माझे कॉफी डूआयडी

Submitted by दाद on 5 November, 2014 - 21:54

ऑस्ट्रेलियात, इथल्यांसारखं बोलायचं झालं तर भारी तोंड वेंगाडावं लागतं.
हॅय म्यॅयट... म्हणजे हाय मेट... (mate).
सॅन्ड्येय... मॅन्डॅय.. सॅट्टॅड्यॅय...
पॅरामाटा... स्पेलिंग आहे - parramatta.. अगदी डब्बल र आणि डब्बल ट जड जाईल पण म्हणून .. पॅय्मॅटॅ? असं बोबड्यात काय म्हणून शिरायचं? मी म्हटलेलं त्यांना पॅरमिटर पासून परमात्मा पर्यंत काहीही ऐकू येतं.
नको तिकडे शब्दं तोडतात ते एक... चांगलं घसघशीत 'सेन्ट लिओनार्डस' म्हणावं तर्खडकरीत तर नाही... सॅन्टलिनर्डस... मला बाजूचा नकाशा घेऊन ’इथे इथे नाच रे मोरा’ करीत ते स्टेशन दाखवावं लागलं होतं तिकिट खिडकीतल्या म्यॅयटला.

आपल्या भारतीय नावांची तर छान विल्हेवाट असते.
लवान्न्या... मला हिला भेटण्यापूर्वी कुणी स्पॅनिश वगैरे असल्यासारखं वाटलं... निघाली लावण्या. तेच मग हिरान्न्याचं.... ज्याला राम्या म्हणत होते ती निघाली रम्म्या.
मग्डा... म्हणजे मुग्धा... शीटॉल, म्हणजे शीतल.. मकेश म्हणजे मुकेश... निटिंग म्हणजे नितिन...

एक आहे 'देव देव'... ते खरा आहे 'देव दवे'. नेवाळकर स्वत:च स्वत:ची ओळख 'नेवॉकर' म्हणून करून देतात. टकलेबाईंना टॅकल म्हणतात, आणि थिटेंची मुलगी स्वत:चं आडनाव 'थाईट' सांगते. आपटे महद्प्रयत्नांती 'ऍप्ट' पर्यंत तरी येतात. फ़ाटक... 'फ़टॅक' झालेत.

आमच्या प्रोजेक्टवर चेन्नईमधून माणसं घेण्याची थोर परंपरा आहे. खूपसे कुमार, श्रीनी, शंकर आहेत... झालच तर नील (नीलेन्द्रस्वामी), थंबी (ह्याचं नाव खरतर मोहम्मद मरिका थंबी आहे... पण मोहम्मद आहेत अजून तीनेकतरी... मरिका त्याला नकोय.... मग उरेल ते), मो( मोहम्मदच... अती तिथे माती झालीये ह्या नावाची इथे)... पुढल्या मोहम्मदला काय म्हणणारेत कुणास ठाऊक.
शॅम (वसुधैवम शामसुंदरम).. वॅसू (वासुदेवम संबंधंम), सम (अजून एक वासुदेवम संबंधंम).

एकदा गोविन्दप्रसादम शण्मुगवेलयुदम नावाचा कुणी टीमवर येणार म्हणताना मॅनेजरची पाचावर धारण.. हे कसं म्हणायचं? ह्यातलं काय म्हणायचं? किती म्हटलं तर चालेल?
त्याचा कोटी जप करूनही त्याला वाचासिद्धी सोडाच... ते नावही सरळ घेता आलं नसतं.

’.. आपण ह्याला कुमार म्हणूया?’ ह्या त्याच्या प्रश्नावर माझ्या नकळत मी कपाळावर हात मारून घेतल होता... ’व्हॉट? व्हॉट? डज इट मीन समथिंग रॉन्ग?’ ह्यावर काय बोलणार?

मी ह्या टीममधे आल्यावर सगळ्यांची ओळखपरेड झाली. आणि दुसर्‍याच दिवशी मॅनेजरने मला टीम मिटिंग भरवायला सांगितली. मी मिटिंग इन्व्हाईट ड्राफ़्ट करून त्याला दाखवलं.
’गंजा? गंजालापण घाल ह्यात’

मला काही केल्या टीममधे टकलू कोण ते आठवेना... खूप विचार करून शेवटी मलाच गंजत्वं प्राप्तं होणार असं ध्यानी आल्यावर एका देसीची मदत मागितली...’अरे, टकलू कौन है अपने टीम मे?’
’... अरे क्या बात... आपुनका बॉस हैना.. रॉड’. आता तो स्वत:ला टकलू म्हणवून घेईल इतका सहृदयी, उदार वगैरे मुळीच नव्हता.
’नही रे... वही बोल रहा था.. किसी गंजा को ऍड करनेको’...

(इथे फ़क्तं देसीच मारू शकेल असला सणसणित हात कपाळावर मारून घेत)’.. अरे टकलू टकलू क्या फ़िर? गंजा बोलो ना’ मला हा गांजा पिऊन आल्यासारखा दिसायला लागला होता.

