजून बघितला
नंदिनी आवडलं. अजून बघितला नाहीय, पण लवकरच बघणारे. कधीकधी १-२ रिव्हू वाचून बघितला की आपल्याला काय वाटलं ते ताडायला मजा येते.
छान लिहीलंयस, नंदिनी. अगदी
छान लिहीलंयस, नंदिनी. अगदी नेमकं. संवाद चुरचुरीत आहेत तरी नंतर पिक्चरच भटकल्याने ती गंमत कमी होत जाते.
धन्यवाद!
धन्यवाद!
अतिशय प्रामाणिक
अतिशय प्रामाणिक अभिप्राय!
आमिर सलमान शाहरूख तुषार फरदीन किशन कुमार ज्ञानेंद्र चौधरी यांच्या तुलना करायच्या असतील तर वेगळा बीबी शोधा >>>> खतरनाक!
जाहिर निशेध
जाहिर निशेध
परीक्षण आमीरवर फोकस न करता
परीक्षण आमीरवर फोकस न करता दिग्दर्शकाच्या चष्म्यातून लिहिलेय हे आवडले,
कारण चित्रपटाचा खरा हिरो (सुपर्रस्टारचा अपवाद वगळता) दिग्दर्शकच असतो, आणि अभिनेते हे केवळ त्याचे रिसोर्सेस. त्यामुळे भल्याबुर्याची जबाबदारी त्याचीच असते.
माझ्यामते राजकुमार हिरानीची यातील सर्वात मोठी चूक म्हणजे यात कास्टींग गंडलीय. या चित्रपटात मांडायचा आशय पाहता थ्री ईडियटस फेम आमीर खानला घेण्याऐवजी मुन्नाभाई संजूबाबाला घेतला असता तर सिनेमा वेगळा आणि जबरदस्त झाला असता. अर्थात यातील "वेगळा" हे महत्वाचे, कारण मग चित्रपट संजय दत्त याची जातकुळी आणि शक्तीस्थाने पाहून तसा बनला असता.
मुन्नाभाई एमबीबीएसच्या वेळी सुद्धा सुरुवातीला शाहरूखला घेऊन चित्रपट बनवला जाणार होता. पण त्याच्या तारखा न मिळाल्याने संजय दत्त आला आणि पुढे घडला तो ईतिहास आहे. पण खुद्द राजकुमार हिरानी देखील म्हणतो की मग त्यानुसार चित्रपट वेगळा झाला असता, शाहरूखच्या बलस्थानानुसार रोमांटीक भागाचे वेटेज वाढले असते.
असो, पण इथे आमीर खानला एका वेगळ्या एलियन गेट अप मध्ये साकारणे तुलनेत सोपे होते बस्स याव्यतिरीक्त त्याच्या अभिनयाचा वेगळा असा वापर झाला नाही. जर एलियनला काही खास सुपर पॉवर दाखवायच्या नव्हत्या तर सामाजिक संदेश प्रेक्षकांपर्यंत परफेक्ट पोहोचवण्यात मुन्नाभाई यशस्वी झाला असता. किंबहुना एका ऐवजी दोन एलियन दाखवत सर्किटलाही फिट करता आले असते, धमाल आली असती.
थ्री ईडियटस फेम आमीर खानला
थ्री ईडियटस फेम आमीर खानला घेण्याऐवजी मुन्नाभाई संजूबाबाला घेतला असता तर सिनेमा वेगळा आणि जबरदस्त झाला असता. >> खरय, परत जेलमधे राहून शूटींग करायचे म्हणजे सेट्स वगरेचा खर्च पण वाचला असता. extra वगैरे पण सहज मिळाले असते.
जेलमध्ये कशाला, बाहेर येत
जेलमध्ये कशाला, बाहेर येत राहतो तो, यातही थोडेसे काम तसेच केले आहे ना बहुधा. बाकी पेपरवर्क स्ट्रॊंग असले की चित्रपट लवकर संपवता येतो, अनुभवाचे बोल आहेत.
संजय दत्त चे शूटिंग तसेही तो
संजय दत्त चे शूटिंग तसेही तो जेल मध्ये जायच्या आधी संपलेले होते.
अनुभवाचे बोल आहेत. >> नक्की
अनुभवाचे बोल आहेत. >> नक्की कशाबद्दल अनुभवाचे बोल आहेत ?
नंदिनी, "माझ्यादृष्टीनं
नंदिनी,
"माझ्यादृष्टीनं पीकेचा आत्मा इथंच हरवलेला आहे. कारण, हे असे विधी वगैरे न करतादेखील धर्म पाळणारे, समाजामध्ये नीट राहणारे असंख्य लोक आहेत. पीके धर्मावर किंवा धर्माच्या ठेकेदारांवर असूड ओढायच्या नादांत या लोकांना दुर्लक्षितच करतो. या लोकांसाठी धर्म हा केवळ जगण्याचा हिस्सा आहे, अख्खं आयुष्य नव्हे".
>>>>>>>पर्फेक्ट!
अगदी नेमके लिहिले आहे. माझीही निराशा झाली. हे म्हणजे एखाद्या गोल्ड मेडलची अपेक्षा असलेल्या विद्यार्थ्याने फक्त फर्स्ट क्लास मिळवावा तसे काहीसे झाले.मी तर म्हणेन की "ओ माय गॉड" मधे हाच विषय अतिशय सुंदर रितीने मांडला गेला आहे.
असामी.. हा हा हा.. हे लक्षातच
असामी.. हा हा हा.. हे लक्षातच नाही आले..
नाही जेलच्या अनुभवाचे नाही.. तर एकेकाळी बालपणी एकांकिकेत अभिनय आणि दिग्दर्शन अश्या दोन्ही पातळ्यांवर काम करून झालेय .. त्या अनुभवाचे.. याउपर सध्या ईंजिनिअरींगमध्येही याचा फायदा होतो.. कसा ते अवांतर ईथे नको..
