Submitted by भारती.. on 13 December, 2014 - 01:53
वाटा
वाटावाटा वळत राहती पावलांसवे पळत राहती
सार्वभौम या अस्तित्वाचे अर्थ नवनवे कळत राहती
या वाटांवर हरवत जावे दूरदूरवर मिरवत जावे
मुक्कामाला क्षितिजापाशी जायचे कसे ठरवत जावे
वाटावाटा वळत राहती सहनशक्तिचा अंत पाहती
स्थानबद्ध जी गृहसीमेतच त्या प्रतिभेला स्वैर बाहती
या वाटांना व्यथा कथाव्या दूरदूर त्या त्यांनी न्याव्या
सर्व कहाण्या सर्व विराण्या वाऱ्यासंगे विहरत जाव्या
वाटावाटा वळत राहती सुखस्वप्नांना छळत राहती
स्थिरावलेल्या संथ भुईला डंख नभाचे मिळत राहती
या वाटांना शोधत जावे पहाटवेळी नि चांदराती
दिगंतराच्या भ्रमंतीमध्ये ऋतुचक्राचे आरे फिरती..
-भारती बिर्जे डिग्गीकर
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
>>>या वाटांना व्यथा कथाव्या
>>>या वाटांना व्यथा कथाव्या दूरदूर त्या त्यांनी न्याव्या
सर्व कहाण्या सर्व विराण्या वाऱ्यासंगे विहरत जाव्या <<<
सुपर्ब!
पूर्ण कविता आवडली. लयही मस्तच आहे.
वा छानच
वा छानच
व्वा! खूपच छान!
व्वा! खूपच छान!
आवडली.. पण वाटावाटा च्या
आवडली.. पण वाटावाटा च्या जागी एखादा वेगळा शब्द असता तर, असे वाटून गेले.
मस्तच..
मस्तच..
नेहेमीपेक्षा वेगळी वाटली.
नेहेमीपेक्षा वेगळी वाटली.
आभार लोक्स, ही माझी कविता
आभार लोक्स, ही माझी कविता बेफिकीर यांची 'रस्ते' या प्रतिमेचा जागर करणारी गझल वाचून आठवली अन इथे दिली.पादाकुलक या सोप्या पण आकर्षक मात्रावृत्तातील ( ८+८ मात्रा प्रत्येक चरणात ) ही कविता आहे ,म्हणून लय तुम्हाला आवडली.. अंजली, नेहमीपेक्षा वेगळी हे खरंच.दिनेश, पटलं, जरा odd वाटतं आहेच.पण, 'वाटावाटा' हे वाटांच्या अनेकानेकतांचं निदर्शक आहे ,उदा. '' वाटा वळती वळत राहती '' असं केल्यास कानांना जास्त चांगलं वाटेल पण emphasis वाटांच्या वळण्यावर जाईल , अर्थ बदलेल....
खूप आवडली शब्दयोजना अशी नेमकी
खूप आवडली
शब्दयोजना अशी नेमकी आहे की हळवेपण आणि परिपक्वता यांचा precise मिलाफ साधला गेलाय
<<वाटावाटा वळत राहती सुखस्वप्नांना छळत राहती
स्थिरावलेल्या संथ भुईला डंख नभाचे मिळत राहती>> हे तर फारच अप्रतिम
रॉबर्ट फ्रॉस्टची "द रोड नॉट टेकन" आणि अनिलांची "मला आवडते वाट वळणाची" ने सुरु होणारी कविता आठवली या अनुषंगाने.
या वृत्ताला वनहरिणी म्हणता येईल ना?
आकर्षक लय हा या वृत्तबद्ध
आकर्षक लय हा या वृत्तबद्ध कवितेचा डौलदारपणा ठरला आहे. वाटावाटा सम कठोर व्यंजनाचा प्रत्येक ओळीत वापर असूनही विलक्षण अशी मृदुता प्राप्त झाली आहे ती रचनेत वापरल्या गेलेल्या वेगाची. एक अनुभव आहे हा, जो अर्थातच उत्स्फुर्त वाटतो. ऊर्जा भरलेली आहे आणि एका विशुद्ध तरल स्वरूपाशी ती नाते सांगत "पावलांसवे पळत" राहिली आहे. हा जिवंतपणा शेवटच्या ओळीपर्यंत अगदी मोकळेपणाने फिरत असल्याचे जाणवते.
कवयित्री म्हणते..."...या वाटांना शोधत जावे पहाटवेळी नि चांदराती..." ~ ठीक आहे; पण तिच्या उत्साहाला टळटळीत दुपार जरी भेटली शोधात तरीही तिची ही शोधयात्रा संपणार नाही वा थांबणारही नाही....ही आशा कायम राहावी.