’गंजा याने टकलू नही?’ हा आपल्याला मदत करणारय हे विसरून मी त्याला जितकं वेड्यात काढत येईल तितकं वेड्यात काढत म्हटलं.

’नही... बोले तो है... लेकिन वो... गंगा सुब्रमण्यम है ना.. उसको सब गंजा बोल्तेय’...इथे मी त्याच्याहीपेक्षा मोठ्ठा जबरी फ़टाका कपाळावर फ़ोडला. ती गंगा पोटरीपर्यंत शेपटा मिरवून होती... तिला गंजा म्हणतायत येडे.

’... ये आउझी लोग गंगा नै बोल सकते ना.. तो गंजा हो गया... अरे... गॅन्जेस नै बोल्ते क्या आपुनके गंगामैया को? तुम भी एकदम अन्नड की त‍र्हा क्या...’
तरी मी उगीच गोंधळ नको म्हणून तिला फोन लावला. तर तिचा व्हॊइस मेल वर गेला ,... हॅलो धिस इज गंजाज व्हॊइस मेल...’
माझ्या कपाळावर लवंगी फ़ोडली मी.

शलाका हे नाव तोंड वेंगाडत वेंगाडत श्यॅल्यॅक्यॅ असं घ्यायला... घेऊन होईपर्यंत लकवा भरेल इतकं वेंगाडावं लागेल... म्हणून कदाचित बरं घेतात. पण ते मी तंबी दिलेले किंवा मला ओळखून असणारे... बाकिच्यांचं काय?

शकाला.. शलाला, शाकाल, शाकालाका.. इथे मला बुम असं ओरडावसं वाटतं... इथवर ठीकय.
श्रीलंका? "that indian lady.. name shrilanka". काय लॉजिकै का?

गिहान्था कनगहपिटया... हे एक श्रीलंकन पात्रं आहे टीममधे. मधे एक दिवस अख्ख्या टीमने धाड घातली खाली कॅफ़ेवर. ह्याच्या नावाचा गोंधळ माझ्या नावापेक्षा भारी घालतात. ऑर्डरवर घालायला त्याचं नाव विचारणार्‍या रजिस्टरमागच्या चवळीच्या शेंगेला त्याने सांगितलं.. जस्ट पुट ’जी’.
थोड्यावेळाने त्याची ऑर्डर घेऊन जी ओरडत आली ती... ’पुट्जी... पुट्जी... पुट्जी....’. आम्ही हसून हसून मेलो.

मी शहाणी झाले होते. म्हणून पुढल्यावेळी ऑर्डरवर नाव विचारल्यावर मी नीट म्हटलं... ’एस’... तिनं चमकुन बघितलंही माझ्याकडे. मी परत मान हलवत सांगितलं ’एस्स’... हवेत दोन वेळा इंग्रजी एस काढून दाखवला.
पुटजीने अंगठा वर करून दाखवलाही.

माझी ऑर्डर बाहेर घेऊन आली ती ओरडत आली... ’ऍssssस.. ऍssssस.... ऍssssस’. पुटजीच्या तोंडातून कॉफ़ीचा फ़वारा.
माझी काही हिम्मत झाली नाही ऑर्डर घ्यायची. कोण तो ’ऍssssस..’ पुढे न आल्याने पुढल्या खेपेला ती आतल्या पदार्थाच्या नावे ओरडत आली. तेव्हा कुठे धीर आला मला हात वर करण्याचा.

आता मी निर्ढावलेय... काय वाट्टेल ती नावं सांगते. जेनी, फ़ेनी... हे माझे कॉफ़ी डूआयडी आहेत.. प्रत्येकवेळी रजिस्टरमागची डोळे वटारुन बघते. प्रत्येकवेळी मी तिला हसून ’ आय होप दे प्रोनाउन्स इट बेटर टुडे’ असं म्हणते.

समाप्त

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धमाल.. एकटीच ऑफिसमध्ये हसतिये मी.

माझ्या मुलीच्या वर्गातले एकूण एक सगळे वंदनला व्हॅनडॅन म्हणतात. आता तोही त्याचे नाव तसेच सांगतो Happy

अरे.......... काय भारीये हे.............. :हहपुवा:

हे तर फॉरिनर्स आपल्या नावांच्या काय धज्जिया उडवतात त्याबद्दल चाललंय.
आम्ही गुर्जर नाव सांगितलं की ऐकणार्‍याला पहिल्यांदा काहीच बोध होत नाही....हे इथे आपल्या भारत देशात. आमच्या नगरात.
आणि कुरियरवाले, किंवा ड्रायक्लीनवाला...........जिथे आमचं नाव लिहिण्याची वेळ येते तिथे मी तो कागद माझ्याकडे ओढून घेते आणि मीच स्वतः नाव लिहिते.......अगदी बिनचूक.
नाहीतर आमच्या नावाचं काय काय झालय..
आणि जर का कुणी गुजर लिहिलं आणि मी सांगितलं की "ज वर रफार द्या" तर .....या बाई कोणत्या भाषेत बोलतात असं माझ्याकडे बघतात.

