उशीराच लिहितोय 'हैदर'वर ... पण चांगल्या चित्रपटाबद्दल सगळ्यांना सांगायला काळवेळ काही असू नये , नाही का ?
(वि. सू. : Spoiler वाटू शकेल असा मजकूर यात आहे हे लक्षात ठेवून वाचावे. मागाहून तक्रार चालणार नाही )
चांगला चित्रपट कोणता हे ठरवण्याची अनेक परिमाणे आहेत. चित्रपट जर गंभीर प्रकृतीचा असेल तर त्या चित्रपटाने आपल्यात निर्माण केलेली अस्वस्थता आणि त्या अनुषंगाने आपल्यासमोर उपस्थित केलेले प्रश्न हे तो चित्रपट किती चांगला आहे याचे परिमाण नक्कीच ठरू शकते. त्या परिमाणाचा विचार करता हैदर हा चांगलाच चित्रपट आहे. मी शेक्सपीअरची कोणतीही कलाकृती वाचलेली नाही पण त्याच्याविषयी किंवा त्याच्या नाटकांविषयी जे काही वाचले आहे त्यावरून हे जाणवते की तो कालातीत लेखक आहे आणि त्याच्या कित्येक नाट्यकृतींचा जगभरातल्या साहित्य/नाटक/चित्रपटावर आजतागायत प्रभाव टिकून आहे. त्यामुळे त्याच्या नाटकाचा आशय पचवणे आणि त्याचे संपूर्णपणे वेगळ्या अशा स्थल-कालसापेक्ष कथानकात रुपांतर करणे म्हणजे गोवर्धन उचलण्याइतकेच कठीण आहे हे निश्चित आणि हा गोवर्धन विशाल भारद्वाजने इतक्या कुशलतेने पेललेला आहे की त्याला कुर्निसात करायला पाहिजे.
हैदर ९० च्या दशकातल्या काश्मीर मध्ये घडतो आहे. काश्मीर प्रचंड धगधगते आहे. काश्मिरी जनांचा अभिमान आणि त्याचवेळी वेदना ठरलेली ‘काश्मिरियत’, त्याला त्यांच्या ‘मुस्लीम’ असण्याची भक्कम पार्श्वभूमी, सैन्याच्या इशाऱ्यावर चालणारे/रोखले जाणारे/वाचवले जाणारे/उध्वस्त होणारे जीवन यामुळे काश्मीर खोरे अगदी कुंद कुंद होऊन गेले आहे. या सगळ्या परिस्थितीमधेच अलिगढ विद्यापीठातून काव्यशास्त्र शिकून नुकताच परततलेल्या हैदरच्या वैयक्तिक आयुष्यात प्रेम, निराशा, वैफल्य, द्विधा मनस्थिती यांचा असा काही गुंता झाला आहे की एकापासून दुसरा पदर वेगळा करणे अशक्य आहे.
हैदर (Hamlet) च्या डॉक्टर वडिलांनी एका अतिरेक्याचे ऑपरेशन करून त्याला बरे होईपर्यंत स्वतःच्याच घरात ठेवल्याने लष्कराने अतिरेक्यांकट घर उद्ध्वस्त केले आहे आणि वडिलांना ताब्यात घेतले आहे. अधिक चौकशी केल्यावर हैदरचे वडील ‘हरवले’ आहेत एवढे एकच उत्तर हैदर आणि कुटुंबियांना पोलिसांकडून मिळत आहे. हैदर बापाच्या शोधात आहे आणि त्याचवेळी त्याला आई ग़ज़ाला (Gertrude - तब्बू) आणि काका खुर्रम (Claudius – के.के.मेनन) यांच्यात ‘काहीतरी’ आहे याचे संकेत मिळतात आणि आणि हैदर अधिकच ढासळतो. काकाशी असणारे नाते, आईवर असणारे प्रेम (मुलगा या angle ने आणि सूक्ष्मपणे सूचित केल्या गेलेल्या ‘इडीपस कॉम्प्लेक्स’च्या angleनेही) यांना तडे जातात आणि मग कोण कुठला गूढ रूहज़ार (एकमेवाद्वितीय इरफान खान) येतो, व्यथित हैदरच्या मनात सूडाचे बी पेरतो आणि हैदरच्या अंतःकरणात लढाई सुरु होते भावनेची आणि बुद्धीची, जगावे की मरावे प्रश्नांची आणि शेवटी दफनभूमीत होते खरीखुरी बंदुकीची लढाई आणि ती संपता संपता जीव घ्यावा की जीवदान द्यावे या यक्षप्रश्नांची....
