ही आहे एक बायको.
कधीकाळी केसांना रोलर लावून तासनतास स्थिर बसून मनाप्रमाणे केस वळवणारी ही आता छोट्या केसांचा रबर लावलेला अर्धवट आंबाडा घालून आणि चपलांचे बंद न लावता धावत पळत ऑफिस ला येत असते. आवडतं पुस्तक पूर्ण वाचल्याशिवाय खाली न ठेवणारी ही आता रात्री आवडत्या पुस्तकाचं अर्धं पान मोबाइल वर वाचून घोरायला सुरुवात करते. लग्नाआधी कपड्यांच्या घड्या करणं हे श्रमाचं काम वाटणारी ही आता रोजच्या जेवणाऐवजी पावभाजी बनवण्याची सूट मिळाली की 'आज तर मज्जा आहे' अशी खूष होत असते. एकेकाळी स्वस्तातले आयते कपडे विकत घेऊन ते शिंप्याकडून घट्ट करुन घेणारी ही व्यक्ती आता फक्त महागडे एक्स एल आयते कपडे घालून 'त्यातल्या त्यात बारीक दिसण्यात ' समाधान मानते. ऑफिसात साडेनऊ तास आणि रस्त्यावर गाड्यांच्या महासागरात दीड तास घालवून सोशिक बनलेली ही व्यक्ती वाकड पूलावर चाळीसच्या वेगाने संध्याकाळी जाता आले तर ईश्वराचे आभार मानते. घरी आल्यावर चपला काढून पोटापाण्याची व्यवस्था केल्यावर बाळाबरोबर खेळण्याचा वेळ देताना आणि कणिक भिजवताना स्वतःची आवडती मालिका बघते आणि नंतर 'टिव्ही बघण्याच्या हौसेपायी रोज बाळाला उशिरा झोपण्याची सवय ' लावल्याबद्दल टोमणे ऐकते. पण काही झाले तरी 'मी टाईम' च त्याग करायचा नाही या जिद्दी साठी ती गप्प बसते आणि ' हाऊस एम डी' दहा ते अकरा ऐवजी नऊ ते दहा होण्याचा दैवी चमत्कार घडावा म्हणून स्टार वर्ल्ड नावाच्या देवाची मनात करुणा भाकते. नवर्याच्या चुका काढून टोमण्यांचा वचपा काढते. कधीकाळी फक्त प्रिय माणसाशी बोलता यावं म्हणून त्याच्याबरोबर ऑफिसपर्यंत जाऊन नंतर बसने स्वतःच्या घरी परत येणारी ही व्यक्ती आता नवर्याला बोलायची निमीत्तं शोधते. 'एक पाण्याचा ग्लास उठून स्वतः घेत नाहीस आणि म्हणे म्यॅल्या जिम म्य्ध्ये क्यार्डीओ क्यमी प्यडतात' असे अचून निशाण्यावर वार करुन जिंकल्याचा आनंद मानते.हिला 'जुनं झालेलं लग्न' हा आजार झाला आहे.
'पुढच्या वर्षी बाळाची शाळा लवकर चालू झाली की जिम लावू' म्हणून यावर्षी आयब्रो आणि बदाम स्क्रब नियमीत लावून 'बाई जाड असल्या तरी चेहरा रेखीव आहे आणि तश्या सुस्वभावी आहेत' असे ऑफिसात मत झाले तरी त्याला कोंप्लिमेंट मानून खूष होते.. हिची फिटनेस ची कल्पना सकाळी सकाळी मधपाणी घेणे, आणि शनिवार रविवार झोपून रामदेव बाबांची पुस्तके वाचणे यापुरतीच मर्यादीत आहे.
अशा अनेक व्यक्ती समाजात आहेत. या फक्त आळशी नाहीत तर दमलेल्या पण आहेत. यांना बारीक व्हायचं आहे पण त्याच बरोबर स्वतःला मिळणारा दुर्मीळ वेळ मनाप्रमाणे घालवायचा पण आहे. लग्न, समाज आणि नोकरी यांनी सध्या त्यांना अनुत्साही बनवलं आहे. यांना सहानूभूती द्या.