अमेय, अशोक, हे प्रोत्साहित
अमेय, अशोक, हे प्रोत्साहित करणारे सुंदर प्रतिसाद वाचून छान वाटतं आहे.
>>टळटळीत दुपार जरी भेटली >> - होय अशोक,'' माझी मध्यान्ह माझीच असते, आकाशउंच समुद्र्मौन ''!
अमेय,हे मुळात पादाकुलक मात्रावृत्तात लिहिले होते ( ८+८ मात्रा प्रत्येक ओळीत -जसे की- )
वाटावाटा वळत राहती
सुखस्वप्नांना छळत राहती
स्थिरावलेल्या संथ भुईला
डंख नभाचे मिळत राहती
- पण दोन ओळी जोडून कॉपीपेस्ट केल्याने वनहरिणी मात्रावृत्तात ( ३२ मात्रा, ८+८+८+८ अशा चार टप्प्यात एक ओळ ) गेलं आहे खरे :)!
अशोकजींच्या प्रतिसादाला
अशोकजींच्या प्रतिसादाला प्रचंड अनुमोदन.
यावर आमच्या सारख्या नवोदितांनी आणखी काय लिहावे? एक मात्र नक्की तुमच्या प्रत्येक कवितेतून
तुमची जीवनविषयक सुजाण द्रृष्टी स्पष्ट होत गेलीय . या
कवितेतल्या ओळीओळीच्या वाटा वाटांतून वाचकमनाची पावलं एका सुंदर शव्दलयीत लगबगतात. शेवटपर्यंत.एक सुंदर सरल तालानुभूती...
अप्रतिम कविता! सध्या थिसीस
अप्रतिम कविता! सध्या थिसीस लिहायला घेतल्यामुळे
वाटावाटा वळत राहती सहनशक्तिचा अंत पाहती
स्थानबद्ध जी गृहसीमेतच त्या प्रतिभेला स्वैर बाहती
ह्या ओळींचा प्रत्यय येतो आहे!
भुईकमळ आणि जिज्ञासा या
भुईकमळ आणि जिज्ञासा या मुलींचे कवितेवरील वरील प्रतिसाद वाचल्यावर मुद्दाम सांगावेसे वाटते की एखादी कविता मनाला भिडल्यावर त्याबद्दलच्या भावना कशा उत्स्फुर्तपणे शब्दांचे रूप घेऊन अवतरतात ते वाचणे फार आनंददायी असेच असते.
ही भारतीच्या अभ्यासाची जादूच होय !
या वाटांवर हरवत जावे
या वाटांवर हरवत जावे दूरदूरवर
मिरवत जावे
मुक्कामाला क्षितिजापाशी
जायचे कसे ठरवत जाव>>>>> या ओळी विशेष आवडल्या..
खुप सुंदर काव्यरचना....
खुप सुंदर काव्यरचना....
अतिशय सुंदर! एकदम
अतिशय सुंदर! एकदम आवडली.
पूर्ण कविता आवडली. लयही मस्तच आहे. >>>
आकर्षक लय हा या वृत्तबद्ध कवितेचा डौलदारपणा ठरला आहे. >>> सहमत.
मजा आहे या कवितेत..
मजा आहे या कवितेत..
भुईकमळ,जिज्ञासा,जाई,संतोष,फार
भुईकमळ,जिज्ञासा,जाई,संतोष,फारेंड आणि नीधप ! या सर्वच प्रतिसादांनी मन भारावून गेलं आहे.म्हणून अजून थोडंसं बोलावं असं वाटलं.
एक जाणवलं ,प्रत्येकाला आपापल्या दृष्टीने निरनिराळ्याच ओळी आवडल्यात कारण त्या सर्वच ओळींची मर्मस्थानं वेगळी आहेत.
कवितेच्या रचनेत ज्या सहा द्विपदी आहेत त्यात आधीच्या द्विपदीमध्ये वाटांबद्दल एक विधान तर त्यानंतरच्या द्विपदीत पहिल्या द्विपदीतील परिस्थितीला प्रतिक्रिया देणारं असं विध्यर्थक विधान आहे. ( हरवत जावे, व्यथा कथाव्या ,शोधत जावे वगैरे )अशा तीन जोड्या आहेत. . पहिल्या जोडीत वाटा आव्हानात्म, मुक्त निमंत्रण देणाऱ्या आहेत, दुसरीत त्या अवरुद्ध , कुचंबलेल्या आहेत, तिसऱ्या जोडीत त्या अ-स्वस्थता ओलांडून स्व-स्थतेकडे जायला सुचवतात ..