मूळचा Hamlet एका शाही घराण्यातल्या उलथापालथीबद्दल आणि सूडाच्या नाट्याबद्दल आहे. त्यातली सर्व महत्वाची पात्रे (Hamlet चा मित्र वगळता) हैदरमध्ये यात आलेली आहेत. आणि विशेष म्हणजे “काकाचा सूड घे” असे सतत Hamlet ला सांगणारे Hamletच्या बापाचे भूत इथे थेट येत नाही पण “सूड घे” संदेश घेऊन रूहज़ार येतो आणि हैदरला तसाच पेटवून बरोब्बर परिणाम साधतो. हैदर मधले दोन धमाल बावळट सलमान आणि थडगी खोदणारे इसम हे सुद्धा Hamlet मधूनच आलेले आहेत. (थडगी खोदणाऱ्यांचे गाणे आणि त्यांचे मरणाऱ्या माणसाविषयीचे तत्वज्ञान हा प्रकार मात्र माझ्या डोक्यावरूनच गेला. तोपर्यंत अगदी व्यवस्थित चाललेला चित्रपट त्या प्रसंगापुरता अचानक आर्ट फिल्म होऊन जातो आणि झेपेनासा होतो. अगदी इंटरनेटवर वेगवेगळ्या ठिकाणी शोधून/वाचूनही मला त्याचे मूळ Hamlet मधले प्रयोजनच कळले नाही. असो.)
Hamlet मधला सर्वात गाजलेला भाग आहे तो ‘टू बी ऑर नॉट टू बी’ आणि हा प्रश्न विशाल भारद्वाजने कवी मनाच्या हैदरच्या तोंडून इतक्या अप्रतिम काव्यमय संवादामधून मांडला आहे की त्याला सलाम करावासा वाटतो. फक्त त्या संवादापूर्वी आलेले प्रेमगीत हा ‘हैदर’ मधला सगळ्यात डोक्यात गेलेला प्रकार. एक तर ते अत्यंत ठिगळासारखे बसवलेले आहे, ते चित्रपटाचा वेग कमी करते आणि त्यातली गरमागरम दृष्ये ‘असले काही दाखवले नाही तर चित्रपट खपणार नाही’ या विचारातून आल्यासारखी वाटतात. ‘टू बी ऑर नॉट टू बी’ चे द्वंद्व संवादातून दाखवायचे असेल तर त्यापूर्वी आंबटचिंबट काहीतरी दाखवणे गरजेचे आहे असा काही कलात्मक विचार त्यामागे असेल तर तो माझ्या आकलनापलीकडचा आणि अभिरुचीपलीकडचा आहे.
हैदर मध्ये उल्लेखनीय म्हणावेत असे प्रसंग बरेच आहेत पण काही विशेष आवडलेले इथे सांगतो.
पहिला : ‘वेड लागलेल्या’ हैदरचा. सैन्य आणि काश्मीरविषयी एका चौकातला उपहासात्मक एकपात्री performance करणारा या प्रसंगातला शाहीद अभूतपूर्व आहे. खरेतर कमीने मधल्या चार्लीचा अपवाद वगळता मला मनापासून कधीही न आवडलेला हा नट. पण इथे त्याने चेहऱ्यावरच्या झरझर बदलणाऱ्या भावांनी अक्षरशः कमाल केली आहे...
दुसरा : मृतदेहांनी भरलेल्या लॉरी मध्ये आपले वडील आहेत का हे हैदर शोधत असताना अचानक समोरच्या मुडद्यान्मधून एक तरुण स्प्रिंग लावल्यासारखा ताडकन उठतो आणि आपण अजून जिवंत आहोत यावर विश्वास बसत नसल्यासारखा वेड्यासारखा बडबडत पळून जातो... अगदी गोठवणारा प्रसंग !