"यान्ना ................ आप्प्लं म्हणा."
हा आहे एक नवरा.
कधी काळी 'लाथ मारीन तिथे पाणी काढीन' अशी जिगर आणि धडाडी असलेला हा डॅशिंग गडी हल्ली फक्त दळणाचा डबा आणण्यासाठी दुचाकीच्या किकला लाथ मारतो. हा एका नोकरी करणार्या बायकोचा समजूतदार नवरा असल्याने याने 'पाटावरुन ताटावर आणि सोफ्यावरुन पलंगावर' अशी राजेशाही बडदास्त मिळवण्याचा हक्क गमावला आहे. दर तीन वर्षाने वेगवेगळ्या एम बी ए च्या फिया भरुन त्यानंतर सहा महिन्यांनी काम जास्त झाल्यने सर्व अभ्यास बासनात गुंडाळून एम बी ए 'नंतर केव्हातरी' या निर्णायक डेडलाईनला टाकून देऊन हा नव्याने नव्या युनिव्हर्सिट्यांच्या शोधात लागतो.हा प्राणी कल्पक आहे आणि नव्यानव्या बिझनेसांच्या कल्पना काढून त्यांची प्रेझेंटेशन्स बनवणे हा याचा लोळत नसतानाचा उद्योग आहे. बायकोची वाचनाची आणि चहाची आवड समजून न घेण्याबद्दल रोजचे टोमणे ऐकणे हे आता याच्या श्वासाचा एक भाग आहे.या च्या बिझनेसच्या कल्पना ऐकून लग्ना आधी आणि थोड्या नंतर प्रचंड प्रभावित होणारी बायको आता थंडपणे 'चांगलं आहे, पण खरोखर करणार आहेस का? टु गूड टु बी ट्रु' असं म्हणून तेजोभंग करते.मुळात फ्यामिली ज्योतिष्याने 'हीच मुलगी बिझनेस मध्ये उत्तम साथ देईल' असे वर्तवल्याने बाकी दोन मुलींचा पत्ता काटून हिच्या नावावर शिक्कामोर्तब झालेले आहे ही अंदरकी बात तो अजून बायकोला बोललेला नाहीय कारण या सत्याचा बायकोकडून पुढील टोमण्यांत दुरुपयोग नक्की होईल याची त्याला खात्री आहे. बायकोला पदोपदी सरप्राइझ देण्याचा सुंदर कल्पना बाळगणार्या या माणसाचा वेळोवेळी 'तू आणलेला तो छोटा ड्रेस आणि तुळशीच्या बियांच्या दागिन्याचा सेट एकदमच काहीतरी होता' या आणि अशा विधानांनी वडा करण्यात आला आहे. मुळात मनमिळाऊ आणि चांगला असलेला हा प्राणी आता सावध पणे वागतो आणि 'तू जा आणि घेऊन ये. मी द्यायचं असेल तर तुला पैसे ऑनलाईन पाठवतो' असे सांगून परत 'हाऊ अन रोम्यांटिक' म्हणून शिव्या खातो. जगातल्या अनेक नवर्यांप्रमाणेच बायकोला हवे तेव्हा हवे तितकेच आणि हवे तसेच रोम्यांटिक वागण्याचे असिधाराव्रत अजून याला साधलेले नाहीय.त्यामुळे तीच तलवार तो स्वतःच्या संरक्षणासाठी सदैव उपसून असतो. 'तू दुधाकडे बघायला सांगितले होतेस, दूध बंद करायला सांगितले नव्हतेस. आधी नीट टास्क असाईन करायला शिक.' असे म्हणून निधड्या छातीने बायको नामक सुतळी बाँबच्या वातीला उदबत्ती लावण्यात तो पटाईत झाला आहे.