१)गुजर...आणि इथे काही चूक होतेय हे कुणाच्या गावीच नसते.

२)गुजराल

३) गुलजार

४) गुंजाळ

५) गुंजन

६)गुरुजन ..... हे जरा अतीच होत नाहीय्ये का?

या आमच्या आडनावाच्या धज्ज्याँ!
माझ्या उसगावातल्या एका नातेवाईकाच्या मुलाचं नाव अबीर ठेवलंय. तर त्याच्या स्पेलिन्गप्रमाणे ए बीयर!
आणि कबीरचा के बीयर!
त्यामुळे हे नातेवाईक ही दोन्ही नावं न ठेवण्याचा सल्ला देतात इतरांना(उसगावात).

माझं आणि नवर्‍याचं - दोघांचं स्टारबक्स नाव - सॅम. नवरा, मी आणि मुलगा - यांच्या नावांची आद्या क्षरं घेऊन बनवलेले. हल्ली तर सॅम नावाची इतकी सवय झाल्ये की दुसर्‍या कोणाला कोणी सॅम म्हणून हाक मारली तरी मी बघते Happy

मामी, आबासाहेब.. नावात कायै म्हणायचय का तुम्हाला?
http://www.maayboli.com/node/17011

तिथे माझ्या लेकाला नाव ( खरतर नावं) ठेवण्यावर होता तो लेक... आपलं... लेख Happy

दाद, मस्त धम्माल आली वाचताना.. Biggrin

साती Rofl

साऊथ ईस्ट देशांत राहताना ही असेच अनुभव येतात.. आपलं ओरिजिनल नांव विसरायला होतं..

थायलँड, चीन मधे तर कायम र ला ल च म्हणायचं त्यांच्यापेक्षा इंडोनेशियन्स्,फिलिपिनोज चे उच्चार

त्यातल्यात्यात बरे असतात..

दाद, तुझ्या नेक्स्ट लेखाच्या प्रतिक्षेत आहे Happy

खुप हसले Lol
नावं घेणा-यांची आणि त्यांनी घेतल्यानंतर 'नाव'वाल्यांची वेडीवाकडी तोंडं, फुतलेले-फोडलेले फटाके, उडालेले फवारे.. सगळी दृश्यं डोळ्यांसमोर दिसत होती Lol
दाद, जब्बरदस्त लिहिलंयस गं Happy

2 तास झाले लेख आणि प्रतिसाद वाचुन. हसून वाट लागली. गाल दुखायला लागलेत आई ग....
मस्त लेख !मजा आली वाचताना!

मग्डा... म्हणजे मुग्धा. >>>> इतक्या वाईट पद्धतीने हाक मारत असतील ऑस्ट्रेलियन्स तर मी माझ टोपणनाव सांगेन त्यांना.....

आमच्याकडे शितोळे आडनावाचा एक माणुस होता. अमेरिकन लोकांनी त्याच्या आडनावाची व्यवस्थित फोड करून वाट लावली होती... Happy

एका वाचकाने पत्र पाठवून एका महत्वाच्या राष्ट्रीय प्रश्नावर चांगली प्रतिक्रिया दिली होती. पण नावात काही बदल शक्य आहे का, यावर खूप खल करावा लागला होता, त्याने पत्राखाली लिहिलेले नाव होते, संपूर्ण नागवेकर.
आमच्या गावाकडे घरी काम करणाऱ्या एका गड्याला मुलगा झाला. नाव काय ठेवावं, म्हणून त्यानं खूप विचार केला. आम्हाला विचारलं, म्हणून सुचवलं. सतीश नाव ठेव. तो खुश झाला. छान नाव आहे म्हणाला. आणि मुलाचं नाव सतीश ठेवलं.
नाव काय या मुलाचं, असं नंतर कुणी विचारलं, तर तो प्रेमानं सांगायचा... छत्तीस!

मी प्रथम ऑस्ट्रेलियाला गेलो असता, मला सांगितले की तुझे पैसे बँकेत जमा होतील, तर तू बँकेत खाते उघड. मी विचारले कुठल्या बँकेत? तर तो म्हणाला, कुठेहि आय एन झेड मधे कर, तू रहातो त्याच इमारतीत आहे. मी म्हंटले आय एन झेड? मला तर कुठे आय एन झेड दिसले नाही, मग त्याने लिहून दाखवले - ANZ !

आणि आपलीच नावे काय, इंग्रजी नावांचेहि तेच हाल. मी मुद्दाम खवचटपणे मॅक्नामारा चे स्पेलिंग विचारले तर एम सी एन आय एम आय र आय असे सांगितले. मी म्हंटले - ओ, मॅक्निमिरि!!
भडकला कदाचित, पण मला काय?
आँ! आत्ता कस्से वाट्टय? असे विचारावेसे वाटले!

भारतीयांच्या नावांचे जे बिनदिकत हाल करतात त्याचे त्या ऑस्ट्रेलियनांना काही वाटत नाही, मग मी तरी का काही वाटून घेऊ?

Pages