आणि तिसरा म्हणजे क्लायमॅक्स: थंडीतल्या काश्मिरात आग ओकत झालेल्या लढाईनंतर पांढऱ्याशुभ्र बर्फाळ गालिचावर उरणारे लालभडक रक्ताचे बुट्टे दाखवणाऱ्या अक्षरशः त्या जीवघेण्या फ्रेम्स !!! आणि त्यात सगळ्या लाल चिखलात खुर्रमवर पिस्तुल रोखलेला बंबाळ हैदर.... ‘दो आंखो के बीच गोली मारना’ म्हणणारा बाप आणि ‘हिंसेने हिंसाच वाढते, सूडाने सूडच फैलावत जातो’ म्हणणाऱ्या सासऱ्याचे विचार हैदरच्या गळी उतरवू पाहणारी ग़ज़ाला अशा दोन टोकांमध्ये आंदोलित होणारा हैदर ... शेवटी प्रचंड आक्रोश करतो आणि .... खुर्रमला सोडून देतो. काकाला मारणाऱ्या Hamlet सह सर्वच जण मृत्यमुखी पडतात असा शेवट असणाऱ्या मूळ नाटकापेक्षा हैदर इथे वेगळी वाट पकडतो आणि त्यातून विशाल भारद्वाज खूप महत्वाचा संदेश देऊन जातो... गांधी जयंतीला इतका हिंस्त्र चित्रपट प्रदर्शित करणे आणि अंतिमतः गांधींचाच संदेश ध्वनित करणे हे हेतुपूर्वक असेल तर तो खरंच मास्टरस्ट्रोक म्हणावा लागेल ...
अशी ही हैदरची कहाणी अनेकरंगी, अनेकपदरी ... अगदी Hamlet पेक्षाही जास्त पदर असणारी. याचे मुख्य कारण म्हणजे त्या कथानकाला देण्यात आलेली काश्मीरची चौकट. मूळ पाश्चात्य पार्श्वभूमीवरचे असणारे नाटक हे त्यातले नाट्य तसेच राखून अधिक कालसुसंगत बनवून काश्मीरच्या मातीतलेच वाटावे इतके बेमालूमपणे आपल्यासमोर आणण्याचे विशाल भारद्वाजला सुचलेच कसे असेल याचा मी राहून राहून विचार करतोय. अर्थात या कामी त्याला बशरत पीर या काश्मिरी पत्रकाराचे मोलाचे सहाय्य झाले आहे. (विशालसोबतच तोही हैदरचा पटकथाकार आहे.) आपण अनेकदा काश्मीर प्रश्नाकडे ठराविक चष्म्यातून पाहतो आणि आपापल्या वकुबाप्रमाणे ‘हा मुस्लीम प्रश्न आहे’ किंवा ‘काश्मिरी जनतेला 'identity crisis’ आहे किंवा ‘एवढे आपल्या सैन्याच्या जीवावर जगतात आणि मग त्यांचाच खुशाल निषेध कसा काय करतात’ इ. असे प्रश्न विचारतो किंवा मते बनवतो. हे सगळे प्रश्न/मते योग्य आहेतच. पण त्यापुढे जाऊन काश्मीरप्रश्नामध्ये आणखीही काही छटा आहेतच आणि त्याच छटा हैदर पडद्यावर आणतो. त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे यातले भारतीय लष्कराचे करण्यात आकेले गेलेले चित्रण. यावर अपेक्षेप्रमाणेच गदारोळ देखील झाला . “असल्या द्रोही चित्रपटावर बंदी घाला" वगैरे ओरडून झाले. नेमक्या याच विषयाच्या अनुषंगानेच मी सुरुवातीला उल्लेखलेली अस्वस्थता अनुभवायला लागलो आणि माझ्या डोक्यात प्रश्नांचे काहूर उठायला लागले. खरंच हा चित्रपट लष्कराचे नकारात्मक चित्रण करतो का, असा प्रश्न विचारल्यास प्रथमतः माझ्यालेखी याचे उत्तर ‘हो’ असे आहे. पण म्हणून ही सैन्याची खूप अंधारी अस्तित्वातच नाही असे म्हणणे म्हणजे स्वतःची फसवणूक करण्यासारखे आहे. अगदी सुरुवातीला डॉक्टरचे घर उध्वस्त करण्यापासून ते गुप्त छावण्यांमध्ये ठेवलेल्यांवर केल्या जाणाऱ्या अमानुष अत्याचारांपर्यंत खूप नावडत्या आणि नकारात्मक गोष्टी यात विस्तृतपणे दाखवल्या आहेत .... आणि इथेच खरी प्रश्नांची गोची व्हायला लागली. विशाल भारद्वाजने असे का केले असेल ? तो चांगली बाजू दाखवू शकला नसता का ? सैन्याची इतकी मदत होते ते त्याने का दाखवले नाही ? आता आली का पंचाईत !!! खरंच सर्जनशील व्यक्तीला “तू अमकेच का मांडतोस ? तमकेच का मांडत नाहीस असे विचारता येते ? बंधन घालता येते ??" असे विचारता येते ? मला कुणी विचारले तू ‘वावटळ आणि हैदर वर का लिहितोस ? ‘मै हू ना’ किंवा ‘दिल तो पागल’ है वर लिहायला काय झाले तर मी ऐकून घेईन ?? मग मला विशाल भारद्वाजला हा सल्ला द्यायचा अधिकार आहे ?