'बायको नीट वेळेचे नियोजन करत नसल्याने मला बाळाकडे बघावं लागतं आणि वेळ मिळत नाही , मिळाला असता तर एव्हाना फोर्ड च्या यादीत पहिल्या दहामधला उद्योगपती असतो' हा विचार करुन स्वतःचं मनोधैर्य आणि आत्मविश्वास जागा ठेवून याने बिझनेस ग्रुपचे नाव, संकेत स्थळ,ऑफिसची रचना हे सर्व तयार ठेवलं आहे. आता फक्त काय उद्योग करायचा हे ठरलं की झालंच.पण अजून यातलं काहीच जमत नाही कारण वेळच मिळत नाही. बायकोला मदत पण करतो, ती जर हवी तशी नसली तर टोमणे पण खातो. अधून मधून 'सांगून आलेल्या तीन पैकी शौचे आडनावाची मुलगी केली असती तर आता आयुष्य कसं असतं? आडनाव सोडून बाकी मुलगी ठिक होती.' अशी अशक्य कोटीतील कल्पनारंजनं तो करतो.
याच्या सारख्या अनेक व्यक्ती समाजात आहेत. पूर्णपणे वाईट नवरा बनायचे नाही आणि पूर्ण चांगला नवरा बनता आलेले नाही या कात्रीत सापडून त्यांचे कपाळावरचे केस मात्र मागे मागे चालले आहेत आणि पोटे मात्र पुढे पुढे येत आहेत. यांना 'अंकल" म्हणून हेटाळणी करु नका. त्यांना समाजात सन्मानाने जगू द्या.
"यान्ना ................ आप्प्लं म्हणा."
(पात्रं आणि प्रसंगः ओळखीचे किंवा सासरचे वाचत असल्यास काल्पनिक)
असं दुसर्यांच्या बायकांना
असं दुसर्यांच्या बायकांना आपल्लं कसं म्हणणार?
पण भावना पोहोचल्या , मस्त लिहिलयं .
नेहमीसारखंच मस्त... सध्या
नेहमीसारखंच मस्त... सध्या याच फेजमधून जात असल्याने जाम आवडल
पण अजून लिहायला हव होत.. क्रमशः आहे का?
टप्प्यात लिहीते आहे. आता फक्त
टप्प्यात लिहीते आहे.
आता फक्त सेव्ह करुनठेवलंय.
तातडीच्या दखलीबद्दल धन्यवाद.
हे पूर्ण होईपर्यंत "खाजगी
हे पूर्ण होईपर्यंत "खाजगी जागा" मधे साठवता येईल.
उत्तम लिहिलं आहेत. सबंद
उत्तम लिहिलं आहेत.
सबंद आयुष्य बोटीवर राहिल्यानंतर गेली फक्त दीड वर्षं इथे नोकरी केल्यामुळे माझ्या मनात जमिनीवर रहाणार्यांबद्दल प्रचंड आदर निर्माण झाला आहे. इथलं आयुष्य खरोखरच खडतर आहे. दमताहेत खरे, पण काही हासिल करतो आहोत का हे त्यांना कळत नाहिये.
तुमचा शब्दप्रयोग मला समर्पक वाटला. आपण त्यांची या दमछाकीतून सुटका करू शकत नाही.
निदान यांना . . . . . . . . . . . आप्लं म्हणा !!
छान लिहिलंय.. अगदी अचुक
छान लिहिलंय.. अगदी अचुक निरीक्षण !!!
मस्तच लिहिलय आवडले. अशा अनेक
मस्तच लिहिलय आवडले.