. कसा ते अवांतर ईथे नको..>>>
. कसा ते अवांतर ईथे नको..>>> एक्झाक्टली. पीके संदर्भात अथवा हिराणीसंदर्भात अथवा त्यांच्या सिनेमासंदर्भात काही बोलायचे असेल तर बोला. बाळपणी एकांकिकांच्या अनुभवाच्या बोलावरून इथं चर्चा नको.
मस्त लिहिलं आहेस नंदिनी. आता
मस्त लिहिलं आहेस नंदिनी.
आता रविवारी सिनेमा पाहताना इथले शब्द लक्षात राहतील.
ओक्के......म्हणजे
ओक्के......म्हणजे चला............उद्या पीके पहायचा प्लॅन होता तो एक्झेक्यूट करायला हरकत नाही.
नंदिनी ............ सुरवातीच्या सूचनेनुसार हा प्रश्न इथे टाकावी की नको? नको असल्यास नंतर प्रश्न डिलिट करीन.
पण गेल्या एक दोन वर्षातल्या मराठी दिवाळी अंकात एक सायन्स फिक्शन कथा आली होती. त्यातही एक एलियन पृथ्वीवर अवतरतो आणि त्याच्या प्रेमात एक मुलगी पडते...अशी काहीशी कथा होती.
पण बाकी काहीच आठवत नाहीये. पण मला खूप आवडली होती. कुणाला माहितीये का?
छान लिहीलंय.
छान लिहीलंय.
तळतळ पोचली.
तळतळ पोचली.
पोस्ट इंटरव्हल सिनेमाची तुलना
पोस्ट इंटरव्हल सिनेमाची तुलना अप्रिहार्यपणे ओह माय गॉड या सिनेमासोबत होणं अटळ आहे. ओह माय गॉड सुरूवातीपासून विषयाशी प्रामाणिक राहतो. पीके विषयाच्या इर्दगिर्द फिरत राहतो, मूळ प्लॉटच्या जवळ जायचेसुद्धा धाडस करत नाही. >>>>>>>>>>>>>>१००+ अनुमोदन.
इर्दगिर्द = जवळपास इर्दगिर्द
इर्दगिर्द = जवळपास
इर्दगिर्द फिरत राहतो = भोवताली घोटाळत राहतो.
आवडलं. अजून बघितला नाहीय, पण
आवडलं. अजून बघितला नाहीय, पण लवकरच बघणारे. कधीकधी १-२ रिव्हू
वाचून बघितला की आपल्याला काय
वाटलं ते ताडायला मजा येते. >>>> +11
प्रामाणिक परीक्षण
प्रामाणिक परीक्षण
चोक्कस.... चला, म्हणजे माझे
चोक्कस....
चला, म्हणजे माझे पाचसहाशे रुपये वाचले
विशाल
विशाल
@ नंदिनी - बराचसा पटला
@ नंदिनी - बराचसा पटला लेख...
हिरानीला त्याचा रीमोटवा लवकर मिळूदेत आणि त्याच्याच विश्वामधले प्रामाणिक परंतु निखळ मनोरंजन करणारे सिनेमा प्रेक्षकांना बघायला मिळू देत हीच त्या “देवाचरणी” प्रार्थना. .>>> + १००० अगदी अगदी खरं...
@ जिज्ञासा - तुमचं ते धूप किनारे मधलं वाक्य मी पहिल्यांदाच वाचलं आणि मला प्रचंड आवडलयं.. सो मी ते कॉपी करत्ये..
धन्यवाद...
फर्स्ट हाफ धमाल पीके, सेकंड
फर्स्ट हाफ धमाल पीके, सेकंड हाफ माती खाके- असं झालं खरं. मला तर बर्याच वेळा मध्यांतरानंतर दिग्दर्शकच बदलला की काय, असं वाटत राहिलं. रिमोटच्या, आणि मग नंतर देवाच्या शोधात भिंगरीगत फिरणारा पीके नंतर एकदम हातपाय गळाल्यागत स्थानबद्धच होऊन जातो, शिवाय मेमरी लॉस झाल्यागत आपण नक्की काय करत होतो- हेच विसरतो. पॉवरपॅक्ड बनत चाललेलं एलियनचं प्रोफाईल गिरक्या खात नंतर पार कोसळूनच जातं. अशा काहीतरी प्रयोजनाने या ग्रहावर आलेला एलियन काय काय धमाल करू शकला असता- याचा थोडा विचार करून बघितला. मध्यंतरापुर्वी अचाट धमाल दाखवून मग नंतर, नंदिनी म्हणते तसं- हिरानी हॅज रियली मिस्ड अ लॉट.
देवाचे, धर्माचे 'मॅनेजर' - ही तर 'ओ माय गॉड'चीच नक्कल. शिवाय सत्यमेव जयतेमधून अजून बाहेर न पडल्यागत सारा नंतरचा अर्धा भाग. आमिरला सामाजिक मास्तर बनवण्याचा, आणि मग नंतर बॉक्स ऑफिसचा मोह हिरानीला टाळता आला नाही हेच खरं. ऑदरवाईज अशा कमी बुद्ध्यांक असलेल्या सपक सरधोपट मेलोड्राम्यासाठी हिरानी अजिबात प्रसिद्ध नाही..
लेख आवडला.
लेख आवडला.
झक्कास रीव्ह्यु !! अजुन
झक्कास रीव्ह्यु !!
अजुन बघितला नाहीये....खरे सांगायचे झाले तर "खर्या" परिक्षणा ची वाट बघत होतो.
आता जरा विचार करायला हवा...to spend 500 bucks or not to spend
Pages