खरेतर या ‘एका बाजूच्या’ आग्रहाच्या पोटात दुसरे एक वास्तव लपलेले असते. ते म्हणजे ‘दुसरी बाजू’ ऐकण्यातली (मान्य करणे फार लांबची गोष्ट आहे) आपली असहिष्णुता. आणि त्यातही ते अप्रिय सत्य असेल तर मग आपण तिकडे काणाडोळाच करतो. एकूण सैन्याच्या संशयाच्या नजरेमुळे खरंच काश्मिरींना जगणे दुष्कर होत नसेलच का ? ठाम ‘नाही’ म्हणायला जीभ रेटत नाही माझी. याच संदर्भात एक क्रूर विनोद हैदर मध्ये येतो. एक माणूस (हा cameo स्वतः बशरत पीरने केलाय) स्वतःच्या घराबाहेर घुटमळत असतो, बायको आत बोलवत असते पण पठ्ठ्या जातच नसतो. तितक्यात रूहज़ार तिकडे येतो, त्याला दरडावून झडती घ्यायच्या आविर्भावात त्याच्याकडचे ओळखपत्र दाखवायला सांगतो. ते दाखवल्यावर मग कुठे तो मनुष्य स्वतःच्या घरात जातो. रूहज़ार टोला मारतो "लोकांना संशय आणि झड्तीची इतकी सवय झालीये की त्याशिवाय ते पुढे सरकतच नाहीत”. अख्ख्या थेटरमध्ये हशा पिकला ... मला जमलेच नाही..
ज्यांचे नवरे ‘बेपत्ता’ आहेत अशा काश्मिरातल्या अनेक स्त्रियांच्या नशिबी हाफ-विडो हा स्थानिकांच्या संकल्पनेतला स्टेटस असतो. अश्या बायका आणि अन्य कुटुंबीय वेळोवेळी मोर्चे काढतात, पोलिसांकडे चकरा मारतात पण हाती फारसे काही लागत नाही. एका प्रसंगात एका लष्करी अधिकाऱ्याला पत्रकार प्रश्न विचारताना ‘बेपत्ता’ नागरिकांचा आकडा अमुक अमुक आहे असे म्हणतो तेव्हा त्या अधिकाऱ्याचे उत्तर असे येते “बेपत्ता नागरिकांचा हा आकडा खरा नाही कारण विस्थापित हिंदू पंडितांचा आकडा ‘बेपत्ता’ यादीमध्ये गणला तर तो काही लाख येईल! ” पडद्यावरचे ते वाक्य ऐकले आणि तोपर्यंत माझ्या हिंदू मनामध्ये कुठेतरी बऱ्याच वेळापूर्वी निर्माण झालेला तरंग अगदी पृष्ठभागावर आला – या आणि आजपर्यंतच्या इतरही विस्कटलेल्या रांगोळीत काश्मिरी पंडितांचे रंग मला कुठेच का दिसत नाहीत ? की काश्मिरी जनतेला सोसावे लागणाऱ्या सगळ्या वेदना फक्त तिथल्या मुस्लीमांच्याच नशिबी आहेत ? असतीलही – कारण तिकडे वेदना अनुभवण्याइतका हिंदू शिल्लक कुठे राहिलाय ! कुणाला यावर चित्रपट काढावासा नाही वाटत नसेल? अधिकाऱ्याच्या तोंडून विशाल भारद्वाज बोलतोय असे म्हटले, तर मग मी विशाल भारद्वाजला हा प्रश्न विचारू का ? पण शिंचा तो सर्जनशीलतेचा आणि सक्तीचा प्रश्न पुन्हा पुढ्यात आहेच ... साक्षात सैन्याची नकारात्मक बाजू दाखवणारा चित्रपटसुद्धा आला, मग विस्थापित काश्मिरी हिंदूंवर, त्यांना हाकलून देणे / मारणे / बाटवणे आदी योजनाबद्ध षड्यंत्रावर आधारित चित्रपट काढण्याचे धाडस खरंच एखादा चांगला आणि प्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक दाखवेल का ? (मी ‘प्रसिद्ध’ म्हणतोय कारण या विषयावर यापूर्वी अशोक पंडित नावाच्या दिग्दर्शकाचा ‘शीन’ नावाचा चित्रपट दहा वर्षापूर्वी आला होता आणि कुत्ते की मौत मेला होता.)