अशा अनेक व्यक्ती समाजात आहेत. या फक्त आळशी नाहीत तर दमलेल्या पण आहेत. यांना बारीक व्हायचं आहे पण त्याच बरोबर स्वतःला मिळणारा दुर्मीळ वेळ मनाप्रमाणे घालवायचा पण आहे. लग्न, समाज आणि नोकरी यांनी सध्या त्यांना अनुत्साही बनवलं आहे. यांना सहानूभूती द्या.>> +१
याच्या सारख्या अनेक व्यक्ती समाजात आहेत. पूर्णपणे वाईट नवरा बनायचे नाही आणि पूर्ण चांगला नवरा बनता आलेले नाही या कात्रीत सापडून त्यांचे कपाळावरचे केस मात्र मागे मागे चालले आहेत आणि पोटे मात्र पुढे पुढे येत आहेत. यांना 'अंकल" म्हणून हेटाळणी करु नका. त्यांना समाजात सन्मानाने जगू द्या.>> +१
पण तरीही>> यांना बारीक व्हायचं आहे पण त्याच बरोबर स्वतःला मिळणारा दुर्मीळ वेळ मनाप्रमाणे घालवायचा पण आहे >> (हेल्दी राहायचे),त्यांनी केदार जाधवांचा वजनाचा धागा फॉलो करायचा.(सिरियसली) हे दोघांनाही लागु.
तळटीप भारीये!
तळटीप भारीये!
सुपर निरीक्षण! मस्त
सुपर निरीक्षण! मस्त लिहिलंय.
तळटीप लैच भारी.
फार आवडलं!!!
फार आवडलं!!!
तळटीप लैच भारी.>>+१
तळटीप लैच भारी.>>+१
फार दिवसांनी एकदम वेगळ्या
फार दिवसांनी एकदम वेगळ्या धाटणीचं काहीतरी वाचलं! जियो! अजून लिहा, खूप लिहा! वाचायला आवडेल!
छान लिहीले आहे. मी अशी खूप
छान लिहीले आहे. मी अशी खूप पात्रं बघते. एक मेकांना आपलं म्हणतच असतील.
मस्त लिहलयं तळटीप लैच
मस्त लिहलयं
तळटीप लैच भारी.>>+१
आवडलं.
आवडलं.
अरे वा अनु! मस्त लिहितेस.
अरे वा अनु!
मस्त लिहितेस.
महान लिहिलंय हे सगळं
महान लिहिलंय
हे सगळं अनुभवायला अगदी दाराबाहेरही पाऊल टाकायची गरज नाही
तळटीपेसहित मस्त लिहीलंय
तळटीपेसहित मस्त लिहीलंय
यान्ना रास्कला रजनीअण्णा
यान्ना रास्कला रजनीअण्णा सार्खे काहीतरी वाटलेले.. पण वेगळेच निघालं,. छान खुसखुशीत
अवांतर टिप्पणी तुमच्या तळटीपवर - तुम्हाला ओळखीचे आणि सासरची चांगलीच माणसे भेटली असणार, म्हणून लिहित आहात बिनधास्त
अगदी घरोघरी मातीच्या ......
अगदी घरोघरी मातीच्या ......:-)
छान लिहिलयं. वरच्या बर्याच
छान लिहिलयं.
वरच्या बर्याच जणांनी फक्त तळटीपच वाचली दिसतयं
भारीये
भारीये
लय भारी
लय भारी
(No subject)
जबरी लिहिले आहे!! हा असा
जबरी लिहिले आहे!!
हा असा टीव्हीवर कार्यक्रम लागाय्चा ना? माझा दादा कायम नक्कल करायचा. मी त्या टोन मध्ये वाचला लेख, सहीच जमलाय..
जबरदस्त!
जबरदस्त!
अगदी अगदी घरातलच लिहिलत हो.
अगदी अगदी घरातलच लिहिलत हो.
अजुन लिहिते आहेस ना. पण पटलं अगदी मनापासुन.
(No subject)
मस्तच...
मस्तच...
छान लिहिलंय. हसू आलं पण थोडी
छान लिहिलंय.
हसू आलं पण थोडी किव ही आली. आज काम आणि पैसा मिळवण्यात आपण जगणं हरवून बसलोय याची पुन्हा एकदा जाणिव झाली.
Pages