एकूण काय हैदरने माझ्या मनात प्रश्नांचे मोहोळ उठवले. एक रुपांतर म्हणून हैदर श्रेष्ठ आहेच पण त्याच सोबत ‘अप्रिय पण सत्य असणाऱ्या घटनांकडे आपण धाडसाने पाहू शकतो का ?’ यासंदर्भातले प्रश्न त्याने – निदान माझ्यापुरते तरी - उपस्थित केले असल्यामुळेही मला तो चांगला चित्रपट वाटतो... पण त्याचवेळी माझे दुसरे मन (हिंदू मन ?) सैन्याबद्दल काहीच चांगले न दाखवल्याबद्दल, त्यातली एका गटापुरतीच असणारी ‘काश्मिरियत’ याबद्दल तक्रार करत राहते आणि ते सांगावे/विचारावे की सर्जकाला असे प्रश्न विचारणे फिजूल आहे असे स्वतःला समजावून चांगल्या बाजूंचे कौतुक करून गप्प बसावे, असा प्रश्न मलाच छळत राहतो... ‘टू से ऑर नॉट....’ हे द्वंद्व हे असे आहे .... ....
सुन्दर लेखन्शैली. नक्की बघणर.
सुन्दर लेखन्शैली. नक्की बघणर.
या आणि आजपर्यंतच्या इतरही
या आणि आजपर्यंतच्या इतरही विस्कटलेल्या रांगोळीत
काश्मिरी पंडितांचे रंग मला कुठेच का दिसत
नाहीत ? की काश्मिरी जनतेला सोसावे
लागणाऱ्या सगळ्या वेदना फक्त
तिथल्या मुस्लीमांच्याच नशिबी आहेत ?
असतीलही – कारण तिकडे
वेदना अनुभवण्याइतका हिंदू शिल्लक कुठे
राहिलाय!
>>>
हिंदू सहिष्णू (!?) होत चाललाय, हिंदूंच्या समस्या "धार्मिक आणि जातिय" अशी लेबल्स लावून दुर्लक्ष केल्या जातात.
काश्मिरी पंडितांचे एकतर शिरकाण झाले किंवा धर्मांतर.
यातून जे वाचलेत ते दिल्ली वा पंजाबमधे स्थलांतरीत झालेत.
दिल्लीत, चंडीगढ़मधे असे बरेच टिक्कू, मट्टू, पंडिता, कौल आणि रैना आडनावाचे लोक मिळतील, ज्यांना त्यांच्याच घरातून अशा शेकडो हैदरांनी हाकलून लावले आहे.
मस्त परीक्षण... अगदी हेच आणी
मस्त परीक्षण...
अगदी हेच आणी असेच वाटत राहीले बघताना आणि बघितल्यावर ही!..
"लोकांना संशय आणि झड्तीची इतकी सवय झालीये की त्याशिवाय ते पुढे सरकतच नाहीत”. अख्ख्या थेटरमध्ये हशा पिकला ... मला जमलेच नाही..>>>>
अगदी.. भयाण वाटलं बघुन!
एकूण काय हैदरने माझ्या मनात प्रश्नांचे मोहोळ उठवले. एक रुपांतर म्हणून हैदर श्रेष्ठ आहेच पण त्याच सोबत ‘अप्रिय पण सत्य असणाऱ्या घटनांकडे आपण धाडसाने पाहू शकतो का ?’ यासंदर्भातले प्रश्न त्याने – निदान माझ्यापुरते तरी - उपस्थित केले असल्यामुळेही मला तो चांगला चित्रपट वाटतो... पण त्याचवेळी माझे दुसरे मन (हिंदू मन ?) सैन्याबद्दल काहीच चांगले न दाखवल्याबद्दल, त्यातली एका गटापुरतीच असणारी ‘काश्मिरियत’ याबद्दल तक्रार करत राहते आणि ते सांगावे/विचारावे का चांगल्या बाजूंचे कौतुक करून गप्प बसावे, असा प्रश्न मलाच छळत राहतो... ‘टू से ऑर नॉट....’ हे द्वंद्व हे असे आहे ....>>>>
हेच अपे क्षीत होतें बहुदा!
सुंदर लिहिलेय !
सुंदर लिहिलेय !
लेखन आवडले >>>>मग विस्थापित
लेखन आवडले
>>>>मग विस्थापित काश्मिरी हिंदूंवर, त्यांना हाकलून देणे / मारणे / बाटवणे आदी योजनाबद्ध षड्यांत्रावर आधारित चित्रपट काढण्याचे धाडस खरंच एखादा चांगला आणि प्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक दाखवेल का ? (मी ‘प्रसिद्ध’ म्हणतोय कारण या विषयावर यापूर्वी अशोक पंडित नावाच्या दिग्दर्शकाचा ‘शीन’ नावाचा चित्रपट दहा वर्षापूर्वी आला होता आणि कुत्ते की मौत मेला होता.) >>>>
(काश्मिरी) हिंदूंच्या वेदना, हत्या, त्यांच्यावर होणारे अत्याचार, बलात्कार यांना न्युज व्हॅल्यु आणि एकंदर किंमत, दोन्ही नाही. त्यामुळे त्यांच्यावर काढलेले सिनेमे चालतील, ही भाबडी आशा मला आजही नाही.
हे वाचा:
My name is not Khan, I am Mr Kaul
हैदर बरा वाटला ,पण काही
हैदर बरा वाटला ,पण काही वेळेला दिग्दर्शक दहशतवादाच्या बाजूने बोलतोय की काय असा भास होतो.
लेख आवडला.
लेख आवडला.
लेख आवडला.
लेख आवडला.
लेख आवडला +१
लेख आवडला +१
मस्त लिहिलंय..
मस्त लिहिलंय..
छान लिहीलय..आवडलं..
छान लिहीलय..आवडलं..
खुप छान लिहिलयं, लेख आवडला.
खुप छान लिहिलयं, लेख आवडला.
चांगल परिक्षण. काश्मिरी
चांगल परिक्षण.
काश्मिरी पंडितांचे रंग मला कुठेच का दिसत नाहीत ? या तुमच्या प्रश्नाने मी काही वर्षापूर्वी जम्मू मार्गे डलहौसी ला फिरायला गेलो होतो. तेव्हाची एक आठवण जागी झाली. हे बहुतेक मी आधी ही लिहिलय. अनेकदा हजार शब्दांचे लेख लिहुन, शेकडो पानांचे ग्रंथ लिहुन जे सांगावे लागेल ते सत्य सामान्य माणसे बोलता बोलता फक्त काही वाक्यात सहज सांगून जातात. जम्मूला मी मुद्दाम तिथल्या सिटीबसनेच फिरलो. रघुनाथ मंदीरात दर्शन घेउन मग काली बाग बघण्यासाठी निघालो, बस मधून उतरून एकाला रस्ता विचारला तो म्हणाला दुसरी बस पकडावी लागेल कुठुन ते दाखवतो अस म्हणून तो सोबत चालू लागला. मी मुंबईतून आलोय म्हटल्यावर मराठीत बोलू लागला. जवळ जवळ वीसेक वर्ष तो मुंबईत राहिल्याने त्याला मराठी चांगल येत होत. " तुमच जम्मू शहर चांगलच मोठ शहर दिसतय" काही तरी बोलायच म्हणून मी बोललो. "आधी इतक मोठ नव्हत, घाटीतून जे हिंदू निर्वासीत आले त्यांच्या येण्यामुळे या शहराचा घेरा वीस किलोमीटर वाढला. " किती लोक निर्वासीत झाले असतील याचा विचार करीत मी अबोल झालो.
फिल्म इण्डस्ट्रीत एक अनुपम खेर व पत्नी किरण खेर यांच्या व्यतिरिक्त कुणीही कश्मीर च्या पंडीतां बद्दल क्वचितच बोलतं. ढोंगी धर्मनिरपेक्षता आडवी येते.... असो, हे माझ मत आहे सर्वांना मान्य असावच अस काही नाही.
छान लिहिलय, आता शोधून बघते हा
छान लिहिलय, आता शोधून बघते हा चित्रपट. धन्यवाद
हैदर पाहून मी खूप प्रभावित
हैदर पाहून मी खूप प्रभावित झालो होतो. मी एक भरभरून स्तुती करणारा लेखही लिहिला. पण अनेकदा हा एक आवेग असतो. तो ओसरला की आपण नव्याने विचार करू शकतो, करू लागतो. त्याच संदर्भांकडे आपण वेगळ्या कोनातून पाहतो.
लहानपणी चुकीच्या संगतीत रमू पाहुन, दहशतवादाकडे वळण्याचं लक्षण दाखवणाऱ्या 'हैदर'ला त्याचे आई-वडील लगेच शिक्षणासाठी बाहेरगावी पाठवून देतात. तिथे त्याच्यासोबत असं काय घडतं की तो सिस्टीमवर इतका नाराज असतो ? - उत्तर मिळत नाही.
त्याच्या डॉक्टर वडिलांनी दहशतवाद्यांना किंवा असं म्हणू की सरकारच्या विरोधात कारवाया करणाऱ्या लोकांना - भले उपचारार्थ का असेना - स्वत:च्या घरात थारा दिला. हा देशद्रोह आहे. त्या माणसांनी सैन्यावर गोळीबार, रॉकेट्स मारून एका सैनिकाला ठार केले. हा खून आहे. त्यामुळे पेटून उठलेल्या ऑपरेशन इन चार्जने म्हटलेलं वाक्य - 'No bloody militant, dead or alive, is worth my soldier's life' - मला तरी जाम आवडलं आणि पटलंही. एक नेता म्हणून जर माझ्या टिममधील कुणावर अन्याय होत असेल तर त्याचा मी बदला घेणारच. अतिरेक्यांच्या हल्ल्याविरुद्ध हल्ला करताना घरच उडवून देणे, हे अति असलं, तरी आवेगात झालेलं असतं आणि जे मरतात ते काही विधायक कार्य करत नसतात. त्याच्या डॉक्टर वडिलांना सैन्यदल पकडून नेतं, ते काही फसवून किंवा गोवून नाही.
ह्या सगळ्यात अन्याय काय झाला आहे की हैदरने पेटून उठावं ?
सैन्याकडून होणारे अत्याचारच फक्त ह्या चित्रपटात दाखवले गेले. अतिशय प्रतिकूल हवामानात मेहनत करून दळणवळण सुविधा उपलब्ध करून देणारे जे जवान मी मागच्या वर्षी लदाखला पाहिले, ते ९५ च्या काळात तिथे नव्हतेच का ? कुठलेच समाजहितार्थ कार्य सैन्याकडून होत नव्हतं की काय ?
मला आठवतंय, ९५ च्या आसपासच्या काळात वर्तमानपत्रात रोज म्हणजे अक्षरश: रोज काश्मीरमध्ये गोळीबार, धुमश्चक्री, हत्याकांड ह्या बातम्या असायच्याच. आज नसतात. ही शांतता आहे की दहशत ?
काश्मीरमधले मूळ स्थानिक लोक - पंडित - त्यांचं काय ? ते कुठे गेले ?
पटकथा लेखक 'बशरत पीर'च्याच नजरेतून काश्मीर व काश्मीर प्रश्न पाहिला गेला आहे का ? हे पीरसाहेब फुटीरतावादी लेखक, पत्रकार आहेत ना ?
'हैदर' पाहिला. 'हैदर'वर लिहिलं आणि नंतर 'हैदर'बद्दल बरंच काही वाचनात आलं. सुरुवातीस मी ते दुर्लक्षिलं, पण हळूहळू विचार करायलाच लागला आणि आता असं वाटतंय की खूपच एकांगी विचार केला गेला आहे. अर्थात, हा तर वर्षानुवर्षं चालला आहे.
गिनतियों में ही गिने जातें हैं हर दौर में हम
हर कलमकार की बेनाम खबर के हम हैं
- निदा फाजली
रसप +
रसप + १००००००००००००००००००००००००००००
हीच कथा खरी तर दुसर्या
हीच कथा खरी तर दुसर्या बाजूनीही तशीच लिहीता आली असती. एका जखमी भारतीय सैनिकाला हैदरचे वडील घरात घेतात उपचारासाठी, त्या मुळे अतिरेकी त्यांना मारतात असे दाखवता आले असते.
पण जिथे खायला मिळते तिथेच घाण करायची ही घाणेरडी वृत्ती आहे.
असले सिनेमा कीती का चांगले असु देत, पण बघायला न जाणे भारतीयांच्या हातात आहे. एकदा निर्मात्याला पैश्याचा बांबू बसला की पुढच्या वेळी असली कथा घ्यायची हिंम्मत होणार नाही.
पण दुर्दैवाने कारगिल युद्ध चालु असताना भारत पाकीस्तान मॅच बघत बसणार्या भारतीयांकडुन काय अपेक्षा करणार.
टोचा, अगदी पटलं.
टोचा, अगदी पटलं.
रसप, तुम्ही वर जे लिहिलेत ते
रसप, तुम्ही वर जे लिहिलेत ते प्रश्न प्रत्यक्ष चित्रपट पाहताना मला पडत होते आणि त्यामुळेच मला चित्रपटाला मध्यंतरानंतर जे काश्मिर दहशतवाद्यांचे, त्यांना देण्यात येणा-या त्रासाचे आणि त्यांच्यावरच्या अन्यायाचे ठिगळ लावलेय ते पुर्णपणे अनावश्यक वाटले.
पहिल्या भागात चित्रपट व्यवस्थित मुळ कथेनुसार जात असतो आणि मध्यंतरानंतर अचानक चित्रपटाचा फोकस हैदर सोडुन तिथल्या फुटिरतावादी काश्मिरींना कसे छळले जात आहे यावर येतो. हे किती खरे खोटे हे जरी क्षणभर बाजुला ठेवले तरी कथानकाच्या दृष्टीकोनातुन हे पुर्णपणे अनावश्यक होते. यामुळे कथेला आणि हैदरच्या व्यथेला कसलीही मदत होत नाही. बापाचा अन्यायाने खुन आणि त्याचा बदला हे मुळ कथानक झाकोळुन जाते.
बापावर अन्याय झाला असे फक्त हैदरला वाटत राहते. समाजातील आपल्या मोठेपणाचा फायदा घेऊन डोक्टर अतिरेक्यांना मदत करतो हे आधीपासुनच समोर आल्यामुळे आपल्याला त्याच्यावर अन्याय वगैरे झाला असे सुरवातीपासुन वाटत नाहीच पण नंतर नंतर तर असल्या देशद्रोह्यासाठी अशीच शिक्षा हवी असे वाटायला लागते. विशाल भारद्वाजकडुन अशी अपेक्षा नव्हती.
बापावर अन्याय झाला असे फक्त
बापावर अन्याय झाला असे फक्त हैदरला वाटत राहते. समाजातील आपल्या मोठेपणाचा फायदा घेऊन डोक्टर अतिरेक्यांना मदत करतो हे आधीपासुनच समोर आल्यामुळे आपल्याला त्याच्यावर अन्याय वगैरे झाला असे सुरवातीपासुन वाटत नाहीच पण नंतर नंतर तर असल्या देशद्रोह्यासाठी अशीच शिक्षा हवी असे वाटायला लागते. विशाल भारद्वाजकडुन अशी अपेक्षा नव्हती.>>>>>>>>>>>>>१०००+++
हा PICTURE बघताना पडलेले सर्वात मोठा प्रश्न कि त्या हैदर ची आई त्या काकावर एवढी फिदा दाखवली आहे ती शेवटी स्वतःच्या पोटाला बोब्म बांधून नेमकी कोणाला उडवायला जाते??????स्वतःला...... तर ती एक पिस्तुल घेवून गेली असती तरी चालले असते. शिवाय तो इरफान खान नेमका त्याचा यात काय रोले तेच समजले नाही......